शुश्रूषणं द्विजगवां देवानां चाप्यमायया ।
तत्र लब्धेन संतोषः शुद्रप्रकृतयस्त्विमाः ॥१९॥
स्वधर्म शूद्राचिये ज्ञाती । द्विजसेवा यथानिगुती ।
त्यांचेनि प्रसादें जीविकावृत्ती । निष्कपट स्थिति सेवेची ॥८६॥
करावें गृहस्थांचें गोरक्षण । चाराव्या जेथें तृणजीवन ।
श्वापदभय आलिया जाण । वेंचूनि प्राण रक्षाव्या ॥८७॥
गोरक्षणीं वेंचिल्या प्राण । त्यासी उत्तम गति जाहली जाण ।
ज्यासी गायींचा कळवळा गहन । त्यासी मी श्रीकृष्ण सदा साह्य ॥८८॥
द्विजसेवा गोरक्षण । दोनही वृत्ति न मिळतां जाण ।
तरी देवालयीं संमार्जन । जीविकार्थ जाण करावें ॥८९॥
निष्कपटभावें आपण । निर्मळ करावें हरिरंगण ।
तेथील प्राप्तीचेनि जाण । करावी पूर्ण जीविका ॥१९०॥
तेथ जे जे काळीं जे जे प्राप्ती । तेणें सुखें असावें निजवृत्तीं ।
हे स्वधर्मकर्मस्थिती । शूद्रप्रकृतिस्वभावें ॥९१॥
विप्रासी अग्निहोत्रादिक कर्म । शूद्र नमी द्विजोत्तम ।
तेथ दोंहींचा स्वधर्म । सहजें सम होतसे ॥९२॥
`गृहस्थाश्रमाचें' वर्तन । तिन्हीं आश्रमां आश्रयो आपण ।
अन्न वस्त्र देऊनि जाण । संरक्षण करावें ॥९३॥
`ब्रह्मचर्याश्रम' वर्तन । गुरुसेवा वेदाध्ययन ।
त्यासी द्यावन दान । अधिकार जाण असेना ॥९४॥
ब्रह्मचार्यासी जें जें योजिलें । तें पाहिजे गुरूसी समर्पिलें ।
गुरूसी वंचूनि दान दिधलें । ते तेणें केले अधर्म ॥९५॥
`वानप्रस्थाश्रमी' जाण । मुख्यत्वें तप प्रधान ।
करावें अग्निशुश्रूषण । वेदोक्तलक्षण प्रकारें ॥९६॥
संन्यासी ब्रह्मचारी दीन । समयीं आश्रमा आल्या जाण ।
यथानुशक्त्या द्यावें अन्न । हें आश्रमरक्षण वानप्रस्था ॥९७॥
`संन्याशासी' अहिंसा प्रधान । ज्ञानपरिपाकें शांति संपूर्ण ।
अनोळखीं भिक्षाटण । हा मुख्य धर्म जाण चतुर्थाश्रमीं ॥९८॥
वर्णाश्रमांहूनि बाह्य जाण । केवळ अंत्यजादि जे जन ।
त्यांचे प्रकृतीचें जें लक्षण । स्वयें नारायण सांगत ॥९९॥