वामन पंडित - विश्वास वध
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
तुटति बंध तरीच समस्त कीं जरि गुरु कर ठेविल मस्तकीं
त्यजुनि सर्वहि कुल्पित कामना गुरुपदांबुज तूं भज कामना ॥१॥
चहुंकडे गुरुराज विराजतो लहरियाचि समुद्र विराजतो
स्थिर - चरांत गुरु नुसता पहा तरि विझे अति मानस - ताप हा ॥२॥
प्रकाशी सुविद्या कुविद्या हरी तो गुरु - ज्ञान देतो अविद्या हरीतो
जयाचे हरीतो गुरुत्वें गुरुत्वा त्रिवाचा गमे जो गुरुत्वें गुरुत्वा ॥३॥
गुरुच तो रुचतो मति ते बरी पसरते सरते सचिदांबरी
गुरुच या भव - हस्तिस जो हरी गुरुपणा अपदुःख न जो हरी ॥४॥
जाणेल जो गुरुकृपेस्तव आपणातें
तो कां स्मरेल नसत्या पहिल्यापणातें
तो तूंच कीं म्हणुनि पूसति लोक सारे
हा देह सातविथि होइल हो कसा रे ॥५॥
असे हेम ताटीं जसें कांठसारें दिसे एक सोनें जसें कांठसारे
तंई ज्ञान अद्वैत ऐसें वदावें जड भ्रांतिचें सोडवीतोचि दावें ॥६॥
सकळ चिन्मय काढिन मी रवा जरि खरा उतरे तरि मीरवा
मग समस्त अवेवहि हे महा - जग तसें दिसतें निज हेम हा ॥७॥
जें जाणनें जाणतसे जगातें नव्हे तम ज्योतिहि तेज गा तें
चिदंबु हें साच जडा न गारा हें ब्रम्ह जाणा पिटितों नगारा ॥८॥
भिन्ना नसोन दिसती जळभिन्न गारा
वर्तूळ श्रुभ्र कठिणा मृदु थंड गारा
तैशाच ब्रम्ह - उदधींतिल विश्व - गारा
गाजे असा निगम - भूपतिचा नगारा ॥९॥
असे आंत बाहेर सोनें नगीं रे तसें ब्रम्ह हें देखणें या जगीं रे
जगीं तत्व जाणोनि ऐसें वदावें कळेना तरी सद्गुरुतें पुसावें ॥१०॥
गुरु बोध सांगूनि आधीं जनासी तनू - इंद्रियें - प्राण - जीवासि नासी
जिता येरिती देखत्को जो शवाला असें जाणतो जो भजे केशयाला ॥११॥
धंदा त्यजूनि करि गोष्ट निरंजनाची
चिंता कसीनकरि तोचि तया जनाची
त्याचाच यत्न अतएव भले करीती
पोटनिमित्त भलते कृषि वोकरीती ॥१२॥
नेणे प्रयत्न पशु त्यसहि केविं चारा
निर्माण देव करितो बरवें विचारा
लागे न नागर न बीजहि त्यांस कांहीं
तो कां उपेक्षिल मुकुंद उपास कांहीं ॥१३॥
नारेळ मार्ग नसतां जळ लाभलाहे
आशा त्यजूनि धरि गोष्टि मनीं भला हे
जैसें कपिथ्य गजभुक्त तसीच हानी
चिंता किमर्थ करणें मग निस्पृहांनीं ॥१४॥
विश्वाससबंध करवी बरवा मनाचा
ऐसा समर्थ अभयंकर वामनाचा
अज्ञान आणि जडता तम जो हरीतो
चैतन्य तत्वमसि उत्तम जो हरी तो ॥१५॥
असा भास हा वास नारायणाचा दिसे भेद तो वेद - पारायणाचा
करा शोध तो बोध हा वामनाचा रमाकांत एकांत - ठेवा - मनाचा ॥१६॥
ज्ञानाऽनळें विविध संचित दग्ध झालें
वंध्या - विलासवत सत्क्रियमाण गेलें
प्रारब्ध शेष उरलें जन - निश्वयाला
अद्वैत बोध मज तों परिपूर्ण झाला ॥१७॥
त्रिकाळीं जयाची अवाधीत निष्ठा जिवाहूनि जो आत्म मानी वरिष्ठा
मनांतीत पाहे जगीं एक द्रष्ठा नमस्कार माझा तया योग भ्रष्टा ॥१८॥
घन श्यामा रामा तुजविण नसे देव मजला
अळंकारीं सोनें स्थिरचरिं असा जो समजला
दुजें देखो जातां झडकरि बळें तूंचि दिससी
घटीं माती जैसी वळखण घटा तेविं वससी ॥१९॥
कर्मे दास्यपणें करुनि निपुणें नारायणीं अर्पणें
पापातें क्षपणें रमापति गुणें प्रेमामृता सेवणें
सत्संगीं वसणें स्मृतींत असणें एकांतिंचें बैसणें
हें सर्व करणें भयाब्धि तरणें दुर्वासना मारणें ॥२०॥
सदा जो चित्सिंधू स्थिर - चर - तरंगांत वसतो
जनोद्धारालागीं प्रगट तनुधारी गवसतो
अशासीं बोलावें स्वसुख अथवा तप्तत्दृदया
जयातें जिज्ञासा तदुपरि करावी निजदया ॥२१॥
देतांही विष पावली अमृतता ते राक्षसी पूतना
कामी मोक्ष अपेक्षितांचि चढल्या वैकुंठ गोपांगना
द्वेषें दानव शत्रुभाव तरले ऐशा जगज्जीवना
घ्या कानें त्दृदयीं धरा तुम्हिं अहो हे वामन - प्रार्थना ॥२२॥
N/A
References : N/A
Last Updated : June 29, 2009
TOP