वामन पंडित - भरत भाव

कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.

करुनि वंदन जानकिनायका भरत भाव निरोपिन आयका
जननि टाकुनि रामपदीं निघे सुकृत तो मति हे समजोनि घे ॥१॥
भरत जबळि नाहीं मातुल - ग्राम - वासी
भरत - जननि धाडी कानना राघवासी
दशरथ मृत झाला राम जातो वियोगें
तृण बहुत दिसांचें अग्निच्या जेविं योगें ॥२॥
मग भरत वसिष्टें आणिला जो अयोध्ये
नगरि गतधवा ते आणि निर्वीर्य योद्धे
जन मृतसम देखे हेतु कांहीं कळेना
जननि - कृत - कुचेष्टा - बुद्धितें आकळेना ॥३॥
वृत्तांत सांगे भरतासि माय स्वानंद जीचा त्रिजगीं नमाय
भेदूनि वक्षस्थळ शब्द तीचा करी महा क्षोभ महामतीचा ॥४॥
जाळील तीतें निज - दृष्टि - पातें पाहे असा हालविताच पाते
म्हणे अहो पापिणि पापरुपे जळो तुझें तोंड जडस्वरुपें ॥५॥
जाळीन हें तोंडचि जाण आधीं मुखें जया देसि अनंत आधी
न माय तूं वैरिण होसि साची माझे मनीं भाव खरा असाची ॥६॥
केला तुवां देखत भर्तृ - घात क्षणें तिवाठा रचिल्या तिघांत
शत्रुघ्न मी लक्ष्मण राम जोडे राजा तिजा तीस अनर्थ जोडे ॥७॥
गिखिना प्रति राम रमापती दवडिल्यावरि मृत्यु - मुखीं पती
निजविला मज हे विधवा धरा म्हणसि भोग अयोग्य वसुंधरा ॥८॥
वना धाडिलें जेधवां रामराया तुवां हेतु केला स्वभर्ता सराया
अहा राम सीता अशा दंपतीतें वना धाडिलें मारिलें कां पतीतें ॥९॥
नकळत पतिताचें खादलें अन्न ओकीं
तर पतित नव्हे तो पापरुपे अहो की
म्हणुनि उदरिं तूझ्या देह हा जन्मला गे
त्यजिन तरि मला हें पाप तूझें नलागे ॥१०॥
हे अग्नि - तापित घृतांत तनू तळेना
प्रत्यक्ष तो कधिंहि पावक आतळेना
रामापराधिनि सुतास शिवेल कां जी
घे ब्राम्हणोत्तम न अंत्यज पात्र - कोजी ॥११॥
राजर्षि योगें निज - धर्मपूतें जीं कां स्वधर्मे बधिती रिपूतें
शरघें न तीं आतळतील मातें त्वद्रुर्भ - संभूत - नराध मातें ॥१२॥
मारील सद्य मज खायिन त्या विखातें
कीं पापियास निज पातक जेविं खातें
तूं पापिणी त्वरित जासिल सैरवासी
होसी सदा निरथ - दारुण - लोक - वासी ॥१३॥
घना० अहो कैकई हें काय केले तुवां हाय हाय
न म्हणवे तुज माय जन्मोजन्मीं वैरिणी ॥१४॥
सर्वजगदभिराम वना धाडिला तो राम
केले विख्यात कुनाम कीं हे पति - मारिणी ॥१५॥
तुझ्या वधें न अधर्म तुज मारावें हा धर्म
परि निदील हें कर्म राम पापकारिणी ॥१६॥
नाहींतरी प्राण आज्य तुझें घालूनियां प्राज्य
जाळूनियां सामराज्य दाखवितों करणी ॥१७॥
धिक्कारुनी गोष्टि मातेसि सांगे कौसल्येच्या ये गृहा सानु रागें
त्यातें देखे जेधवां राम - माय श्रीरामाचा शोक लोकीं नमाय ॥१८॥
मोकळा करुनि कंट तेधवां आठवूनि मनिं जानकी धवा
ते रडे भरतही तसा रडे जोंवरी नयन होति कोरडे ॥१९॥
म्हणे वांसरा घात झाला असा रे तुझ्या माउलीचेच हे खेळ सारे
वृथा धाडिला राम माझा वनासी न देखों शके त्या जगज्जीवनासी ॥२०॥
अरे राघवें व्यापिले लोक सारे तरी नावरे शोक माझा कसा रे
तृषाक्रांत डोळे घनश्याम - रामा पहायास रे सर्व - लोकाभिरामा ॥२१॥
जानकी जनकराज - कुमारी पाय कोमळ जिचे सुकुमारी
चालली जसि वना अनवाणी बोलली कटकटा जनवाणी ॥२२॥
सुनु सूनहि वनाप्रति जाती आणि जे जित असेल कुजा ती
मानवी तनु पशूंत गणावी ते शिळा परि सजीव म्हणावी ॥२३॥
भरत शोक अनेक तिचे असे परिसतां मग बोलत तो असे
जननि गोष्टि समस्तहि हे खरी परिस येविषयीं मम वैखरी ॥२४॥
मी ब्रम्ह हत्या - शतपाप लाहें ठावें असे लेश जयीं मला हें
खङ्गें वसिष्ठासि अरुंधतीतें वधीं जई ठाउक हे मतीतें ॥२५॥
म्हणे राममाता अरे वासरा मी तुझा जाणतें प्रेम उल्हास रामीं
तुला राम - सेवेविणें काम नाहीं न राज्यादिकांची जया काम नाहीं
तो वसिष्ठ वदला भरतातें राम - पाद - निजलाभ - रतातें
पाळिं यावरि समस्त धरा हे राजनीति करिं सावध राहें ॥२६॥
रायें तुतेंचि दिधलें स्व - नृपासना रे
संपूर्ण तूं जननिची करिं वासना रे
शब्दार्थ हे नकळती गुरु - लाधवाचे
साचे म्हणूनि पद आठवि राघवाचे ॥२७॥
घना० म्हणे भरत हा राम त्राहें त्राहें मेघश्याम
वसिष्ट हा गुरुनाम तोही मज कोपला ॥२७॥
अंतरले तुझे पाय तया राज्याचे उपाय
सांगे मज हाय हाय नव्हे गुरु आपला ॥२९॥
अग्नितुल्य वाटे राज्य मज जाळिल सामराज्य
वरी ऋषी घाली आज्य त्याणें जीव तापला ॥३०॥
दावीं सत्वर चरण किंवा स्वामी दे मरण
तुझ्या नामाचें स्मरण त्याचा भाव संपला ॥३१॥
स्मरोनि ऐसें रघुनंदनातें त्या राघवाच्या पदवंदनातें
जावें असा भाव धरुनि साच बोले वसिष्ठा प्रतिही तसाच ॥३२॥
राजाधिराज रघुराजचि एक जाणा
पाहों चला सकळ जाउनि त्या सुजाणा
आम्हीं समस्त जन किंकर राघवाचे
जें रामनाम जपतों अजि नित्य वाचे ॥३३॥
विना राक्षसी कैकयी काननातें चला सर्व पाहूं मृगांकाननातें
प्रयत्नेंचि घेऊनि येऊं गृहातें नयेतां समर्पू शरीरें स्वहातें ॥३४॥
येणार ते या अथवा न काही राहेन मी हे नघडेचि कांहीं
बोलोनियां स्पष्टचि चालिला हो शोकांतही घे प्रभु - नाम - लाहो ॥३५॥
हा राम हा राम असेंचि वाचे चित्तांत पाय प्रभु - राघवाचे
त्यजी कुलाचार्यहि राम - वाटे कीं तो गुरु त्यास गुरु नवाटे ॥३६॥
येणार ते या अथवा नकाहीं शब्दांत या अर्थ सखोल कांहीं
कीं जो गुरु अंतर राम - पायीं पाडी त्यजावा गुरु तो उपायी ॥३७॥
श्रीरामही टाकुनि राज्य मातें जो घे म्हणे त्या ऋषिसत्तमातें
गुरुत्व कैचें तरि मी उपेक्षा करीन त्याची न मला अपेक्षा ॥३८॥
या कारणें या अथवा न कांहीं राहेन मी हें नघडेचि कांहीं
ऐसी उपेक्षा वदनीं वदे तो श्लोकांत या व्यासचि भाव देतो ॥३९॥
नाहींतरी या अथवा नकाहीं गुरुस बोलेल घडेल कांहीं
रामानिमित्तें गुरुही त्यजावा वाक्यांत भावार्थ असा भजावा
रामानिमित्तें जननीस टांकी पाणी नपी राज्य नदी - तटाकीं
लंघूनियांही - गुरु - संगतीतें पावे अहो दे गुरु ज्या गतीतें ॥४१॥
गुरुविणें न घडे परमा गती गति शुकादि गुरुसचि मागति
परि गुरु करि अंतर राघवीं न गुरु तो ठक दांभिक लाघवी ॥४२॥
तो बाप जो राघव - भक्ति दावी तसीच जी मायहि ते वदावी
जो राम दावी गुरु तोचि साच श्रुत्यर्थ - इत्यर्थ असे असाच ॥४३॥
वसिष्ठ घे राज्य म्हणे नसाच परंतु भावार्थ नव्हे तसाच
त्याच्या परिक्षार्थचि बोलिला हो त्याहूनि आधीं मुनि चालिला हो ॥४४॥
आज्ञा गुरुची अवघे करीती सच्छिष्य ते लोक अलोकरीती
परंतु त्याच्या वचनें तयातें नटाकिती सत्पद - दातयातें ॥४५॥
राम तोचि गुरु भेद असेना भिन्न भाव तरि राम दिसेना
राम टांकि म्हणणेचि गुरुचा त्याग आत्म - सुख - कल्पतरुचा ॥४६॥
तूं टाकि माझ्या वचनेंचि मातें शब्दें अशा जो गुरुसत्तमातें
टाकील शिष्याधम तो गणावा टाकी न जो उत्तम जो म्हणावा ॥४७॥
राम नत्यजि तंईच गुरुतें न त्यजी स्व -सुखकल्पतरुतें
जो असें वचनही नमनीं तो श्रीगुरु न मनिंही नमनीं तो ॥४८॥
लंघूनि शब्दहि असा गुरु तो उपेक्षी
शिष्यासि त्या मग कसा गुरु तो अपेक्षी
जो रामनिष्ठ गुरु निष्ठचि निर्विकारें
सोडी वसिष्ठ भरतासि तयाप्रकारें
म्हणे परिक्षार्थचि टाकि मातें तसा म्हणे टाकि रघूत्त मातें
उल्लंघितां शब्दचि इष्ट वाटे म्हणोनि लागे ऋषिवर्य वाटे ॥५०॥
प्रकरणीं पुढिल्या गुरुराज तो भरत संगतिनेंच विराजतो
जरि पथीं गुरु होय समागमीं तरिच राम मिळे निगमागमीं ॥५१॥
वसिष्ठ तो आणि समस्त माया रामार्थ टाकूनि समग्र माया
सेना प्रजा सर्वहि त्याचवेळे जाती जसे लंघिति सिंधु - वेळे ॥५२॥
पायीं निघे भरत सानुज रामवाटे
रामाविणें इतर इष्ट न काम वाटे
माथां जठा मुकुट वल्कल नेसला हो
श्रीरामवेष वदनीं प्रभु - नाम - लाहो ॥५३॥
राम - वल्कल - जटादिक रीती वेष तो उभय बंधु करीती
राम सानुज तसें भरतातें देखती सकळ रामरतातें ॥५४॥
तों भेटला गुहकनाम किरात पाटे
श्रीराम भक्त परमाप्त तयास वाटे
गंगातटीं रघुपती शयनास दावी
ते भक्ति काय म्हणुनी मुखिं हो वदावी ॥५५॥
दर्भ निर्मित तया शयनातें देखतां उदक ये नयनातें
भूतळीं भरत घालुनि घे हो त्या स्थळींहुनि न चित्त निघे हो ॥५६॥
राम - वृत्त रघु - वश - वरातें सर्व वर्णुनि गुहारव्य - किरातें
लंघुनी सुरनदी भरतातें ते ससैन्य रघुराज - रतातें ॥५७॥
ब्रम्हा रमा वंदिति नित्य ज्यातें त्या राघवाच्या चरणांबुजातें
पाहूं बरें हे भरता असोसी वियोग तो प्राणवियोग सोसी ॥५८॥
कैकेयीच्या दुष्ट भावें जळाला इच्छी रामाच्या पदाच्या जळाला
तों स्वामीच्या देखिलें आश्रमातें कांहीं चित्तें टाकिलें हो श्रमातें ॥५९॥
पाद - चिन्हित - तये वसुधेतें देखतां तृषित जेविं सुधेतें
रामचंद्र - पद - सारस - मुद्रा याढवी भरत - सौख्य - समुद्रा ॥६०॥
घालूनि घे भरत देखुनि त्या रजातें
शत्रुघ्नही अनुसरोनि निजायजातें
चित्त स्मरे प्रभुचिया पद - नीरजातें
प्रेम - प्रवाह नयनीं सुखनीर जातें ॥६१॥
तनुवरी गुटियाच उभारती कवि मुखें किति वर्णिल भारती
भरत येरितिने अजि लोळला प्रभु - पदाब्ज - रजीं बहु घोळला ॥६२॥
हा राम राम रघुनंदन हेंचि वाचे
चित्तांत ते चरण दीसति राघवाचे
ते रेणु हे मुकुट मंडण जे शिवाचे
ऐसें म्हणे त्यजुनि भाव अहो जिवाचे ॥६३॥
भरत पदरजीं त्या घोळला दीर्घकाळ
त्रिभुवनिंहि सुखाचा होय तेव्हां सुकाळ
नमिळति पदरेणू जे विरंच्यादिकांहीं
सुलभ मज म्हणे हें भाग्य माझेंचि कांहीं ॥६४॥
देखोनि राघव - पदाब्ज - रजास वाटे
लोटांगणीं गडबडी सुख फार वाटे
आनंद - नीरत्दृदयीं नयनां बुजाचें
चित्तांत राम - पद घे रज अंबुज्याचें ॥६५॥
बाम - अंकगत भूमि - कुमारी बाम बाहु सुरता सुकुमारी
वल्कलांवर जटा अभिरामा देखतो भरत त्या रघुरामा ॥६६॥
दूर्वा - दल - श्यामल दीप्ति देहीं सेवी पदें लक्ष्मण तो विदेही
गंगातटीं सेवित मंदवातें देखे अशा श्रीरघुपुंगवातें ॥६७॥
देखोनि ऐसें रघुनंदनातें धावे त्वरेनें पदवंदनातें
अलभ्य जो हर्ष सुरादिकांहीं तो होय त्यामाजिच शोक कांहीं ॥६८॥
रडे फुंदफुंदे शिरी पादपद्मा धरी सद्म मानीतसे नित्य पद्मा
बळें क्षेम दे त्यास वोढूनि राम स्व - भक्त - प्रिय स्वामि विश्वाभिराम
मांडिये उपरि बैसविला हो अश्रुनीर पुसि दे सुख लाहो
वासरा न रड सांग सुवार्ता शब्द हा निववि दुःख दवार्ता ॥७०॥
तों देखिला गुरु वसिष्ठ तयास वंदी
ब्रम्हण्यदेव जडला चरणार विंदीं
तों माउल्या तिघिहि सत्वर पावल्या हो
भेटोनियां तिघिही सत्वर सेविल्या हो ॥७१॥
पिता सुखी कीं म्हणतांचि रामा रडोनि त्या सांगति सूपरामा
रडे अहो रामहि लोकरीती स्त्रिया पुन्हा शोक महा करीती
सपिंडीक्रिया राम गंगे - तटाकीं करी आणि तो पिंड गंगेंत टाकी
रडे लोक दृष्टीस शोक श्रमातें प्रभू दाउनी ये पुन्हा आश्रमातें ॥७३॥
तों वदे भरत गोष्टि मनाची प्रार्थना बहुत आगमनाची
मांडिली परि न राघव मानी देखतां सुखरांस विमानीं ॥७४॥
झणि फिरे स्वपुरी प्रति राम हा म्हणुनि आधि मनीं अमरा महा
भरतशब्द तदर्थ नये मना पुरवणें प्रभुला सुरकामना ॥७५॥
आज्ञा पित्याची मज मोडवेना वत्सा तुझी गोष्टिहि तोडवेना
घालूं नको बा मज संकटांत नको पडों या सहसा हटांत ॥७६॥
असी आयके जे धवां रामवाणी मुखश्री करी बंधु तो दीनवाणी
म्हणे तात आज्ञा मृगांकानना रे मला सांग जाईन मी कानना रे ॥७७॥
बापा ऐसें वर्ततां तो विशेषें आज्ञा - भंग प्राप्त दोघां अशेषें
एवं राज्यातें तुवां रे भजावें ताताज्ञेनें कानना म्याच जावें ॥७८॥
असी आयके जे धवां रामवाचा करी कर्म जें बंध तोडी भवाचा
पुढें पांचवा भाव त्यामाजि वाचा स्मरा आयका बंप तोडा भवाचा
येना असें भरत देखुनि रामराया
गंगातटीं रचुनि दर्भ बसे मराया
पाहे वसिष्ठ - मुनि - वकत्र - सरोरु हातें
श्रीराम आणि खुण दाखवि हो स्वहातें ॥८०॥
कीं सांग गुत्द्य अवतार - चरित्र याला
जें तारितें चहुयुगांत जगतत्रयाला
बोले वसिष्ट मग सन्निध जाउनीयां
कां प्राण टाकिसि म्हणे समजावुनीयां ॥८१॥
हा राम मारील दशाननासी यालागिं जातो प्रभु काननासी
नको निवारुं भरता तयाला ब्रम्हादिकांच्या पद - दातयाला ॥८२॥
येणार मागुति चतुर्दश - वत्सरांतीं
राहो वनांत तितुके दिन आणि राती
आत्माच तो तुज वियोग तयासि नाहीं
येऊनियां करिल जे तय कामना ही ॥८३॥
हें आयकोनि जरि शोकहि दूर केला
प्रत्यक्ष दर्शन सुखास बहू भुकेला
तेव्हां उठोनि भरतें पद वंदनातें
केलें दुरुनि म्हणतो रघु नंदनातें ॥८४॥
देखोनियां गमन - निग्रह राघवाचा
बोले उभा भरत निश्वय रुप वाचा
वर्षे चतुर्दश वरीच धरीन देहा
त्यानंतरें त्यजिन यास निरोप दे हा ॥८५॥
वर्षे द्विसप्त भरि काल समाप्त झाला
त्यानंतरें अजि तुझ्या चरणांबुज्याला
स्पर्शे शिरें न जरि देह तयाच वारीं
यातें त्यजीनचि विरिंचि जरी निवारी ॥८६॥
वर्षे चतुर्दशहि रक्षिन शासनानें
अंगीं करीन नवसेन नृपासनातें
सिंहासनावरि तुझ्या पद पादुका मी
पूजीन जों तव - पदांबुज - लाभ - कामीं ॥८७॥
पादुका जडित आणुनि हातें रामचंद्र चरणांबुरुहातें
लावुनी निजशिरीं भरतानें वंदिल्या रघुवरांघ्रि - रतानें ॥८८॥
भरत - जननि जागी होय राम प्रतापें
विकळ रघुपतीच्या द्रोह पापानुतापें
रडत म्हणतसे मी पापिणी रामराया
न धरिन तनु आज्ञा येस्थळीं दे मराया ॥८९॥
रघुपति तिस बोले टाकि हा शोक माते
इतुकिहि मम माया जीत ही सृष्टि माते
सकळहि सुरकार्या म्याचि हा हेतु केला
अमर दशमुखाच्या मृत्युतें हो भुकेला ॥९०॥
झणी हो कैकेई बुडविशि तुं शोकांत त्दृदया
तुझी माझे ठायीं सुमति भरताहुनि सुदया
तुतें मी कौसल्येहुनि अधिक माते समजतों
तुयां ऐसें केलें म्हणउनि नवाटेच मज तों ॥९१॥
म्हणे मंथरा राम राज्यार्थ सिद्धी करी ती तुझा हो पती हे प्रसिद्धी
तुवां इष्ट मानूनि त्या भारतीतें दिला टाकुनी कंठिंचा हार तीतें ॥९२॥
शरीरीं तुझ्या यापरी देवराया निघोनी करी येरितीतें भ्रमाया
तुझा यांत अन्याय कांहींच नाहीं करी मोह माया विरिंच्यादिकांहीं ॥९३॥
करुनि मागुति बुद्धि सकोमला क्षणभरी विसरुंचि नको मला
तरि असा न पडे भ्रम मागुती जितचि पावशि हो परमा गती ॥९४॥
भरत भाव असा बरवा मनें सुरस सेवुनि सादर वामनें
अजि समर्पियला पदवंदनीं रचुनि पद्यपदें रघुनंदनीं ॥९५॥
हरिगुणीं ग्रथिल्या यमकां पहा धरिल थोरभयें यम कांव हा
हरिगुणाविण हो यमकां करी करि न दंड धरी यम कांकरी ॥९६॥
राम तुष्ट असिया यमकां हो आणिखी नियम संयम कां हो
वामनें हरिगुणीं रसनेला अर्पितां अनुभवीं रस नेला ॥९७॥

N/A

References : N/A
Last Updated : July 04, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP