० पद १९९ वें
उपकाराच्या राशी । जाल्या जी अनंता । उतराई आतां । काय व्हावें ॥१॥
संकटीं रक्षीलें । ब्रीद साच केलें । मज उद्धरीलें । अनाथासी ॥२॥
अनाथाचा नाथ । नाम तुज साजे । मनोरथ माझे । सिद्धी नेले ॥३॥
सीनलो भागलों । संसारीं तापलों । तुज शरण आलों । मायबापा ॥४॥
क्षेम देउनीयां । सुखी केलें मातें । मस्तक अनंतें कुर्वाळीलें ॥५॥
केशव म्हणे माझा । अंगिकारू केला । उदरीं ठाव दिला । जगन्नाथें ॥६॥
० पद २०० वें (जत्या केशवाच्या)
संसार-सांखळी । तोडिली गुरुनाथें । भवबंधाहुनी मातें । सोडवीलें ॥१॥
यासी उतराई । केविं काय आतां । जेणें घरदारीं नांदतां । मुक्त केला ॥२॥
मस्तकीं निजकर । ठेउनी सादर । विश्रांतीचें घर पाववीलें ॥३॥
मुक्तीचें सांकडें । फेडुनी तत्वतां । निज० पदीं आइता ।
ठाव दिल्हा ॥४॥
रंकाचें मी रंक । अनाथ बापुडें । मजलागीं येव्हढें । सुखी केलें ॥५॥
केशव स्वामी थोर । कृपेचा सागर । तेणें पैलपार । पाववीलें ॥६॥
० पद २०१ वें
मारीलें गांजीलें । बहुत वीटंबीलें । देहाचें वर्तलें । आठवेना ॥१॥
याचे पाय आतां । वंदीन मस्तकीं । ब्रम्हानंदे सुखी । सहज होसी ॥२॥
सभाग्य साधुजन । निजबोधीं मग्न । देहत्रयाचें भान । कैंचें त्यांसी ॥३॥
कैंची त्यांसी सीमा । कैंची हे अविद्या । जीव शीव वंध्या । पुत्र झाले ॥४॥
स्वसुखें राहिलें । सर्व विसरलें । वंदितसे पाउलें । समाधी त्याचे ॥५॥
समाधीचें घर । जालें निरंतर । धन्य योगेश्र्वर । तिहीं लोकीं ॥६॥
केशव म्हणे त्याची । सर्वदा संगती । निज० पदीं विश्रांती । आम्हांलागीं ॥७॥
सद्गुरुनाथें ज्ञान। दीपक लाविला । देव तो दाविला । परात्पर ॥१॥
देवाचिये पायीं । सुख झालें केव्हढें । ब्रह्मांड येवढें । हरपलें ॥२॥
नाहीं रूपरेखा । स्वयंभू तो देखा । ऐसीया व्यापकां । नित्य भेटों ॥३॥
देवासी भेटतां । भक्त तो आटला । देविं देवो दाटला । केशव म्हणे ॥४॥
० पद २०३ वें
मंत्रसार मनीं । नित्य आठवुनी । सौंसारापासोनी । मुक्त झालों ॥१॥
गेली गेली माया । अविद्यादि लया । विश्रांतीच्या ठाया । लागीं आलों ॥२॥
स्वानंद-सं० पदा । पावलों सर्वदा । सुख-दुःखाची बाधा । नाहीं मळ ॥३॥
सरले शोक मोहो । नेणें मी संदेहो । जाले चारी देहो । शून्य माझे ॥४॥
केैचें पाप-पुण्य । सहज चैतन्य । जालों धन्य धन्य । आत्मलाभें ॥५॥
माझ्या ठायीं कांही । मी-तूं पण नाहीं । माझा मीच पाही । होउनी आसे ॥६॥
केशव म्हणे माय । सांगों आतां काय । फळलें ऐसे पाय । गुरुरायाचे ॥७॥
० पद २०४ वें
श्रवणीं म्यां हे ऐकिलें येक वो । नयनिं म्यां हें देखिलें येक वो ॥१॥
गुरुवाक्यें वोळखिलें येक वो । एकपणीं नित्य नवें सुख वो ॥२॥
सर्व कर्मीं साधीलें येक वो । आत्मबोध लाधलें येक वो ॥३॥
एकपणेविण तें येक वो । केशवराजीं फावलें देख वो ॥४॥
० पद २०५ वें
आत्माराम हृदयकमळीं । सिद्ध आहे तुजचि जवळी ॥ध्रु॥
त्रिजटा म्हणे वैदेही वेल्हाळे । परतुनि राम पाहे तूं भूबाळे ॥१॥
व्यर्थ शोक करणें काय वो । सर्व भूतीं रामचि आहे वो ॥२॥
सर्वव्यापी सर्वांसी जवळा । राम कोठें नाही वो वेगळा ॥३॥
सर्वगत रामासी जाणोनी । सुखें राहे अशोक सुवनीं ॥४॥
केशवप्रभु यापरी दावितां । सीता-राम लाधली तत्वतां ॥५॥
० पद २०६ वें
संशयनिवृति वस्तूचें दर्शन । पूर्वपुण्यें जालें तो संपूर्ण ॥ध्रु॥
तेणें माझें हरपलें मीपण । सदोदित कोंदलें चैतन्य ॥
सखी ये कैसें नवल वो वीतलें । माझें मन स्वरूपीं गुंतलें ॥१॥
निरामय निर्गुण निष्कळ । निजानंदघन वो निर्मळ ॥
परमधाम साधूचें केवळ । तेथें चित्त राहिलें निश्र्चळ ॥२॥
येकपणेवीण तें येकलें । निजरूप सर्वदा संचलें ।
सद्गुरुकृपें केशवीं फावलें । जन्ममरण-दरिद्र नाशलें ॥३॥
० पद २०७ वें
मानस माझें भुललें आजी वो । पूर्वस्थिती पालटली माझी वो ॥ध्रु॥
दीनानाथें केलीवो झडपनी । आतां कैसकं करूं मी साजनी ॥१॥
देहीं देहभावना न कळे । द्वेताद्वैत संकल्प मावळे ॥२॥
नवल केशवस्वामीची करणी । निर्विकल्प स्थापिलें चरणी ॥३॥
० पद २०८ वें
पाहों जंव गेलीये आपणा । तंव मी वो मुकलें मीपणा ॥ध्रु॥
स्वानुभवें भोगीतां निजखुणा । सहज तेथें राहिली धारणा ॥
आतां काय सांगू वो सखीये । सांगतां मज नये ग बाईये ॥१॥
मनाचें वो मोडलें मनपण । स्मरणेसी नाठवे विस्मरण ॥
सुखाचेंही राहिलें स्फुरण । तेथें सांगे अनुभऊ कवण ॥२॥
आपोआप निमाला विस्मयो । स्थिती तेही पांगली अवलयो ॥
सद्गुरुकृपें केशवीं अवलयो । तेथें कवण सांगे हा परिचयो ॥३॥
० पद २०९ वें
ब्रह्मारण्यीं आमुचें असनें । सहजाचें वल्कलें नेसणें ।
अधिष्ठानीं आम्हांसी बैसणें । सुख-तरु-छायेसी बैसणें ॥ध्रु॥
येकैयेक येकला येकट । निरंजनीं राहिलों निकट ॥
त्यजुनि माया-प्रपंच फलगट । ब्रह्मवन सेवीलें बळकट ॥१॥
दृश्य वार्ता नायकों श्रवणीं । भेदु कैसा न देखों नयनीं ॥
मुक्त झालों सकळांपासुनी । सहजीं सहज क्रीडत येकपणीं ॥२॥
संग आम्हीं सर्वही सांडीला । निराकारीं आश्रमू बांधला ॥
गुरुकृपें केशवीं येकला । येकपणेवीण तो संचला ॥३॥
० पद २१० वें
निजधैर्य नागर धरुनी । मोहकुट सांडीले काढुनी ।
ज्ञान-भक्ती-वैराग्यें तिफणी । अति शुद्ध केली हे मेदिनी ॥ध्रु॥
श्रवणाचें चाडें हें धरिलें । गुरुमुखें निजबीज पेरिलें ॥१॥
सद्भावाचा वरुषला निजघन । परिपूर्ण पीकलें चैतन्य ॥
तेथें सत्त्व सोहंकारा राखण । कर्म-पक्षी हांकी तूं आपण ॥२॥
निजबोधें पिकलें शेत हो । स्वानंदाच्या घुमरी येत हो ॥
अनंताच्या राशी हे होत हो । गुरुकृपें केशवीं घेत हो ॥३॥
० पद २११ वें
जुनाट चोर आला वो बहुकाळा । कर्म-झोंप मोडुनि तत्काळा ॥ध्रु॥
त्रिगुणाचें घर वो फोडीलें । भ्रांति-विरदळ हें चोरीलें ॥१॥
स्वबोधाचें खनीत लाउनी । नेलें भेदधन हें काढुनी ॥२॥
केशव म्हणे सर्वही हरलें । सेखीं मज जीवेंचि मारीलें ॥३॥
० पद २१२ वें
जेथें वाचा कुंठीत सकळा । जेथें मती जालीया पांगुळा ॥ध्रु॥
जेथें क्रीया सर्वही निश्र्चळा । तेथें ठाव कैंचा वो गोकुळा ॥
सुखीय ऐसें देखीलें चोज वो । नये गुज सांगतां मज वो ॥१॥
जेथें शून्य दरशनें होती वो । नेति नेति पातल्या श्रुति वो ॥
साधु बुडी जे ० पदीं देति वो । आम्हांलागीं जाली ते प्राप्ती वो ॥२॥
गुणातीत अद्वय पाटणी । नाहीं देतां काळाची वांटणी ॥
स्वानंदाची स्वानंददाणी । केशवराजीं सर्व ही आटणी ॥३॥
० पद २१३ वें
विज्ञानसागरीचा । चंद्र सद्गुरु रावो ।
सर्वदा सुखरूप । त्याचा अमृत देहो ॥ध्रु॥
यालागीं संग त्याचा । गोड अंतरीं वाटे ।
अंतरीं सांठवीतां । भवदुःख हा आटे ॥१॥
अलक्ष योमवासी । ताप त्रिविध नाशी ।
भावार्थ चकोरासी । करी स्वानंदराशी ॥२॥
पूर्णमे पूर्ण भेटे । अंधःकार तैं फिटे ।
विश्रांति वारीधीसी । अति भरतें दाटे ॥३॥
सर्वदा गोड बहु । ० पदीं मिळवा जीउ ।
जीवाचि शिव होय । जाय कल्पना बहु ॥४॥
उदयो अस्तु नाहीं । यासी सर्वथा पाही ।
सर्वांसी निववीतो । सर्व नेणोनि कांही ॥५॥
अनादि-नित्य-सिद्ध । केशवस्वामी हा शुद्ध ।
उदरीं जन्मतां मी । जालों स्वयंभु बुद्ध ॥६॥
० पद २१४ वें
वाचेरी नाम बोलों । बोल ग्रासुनी डोलों ।
डोलासी विसरूनी । तृप्त होउनी ठेलों ॥ध्रु॥
काय तें गुज सांगों । नये सांगतां कोणा ।
वृत्तिसी ठाव नाहीं । केवीं दाखवूं खुणा ॥१॥
अपार सुख दाटे । तेथें संसार आटे ।
देहचिं देह नाहीं । थोर कौतूक वाटे ॥२॥
यापरि संत-पायीं । बोध फावला पाहीं ।
बोधासि ठाव कैंचा । भेद केशवीं नाहीं ॥३॥
० पद २१५ वें
गुरुरायाचें नामसार सेवीं । चित्त सदगुरु-पादांबुजीं ठेवी ॥ध्रु॥
किती सांगों बा तुम्हांप्रती । माझा रामाचि वोळखा मूर्ती ॥१॥
अहं-ममतेचें बीरडें तोडा । मग सच्चिदानंद राम जोडा ॥२॥
म्हणे केशव निश्र्चळ राहा । राम होउनि राम तुम्ही पहा ॥३॥
० पद २१६ वें (सहज चाली)
पूर्ण स्वानंदाचें लेणें । मज लेवविलें हो जेणें ॥ध्रु॥
त्याचे विसरावे जरी पाय । तरी मरणचि वाईट काय ॥१॥
पर वस्तुसि दावुनि दृष्टी । केली चिन्मय अवघी सृष्टी ॥२॥
केशव म्हणे तो माझा पिता । करी नामेंची भवसिंधु रिता ॥३॥
० पद २१७ वें
आम्हा तरील म्हणवुनि आलों । तंव समूळींच बुडवीलों ॥ध्रु॥
त्याचें काय करावें आहीं । जीव घेउनि म्हणवितो स्वामी ॥१॥
नाहीं मीपण उपजलें जेथें । केलें क्षेत्रसंन्यासी तेथें ॥२॥
नाहीं मीपण उपजलें जेथें । केलें क्षेत्रसंन्यासी तेथें ॥२॥
येणें नये तया ठायासी नेलें । केशव म्हणे तो ठावचि केलें ॥३॥
० पद २१८ वें
माझें स्वरूप सुखरूप आहे । मजमाजी रिघोनि पाहे ॥ध्रु॥
तूंही सुखरूप बापा होसी । जरी अंतरी बुडी देशी ॥१॥
मी अखिल सुखाचा सिंधु । परिपूर्ण परमानंदू ॥२॥
म्हणे केशव माझ्या ठायीं । मी-तूंपणाचा बुब्दुद नाहीं ॥३॥
० पद २१९ वें
काळदेहासि आला खावों । आम्ही आनंदे नाचों गावों ॥ध्रु॥
आम्ही ऐसें निर्भय झालों । नित्य अक्षय ठायासीं आलों ॥१॥
काळें गिळिला आमुचा देहो । आम्ही काळची बुडविला पाहो ॥२॥
म्हणे केशव आमुच्या ठाईं । देहासगट काळचि नाहीं ॥३॥
० पद २२० वें
निजडोळियांसी डोळा पाहे । स्वयं डोळाचि होउनि राहे ॥ध्रु॥
भवहरण तयाचे पाय । गोड त्याहुनि सांगों काय रे ॥१॥
डोळा होउनि डोळा आटे । त्याच्या स्मरणेंचि डोळा भेटे ॥२॥
डोळा डोळियांत केला गोळा । म्हणे केशव तो माझा डोळा ॥३॥
० पद २२१ वें
नाहीं बोलायासारीखें । ऐसें कळलें ज्याच्या मुखें ॥ध्रु॥
त्याचें मुख डोळां पाहूं । आम्ही सुखचि होउनि राहूं ॥१॥
मूळ सुखाचें तें मुख । त्याचें मुखचि केवळ सुख ॥२॥
म्हणे केशव मुखचंद्रमा । करि अमृतवृष्टी आम्हां ॥३॥
० पद २२२ वें
मायबाप सद्गुरुरावो । त्यांचा मजवरि मोठा स्नेहो ॥ध्रु॥
मज बरवें ठेवुनि पोटीं । क्षणोक्षणा देतो भेटी ॥१॥
मज वल्लभ कोणिच नाहीं । मग तेणेंचि वरलें पाही ॥२॥
ज्याचा जार त्यासिच भार । आम्हा आणिक कैंचा थार ॥३॥
स्वयं घरजांवई झाला । मजसगट पोटा आला ॥४॥
आतां जाणें नाहीं कोठें । माझें भाग्य बहु मोठें ॥५॥
आम्हां फळलें पाहीं । पार विश्रांतीसी नाहीं ॥६॥
म्हणे केशव सांगों काय । अति बरवे याचे पाय ॥७॥
० पद २२३ वें
माहेराचि घेउनि धनी । आले सासुरयां लागुनी ॥ध्रु॥
तंव बापचि भेटों आला । मज विस्मयो मोठा जाला ॥१॥
अवघें सासुरयाचें घर । झालें माझें निजमाहेर ॥२॥
आतां माहेरा कैसें जावें । मज सासुर नाहीं ठावें ॥३॥
ऐसें कौतुक जालें माय । नाहीं मीपण सांगो काय ॥४॥
म्हणे केशव माझ्या ठाईं । द्वैतभावचि उरला नाहीं ॥५॥
० पद २२४ वें
मोहो-मायेचा अंत जाला । बोध-पुत्र पोटा आला ॥ध्रु॥
ऐसें सुतक पडलें पाहीं । कर्म कांहिच उरलें नाहीं ॥१॥
उभयें सुतकें जालों लाठें । आम्ही अक्षय सुतकी मोठे ॥२॥
आमुचें सुतकें सुतक नाशी । म्हणे केशव सुतकराशी ॥३॥
० पद २२५ वें
चारीं घरें जाळुनि गेला । परी आगिंच जडोनि ठेला ॥ध्रु॥
तयासंव चोराच्या मागें । आम्ही लागलों लागवेगें ॥१॥
पायांमागें ठेवुनि पाय । त्याच्या पायांसि पावलों पाहें ॥२॥
चोर नोहे तो चोरांचा रावो । सर्व ग्रासुनि त्यास विसावो ॥३॥
म्हणे केशव मी दुमदुम आलों । पाय धरितांची तद्रूप झालों ॥४॥
० पद २२६ वें
देव ग्रासुनि प्रगट होतो । माझा आनंद मज भेटि देतो ॥ध्रु॥
तें मी कैसें सांगूं काय । माझें सर्वांग गिळिलें आहे ॥१॥
सुखसिंधूच्या उसळती लाटा । आजी प्रळय जाला मोठा ॥२॥
बोले केशव मंगलचरणी । अति दाटलें सारंगपाणी ॥३॥
० पद २२७ वें
नामरूपाचा जेथें भास । नामरूपचि नाही त्यास ॥ध्रु॥
ऐसें जाणे तो निज योगी । माया नाहीं करूनी भोगी ॥१॥
नामरूपाची घडामोडी होतां । आन उत्पन्न पाहे तत्वतां ॥२॥
संत केशव म्हणे कांही । आतां गलबलची नाहीं ॥३॥
० पद २२८ वें
अहं-ब्रह्म-स्फुरण स्फूर्ती । भास जेथें नाहीं निश्र्चिती ॥ध्रु॥
हा मुळींचा अनुभव पाहीं । जाणे त्यासी पय-पान नाहीं गा ॥१॥
द्रष्टा, दृश्य, दर्शनत्रय । स्फूर्तीपोटी भास होय ॥२॥
संत केशव स्फूर्ती मूळी । पूर्ण स्वानंदे करि कल्होळी ॥३॥
० पद २२९ वें
आम्ही परात्पर परदेशी । अलक्ष-पुरीचे निवासी ॥ध्रु॥
नामरूप नाहीं आम्हां । दिसों परी न येवों कामा ॥१॥
सर्व संगिं संगातीत । निर्धूत निज अवधूत ॥२॥
भोगत्यागातित भोग । केशव म्हणे हा आमुचा योग ॥३॥
० पद २३० वें
गुरुरायाच्या पडलों बंदी। आतां सुटीका नाहीं कधीं ॥ध्रु॥
पाईं बोधाची अखंड बेडी । यकदंडी जोडली गाढी ॥१॥
अति दुर्घट बंदीखान पाहीं । येथें पडल्या उघडचि नाहीं ॥२॥
गुरुमुखें केशव बंदी पडिला । कैसा हृदयिंच जाउनि जडला ॥३॥
० पद २३१ वें
पशुपक्षी नाना याती । जग नांदे आत्मस्थिती ॥ध्रु॥
तेथें कैचें चंड गुणागुण । जग ब्रह्मत्वें संपूर्ण ॥१॥
जग स्वइच्छा क्रीडितां । नाहीं भंगली निजात्मता ॥२॥
गुरुकृपें निजदृष्टी । नाहीं केशवा वेगळी सृष्टी ॥३॥
० पद २३२ वें
देहबुद्धी सारुनी मागें । ब्रह्म जालें जें निजांगें ॥ध्रु॥
तया साधन कोठें आहे । तिहीं साधावें तें काय ॥१॥
स्वयं ब्रह्मचि होउनि ठेलें । सर्व ब्रह्मचि देखते जालें ॥२॥
गुरुकृपें केशवीं पाही । तेथें कांहीच उरले नाहीं ॥३॥
० पद २३३ वें
जेथें येणें जाणें नाही । ते आमुची मिरासी पाही ॥ध्रु॥
बरवें निरंजनपूर । तेथें बांधलें आम्हीं घर ॥१॥
नित्य सुखाचा सुकाळ । नाहीं कल्पांतीं दुष्काळ ॥२॥
म्हणे केशव तया गांवी । असे येकुचि गोसावी ॥३॥
० पद २३४ वें
मन स्वरूपीं रमेना । भवदुःख तंवरी शमेना ॥ध्रु॥
विषई बुद्धीचा पसरू । तंव तव स्वरूपीं विसरूं ॥१॥
चित्स्वरूपी विलासे । निजसुख तरीच प्रकाशे ॥२॥
होतां स्वरूपी तन्मय । कैचें केशवीं भवभय ॥३॥
० पद २३५ वें
आम्ही सकळांहुनि प्रांजळ । आम्ही सकळांपरिस खोल ॥ध्रु॥
आम्ही सकळांहुनि दुरी । आम्ही सकळांचे अंतरीं ॥१॥
आम्ही सकळांचे सांघाती । संग नाहीं आम्हांप्रती ॥२॥
आम्ही सकळांचे गोसावी । सकळ नाहीं अमुचे गांवी ॥३॥
केशव म्हणे अमुच्या धामीं । सहजीं सहज आमुचे आम्ही ॥४॥
० पद २३६ वें
सुखदुःखासी ग्रासुनि राहे । सर्व पाहुनि कांही न पाहे ॥ध्रु॥
आम्ही त्याचिया उदरासि आलों । जन्म-मरणावेगळे जालों ॥१॥
बंध-मोक्षाचा विटाळा कांही । ज्यासी स्वप्न्नी जाला नाहीं ॥२॥
केशव म्हणे कौतुक पाहीं । शून्य हरपलें ज्याचिया ठायीं ॥३॥
० पद २३७ वें
कानावाटे मी नयनासी प्यालों । सेखीं सूर्याचा नयन मी झालों ॥ध्रु॥
ऐसें सद्गुरुनाथें केलें । माझें जितांचि जीवपण नेलें ॥१॥
दृष्टिद्वारा मी सृष्टीसी घोटी । दृष्टि हरपे माझिया पोटीं ॥२॥
केशा म्हणे मी जाणोनि भोळा । माझा सर्वांग जाहला डोळा ॥३॥
० पद २३८ वें
तोंडावाटे वोतुनि कानीं । पाजी अक्षय शीतल पाणी ॥ध्रु॥
त्याच्या भेटीची होतां वाणी । ० पदो० पदी पाविजे हाणी ॥१॥
निजबोधाची उघडुनी खाणी । हरीदरुशनीं हरली वाणी ॥२॥
केशा म्हणे तो विशोक पाणी । दीन होऊनी हृदयासी आणी ॥३॥
० पद २३९ वें
माहेरासि धांवुनि गेलें । मायबाप सुखी केलें ॥ध्रु॥
तो मी आनंद सांगुं काय । सांगुं जातां वाचा राहे ॥१॥
आलें सासुरियांच्या घरा । तंव बापचि भेटे खरा ॥२॥
केशा म्हणे दोन्ही ठायीं । एक माहेर जालें पाहीं ॥३॥
० पद २४० वें
माझा कृपाळु सद्गुरु पिता । तेणें हरिली सकळही चिंता ॥ध्रु॥
माहेराची लागली गोडी । मज नाठवे सासुरवाडी ॥१॥
शांति-मातेच्या ० पदराखालें । माझें जन्मचि सार्थक झालें ॥२॥
नित्य भावाच्या चरणीं लोळे । भक्ति-बहिणीसी घेउनि खेळे ॥३॥
दयाशांति विरली बाळा । सभोंवतां यांचा पाळा ॥४॥
क्षणक्षणां सोहळे होती । मायबाप बहु सुख देती ॥५॥
केशा म्हणे याच्या पायीं । म्यां मिरासी केली पाहीं ॥६॥
० पद २४१ वें
देव दावुनि हरिला देहो । केला संपूर्ण मजला देवो ॥ध्रु॥
देव त्याविण आणिक नाहीं । माझ्या जीवीचा अनुभव पाहीं ॥१॥
देव सर्वही केलें तेणें । परी नाथिलें मीपण नेलें ॥२॥
देव होउनी नाहीं जेथें आम्ही । देवराव तो केशव स्वामी ॥३॥
देव २४२ वें
हात ठेउनि शिरावरी । देव भक्तासी येकचि करी ॥ध्रु॥
त्याचें अखंड सेवन करूं । दीनबंधु तो हृदयीं धरूं ॥१॥
ज्याचें दर्शनें मीपण आटे । जाय त्रिपुटी तैं तो भेटे ॥२॥
केशा म्हणे तो माझा बाप । ज्याचा चौघांसी नसे माप ॥३॥
० पद २४३ वें
गुरुरायाची कृपा झाली । तेणें पूर्विल चुकराई गेली ॥ध्रु॥
आम्ही अखंड प्रेमें धालों । ब्रह्म-भुवनींचे राजे झालों ॥१॥
दुःखदायक भव जेथें आटे । तो सुखनिधी अंतरीं दाटे ॥२॥
केशव म्हणे गुरु० पद-वासीं । जालों मंगळमय अविनाशी ॥३॥
० पद २४४ वें
लिंग लिंगासी शरण गेलें । लिंग लिंगिंच सुखरूप ठेलें ॥ध्रु॥
लिंग लिंगाच्या हाता आलें । अववें लिंगासी लिंगाचि जालें ॥१॥
लिंगें लिंगाचा केला संग । लिंगी लिंगचि जालें अभंग ॥२॥
केशव स्वामीचें आलिंगी लिंग । तेथें लिंगचि जालें आलिंग ॥३॥
० पद २४५ वें
लांब लांब करूनी गोष्टी । तुझ्या स्वरूपीं घालूं मीठी ॥ध्रु॥
आम्हां इतुकेंचि पुरे देवा । सेव्य होउनीयां करूं सेवा ॥१॥
सेव्य-सेवक कांहिच नेणे । परी सेवाचि करूं जाणे ॥२॥
केशा म्हणे घेतां गोडी । निजगोडिच झाली उघडी ॥३॥
० पद २४६ वें
चित धांवुनि चरणीं पडे । तंव भाळींच डोळा पडे ॥ध्रु॥
मायबापाचा प्रसाद जाला । अवघा डोळा हाता आला ॥१॥
कानिं डोळा तोंडी डोळा । हातीं पायीं भरला डोळा ॥२॥
केशव स्वामीची आकळ लीळा । तेणें सर्वांग केला डोळा ॥३॥
० पद २४७ वें
वस्त्र मळकें लेवुनि येती । शुद्ध असतां मळके होती ॥ध्रु॥
धिक् धिक् त्यांचे जिणें । जगामाजी लाजिरवाणें ॥१॥
मळकें आंगी जडोनि ठेलें । तेणें आंगचि मळकें केलें ॥२॥
अति निर्मळ केवळ भले । केशो म्हणे मळके झाले ॥३॥
० पद २४८ वें
जड जीव मी पाव जालों । शिव होउनी पूर्ण निवालों ॥ध्रु॥
ऐसें केलें दयाघन देवें । माय-बाप दिन-बांधवें ॥१॥
सुख स्वरूप जालों आजी । विश्र्व हरपलें हें मजमाजी ॥२॥
जगपाळक मी जगकर्ता । म्हणे केशव मीचि अकर्ता ॥३॥
० पद २४९ वें
मन ब्रह्म-परायण जालें । जन सहजचि मिळुनी आले ॥ध्रु॥
आतां काय करावें माय । आम्हा आणिक उरलें काय ॥१॥
जन नाहींपणें हें पाहों । स्वयं पाहणेंचि होउनि राहों ॥२॥
म्हणे केशव यापरि आहों । परी आहेपणा न साहों ॥३॥
० पद २५० वें
मन मारूनि लक्षिती देवो । त्यासी मृगजळ जाला देहो ॥ध्रु॥
त्याचा देहचि केवळ देवो । श्रुति सांगती निःसंदेहो ॥१॥
मीतूंपणाची हरपे सोय । ऐसी प्रतीती अखंड होय ॥२॥
अति निश्र्चळ मंगळ धामीं । सुख-सागर केशव स्वामी ॥३॥
० पद २५१ वें
गाय देउनि घेतला गोऱ्हो । त्याचे पयपानें जालों मी गोरा ॥ध्रु॥
माझी देहबुद्धिकृशता गेली । सिद्धशाश्र्वत पुष्टी आली ॥१॥
क्षीर नव्हे तो आक्षर-सार । तेणें सुखरूप जालों अपार ॥२॥
केशव म्हणे मी पयपानें धालों । स्वयं अमृतसागर जालों ॥३॥
० पद २५२ वें
देहबुद्धिचें उगवुनि कोडें । कान फुंकुनि लाविलें वेडें ॥ध्रु॥
तेणें सर्वही केले वेडे । नाचे स्वानंदाचें कोडें ॥१॥
जीव सगळे घेउनि रक्षी । माझें सगळेपणही भक्षी ॥२॥
सर्व नहोनि सर्व मी आसें । केशव स्वामीनें ठेविलें ऐसें ॥३॥
० पद २५३ वें
ज्ञानमार्गी आवडी लावी । देव देहिंच उघडा दावी ॥ध्रु॥
यासी उत्तीर्ण कैसेनी व्हावें । मायबापांसी म्यां काय द्यावें ॥१॥
आत्म वैभव अर्पुनि मातें । केलें सुखरूप त्रैलोक्यनाथें ॥२॥
म्हणे केशव सांभाळ केला । ठाव अखंड उदरीं दिला ॥३॥
० पद २५४ वें
भेटीकारण वैकुंठनाथ । वाट जयाची पहात ॥ध्रु॥
संत सापडले ते माय । ज्याचे देवासी दुर्लभ पाय ॥१॥
ज्याच्या नामें सर्वही काळ । ब्रह्मसुखाचा सुकाळ ॥२॥
म्हणे केशव भेटी जाली । सर्व सिद्धी हाता आली ॥३॥
० पद २५५ वें
काळ निःशेष ग्रासित जो कीं । दीनवत्सल स्वामी तो कीं ॥ध्रु॥
फळे फळीत याचे पाय । मज आठवती ग माय ॥१॥
हरी अंतरी दाउनि डोळा । करी आनंद वेळोवेळां ॥२॥
म्हणे केशव चित्सुखदाता । आला अक्षय लाभू हाता ॥३॥
० पद २५६ वें
भगवंती लावुनि रती । संसाराची केली शांती ॥ध्रु॥
माय माझी आनंदवती । इची महिमा वानूं किती ॥१॥
बोध आनंदवतीनें केला । भेद अद्वयवतीनें नेला ॥२॥
माय नव्हे ते अक्षय सती । केला केशव चित्सुखपती ॥३॥
० पद २५७ वें
गेली विरोनि मायेचि राती वो । आला हृदयासी बोधगस्भती वो ॥ध्रु॥
नवल-उदय जाला बाई आजी वो । ज्ञानमार्तंड उगवला
सहजीं वो ॥१॥
जाला निर्बिब निजप्रकाश वो । प्रभा कोंदाटली अविनाश वो ॥२॥
उदो-अस्तुवीना उदयो जाला वो । केशव आंगचि दिनकरू
केला वो ॥३॥
० पद २५८ वें (राग-कांबोध)
आकाशीं राहोनी पाताळीं खेळे । बाहेरी आंधळे अंतरी डोळे ॥ध्रु॥
आपले जीवीचें गुज तें सांगों । ऐके तयासी समाधी लागो ॥१॥
नामरूपाविण संचलों पाही । आकारलें परी जन्मलें नाहीं ॥२॥
आहेपणें ते कोठेंचि नाहीं । नाहींपणें तें नांदतें देहीं ॥३॥
क्षरीं अक्षरमय तें साचें । क्षराक्षरातीत स्वरूप त्याचें ॥४॥
कृपा हस्तक ठेवुनि माथा । केशव म्हणे मज भेटलें आतां ॥५॥
० पद २५९ वें (घाटी-रामकळी)
आनंदसागरीं । दिधलीया बुडी । आठवेना गोडी । संसाराची ॥ध्रु॥
ज्याचें सुख तोची । जाणे पै रे भाई । इतर नेणती कांही । प्रेमसुख ॥१॥
जाणोनी नेणणें । नेणोनी जाणणें । आपलीयापणें । आपणची ॥२॥
गुरुकृपाबोधें । निजदशा पावला । सर्वदा राहिला । अढळ० पदीं ॥३॥
केशव म्हणे त्याचीं । लक्षितां पाउलें । जिवत्व निरसीलें । शिवत्वेंसी ॥४॥
० पद २६० वें
अंतरी पालटु जाला नाहीं मना । तंववरी चिद्धना पाविजेना ॥ध्रु॥
पावलीयाची खूण यापरी जाणीजे । सर्वदा होईजे सुखरूप ॥१॥
ब्रह्म सनातन होउनी पावन । सहज जालेपण विसरला ॥२॥
गुरुकृपें केशवीं अनुभवें पावला । पावतांची झाला तेंची रूप ॥३॥
० पद २६१ वें
आपलीया घरीं आपण राज्य करीं । सर्वथा बाहेरी पाउलें न घाली ॥ध्रु॥
प्रपंचाचा वारा नलगे त्या सुकुमारा । आनंदाचा वोवरा पहुडला असे ॥१॥
आपलें आपण सुख भोगी तोचि योगी । माया-कवच वेगीं फेडुनियां ॥२॥
जागृती-स्वप्न्न-सुषुप्ती-तुरीया-उन्मनी । पंचमुद्रा सारूनी योग निद्रा अखंड ।
घेतु तेथें सहजीं सहज पूर्ण उरलेंसें आपण । हेंही सरलें स्फुरण आपणामाजी ॥४॥
ऐसीया योगभूमिका पावोनी मोक्ष देखा । स्वयंभ स्वसुखा आरूढला ॥५॥
आरूढलीय दशे मीतूंपण नसे । केशवीं समरसें दुजें नवीण ॥६॥
० पद २६२ वें
द्वैतासी रुसोनी अद्वैतीं निजेला । शेखी तेंही गेला विसरोनी ॥ध्रु॥
नवल निद्रा कैसी योगिया बाणली । विश्रांती फावली अखंडीत ॥१॥
जीवदशा ओसरे मीतूंपण नुरे । स्वानंदे पडिभरें निज घेतु ॥२॥
गुरुकृपें केशवीं यापरी निजेला । निजीं निजरूप ठेला होउनीयां ॥३॥
० पद २६३ वें
जन्मेसी मरण निःशेष भक्षी । निजरूप दृष्टीवीण लक्षी ॥ध्रु॥
देखणा रे तोचि देखणा रे । भुलला आपण आपणा रे ॥१॥
दृश्य नाहीं तें देखिजे कायी । यापरी जें देखियलें पाहीं ॥२॥
गुरुकृपें केशवीं देखणी सिद्धी । देखणेपणाची राहिली विधी ॥३॥
० पद २६४ वें
नामरूपाची घेउनि बुंथी । नांदती जगीं आत्मप्रतीती ॥ध्रु॥
नाम कैंचे तया रूप कैंचे । निजांनंदघन स्वरूप त्याचें ॥१॥
प्रालब्धकर्में वर्ततां देहीं । देहत्रयाचा हेतुचि नाहीं ॥२॥
गुरुकृपें केशव पावलें साचा । वेंच करुनियां मीपणाचा ॥३॥
० पद २६५ वें
बंधेवीण कैंचा मोक्षासी ठावो । भक्त नाहीं तेथें कैंचा देवो ॥ध्रु॥
जैसें आहे मुळीं तैसाचि आहे । आहे-नाहींपण तेथें न साहे ॥१॥
सांडी मांडी जेथें कांहींच नाहीं । कांही नाही तेथें जाणावें कायी ॥२॥
गुरुकृपें केशवीं बाणलें ऐसे । ज्यासी बाणे तेणें सांगिजे कैसें ॥३॥
० पद २६६ वें
नाम ना रूप वर्ण ना छाया । संत गेले गा ऐसीया ठायां ॥ध्रु॥
परतोनी संसारा नाहीं ते आले । आपुलें स्वरूप आपण जालें ॥१॥
जातांचि अद्भुत नवलाव केला । विश्र्वाचा मागुची काढुनी नेला ॥२॥
गुरुकृपें केशवीं पावला याची खूण । ज्यासी कळलें त्यासी पावले आपण ॥३॥
० पद २६७ वें
सद्गुरुकृपा जयासी जाली । तेणेंचि जोडी आपुली केली ॥ध्रु॥
जोडकार तो जाणिजे भला । संपूर्ण आत्मलाभ जोडिला ॥१॥
कर्मकळंतर अवघेंचि खादलें । अक्षय मुद्दल ० पदरीं बांधिलें ॥२॥
आपलें मुदल आपण जाला । केशवीं उदीम फळासी आला ॥३॥
० पद २६८ वें
ठेविला ठावो विसरला पाहीं । पाहों गेलें नाहीं ते ठाईं ॥ध्रु॥
सांपडे निधान कैसेनि त्यातें । विसरे नाडीलें जेथीच्या तेथें ॥१॥
विसरा ऐसें पाप नाहीं देखा । दुऱ्हा वीसरें स्वसुखा ॥२॥
गुरुकृपा होय विसर तैंच जाय । आठवाचें मूळ केशव लाहे ॥३॥
० पद २६९ वें
नाहीं तें सांडोनी आहे तें पाहिजे । पाहणें हरपे तेथेंची राहिजे ॥ध्रु॥
योगियांचे मत जाणिजे ऐसें । आणीकासी गम्य होइल कैसें ॥१॥
जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । निश्र्चयेसी ज्याचा तोची ब्रह्म ॥२॥
ब्रह्मीं ब्रह्मपण हेंही नाहीं जाण । केशव सांगे अनुभवाची खूण ॥३॥
० पद २७० वें
ज्ञानेंवीण जीणें कासया कारणें । त्याहुनी मरणें हेंचि भलें ॥ध्रु॥
ज्ञानेंवीण कीजे तितुकें पाल्हाळ । मोक्ष सर्वकाळ ज्ञानयोगें ॥१॥
कर्म कर्मातीत करुनी ठेवी ज्ञान । दुःखासी अवसान ज्ञानमात्रें ॥२॥
ज्ञानेंचि आटला भवसिंधु एव्हडा । केशवीं रोकडा आत्मलाभू ॥३॥
० पद २७१ वें
आत्मासच्चिदानंद बोलणें हेचि भेद ।
आत्मानात्माचा अनुवाद न सरे तेथें ॥ध्रु॥
म्हणोनियां श्रुती परतल्या नेती नेती ।
तो मी शब्द स्थिती बोलों कैसा ॥
बोलतां नये आतां बोलावें तें काय ।
बोलिजेसें नव्हे माय बोलों मी कैसें ॥१॥
तत्त्वमश्यादि वाक्य जीवेश्र्वरासी घडे ऐक्य ।
हा साधकां स्वबोध मुख्य सिद्धांत नोहे ॥
जीव शीव ० पदें दोन्ही गेलीं जेथें हरपोनी ।
तया निजनिर्वाणी बोलणें कैंचे ॥२॥
दृश्य-द्रष्टा-दर्शन जेथें त्रिपुटी जाली क्षीण ।
तेथें सोऽहं ब्रह्म हें स्फुरण स्फुरे हें कोठें ॥
गुरुकृपें केशवीं प्रमाण नव्हेचि कांही ।
जयालागीं मौन्य पाहीं सहजस्थिती ॥३॥
० पद २७२ वें
आत्मा चैतन्यराशी । अखंड तुजची पाशीं । देहादि इंद्रियांसी । व्यापुनी असे ॥ध्रु॥
तयासी डोळेभरी । कां तूं पाहसी ना । स्थिर राहसी ना । तेथेंचि कां ॥१॥
दुरी ना जवळा । क्षण नव्हे वेगळा । प्रकाशुनी सकळां । सकळातीत ॥२॥
व्याप्य-व्यापकभाव । जयाचें स्वरूपीं वाव । केशव म्हणे देव । तो तूं स्वयं ॥३॥
० पद २७३ वें
कधीं नाही देखिलें । ना कधीं आइकीलें । तें रूप देखीलें । आजी डोळा ॥ध्रु॥
नांव तया नाहीं । रूप तया नाहीं । जैसे आहे पाहीं । संचलें तैसें ॥१॥
मंगळा-मंगळ । सुखची निखळ । साधूचें केवळ । निजहीत ॥२॥
संत केशव म्हणे । जाली तयाची भेटी । दुजेपणवीण मिठी । पडोनि ठेली ॥३॥
० पद २७४ वें
मी ज्ञाता ऐसा अभिमान वसे । तंवरी तें जिडोळां न दिसे ॥ध्रु॥
अभिमान सांडुनी सुखरूप राहीं । ठाईंचा ठाईं तरी निवसील ॥१॥
ज्ञातेपणाचा अभिमान धरितां । जवळीं निज परी न येची हाता ॥२॥
गुरुकृपें केशवीं निरभिमान स्थिती । देहींच विदेह तेथें कवण मानी मुक्ती ॥३॥
० पद २७५ वें
जयालागीं शीणताती योगी । तें निज अंगी जडलें असे ॥ध्रु॥
निज तें आंगी निज तें आंगी । निज तें आंगी जडलें मना ॥१॥
आंगीच्या आंगी जडलेंसे निज । कर्माकर्मीं निज लागे सहज ॥२॥
सद्गुरुकृपें केशवीं विश्रांती । अखंड जाली निजप्राप्ती ॥३॥
० पद २७६ वें
दिसे तें नीज नीज दिसतें । गुरुकृपें आमुतें दृष्टिवीण ॥ध्रु॥
पाहतां निज नीजें समाधी यावों लाजे । निजीं निज विराजे निजपणें ॥१॥
आकाशावरुते पाताळा खालुते । बुद्धीसी निरूते चोजवेना ॥२॥
गुरुकृपें केशवी निजबोध-प्रतीती । जागृती सुषुप्ती स्वप्न्नीं दिसे ॥३॥
० पद २७७ वें
आत्मप्राप्ती ० पदें गुरुकृपा जाली । तेणें बोधाची गुढी उभारली ॥ध्रु॥
आनंद जाला आनंद जाला । आनंद जाला बोलवेना ॥१॥
लय लक्षेंवीण अनुभव-सोहळा । दृष्टीवीणें नीज देखिलें डोळां ॥२॥
गुरुकृपें केशवी आनंद पुष्टी । परमानंदे कोंदली सृष्टी ॥३॥
० पद २७८ वें
सर्व वोळखीलें चिद तेंची जालें । आनंदाचें लेणें सर्वांगी बाणलें ॥ध्रु॥
सत्तें काय चित् तें काय । आनंदी दोहोंचें बोलणें राहे ॥१॥
सद-चिद-गोडी आनंदी घोटी । आनंद जिराला आनंदापोटीं ॥२॥
यापरी त्रिपदें गिळिलीं आनंदे । गुरुकृपें केशवीं पूर्ण ब्रह्मानंदे ॥३॥
० पद २७९ वें
सद्गुरुकृपेची फळली वाडी । आकाश घातलें आपणाबुडी ॥ध्रु॥
शून्याच्या शेंडा लाविली टाळी । मनाच्या मुळीं राहोनियां ॥१॥
योगेंवीण मुद्रा ध्यानेंवीण लक्ष । आपेआप निज जालें प्रत्यक्ष ॥२॥
सद्गुरुकृपें केशवीं निर्मळा । आपला डोळा आपण जाला ॥३॥
० पद २८० वें
निर्गुणाच्या हातीं दीधलें मातें । जातीकुळ तेथें पारूशलें ॥ध्रु॥
बोलों नये कांही चालू नये । हालों नये ऐसें जालें ग माय ॥१॥
सबाह्य आनंदी पडलीसे गांठी । आतां जीवित्वें संवसाठी होउनी ठेली ॥२॥
निःसंगेसी संग संसारा उजवण । गुरुकृपें केशवीं कायसी बोळवण ॥३॥
० पद २८१ वें
स्वरूप आरीसा पाहतां चांग । स्वरूपींच डोळां देखिलें आंग ॥ध्रु॥
देखिलें ग माय निजरूप डोळां । लय लक्षवीण देखणी कळा ॥१॥
स्वयंभु आरसा प्रकाशें सुरवाड । पाठी ना पोट तया अंत ना वाढ ॥२॥
बिंब-प्रतिबिंबेवीण अखंड आरिसा । गुरुकृपें केशवीं देखनी दशा ॥३॥
० पद २८२ वें
बहु बोलण्याचा आला असे वीट । परी वागेश्र्वरी धीट अनावर ॥ध्रु॥
बोलतांचि नये तेंचि बोलत आहे । ऐसीयासी काय की जे आम्ही ॥१॥
जेथें अनिर्वाच्य सकळ शब्द नुठी । त्याच्या सांगतां गोष्टी पडे मौन्य ॥२॥
न बोलोनि बोलणें बोलतां न बोलणें । हे स्वानुभवीं जाणे म्हणे केशव ॥३॥
० पद २८३ वें
गुरुराजचरण आम्हीं वंदिले आजि पाहीं ।
दुरित सकळ गेलें भव-दुःख पुढें नाहीं ॥ध्रु॥
त्रिताप विरोनि गेले पाउलें पाहतां हो ।
अति शुद्ध-बुद्ध जालों तत्० पदिं राहतां हो ॥१॥
अविकळ निजभावें रंगलों पाद० पद्मीं ।
अविचळ स्थिर तेणें राहिलों आत्मसद्मीं ॥२॥
पदिं पदरुप जालों पावलों सर्व जोडी ।
केशवस्वामी सांगे लाधलों सौख्यकोडी ॥३॥
० पद २८४ वें
मनाच्या मुळीं निजसुख जालें । निधान पाहिलें परलोकिंचें ॥ध्रु॥
पाहिलें निधान जालें समाधान । लागलें निजध्यान स्वरूपाचें ॥१॥
स्वरूपीं निर्धारी जाला साक्षात्कार । इंद्रिय-व्यवहार पारुशला ॥२॥
पारुशला देहभाव भवलाभीं अभाव । केशवीं अनुभव
निजबोधें बा ॥३॥
० पद २८५ वें
विवळलीया दृष्टी काढी मागू । कांही नाहीं तेथें लावि लागू ॥ध्रु॥
मागाडीयाची निर्मळ बुद्धी । आपण बैसला आपणा० पदीं ॥१॥
मीपण हरवीलें तूंपण गिळीलें । गुरुकृपें केशवीं ठिकाणीं लाविलें ॥२॥
० पद २८६ वें
आत्मतीर्थीं स्नान करुनीयां विधी । सोविळें घेतलें निजात्मसिद्धी ॥ध्रु॥
सोविंळा जालों कोण्हासि न शिवों । सबाह्य आघवें शुद्ध केलों बा ॥१॥
देहबुद्धीचें वोविळें फेडिलें वास । स्वरूपें सोविळा जालों सावकाश ॥२॥
गुरुकृपें केशवीं निजबोधें सोविळा । जगेसी वर्ततां नव्हेचि वोवळा ॥३॥
० पद २८७ वें
वेदासी गूढ पडीयलें जेथें । नुगवेचि शास्त्रातें उगवीतां ॥ध्रु॥
तें गूढ उगवी तें गूढ उगवी । तें गूढ उगवी बाईय वो ॥१॥
निजज्ञान कासवटी स्वानुभव दृष्टी । हेचि हातवटी उगवयाची ॥२॥
गुरुकृपें केशवीं तें गूढ उगवीलें । सांगों जातां गूढ अधिकाचे पडिलें ॥३॥
० पद २८८ वें
संतसमागम मज घडला । आनंदघन हरि सांपडला ॥ध्रु॥
म्हणवुनि पावन जालों मी । पूर्ण सुखें निवालों मी ॥१॥
सबाह्य अंतरि हरि पाहे । मीपण ग्रासुनि स्थिर राहे ॥२॥
मती गती परती जाली । म्हणे केशव चविला चवि आली ॥३॥
० पद २८९ वें
नश्र्वर भुवनीं ठेवुनियां । प्रेमरसायण देउनियां ॥ध्रु॥
कारण वारण योगें रे । उद्धरिलें मज वेगें रे ॥१॥
विवर्त परता सारुनियां । सर्वहि शोक निवारुनियां ॥२॥
केशव म्हणे निजदातारा । निज० पदिं देउनि मज थारा ॥३॥
० पद २९० वें
विचार लेणें हें लेववुनी । नांदवी चिन्मय-भुवनीं ॥ध्रु॥
तो म्यां देखियला निजदाता । सद्गुरु जनिता आतां ॥२॥
अपारभय-हर्ता सुखकर्ता । समता वनिता भर्ता ॥२॥
अखंड शोभतसे समाधामीं । तारक केशव स्वामी ॥३॥
० पद २९१ वें
गुणमई जे ठायीं लय पावे । घडिघडि तेथें धांवें ॥ध्रु॥
मन हे पिसाळलें पिसाळलें । हरि० पदिं लंपट झालें ॥१॥
त्यागुनि संगम या करणीचा । देवचि कवळी सांचा ॥२॥
सर्व हरी ऐसें गुज सांगे । प्रेमें नाचूं लागे ॥३॥
समाधि-युत्थानीं हरि भासे । म्हणवुनि खदखद हांसे ॥
केशवस्वामीची निजगोडी । मेल्यापरी न सोडी ॥४॥
० पद २९२ वें
कवळीं कवळीं मी हरि बोले । हरि० पद लक्षुनि डोले ॥ध्रु॥
अपार सुख जालें मज पाहीं । मीपण उरलें नाहीं ॥१॥
सर्वहि कारणी मी हरि ल्यालों । हरिच्या उदरा आलों ॥२॥
केशव सांगे मी हरिसंगें । हरिमय जालों वेगें ॥३॥
० पद २९३ वें
हृदय-सरोजी या हरि भरला । कर्मसमुच्चय सरला ॥ध्रु॥
म्हणवुनि तरलों मी तरलों मी । निमग्न झालों ब्रह्मीं ॥१॥
ममता सांडुनियां मज गेली । माया मैंदीन मेली ॥२॥
केशवस्वामीसी समयोगें । समरस जालों वेगें ॥३॥
० पद २९४ वें
श्रवणिं लेउनियां शिवमुद्रा । आलों चिन्मय भद्रा ॥ध्रु॥
म्हणवुनि श्रम गेला श्रम गेला । आत्मसमागम केला ॥१॥
मदन-प्रयागीं मी स्थिर झालों । आनंद-अवभृत न्हालों ॥२॥
गगन विरालें हें जे ठाईं । जालों तें लवलाही ॥३॥
केशवस्वामी मी भव सरला । केशव मात्राचि उरला ॥४॥
० पद २९५ वें
स्तवितां वैखरि हे स्थिर जाली । तेथेंचि मुरकुंडि घाली ॥ध्रु॥
क्षणभरि नव जाय तंव कोठें । मुनिचें कौतुक मोठें ॥१॥
सुखघन होउनियां सुख भोगी । त्रिभुवन-तारक योगी ॥२॥
केशवस्वामींशीं समरसला । मंगळनिधि कीं भला ॥३॥
० पद २९६ वें
समाधि-युत्थानीं सम होणें । ऐसें जयाचें देणें ॥ध्रु॥
तयासि देइजेसे तव नाहीं । म्हणवुनि उगला राही ॥१॥
अखंड ठेवुनियां सुखधामीं । सबाह्य निववी स्वामी ॥२॥
सर्वहि हरपलें जें ठाईं । ते ० पदीं नांदवी पाही ॥३॥
पुष्कळ बोधुनियां घनबोधा । इंद्रियें केलीं मेधा ॥४॥
मीपण निर्दळितां निजधाता । केशव म्हणे मम धाता ॥५॥
० पद २९७ वें
जाणीवेचें बंड शतखंड केलें रे । परम० पदीं मन निश्र्चळ ठेलें रे ॥ध्रु॥
म्हणवुनियां भव-भय मज नाहीं रे । चिन्मयसागरीं बुडी दीधली पाही रे ॥१॥
नामरूपाचा दुष्काळ झाला रे । कल्पित जीव-शिव-भाव निमाला रे ॥२॥
जैसें आहे सुख तैसेंचि आहे रे । केशव म्हणे हेंही स्फुरण न साहे रे ॥३॥
० पद २९८ वें
गुरुभजनाचें फळ मज जालें रे । परम ० पदाचित सहजचि आलें रे ॥ध्रु॥
अध्यारोपान्वय वादासी नेणे रे । कांही न जाणे तें निजरूप जाणे रे ॥१॥
शमदम-साधनीं शिणविलें नाही रे । चित्सागरामाजी बुडविलें पाही रे ॥२॥
केशवस्वामीची निजभेटी जाली रे । आत्मसुखें सर्व क्रिया निमाली रे ॥३॥
० पद २९९ वें
तत्वता तत्त्व जाणोनि राहे रे । स्वानुभवें तत्त्व अखंड पाहे रे ॥ध्रु॥
त्याहुनि जोडी कांहिच नाहीं । लाभ मुख्य नरदेहीं पाही रे ॥१॥
तत्त्वेंसी नित्य मिळोनि राही रे । विश्र्व हें तत्त्वरूपचि पाही रे ॥२॥
गुरुवाक्य तत्त्व कळलें यथार्थ । केशवराजीं जन्म जालें कृतार्थ रे ॥३॥
० पद ३०० वें
वृत्ति निमाली करणें आतां काय । कन हरपे बोलण न साहे ॥ध्रु॥
जन-वन-वीजन ब्रह्म पाहे । पाहतें पाहणें हेंही तेथें राहे ॥
मुळीं शोधतां न दीसे देहभावो । तेथें विदेही म्हणणें हेंही वावो ॥
कर्माकर्म नुरेचि कांही ठावो । भ्रांति फिटली कैंचा संदेहो रे ॥१॥
मज पाहतां अवघे नव्हे देहीं । तेथें आपण कां म्हणवी विदेही ॥
देह विदेह भावना ऐसी कांही । तेजस्वी रूपीं पाहतां अणु नाहीं रे ॥२॥
निजस्थितीचा निजनिर्वाहो । तेथें ब्रह्मीं ब्रह्मत्वा अभावो ॥
गुरुकृपें केशवीं पूर्ण भावो । होय तें हा आकळे अभिप्रावो रे ॥३॥
० पद ३०१ वें
आम्ही निजबोधें संन्यास करोनी । नातळों कर्मासी हो ।
पूर्ण ज्ञानाग्निच्या होमों होम दिधला तिन्ही देहासी हो ॥ध्रु॥
ऐसा शुद्धबुद्ध संन्यास सद्गुरुवचनें सावकाश हो ॥१॥
असंभावना विपरीत भावना समूळ जाळिली कल्पना हो ।
स्त्री-पुत्रेंसी क्रीडतां बुद्धी न पवेचि बंधना हो ॥२॥
गुरुकृपें केशव संन्यासी सहजाश्रम नाम त्सासी हो ।
पूर्ण परिपूर्ण लीळा अखंडवास चिदाकाशीं हो ॥३॥
० पद ३०२ वें
डोळ्याचें देखणें पाहतां डोळसपणें । डोळां बसे परी न लसे वो बाई ये ॥ध्रु॥
पाहतां पाहणें संचलें असे । अनुभवें दिसे अखंड वो बाई ये ॥१॥
डोळ्यांचे अंजन डोळ्यांसी लेईलासे । आंगें अंगी दिसे पाहतेपण ॥२॥
निजनीजपणें गिळिलें पाहतेपणें । केशवराजीं पाहणेपणें वो बाइये ॥३॥
० पद ३०३ वें( राग-नाट)
अनंत ब्रह्मांडें जयाच्या पोटीं । तें रूप जाणा देखीयलें ॥२॥
योगियांलागुनी नातुडे चिंतनीं । तें रूप जनीं-वनीं देखीयलें ॥३॥
केशव म्हणे परिपूर्ण त्रिभुवनीं । तें रूप गुरूवचनीं देखीयलें ॥५॥
० पद ३०४ वें
लटिकें रे लटिकें रे अवघें हें लटिकें रे । निजात्मास्थिति पाहतां कांही मुळींच नाहीं हें जालें ॥ध्रु॥
सुख-दुःख, बंध-मोक्ष, पुण्य-पापसकळिक ॥
मिथ्यारूप हे जाणुनियां निजस्वरूपीं राहे निवांत ॥
दृश्या-दृश्य विचारू नसे कांही साचारू ॥
ब्रह्म सनातन प्रमाणविराहेत केशवीं हा निज साक्षात्कारू ॥ लटिकें रे ॥१॥
० पद ३०५ वें (यमक)
ज्ञानाज्ञानातीत रे । ब्रम्ह सदोदीत रे ॥ध्रु॥
सर्वगत आहे बा । बरवें डोळां पाहे बा ॥१॥
दृश्यादृश्य वेगळें । त्रैलोक्यासि सगळें ॥२॥
अंतर्बाहेरीं एकलें । केशवराजीं संचलें ॥३॥
० पद ३०६ वें (जेवण राग-कांबोध)
विवेक वरण निवृत्ती रोटी । स्वानुभव घृत वाढीलें ताटीं ॥ध्रु॥
संतसंगें मी शीकलों जेऊं । अहंसहीत नाठवे सोहुं रे ॥१॥
शांतीक्षीर हे वाढिली बरी । सप्रेम साजिरी साखर वरी रे ॥२॥
विश्रांति धारी अभेद भांडें । मोक्ष निजामृत त्यावरि सांडे रे ॥३॥
अलक्ष वडा बडुत फुडा । समाध फेणीचा स्वाद तो गाढा रे ॥४॥
वैराग्य पापड भजन भाजी । निष्काम लोणचीं सेविलीं आजी रे ॥५॥
स्वबोध भात स्वानंद कढी । जंव जंव जेवी तंव तंव गोडी रे ॥६॥
प्राप्त दध्योदन वाढीलें ठाईं रे । सबाह्य तृप्त जेवितां पाहीं रे ॥७॥
गुरुकृपें केशव जेउनि धाला । ढेंकर देउनि ईश्र्वर जाला रे ॥८॥
० पद ३०७ वें
आंधळें हातीं घेउनी काठी । हिंडे सृष्टी परी न देखे दृष्टीं ॥ध्रु॥
शब्द-ब्रह्म तैसें बोलोनि काय । स्वानुभवरीति वेगळी आहे ॥१॥
वांझ सांगे मुखें गर्भाचे डोहाळे । सुरतीचे सोहळे षंढ मिरवी ॥२॥
गुरुकृपें बोध संपूर्ण लाधला । तें सुख पावला केशवराज ॥३॥
० पद ३०८ वें (रामकळी)
निजनामें आळविलें स्वरूपीं साधन केलें ॥
नाहीं नाहीं चाळविलें दिधलें सुख ॥ध्रु॥
काय तुज वानूं आम्ही निजात्मा माहेरा स्वामी ॥
सर्वदा मंगळधामीं ठेविलें आम्हां ॥१॥
चिदानंदी बोळवण पूर्ण जाली पेठवण ॥
द्वैताद्वैत आठवण म्हणौनि गेलें ॥२॥
हस्तक ठेविला माथां स्व० पदिं नांदतों आतां ॥
ताता तूं स्वानंददाता केशव स्वामी ॥३॥
० पद ३०९ वें
अंतरी दाउनि हरी । तत्० पदीं निश्र्चळ करी ॥
त्याचिया पायांचि सरी । न पवे कोण्ही ॥ध्रु॥
नाथ तो तात तो पाहीं । स्वार्थ तो संदेह नाहीं ॥
नांदतां स्वदेहीं केलें । स्वानंदें तृप्त ॥१॥
संपूर्ण देउनि बोध । संपूर्ण नासला भेद ॥
संपूर्ण सच्चिदानंद । संपूर्ण केला ॥२॥
सम्यकु सद्गुरु राजा । सम्यकु स्वामी तो माझा ॥
सम्यकु अभेद पूजा । केशव करी ॥३॥
० पद ३१० वें
आनंदाचे घरीं मज । ठेवियेलें ग माय ॥
आनंदमय वो केलें । सांगों कैसें काय ॥ध्रु॥
आंनद पिकला पाहीं । आनंद सकळही ठायीं ॥
आनंदावांचुनि कांही । उरलें नाहीं ॥१॥
आनंदाची कुळवाडी । आनंदें दाटली गाढी ॥
आनंदें नांदते पूर्ण । आनंदवाडी ॥२॥
आनंदाचा दातारू । आनंद तो साचारू ॥
केशवीं आनंदें जाला । आनंद नमस्कारू ॥३॥