शमो दमस्तपः शौचं सन्तोषः क्षान्तिरार्जवम् ।
मद्भक्तिश्च दया सत्यं ब्रह्मप्रकृतयस्त्विमाः ॥१६॥
उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । ब्राह्मणप्रकृति दशलक्षण ।
तुज मी सांगेन निरूपण । तें सावधान अवधारीं ॥८४॥
मनादि ज्ञानेंद्रियवृत्ती । बाह्य दृष्टीं परिचारस्थिती ।
ते आवरूनि विवेकयुक्तीं । आत्मप्रतीति धरावी ॥८५॥
तेचि वृत्तीचें धरणें ऐंसें । कृष्णसर्पाचें मुख धरणें जैसें ।
तो वेढे उकली जंव आपैसें । तव धारणासौरसें नेहटावा ॥८६॥
तेवीं वैराग्यप्रतापवशें । गुरुवचनाचेनि विश्वासें ।
अंतरवृत्तीतें ऐसें । जंव ये आत्मासमरसें निजात्मता ॥८७॥
मुख्य करूनि गुरुवचन । तदर्थी बुद्धि निमग्न ।
तत्प्रवण होय मन । `शम' तो जाण या नांव ॥८८॥
ब्राह्मणप्रकृतिमाजीं जाण । हें स्वाभाविक निजलक्षण ।
या नांव गा शमगुण । ऐक निरूपण दमाचें ॥८९॥
विषयप्रवृत्ति प्रचंड । कर्मेंद्रियांचें बळ बंड ।
विधीनें त्यांचें ठेंवूनि तोंड । सैरा वितंड विचरों नेदी ॥९०॥
वेदविधीचेनि हातें । देहनिर्वाहापुरतें ।
खाणें जेवणें इंद्रियांतें । तो जाण येथें `दम' गुण ॥९१॥
तेथ शम तो जाण मुख्य राजा । दमादि इतर त्याच्या प्रजा ।
ते दोनी सांगितले वोजा । ऐक तिजा तपोनेमु ॥९२॥
शमें ज्ञानेंद्रियौपशमु । तेचि कर्मेंद्रियां मुख्य दमु ।
याहीवारी वेदोक्त कर्मु । तें ज्ञान परमु गौरवाचें ॥९३॥
शरीरशोषणा नांव तप । तें प्रारब्धभोगानुरूप ।
हृदयीं हरि चिंतणें सद्रूप । हें मुख्य तप तपांमाजीं ॥९४॥
जो वर्ततां स्वधर्मस्थितीं । हरितें विसंबेना निजवृत्ती ।
जो निजात्मनिश्चयो चित्तीं । अहोराती विवंचित ॥९५॥
जेवीं लोभिया वाहे धन । कां तरुणालागीं तरुणी जाण ।
तैसें निजत्मविवंचन । जयाचें मन सदा करी ॥९६॥
त्या नांव गा तपोनिष्ठ । हें तपांमाजी तप वरिष्ठ ।
ब्राह्मणपकृतीमाजीं श्रेष्ठ । `तप' तें उद्भट या नांव ॥९७॥
ऐक `शौचा' चा निचार । तो आहे द्विप्रकार ।
अंतरि ज्ञाननिर्धार । ब्राह्य आचार वेदोक्त ॥९८॥
बाह्य मळाचें क्षाळण । मृज्जलादि वेदविधान ।
आंतर मळाचें निर्दळण । आत्मज्ञान निजनिष्ठा ॥९९॥
शुद्ध शौचाचें निर्मळपण । मुख्यत्वें उद्धवा हेंचि जाण ।
आतां संतोषाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥१००॥
पुत्र जन्मल्या होय सुख । तो गेलिया सवेंचि दुःख ।
धन जोडलिया होय हरिख । सवेंचि शोक तन्नाशीं ॥१॥
ज्या सुखाची होतां भेटी । निःशेष मावळे दुःखकोटी ।
या नांव `सत्यसुख' सृष्टी । इतर चावटी ते मिथ्या ॥२॥
निरुपचार अंतरगती । मद्भावें जे सुखप्राप्ती ।
जाहलिया संपत्ती विपत्ती । जे संतोषप्राप्ती समसाम्यें ॥३॥
येचि पदीं पाठांतर । `तितिक्षा' म्हणती थोरथोर ।
ऐक त्याचेंही अर्थांतर । पदार्थविचार तो ऐसा ॥४॥
शीत-उष्ण-मृदु-कठीण । अंगीं आदळातांही जाण ।
ज्याचें डंडळीना मन । भावना पूर्ण मद्भावें ॥५॥
संतोषतितिक्षा-व्याख्यान । हें पांचव्या पदाचें लक्षण ।
उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । ऐक निरूपण शांतीचें ॥६॥
माझा निर्धारितां निजबोध । अंतरीं निमाले कामक्रोध ।
त्यांसी केलियाही अपराध । न मनीं विरुद्ध पुढिलांचें ॥७॥
परी तेथींची नवलपरी । अपकार्या होय उपकारी ।
विकार नाहीं ज्याचे अंतरीं । जाण ते खरी `निजशांति' ॥८॥
ऐशी सदा शांति संपुर्ण । तें ब्राह्मणाचें षष्ठ लक्षण ।
ऐक आर्जवाचें निरूपण । जीवींची खूण सांगेन ॥९॥
कुरूप जरी जाहली माता । तरी स्नेहासीं नाहीं कुरूपता ।
कां सुवर्णाचे नाग करितां । सोनें सर्वथा नव्हे सर्पु ॥११०॥
तेवीं कुटिलांसी कुटिलता । करावी म्हणोनि शिकवितां ।
कुटिलत्व नुपजे चित्ता । जाण तत्त्वतां तें `आर्जव' ॥११॥
गायीसी गोड व्याघ्रासी कडू । हा गंगाजळी नाहीं पवाडु ।
तेवीं आर्जवाचा पडिपाडु । विषमांही गोडु समसाम्यें ॥१२॥
या नांव जाण `आर्जव' । सातवें लक्षण अपूर्व ।
आतां निजभक्तीचा स्वभाव । देवाधिदेव सांगत ॥१३॥
वन उद्यान गंगादि जीवन । यांसी पृथ्वीचि जेवीं अधिष्ठान ।
तेवीं सकळ लक्षणां जन्मस्थान । माझी `भक्ति' जाण उद्धवा ॥१४॥
सकळ पिकांचिये प्राप्ती । आधारभूत जेवीं क्षिती ।
तेवीं सकळ लक्षणां उत्पत्ती । माझिये भक्तीमाझारीं ॥१५॥
ऐक ते भक्तीचा इत्यर्थ । सांडोनियां विषयस्वार्थ ।
जीवींहूनि मजलागीं भावार्थ । तोचि निजभक्त पैं माझा ॥१६॥
भक्त आणि करी धनार्जन । हेंचि भक्तिसी मुख्य विघ्न ।
धनलोभी तो अभक्त पूर्ण । सत्य जाण उद्धवा ॥१७॥
माझा भाव नाहीं जिव्हारीं । आहाचवाहाच माझी भक्ति करी ।
तो आंधळ्या गरुडाचे परी । उडे परी निर्धारीं स्थान नेणे ॥१८॥
माझा भावार्थ जेथ होये । तेथ मी जाती कुळ न पाहें ।
मी भावाचेनि लवलाहें । वश्य होयें निजभक्तां ॥१९॥
जेथ भावार्थे माझी आवडी । तेथ अवश्य माझी पडे उडी ।
जेणें भावार्थाची उभविली गुढी । तो जाणे गोडी मद्भक्तीची ॥१२०॥
जें जें भेटे तोचि देवो । ऐसा भावार्थीं ज्याचा भावो ।
तो एक पढियंता मज पहा हो । त्याचेनि भावें जीवों आम्ही उद्धवा ॥२१॥
तोचि माझा जीवप्राण । त्यासी मी सर्वस्वें करीं निंबलोण ।
मी सर्वदा त्याआधीन । जेवीं व्याली धेनु वत्सासी ॥२२॥
एवं निःसीम भावार्थाची स्थिती । त्या नांव उद्धवा माझी `भक्ती' ।
यापरी भक्तीची व्युत्पत्ती । ऐक पां ख्याती दयेची ॥२३॥
बाळक देखोनि संकटीं । जेवीं न सांवरत माय उठी ।
तेवीं दीन देखोनि दृष्टीं । ज्याचे पोटीं दया द्रवे ॥२४॥
ऐशिया दयेच्या ठायीं जाण । आपुलें पारकें पुसे कोण ।
स्वजाति-विजातिलक्षण । पुसायाही पण धीर नाहीं ॥२५॥
महापूरीं बुडतयातें । कृपाळू जाती न पुसे तेथें ।
उडी घालूनि वांचवी त्यातें । `दया' निश्चितें ती नांव ॥२६॥
दीनाचिये दयेलागीं । जो रिघे जळत्या आगीं ।
त्याचे चरण मी वंदीं वेगीं । धन्य जगीं दयाळू ॥२७॥
ऐशिये दयेचेनि गुणें । मज अनंतालागीं तेणें ।
विकत घेतलें जीवें प्राणें । कीं जाहलों पोसणें मी त्याचें ॥२८॥
यालागीं दयाळुवाचे घरीं । मी सदा नाटिका काम करीं ।
जे दयावंताचे अवसरीं । तें माझे शिरीं सर्वदा ॥२९॥
जो जाणे दिनांचा विचार । दीनदयाळू जो साचार ।
उद्धवा तो माझें निजभांडार । सुखाचें सुखसार तो माझें ॥१३०॥
या नांव गा `दया' जाण । तें हें नववें लक्षण ।
आतां सत्याची उणखूण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥३१॥
सत्याचें सत्यत्व तें ऐसे । जागृतिस्वप्नसुषुप्तिवशें ।
ज्यासी असत्यता न स्पर्शे । निजभक्त ऐसें निडारिलें ॥३३॥
ऐसें सत्य परिपक्वल्या पोटीं । सत्य वाचा सत्य दृष्टी ।
निजसत्यत्वें सत्य सृष्टी । पडिली तटी असत्याची ॥३३॥
यावरी गा ` सत्यत्व ' जाण । त्या नांव दहावें लक्षण ।
हें ब्राह्मणाचें संपूर्ण । कर्माचरण स्वभावें ॥३४॥
ब्राह्मणप्रकृतीचे स्थितीं । या दशलक्षणांची उत्पत्ती ।
स्वाभाविक सहजगती । अकृत्रिम स्थिति उद्धवा ॥३५॥
येंहीं दश लक्षणीं संपूर्ण । वर्णवरिष्ठ वंद्य ब्राह्मण ।
आतां क्षात्रप्रकृतीचे गुण । ऐक निरूपण उद्धवा ॥३६॥