सायं प्रातरुपानीय भैक्ष्यं तस्मै निवेदयेत् ।
यच्चान्यदप्यनुज्ञायमुपयुञ्जीत संयतः ॥२८॥
अन्नधनपुष्पी फळीं । सायंप्रातर्मध्यान्हकाळीं ।
भिक्षा मिळे ते गुरूजवळी । अर्पूनि कृतांजळी रहावें ॥७॥
तेथ गुरुआज्ञा जाहल्याही जाण । उदरापुरतें घ्यावें अन्न ।
अन्नावेगळें पदार्थभरण । घेवों न ये जाण ब्रह्मचार्या ॥८॥
सायं प्रातः काळीं जाण । ब्रह्मचार्या विहित भोजन ।
गुरुआज्ञा जें दिधलें अन्न । तेणें प्राणतर्पण करावें ॥९॥
तेथ न म्हणावें धडगोड । न करावें रसनाकोड ।
न वाढवावा विषय वाड । देहनिर्वाहीं चाड शिष्यासी ॥३१०॥
भोजनीं कांहीं ज मागावें जाण । यालागीं दृढ धरावें मौन ।
अधिक खादलिया अन्न । तें प्रतिबंधन गुरुसेवे ॥११॥
आहारीं अधिक घेतलिया अन्न । निद्रा आलस्य दाटी गहन ।
अत्यंत अल्प जें भोजन । तेणें विकळचळण देहाचें ॥१२॥
गुरुसेवेलागीं जाण । वृत्ती राखावी सावधान ।
यालागीं शिष्यासी भोजन । युक्ताहारपण सर्वदा ॥१३॥
गुरुसेवेलागीं जाण । शरीर राखावें सावधान ।
तें गुरुसेवेचें लक्षण । स्वयें जनार्दन सांगत ॥१४॥