देवा दूध हें घेई । पिउनीया स्वाद हा पाही ।देवा० ॥धृ०॥
काळ्या गाईचें असें हें दूध । पवित्र असें बहु शुद्ध ।
नको करुं याचा विरोध । ऊन ऊन हें झडकरी पीई । देवा० ॥१॥
त्यासि लावियलें केशर ॥ गोड घातलि खडिसाखर ॥
वेलचीचा वास सुंदर । तें पिउनी तृप्त तूं होई । देवा० ॥२॥
हा कलाकंद तुज देतें । घे पेढे तुज आवडते ।
तुजसाठी बर्फी मी करितें । वारी म्हणे थोडें तरी खाई । देवा० ॥३॥