वामन पंडित - रामजन्म
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
त्दृदयिं आठवुनी पदसारसा
वदतसे अवतार कथारसा
सुरस जो मुनिवाल्मिक गातसे
सकळ रामकथा मुनि गा तसे ॥१॥
प्रगट रामचरित्र कलौ करी
जितचि मुक्ति तया अजि लौकरी
ह्नणुनि गा रघुनायक राम हा
तदनु रुप विलास करा महा ॥२॥
शुक्लपक्ष मधुमास वसंतीं
रामजन्म नवमी तिथि संतीं
वर्णिली वदति अर्थहि लोकीं
त्या खुणा निपुण तो अवलोकी ॥३॥
योगीं अशा जन्म न राघवाचा
तो योग आला अशि गोष्टि वाचा
काळांत जो उत्तम जन्मकाळ
श्रीरामजन्मीं करिती सुकाळ ॥४॥
जनीं मनीं भक्ति कळा समृद्धि
केल्या जशा चंद्रकळा समृद्धि
वाढे सुखें चंद्र मनोभिमानी
तो शुक्लपक्षीं जन जन्म मानी ॥५॥
गोड रामरस केवळ संतीं
सेविला प्रथम मास वसंतीं
त्या रसें मधुर तो मधु झाला
कीं जयांत अजि जन्म अजाला ॥६॥
ऋतूचा धणी सूर्य काळाभिमानी
वसंतासि जो उत्तमत्वेंचि मानी
वडिल स्ववंशीं प्रभु जन्मकाळीं
तया दाखवी उत्सहाच्या सुकाळीं ॥७॥
रामावतारार्थ जगीं भुकेल्या
भक्ती जनीं त्या श्रवणादि केल्या
नव प्रकारें भजती अजाला
जन्म प्रभूचा नवमीस झाला ॥८॥
नवदिन नवरात्रीं भक्ति लोकीं करा हो
नवविध निज भक्ती लोकीं करा हो
नवरस नवमीस स्वामिचा जन्म झाला
नवरस नव अर्पा प्रीतिनें त्या अजाला ॥९॥
नवविधा नवरात्रिं महाधनें
गुणकथा श्रवणादिक साधनें
करुनि सेवटिं आत्म निवेदना
भजति संत अहो रघुनंदना ॥१०॥
चित्त जो उपसमीपचि वासीं
राघवीं करिल तो उपवासी
भक्ति वांचुनि दुज्या विषयातें
सेवितां सुख गम विषयातें
अयोध्येमधें लोक ऐसेचि सारे
विनाराम जे नेणती हे पसारे
तयाचेच गाती असे गीत नाना
न ज्या कीर्तनीं अन्यवार्ता तनाना ॥१२॥
टळटळित दुपारां जन्मला रामराणा
ह्नणुनि सकळ गाती ठाउकें हें पुराणा
दशरथगृहमाथां सूर्य आला अहो तो
कुळटिळक पहाया तो चि मध्यान्ह होतो ॥१३॥
त्या सुखा रवि अखंड अपारा
वाटतें स्मरतसेल दुपारा
स्तब्ध यास्तव असेच घडी हो
कीं स्मरोनि सुख तें उघडी हो ॥१४॥
स्वयें अंतरिक्षीहुनी लेंकुरातें
अहो भास्करें लावियेलें करातें
झणी उष्ण लागे ह्यणें राघवातें
दुरुनीच दावी अशा लाघवातें ॥१५॥
सूर्य यास्तव असे गगनींच
हें विचारुनि नये मगनीचे
साउली करुनि आडचि पाहे
उष्त्म शंकित करी स्वकृपा हे ॥१६॥
छाया ह्यणे वाइल हे मला जे
घेऊनियां हे कर हेमलाजे
जातांचि मी अव्यवधान मातें
देखोनि सोडील रघूत्तमातें ॥१७॥
आणिखी प्रगट कौतुक रीती
वाल्मिकि प्रभृति येथ करीती
मेष राशि पदवी बरवी हो
घे तईं तदवलंब रवी हो ॥१८॥
पुत्र उत्सह जयास विराजे
उत्तमा सनिंच बैसवि राजे
सूर्य ये परम उच्च पदातें
सेविती ग्रह समस्त पदातें ॥१९॥
प्रकटला प्रभु ज्या विमलक्षणीं
ऋषि वरां सुखदे श्रुभलक्षणी
ह्यणति मारुनियां पुरुषाद हा
करिल शुभ्र यशें स्व दिशा दहा ॥२०॥
दशरथ स्वसुतानन पाहतो
निज सुखें सुखि होउनि राहतो
जगपटीं सुखतंतु विराज तो
प्रगटला नयनीं रघुराज तो ॥२१॥
रवीच्या करें श्यामता ये घनासी
तया चाच संताप तो मेघ नासी
तया सूर्यवंशी घनश्याम राम
करी काळ वैवस्वताचा विराम ॥२२॥
जसें चातकाला घनाचेंच पाणी
स्वभक्तां तसा राम कोदंड पाणी
ह्नणुनी घन श्याम हा राम झाला
जया कारणें जन्म घेणें अजाला ॥२३॥
बुंग बुंग रवतुंग मृदंगीं
संग संग नटती स्व - त्दृदंगी
अंग - भंग बहु दावित रंगीं
रामरंग - सुख सिंधु तरंगीं ॥२४॥
दुम दुम ध्वनि वाजति दुंदुबी
सहित रावण राक्षसनृंद भी
सुख नरां सकळां अमरां महा
प्रगटतांचि रघूत्तम राम हा ॥२५॥
रविकुळांत रघूत्तम राम हा
उपजतां सुख दे अमरां महा
सकळ पूर्ण मनोरथ मेदिनी
करि तयांत अहो प्रथमे दिनीं ॥२६॥
ब्रम्ह पूर्ण गुण वैभव लोकीं
जन्मतां मग धरा अवलोकी
योग्य लेंकिस गमे नवरा हो
जो मनीं ह्नणति मानव राहो ॥२७॥
तो हाणितां राघव दानवारी
श्री भूमि संकल्प करुनि घाली
विवाह तात्काळ करुं निघाली ॥२८॥
आणीक आनंद अपार झाला
कीं लाधलें पायिंचिया रजाला
ऐश्या सुखें राघवजन्मकाळीं
जनासि घाली धरणी सुकाळीं ॥२९॥
असे सर्व भूतांसही वेगळाले
दिल्हे सोहळे दोघ त्यांचे गळाले
जळें न्हाणितां राम कोदंड पाणी
महादोष गेले ह्नणे आजि पाणी ॥३०॥
तारील पाषाण असे जळाला
वाटे ह्नणे दोष जळो जळाला
तेव्हा तरी तारक शक्ति राम
देईल आह्मासि मनोभिराम ॥३१॥
देखूनियां जन्म असा जाला
आनंद मोठा उदकासि झाला
ऐसाचि आनंद समस्तभूतीं
श्री राघवाची करि हो विभूती ॥३२॥
भयें राक्षसांच्या सदा जो विझाला
स्वयें अग्नि तो दीप्त कुंडांत झाला
ह्नणे अग्नि आला मला पाळणार
य या ऊपरी यज्ञही चालणार ॥३३॥
स्व सुत राघव दास्य सुखें करी
विभव हें अवलोकिन लौकरी
पवन घे असी राम सुखें धणी ॥३४॥
पुत्र राम परमानव साचा
व्यर्थ अन्य परमा - नवसांचा
पुत्र वास चुकवी नरकाचा
दुर्गती न चुकवी नर कांचा ॥३५॥
रामभक्त सुत मानव लोकीं
तत्पिता न नरका अवलोकी
गोष्टि हे अलिकडेंच वदावी
त्यासि तो स्व पद राघव दावी ॥३६॥
वंशजांत करि राघव सेवा
कीं कथा करिती त्यांत असे वा
सर्व वंश करि धन्य अहो तो
येकही नर असा जरि हो तो ॥३७॥
वंश धन्य करि राम धरवीं
अर्पितां त्दृदय राम चरित्रीं
पाडिली नगरि वोस यमाची
रामकीर्ति असि या नियमाची ॥३८॥
वायूस आनंद अपार झाला
कीं याचिया पायिंचिया रजाला
लाधेल सेवील रघूत्तमातें
स्वपुत्र तो धन्य करील मातें ॥३९॥
श्रीराम जन्म समयीं जन राम राम
प्रेमें ह्नणे ध्वनि उठे त्दृदयाभिराम
आकाश तो निरवकाश सुखेंचि झाला
कीं लोक शब्द कृतताप तंई विझाला ॥४०॥
एक शब्द गुण त्यासहि वाणी
रामनाम न वदे जन वाणी
खेद हा परम जो गगनासी
राम शब्द सहजें मग नासी ॥४१॥
सुमित्रा सुताच्या अहो अग्रजाला
जगीं जन्म झाला परेशा अजाला
असा सर्व भूतांसि आनंद झाला
अपेक्षी अहिल्या पदांच्या रजाला ॥४२॥
ऋषि समस्तहि राघव कीर्तनी
चरित गाति निरोपिति नर्त्तनीं
बहु सुखी ऋषि वाल्मिकि वैखरी
करुनि दाखविली निज वैखरी ॥४३॥
विश्वामित्र स्वामिच्या जन्म काळीं
नाचों लागे उत्सहाच्या सुकाळीं
कीं मी आतां आणिन स्वाश्रमातें
नाशी माझा राम हो या श्रमातें
भविष्यातें पाहे करुनि त्दृदयीं ध्यान मुनितो ॥४४॥
सुखें नाचों लागे चरित रघुनाथा नमुनि तो
स्ववेंशीं रामाचे गुण रचित ऐसें समजला
ह्नणें हे भाग्य त्रिभुवन वसिष्ठासि मजला ॥४५॥
श्रीमद्भागवतांत आणि इतर ग्रंथीं महाभारतीं
श्रीमद्रामकथा निरुपिलि वरी व्यासाचि ही भारती
गातां तेचि शुकादि गोत्र जवळी मध्यें वसिष्ठान्वयीं
माझा वामन राम गाइल तंई लक्षूनि सर्वान्वयीं ॥४६॥
उपाध्याय रामास मानें मुनीं हो
स्ववंशीं स्मरे भक्त जो ने मुनी हो
सुखें राम सेवी अशा गोत्रजाला
स्मरोनी ऋषी - मात्र संतुष्ट झाला ॥४७॥
इत्यादि राम चरितीं रस हे अपार
श्रीव्यासवाल्मिकिहि नेणति अंतपार
हा ग्रंथ वामन निरोपित राघवाचा
वाचा हरील मग ते सकळाघवाचा ॥४८॥
N/A
References : N/A
Last Updated : July 04, 2009
TOP