अग्न्यर्काचार्यगोविप्रगुरुवृद्धसुरान् शुचिः ।
समाहित उपासीत सन्ध्ये च यतवाग्जपन् ॥२६॥
गायत्रीदात्या आचार्यपण । माता पिता तें गुरुस्थान ।
अग्निसूर्यादि सुरगण । गो ब्राह्मण आणि ज्येष्ठ ॥९२॥
यांचें करावया उपासना । बाह्य शुचि अंतरीं समाधान ।
गुरुचरणीं अनन्य शरण । आज्ञापालन पितरांचें ॥९३॥
अग्नीचे ठायीं हवन । इंद्रादि देवांचें स्तवन ।
ब्राह्मण तें पूज्यस्थान । अर्घ्यदान सूर्यासी ॥९४॥
ज्येंष्ठांसी साष्टांग नमन । गायीसी अंगकुरवाळण ।
सायंप्रातःसंध्येसी मौन । मध्यान्हीं जाण मौन नाहीं ॥९५॥
सद्गुरूचा समर्थवादु । सर्वां वरिष्ठ सर्ववंद्यु ।
ज्याचा प्रताप प्रसिद्धु । स्वयें गोविंदु सांगत ॥९६॥