वामन पंडित - शुकाष्टक
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
चिंध्या नसांपडति काय उग्याचि वाटे
कंथेनिमित्त जरि शीत तनूस वाटे
ऐसें असोनि म्हणतो श्रुक वाक्य कीं कां
ज्ञाते भले भजति दुष्ट - धनांध - लोकां ॥१॥
अन्नाविणें विकळ देह म्हणाल हो तो
भिक्षाशनें भजन - हेतु जितांचि होतो
तेंतों मिळेचि म्हणतो श्रुक यावरी कां
ज्ञाते भले भजति दुष्ट - धनांऽध - लोकां ॥२॥
कोठें मिळे न जरि भैक्ष्यहि या प्रकारीं
बोले तरु नसति काय परोपकारी
ऐसें असूनि म्हणतो श्रुक यावरी कां
ज्ञाते भले भजति दुष्ट - धनांऽध - लोकां ॥३॥
पाणीं अगत्य तरि पात्र - मिसें अपेक्षा
त्याची भले न धरिती करिती उपेक्षा
कीं आटती श्रुक म्हणे न नद्या अहो कां
ज्ञाते भले भजति दुष्ट - धनांऽध - लोकां ॥४॥
राहावया मठ गृहादिक तों सजावें
त्याकारणें जरि धनांध - गृहास जावें
कोण्ही गुहा श्रुक म्हणे न निरोधिल्या कां
ज्ञाते भले भजति दुष्ट - धनांऽध - लोकां ॥५॥
भोगी विरक्त हरिभक्त नसे असोशीं
भिक्षाशनादिक तथापि न देह सोशी
त्याला म्हणे हरि उपेक्षिल काय हो कां
ज्ञाते भले भजति दुष्ट - धनांऽध - लोकां ॥६॥
ऐसें म्हणे श्रुक तथापि हरीस योग
क्षेमार्थ सेविति तयांस न भक्ति - योग
कीं तो सकाम इतुकी जरि वासना ही
त्याचा श्रुकोक्त मग भार हरीस नाहीं ॥७॥
प्रारब्ध - निष्ठ सुख दुःख समान पाहे
देतो स्व - भक्ति हरि यासि म्हणे कृपा हे
त्याचें अगत्य पुरवी हरि लौकरी तो
किंवा अहो सहनशील तया करीतो ॥८॥
ज्यावीण देह नचले हरि लौकरी तो
दे अर्थ कीं दृढशरीर असें करीतो
भिक्षाशनादि मग तो स्वमुखेंचि सोशी
ज्याला नसे विषय - भोग - सुखीं असोशीं ॥९॥
योगभ्रष्टासि जन्म द्विविध हरि वदे अर्जुनातें विशेषें
त्यांत श्रीमंत - योगी - श्रुचि - गृहिं उपजे भोगवांछाविशेंषें
भोग श्रीमंत भोगी तर्हि मति पहिली पावतां देवदेवा
वैराग्यें सेवितो तो सकळ सहनता सत्सदंनादि देवा ॥१०॥
सुखी देह जो जो कदन्नासि सोशी सदन्नादिही घे नसोनी असोशी
द्विधाही म्हणे उत्तम - श्लोक पाळी सुखें भोगवी भोग जे जे कपाळीं ॥११॥
रक्षी न काय अजित स्व - पदाब्ज - दासां
तें बोलिला श्रुक असें असिया उदासां
भावार्थ हा निवडिला स्फुट वामनानें
मानूनि निश्चय अस बरवा मनानें ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : June 27, 2009
TOP