वामन पंडित - कंसवध
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
नवरसें भवरोग - रसायनें
करि हरी करिती मुनि गायनें
किमपि कंसवधीं रस देखिले
कथिन जे मनिंवामनिं रेखिले ॥१॥
रंगाचिया दारवटांचि हस्ती
मारुनि घे साऽग्रज दंत हस्तीं
देहीं गजाचे मद - रक्त बिंदू
तो मल्लरगांत मुकुंद वंदूं ॥२॥
भिन्न भिन्न मतिच्या अवलोकीं
देखिला कस कसा रस लोकीं
श्लोक एकचि वदे शुक राया
जे रसज्ञ तिहिं अर्थ कराया ॥३॥
मल्लां वज्र गमे नरा नृप गमे काम स्वयें स्त्रीजना
गौळ्यां आप्त नृपां खळां प्रभू शिशू माता - पित्यांच्या मना
कंसा मृत्यु अशक्त पामरजनां संतांसि तत्त्वाऽमृत
श्रीशेषासन यादवां हरि दिसे रंगांत रामाऽन्वित ॥४॥
दे मल्लां रस रौद्र अद्भुत नरां श्रृंगार नारी - जनां
गौळ्यां हास्य नृपांस वीर करुणा मातापित्याच्या मना
कंसा लागिं भयानकाऽख्य रस दे बीभत्स मूढां भ्रमे
संतां शांत रस स्वभक्ति रस तो दे यादवां या क्रमें ॥५॥
नव - रस हरि दावी यांत मल्लादि - दृष्टी
करि दशम रसाची यादवांमाजि वृष्टी
रस दश कथिले जे ज्याक्रमें श्रीश्रुकानें
हरिगुण - रस तैसे घ्या मुखें आणि कानें ॥६॥
दहा रस श्री शुक बोलिला हो
त्यांचा क्रमें घ्या श्रवणादि लाहो
रसीं प्रति श्लोक - रसाऽव लोकी
गुणाऽमृत - प्राशन मृत्युलोकीं ॥७॥
वधुनि दाखवटांचि महाकरी
उभय दंत सहाग्रज घे करीं
गज वधूनि मृगांत जसा हरी
त्वरित मल्लदळांत निघे हरी ॥८॥
रंगांऽगणीं लक्षुनि कैट भारी
वज्राहुनी मानिति मल्ल भारी
ऐशा हरी रौद्ररसाशि दावी
कया - रसाची रुचि हे वदावी ॥९॥
भोजराज विगतप्रभ झाला
श्रीपती नृप गमे मनुजांला
दाखवी सुरस अद्भुत लोकीं
कीं असें जन मला अवलोकी ॥१०॥
संगांग - श्रृंगाररसास नेत्रीं
कीं रंग दाऊनि कुरंग नेत्रीं
अनंगरंगांऽबुधिच्या तरंगीं
रंगीं करी व्याकुळ अंतरंगी ॥११॥
शरीर रक्तांकित दंत हस्तीं
येतो कसा डोलत मत्त हस्ती
ह्नणोनी जे हांसति सख्य भावें
गोपाळ हा हास्य रस स्वभावें ॥१२॥
घेऊनियां याच नृपाऽसनातें
करील आह्मां वरि शासनातें
वाटे असें दुःख नृपांसि भारी
वीराऽख्य दावी रस कैठभारी ॥१३॥
कृष्ण हा परम देवदेव कीं
हें स्मरे न वसुदेव देवकी
लेंकरुं ह्नणुनि वर्षती दया
दाखवी हरि दया - रसोदया ॥१४॥
कृष्ण हीन - बळ बाळ लेंकरुं
मल्ल मारितिल काय मी करुं
येरिती करिति खेद दंपती
फुंदती रडति आणि कांपती ॥१५॥
द्विरद दंत जसे उपडूनि घे
रस भयानक कंसमनीं निघे
मनीं ह्नणे निमिषें वधिला करी
मजहि मारिल यावरि लौकरी ॥१६॥
अनंत - शक्तीसहि अज्ञ - लोकीं
अशक्त मानूनि कृपाऽवलोकीं
निरुपिला खेद बहू प्रकारें
बीभत्स केला रस निर्विकारें ॥१७॥
श्रीमूर्ति देखूनि महा - विभूती
संतां गमे स्वात्मसुखाऽनुभूती
ते देखती शांत निज स्वरुपीं
दावी हरी शांतरस स्वरुपीं ॥१८॥
नव रस कवि गाती हेचि वर्णूनि जाती
निज चरित - रसीं त्या दाखवी दिव्यजानी
दशम रस अनन्य प्रेमभक्तीस लोकीं
यदुपति हरि तो दे यादवां स्वाद लोकीं ॥१९॥
विना शेष शायी जनां यादवांला
नसे देव ते देखती माधवाला
गमे राम तो शेष हा शेषशायी
स्व पायीं तया दे रस प्रेमदायी ॥२०॥
इष्ट दैवत अभीष्ट अशेषें
दे जनां प्रिय हितेंचि विशेंषें
यादवां स्वसुख कल्पतरुचें
प्रेम हें सहज आदिगुरुचें ॥२१॥
इष्ट सर्वहि अभीष्ट असेना
कृष्णरुप सचराचर - सेना
वामनास सकळात्मक - लाहो
कीर्त्तनप्रिय असा कळला हो ॥२२॥
सविजे प्रिय मुकुंद उगा हो
कीर्त्तनीं अजि तयासिच गाहो
या झणी सुख ह्नणाल जगा हो
हे मृगांबु ठकणार मृगां हो ॥२३॥
टीकाकार जसे क्रमें रस दहा हें बोलिलें श्रीधरें
श्लोकींचे रस त्या क्रमें कथियले हे वामनें सादरें
ते येती कवणे - रिती अनुभवा तो भाव यां प्राकृतां
श्लोकीं आणि पदीं असा अवघिया आधार जो संस्कृता ॥२४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 20, 2011
TOP