मनीं वाटें हरीगुण गावुं गे । हरीगुण गावुं ।
हरीला पाहूं । वाटें हरीगुण गावुं गे ॥धृ०॥
नामस्मरणीं वृत्ती रंगवुनी । अखंड स्वरुपीं राहूं गे । मनीं वाटें० ॥१॥
गातां गातां भान न चित्ता । स्वरुपीं एकची होवुं गे । मनीं वाटें० ॥२॥
एकची होवुनी स्वानंदांतची । निमग्न होवुनी राहूं गे । मनीं वाटें० ॥३॥
वारी म्हणे हरी नाम हा मेवा । नित्य तयाला सेवूं गे । मनीं वाटें० ॥४॥