त्रेतामुखे महाभाग प्रणान्मे हृदयात्रयी ।
विद्या प्रादुरभुत्तस्या अहमासं त्रिवृन्मखः ॥१२॥
उद्धवा या कलियुगाच्या ठायीं । तुझ्या भाग्याची परम नवायी ।
कृतयुगींच्या प्रजांपरीस पाहीं । तुज माझ्याठायीं विश्वास ॥७१॥
त्रेतायुगीं प्रकटलें कर्म । जो वैराज मी पुरूषोत्तम ।
त्या माझेनि निःश्वासें त्रयीधर्म । वेदसंभृम वाढला ॥७२॥
तेथ त्रैविद्या विविध भेद । नाना मंत्र नाना छंद ।
ऋग्वेदादि तिन्हीं वेद । प्रकटले प्रसिद्ध निजशाखीं ॥७३॥
त्या वेदांपासाव त्रिविध मख । त्रिमेखलायुक्त मीचि देख ।
जेथ होत आध्वर्यव हौत्रिक । कर्मविशेख जे ठायीं ॥७४॥
ऐसें मद्रूप यज्ञकर्म । तेथिल्या अधिकाराचें वर्म ।
दों श्लोकीं पुरुषोत्तम । वर्णाश्रम सांगत ॥७५॥