श्रीकेशवस्वामी - भाग १६

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ४१० वें (मस्तानी)

संतसेवा हेंची पै साधन । आसन मुद्रा अवघेंची बंधन ॥ध्रु॥

खटपट नाथीली न करी । वोळगे पाय साधूचे अंतरी ॥१॥

तजुनी माया भ्रांति हे वाउगी । स्थिर राहे सर्वदा सत्संगीं ॥२॥

केशव म्हणे साधुच्या भजनीं । सुखें वास करी बा चिद्धगीं ॥३॥

० पद ४११ वें

नको भुलूं प्रपंची सर्वथा । भावें तयां वोळगे अनंता ॥ध्रु॥

हेंचि रे तुज मागतों सजना । अहर्निंशीं लक्षी त्या निर्गुणा ॥१॥

त्यजुनि माया संगु हा नाथीला । निजसखा साधी तूं आपुला ॥२॥

केशव म्हणे हाचि रे उ० पदेसु । आतां नको विसरूं परेशु ॥३॥

० पद ४१२ वें

साधनभ्रमें कासया सीणशी । तेणें आत्माराम तूं नेणसी ॥१॥

आतां रे तुज सांगतों स्वहीत । गुरुवाक्यें लक्षी तूं अच्युत ॥२॥

अनन्य गुरुभक्ती तूं करीसी । तरीच नित्यानंद हे वरीसी ॥३॥

केशव म्हणे सद्गुरुवचनीं । विश्र्वंभरू दिसे या लोचनीं ॥४॥

० पद ४१३ वें

बाळा राहीं स्वरूपी जागत । विषयमदें हो नको भ्रमीस्त ॥१॥

सांडी माया भा्रंती हे नाथीली । निजवस्तु वोळखे आपुली ॥२॥

तळमळ करिशी तूं कासया । वेर्थ पावन देहासी नाशया ॥३॥

केशव म्हणे सांगतों उ० पदेश । निरंजनि करी तूं प्रवेश ॥४॥

० पद ४१४ वें

सद्गुरु मोक्ष-दाता । त्याचें चिंतन करी ।

आयुष्य व्येर्थ जातें । विषयांच्या भरोवरी ॥ध्रु॥

म्हणवुनि धरीं भावो । संतचरण अंतरीं ।

तरि तूं पावशील । सुखक्षणा भीतरीं ।

यालागीं साधी बापा । शीघ्र सद्गुरुकृपा ।

सदगुरुवचनेंची । भेटी निजस्वरूपा ॥१॥

चौऱ्यांशी लक्ष योनी । तुज भ्रमतां पाहीं ।

विश्रांति सखया रे । कोठें देखिली नाहीं ।

व्यर्थ बा शिणलासी । हित नेणोनि कांहीं ।

आतां तरी संतसंगें । स्थिर स्वरूपीं राहीं ॥२॥

सद्गुरु बाप-माय । त्यांचे धरीं तूं पाय ।

संसार-दुःख तेणें । क्षण न लागतां जाय ।

अकळ स्वरूपस्थिती । वि रे देहिं संहेह ।

केशवीं कृपामात्रें । निजानंदिं तन्मय ॥३॥

० पद ४१५ वें

मनीं सद्भाव लवलेश नाहीं । बुडे व्येर्थची या कामडोहीं ॥ध्रु॥

त्याची संगती नको देवा । ज्यासी नावडे साधुची सेवा ॥१॥

कासम संगासी रातेला निका । पुढें साधीच ना ब्रह्मसुखा ॥२॥

म्हणे केशव दुर्मती बहु । नेघे स्वरूपसुख अनुभऊ ॥३॥

० पद ४१६ वें

निजतत्त्व जें निर्मळ । तेथें राहें तूं निश्र्चळ ॥ध्रु॥

सांडि कल्पना वाउगी । नाहिं स्वरूपीं उगीदुगी ॥१॥

द्वैत निरसुनी सकळ । भोगी निज० पद आढळ ॥२॥

म्हणे केशव स्थिर राहे । निरंजनि विरोनि जाय ॥३॥

० पद ४१७ वें

जळीं पाषाण कोरडा । तैसा राहूं नको जडा ॥ध्रु॥

करी स्वहित आपुलें । धरुनि संतांची पाउलें ॥१॥

सांडी जाणिवेचा चाळा । भरीं भरूं नको वाचाळा ॥२॥

म्हणे केशव तांतडी करा । हरी सेवुनि भवनदी उतरा ॥३॥

० पद ४१९ वें

प्रतीतीची नाहीं सोय । वरी शृंगारिलें देह ॥ध्रु॥

त्याचि संगति नको रामा । ते कांहिच न येति कामा ॥१॥

काम घरींचा राजा केला । स्वयं परिवार आपण जाला ॥२॥

कामीं निष्कामी हें नेणें । म्हणे केशव देह मी म्हणे ॥३॥

० पद ४२० वें

कातड्याचें केलें घोडें । वरी तदृप बाहुलें वेढें ॥ध्रु॥

कैसे नाचती नाचती । नाचवित्यातें नेणती ॥१॥

हावभाव दाविती नाना । चाळकासी नेणती जाणा ॥२॥

नाचवितां न पडे ठायीं । म्हणे केशव तंव सुख नाहीं ॥३॥

० पद ४२१ वें

संत गर्जती तारकध्वनी । परी नायकतीं जन कोणी ॥ध्रु॥

केलें बहिराट केव्हढें । आत्मविषयीं जालें वेडें ॥१॥

बाह्या उभारोनी बोले गीता । परि अर्थ न भेदे गीता ॥२॥

शास्त्रसिद्धांत गृह्यार्थ सांगे । तऱ्ही वर्मींच वाक्य न लागे ॥३॥

वेद कृपाळु होउनि बोले । ऐकणार तें बाहेरी गेलें ॥४॥

निजप्राप्तिसि विन्मुख ठेलें । म्हणे केशव अवघेंचि मेलें ॥५॥

० पद ४२२ वें

आधीं मृदलाची घेउनि गोडी । मग कळांतर हें जोडी ॥ध्रु॥

तरी तूं जोडका होसी पाहीं । तुझ्या भाग्यासी पारचि नाहीं ॥१॥

मुदला आंगीं जोडे जितुकें । ठेवि मुदलचि करुनि तितुकें ॥२॥

मुदलें मुदलचि साधुनि पाहे । म्हणे केशव सुखरुप राहे ॥३॥

० पद ४२३ वें

काम-पर्वत हा उडवेना । शांतीसागरीं बुडी दैना ॥ध्रु॥

तेणें स्वहीत नाहीं केलें । त्याचें जन्मचि वांया गेलें ॥१॥

भक्ति सर्गांगी बाणेना । देव आपण हें जाणेना ॥२॥

म्हणे केशव सुख पावेना । नित्य अच्युत० पद पावेना ॥३॥

० पद ४२४ वें

पाय संतजनाचे सेवा । हरि अंतरिं आणुनि ठेवा ॥ध्रु॥

कां हो व्यर्थचि घेतां धांवा । घ्या राघविं पूर्ण विसांवा ॥१॥

भवसंग-हराच्या संगीं । मन रंगुनि ठेवा वेगीं ॥२॥

म्हणे केशव मंगळधामा । भेद ग्रासुनि वोळगा रामा ॥३॥

० पद ४२५ वें

संदेहसागर हा आटेना । राम तोंवरी तो भेटेना ॥ध्रु॥

हित सांगतसें तुम्हांतें । तोडा संदेह हातोहातें ॥१॥

संदेह पुढें येउनि राहे । तेथें कैंचा तरणोपाय ॥२॥

संतसंगे संदेह सोडा । म्हणे केशव केशव जोडा ॥३॥

० पद ४२६ वें

आत्मज्ञान जोंवरीं नाहीं । सुख तोंवरी कैचें काई ॥ध्रु॥

कैसें न कळे हें मूढातें । आत्मउकल नाहीं त्यातें ॥१॥

निज-निधान असतां घरीं । पाहों धांवती तें बाहेरीं ॥२॥

आपला विचार आपण केला । तोचि अढळ० पदासी गेला ॥३॥

यावें आपण आपल्या घरा । हाचि केशवीं अनुभव खरा ॥४॥

० पद ४२७ वें

ऐकोनियां ब्रह्मकथा । सुख नुपजे ज्याच्या चित्ता ॥ध्रु॥

तोचि केवळ रे पाषाण । त्याचि कैसें गोडपण ॥१॥

वाखाणितां आत्मचर्चा । बोध प्रखर नव्हे ज्याचा ॥२॥

केशवस्वामीची नेघे गोडी । नित्य विषयासी चरफडी ॥३॥

० पद ४२८ वें

ज्सासी स्वरूपाचा वीट । तोचि करंटा चोखट ॥ध्रु॥

नको तयाचें दर्शन । पापें खतेला तो जाण ॥१॥

नावडेचि ब्रह्मनिष्ठा । करी व्यर्थची कठपटा ॥२॥

म्हणे केशव त्यासी पाही । हितगुज नको कांही ॥३॥

० पद ४२९ वें

पंचभूतांचें देउळ । माजी ब्रह्मलिंग केवळ ॥ध्रु॥

तेथें सुमनें बांधूं पूजा । भाव सांडूनियां दुजा ॥१॥

तोचि सर्वदा न्याहाळी । नित्य आनंदे वोवाळी ॥२॥

गुरुकृपें केशवीं पाही । तेचि होउनि तेथेंचि राही ॥३॥

० पद ४३० वें

रामनामें जरि मोक्ष घडे । तरी कां साधक सीणती गाढे ॥ध्रु॥

राम वरीवरी म्हणसी काय । रामरूपीं धरी कां सोय ॥१॥

मनी विषयांचा अभिलाष । नामें केविं तुटे गर्भवास ॥२॥

रामरूपीं वोळखी नाहीं । नामें तरती तरी केवीं पाही ॥३॥

काम-क्रोध-मद-मोहत्यागें । राम भेटे साधुसंगें ॥४॥

गुरुकृपें केशवीं भेटी । तेथें निःशेष वाचा नुठी ॥५॥

० पद ४३१ वें

संतचरण-कमळ-तीर्थ सेवीजे । रामभजनीं सज्जनीं

चित्त ठेवीजे ॥धु्र॥

मुक्त होइजे संसारापासूनी । सुख भोगीजे अहंभाव नासोनी ॥१॥

ज्ञानशास्त्रें त्रिगुण-ताप तोडीजे । आत्मप्राप्ती पावोनी

द्वैत सोडीजे ॥२॥

गुरुकृपें निजबोधीं बुडीजे । म्हणे केशव ब्रह्मानंद जोडीजे ॥३॥

० पद ४३२ वें

अज्ञानाची निवृत्ती । जेणें होय निश्र्चिंती । ऐसी करावी गुरुभक्ती ॥ध्रु॥

सांगुं मी किती, वोळखावा राम स्वयंज्योती ॥१॥

दुःखाचा समुद्र आटे । अंतरीं घननीळ दाटे । ऐसीया लागावें नीट वाटे ॥२॥

संसार समूळ मोडे । देवाचा निजदेव जोडे । तें कां नेणती लोक वेडे ॥३॥

कामाचा संगचि तुटे । संदेह निःषेश आटे । नांदावें ऐसिया राजपेटे ॥४॥

केशवाचा स्वामी भेटे । द्वैताची वार्ता नमुटे । जन्ममरणाचें खत फाटे ॥५॥

० पद ४३३ वें

सुखाची कुळवाडी । केली नाहीं मन । तोंवरी ज्ञातेपण । मिरवूं नको ॥ध्रु॥

अंतरपालट । जाला नाहीं जंव । शब्दज्ञानें तंव । मोक्ष कैंचा ॥१॥

अंतर पालटे । भवदुःख तें आटे । सर्वकाळीं भेटें । आत्मसुख ॥२॥

गुरुकृपें केशवीं । पालटलें मन । आपलें निधान । आपण जाला ॥३॥

० पद ४३४ वें

नाथिला अहंकारू घेउनी माथा । मी देह तत्वतां ऐसें म्हणसी ॥ध्रु॥

नाडशी रे तेणें नाडशी रे । संसारसागरीं बुडशी रे ॥१॥

निर्गुण-निष्काम, नित्यरूप तुझें । नेणोनी वायां माझें देह म्हणशी ॥२॥

जडमूढ मढें देह तूं जाणसी । ते तूं कैसा होसी साक्षरूपा ॥३॥

मी आत्मा ऐसें नेणोनियां पाही । मृगांब-प्रवाहीं वाहवलाशी ॥४॥

केशव म्हणे निजसोय धरी आपुली । सांडीं हे नाथिली द्वैतभ्रांती ॥५॥

० पद ४३५ वें

भवदुःखाचे खोडा मीपणें पडलाशी । सुखरूपा भुललाशी आपण यातें ॥ध्रु॥

नाथिलें हें वोझें घेतलेंसें माथां । मीपण सांडी आतां मुक्त होशी ॥१॥

मीपणाच्या पोटीं भेदाची कुळवाडी । मीपण केवळ धाडी व्यामोहासी ॥२॥

गुरुकृपें केशवीं मीपण सांडीतां । नीजरूप तत्वतां सहजची तूं ॥३॥

० पद ४३६ वें

कल्पनेचा त्याग केला नाहीं सांग । जीवबुद्धीचा पांग फिटला नाहीं ॥ध्रु॥

सगुण निर्गुण पूर्ण नित्य संचलें । तें नाहीं देखीलें ज्ञानदृष्टीं ॥१॥

म्हणवोनी पडले प्राणी भवबंधामाझारीं । पुढती तें बाहेरी न येती कदा ॥२॥

पारावारू नाहीं ज्या दुःखालागीं । तें सुखरूप असतां आंगीं लावुनी घेती ॥३॥

स्वप्न्नीं प्राप्त झालें तें स्वप्नची लटीकें । परी तें भोग न चुके जागृतीवीण ॥४॥

ज्ञानेवीण तैसा न सरेची संसार । वाढला अहंकार अधीका आधीक ॥५॥

अज्ञानेसी नाश आपला जैं साधी । त्या नांव त्रिशुद्धी ज्ञान म्हणीजे ॥६॥

तेणें ज्ञानें आपुला उकलू केला नाहीं । केशव म्हणे ते देही तरती कैसे ॥७॥

० पद ४३७ वें

स्वयंब्रह्म असती परी ब्रह्म नव्हों म्हणती । बाप केव्हडी ख्याती। विल्कपाची ॥ध्रु॥

स्वप्न्नीं पडोनी जैसा राव रंक झाला । तैसा आत्मा आला जीवत्वासी ॥१॥

मीपणाच्या त्यागीं जीवत्व नलगे अंगी । आत्म सुखरूप संगी संगातीत ॥२॥

सिद्धचि असतां कैसी कवणा नुगवे गुंती । म्हणवुनी कुंथाकुंथी करती रे या ॥३॥

व्यामोहाचेनि बळें ज्याचें त्सासी न कळे । बांधोनि आपुले डोळे आंधळे होती ॥

सुषुप्तीचे नि योगें भासलें जैसें स्वप्नं । तैसें अन्यथा ज्ञान अज्ञानें पैं ॥५॥

अज्ञानाचा नास समुळ केला नाहीं जंव । आपला आपण तंव नेणिजे सुख ॥

आपला आपण सुस्वप्नें निजे तत्वतां । तंववरी मोक्षवार्ता श्रवण मात्र ॥७॥

साध्य साधक साधन त्रिपुटीं नाहीं जेथें । वेगळेपणा तेथें ठाव कैंचा ॥८॥

डोळा आनु जैसा न समाय क्षणभरी । स्वरूपा भीतरीं तैसा भेदू ॥९॥

नसोनियां कल्पांतीं ते नयोनि जन्मा येती । केशव म्हणे भोगीती अकल्प दुःख ॥

० पद ४३८ वें

काया काय करी मृगांबलहरी । स्वप्नीची सुंदरी जैसी असे ॥ध्रु॥

नाहीं त्याचा ठाया करणें हें काय । आहे तेंची पाहे विचारूनी ॥१॥

मिथ्यारूप आहे दुःखाचा सागर । तेथेंचि तत्पर मूर्ख होती ॥२॥

कामाची संगती तेची अधोगती । कायातीत होती त्यासी नाहीं ॥३॥

नाहीं तेची नाहीं करुनी सांडीगे । अक्षय पावीजे ब्रह्म० पदा ॥४॥

जें ० पद पाविजे तें स्वयं होइजे । केशवीं भोगिजे आत्मसुख ॥५॥

० पद ४३९ वें

असत्याच्या पाठी लागलासी काय । गुरुमुखें पाही विचारोनी ॥ध्रु॥

मरशील आतां मरशील आतां । नरदेह मागुता । गेल्या नये ॥१॥

नामरूप हाची मायेचा विकार । ब्रह्म निराकार । तूंचि स्वयं ॥२॥

संत केशव म्हणे । नाहीं भिन्नाभिन्न । केशवचि परिपूर्ण । जाणोनि राहे ॥३॥

० पद ४४० वें

आपणचि आत्मा असोनियां पाही । न हो म्हणती देहीं । आत्मरूप ॥ध्रु॥

ऐसीयासी आम्ही करणें हो काय । घरचे घरीं पाहे । पडली चुकी ॥१॥

सुखरूप असोनि । दुःखरूप म्हणती । यालागीं पुनरावृत्ती । न चुकेची ॥२॥

बंधमोक्षेंवीण । चिन्मयरूपसार । आसोनि पामर । विन्मुख जालें ॥३॥

संतकेशव म्हणे । असोनियां एक । भाविती अनेक । येकपणा ॥४॥

० पद ४४१ वें

जें जें बोलसी तितुकें अरूतें । निज तें पर तें अरे मना ॥ध्रु॥

निज तें पर तें निज तें पर तें । निज तें पर तें अरे मना ॥१॥

परुतेना अरुते परात्पर ब्रह्म तें । सकळीं सकळ तें बुझरे मना ॥२॥

गुरुकृपें केशवीं निजात्म निश्र्चितें । मन मुरे तें बुझरे मना ॥३॥

० पद ४४२ वें (घाटी - सहज)

अरे हरी आधी तूं निज साधी तूं । मग सांडि हा उपाधी तूं ॥ध्रु॥

उगवी जा गुंती नाथिली । वळखे निजवस्तु आपली ॥१॥

निरंजनी करी प्रवेशू । केशव सांगे उ० पदेशू ॥२॥

० पद ४४३ वें

देहबुद्धिचें पडळ फेडा । देहींच देव पाहें उघडा ॥ध्रु॥

दवे पाहा तुम्ही देव पाहा । देव पाहोनी उगे रहा ॥१॥

उघडा देव सर्वत्र असे । परतलीयां दृष्टीसी भासे ॥२॥

देव भक्त लीळा वीसरला । केशा म्हणे अभिन्न सोहळा ॥३॥

० पद ४४४ वें (राग -अहेरी; चाल - जात्याची)

लागे तो जाणे हाणे तो जाणे । अंगी आदळे तेव्हांची बाणे ॥ध्रु॥

मुद्दल आयुष्या होतसे तुटी । प्रतीतीवीण वावुग्या गोठी ॥१॥

आंगीं आंगत्व भीनलें अंगा । आपेंआप कैसें बसलें जागा ॥२॥

सद्गुरुकृपें परतल्या दीठीं । केशवीं भार लाविला खुंटी ॥३॥

० पद ४४५ वें

बोलाचे उंडे बोलाचे मांडे । बोलासाठीं केंवी तरसील भांडे ॥ध्रु॥

बोलणें सांडीं बोलणें सांडी । मौनावरी तूं आसन मांडी ॥१॥

बोलणें अबोलणें सारुनी दोन्ही । बोलसी बोलणें बोलुनी ॥२॥

सद्गुरुकृपें केशवीं पाहीं । बोलणें अबोलणें नुरेचि कांही ॥३॥

० पद ४४६ वें

प्रांजळ शब्दें ब्रह्म सांगे वरीवरी । अनुभव पुसतां चाउंबाउं करी ॥ध्रु॥

झेंपवेना निज झेंपावेना । झेंपवेना निज शब्दबह्में ॥१॥

सर्व इंद्रियाीं वस्तु व्यापक म्हणे । परी व्यापकाची खूण अंगीं न बाणे ॥२॥

गुरुकृपें केशवीं शरण संतापायीं । येक्या बोलें कैसें ठेवियलें ठायीं ॥३॥

० पद ४४७ वें

क्षण एक सोविळा क्षण एक वोविळा । तयाचाचि विटळ मानूं आम्ही ॥ध्रु॥

अखंड सोविळें जोंवरि नाहीं । तोंवरी सोविळा जाला तो काई ॥१॥

बाहेरी सोविळें भीतरीं वोविळें । कल्पनेचे मेळ न फिटेची ॥२॥

सद्गुरुकृपें केशवीं त्रिशुद्धी । सर्व सोविळें जैं जाय देहबुद्धी ॥३॥

० पद ४४८ वें (घाटी - चुटक्याचें ० पद)

संत-समागम जोडीना । संशय-सांखळी तोडीना ॥ध्रु॥

म्हणवुनियां मन शीण पावे । गोमय-सदनाप्रति धांवे ॥१॥

विचारभुवनीं राहेना । सर्वसखा हरी पाहेना ॥२॥

केशव स्वामीस भेटेना । समरस होउनि आटेना ॥३॥

० पद ४४९ वें

प्रेम-प्रयागीं न्हाना हो । चिद्रुप हृदया आणा हो ॥ध्रु॥

म्हणवुनि नमितों चरणाशीं । भजनी ठेवुनि कर्णासी ॥१॥

संशय-वारा दुरि वारा । अति गति देउनि मज तारा ॥२॥

पूर्ण स्वरूपामाजीं वो । म्हणे केशव रमवा आजी हो ॥३॥

० पद ४५० वें

साधुसमागम जोडेना । संशय मंडप मोडेना ॥ध्रु॥

तंवरी निज सुख नाहीं रे । बरवें कळलें पाही रे ॥१॥

गुणमयी रजनी नासेना । वेदनसूर्य प्रकाशेना ॥२॥

केशवस्वामी भेटेना । सबाह्य अंतरीं दाटेना ॥३॥

० पद ४५१ वें

विचारदिपक लावुनियां । रामहिरा करीं घेउनियां ॥ध्रु॥

निश्र्चळ जालें मन माझें । केलि दया निज गुरुराजें ॥१॥

गोपति परती ठेवुनियां । गोपति बरवा सेवुनियां ॥२॥

अक्रिय ठायां येउनियां । म्हणे केशव केशव होउनियां ॥३॥

० पद ४५२ वें

भवहर शंकर सेविशिना । हृदयसरोजीं ठेविशिना ॥ध्रु॥

म्हणवुनियां गति न घडे रे । निजसुख ठायीं न पडे रे ॥१॥

श्रवणमननें विवळशिना । अमळ प्रयोगें निवळशिना ॥२॥

जाणिव नेणिव सोडनिशा । म्हणे केशव केशव जोडशिना ॥३॥

० पद ४५३ वें

क्षणाक्षणा कां मरीजे रे । सज्जन-सेवा करिजे रे ॥ध्रु॥

रामसनातन पाविजे रे । अपारमाया तरिजे रे ॥१॥

कवळुनियां हरि धरिजे रे । प्रेमरमें जन भरिजे रे ॥२॥

जाणिव नेणिव हरिजे रे । म्हणे केशव केशविं विरजे रे ॥३॥

० पद ४५४ वें

मन सज्जन सदना आलें रे । भजनपरायण जालें रे ॥ध्रु॥

म्हणवुनि केवळ सुख पावे । निजगतिनें अति बळकावें ॥१॥

सारविचार स्थिर राहे । निष्कळ पुष्कळ हरि पाहे ॥२॥

म्हणे केशव ० पद जोडी । ० पदो० पदीं घे निज गोडी ॥३॥

० पद ४५५ वें

काम कुनामक जाळीं रे । निर्मळ भजनें जाळी रे ॥ध्रु॥

भज तूं सज्जन-रंजन रे । तारक शोक प्रभंजन रे ॥१॥

नासुनियां भवरोगी रे । सर्वहि वैभव भोगी रे ॥२॥

पातक-पंचक-मोचक रे । केशव म्हणे अति रोचक रे ॥३॥

० पद ४५६ वें

साधुस हृद्रत संगा रे । निर्मळ चिद्घन मागा रे ॥ध्रु॥

जागा रे तुम्ही जागा रे । निजात्ममार्गीं लागा रे ॥१॥

निरसुनि कल्पित भोगा रे । अनुभव-भुवनीं वागा रे ॥२॥

साधुनि सन्मय योगा रे । म्हणे केशव, केशव भोगा रे ॥३॥

० पद ४५७ वें

दर्पणीचें धन रे । तैसें जाले जन रे ॥

अनुभव लोचनीं रे । उघडुनि पाहें बा ॥ध्रु॥

दोरी भासे अजगरू । तैसा ब्रह्मीं संसारू ॥

दिसे परी तो साचारू । अनुमात्र नाहीं बा ॥१॥

विश्र्वरूप सकळ । मृगजळ केवळ ॥

जाणोनियां निश्र्चळ । निजरूपीं राहे बा ॥२॥

सांडी मांडी न करी । कोण्ही हेतू न धरीं ॥

केशवीं गुरुवाक्यें करी । आहे तेंचि होई बा ॥३॥

० पद ४५८ वें

प्रपंच वैरी हा त्यागावा । अंतरीं श्रीहरि ध्यावा ॥ध्रु॥

आणिक न करावा उपाय । हाचि तरणोपाय ॥१॥

मीपण निरसुनियां स्थिर व्हावें । राम-रसायन घ्यावें ॥२॥

केशवस्वामीसी समभावें । सबाह्य आलिंगन द्यावें ॥३॥

० पद ४५९ वें

देशांग विसरावें समभावें । स्वरुपीं निश्र्चळ व्हावें ॥ध्रु॥

आणिक नमनावें हित कांहीं । हरिविण बरवें नाहीं ॥१॥

गोमय उपाधी हा त्यागावा । चिन्मय लाभचि घ्यावा ॥२॥

मीपण ग्रासुनियां सुख घ्यावें । केशवस्वामिच व्हावें ॥३॥

० पद ४६० वें

प्रपंच कैंचा मा त्यागावा । आत्मा कैसा घ्यावा ॥ध्रु॥

बरवें जाणावें जाणावें । जाणणें मात्राचि व्हावें ॥१॥

अवघा परतत्त्व परिपूर्ण । म्हणतें उरलें कोण ॥२॥

केशवराजीं हा निजबोधू । बोधा नलगे वेधू ॥३॥

० पद ४६१ वें

गगनकमळ तैसें जग जाणे । ब्रह्मसनातन परिपूर्ण बाणे ॥ध्रु॥

भज रे तया भज निजयोगी राया । ज्याच्या भजनीं नाहीं जन्मली माया ॥१॥

अचळ० पदीं केली अचळ मिराशी । जाला गुणातीत आनंदराशी ॥२॥

स्वरूप होउनि नित्य स्वरूपीं विराजे । केशवस्वामी हेंही नाम न साजे रे ॥३॥

० पद ४६२ वें

राम धुंडाळी कर्म गुंढाळी रे । वेगीं चाल तूं सत्संग ढाळी रे ॥ध्रु॥

चाल सखया सत्संग पाहाटे रे । स्वरुपानंदें तूं अखंड राहटे रे ॥१॥

गाळुनि कामा वोळख रामा रे । तेणें पावशी तूं परधामा रे ॥२॥

मनातें दंडी जाणिव सांडी रे । केशवराजीं तूं आसन मांडी रे ॥३॥

० पद ४६३ वें

तें रूप बाई सांगूं मी कैसें आतां वो । श्रुतिशास्त्रां आनुनय वर्णितां वो ॥ध्रु॥

जें अतिनिर्मळ निश्र्चळ निष्कळ वो । सबाह्य अंतरीं कोंदलें पुष्कळ वो ॥१॥

अव्यक्त अद्वय सद्रुप अद्वय । पाहतां मन माझें जालें तन्मय वो ॥२॥

अकळ अलक्ष चिन्मय ब्रह्मपर जें । वर्णितां भागले ब्रह्मादिक सुर जे ॥३॥

सर्वाठायीं सर्व व्यापक पाहीं रे । आहे नाही हेंही न साहे कांहीं रे ॥४॥

गुरुकृपायोगें पाहतां माय वो । केशवीं केशवपण विरोनि जाय वो ॥५॥

० पद ४६४ वें

विषयधंदा सांडी वेगीं अंधा । हृदयकमळीं नित्य न्याहळी मुकुंदा रे ॥ध्रु॥

नाथिली तूं खटपट करिशीं कां हे । चिदानंदीं नित्य निश्र्चळ राहे रे ॥१॥

त्रिगुण-बेडी हे आत्मबोधें तोडी । मिथ्या देहाचे पडों नको वोढी रे ॥२॥

साधुसंग जोडी देहबुद्धी मोडी । केशवप्रभुची धरी सर्वकाळ गोडी रे ॥३॥

० पद ४६५ वें (चाल-सकळाभरण)

स्वरूपीं निश्र्चळ रे भवरा । सांडीं तूं तळमळ रे भवरा ॥ध्रु॥

सांगणें निजहित रे भवरा । होऊं नको दूचित रे भवरा ॥१॥

सेवी तूं येकांत रे भवरा । निजसुख निवांत रे भवरा ॥२॥

निजसुख निर्मळ रे भवरा । तेथेंची वीवळ रे भवरा ॥३॥

नाथिली घळमळ रे भवरा । सांडुनी सकळ रे भवरा ॥४॥

स्वरूपीं मकरंद रे भवरा । परिमळ सुगंध रे भवरा ॥५॥

भोगीं तूं सावध रे भवरा । केशवीं आनंद रे भवरा ॥६॥

० पद ४६६ वें

वायांची बडबड करूं नको । वायांची बडबड करूं नको ॥

अंतरीं विषय बाहीर परमार्थ माईक हें सोंग धरूं नको ॥ध्रु॥

मी एक ज्ञाता अज्ञान जाणपणें या मरों नको ॥

स्वहित आपुलें सांडुनियां दुरी व्यर्थचि अडवाटे भरूं नको ॥१॥

नाथिलेंचि बंडसुनी पाषांड वितंडवादी पडों नको ॥

थोरपणाचें घेउनि ओझें फुकट बापा बुडों नको ॥२॥

पावन नरदेह पावोनियां तू मायाविलासीं भ्रमों नको ॥

केशवप्रभुचें चिंतन सांडुनि संसार-दुःखें श्रमों नको ॥३॥

० पद ४६७ वें

दृष्टि स्वरूपीं न पडे । भेद तोंवरी कैसे मोडे ॥

ऐसें जाणोनि विवेकें । करी वोळखी सद्गुरुमुखें ॥ध्रु॥

अहावाहच सांगशी गोष्टी । ते स्वरूपीं नव्हेचि भेटी ॥

गुरुकृपें केशवीं वोळखी । स्वयंस्वरूपातें पारखी ॥१॥

० पद ४६८ वें

तया मनाचा चाळक । तें तूं न कळे म्हणशी देख ॥

हेंचि नवल मोठें पाहीं । तुझें तुज न पडे ठायीं ॥२॥

जेणें सकळ ० पदार्थ जाले । तें तूं म्हणशी मज न कळे ॥

म्हणे केशव न कळे तुज । तरी सद्गुरुमुखें बूझ ॥३॥

० पद ४६९ वें

मन विरतों गोविंद गावा । धनी पुरेतों अंतरीं ध्यावा ॥ध्रु॥

अंतरी ध्यायी तरी होईल हित । काय वरीवरी गाउनी गीत ॥१॥

होय जिवित अवघें वावो । तंव हृदयीं धरावा देवो ॥२॥

सांगे केशव जीवींची खूण । गुण ग्रासुनी होय निर्गुण ॥३॥

० पद ४७० वें

जो आगमासी सहसा कळेना ।

निगमासिही जो पैं आकळेना ।

पाहे मना रे रुप त्या शिवाचें ।

जो मूळ आहे सकळां जिवांचें ॥१॥

अखंड जो खंड नव्हेचि केल्या ।

सरोचिना जो बहु कल्प गेल्या ।

पाहे मना रे रुप त्या शिवाचें ॥

जो मूळ आहे सकळां जिवांचें ॥२॥

० पद ४७१ वें (सहज चालीचें)

जेथें असंतचि नाहीं । तेथें संत म्हणावें कांहीं ॥ध्रु॥

कांही न साहे न साहे । स्वयं सद्गुरुकृपें पाहे ॥१॥

जेथें दुःखासी नाहीं ठावो । सेखीं सुखाचाही अभावो ॥२॥

जेथें मायाचि मिथ्या जाली । तेथें चिन्मात्र कैंची बोली ॥३॥

संतासंत अनिर्वाच्य जालें । शब्द निशब्द मौन्य पडीलें ॥४॥

गुरुकृपें केशवीं पाही । आपेआप होउनि राही ॥५॥

० पद ४७२ वें

राम वरीवरी बोले वाचें । काम कडीयसी घेउनि नाचे ॥ध्रु॥

त्याचें काय करावें गाणें । मन अंतरि केविलवाणें ॥१॥

घे बहुरुपी उत्तम सोंगें । तैसा हरिदास म्हणवी अंगे ॥२॥

देह ठेवुनि भजनापासीं । चित्त गेलें कुटुंबापाशीं ॥३॥

वर्म चुकोनी लावी डोळा । प्रेम आंगीं नसतां लोळे ॥४॥

केशव स्वामीसी जाला चोर । भोगी अनंत दुःख अघोर ॥५॥

० पद ४७३ वें (बिलंदी)

भाव नाहीं निका । मुळींच रंग फिका ॥ध्रु॥

व्येर्थ जन्म त्याचा । देवासी वीट ज्याचा ॥१॥

प्रेम कळा नाहीं । गर्वेंचि मरे पाही ॥२॥

केशव म्हणे त्याचें । झणीं नाम घे शिवाचें ॥३॥

० पद ४७४ वें

ज्ञान-गोष्टी सांगे । मनपाठीं लागे ॥ध्रु॥

तेणें काय हित केल । त्याचें सर्व वाया गेलें ॥१॥

ज्ञानचर्चा करी । चित्त लोकाचारी ॥२॥

ज्ञान सांगे गर्वें माजे । साधुभजनीं लाजे ॥३॥

ज्ञान सांगे लोकां । परी केशवीं शुष्क देखा ॥४॥

० पद ४७५ वें (सहज चालीचें)

ऐसा हरी म्हणा मोठ्यानें । काळ पळे बहु नेट्यानें ॥ध्रु॥

हें सांगितलें शिव-दातारें । अंतरिच गुज निधारं ॥१॥

ममताहरि हरि सोवुनियां । राहें गुणातित होउनियां ॥२॥

म्हणे केशा केशव० पदवासी । सर्व हें केशवरूप तयासी ॥३॥

० पद ४७६ वें

भगवद्भक्ति विरोधी । तो मज मानेना मानेना ॥ध्रु॥

प्रपंच बरवा शोधी । तारक-मार्ग निशेधी ।

असत्य समागम वेधी । तो मज मानेना मानेना ॥१॥

विचार मंदिर वाडी । कोरुनि सौंशय काढी ।

भूतदयांबर फाडी । केली दुर्मति गाढी ॥ तो मज ॥२॥

गुणमईचें घर वसवी । रतिपति अंतरिं बसवी ।

बसती चिंता डसवी । सर्वसखा हरि नसवी ॥ तो मज ॥४॥

सज्ज्नचरणां नल वे । प्रबोधनपानें न निवे ।

सवगताप्रति न सिवे । केशवप्रभुचें रूप नव्हें । तो मज ॥५॥

० पद ४७७ वें (श्र्लोक)

निजांगनेपासुनि सूटला हो । परांगनेलागुनि वीटला हो ॥ध्रु॥

जाला सुखी केवळ आत्मयोगें । वर्ते जगीं द्वैतदशा वियोगें ॥१॥

पुत्रत्व त्यागुनि पिताचि जाला । कळत्र मातेसि करूनि ठेला ।

त्या योगभ्रष्टासि कसें भजावें । भजेल तेणें तसलेंचि व्हावें ॥२॥

करी साउली माउली संत ज्यासी । चिदात्मा तयाच्या गृहीं क्षेत्रवासी ।

दया-शांति-विश्रांति तेथेंच खेळे । समाधिस्थ तो पाहतां तृप्त डोळे ॥३॥

महत् शोककारी विकारी विलोकी । गळाला अहंभाव हा सत्० पदा कीं ।

असे बोलिलें वेदशास्त्रींपुराणीं । दयासिंधु ते संत चित्सौख्यवाणी ॥४॥

दयाळो गुरू अंतरीं आठवाना । महत् शोरूकपी तया आठवाना ।

गुणातीत तो आठवा आठवाना । कदा द्वैत दारिद्र हें आठवाना ॥५॥

सिद्धांत हा सार-विचार घेशी । पितामहांचें तरि रूप होशी ।

गुह्यार्थ हा केशवराज बोले । कळे मनीं तोचि गळोनि डोले ॥६॥

सर्वात्मा तो अंतरीं राम पाहों । निष्कामाचें धाम होउनि राहों ।

ऐसी आम्हां लाधली प्राप्ति पाहीं । गेली माया देह देहींच नाहीं ॥७॥

हृत्पंकजीं ठेवुनि साधकाला । मातापिता पूर्ण स्वयेंचि झाला ।

तो सद्गुरु भेटति नित्य ज्याला । भेटेचिना देह असोनि

त्याला ॥८॥

भगभग करितांही प्राप्ति नाही भगाची । तगबग अति वाढे सौख्यहर्तीं जगाची ।

परम विकळ होती नेणती पूर्णदाता । निजगति अविचारें मानिती व्यर्थ चिंता ॥

० पद ४७८ वें

शांति ज्याची वनिता । भक्ति ज्याची दुहिता ।

बोधपुत्र तत्वता । त्रिभुवनिं विजयी ॥ध्रु॥

ऐसियाच्या पायीं रे । दीन होउनि राहीं रे ।

जन्ममरण कांही रे । मग तुज नाहीं रे ॥१॥

ब्रह्मसुखसं० पदा । भोगिती ते सर्वदा ।

द्वैतभाव तो कदा । नाठवीती मानसीं ॥२॥

एकपणें रातलें । वृत्तिवीण मातलें ।

शोकमोह घातलें । भोवंडुनी बाहेरी ॥३॥

सौंसाराचें सांकडे । त्याच्या दृष्टी केव्हडे ।

निजरूप रोकडें । करुनियां ठेविती ॥४॥

काळातेंही मारिला । लोकतेंही तारिला ।

भेद हा निवारिला । केशव म्हणे आमुचा ॥५॥

० पद ४७९ वें

शोकसिंधु आटेना । आनंद चित्तीं दाटेना ॥ध्रु॥

तरी तें ज्ञान काय बा । शीण हा न जाय बा ॥१॥

गळित होउनि बोलेना । समाधिबोधें डोलेना ॥२॥

केशवराजीं मिळेच ना । मिळोनि तेथें गळेचि ना ॥३॥

० पद ४८० वें

मोलें हातां येईना । बोलें प्राप्त होईना ॥ध्रु॥

काय सांगु तुज वो । अंतरींचें गुज वो ॥१॥

भेदबुद्धि गळेचिना । तोंवरि कांही कळेचिना ॥२॥

सांगीजेसें नाहीं वो । परी लाभें संतापाईं वो ॥३॥

द्वैत संगा रुसोनी । तेंचि राहे होउनी ॥४॥

केशव सांगे सद्भावें । तेंचि अवघें जाणावें ॥५॥

० पद ४८१ वें (राग - गौडी)

जाग जाग जाग सदा राम नामिं जाग ।

संतसंग धरुनि करी परता भवनाग ॥ध्रु॥

कामक्रोधलोभ याचा तोडुनिया टाकी लाग ।

परमशीतळ होउनी मनीं भजन-भुवनीं वाग ॥१॥

वीसराचा नाश करुनी विसरा विसर भाग ।

केशवराज स्वामीयासी पूर्ण दशा माग ॥२॥

० पद ४८२ वें

चाल रे चाल विचार-वना चाल ।

कामक्रोध लोभ यांचा सोडुनि देई ख्याल ॥ध्रु॥

वासनेची टाळ वेगीं कल्पनेसी गाळ ।

पुण्यपाप जाळ जंजाळ वेगीं जाळ ॥१॥

सर्वसंग सोडि वेगीं सर्व क्रिया तोडी ।

केशवराजस्वामी सखा सर्वकाळ जोडी ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP