सद्गुरुदेवा द्या मजला चरण सेवा ॥धृ०॥
सेवा वाटे गोड । तेणें पुरतील मनींचें कोड ।
देहबुद्धी ही जाईल द्वाड । सुटेल संसार गोवा । द्या मजला० ॥१॥
सेवेमध्ये आनंद भारी । संसारदुःख दूर करी ।
भवभय नाही तीळभरी । मुक्त करी जीवा० । द्या मजला० ॥२॥
सेवा करीतां आत्मप्रकाश । पाहुनी अज्ञानाचा नाश ।
सौख्य देतां तें अविनाश । वारीचा हा ठेवा० । द्या मजला० ॥३॥