कुटुंबेषु न सज्जेत न प्रमाद्येत्कुटुंब्यपि ।
विपश्चिन्नश्वरं पश्येददृष्टमपि दृष्टवत् ॥५२॥
जरी जाहली स्त्रीपुत्रगृहस्थिती । परी न धरावी त्यांची आसक्ती ।
सावध राखावी चित्तवृत्ती । परमात्मयुक्तिसाधनें ॥९३॥
सांडूनि कल्पना प्रमाद संग । चुकवून प्रमदांचें अंग ।
ईश्वरनिष्ठा अतिचांग । वृत्ति अभंग राखावी ॥९४॥
गृह-कुटुंब-विषयासक्ती । पाहतां विवेकाचिये स्थितीं ।
परिपाकें नश्वरप्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९५॥
जैसा इहलोकींचा परिपाक । तैसाचि जाण स्वर्गलोक ।
उभयतां नश्वर देख । केवळ मायिक मिथ्यात्वें ॥९६॥
स्त्री पुत्र आणि धन । हें नश्वर जैसे कां स्वप्न ।
येचिविषयीं निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥९७॥