श्रीनारायण निर्निमित्त उगला आहे जसा निश्वयें
तैसें विश्व तथांत हें उपजतें वस्तु - स्वभावें स्वयें
माया शुद्ध तयामधें प्रथमता होते अजा जेधवां
तेव्हां निर्गुण तेंचि ईश्वरतथा घ्यावें द्विजा माधवा ॥१॥
मध्यान्हीं किरणीं मृषा जळ तसी मायाच अव्यक्त ते
अव्यक्तें मग निर्गुणी सगुणता सर्वज्ञता वर्तने
इच्छा सृष्टिनिमित्त वृत्ति उठिली तें सूत्र तेथें क्रिया
शक्तीचें बळ आगळें बळ तिन्हीं सूत्रारव्यतत्वीं तया ॥२॥
इच्छा सृष्टि करावया उपजली शक्ति क्रियारुपिणी
जीचा वास रजोगुणीं प्रबळ जो आधीं तयां तीं गुणीं
ते चिच्छक्ति अधीन सत्व - गुणिची जे शक्ति तेथें वसे
ते चिच्छक्ति करुनि यासिच महत्तत्वाख्य राज असें ॥३॥
तत्त्वें दोनिहि सूत्र आणिखि महत्तत्वासहीं वेगळीं
संख्येमाजि न मोजिती श्रुतिमधें ऐसेंचि सर्वास्थळीं
दोन्हीं एक तथापि भेदहि असे वायूस सूत्रात्मता
मुख्य - प्राणहि तो विरिंचिस महत्तत्वास तो तत्त्वता ॥४॥
एवं राजस सूत्र सात्विक महत्तत्वाख्य - शक्ति - द्वयें
सत्वादि त्रिगुणीचि सूत्रहि महत्तत्वाख्यही निश्वयें
तेथें जो तिसरा तमोगुण तदा द्रव्याख्य शक्तीस तो
पोटें घेउनियां उगाच असतो तत्त्वद्वयीं भासतो ॥५॥
सूत्रीं आणिक जो तमोगुण महत्तत्वीं असा बोलिला
तो सत्वास रजास घेउनि अहंकार स्वये ऊठिला
तों तो रुद्रचि शब्द तेथ उठिला आकाश त्यापासूनी
झाला शब्दचि तो नभोगुण असों बीजीं फळें येथुनी ॥६॥
झाला शब्द नभांतुनीचि परि तो व्याला पृथक् वायुला
आकाशींच असोनि वायुगुण तो बीजीं फळीं राहिला
वायु स्पर्श - गुणीं परंतु वडिला व्योमांत जो शब्द तो
जैसा स्पर्श धरुनि शब्दहि तसा दोहीम गुणीं वर्त्ततो ॥७॥
वायूपासूनि रुप भिन्न उठिलें तेथूनि वैश्वानरा
झाला उद्भवरुप तें निज - गुण - स्पर्शाखही दूसरा
वायूचा गुण आणि शब्द नभिंचा तोही तयाअंतरीं
आतां अग्निमधूनि होय रस तो निर्माण पाणी करी ॥८॥
पाण्याचा रस आपुला गुण तसा व्योमादि - भूतत्रयें
शब्द स्पर्शहि रुपही गुण तिन्हीं दावी तयांचे स्वयें
पाण्यापासूनि गंध होय मग तो निर्माण पृथ्वी करी
तीचा गंध गुण स्वकीय तरि ते शब्दाहि चारी धरी ॥९॥
एवं तामस पंचक - द्वय रजोहंकार निर्मीत सा
केलें सात्विक - मींपणें मन असीं एकदिकें विंशती
अव्यक्तादिक कारण - त्रय असीं चोवीस हीं मोजिती ॥१०॥
केले सात्विक - मींपणें सुर दहा ते चोविसां वेगळे
ते विश्वेश्वर इंद्रियात्मक धणी लोकेंद्रियां आगळे
दिकवातार्क रसेश अश्विनि - सुत - ज्ञानेद्रियांचे पती
ते अग्नीद्र उपेंद्र मित्र कजिहीं कर्मेद्रियें वर्तती ॥११॥
एक श्रोत्र दुजें खगिंद्रिय तसें जें चक्षुही तेजसें
जिव्हा घ्राण मिळोनि पांच रचिलीं ज्ञानेंद्रियें राजसें
वाचा आणिक पाणि इंद्रिय दुजें पादारव्य हेंही तसें
पायूपस्थ मिळोनि कर्ममय हीं पंचेंद्रियें राजसें ॥१२॥
ऐसीं चोविसही मिळोनि रचिलें ब्रम्हांड त्याभीतरी
त्यांचे अंश मिळोनि सर्व रचिले जे देह ते दोंपरी
स्थूळीं हे नभ - आदि पंचक दिसे सूक्ष्मांत सोळा पहा
भूतांचे गुण पांच एक मन हें कीं इंद्रियेंजीं दहा ॥१३॥
सोळा आणिक पांच एकविस हे आतां तिन्हीं कारणें
चित्तीं चित्प्रतिबिंब तेथ दिसतें अंतीं मती मीपणें
अव्यक्तांशक चित्त आणखि महत्तत्वांस्ख नाना - मती
तैसे मी म्हणऊनिही बहु अहंकारांश ते बोलती ॥१४॥
चित्ताचा अतएव देव म्हणती श्री - वासदेव प्रभू
शुद्धाऽव्यक्त - उपाधि तो म्हणउनी तत्पुत्रही आत्प्रभू
ब्रम्हा बुद्धि - गुणादिदैवत महत्तत्वांश नानामतीं
चित्तापासुनि बुद्धि तेथुनि अहं सर्वज्ञ हें पाहती ॥१५॥
चित्तें केवळ आत्मता - स्फुरण जें ऐसी विराडात्मता
अव्यक्तात्मक वासुदेव विभु जो त्याला असे तत्वता
आत्मा निर्गुण चित्त त्या अनुभवीं अव्यक्त ऐशा श्रुती
ब्रम्हा बुद्धि उमेश मी पण मन श्रीबंधु तारापती ॥१६॥
जागृत् स्वप्न सुषुप्ति तीनहि जशा सत्वादि तींहीं गुणीं
तुर्या केवळ सत्व यां अवधियां मानाल सत्ता झणी
तत्वें चोविस हीं जडेंचि अवघीं सत्ता न यांला असे
झाला पंचविसावयाचि करितां जीवत्व - सत्ता दिसे ॥१७॥
जीवात्म्यासह पंचवीसचि तसा जो सच्चिसावा स्वयें
सर्वात्मा प्रतिजीव बिंब अवघें ज्या स्वामिचें निश्वयें
त्यानें प्राकृत - वैखरींत रचिली हे वामनाच्या मुखें
हे कंठीच धरुन साधक सदा श्रीतत्वमाळा सुखें ॥१८॥