वामन पंडित - भामाविलास

कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.

लता सत्या कीं खगगमन - भक्ताऽमरतरु
तरु हातीं तो श्रीपति भवनदी - पार उतरु
धरी लक्षी पक्षी करतळयुगीं पादयुगळा
गळां रत्न ध्यावा द्रुम - गरुड - संयुक्त सगळा ॥१॥
खगेंद्र खांटां सुरभूरु हातें
हातें धरी पादसरोरुहातें
त्याच्या स्मरा नासिल तो असल्या
सत्यापती दाविल नित्य सत्त्या ॥२॥
श्रीकृष्णपादाद्भुत वारिजाती
जाती भवार्ती सुख - पार जाती
जाती उणे त्यांसहि दे पदासी
दासीं अशाच्या स्तविजे पदासी ॥३॥
म्हणूनि गातों गुण माधवाचा
वाचाळ मी भाट रमा - धवाचा
वाचा प्रबंध प्रभु - वैभवाचा
वाचा हरीते भ्रम या भवाचा ॥४॥
वदा नाम भामाविलास प्रबंधा
अविद्येचिया जो हरी क्षिप्र बंधा
हरी भा प्रभा मा रमा सत्य भामा
प्रकाशे न कां जेविं नासत्य भामा ॥५॥
कृष्णासि कृष्ण - पद - भक्ति - विशारदाने
जें स्वर्ग - पुष्प दिधलें मुनि नारदानें
तें रुक्मिणीप्रति दिलें त्रिजगान्निवासें
जें द्वारका करि भरोनि सुगंध वासें ॥६॥
असी गोष्टि दासी - जनीं बायकांनीं
विचारुनियां सांगतां जाय कांनीं
तईं सत्यभामा महा - क्रोध दावी
बुझावी हरी तेचि लीळा वदावी ॥७॥
गडबडां धरणीवरि लोळते
वदवती न कवीसहि लोळ ते
रडत मूर्छित होय घडी घडी
पवन निश्चळ नेत्र न ऊघडी ॥८॥
अलंक हार गळांतिल तोडिते
कुरळ केश मुखांवरि सोडिते
कर - युगें उर मस्तक ताडिते
वसन आणिक कंचुकि फाडिते ॥९॥
महा - उष्ण - श्वासें करुनि वदते शुष्क अधरा
धरापृष्ठीं जाडा न शठ दुसरा या गिरिधरा
धराया माझा हा कर कपटि कैंचा जनमला
मला जो निंदूनी कुसुम तिस देऊनि रमला ॥१०॥
सख्या हो मेल्याही शवहि न शिवो हें यदुपती
पती नाना स्त्रींचा पतित - जनही ज्यासि जपती
नका येऊं देऊं सदनिं सवतीच्या पियकरा
करातें लावीना मज कपटि ऐसें तुम्हिं करा ॥११॥
इत्यादि नानाविध भाव दावी
ते शोक - वार्ता कितिहो वदावी
कृष्णें समाधान विचित्र केलें
त्या वर्णनीं चित्त असे भुकेलें ॥१२॥
रडत रडत मूर्छेमाजि वृत्ती बुडाल्या
परम विकळ मी तूं या स्मृतीही उडाल्या
उचलुनि सखियांनीं मंचकीं दिव्य - सेजे
निजविलि मृततुल्या सत्यभामा दिसे जे ॥१३॥
ये अशांत सदनांत हरी तो
जो अनादि भव - शोक हरीतो
किंकरी नमुनियां चरणातें
सांगती सकळ आचरणातें ॥१४॥
सर्वज्ञ तीची समजोनि ठेवी
मौनेंचि नाकावरि बोट ठेवी
काढी उशी घालुनियां स्वमांडी
त्यानंतरें सांत्वन - यत्न मांडी ॥१५॥
स्तनीं आननीं बिदु जे काजळाचे
तिच्या लोचनींच्या स्वशोकाजळाचे
पुशी हस्त - पद्येंचि आधीं हरी तो
जया पाणिनें सर्व आधीं हरी तो ॥१६॥
म्हणे शोक कां प्राप्त झाला महाहा
असी कष्टली कां शुभांगी अहाहा
न बोलेचि कां आमुची आजि राणी
जिच्या बोलण्याचीच आम्हां शिराणी ॥१७॥
कस्तूरि आजि न दिसे वदनीं कपाळीं
हें निष्कळंकपण या द्विजलोक पाळीं
मुक्तां द्विजां त्यजुनि कां परि शोक पाळी
कां क्रोध या शशिस यासि जसा कपाळीं ॥१८॥
इत्यादि सौंदर्य मुकुंद वर्णी
तें आइके तप्त - सवर्ण - वर्णी
तरी न पाहे मुख कृष्णजीचें
स्वमानभंगें  मन उष्ण जीचें ॥१९॥
जईं श्रीवत्सांक प्रभु करि निजांक - स्थिति शिरा
शिरा नाडी प्राण प्रगटति न लाऊनि उशिरा
शिगणी शब्दांची पुरवि तरि डोळे न उघडी
घडी जे मानाची बिघडलि असे तोंवर घडी ॥२०॥
ब जागीची जागी स्वमति परि डोळे न उघडी
घडी एक क्रोधें मन बुडवि मानी अवघडी
घडी पूर्व प्रेम - स्थितिस बसतां तीस विघडी
घडी स्त्रीजातीची घडविलि असे ख्याति उघडी ॥२१॥
जयां देती लाड प्रियपति तयांचाच ठकळा
कळा कांति भ्रांति धरुनि अति धीटाच सकळ
कळावें या लोकीं म्हणुनि वदती ते शशि - कळा
कळा हे दावी कीं थट घट वदे क्रोध - विकळा ॥२२॥
सख्या दुःखी तूझ्या मजसहित कीं कान उगले
गळे नेत्रीं पाणी न निघति मुखीं शब्द सगळे
किती मी प्रार्थीतों धरुनि शिर अंकाच उपरी
परी क्रोधाची हे अधिकचि दिसे अद्भुत परी ॥२३॥
वदे भामा कोपें अति विकळ चाऊनि अधरा
धरा पृष्ठीं नाहीं ठक तुज असा अंबुज - धरा
धरावें या अंकीं शिर अजि तिचें पक्षिगमना
मना आलें देणें कुसुम जिस तें कंस - दमना ॥२४॥
तों नेत्र मोडुनि वदे ढकलूनि मांडी
भ्रू - मंडळीं भ्रमण अंगुलि - भंग मांडी
तों कृष्णजी करुनि हास्य म्हणे अहाहा
वेडे अनर्थ इतुक्यास्तव कां महाहा ॥२५॥
अर्पितां मुनिवरें सुमनातें
वाढलें प्रथम हेंचि मनातें
कीं असा तरु पुरींत असावा
त्यांतही स्वसदनींच वसावा ॥२६॥
तत्रापि जे प्रिय बहू स्ववधूचि माजी
तो स्थापणें तरु तिच्या सदनाचि - माजी
ते तूं प्रिया तुजचि देइन त्या द्रुमातें
हें वाटलें प्रथम आण तुझीच मातें ॥२७॥
तुतें वृक्ष देणेंचि यालागिं आधीं
फुलें नासिला जो तिला होय आधी
न जाणोनि केले तुवां कष्ट भारी
समाधान ऐसें करी कैठभारी ॥२८॥
जे शब्द योजित असे मनिं पारिजातीं
जाती तिच्या त्दृदय - सुंदर - वारिजातीं
जाति स्वभाव तरि ये वदनांबुजातीं
जा तीस द्या तरुहि सेवित - देव - जाती ॥२९॥
मत्प्रीति तीवरि अगे जसि आरसाची
साची तुझी शपथ लोचनसारसांची
साची नसेल तरि त्यांतहि श्लाघ्य राणी
राणी वडील म्हणती तिस ते शिराणी ॥३०॥
फूल देउनि तिला उतराई
होय मी समज हे चतुराई
देतसें तरुचि तो तुजला गे
खेद हा न करणें तुज लागे ॥३१॥
हरी जाणें हें कीं न वदत असें क्रोध - निकरें
करें आलिंगावी प्रिय वदत हे म्यां प्रियकरें
करें श्री चंद्राच्या कठिन शशिकांत द्रवतसे
तसे हे ही भाव प्रगट करणारी अमृतसे ॥३२॥
करुनी अशा सत्य नेमास तीतें
वळें वोढुनी सत्यभामासतीतें
दिलें क्षेम त्या दुर्लभा माधवानें
चहूंहीं भुजीं सत्यभामा - धवानें ॥३३॥
असी ते बुझावूनि रंभोरु हातें
तिच्या धूतसे हो मुखांभोरु हातें
उटी लावुनी वाटिल्या केशरा जी ॥३४॥
पुढें राखडी गुच्छ केशाऽग्रभागीं
मध्यें भूषणें अन्य त्यांच्या विभागीं
वरी शीसफूलाख्य सीतांशु भांगीं
द्विजें मोतियें लेविलीं त्या शुभागीं ॥३५॥
मुक्तां द्विजांची नवसिंधु जाची
ज्याची चमू नौक्तिकसिंधु ज्याची
ज्याची प्रभा क्षीरसमुद्र ज्यातें
त्यातें धरी कृष्ण करां बुज्यातें ॥३६॥
करि हरि यमुना हो मूद गंगावनाची
मिरवि धवल - पुष्पीं दीप्ति गंगा - वनाची
सित असित नद्यांच्या संगमीं श्री - त्रिवेणी
तसिच यदुपतीनें घातली चित्र - वेणी ॥३७॥
पतीनें अळंकारितां फार साजे
सखीचे करीं पाहते आरसा जे
गमे की स्वसौंदर्य - सीमा न साहे
प्रिया प्रीतिनें वाढवी मानसा हे ॥३८॥
मुखेंदु शोभे बहु भामिनीचा
नीचा दिसे हा पति यामिनीचा
नक्षत्र - सेना जसि सिंधु ज्याची
ज्याची चमू मौक्तिक सिंधु ज्याची ॥३९॥
बोले सखी वृंद उभा असाची
साची प्रिया हे पति मानसाची
म्हणोनि शोभे बहु सत्यभामा
भामापती प्रीतिच सत्यभामा ॥४०॥
अळंकारितां येरिती जो हरी तो
अनेकांपरी शोक तीचा हरी तो
प्रसंगांत त्या वृंद आले सुरांचे
तिही वर्णिले त्रास भौमासुराचे ॥४१॥
आयके बळ हरी नरकाचें
बीज जो परी हरी नरकाचें
भीत देखुनि सुरां शरणांतें
नेमिलें असुर नाश - रणातें ॥४२॥
तों दाखवी म्लानमुखां बुजातें
श्रीसत्यभामा न सुखांबु ज्यातें
म्हणूनियां युद्धविलास तीतें
दावी सवें नेउनियां सतीतें ॥४३॥
या दुःखितांची न हरुनि आधी
स्त्रीकाम कर्यव्य अयुक्त आधीं
देवार्थ जाऊं तरि हे वजागी
मूर्छेसि जातां करि कोण जागी ॥४४॥
दोहीं परी संकट हें हरी तो
संगें तिला नेउनि जो हरीतो
म्हणे खळा मारिन याच वाटे
आणूं तरु कीं सुख ईस वाटे ॥४५॥
होती अधिष्ठूनि जसीच मांडी
तसी सवें नेउनि युद्ध मांडी
वधूनि भौमासुर पारिजाता
आणी नमों तत्पदवारिजाता ॥४६॥
प्रकाशतो देउनि सत्य भामा
तों तोचि तेथें अजि सत्यभामा
वाच्यांश तो तो हरि वामनाचा
आत्मा ठसा हा बरवा मनाचा ॥४७॥
भातें प्रभा केवळ चित्स्वरुपें
मा शक्ति शुक्तीवरि जेविं रुपें
भामाविलास प्रभु नाम याचें
ठेवी असें कृष्ण अनामयाचें ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : July 04, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP