अहिंसा सत्यमस्तेयं अकामक्रोधलोभता ।
भूतप्रियहितेहा च धर्मोऽयं सार्ववर्णिकः ॥२१॥
हो कां उपायें जेणें तेणें । पुढिलासी जें सुख देणें ।
तें उपतिष्ठे मजकारणें । तो गुण म्यां श्रीकृष्णें वंदिजे ॥३४॥
तैसेंच परपीडा असुख । पुढिलांसी न देणें दुःख ।
तेणेंही मज होय सुख । जाण निष्टंक उद्धवा ॥३५॥
दुःख नेदूनि सुख देणें । या नांव `अहिंसा' म्हणणें ।
हा पहिला गुण जाणणें । ऐक लक्षणें सत्याचीं ॥३६॥
सत्य तें जाण पां ऐसें । ज्याचें मन वाचा असत्यदोषें ।
जागृतिस्वप्नसुषुप्तिवशें । स्पर्शलें नसे अणुमात्र ॥३७॥
निंदा आणि नरस्तवन । कदा मिथ्या न बोले वचन ।
वाचा अनसुट धरणें जाण । `सत्य' संपूर्ण या नांव ॥३८॥
हो कां अधर्माचिये जोडी । कोडी धरोनियां कवडी ।
जो रिघों नेदी दृष्टीबुडीं । फुटकी कवडी स्पर्शेना ॥३९॥
तेथेंही चोरी करणें । कां दृष्टी चुकवूनि वस्तु घेणें ।
अथवा न पुसतां नेणें । हें जीवेंप्राणें न संभवे ॥२४०॥
अन्यायोपार्जित धन । स्वप्नींही नातळे मन ।
हें `अचौर्याचें' लक्षण । तिसरा गुण उद्धवा ॥४१॥
स्वधर्में धन यावें हाता । हेहि नसे धनकामता ।
कामिनीकामाची नेणे वार्ता । परस्त्री ते माता नेमस्त ॥४२॥
हो कां स्वदाराभिगमन । तेथेंही आसक्त नसे मन ।
आश्रमधर्मार्थ जाण । प्रतिपालन स्त्रियेचें ॥४३॥
या नांव गा `अकामता' । उद्धवा जाण तत्त्वतां ।
हे चौथी लक्षणता । ऐक आतां अक्रोधु ॥४४॥
जेथ कामाचा आदरु नाहीं । तेथ क्रोधाचें न चले कांहीं ।
जेवीं आकाशाचे ठायीं । न रुपती पाहीं निजशस्त्रें ॥४५॥
जरी बीज जाहलें गोमटें । तरी भूमीविण अंकुर न फुटे ।
तैसें कामावांचूनि कोठें । क्रोध उद्भट न वाढे ॥४६॥
एवं कामाची जे बोळवण । तेचि क्रोधाचीही जाण ।
जैसें गरोदरीचें मरण । करी निर्दळपण गर्भाचें ॥४७॥
शिर तुटलिया पाठीं । हस्तपादादि क्रिया नुठी ।
काम निमालियापाठीं । निमाली गोष्टी क्रोधाची ॥४८॥
जेथ काम क्रोध नाहीं । तेथ लोभ उठी कोणे ठायीं ।
तळवटीं नसतां भुयी । वृक्ष कंहीं वाढेना ॥४९॥
शीस बोडिलें सकेशीं । तेथ राहूं न शके ऊ जैसी ।
तेवीं गेलिया कामक्रोधांसी । वस्ती लोभासी असेना ॥२५०॥
जेवीं कां भ्रताराचें मरण । घेऊनि जाय अहेवपण ।
तेवीं कामक्रोधेंवीण । लोभलक्षण असेना ॥५१॥
या नांव `निर्लोभता' । सत्य जाण सर्वथा ।
क्रोधलोभांतें वाढविता । जाण तत्त्वतां कामचि ॥५२॥
जेथ कामाचें अपूर्ण काज । तेथ क्रोधाचें खवळे तेज ।
जेव्हां कामाचें पूर्ण निज । तेव्हां नाचे भोज लोभाचें ॥५३॥
जेवीं दीपाची दीपकळा । ते सवें वागवी तेजकाजळां ।
तेवीं क्रोधलोभांचा सोहळा । कामाजवळा संतत ॥५४॥
जेवीं कां शारियाचें शीत । घामज्वरासमवेत ।
तेवीं क्रोधलोभयुक्त । जाण निश्चित कामचि ॥५५॥
जेथ कामाचा नाहीं पांगु । तेचि क्रोधलोभांचा त्यागु ।
हा समूळ उपावो चांगु । स्वयें श्रीरंगु बोलिला ॥५६॥
एवं कामत्यागें सर्वथा । त्यागु पावे क्रोधलोभता ।
भूतांसी प्रियत्वें जे हितता । ऐक तत्त्वतां सांगेन ॥५७॥
जैशी शक्ति आपणासी । तैसें प्रिय करावें भूतांसी ।
अगत्य विचंबु ज्याचा ज्यासी । तें तें त्यासी अर्पावें ॥५८॥
अन्न वस्त्रदान मान । पोटींच्या कळवळ्यानें जाण ।
करावें भूतीं प्रीयाचरण । हा स्वधर्म जाण सर्वांचा ॥५९॥
ऐसें प्रिय करावें भूतां । जें परिपाकीं ये त्याच्या हिता ।
जेणें प्रियें उपजे बाधकता । तें सर्वथा न करावें ॥६१॥
जो भूतप्रिय हितकारी । ऐसा जो पुरुष संसारीं ।
मी भगवंत त्याच्या घरीं । सर्व हित करीं सर्वदा ॥६२॥
त्याच्या अशुभांची होळी । भूतहितप्रियमेळीं ।
मी स्वयें करीं वनमाळी । तेचि काळीं तत्त्वतां ॥६३॥
जो सद्भावें सत्य साचार । भूतांसी हितत्वें प्रियकर ।
त्यासी मी भूतात्मा श्रीधर । करीं संसार सुखरुप ॥६४॥
अहिंसादि सप्तलक्षण । हा सर्वांचा स्वधर्म जाण ।
सर्वाश्रम सर्व वर्ण । त्यांसी मुख्यत्वें जाण हा धर्म ॥६५॥
चतुर्वर्णस्वभावप्रकृती । वर्णबाह्यांची लक्षणस्थिती ।
सर्व वर्णांची स्वधर्मगती । ते म्यां तुजप्रती सांगितली ॥६६॥
यावरी आश्रमस्वधर्मता । तुज मी सांगेन आतां ।
उद्धवा ऐक गा तत्त्वतां । प्रथमतां ब्रह्मचर्य ॥६७॥
ब्रह्मचर्य द्विविध जाण । एकाचें `नैष्ठिक्य' संपूर्ण ।
एक तो `उपकुर्वाण' । ऐक लक्षण दोहींचें ॥६८॥
व्रतबंध वेदाध्ययन जाहल्यापाठीं । जो परमार्थीं ठेवूनि दृष्टी ।
गृहस्थाश्रमाची न करी गोठी । `नैष्टिक्य' परिपाठी त्या नांव ॥६९॥
वेदशास्त्र संपूर्ण पठन । गुरुदक्षिणा व्रतविसर्जन ।
करूनि करी पाणिग्रहण । `उपकुर्वाण' या नांव ॥२७०॥