|
पु. १ तोंडांत घालून चर्वण करितां येईल इतका खाद्य पदार्थाचा अंश , परिमाण ; तोंडात मावेल इतका अन्नाचा गोळा ; कवळ . २ घाण्यांत , जात्यांत घालावयाचा वैरणीचा एक वेळचा हप्ता , परिमाण ; घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल . ३ जात्याच्या भोंकांत , खळगींत , घिरटीपाशीं दळले न जातां शिल्लक राहणार्या दाण्यांचा समुदाय . ( क्रि० धरणें ). हें जातें घांस धरतें . [ सं . ग्रास ; किंवा घस = खाणें ; सं . प्रा . घास ; फ्रें . जि . खास ] ( वाप्र . ) ०उतरणें काढणें चिरणें मोडणें - शिजविलेल्या अन्नाचा , भाताचा घासाएवढा गोळा घेऊन त्यावर तेल वगैरे घालून व रेघोटया काढून अन्नाचा वीट आलेल्या माणसावरून उतरून - ओंवाळून तो घास अग्नींत किंवा घराच्या बाहेर टाकतात तो प्रकार ; परक्या माणसाची दृष्ट अन्नास लागून पुढें खाणारास अन्नाची किळस , वीट येतो तेव्हां हा प्रकार करतात . ०करणें भरणें - ( एखाद्यास ) अतिशय छळणें , सळो कां पळो करून सोडणें . ०काढणें जात्यांत दळले न जातां राहणारे दाणे काढून टाकून जातें साफ करणें . ०देणें १ विवाहसमारंभात जेवणाच्या वेळीं नवपरिणीत वधूवरांनी उखाणे घेऊन एकमेकांच्या तोंडांत घांस घालणें . २ २ भरविणें ; जेऊं घालणें . म्ह० घांसभर देणें आणि कोसभर नेणें = थोडक्या मोबदल्यांत बरेचसें काम करून घेणें . घांसभर देणें आणि कोसभर नेणें ही अवस्था या लोकांना नकोशी झाली आहे . - खेया . घासीं गू खाणें - ( अक्षरश : ) ( अन्न खात असतांना त्याबरोबर विष्टां भक्षण करणें . उ० एखादी आई जेवीत असतांना तिचें मूल तिच्या मांडीवर हगतें व न कळत , त्या विष्टेचा अंश अन्नाबरोबर आईच्या पोटांत जातो यावरून ) एखाद्यासाठीं अतिशय कष्ट सोसणें ; हरप्रयत्न करणें ; खस्ता खाणें . सामाशब्द - ०खाऊ वि. ( उप . ) आयतें खाण्याशिवाय दुसर्या कशाकडेहि लक्ष न देणारा ( कुटुंबांतील आयदी , निरुद्योगी , मनुष्य ). [ घांस + खाणें ] ०मुटका पु. पिशाच्चांचा उपद्रव टाळण्यासाठीं , त्यांना संतुष्ट करण्याकरितां बाहेर टाकावयाचा अन्नाचा गोळा . ( क्रि० देणें ; टाकणें ; उतरणें ).
|