वामन पंडित - दंपत्य चरित्र
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
कर्णी पृथेच्या घन श्याम लागे त्या मेहुण्यामाजि गणी मला गे
इच्छा मला हे बहु वाटते हो विप्रासवें पाहिन वाट ते हो ॥१॥
कुंती म्हणे त्या कमळापतीतें योजूं कसी मी तुज दंपतीतें
नपाहवे रे तुझिया पदातें जें छेदितें सर्वहि आपदातें ॥२॥
हंसतवदन कुंती बोलली श्रीहरीतें
धरिल कसि शिरीं रे रुक्मिणी घागरीतें
पदतळ मृदु तैसे स्कंधही रम्य पाणी
सजळ घट धराया योग्य ना चक्रपाणी ॥३॥
माझें शरीर तरि हें समुळीं वृथा हो
ऐकोनियां वचन हास्य करी पृथा हो
होऊनि दंपति हरी तरि काय जासी
हें ऐकतां बहुत हर्ष असे अजासी ॥४॥
जो धन्य देह झिजतो द्विज - धर्म - कामी
तो घेउनी नच करी तरि धर्म कामीं
बोलोनियां वचन हें हरि चालिला हो
घे रुक्मिणी घटकरीं मग बोलिला हो ॥५॥
स्वामी बरें म्हणुनि श्री घट घे स्वहातीं
ऐकोनियां नृप ऋषी नयनीं पहाती
जीचे कृपेकरुनियां विधि सर्व चाले
ते आद्यशक्ति घट घेऊनि मार्ग चाले ॥६॥
करा जोडूनियां विनवित असे पद्मनयना
नव्हे योग्य स्वामी तुज तरि असें शेष - शयना
तुझ्या नामीं झाले रत जन तयां सौख्य करिसी
अतां तो तूं माझ्या सदनिं सखया कामकरिसी ॥७॥
जगन्नाथा देवा सलगि तुजसीं फार करितों
न जाणूनी तूतें सुत्दृदकुळिंचा भाव धरितों
नसांगावें तेही करिसि करवीतों अम्हिं तुला
वदोनियां ऐसे यदुतिलक साष्टांग नमिला ॥८॥
हरी बोले प्रेमें स्तविसि नृपति व्यर्थ मजला
जसे बंधू भीमार्जुन सकळ तैसा मि तुजला
तुझ्या कार्यासाठीं सगुण मजला देह धरणें
वदोनीयां ऐसें जई न करि तैं व्यर्थचि जिणें ॥९॥
बोलोनियां हें हरि चालिला हो भागीरथीचें तट पावला हो
भरुनि दे कुंभ रमा - शिरीं हो आश्चर्य ऐसें हरि तो करी हो ॥१०॥
पदर उभयतांचे बांधिले कौतुकांनी
कुरुपति - ललनानें ऐकिली मात कानी
अभिनव मग तोही देखिला पूतनारी
घटसहित सवें ते चालिली पूत नारी ॥११॥
म्हणे मस्तकीं वेदना काय होते हरी बोलतां बोलिली श्री अहो ते
म्हणे धर्मकाजी नसे खेद मातें रमा बोलिली वाक्य सर्वोत्तमातें ॥१२॥
विशेष तुझ्या हरि संन्निधानीं जे राहती त्यां सुख - राजधानीं
मी धन्य होतें द्विज - धर्म - कामी नाहींतरी मी अवधी रिकामी ॥१३॥
वाद्यासहित ऋषिते नृप - संन्निधानें
आले शिरीं कलश घेउनियां निधानें
तो न्हाणिला हय करें अवनीपतीचा
श्रीकांत भक्तजन - वत्सल यारितीचा ॥१४॥
अपारें असीं भक्त - कामें करीतो पदीं आपुल्या नेतसे लौकरी तो
कथेच्या रसें शुद्ध केलें मनाला कलीमाजि या तारिलें वामनाला ॥१५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 29, 2009
TOP