स्वयें ईश सर्वज्ञही उद्धवानें पुसे नीति वंदूनि त्या माधवातें
तयाच्या वदों त्याच दिव्या कथार्था शुक - व्यास उक्ती वदोनी यथार्था ॥१॥
सुधर्मा सभा भोंवने वृष्णिचक्र हरी मध्यभागी करीं शंखचक्र
घनश्याम हेमांबरी भासमान नये कोटि - कंदर्प - शोभा समान ॥२॥
पुढें नाचती संघ नृत्यांगनांचे जयाचें यथाभाग सर्वागनाचे
सभे बैसले ते समीप द्विजानी यशें धार्मिकांचीं निरोपीत जाती ॥३॥
सकवच तनु सारें मस्तकीं टोप भारी
यदु - मधु - वर ऐसे त्यामधें कैठभारी
करिं सशर धनुष्यें पाठिसीं पूर्ण भाने
हरि मनि नयनीं ही येरितीची सभा ते ॥४॥
तों दूत ये एक विदेश - वासी साष्टांग वंदी प्रभु केशवासी
प्रणाम त्यानंतर राजयाचा करी पुढें काळ बरा जयांचा ॥५॥
जरासंधें बंधें करुनि अयुत - द्वंद्व नृपती
बहू केले कष्टी मग हरि हरी हेंचि जपती
दुराशा राज्याची त्यजुनि अवघे पातक - मळ
स्वदृष्टीनें पाहूं म्हणति हरिचें पाद - कमळ ॥६॥
हरिचरण पहाया भूप जो तो भुकेला
वध मगधपतीचा या सुखा हेतु केला
म्हणति शरण आलों मुक्ति देणार साची
परि रुचिन तिला हे जे पदाब्नीं रसाची ॥७॥
म्हणुनि मारुनि मागध माधवा चरण सत्वर दाविं रसा - धवा
धरुनि भाव मनीं इतुका महा वदनि दूतमुखें नृप काम हा ॥८॥
विनति संपवि दूत विशारद प्रगट होय अशांतचि नारद
नमुनि त्यास सभासद वेष्टित प्रभु पुसे निज - पांडव - चेष्टित ॥९॥
स्वजन वत्सल लौकिक तांडव स्फुट करुनि म्हणे अजि पांडव
धरुनियां असती असि कामना विदित भाव करी इतुका मना ॥१०॥
प्रश्नें हरी सुख करी मुनि - अंतरंगा
शब्दांत दाउनि दयांबुधिच्या तरंगा
जें मी वदेन म्हणतों पुरुषोत्तमातें
तें हा पुसे ऋषि म्हणे स्वयमेव मातें ॥११॥
मी पांडवांचेंचि बरें कराया प्रार्थू पहतों जगदेकराया
त्याची त्वराया पुरुषोत्तमातें योजी स्वयें त्यावचनीच मातें ॥१२॥
मी भक्त माझ्या वचनास मान देणार सर्वत्र जरी समान
या कारणें बोलविनो मला हो ऐशा मुनीला सुखधाम लाहो ॥१३॥
नमुनि मुनि म्हणे तो राजसूय - ऋतूतें
करुनि यजिल राजा पांडुचा पुत्र तूतें
स्व - चरण - शरणातें चक्रवर्ती कराया
लव निज - करुणेचा दाविं लौकिक राया ॥१४॥
मिळतिल जन सारे त्या समस्तांत देवा
दिससिल हरि येथें सर्वभूतां सदेवा
क्रतुवर म्हणुनी हा होय ऐसी कृपा हे
करुनी निज - अपांगें पांडवांलागि पाहें ॥१५॥
श्रवण कथन ज्याचें दुष्टही अंत्यजाती
करुनि तरति पापें भस्म होऊनि जाती
ऋतुवर हरि होतां त्या तुझे दिव्य पायें
त्रिभुवन जन पाहे तूंचि त्याच्या उपायें ॥१६॥
तुझ्या कीर्तीगाती अतळ वितळीं आणि सुतळीं
सहस्त्रां तोंडीं ही भुजगपति गातो अतितळीं
मनुष्यक्ष्मा - लोकी क्षिति - सुर स्फुर स्वर्गभुवनीं
वितान त्रैलोक्यावरि यश तुझें जी जनिं वनीं ॥१७॥
त्वत्कीर्ति जी त्रिभुवनीं जरि चांदवा हे
मंदाकिनी चरणतोय अमंद वाहे
गंगा दुजी तिसरि भोगवती हरी ते
पादोद्भवा जगतिपातक संहरीते ॥१८॥
साम्राज्य या ऋतुमिसें अजि पांद वांतें
देऊनि दाखवि जगीं यश - तांडवातें
भावें अशा यश निरुपुनि नारदानें
केलें करुनि निजकार्य विशारदानें ॥१९॥
ऐकोनि गोष्टी मुनिनारदाच्या भक्तांचिया मुक्तिविशारदाच्या
आधींच हें कृत्य अगाध वाटे तों देखिले यादव अन्य - वाटे ॥२०॥
गमें यादवां कीं नृपांचाचि धांवा धरुनी मनीं शत्रु आधीं वधावा
मुनी पांडवांचेचि संधीस पाहे मुकुंदास दोहींकडेही कृपा है ॥२१॥
पक्षद्वयावरि करुं म्हणतो कृपा हे
साक्षी हरी निजसभे मतभेद पाहे
कीं मागधा वधिन नेउनि भीमसेना
संकल्प हा स्वकृत हें नमनी स्वसेना ॥२२॥
देग्वे हरी खवळले यदुवीर भारी
हे नीति त्यास न वढे मधुकैठभारी
कीं सांगतां बहु जरा - सुत - गर्व दूनें
निःसीम कोप चढला सकळां यदूतें ॥२३॥
जरासंधवैरानुबंध स्मरावा वदूनीं तयांच्या करें तो मरावा
असी धाडितां गोष्टि भू - पाळकानीं यदृमाजि घेतीस गोपाळ कानीं ॥२४॥
पथीं पायीं जातां प्रगट नकरी माग धरणी
पळाला सत्रादां हतबळ असा मागध रणीं
पुरीतें तूं जातां विमुख तुज त्या मार्ग गमनीं
स्वयें केलें मानीं मृगपतिस जैसा मृग मनीं ॥२५॥
करुनि गर्व अपार असा हरी प्रबळ आपण निर्बळ संहरी
म्हणुनि मारुनि सत्वर या खळा करिं सुखी क्षिति सागरमेखळा ॥२६॥
श्रवण हें करितां बहु तापले अधर चाविति यादव आपुले
म्हणति हे अपकीर्तिच ऊघडी परिहरुं अरि मारुनि ये घडी ॥२७॥
तनुत्राणें देहीं तटतटित ऐसेचि फुगले
मुनी मध्यें बोले म्हणुनि अति सक्रोध उगले
अशातें गुन्ह्याचें कथन करितां विप्रवचना
निमित्त हे केली म्हणतिल नृपा शब्द - रचना ॥२८॥
सर्वज्ञ यास्तवचि लौकिक भाव दावी
कीं नीतिउद्धवमुखें स्फुट हे वदावी
त्यातें वदे सदय माधव हें स्ववाचा
कीं उद्धवा नयन तूं निजर्वेभवाचा ॥२९॥
आम्हांस तूं तनुस नेश्र जसा तसारे
वर्तो तुझ्याच वचनें यदुवीर सारे
हें उद्धवा तुज विचार - रहस्य ठावें
कोणीकडे प्रथम सांग अगा उठावें ॥३०॥
त्रिभुवनपतिची हे आयके शुद्ध वाचा
जनि विजनिहि कांदे तोष त्या उद्धवाचा
विदित मन सभेचें दूत - देवर्षि - वाणी
अणुभरि न जयातें बुद्धि - चातुर्य - वाणी ॥३१॥
म्हणे मुकुंदा मुनि - नारदानें जें बोलिलें बुद्धि विशारदानें
ते योग्य सिद्धि स्वकरें कराया जावेंचि तेथें जगदेकराया ॥३२॥
शरण भूपति सोडवणें स्वरें मनिं असें धरिलें सुरशेखरें
परि जरासुत - मृत्यु जधीं घदे उभय सिद्धि - कपाटहि ऊघडे ॥३३॥
जिंकोनि राजे सहसा धनानें जो राजसूय ऋतु साधनानें
आणील त्याला मखराज सिद्धि ते होंनदे भागधहं प्रसिद्धी ॥३४॥
मेल्याविणें तो सहसा धनानें नेदील होऊं ऋतु - माधनाते
तैसाचि सोडील न त्यां नृपांतें दोन्हीं घडावीं खळ - घात - पातें ॥३५॥
रणीं मृत्युही त्यास देवा असेना जरी जाय अक्षोहिणी कोटि सेना
जरासंध तो द्वंद्वयुद्धीं वधावा घडे योग तेव्हां फळे भूष धाया ॥३६॥
जरासंधदेहास या दोनिभाग स्वहस्तेंचिरुनी करी जो विभाग
तयाच्या करें मृत्यु तो या खळाचा नव्हे अन्यथा घात उछृखेळाचा ॥३७॥
पाहिजे समबळीच खळा या देह - सांधिस बळें उखळाया
पाडुनी अयुत - नाग - बळानें कोण जी चिरिल त्या प्रबळातें ॥३८॥
भीम एक समसत्व नृपा था तोचि एक खळ - मृत्यु - उपाया
हें रहस्य विरळांसचि ठावें सद्य यास्तव मखार्थ उठावें ॥३९॥
मगधपति वधावा जाउनी त्याच वाटे
समबळि अरि ज्याचा एकला भीम वाटे
त्यजुनि सकळ इंद्र - प्रस्थभूमीस सेना
गमन अजि करावें घेउनी भीमसेना ॥४०॥
जवळि तूं असतां अजि भीम हा चिरिल मागधसंधि उभी महा
शिखिमुखीं वन अर्पुनि खांडव करि जसा रणि तांडव पांडव ॥४१॥
करुनि तूं जग मोडिसि माधवा परि निमित्त विधीस उमा - धवा
करिसि या रिति या कुरुनंदना करि पुढें यदुनंदन - नंदना ॥४२॥
परि द्वंद्वयुद्धार्थ तो सांपडावा चमत्कारयोगेंच फांसा पडावा
नदे ब्राम्हणा पाठि नेदूनि दान करावें तयाच्या वधा हें निदोन ॥४३॥
स्वयें विप्रवेषासि भीमें सजावें अकस्मान आतिथ्य - काळास जावें
म्हणें माग तों युद्ध देहें वदावें खडाण्या पशूतें तया हेंचि दावें ॥४४॥
असें द्वंद्वयुद्धीं हरी त्या नृपातें चिरावें क्षिती पाडुनी घात - पातें
तई याग तेव्हांच त्यां भूपतीतें घडे मुक्ति भक्तास्त्रियांच्या पतीतें
पदभ्रष्टा राण्या गिरिदरिं अरण्यांत असती
कितेका कुग्रामीं करुनि असती जी स्ववसती
दळाया कांडाया इतर गृहकृत्यास बसती
तुतें जेव्हां जेव्हां स्मरति इतराही नृपसती ॥४६॥
निजउनि नृपकांता पाळणीं वाळकांतें
स्मरतचि तुज गाती श्री जगत्पाळकातें
करिसिल पतिमुक्ती मागधातें वधूंनी
म्हणुनि भरवंसा हा मानिला त्यां वधूंनीं ॥४७॥
गाती तुझे विशद कर्म नरेंद्रकांना
कीं मारुनी रिपुसि सोडविशी स्वकांता
गोपी जगीं क्षितिपति स्मरन स्वमाया
इत्यादि बंध हरि कीर्ति जगीं सजाया ॥४८॥
व्रजसतीसह गाय वनींहरी धनद - दूत तई अबला हरी
वधुनि ते खळ तो प्रभु त्या वधू त्वरित सोडवि मागध तो वधू ॥४९॥
जळचरें चरणीं धरितां करी करि सरोरुह काकुलती करी
स्वगति जो तइंदे द्विरदाधिपा वरद तोचि वधू मगधाधिपा ॥५०॥
जनकजा हरिनां दशकंधरें वधुनित्यासहि कौस्तुभ - कंधरें
स्वपदही दिधलें स्वपतीस तो रिपुहर स्वपदप्रद दीसतो ॥५१॥
स्वजननी जनकें यदुशेखरें वधुनि कंसहि सोडविलीं खरें
कवण त्याविण मागध संहरी म्हणुनि भूपसत्या वदती हरी ॥५२॥
दुतबिलंबित - नृत्त तसा हरी नृपहि सोडवि मागध संहरी
द्रुतकृपाळु मरवार्थ विलंबितो प्रभुस कार्य असे अविलंबितो ॥५३॥
चारि हे द्रुतविलबित - वृत्ते आयकोनि हरि चारिहि कृत्तें
पातला द्रुतचि अल्पविलंबें कार्य उद्भवहि त्या अविलंबें ॥५४॥
असे तो पुढें नीट जोडोनि पाणी असा उद्धवें प्रार्थिला चक्रपाणी
म्हणें हेंचि गाती हरी लोक सारे हरी तूं न दुःखें हरीसी कसा रे ॥५५॥
गाती असेच शरणागत जे पदातें
व्यासादिकें मुनि अशा यशसंपदातें
ऐसेंच उद्धव म्हणें हरि - भक्त सारे
गातां न पावसि म्हणे हरि तूं कसा रे ॥५६॥
जरा संध हा सर्वथाही वधावा धरुनी असा हा बहू - जीव धांवा
जई राज सूयाचिया क्षिप्र संधी हरी तोचि आम्हां अरी हे प्रसिद्धी ॥५७॥
नृपां राज्य साम्राज्यही पांडवांतें सुखी तृष्णिवृंदें करु तांडवातें
यशाची तुझ्या सर्वलोकीं प्रसिद्धी वधें मागधाच्या अतिक्षिप्र सिद्धी ॥५८॥
सविनय निपुणाची येरिती सिद्ध वाचा
परिसुनि यदुवृंद स्वामि हा उद्धवाचा
मुनिवर नृपदूतें हर्ष पावोनि सारे
म्हणति चतुर नाहीं उद्धवा तूजसा रे ॥५९॥
भीम एक कळला खळहंता यादवीं दवडिली स्वअहंता
गोष्टि अप्रिय मना जई वाटे बुद्धि हे कसनि लावि सुवाटे ॥६०॥
हरी इंद्र प्रस्था गमन - करुनी पांहुतनया
स्वभक्तांची वाणी सहजचि वदे त्या सुविनया
सवेंनें भीमाते सहज करुणेंनें तदनुजा
प्रकारें त्या मारी मगधपति दे राज्य तनुजा ॥६१॥
जसें गीत केले नृपांच्या वधूंनीं तसें सोडिलें मागधातें वधूनीं
हरुनी तयांच्या महा आपदेतें पदद्वंद्व दाऊनि दे संपदेतें ॥६२॥
न करुं म्हणति राज्यें भूप जे त्यांस देवें
परिहरुनि अविद्या दीधलें त्यां सदेवें
मिळुनि बहुत राजे क्लेश फारां दिसांचे
हरुनि विमळ केले दुग्धतापादि साचे ॥६३॥
नव्हे जागरीं कद्वक स्वप्नसेना प्रबुद्धांतसा बद्ध - भोगी असेना
असें ध्यान लाऊनियां चिद्रसाचें दिल्हें राज्य कीं जें न वाटेचि साचें ॥६४॥
सदन्नें सद्वस्त्रें विविध सदलंकार निकरें
तयां शोभा केली अभय अभया देउनि करें
रयीं एका एका बसउनि कृपायुक्त - हदयें
तयां आज्ञा देतां गमन करिती भाग्यउदयें ॥६५॥
ते सोडऊनि अवघे नरदेव देवे
येऊनियां करविला ऋतु वासदेवें
यागांत मोक्ष शिशुपाळ - नृपास देवें
देतां दिसे प्रकट सर्वजना सदेवें ॥६६॥
मुक्तिदायक मुकुंद - विलास ग्रंथ यास्तव मुकुंदविलास
ध्यान वामन मुकुंद - पहातें अर्पितां निज - मुकुंद - पदातें ॥६७॥
समाप्त.