वर्णूं किती तव गुणा । अंत न लागे मनमोहना ॥धृ०॥
पूर्व पुण्य हें बहु थोर । तेणें प्राप्त झाला हा शामसुंदर ।
रुप बहु मनोहर । पाहातां नयनीं आनंद फार ।
वृत्ती ही तदाकार । उल्हास अंतरीं होतो मना । वर्णूं किती० ॥१॥
लाधले हे दिव्य पाय । न कळें पूर्वीचें पुण्य तें काय ।
वोळली सद्गुरु माय । मज दीनावरी कृपा केली गुरुराय ।
उतराई होऊं मी काय । अनन्य होउनी लागतें चरणा । वर्णूं किती० ॥२॥
अंतरींचा तूं रे प्राण । तुज पाहुनी तन्मय होई रे मन ।
आवडेना दुजें आन । पाहातां हरी तव हास्यवदन ।
वृत्ती जाते रंगून । देहभाव तो मुळी स्फुरेन । वर्णूं किती० ॥३॥
ऐसी ही सुंदर मूर्ती । सद्गुरुने प्रेमें दिली माझे हातीं ।
कामना केली पुरती । अखंड राहो ही मम चित्तीं ।
प्रेमें घडो तव भक्ति । वारिसी सेवा घडो तव चरणा । वर्णूं किती० ॥४॥