श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णायनमः ॥
ॐ नमो श्रीसद्गुरु महामेरु । सुक्ष्मस्वरूपें तूं गिरिवरु ।
चैतन्यस्वभावें अतिथोरु । तूं आधारु सर्वांचा ॥१॥
तुझ्या निजबोधाचीं शिखरें । वैकुंठकैलासादि अतिथोरें ।
तेथें ब्रह्माविष्णुमहारुद्रें । तुझेनि आधारें नांदिजे ॥२॥
तुझिया आधारस्थितीं । नांदती त्रैलोक्य-लोकपंक्ति ।
सकळ भूतांची उत्पत्ति स्थिती । निदान अंतीं तुजमाजीं ॥३॥
सुरासुर लहानथोर । एक सौम्य एक क्रूर ।
इयें भूतें धरूनि निर्विकार । स्वरूप साचार पैं तुझें ॥४॥
तेथ विवेकाचें आगर । सच्चिदानंदाचे रत्नाकर ।
तेथील लाधल्या कंकर । नीच ते थोर वेव्हारे होती ॥५॥
ज्याच्या औषधींचा चमत्कार । सेवितां करिती अजरामर ।
जेथ चिद्गंगेचे निर्झर । निरंतर प्रवाहती ॥६॥
जो सुरनरांचा विश्राम । जो सकळ आश्रमांचा आश्रम ।
जो क्रियाकर्मांचें नैष्कर्म्य । जो निजधाम जीवाचे ॥७॥
जो भजनाची कुळवाडी । जो भक्तजीवनाची वाडी ।
जो आवडीची निजआवडी । जो गोडियेची गोडी निजात्मता ॥८॥
ऐसा सद्गुरु महामेरु । जो कठिणत्वेंवीण आधारु ।
ज्याचेनि अंगें संसारु । होय सुखकरु साधकां ॥९॥
त्या साधकांचें सामाधान । शिष्यांचा स्वानंदघन ।
आर्ता-चातकां निजजीवन । स्वामी जनार्दन तुष्टला ॥१०॥
तयाचा जो चरणप्रसादु । श्रीभागवतीं एकादशस्कंधु ।
पूर्वार्धाचा विनोदु । भाषाप्रबंधु वाखाणिला ॥११॥
तेथें उद्धवें पुशिल्या विभूती । त्या षोडशाध्यायीं श्रीपती ।
सांगितल्या यथानिगुतीं । भजनस्थितीलागोनी ॥१२॥
त्या विभूतींमाजीं निजवर्म । `भक्तांचें जें भजनकर्म ।
तें मी केवळ आत्माराम' । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥१३॥
तेथ आशंकेची व्युत्पत्ती । 'करितां कर्माची कर्मगती ।
कर्मठ जाहले नेणों किती । तरी कर्में मुक्ती घडे केवीं' ॥१४॥
कर्में करितां वाडेंकोडें । कर्मीं कर्मठता न चढे ।
कर्मांमाजीं मोक्ष आतुडे । हेंचि रोकडें पुसों पां ॥१५॥
स्वयें बोलिला श्रीपती । `सात्त्विकांची जे कर्मस्थिती ।
ते कर्मचि माझी विभूती' । हें सोळाव्याअंतीं निरूपिलें ॥१६॥
स्वयें आचरितां स्वकर्म । तें कर्मचि होय ब्रह्म ।
हेंचि कर्मक्रियेचें वर्म । देवासी सुगम पुसों पां ॥१७॥
ऐसा पोटिंचा आवांका । तेचि पुसावया आशंका ।
वर्णाश्रमांची स्वधर्मपीठिका । देवासी देखा पुसत ॥१८॥