वामन पंडित - सीता स्वयंवर
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
श्री - स्वयंवर - बधू नवरा हो तो अखंड मनिं राघव राहो
भग्न जो करि धनुष्य भवाचें बीज तो हरु अनादि - भवाचें ॥१॥
वंदूनियां पद तया प्रभु - राघवाचें
सीतास्वयंवर निरुपिन लेश वाचे
जें व्यास - वाल्मिकि - मुखांतिल सार साचें
संक्षेप मी कथिन रुप तया रसाचें ॥२॥
राम उद्धरुनि गौतम - जाया दे निरोप पतिसंनिध जाया
कौशिकासह गृहा जनकाच्या ये स्वयंवरवधूजन काच्या ॥३॥
रावणादिक पती असुरांचे वृंद वृंद नृप - भूमिसुरांचे
मान्यता जनक तो करि पूजी तों मुनींत दशकंटरिपू जी ॥४॥
बुद्धि जे अनुभवी जनकाची मूर्ति त्या निजसुखा कनकाची
पाहतां धणि पुरे न मनाची न स्मृति स्फुरतसे नमनाची ॥५॥
तो भक्ति संस्कार वरी विदेहा पाडी पदीं दंडचि जेविं देहा
उठे करी त्यावरि पूजनातें करुनि पायीं अवनेजनातें ॥६॥
आले बहू आणिकही घरा जे पूजी यथायोग्य मुनींद्र राजे
त्यानंतरें आणवि त्या धनुष्या न जें ढळे दैत्य - सुरां - मनुष्यां ॥७॥
त्रिशत गण शिवाचे सत्वरें त्या धनुष्या
उंचलिति नढळे तें अन्यदेवां मनुष्यां
तिहिं बहुबहुकष्टें ठेविलें चाप रंगीं
दचकति नृप सारे देखता अंतरंगी ॥८॥
वाटे तयां परम दुर्लभ ते नवोढा
जेव्हां पुरोहित म्हणे धनु कां न वोढा
कोणी धरुनि बसला बसल्याचि ठाया
उत्साह बुद्धि न मनाप्रति दे उठाया ॥९॥
घ० सीता - स्वयंवरीं वीर प्रबळ बळाढ्य धीर
नृपवर थोर थोर सभे घन दाटले
त्यांच्या पूजनीं उपचार महा जनक उदार
करीं मनीं वाक्य सार निज कर जोडिले
ऐका सकळही पण मृड - कोदंड कठिण
निज - भुज - बळें गुण चढवुनि वोढणे
गुण - निपुण - प्रवीण सर्वही सुजाण पण
पूरवील हा जो पण त्यासि सीता अर्पणें
वाक्य ऐकूनि तयाचें चित्त भंगलें भूपांचें
कोणी नबोलेचि वाचें टकमक पहाती
अवघे तटस्थ भूप कोणी नबोलेचि चुप
तेव्हां होउनी सकोप बोले लंकाधिपती
स० तों दशकंठ अकुंठ विसांभुजिं तें विषकंठ - धनू उंचली
कष्टत कोष्ठवरि द्विज ओष्ठहि चावुनि ज्या जरिनें खचली
चाय उरीं दडपे झडपे मग आनन - पंक्ति धरे रचली
वासुनि दांत मुखांत दाहांत पडे मति गाढ नमीं पचली ॥१०॥
घ० कोणी उचलीना चाप बहु पावले संताप
कोणी उफराटी थाप चढवीतां चाखली
रावणें जो केला ताण भुई पडला उताण
शक्ति कराया उत्थान अंविकेनें राखिली
दडपे धनुष्यें ऊर दाहीं कंठीं घुरघुर
जेणें ऐशी दशा क्रूर कधीं नाहीं देखिली
तोही पावतां विराम उठे दाशरथी राम
तेव्हां मूर्ति अभिराम जनीं मनीं देखिली ॥११॥
श्लो० नित्यमुक्त जरि नित्य विरक्त श्री स्वयें स्वचरणीं अनुरक्त
हे अनन्य विषया निजरामा या निमित्त उठणे रघुरामा ॥१२॥
म्हणे विश्वामित्र स्वमनिं सकळांचे भरंवसे
कळों आलें आतां मजजवळि विश्वंभर वसे
तथा या श्रीरामाविण जनकजा अन्य व वरी
म्हणोनी बोले कीं उठ उघुपती साध नवरी ॥१३॥
श्रीराम तेव्हां मुनि - पाद - पद्मा बंदी जयाचे स्वपदींच पद्मा
आज्ञा गुरुची म्हणऊनि साची करीन बोलोनि उठे तसाची ॥१४॥
श्रृंगार - वीर - करुणादि नवां रसांचीं
लीला जगदुरुचिया पद - सारसांची
सप्रेम तो दशम त्यासह त्या नवांतें
दावी सभेसि उठतां सुर - मानवांतें ॥१५॥
घ० दावी सीतेसि श्रृंगार परि दिसे सकुमार
त्यांत वीभत्स विकार निर्विकार दाखवी
विप्र म्हणती किशोर चढवितां चाप घोर
कटिन हो हाचि थोर कृपारस राघवीं
म्हणती मुंगी सपक्ष मूढां हाचि हास्य पक्ष
मानिला हो वीर दक्ष देव दैन्य दानवीं
संतां शांत सीताधध चाप मोडी अभिनव
मोडी रौद्र त्याचा रव भयानक सूचवी ॥१६॥
श्लो० श्रृंगार - श्रृंग - उदयाचळ - रामचंद्रा
श्रीरंगतुंगत्दृदया रघुरामचंद्रा
अगोगसुंदरवरा नव मेघरंगा
रंगांगणीं जनकजा जडि अंतरंगा ॥१७॥
श्रृंगार - श्रृंगालय - केसरी हो सांगा अनंगा नट केसरी हो
कासे विकासे पट केसरी हो श्री शंकली पंकज - केसरीं हो ॥१८॥
अनंगरगांबुधिच्या तरंगीं रंगीं शुभांगी जडि अंतरंगीं
भंगील हा हो धनु केविं रंगीं म्हणे कुरंगीनयनी सुरंगी ॥१९॥
श्रृंगाररुप पहिला रस चाखवीला
बी भत्स शोककर त्यांतचि दाखवीला
कीं पाहतां विषय मानुनि त्या मलाही
चिंतानळी मन करीलचि काम लाही ॥२०॥
सूर्यवंशपतिच्या सकुमारा देखतां रघुपतीस कुमारा
चाप तें कठिन हो मृदु भारी हें मनांत भय काम उभारी ॥२१॥
लज्जावती फार तथापि त्याची शंका तसी ना धरि हो पित्याची
म्हणे अहा तात कशा पणातें केलें तुवां संकट आपणातें ॥२२॥
बहु कठोर म्हणे धनु जानकी निकट कांसव - पृष्ठसमान कीं
रघुपती तरि हा लघु आपण अहह दारुण तात तुझा पण ॥२३॥
मदन - शत्रु - शरासन हें महा मदनमूर्तिच केवळ राम हा
करिल सज्ज कसा धनु आपण अहह दारुण तात तुझा पण ॥२४॥
मज नये नवरा दुसरा मना निजपणीं दृढ हे स्मर कामना
रघुपती तरि हा लघु आपण अहह दारुण तात तुझा पण ॥२५॥
प्रतिज्ञा सांडावी मति असि न माने स्वजनका
वदे दुःखें तेव्हां सखिजवळि निंदूनि जनका
म्हणे वैरी बाप त्यजुनि पण रामासि मजला
नदे या देहातें त्यजिन मज नाहीं समजला ॥२६॥
सखींसीं असें बोलतो सारसाक्षी कृपाक्लिन्न तो होय संसार - साक्षी
तिला आणि सर्वा जसी देव दावी तसी गोड एथूनि लीला वदावी ॥२७॥
मंडपात मग जी जनकाच्या त्या स्वयंवर वधू जनकाच्या
अंगणांत विभु ये कनकाचा या प्रभा म्हणति लोक न काचा ॥२८॥
रामचंद्र उठतो जनकाच्या मंडपीं नवरिच्या जनकाच्या ॥२९॥
छावा उठे दशरथ - प्रभु - दिग्गजाचा
घे चाप इक्षुसम तें पति भर्ग ज्याचा
शुंडा स्वबाहु उचलूनिच चालिला हो
घेती समस्त नयनीं प्रभुचालिला हो ॥३०॥
गजाशिशु गति जैसे जेविं शुंडा उभारी
रघुपति उचलूनी ये तसा बाहु भारी
करि करि चिमणासा इक्षुभंग स्वहस्तीं
प्रियहि भव धनुष्या ध्वंसि तैसा स्वहस्तीं ॥३१॥
घे इक्षु वारण जसा कर पुष्करानें
श्रीराम चाप उचली कर पुष्करानें
विध्वस्त कानन दशानन - अंबुजाचें
चाप प्रताप हरि आनन - अंबु ज्याचें ॥३२॥
दश - मुख - कमळांतें हस्त पद्मा विसातें
पडत असुर मूर्छेमाजि अब्जा तिसातें
तनु - जलज - वनीं त्या वारणा अव्ययाला
दृढ मृड धनु वाटे उत्सहो दिव्य याला ॥३३॥
पद्माटवीस गज इक्षु मिसें निघाला
आला तथापिहि सरोजवनासि घाला
तोंडें दहा पसरिलीं सरली अहंता
पायीं उरीं ढकलि चाप तदीय - हंता ॥३४॥
पाहूनि पूर्वी उठतांचि राम श्रीमूर्ति देखूनि मनोभिराम
आली कृपा ते असि विप्रसंगा सिंहावलोकें परिसा प्रसंगा ॥३५॥
जन वदति रमा हे आजि हो रामरामा
मुनि वदति मुखें जे गाति कीं राम रामा
उडति उडविती जे विप्र अंगोस्तरातें
प्रभुहि भव धनुष्या मोडि या दुस्तरातें ॥३६॥
एवं दशातन - उरावरि चाप हा तें
हाणोनि लात उचली जन तें पहातें
पायीं उरीं ढकलि राम दशास्य - हंता
ज्याचीं मुखें पसरलीं सरली अहंता ॥३७॥
कीर्तिचा तरि जगी रव याचा दिसतो मृदु - किशोर - वयाचा
हो तथापि जय राघवराया ये रमा त्वरित यासि वराचा ॥३८॥
मोडो त्वरें हे भव चाप हातीं ऐशा कृपेनें द्विज जे पहाती
तो भाव दावी स्व - कृपा - रसाचा जरि स्वयें पूर्ण अपार साचा ॥३९॥
मुंगीस पक्ष फुटले उठला तसा रे
अन्योन्य हें वदति हांसति चट्ट सारे
श्रीराम हास्यरस येरिति भाव दावी
आतां कथा किमपि वीररसीं वदावी ॥४०॥
मोठ्या गजासहि जसा चिमणा हरी तो
गंडस्थळें अति विदारुनि संहरीतो
मोडील हें धनु असें कुशलांसि वाटे
चित्तांत वीररस ये नयनासि वाटे ॥४१॥
संत पात्र विभु - शांत - रसाचें प्रीतियुक्त निज अंतर साचें
या सभे करिति वर्षति दृष्टी प्रेम ज्यां न भव दुःख अदृष्टीं ॥४२॥
अद्भुतांत विभु अद्धुत दावी ते कथा विशद लेश वदावी
केविं वोढिल धनुष्य भवाचें आइका सुख निजाऽनुभवाचें ॥४३॥
स्वउत्तरी यांवर त्या समाजीं बांधोनियां चाप तयास माजीं
दशाननाच्या त्दृदया वरुनी घे मस्तकीं कुंतळ आवरुनी ॥४४॥
घंटा - पताकांसह चाप हातीं घेतां स्त्रिया पूरुषही पहाती
किशोरही थोर पराक्रमी तो जाणों उसांतें गज आक्रमीतो ॥४५॥
घे आणि सज्जन मिसें करि चाप हातीं
ओढी त्वरें नवल सर्वहि हें पहाती
स्वल्या वयांत जन मानिति अद्भुतातें
या अद्भुतें स्फुट करी सरसा मृतातें ॥४६॥
रौद्रावरी रौद्र - रसासि घाली गोडी रसज्ञांत असी निघाली
कीं रुद्रचापावरि रुद्रभावा योजी असें रौद्र - रस - स्वभावा ॥४७॥
श्रीमद्राघव - हस्त - पद्म - गुण ये कर्णात हो जेधवां
मोडे हें भव चाप अर्थ इतुका दावी जगीं तेधवां
कीं श्रीराम - कराऽरविंद - गुणही कर्णात येतां स्वयें
मोडे हें भवसायकासन असा भावार्थ हा निश्वयें ॥४८॥
जेव्हां कथेची गति हे वदावी धनुष्य - भंगी रस रौद्र दावी
कडाडितां चाप भयान कांहीं करी असा उग्र जनास कांहीं ॥४९॥
कडकडकड चापीं जेधवां शब्द जाला
तडतड विधि अंड त्रास दे अब्जजाला
तडफडि फणिराणा कंप भूमंडळाला
खडबडि कनकाद्री धाक आखंडलाला ॥५०॥
घ० करीती खळासि दंड ऐसे राम - बाहुदंड
तिहीं मृड चाप चंड मोडितां कडाडिलें
भांड ब्रम्हांड अखंड साता द्वीपां खंड खंड
होऊं पाहे खंड खंड गगन गडाडिलें
राक्षसांत मुंड मुंड रावणादि पुंड पुंड
होती त्यांचे पिंड पिंड त्दृदय तडाडिलें
भ्याले भूप लंड भंड गज दिग्गज उदंड
तोंडीं उगळितां गंड शोणित भडाडिलें ॥५१॥
घंटा ज्यासी जडजड पताकांची फडफड
करी चाप कडकड मोडी राम जेधवां
अब्जजादि तडतड गिरीवरी खडखड
नक्षत्रांचे घडघड लोळे व्योम चांदवा
भ्याले वीर धडधड ज्यांचे मनीं धडधड
राक्षसांचे धडधड कांपले हो तेधवां
रावणाची बडबड राहे पडे हडबड
काळघन गडगड आटले हो तेधवां ॥५२॥
श्लो० सद्भक्ति ते मूर्ति नवां रसांची देखोनि नेत्रीं गति मानसांची
ते वर्षती प्रेम तयाचि वाटे एवं दहावा रस त्यांसि वाटे ॥५३॥
मना सदा प्रीति सुखा निजाची मूढां जनांतें नकळोनि जाची
सप्रेम विद्या प्रद मुर्ति साची भक्तांसि वाटे दशमा रसाची ॥५४॥
मुसहि नवरसांचीं रामरुपेंचि केली
तरि दशमरसाच्या आवडीनें भुकेली
दशम सुरस ओते त्यांत रुपें नवांचीं
दिसति सफळ विद्या तेधवां मानवांची ॥५५॥
रामरुप नवही रस पाहे राम त्यावरि करीच कृपा हे
प्रेम तो दशम त्यां रस दावी यानिमित्त रसरीति वदावी ॥५६॥
मोडी असें जो भव चाप हातीं तो लोक रामी र्स हे पहाती
ते जानकी ये प्रिय देवराया रंगांत मातंगगती वराया ॥५७॥
गजगती जगती प्रति दाविते वसुमती सुमती सुख भाविते
स्वततुजा तनु जाणतसे धरा नवरि ते वरिते मणिकंधरा ॥५८॥
नव सुधा वसुधा - तनया स्मरा जनमनीं न मनीं वशजे स्मरा
स्वपति तों पतितोद्धर तो खरा नवरि ते वरिते रघुशेखरा ॥५९॥
जगपित्यास जगज्जननीच ते वरि नजाणति हें जन नीचते
नवरि जे वरिजे जगदीश्वरें अमळ ते मळते न दुज्या वरें ॥६०॥
ध्वनि उठे चरणीं लघुभूषणीं मन समर्पित ये रघु भूषणीं
परमहंस - गतीच जया प्रिया परमहंसगती वरि ते प्रिया ॥६१॥
स्मर तिला रतिलाच न ईश तो अतनु जो तनुजोत्तम दीसतो
नृपति तों पतितोत्तम भासती नवरि ते वरिते प्रभुतें सती ॥६२॥
अनादि हाचि प्रिय नाथ जीचा मुखेंदु तो या रघुनाथजीचा
लक्षूनिही अन्य मुरवांबुजा ते पाहे नृपाच्या न मुखांबुजातें ॥६३॥
शवापरी मानुनियां नृपांगें लक्षूनियां तुच्छपणें अपांगें
सर्वोत्तमा त्याचि रघूत्तमाला अर्पी गळां श्री निज - हस्त - माळा ॥६४॥
कमळजा मळ - जाल - सुरादिकीं नवरि ते वरिते स्व अनादि कीं
स्वपति तो पतितोद्धर त्याविना इतर ते तरते गुण भाविना ॥६५॥
सुर्वणमुक्तादि - सुधा शुभांगीं त्याली अळंकार असे शुभांगी
अंगांगश्रुंगार यथाविभागीं सीता उभी ते प्रिय - बाम - भागी ॥६६॥
अर्पी गळां हार जया सुकाळी सीता सुखाच्या पडली सुकाळीं
विचित्र वाद्यें जन वाजवीती सीतापतीचें यश गाजवीती ॥६७॥
गेलीं अयोध्येसि सहस्त्र पत्रें कीं राघवें हस्त सहस्त्र पत्रें
भवायुध - ध्वंस - बळां तरंगीं यशोब्धि केला धवला तरंगीं ॥६८॥
भव धनु रघुवीरें भंगिलें विश्व - सारें
तुम्हिं सहपरिवारें पत्र वाचूनि सारें
निज - तनय - विवाहालागिं यावें प्रभावें
जनक दशर थातें हें लिही प्रेम - भावें ॥६९॥
भिजवि सजळ - नेत्रें पत्र तें ज्यांत वाची
दशरथ नृप साची कीर्ति ते राघवाची
ठक सकळ सभा ते राहिली प्रेम - पाणी
स्रवति नयन - चित्तीं राम तो चाप पाणी ॥७०॥
करि विभु - जय - वार्ता भग्न वार्ता भवाची
नवल न धनु - कांबी ध्वंसिली हे भवाची
श्रवणिं निघत नासी दुःख संसार सारा
दृढ पण मृडचा पाहूनिही ज्या असारा ॥७१॥
दशरथ - नृप - संगें सव आमात्य योद्धे
इतरहि जन जाती नीघती जे अयोद्धे
सजल - नयन सारे राघवातें पहाती
नवल म्हणति यानें मोडिलें चाप हातीं ॥७२॥
पूजूनियां जनक त्यां सकळां स्वहातें
येऊनि दूर बहु सादर ते गृहातें
श्रीराम - कीर्ति वदनेंचि किती वदावी
यालागि चाप - शकलें नरदेव दावी ॥७३॥
असें देखतां मोडकें चाप भारी शरीरीं गुड्या रोम - राजी उभारी
स्व - मांडीवरी राम घेऊनि माय स्वयें पूसते प्रेम चित्तीं नमाय ॥७४॥
म्हणे श्री कौसल्या परमसुकुमारा रघुपती
कडीं हातीं तूझ्या जडित जड - चित्तांत खुपती
अशा या हस्ताब्जें उचलुनि धनू दोन तुकडे
कसे केले पाहों नशकति बली थोर जिकडे ॥७५॥
नसे अंत या राम - कीर्ति - प्रवाहा असो तें पुढें राम - सीता - विवाहा
जना देखतां फार आनंद झाला अजा पद्मजा भेटली श्री अजाला ॥७६॥
रामानुजां देखुनि सुप्रभावां कन्या तिघी तीं भरतादि - भावां
विदेह तो देत विवाहरीती कीर्ती जयांच्याच भवा हरीती ॥७७॥
श्री - विदेह - तनया सुकुमारी पूर्ण शांति निज भूमि - कुमारी
आत्मयासि वरि होउनि रामा मूर्तिमंतसगुणा अभिरामा ॥७८॥
रायें विवाहास मुहूर्त केला लागे हरिद्रा नृप - कन्य केला
सुवासिनीच्या करपुष्करानीं सुरत्न - कुंभाकर - पुष्करानीं ॥७९॥
चहूंही मोक्षाचे कलश चहुं कोनीं मिरवती
न जे ब्रम्हीं हेमीं दिसतिहि खरेसे म्हणविती
गुणी शुभ्रीं दावी सगुणपण संतांस सुमती
असें न्हाणें वारी अभिनव वधू - शांति - सुमती ॥८०॥
चढे तीस सर्वात्मतेची हरिद्रा नजे ठाउकी भेदवाद्या दरिद्रा
तिचें शेष ये षङ्गुणा रामचंद्रा अविद्याऽग्नि - संतप्त - विश्राम - चंद्रा ॥८१॥
एक राम जनिं देवदेव कीं भाव हा उभय - देव - देवकीं
जान्हवी पुरवि काम कामना वापिका - खनन - कामका मना ॥८२॥
जीव जे प्रकृति - अष्टक - वर्गी तृप्त ते सकळ अष्टक - वर्गी
ज्योतिषी द्विज पुरोहित सारे त्यांत एकहि न मोहितसा रे ॥८३॥
गुणत्रयांच्या तटिनी - प्रवाहीं सत्वांबु शोधूनि पृथक् विवाहीं
ते घालिनी काळघडी द्विजाती सत्वें घड्या रामनिमित्त जाती ॥८४॥
वाजवीत विविधा निगमातें घे नृप श्रुतिचिया उगमातें
आणिला निजगृहा नवरा हो जो मनीं म्हणति मानव राहो ॥८५॥
पूजूनि राम निगमोदित बोधरीती
चित्तंतु आड पट मायिक जो धरीती
काढावयासिच निषेधुनि घेत हातीं
शांतीसि अंतरहि हेंचि असें पहाती ॥८६॥
श्रीराम - मंगळ - कथा जन गात नाना
अध्यात्म - मार्ग पहातांचि वृथा तनाना
न भ्रांतिचा पट किटे म्हणुनी द्विजाती
गाती सुमंगळ सुधारस चित्रजाती ॥८७॥
मंग० ब्रम्हा वृद्ध सकाम कामरिपु तो रुद्र स्मशानीं वसे
दैत्य - त्रस्त - सुरेंद्र - इंद्र - गुरुही इंद्राभिमानी वसे
दुर्वासादि अशांत शांत मजही जो कांत इच्छीचना
माळा हे कमळा विचारुनि गळां घालीं जगज्जीवना ॥८८॥
इच्छीना मजला सुरासुर भला ऐसा दिसेना मला
आशेसीं रमला जिच्या नर तिला तो दाससा भासला
श्रीवांछादि - मला शिवे न शमला त्या या घनश्यामला
माला हे कमला विचारुनि गळां घाली जगन्मंगला ॥८९॥
श्रीमद्भागवतांत आणि इतर - ग्रंथीं महाभारतीं
श्रीमद्रामकथा निरुपित बरी व्यासाचिही भारती
गाती तेचि शुकादि गोत्रज कुळीं मध्यें वसिष्ठान्वयीं ॥९०॥
पौरोहित्यहि निंद्य तें विधि - पिता दे या कुळाचें मला
या संबंधमिसेंचि लाधसि म्हणे रामा घनश्यामला
तो मी आजि पुरोहितत्व करितों वैवाहिकें मंगळें
गातों रामरसें कृतार्थहि असें केलें जगन्मंगळें ॥९१॥
विश्वामित्र म्हणे पवित्र चरणें माझ्या करी आश्रमा
संगें ये मिथिलेसि पादकमलें नासी अहल्या - श्रमा
मद्वाक्यें भव - चाप - भंग करितां माला रमाकंधरीं
घाली आजि विवाह मंगळदिनीं सीतेसि हातीं धरीं ॥९२॥
घ० सावधान सावधान कांहीं नाहीं व्यवधान
आत्म - लाभाचें निधान लग्न बहू जवळी
म्हणे ज्योतिषी आचार्य काळ - गणनादि कार्य
झालें बोल जें हें कार्य घडीजेल कवळी
ॐ पुण्यादि हें अक्षर मुखा येतां पदाक्षर
निरसें दिसे अक्षर तंतु नेत्रीं सकळीं
शांति आत्मा वधू वर वरितां हो परस्पर
अक्षतिं अक्षततर मुक्तिचि मुक्ताफळी ॥९३॥
श्लो० गातां द्विजीं राधव - मंगळाला जो आड माया - पट तो गळाला
परस्परें अर्पिति अक्षतांतें मुक्ताफळां नूतन - अक्षतांतें ॥९४॥
संतप्त सोनें जसि जोति यांची सीता - शरीरावरि मोतियांची
श्री - इंद्र नीळाचिसमें समान श्री रासदेहावरि भासमान ॥९५॥
तद्वं नवरि वरी हो श्री अजा श्री अजाला
तइं अगड धडाधों घोष इत्यादि झाला
ध्वनि गगनिं अशब्दीं स्थावरां जंगमाचा
प्रकृति - पुरुष - योगें चिज्जडा संगमाचा ॥९६॥
काम - क्रोध - हुताशनीं तडफडा होऊनियां भाजल्या
लाजा वृत्तिमयी न या चिदनली त्या होमितां वाजल्या
सातां आवरणांत सप्तपदिहि होतां पुढें तो पती
तेव्हां कांत दुजा कधीं नवदवे वार्ताच या लोपती ॥९७॥
आत्मा सुवर्ण सचराचरवास मुद्रा
ऐशा धने भरवि देह - चतुःसमुद्रा
विद्याकरें भव - दरिद्रपणासि नाशी
संतोष तो सुर - नरां कमळासनासी ॥९८॥
तत्तद्व्रम्हसमन्वयें ध्वनि उठे ते ताल घेती श्रुती
आलापी व्यतिरेक - रुपक रिती कीं तन्न तन्न श्रुती
वेदांता गण तर्क - कर्कश खडे सांडूनि जे शोधिती
गीतागीत तदर्थनाद्यहि असें तेथें जना बोधिती ॥९९॥
दशहि इंद्रिय अश्व तनू - रथीं दशरथारव्य चिदंश महारथी
स्व - सुख - नंदन उत्सव पाहतो श्रुत - सुतैक्य - सुखी स्थिर राहतो ॥१००॥
कुळस्त्री कौशल्या सुमति निगमोक्ता कुशलता
करी कामें टाकी श्रुति - विहित - वार्ता विषलता
धरी स्वात्माराम - प्रभुसि उदरीं युक्ति नमनीं
करी सर्वात्मत्वें प्रकटहि तथा बुद्धि जननीं ॥१०१॥
आणी शांति सुनेचिया सुनमुखा पाहावया ते सती
वृत्ती कोटि वराडिणी अवघिया ज्या चिन्मया दीसती
शुद्ध ब्रम्ह सुवर्ण विश्व नग जें होऊनि साकारलें
अर्पि तें पाहिलें सुनेसि विधिनें सासू गळां कारलें ॥१०२॥
कामादि सा - कुरस - वर्जित - षड्रसाचा
निःकामनादि परिपाक विपाक साचा
सायुज्यतादिक चतुर्विध अन्न जाती
जें त्यासि इष्ट जन सेवुनि तेंचि जाती ॥१०३॥
समारंभ इत्यादि तो कोण वर्णी वधूचा पिता तृप्ति दे सर्व - वर्णी
हरी दुःख हें स्वल्पही रामवार्ता निरोगी करी अल्प मात्रा भवार्ता ॥१०४॥
ओवाळितो स्वपुरुषार्थ चतुर्थ होमीं
रामावरुनि म्हणऊनि चतुर्थ हो मी
दे सर्व आंदण फणींद्रहि जें न मोजी
न्यूनासि पूर्ण करिं तूंचि म्हणे नमो जी ॥१०५॥
साडे करी स - जळ - लोचन कन्य केला
सद्वंशजा निरवितां जन धन्य केला
कां स्वशांति तिस घेउनि ये अयोध्ये
श्रीराम आणि जन सर्व अमात्य योद्धे ॥१०६॥
आद्यंत अध्यात्मचि हे कथा रे जे वर्णितां न भ्रम शोक थारे
अध्यात्मरामायण नाम याचें ठेवी असें व्यास अनामयाचें ॥१०७॥
परंतु साधारण मानवांची वाचा अजी हा महिमा नवाची
म्हणोनियां राधव - लोक - लीळा उग्याचही संहरती कलीला ॥१०८॥
अध्यात्मरामायण गति संतीं हें कोकिळ जे वदली वसंतीं
आतां रुचीनें जन घेति सारे वदों तया राम - कथा - रसा रे ॥१०९॥
जिंके पुरीस फिरतां जगदग्नि ज्याला
जो भगितां भव धनुष्य भडाग्नि झाला
ज्याला जगांत घडली बहु - राज - हिंसा
तो क्षत्रियानळ करी रघुराज हिंसा ॥११०॥
दशरथ नृप त्याला कंकणें आणि चोळी
भृगुवर लपतां तो हस्त सक्रोध चोळी
दशरथ - सुत जिंके राम तैशास वाटे
दशमुख विजयाचें काय आश्वर्य वाटे ॥१११॥
घ० राम असतां किशोर भेटे जामदग्नी घोर
क्षत्रियांत गर्व थोर त्यातें दूर जो करी
अन्य - राम - वीर - रस आइकावे हे सुरस
तुटे नामें हे कुरस भव - रोग लौकरी
रावणासि बांधे धीर बाहूसहस्त्राचा वीर
कापी तशाचेंही शिर पशु जो घे करीं
ऐशा भृगु - कुळीं राम जिंकी त्यासि रघुराम
दश ग्रीवादि संग्राम प्रेमें गावा किंकरीं ॥११२॥
श्लो० ऋषित्वेंच ठेवूनि विप्रोत्तमाला तयांतील रामांश रामीं मिळाला
अयोध्येप्रति श्रीस घेऊनि पावे सदा हेचि हो मंत्र त्याचे जपावे ॥११३॥
सीता - स्वयंवर असें वरव्या मनानें
लक्षूनि शास्त्र अवलोकुनि वामनानें
भाषाप्रबंध रघुनाथ - कथा - रसांचा
केला प्रसाद अवघा पद - सारसांचा ॥११४॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP