वामन पंडित - रुक्मिणी पत्रिका
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
तापत्रयां हरिति श्रोत्र - मनीं रिघोनी
त्रैलोख्य - सुंदर - तुझे गुण आइकोनी
रुपा तुझ्या मदनमोहन - सांवळ्यातें
निर्लज्ज मन्मन हरी तुजला वरीतें ॥१॥
श्रोत्यांचिया श्रवण - रंध्रिं रिघोनि चित्तीं
तूझे गुण त्रिविध ताप हरी हरीती
ऐकोनियां भुवन - सुंदर या गुणातें
निर्लज्ज चित्त हरि हें तुजला वरीतें ॥२॥
विद्या वय द्रविण रुप इहीं करोनी
हा आत्मतुल्य पति हेंचि मनीं धरोनी
जे सर्व - लक्षण - विचक्षण सत्कुलीता
कोण्हीं नृसिंह नवरी तुजला वरीना ॥३॥
जे सर्व - लक्षण - विचक्षण आणि धीरा
तेही तुझे गुण असे जगदेकवीरा
ऐकोन कोण नवरी न वरील तूतें
निर्लज्ज यास्तव झणी म्हणसील मातें ॥४॥
देहार्पणा करुनि तूं पति म्या वरीला
जाया करीं हरि तुं नेउनि शीघ्र माला
सिंहांगनेसि मज नेइल अंबुजाक्षा
जेबूक चैद्य जरि तूं करिसी उपेक्षा ॥५॥
म्या तूज निश्वित मनें वरिलें अनंता
येऊनियां करिं धरुनि करीं स्वकांता
सिंहांगनेसि मज जंबुक अंबुजाक्षा
नेईल चैद्य जरि तूं करिसी उपेक्षा ॥६॥
आराधिला जरि गदायज म्या अगण्यें
पूर्तेष्ट - दत्त - नियमादि - बहूत - पुण्यें
येऊनियां करिं धरु मज चक्रपाणी
चैद्यादि दुष्ट हरि हे नधरुत पाणी ॥७॥
स्वर्वेश्वरार्पणविधी करुनि अगण्यें
केलीं जरी असति कीं बहुजन्म पुण्यें
येऊनियां मज करीं धरि चक्रपाणी
हे नातळोत दमघोसुतादि कोणी ॥८॥
त्वां गुप्त उद्दहनपूर्वदिनींच यावें
होऊनियां मग स्वसैन्य - समेत हावें
चैद्यादिका मथुनि पौरुषश्रुल्क द्यावें
मातें निशाचर - विधी करुनीच न्यावें ॥९॥
लग्नाचिया पहिलिया दिवसांत यावें
संगीं समय बळ यादव सैन्य घ्यावें
या चैद्य - मागध बळोऽबुधितें मथावें
मातें निशाचर - विधी करुनी हरावें ॥१०॥
बंधू तुझे न वधितां ग्रह - मध्यगा तूं
नेऊं कसी असि जरी पुसतील मातू
आहेच पूर्वदिवसीं गिरिजेसि यावें
त्वां येऊनी हरि मला हरुनीच न्यावें ॥११॥
अंतः पुरांतुनि तुझे नवधूनि बंधू
न्यावें कसें म्हणसि तूं जरि सौख्य - सिंधू
यांचे कुळीं हरि असे कुळदेवि - यात्रा
तेथूनि तूं मजसि ने शतपत्र - नेत्रा ॥१२॥
रुद्रासि ज्या पद - रज - स्वपनाचि इच्छा
तैसीच संत करितील जयाचि इच्छा
याचा प्रसाद नपवें जरि जन्मिं हेची
प्राण त्यजूनि शतवार वरीन तोची ॥१३॥
शर्वादि सर्व तुझि इच्छिति पाय - धूळी
तूझा प्रसाद नव्हतां मज याचकाळीं
जन्मा शतांत स्मरणे मरणें मुकुंदा
अंतें तुझ्याच वरणें चरणार विंदा ॥१४॥
हरि - चरण - सरोजीं रुक्मिणीची शिराणी
विवाद - लिखित - रुपें बोलिली जे पुराणीं
मनुज - तनुज जैसा भूतळीं चक्रपाणी
जगदद्य हरि भाषारुप हे व्यासवाणी ॥१५॥
असि विदर्भ - महीपति - पुत्रिका लिहि हरिप्रति संस्कृत पत्रिका
लिखित - भाव तिचा वरवा मनें उकलिला त्दृदयांतुति वामनें ॥१६॥
N/A
References : N/A
Last Updated : July 04, 2009
TOP