वामन पंडित - अहिल्योद्धार
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
करुनि नमन सीता वल्लभाच्या पदातें
कथिन पदरजाच्या कीर्तिच्या - संपदातें
जड शिळ तनु झाली जे अहिल्या मतीची
निज चरणरजें ते उद्धरुं राम तीची ॥१॥
सुरेंद्रें अहिल्या - सतीसीं रमाया
तिला दाविली गौतमाकार माया
प्रिया आत्मयाची तसा भाव दावी
अहंकार बुद्धीस ते पैं वदावी ॥२॥
अहंकार इंद्र प्रियात्मत्व दावी
रमे बुद्धिसी ते अहिल्या वदावी
शिळा देह जो मी गमे ज्या मतीतें
जगीं उद्धरुं तो पदें राम तीतें ॥३॥
चिच्छक्ति चित्स्फुरण निर्मळ ज्या मतीतें
आत्मा सदा प्रिय गमे सुख धाम तीतें
ते आत्मता तसिच मानुनि मी पणानें
संपादिते तनु शिळापण आपणातें ॥४॥
अहिल्या तसी स्वप्रियाकार माया
न जाणोनि गेली पराशीं रमाया
घडे या निमित्यें शिळाशाप तीतें
पती मानितां त्या शचीच्या पतीतें ॥५॥
गौतमें करुनि कोपतीव्रता
शापिली निजसती पतिव्रता
पावऊनि अधमाधमा गती
मानिली निरपराध मागुती ॥६॥
शापूनि होय अनुतप्त मुनी सतीतें
कीं ठाउकें न सुरकृत्रिम जीस तीतें
म्यां शापिली तरि जडात्मकता मतीची
नाशी रघूत्तम तशी हरु राम तीची ॥७॥
सागरी दगड राघव तारी
ये शिळेसि विभु तो अवतारी
उद्धरी जिस जड भ्रम तीतें
राम उद्धरि जसा कुमतीतें ॥८॥
कानीं असें वचन आयकतां पतीचें
झालें अचेतन शिळामय रुप तीचें
नासा स्तन श्रवण केशहि वेगळाले
देखूनि बाष्प मुनिच्या नयनीं गळाले ॥९॥
अवयव अवघेही हे यथा पूर्व सारे
कुरळ पसरलेते मूर्धजांचे पसारे
करितिल वनिं चूर्ण श्वापदांचेच पेटे
ह्नणुनि मुनी मनी हा शोक वन्हीच पेटे ॥१०॥
देखतां मुनि तिला तनुकंपा
पावला उपजली अनुकंया
शोक होउनि अपार सतीचा
वेचवी तय कृपारस तीचा ॥११॥
विनावृक्ष येथें नसो जीव जाती
गजव्याघ्र निर्जीव होऊनि जाती
हिला पाय लागो मृगांकाननाचा
घडो जंगमा त्याग तों काननाचा ॥१२॥
वचन हें निघतां ऋषि आननीं
वसति जंगम जीव न काननीं
विपिन शासन येरिति नेमुनी
निज तनू बदरी प्रति ने मुनी ॥१३॥
साठी सहस्त्रां - वरुषीं अजाला
वंशीं रवीच्या मग जन्म झाला
तो राम सीता वरण प्रसंगें
ये त्या वना कौशिक विप्र संगे ॥१४॥
तो स्थावरांविण न देखत जंगमातें
सर्वज्ञ रामहि वदे अजि सांग मातें
हांसे ह्नणे मुनि सुरांविधिपूर्वकांहीं
तूं निर्मिता विदितसे तुज सर्व कांहीं ॥१५॥
सर्वज्ञ राम अजि लौकिक भाव दावी
म्यां कां तयाप्रति न पूर्व कथा वदावी
सांगे ह्नणोनि ऋषिवर्य मुनींद्र रामा -
वार्त्ता दिवाकर कुळांबुधिचंद्र रामा ॥१६॥
कथि कथा कुशिकान्वय नंदन
श्रवण तें करितो रघुनंदन
सकळ पाहति गौतम आश्रमा
नयनिं देखति विप्रवधूश्रमा ॥१७॥
शिळा सारी नारी हसित अधरीं मंद मिरवे
मुखीं चंद्र ज्योत्स्ना अवयव यथा पूर्व बरवे
ऋषी विश्वामित्रा प्रति सकळ देखूनि पुसती
मुखें कोण्या हांसे ह्नणति वद जी गौतम सती ॥१८॥
दिल्हें तया उत्तर कौशिकानें
कीं शाप हा आइकतां स्वकानें
झाली सती ते अति दीन वाणी
आक्रंदली सुस्वर दीन वाणी ॥१९॥
करुनी गळा मोकळा सारसाक्षी
रडे कीं अगा सर्व संसार साक्षी
पतिप्रीति कामी नसें पाप कामीं
असी ते पहा पावले शाप कामीं ॥२०॥
पतिव्रता मी पतिहार कंठीं
घालूनि धर्मे निज काळ कंठीं
वेशें तया इंद्र भुजंगमा तें
घे तो डसे दुष्ट भुजंग माते ॥२१॥
ज्याला तपें सकळ भूत भविष्य ठावें
ऐश्या पतीसहि असें तम कां उठावें
गेली स्वकांत ह्नणऊनिच जे रतीतें
शापें तिला रचियला अपकारतीतें ॥२२॥
इत्यादि शोक परिसोनि मुनी सतीचा
मानी मनीं निरपराध विलास तीचा
आली कृपा तंव बहू ऋषि गौतमातें
बोले त्यजूनि अति दीर्घतमा - तमातें ॥२३॥
ह्नणे स्पर्शला काम देवाधमातें
अहिल्ये तसा झोंबला क्रोध मातें
भली तूंचि मी इंद्र दोघे समान
त्रिलोकीं न होतील आह्मांस मान ॥२४॥
चित्तीं मला उपजला अनुताप साचा
दुर्वार शाप अति दारुण तायसाचा
हे नाशिलें सुकृत म्यां तंव घात - पातें
आतां कृपें करुनि वेचिन वो तयातें ॥२५॥
हा शाप आणि पुरुषांतर तूज लागे
स्पर्शे अकल्पित तंई अघ तूज लागे
दोहींस या परि हरुनि समागमातें
माझ्या पुन्हा मिळशि तूं वर माग मातें ॥२६॥
हें आयकोनि अबला ऋषिवर्यवाणी
आतां नको करुं ह्नणे करुणेसि वाणी
दे एक थोर वर येरिति कीं कदापी
मीन च्यवेंन मज कोणहि लोक दापी ॥२७॥
ऋषि ह्नणे असि हे वर मागती
कशि घडे इशि हे परमा गती
बहुत दीर्घ विचारुनियां मुनी
हसित वत्क्र वदे तिस नेमुनी ॥२८॥
ह्नणे सूर्य वंशांत पूर्णावतारी
शिळा सागरा - माजि जो देव तारी
घन श्याम तो राम लाऊं पदांतें
तुतें आणि दे चिंतिल्या संपदांतें ॥२९॥
पडे शब्द कानीं जसा हा सतीच्या
सुखें येत रोमांच देहास तीच्या
जगीं पूर्ण जीच्या निजानंद झाला
मनी आठवी रामचंद्रा अजाला ॥३०॥
झाली शिळा परि मनीं सुख तें सतीच्या
अद्यापिही दिसतसे मुखिं हास्य तीच्या
रामाचिया स्मरतसे त्दृदयीं पदातें
हो हास्य सूचवि मनोगत संपदातें ॥३१॥
हें आयकोनि मग या रिति हो प्रसंगें
इंद्राचिही पुसियली गति विप्रसंगें
बोले ऋषी सतिस जो मुनि देवराया
तो ये कृपा कुतनु देखुनि दे वरा या ॥३२॥
अहिल्या सती शापिली कोपतापें
सुरेंद्रासि तेव्हां तपाच्या प्रतापें
ह्नणे प्रीति ऐसी जयाला भगाची
तनू हो सहस्त्राभगीं दुर्भगाची ॥३३॥
तेव्हां मुनीतें अनुताप झाला
देखोनि अक्रोध महा द्विजाला
समागमें इंद्रहि काननातें
चाले स्वयें झांकुनि आननातें ॥३४॥
देखोनि दीन मुनि सत्तम देवराया
शापापहार करि ये रितिं दे वराया
कींहीं भगें दश शतें नयना कृतीतें
पाऊनि सूच उत भाव जना कृतीतें ॥३५॥
केलीं भगें नयन यांत असी कृपा हे
कीं लोचनीं दशशतीं अति दुर पाहे
चित्तीं धरुनि अनुताप असीं कदापी
कर्मे नको करुं असा सविवेक दापी ॥३६॥
निरोप देऊनि सुराधिपातें
शिळा सती आळवि त्र्प्र श्रुपातें
गेला तपस्वी परमा - तपातें
शोषीतसे वर्ष हिमातऽपातें ॥३७॥
तदारभ्य हा ईस कांतार वास
स्मरे हे शिळा होउनी राघवास
सुखे त्या मुखीं हास्य सद्भाव दावी
मुनी हो इची काय शोभा वदावी ॥३८॥
असें विश्वामित्रा हसित पुसतां विप्रनिकरीं
तयातें हे वार्ता कुशिक - सुत तो वर्णन करी
कर श्रीरामाचा धरुनि ऋषि वृंदातुनि मुनी
पुढें ने श्रीरामा पद इस ह्नणे लावि नमुनी ॥३९॥
श्रीराम तेव्हां तिस पादपद्मा
लावी वसे ज्यांत अखंड पद्मा
तों रामराम ध्वनिं आननांत
त्वरें उठे गर्जत काननांत ॥४०॥
ते जो उठे गर्जत रामराम
प्रतिध्वनी होति मनोभिराम
तो कौशिकादि द्विज राम वाणीं
उच्चारितां काय सुखासि वाणी ॥४१॥
स्पर्श कांचन करी परि साचा
काळिमा हरुनि त्या परि साचा
देह हेम - परि सुंदर जाला
लागतांचि हरिपाद - रजाला ॥४२॥
जयिं मतिस चिदात्मा चित्पदीं भाव दावी
जड - तनु तिचि ब्रह्म तेव्हां वदावी
कपट पुरुष वेषें हे दशा जे सतीतें
रघुपति पद - पद्मीं स्पर्शतां नास तीतें ॥४३॥
पद - रजें उठतां कुशलक्षणीं
प्रथम पाय यवाकुशलक्षणी
दिसति शोभति अद्भुत नूपुरें
स्मरति ज्यासि विरंचि तनू पुरें ॥४४॥
उठे तो पुढें राम कोदंड पाणी
गळां हार मुक्ता फळांचे सुपाणी
घनःश्याम दृष्टी दिसे कामिनीच्या
प्रभा अंबरीं दिव्य सौदामिनीच्या ॥४५॥
सजळ जळद वर्णा दुःख संसार भंगा
कनक रुचिर वर्णा सूर्य कोटि प्रभंगा
सशर करिं धनू त्या राघवा सानुजातें
स्तवित कमळ - नेत्रा कुंडलास्यां बुजातें ॥४६॥
पद रजा जसि लाधलि दुर्लभा
परम विस्मित गौतम - वल्लभा
करुनि मागुति मागुति वंदना
स्तवितसे स्वमुखें रघुनंदना ॥४७॥
ब्रह्मादिही हुडकिती पद - नीर ज्याचा
तो रेणु लाभ मज आजि तया रजाचा
केले मला परम धन्य जगान्निवासा
नासूनि शाप तनु दुःख अरण्य - वासा ॥४८॥
स्व - पद - रज जयाचे उद्धराया उपाय
त्रिगुण विरहिता या देह ना हात पाय
प्रथम नवल हें कीं जन्म त्याही अजाला
तदुपरि चरणाच्या रेणुचा स्पर्श झाला ॥४९॥
चाले वदेही वरदान देही
तथापि हा राघव दान देही
न देह हा भाग्य अहो जनाचें
विचित्र कर्त्तव्य निरंजनाचें ॥५०॥
मनुष्य या शुद्ध निरंजनाला
जो मानितो त्या अबुधा जनाला
मोहावया राम तसेंचि दावी
विचित्र याची करणी वदावी ॥५१॥
सुर - नदी भुवन त्रय पावनी
पद - रजें प्रभु तो मज या वनीं
जड शिळत्व निवारुनि दीसतो
धरिन मी मनिं योमिनि दीस तो ॥५२॥
सेव्य जो सकळ देव दानवीं
त्या शिवासही शिरीं सदा नवी
ते नदी जसिच पाद - नीर जी
धन्य मी तसिच पादनीं रजी ॥५३॥
विधि भवासहि पावन नीर जी
जनन त्यास तुझ्या पदे - नीरजी
मज शिळेशिहि हे तनु संपदा
तच पदींच नमो अजि या पदा ॥५४॥
पदरजेंचि पवित्र नदी सती
मजहि ते पद पावन दीसती
दिसतसे प्रभुचा मज वेष ही
विभव हें किति वर्णिल शेषही ॥
मनुज आकृति बाण धनुर्धरा
जळज - लोचन कौस्तुभ कंधरा
नयनि देखतसे तरि या विना
इतर दैवत मानुनि सेविना ॥
ज्याचें पदाब्ज - रज धुंडिति वेद वाचा
नाभीसी संभव सरोरुह - संभवाचा
घेणार नाम - रस - सार पुरारि - वाणी
तो रामचंद्र भजतां मज काय वाणी ॥
या दीन - पालन कथा खळशासनाच्या
गाती निरुपिति सभे कमळा - सनाच्या
त्या राघवा विण दुज्या कवणा भजावें
सर्वात्मता शरण एक तयास जावें ॥
धरुनि स्तनीं लग्न संगीत वीणा
तुतें राघवा गाय वाणी प्रवीणा
कुचाऽग्रावरी वर्षते नेत्र - पाणी
त्दृदऽब्जीं जिच्या राम कोदंड - पाणी ॥
तुतें ब्रह्म - लोकीं सदा गाय वाणी
नसे जीस गातां निजानंद - वाणी
स्तनाऽग्रावरी ते धवां अंबु जाचे
अहो भाग्य त्या दिव्य नेत्रांऽबुजाचें ॥
रघुपती तुज गाउनि भारती
सकळ मानितसे निज भार ती
तनुवरी गुढियाच उभारती
उपजवी सनकादि सभा - रती ॥
विधाता - पिता आणि तत्पुत्र - दारा
तुतें गातिगा रामचंद्रा उदारा
असा तूं जग - द्धाम विश्वा - भीरामा
तुझे पाद पद्मींच मी सुक्त रामा ॥६२॥
जे संपदा कमळजा सकळां सुरांची
जे माउली विधि हरादिक वांसुरांची
तेही स्तनीं पद तुझें निज संपदातें
मानी तया नमन मी करितें पदातें ॥६३॥
आक्रमी स्व - चरणें त्रि - जगातें
राम हा ह्नणुनि शास्त्रहि गातें
त्या पदा नमुनि गौतम जावा
घे निरोप पति - सन्निध जावा ॥६४॥
श्रीत्रिविक्रम विराम वामनीं
नित्यही प्रियपणे नवा मनीं
चित्स्वरुप करि कामना शिला
वामनें इतर काम नाशिला ॥६५॥
N/A
References : N/A
Last Updated : July 04, 2009
TOP