मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ५० वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ५० वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
ओं नमो मूळपीठ गणराजा ॥ सर्वही शास्त्रीं मिरवे तुझी ध्वजा ॥ ग्रंथकर्ते कवींच्या मतिवर अभय तुझा ॥ महाराजा मिरवसी ॥१॥
तूं मूळ ओंकारध्वनि नाद ॥ जो उल्लेखें स्वानंदकंद ॥ स्फुरला ब्रह्मीं ब्रह्मानंद ॥ मूळ बीज जीवाचा ॥२॥
ओंकार जन्मला त्रयमातृकेसी ॥ मातृका जन्मल्या पनास अक्षरांसी ॥ तेचि मिरवल्या चौंवाचेसी ॥ वाग्विलासिनी चपळ या ॥३॥
तीच चातुर्यसरस्वती ॥ शब्दरुपें प्रबळ शक्ती ॥ प्रतापरुपें बोध कीर्ती ॥ मंडण होय कवीश्वरां ॥४॥
सद्गुरुअ जो ब्रह्मरुप ॥ उल्लेख प्रकाश अमूप ॥ ज्याचें मोजतां स्वरुप माप ॥ चारी कुंठित स्वयें होती ॥५॥
गणेश सरस्वती मूळमाया ॥ ज्यां पासोन प्रकाशे स्वयें तुर्या ॥ ज्ञानविग्रहें गुरुवर्या ॥ नवल चर्या पैं ज्याची ॥६॥
उल्लेख तोचि परम पुरुष ॥ ईश्वर माया म्हणावें त्यास ॥ त्यापासोनि जगदाभास ॥ कवण्यारीतीं तें ऐका ॥७॥
माया ईश्वर जगदाभास ॥ चौथें ब्रह्म यांत वस ॥ भिन्न परी एक मूस ॥ परिसा दृष्टांतीं सांगतों ॥८॥
अकार उकार आणि मकार ॥ त्यांतच मिरवे स्वयें ओंकार ॥ तेंचि जग माया ईश्वर ॥ चौथें ब्रह्म या रीतीं वसे ॥९॥
त्रिशूळाचे तीन अंकुर ॥ दंड लोखंड धातु एक करार ॥ यावरी सूक्ष्म विचार ॥ समजणें संग चौघांचा ॥१०॥
तीन पाय चौथी फावडी असे ॥ काष्ठांत दुजी जात नसे ॥ तेवीं ईश्वर माया जगास ॥ चौथें ब्रह्म व्यापिलें ॥११॥
आकाश अवकाश पोकळ ॥ तीं नामीं गगन निर्मळ ॥ तैसा चौंपदार्थांचा मेळ ॥ एकरुपीं गोठला ॥१२॥
हें समजोनि एक ब्रह्म ॥ वदले वेदवेदांत वर्म ॥ हें रहस्य ज्यास गुरुमय ॥ निगुर्‍यास विश्वास ठसेना ॥१३॥
हाचि बोध ठसावयास ॥ महाभाग्य पाहिजे शिष्यास ॥ गुरुही पूर्ण परेश ॥ बोधकर्ता असावा ॥१४॥
प्रथम गुरु म्हणावें मायबापांस ॥ दुसरा गुरु म्हणावें सुइणीस ॥ कान फुंकोन थापटी बाळास ॥ नाहणी उजरी हस्तपाद ॥१५॥
तिसरा पंतोजी गुरु जान ॥ लेहोनि विदयांत करी निपुण ॥ चौथा कर्ममार्गीं घ्या ओळखोन ॥ जित्या मेल्या सोडीना ॥१६॥
पांचवा गुरु पाहे जन्मनक्षत्रा ॥ ठेऊनि नांवाचें लावी पिसे ॥ साहावा घाली पूजेच्या घोरास ॥ घेई दक्षिणा कानफुंकी ॥१७॥
इतुकें गुरु सहज जगांत ॥ यांपासोन कैसा जीव होय मुक्त ॥ जो करी भेदभ्रांति कल्पनातीत ॥ तो सद्गुरु मोक्षदानी ॥१८॥
मोक्षाचा पेंच ऐसा ॥ तेंही सांगतों परियेसा ॥ आपणच केला फांसा ॥ फाशाआधीन आपण जाहला ॥१९॥
फांसा पडे तैसा सोंकटया मांडित ॥ फांसा पडे तैसा आपण खेळत ॥ हार जित फशाआधीन होत ॥ लटिका फसे जीतीं ॥२०॥
तैसा फसे आपण ॥ अविदयाफांसा निर्माण करुन ॥ आपण जाहला तिचे आधीन ॥ काढा म्हणे आडकलों ॥२१॥
शुकनळिकान्यायें ॥ गुंतोनि निघावया करी उपाये ॥ तैसी ईश्वराची मौज आहे ॥ आपुल्या विसरें आपण भुले ॥२२॥
उगाचि भुलीचा भ्रम ॥ हें अविदयेचें वर्म ॥ जैसें ठेविलें गाडा नाम ॥ ऐवज गाडा दिसेना ॥२३॥
द्रुम नसे बीजा पोटीं ॥ बीज नसे द्रुमा पोटीं ॥ एकापासोन एक उठी ॥ शेखी एकांत एक नसे ॥२४॥
वासना पाहतां मन नसे ॥ मन पाहतां वासना नसे ॥ दोंहींचें मूळ कल्पना असे ॥ कल्पना म्हणजे रज्जुसर्प ॥२५॥
रज्जुसर्प जाहला नाहीं ॥ तैसी अविदयेची नवाई ॥ स्वप्नीं परस्त्री भोगिली नाहीं ॥ वीर्य मात्र द्रवलें ॥२६॥
मी बुडबुडा हेंचि पाप ॥ मी जळ हें पुण्याचें रुप ॥ स्वयें जळचि आपुलें स्वरुप ॥ दोही कल्पना मिथ्याचि ॥२७॥
मिथ्या बाजागिरी ओडंबरी ॥ तेंवी जीवास संसारघोर भारी ॥ जैसा समुद्र लाटा मारी गजरीं ॥ लाभ नसे श्रम फार ॥२८॥
घूस उकरी मातीसी ॥ प्राप्ति नसे कष्ट जीवासी ॥ निरवणुक करी घरच्या माणसांसी ॥ आपण चाले मसणखाई ॥२९॥
काळफांसे बैसले कंठांत ॥ घोर लागला जीवांत ॥ चित्त ओढी मुलांच्या हितांत ॥ आपुलें स्वहित सुचेना ॥३०॥
सहज संसारभ्रांति पाहीं ॥ मोकळाचि असतां आपुलें ठायीं ॥ जो लीन होऊनि गुंते देहीं ॥ खाय हिंदोळे लटिकेची ॥३१॥
सहज खेळतां सोंगटीं ॥ विषाद वाढला हांव पोटीं ॥ येर येरां मारिती मुष्टी ॥ लाभ नसतां फजिती ॥३२॥
आपणचि तमाखु खाई ॥ म्हणे गळां पडली सुटत नाहीं ॥ हे अविदयेची नवाई ॥ आपुले हातें आपणास फसे ॥३३॥
श्वान पाहोनि दर्पणाला ॥ प्रतिबिंब पाहोनि भुंकेला ॥ तैसा जगाचा गलबला ॥ दुजें नसतां बरळती ॥३४॥
उत्पत्ति स्थिति संहार ॥ हाही काल्पनिक व्यवहार ॥ बुडबुडा उद्भवे फुटोनि विरे ॥ नीर स्वभावें आपणचि ॥३५॥
उल्लेख जाहला हेंही बोलों नये ॥ जैसें संचलें आहे ॥ जैसें आहे तैसेंचि आहे ॥ समजोनि राहणें उगेंची ॥३६॥
चित्राच्या वारुवर स्वार जाहला ॥ तो न चलतां ठायींच बैसला ॥ तैसेंच समज गुरुकिल्लीला ॥ येणें जाणें मिथ्याचि ॥३७॥
कैंचा उल्लेख कैंची तुर्या ॥ कैंचा ईश्वर कैंची माया ॥ कैंची साम्य स्फुरणचर्या ॥ प्रणव अर्धमात्रा रज्जुसर्प ॥३८॥
समुद्राच्या पोटांतून ॥ लाटा मोजोनि काढणें ॥ साखरेची गोडी वेगळी करणें ॥ तैसी मोजणें भिन्नता ॥३९॥
जेणें भिन्न भाव कल्पिला ॥ तेणें आकाशीं खुर्पून कांदा काढिला ॥ अग्नीस हींव लागल्या ॥ काढा देणें मूर्खता ॥४०॥
धनुर्वात चढला वायूसी ॥ तेवीं होते कल्पना मानसीं ॥ खदयोततेजाच्या धरुनि काजळीसी ॥ अंजन घालणें सूर्यातें ॥४१॥
ब्रह्मउल्लेख जीव माया ॥ जैसा कापुस पेळा दोरा कुकडें चर्या ॥ किंवा सिंधू हेलावे बुदबुद लहरिया ॥ तैशा परी माया बरें पहा ॥४२॥
कडीं कुडकी मुदीं कंठी मोजा मापा ॥ तरवार कटार विळा खुरपा ॥ प्राण उदान अपान व्यान स्वरुपा ॥ अंतर काय सांगावें ॥४३॥
जग नाहीं आहे जगदीश ॥ माया नाहीं ब्रह्मींचा विलास ॥ दीप नाहीं वन्हीचा प्रकाश ॥ पट नाहीं तंतु सत्य कीं ॥४४॥
पुत्र म्हणे माझा पिता ॥ त्यासचि पति वदे कांता ॥ सून भावी मामाजी तत्वतां ॥ बंधु म्हणे अहो दादा ॥४५॥
पारसी आब म्हणे उदकास ॥ संस्कृती म्हणे आप त्यास ॥ कानडा म्हणे नीरास ॥ महाराष्ट्र उदक पाणी ॥४६॥
अविंध म्हणे रोटी देखा ॥ मानभाव म्हणे त्यास कोरका ॥ भाकर येती महाराष्ट्रमुखा ॥ परदेशी म्हणे चुपरिया ॥४७॥
ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ ॥ तोचि संन्यासी परमहंस होत ॥ इतुक्या वेशांत शोभत ॥ पुरुष एक जाण पां ॥४८॥
धोत्रें पागोटीं लुगडीं ॥ एक सुताची अवघी घडी ॥ उदंड मडक्यांची परवडी ॥ मृत्तिका सहज स्वभावें ॥४९॥
जाहली परमार्थाची सीमा ॥ पुढें दयावया नाहीं उपमा ॥ गुरुभक्तांचा हाचि प्रेमा ॥ समजोनि शाहणे वर्तती ॥५०॥
हा दांडाइताचा हात ॥ जैसी बुदबळांत प्याद मात ॥ कीं वाचकांचा पुरुषार्थ ॥ राज्य करी जीवनमुक्त ॥५१॥
ज्ञानियास अवघा एकडा ॥ अज्ञानास नुगवे कोडा ॥ पोहणार पाण्यांत जाय दुडदुडां ॥ अनाडी भेतो कडेसी ॥५२॥
भेदभेदियांस येथें भ्रांत ॥ गुरुभक्तांचा राजपंथ ॥ पुत्राचा मातेच्या स्तनावर हात ॥ इतरांस भय स्पर्शाचें ॥५३॥
खेळारी खेळती टिपरी घाई ॥ अनाडी उगाचि दुरुनि पाही ॥ अद्वैतबोधिकां दूध साई ॥ भेदिका तक्र दुर्लभ ॥५४॥
कुर्‍हाड कातर दुर्जन ॥ अखंड करिती खंडण ॥ सुयी सुहागी सज्जन ॥ खंड करिती अखंड ॥५५॥
आहे बोधाची एकचि टीप ॥ स्वयें स्वरुपीं आपेंआप ॥ अनंतधारा जळाचा व्याप ॥ हें लक्षण सुज्ञानाचें ॥५६॥
अद्वैती लक्षिती एक बुडास ॥ भेदी मोजी शाखापत्रांस ॥ यालागीं मन त्याचें फोस ॥ गुरुभक्त ना घेती ॥५७॥
अनंत घटीं एक भानु बिंबला ॥ भिन्नवादी भिन्न अनुभवी त्याला ॥ अद्वैतवादी एक लक्षी सूर्याला ॥ इतुकें अंतर दोहींस ॥५८॥
अद्वैतबोधी पाही एक देहास ॥ भेदी मोजी बहु केश ॥ हें समजणें चतुरास ॥ रस घेऊनि चोहटी त्यागणें ॥५९॥
वसविली अद्वैतसुखाची पेठ ॥ कोंदला स्वानंदाचा लोट ॥ ग्राहिक सज्जन भाग्य मोठ ॥ लेती भूषण अर्थ हिरे ॥६०॥
हें अनुभवाचें पदक ॥ गळां घालिती गुरुभक्त देख ॥ जाहले साम्राज्याचे नृपनायक ॥ विराजमान अक्षयी ॥६१॥
भरे ब्रह्म संपदा घरीं ॥ उडे ज्ञान सुढाळचवरी ॥ सत्ता एक त्रैलोक्यावरी ॥ स्वानुभव सुखसिंधू ॥६२॥
ऐसें वैभवे यावयासी ॥ पाहिज कोटिपुण्यांच्या रासी ॥ महालाभ संतसंगासी ॥ लोभें जोडी सदैव ॥६३॥
ज्या जोडीनें भव तुटे ॥ जन्ममरण दु:ख मिटे ॥ आपुल्या स्वरुपीं आप भेटे ॥ खुंटे कल्पना मनाची ॥६४॥
हृदयीं फिरे ज्ञानचक्र ॥ मिठी सुटे भेदनक्र ॥ भ्रांति पळोन सांडी वक्र ॥ सूर्यचक्रावरी कैंची निशा ॥६५॥
बध्द मुक्त ही कल्पना ॥ लय लक्ष कल्पित जाणा ॥ षट्‍चक्र अजपाची गणना ॥ तेही कल्पित पिंडांत ॥६६॥
पिंड ब्रह्मांड पूर्वपक्ष ॥ तैसेचि जाणा बंधमोक्ष ॥ या साधनीं होती जे दक्ष ॥ तेही मुमुक्षु अज्ञान ॥६७॥
ब्राह्मणें शिखासूत्र त्यागून ॥ घेतली संन्यासदीक्षा जाण ॥ दोनही देहांचीं सजलीं लक्षण ॥ आत्मा ब्राह्मण संन्यासी नव्हे ॥६८॥
आत्मा ब्रह्मचारी नव्हे गृहस्थ ॥ वानप्रस्थ न संन्यासी दिसत ॥ नव्हे परमहंस विख्यात ॥ इतुकीं सोंगें देहाचीं ॥६९॥
आत्म्यास असतां देहसंबंध ॥ तरी पडते अविदयेचे बंध ॥ आत्मा देहातीत निर्द्वंद्व ॥ सदा स्वानंदीं निमग्न ॥७०॥
आत्म्यास सुंता मुंज नसे ॥ तें देहसंबंधाचें पिसें ॥ जातिधर्माचे फांसे ॥ कैसें गोंवे शास्त्रांनीं ॥७१॥
एकाची लेंक एकाची लेंक एकाचा पुत्र ॥ नवरानवरी जाहलीं देख ॥ सोयरे संबंधी लोक ॥ कौतुक देख ममतेचें ॥७२॥
लग्नसमयीं पदराची ॥ गांठ ब्राह्मण बाधीं त्यांची ॥ मरतां सुटे गांठ पदराची ॥ कैचें नातें तुटे संबंध ॥७३॥
विसरोनि निजपति ईश्वर ॥ देहसंबंधासाठीं सेवी वैश्वानर ॥ हे अविदयेचे महा घोर ॥ भ्रांत भ्रमें भवचक्रीं ॥७४॥
पंचभूतांचे एक गोत्रज ॥ उंच नीच मिरवी पैज ॥ हें भ्रांतीचें उदंड बीज ॥ किती चोज सांगावें ॥७५॥
अवघी एक स्वरुपाची रचना ॥ अविदया माया जगकल्पना ॥ कल्पित जीव शिवप्रपंच रचना ॥ वांझ जांवायाची संतती ॥७६॥
न धरुनी शास्त्राची भीड ॥ अनुभव बोलतों उघड ॥ जें करावें तें भ्रांति गडबड ॥ निवांत राहणें ब्रह्मदशा ॥७७॥
बुडबुडा जळ शोधावयाचे उपायीं ॥ फिरतां पडे भंवर्‍याचे डोहीं ॥ तैसी जीवाची नवाई ॥ साधनकचाटी घोरांत ॥७८॥
कल्पित ब्रह्मांडाची रहाटी ॥ कल्पित साधनकोटी ॥ जैं निर्विकल्पदशा उठी ॥ तेव्हां मिठी स्वयें स्वरुपीं ॥७९॥
अवघें कोंदलें ब्रह्म एक ॥ म्हणावया दुसरें नसे देख ॥ हें समजोनी सनकादिक ॥ ब्रह्मानंदें डुल्लती ॥८०॥
बुडबुडा पाहे आपणाकडे ॥ मीच सिंधु बोध घडे ॥ उडालें साधनांचे सांकडें ॥ करी कल्लोळ आपणांत ॥८१॥
यारंगें रंगोनि मुनिजन ॥ संत साधु सखे सज्जन ॥ आपुलें करुनियां कल्याण ॥ गुरुकृपें विराजती ॥८२॥
ज्ञानियांचें हेंचि लक्षण ॥ जनी पाहावा जनार्दन ॥ पिंड ब्रह्मांड संपूर्ण ॥ प्रकाशघन चैतन्य ॥८३॥
जळ म्हणे मी लहरी ॥ आशाविषादांचा चढला कैफ भारी ॥ इतुक्यांत जन्ममरणांची फेरी ॥ पडली सत्य मानावें ॥८४॥
भवर्‍यांत प्राणी पडला ॥ तरी काय जातीवेगळा जाहला ॥ एके ठायीं खळबळला ॥ इतुक्यांत दुजा भाव कल्पावा ॥८५॥
पाहतां लोहदर्पण ॥ पुढें उजळ मागें मलिन ॥ दोहीं अंगें धातु व्यापून ॥ अखंड लोखंड एकचि ॥८६॥
तरवार म्हणी मी लोखंड ॥ ना म्हणे तर काय होय दगड ॥ तैसा जीवाचा असे कोड ॥ ना ब्रह्म म्हणतां भिन्न जाहला ॥८७॥
श्वान वारु खंडेराव ॥ अवघा सुवर्णाचा गौरव ॥ पटाचा केला भाव ॥ तर काय तंतू बुडाला ॥८८॥
चंद्र आणि चांदणें ॥ सूर्य आणि रविकिरणें ॥ गोडी आणि गूळ जाण ॥ भिन्न काय कल्पावें ॥८९॥
जगचि आहे जगदीश ॥ मुक्तांचा मुक्तिपदींच विलास ॥ हा ज्ञानाचा कळस ॥ ब्रह्मैव ब्रह्म सर्व ही ॥९०॥
ही ज्ञानाची मस्ती तेव्हां घडे ॥ सद्गुरु कृपा पूर्ण जोडे ॥ स्वानंदाचा पूर चढे ॥ उडे कल्पना भवभ्रांती ॥९१॥
तेचि सद्गुरुचे अंखित ॥ आत्मबोधें ज्ञानभरित ॥ सदा स्वानंद उन्मनींत ॥ सुलीन दशा जयांची ॥९२॥
चिदाकाश जेवीं गगन ॥ तेवीं आपण विराजमान ॥ स्वयंप्रकाश परिपूर्ण ॥ आपीं आप कोंदलें ॥९३॥
ही पध्दति श्रीगुरुची ॥ पूर्ण कृपा मुनींद्रस्वामीची ॥ वृत्ति रंगली शहाची ॥ जाहला सफळ संसार ॥९४॥
काय अर्पूं गुरुदेवा ॥ पूज्य पूजक तूंचि बरवा ॥ कोणत्या करुं गौरवा ॥ गौरवी गौरवा तूं एक ॥९५॥
एकीं अनेक अनेकीं एक ॥ हें कौतुक तुझें देख ॥ गुरुशिष्यांचा विवेक ॥ उभयप्रसंगीं तूंचि कीं ॥९६॥
आतां वदलीं जें जें वाणी ॥ वाचा वाग्विलासिनी ॥ कळा चातुर्य शब्दखाणी ॥ मिरवसी अवघा तूंचि कीं ॥९७॥
तुज नमावें प्रेमभावें ॥ नयनीं तूंचि स्वयमेव ॥ अंतर बाहेर देवी देव ॥ नवल लाघव हें तुझें ॥९८॥
आतां मजमाजीं जें गा मीपण ॥ तेंही तूंचि गुरु पूर्ण ॥ जें बोलिलों शब्दसुमन ॥ तेंही अर्पिणें तुजलागीं ॥९९॥
तुझें कृपेनें ग्रंथरचना ॥ करुनि मिरविलें भूषणा ॥ अनुभव अलंकार नग नाना ॥ शोभा शोभलों तव कृपा ॥१००॥
सद्भावें तूतें शरण ॥ करितों अनन्यभावें नमन ॥ उरलें हेंचि साधन ॥ नाम तुझें आठवी ॥१॥
नमो निर्विकार निरंजना ॥ नमो परात्पर भवमोचना ॥ नमो आदिनारायणा ॥ करुणाघना तुज नमो ॥२॥
नमो जगपाळका श्रीहरी ॥ नमो जीवाचिया आदिजीवा नमो श्रुतिसागरगौरवा ॥ देवाधिदेवा तुज नमो ॥४॥
नमो योगियांची समाधी ॥ नमो देवाची मूळबुध्दी ॥ नमो ज्ञानधनाचा धननिधी ॥ सुधेचा सुधाब्धी तुज नमो ॥५॥
नमो जगदीशा जगज्योती ॥ नमो परेशा परब्रह्ममूर्ती ॥ नमो सत्ताधारी कैवल्यमूर्ती ॥ भक्तपति तुज नमो ॥६॥
नमो सर्वांस आदिमोक्षा ॥ नमो अतिकटाक्षा दक्षा ॥ नमो नसे तुज अपेक्षा ॥ अलक्ष लक्षा तुज नमो ॥७॥
नमो सर्व सूत्र तुझे हातीं ॥ नमो प्रताप अद्भुत शक्ती ॥ नमो संसारश्रमिकां विश्रांती ॥ कृपामूर्ती तुज नमो ॥८॥
नमो जीवचकोरचंद्रा ॥ नमो शांतुसुखसमुद्रा ॥ नमो समता लाविसी मुद्रा ॥ देवनरेंद्रा तुज नमो ॥९॥
नमो धीर गंभीर श्रीरंगा ॥ नमो अचळ अढळ अभंगा ॥ नमो हृदय अब्जिनीभोगभृंगा ॥ अनंत सौख्या तुज नमो ॥११०॥
नमो प्रेमळाच्या प्रियकरा ॥ नमो योगमायेच्या निजवरा ॥ नमो काळचक्रावरी लाविसी तुरा ॥ भक्तमाहेरा तुज नमो ॥११॥
नमा फेडिसी भेदकल्या ॥ नमो चौर्‍यांशी चुकविसी खेपा ॥ नमो संतहृदयीं ज्ञानदीपा ॥ मायाबापा तुज नमो ॥१२॥
नमो श्रीगुरुमुगुटमणी ॥ अगाध अपार तुझी करणी ॥ जे जीव तरती तुझिया स्मरणीं ॥ त्यांस उन्मनी सुखशय्या ॥१३॥
तुम्हीं पाहिल्या कृपादृष्टीं ॥ जीवाच्या उध्दरती अनंत कोटी ॥ बैसे सायुज्यपदाचें आनंदपदीं ॥ अक्षयी भोगी साम्राज्य ॥१४॥
याचसाठीं गुरुसेवा ॥ करणें लागे सभाग्यजीवा ॥ अभाग्यास गुरुच नाहीं ठावा ॥ मग विसावा कैंचा त्यास ॥१५॥
सद्गुरुवांचोनि जे शाहणी ॥ जैसी चाळक व्यभिचारिणी ॥ दुधास दीधली हिंगाची फोडणी ॥ काय रुची मग लागे ॥१६॥
चंद्रामृताचे तुषार ॥ घेऊं जाणे चकोर चतुर ॥ त्या अनुभवास दर्दुर ॥ कैसा प्राप्ती पावेल ॥१७॥
सेविती ज्ञानफणसाचे आंतील गरे ॥ त्या तृप्तीनें वासना पुरे ॥ आत्मरमणीं कामना पुरे ॥ पोट भरे आनंदें ॥१८॥
जे विवेकमतीचे राजहंस ॥ स्वीकारिती मुक्तीचे मुक्ताफळघोंस ॥ ते काय वायसा ऐसे ॥ अनामिक ढोरें इच्छिती ॥१९॥
ज्याचें पाऊल अनुभवपंथीं ॥ संगें श्रीगुरु मनोरथीं ॥ त्यागिती अर्थजिज्ञासा अर्थार्थी ॥ सेविती भक्ती चौथी जे ॥१२०॥
तोचि पुरुषार्थी नर गंभीर ॥ जयानें जिंकिला संसार घोर ॥ बैसला मोक्षपदावर ॥ छत्र शिरीं गुरुकृपा ॥२१॥
ललाटपट्टाचीं अक्षरें ॥ पुसों येती काय आपुल्या करें ॥ ती रेषा मोडणार शिरजोर ॥ गुरु एक समर्थ ॥२२॥
सांडोनि आश्रय श्रीगुरुचा ॥ दास होय कुटुंबाचा ॥ शोक संताप श्रमांचा ॥ बोजा वाहे मस्तकीं ॥२३॥
सोसी कुटुंबाची जांचणी ॥ उदरपोषणाची कांचणी ॥ अंतीं देती मोकलोनी ॥ एकला वसे मसणवटीं ॥२४॥
अस्थि मांस चर्म नाडींचा ॥ आंत सांठा विष्ठा मूत्र कफ पित्तांचा ॥ त्या देहाचा लोभ धरी कच्चे मतीचा ॥ नव्हे साचा गुरुभक्त ॥२५॥
वय वेंचिती जे विषयध्यासनीं ॥ ना आवरे मन चपळपणीं ॥ चिंतासमुद्रीं जाती बुडोनी ॥ शेवटीं जांचणी यमाची ॥२६॥
जयानें निर्मिलें त्यास विसरलें ॥ विकार प्रपंचीं गुंतले ॥ काम क्रोध मद मत्सरीं वेष्टिले ॥ तापत्रयें संतप्त ॥२७॥
पदरीं नसे पुण्याचा लेश ॥ पापग्रंथीं संचली असे ॥ मीपणाचें लागलें पिसें ॥ जाय आयुष्य दुर्लभ ॥२८॥
प्रपंचकर्दमीं बुध्दि आडकली ॥ चौर्‍यांशींची धडक बैसली ॥ शिरीं जरा येउनि कडकडली ॥ मृत्यु लपटे त्यावरी ॥२९॥
ऐसे चपेटे कर्मांचें ॥ भोगणे घडे गर्भवासाचे ॥ जीव जाऊन त्यांत पचे ॥  कचक्यांत मग पडे ॥१३०॥
पुढें जाणोनि अधोगती ॥ शाहणे निघाया उपाय करिती ॥ ज्यांत उगवे मोहाची गुंती ॥ तें कर्म आचरती पवित्र ॥३१॥
कवण त्याग कर्मांचें काय फळ ॥ त्याचें शोधोनि पाहिजे मूळ ॥ तें फळ अर्पीं पद अचळ ॥ त्या कर्मासी झोंबावें ॥३२॥
सौख्य भोगून देईन पतन ॥ त्या कर्माचा त्याग करणें ॥ हें समजोन शाहणे ॥ निष्काम कर्मीं वर्तती ॥३३॥
निष्कामाचें सुख अचल ॥ कामनिक देई दु:ख प्रबल ॥ जैसा बचनाग मुखीं गौल ॥ पोटीं होय हुताशन ॥३४॥
श्वान मैथुनीं सुखी अडकल्या दु:ख ॥ वनिताभोगीं सुखावे अंतीं तिडक ॥ द्रव्य सांपडल्या तस्करा हरिख ॥ सांपडल्या दु:खाचे डोंगर ॥३५॥
वेश्यावसनाची पहिली गोडी ॥ दु:ख भरल्या मग चरफडी ॥ तैसी कामनिकाची परवडी ॥ आधी सुख मग दु:ख ॥३६॥
अथवा मैंदाची मार्गी संगती ॥ किंवा परद्वारींची लबाड प्रीति ॥ जैसी बदरीफळाची जाती ॥ आंत कठिण वर मऊ ॥३७॥
स्वयंपाक करितां श्रम आधीं ॥ भोजनीं तृप्त होय बुध्दी ॥ तैसी निष्कामाची सिध्दी ॥ स्वानंदपदवी भोगवी ॥३८॥
कामनिक वासना मोहळमाशीची ॥ संग्रहीं पोळी करी मधाची ॥ बनकर झोडोनि खाई रुची ॥ मक्षिकाकपाळीं भणभण ॥३९॥
वाळवी श्रमोनि करी वारुळाशीं ॥ सर्प घरधणीं होय घरासी ॥ तैसा कर्ता लोभसंग्रहासी ॥ अधिकारी कुटुंब आपण मसणवटीं ॥१४०॥
चारी प्रहर दिवसां वणवण करी ॥ स्वप्नीं चार प्रहर फिरे फेरी ॥ जीवांस विसांवा क्षणभरी ॥ वासनेमुळें होईना ॥४१॥
संसार अवघा वाजेगिर ॥ जैसा गारुडियाचा हुनेर ॥ किंवा शिमगियाच्या खेळावर ॥ खुष होती माणसें ॥४२॥
काय संसार हिजडीचा ॥ काय रोजगार कुंटणीचा ॥ काय जन्म कातकाडयांचा ॥ काय कैकाडयाची शुचिता ॥४३॥
काय वाचा चहाडाची ॥ काय पगडी विसनीची ॥ काय छाया हिंवराची ॥ काय झाड अगियाचें ॥४४॥
मनुष्यासारिखा जन्म पावोन ॥ त्याचें अंगीं कुलक्षण ॥ मग चंदनाचे गुण ॥ कोणत्या जन्मीं येतील ॥४५॥
पाणी जाय सर्वांत मिळोन ॥ तैसा पाहिजे सज्जन ॥ जो सर्वांस प्रिय होऊन ॥ वर्तें जैसी शर्करा ॥४६॥
धैर्य असावे अचाट ॥ पृथ्वी ऐसें घनवट ॥ जैसें धार्मिकाचें नेट ॥ हरिश्चंद्रासारिखें ॥४७॥
पुण्यवंत गेले मुक्त होऊन ॥ कीर्तिघोषें भरलें त्रिभुवन ॥ विश्वामुखीं मिरवे भूषण ॥ वर्णितां पुराणें पुरुषार्थ ॥४८॥
ऐसें वैभव यावया अंगीं ॥ संत उपदेश करिती जगीं ॥ बरवे रंगा आत्मरंगीं ॥ सांडावी उगी उपाधी ॥४९॥
प्रारब्धरेषा समजोन ॥ प्राप्तीं अप्राप्तीं असावें समाधान ॥ वाटसरु निश्चय मानून ॥ संसारांत वागावें ॥१५०॥
येथें वस्तीचें असे पेण ॥ मग सायास काय करुन ॥ राज्य टाकोनि सेविलें वन ॥ काय शहाणे ना होती ॥५१॥
चांगले घरीं पाहुणे आले ॥ आदर घेऊनि उठोन गेले ॥ ऐसें पाहिजे समजलें ॥ विचारवंती सुजाणीं ॥५२॥
कोणी कोणाचा नव्हे सोबती ॥ एकटें जाणे लागे पंथीं ॥ मग कां करावी मागें गुंती ॥ काळफांसे ज्यामधीं ॥५३॥
जाईल ब्रह्मांड लयांत ॥ चंद्रसूर्यहरिहरां सहित ॥ तेथें जीवाची काय मात ॥ तगावया मृत्यूपुढें ॥५४॥
मृत्यूची चपेट अधिक ॥ जाती एका मागें एक ॥ संहार होतसे लोक ॥ भला बुरा तगेना ॥५५॥
मृत्यूची चहूंकडे लाग आग ॥ मध्यें सांपडे जीवपतंग ॥ त्यांतून निघावया मार्ग ॥ कोठें ठाव दिसेना ॥५६॥
मृत्यूचीं पसरलीं भोवतीं जाळीं ॥ आडकलीं जीव मासोळी ॥ काढावया न दिसे बळी ॥ तळमळती शोकसंतापें ॥५७॥
ऐसे कहर पाहून ॥ मग कां बैसावें डोळे झांकून ॥ आयुष्य जातें पळपळ जाण ॥ त्याचा खेद कां न कीजे ॥५८॥
द्रव्य दारांची प्रीती भारी ॥ जाहले ईश्वरीं पाठमोरी ॥ बुडाले चौर्‍यांशी शोकसागरीं ॥ कोण त्यांसीं काढितो ॥५९॥
एक एक योनी माझारी ॥ गर्भवास संकट भारी ॥ पुन्हां जन्ममृत्यु शिरीं ॥ विसावा क्षणभरी असेना ॥१६०॥
श्वास घालावया नाहीं अवकाश ॥ एवढे दु:खाचे क्लेश ॥ कंठी बैसती काळफांस ॥ सुखाचा लेश मिळेना ॥६१॥
अफाट काळाची चपेट कडकी ॥ क्षणाक्षणा बैसे हृदयीं धडकी ॥ मग फुटे देहाची मडकी ॥ कां लोभिष्ट त्या होणें ॥६२॥
देह विकारांचे मूळ ॥ देह कफ वातांचें स्थळ ॥ देहा ऐसी कुश्चळ ॥ दुजी वस्तु असेना ॥६३॥
देहांत रोगांची सांठवण ॥ देहांत चिंतेचा खजिना जाण ॥ निमाल्या कुडी बीभत्स चिन्ह ॥ लक्षितां दिसे भ्यासुर ॥६४॥
देह अस्थींचा पिंजरा ॥ उद्वेगाचा कोठारा ॥ विष्ठामूत्रांचा थारा ॥ लाळ शेंबुड थुंका खांकर ॥६५॥
गंधर्व नगरीची दुर्ग थोर ॥ वायु स्पर्शतां वितळे लौकर ॥ तैसा शरीराचा विकार ॥ केव्हां पडेल कळेना ॥६६॥
ग्रास घेतां लागे उचकी ॥ इतुक्यामध्यें काळ उचकी ॥ धक्का लागतां बैसे दचकी ॥ भय वाटे मरणाचें ॥६७॥
घडी घडी पळ पळ काळ जपतो ॥ जैसा बिडाल मूषकीं टपतो ॥ हें समजोन प्राणी उन्मत्त होतो ॥ फजित पावतो पुन: पुन: ॥६८॥
तेजीस इशारत तट्टास फोक ॥ सहज बोलती जाणते लोक ॥ सुमती लागे विवेक ॥ कुमतीस कठिण विष कीं ॥६९॥
भल्याचा विवेक भले घेती ॥ जैसा शर्करा पयांत मिळती ॥ केशर कस्तुरीची जाती ॥ भूषण देती लेणियां ॥१७०॥
हंस बैसला बकाचे पंक्तीं ॥ काय संतोष पावे चित्तीं ॥ मयूरनृत्याची गती ॥ काय साधेल वायसा ॥७१॥
साधु बोलती नीतीस ॥ तो भल्यालागीं उपदेश ॥ कुमतीस वाटेल त्रास ॥ जेवीं सुगंध सूकरा ॥७२॥
गर्दभास केशराचे लेप दिले ॥ त्यास उकर्ड्याचे डोहळे ॥ तैसें खळासि ज्ञान शिकविलें ॥ तो करी टवाळी परतोन ॥७३॥
सर्पालागीं दुग्धघट पाजिला ॥ पोटीं जातां विष गरळा ॥ बोध करितां कुमतीला ॥ निंदी फिरोन कर्त्यासी ॥७४॥
सर्पदंश जाहला ज्यासी ॥ चारुं नये शर्करेसी ॥ यापरी दुर्जनासी ॥ हित उपदेश करुं नये ॥७५॥
विषबाधा ज्यास दारुण ॥ त्यासि विष्ठा दयावी घोळोन ॥ ज्वर अंगीं बाणल्या जाण ॥ त्यासि पय पाजूं नये ॥७६॥
खरपृष्ठीं ठेवूं नये जीन ॥ टोणग्यावर काय अंबारी घालोन ॥ श्वानास काय होय चंदन ॥ मर्कटास श्रीफळ देऊं नये ॥७७॥
शिवरात्र व्रत धरी कोल्हा ॥ मढें उकरी फराळाला ॥ ज्याचे अंगीं जो स्वभाव आला ॥ तो त्यासी सुटेना ॥७८॥
यासाठीं क्षोभल्या दुर्जन ॥ उगेंच असावें भल्यान ॥ दुर्योधनाचा स्वभाव देखोन ॥ साहता जाहला धर्ममूर्ती ॥७९॥
ज्यास पाहिजे परमार्थधन ॥ त्याणें घ्यावें सोसून ॥ वाद घालतां क्षोभे मन ॥ संतापे वृत्ति आपुली ॥१८०॥
यालागीं शांतीचें भूषण ॥ वागविती संत सभाग्य पूर्ण ॥ दुर्जन निदेचे बाण ॥ त्यांस काय करतील ॥८१॥
निंदा पाप महादारुण ॥ कोणाची करुं नये भल्यान ॥ सर्वास मानावें सज्जन ॥ त्यांत कल्याण आपुलें ॥८२॥
शूरपणाचें हेंचि फळ ॥ गाळावा अभिमान प्रबळ ॥ सर्वांस बोलावें मंजुळ ॥ त्यांत बरें हरि करी ॥८३॥
आपण असल्या निष्कपट ॥ कुबुध्दीचें होय तळपट ॥ जैसा भजनाचा उठल्या लोट ॥ पापाचा ठाव उरेना ॥८४॥
सर्वांभूती पहावा भगवंत ॥ हेंचि ईश्वराचें मनोगत ॥ या बोधें साधुसंत ॥ मुक्त असती संसारीं ॥८५॥
सोडोनि निंदा स्तवन ॥ जनीं पहावा जनार्दन ॥ हे सज्जनाचे श्रेष्ठ गुण ॥ ज्यांत संतोषे जगदात्मा ॥८६॥
ऐकोनि मारुतीची आरोळी ॥ जीवा भिऊन पळे भद्रकाळी ॥ तेथें तगावया भूतावळी ॥ शक्ति काय पामरां ॥८७॥
तेवीं धरितां अद्वैतबोधाची सिध्दी ॥ गळून जाय भेदाची बुध्दी ॥ ज्यांपासी वसे ज्ञाननिधी ॥ ते सभाग्य बोलिजे ॥८८॥
निंदय वंदय हें वचन ॥ पूर्वपक्ष बोलिलों जाण ॥ अज्ञान जनां कारण ॥ हितोपदेश भल्याचा ॥८९॥
आवघा आत्मा एक ॥ गुणभेदें दिसे वेगळिक ॥ समजेल तो चतुरांचा नायक ॥ नगीं हेम एकची ॥१९०॥
जगाच्या हितासाठीं ॥ मांडिली अनुभवाची कसोटी ॥ जीवांच्या उध्दराव्या कोटी ॥ हे पुरुषार्थ संतांचे ॥९१॥
परउपकारासाठीं सिध्दांतबोध ॥ केला सोलींव स्वानंद ॥ ज्यांत कोंदला ब्रह्मानंद ॥ जिरे फुंद द्वैताचा ॥९२॥
एक एक प्रसंगांत साचा ॥ रस ओतीला अनुभवसुखाचा ॥ कल्याण होय श्रोतियांचा ॥ ठाव मनाचा पुसोनी ॥९३॥
जिंकिला संसार घोर सिंधू ॥ ज्ञानें प्रकाशिला निजानंदू ॥ तोचि केला सिध्दांतबोधू ॥ तोडिला कंदू कल्पनेचा ॥९४॥
ग्रंथाचा पाहिल्या आदिअंत ॥ अर्थ बिंबल्या जीवन्मुक्त ॥ यास साक्ष श्रीगुरुनाथ ॥ जो समर्थांचा शिरोमणी ॥९५॥
सिध्दांतबोध तारक नौका ॥ गुरुनें निर्माण केली देखा ॥ निर्भय यांत बैसल्या सुखा ॥ उणें काय त्या पुरुषा ॥९६॥
सिध्दांतबोध शोधिल्या सज्जनीं ॥ लाधे परमार्थाची धणी ॥ बैसेल मोक्षाचे सिंहासनीं ॥ साम्राज्यीं विराजे ॥९७॥
अनुभवें गौरविला ग्रंथ ॥ सुफळ जाहला मनोरथ ॥ येऊनि जननीच्या उदरांत ॥ सार्थक जाहलें गुरुकृपें ॥९८॥
लाधलों संतांचे चरणरज ॥ सांपडलें गुरुकृपेचें गुज ॥ भली जाहली मौज ॥ जोडिला देव भाग्यानें ॥९९॥
ओंकार बीजीं लावूनि लक्ष ॥ त्याचा विस्तारला वृक्ष ॥ आतां फळें तोचि मोक्ष ॥ अनुभव फुलीं फुलला असे ॥२००॥
आपुले शक्तीप्रमाणें ॥ केले ग्रंथाचें लेखन ॥ गंगोदक गंगेस अर्पणें ॥ तैसें लिहिणें हें माझें ॥१॥
मूळ बीज ओंकार ध्वनी ॥ त्यापासोनी वेद शास्त्र पुराणांची ठेवणी ॥ अक्षर मातृका काना वेलांटी मिळोनी ॥२॥
त्यांत व्यंजन विराजे ॥ ग्रंथ शोभे अक्षरसुमनें ॥ अक्षर शोभे कविमुखानें ॥ कवि शोभे अनुभवानें ॥ अनुभवीं शोभा ज्ञानाची ॥३॥
ज्ञान म्हणिजे जाणीवकळा ॥ ज्यांत आत्माचि प्रकाशला ॥ जो सर्वांघटीं बिंबला ॥ आवरुन वागवी देहासी ॥४॥
हुडकूं जातां न दिसे भूमंडळी ॥ ज्ञानें पाहतां हृदयकमळीं ॥ कृपा करी गुरुमाउली ॥ स्वयें ब्रह्म आपणाचि ॥५॥
जडीं अजडीं वस्तु घनवट ॥ कोंदली दशदिशा दाट ॥ शब्द गीत हालवी होंट ॥ याहून प्रचीत कोणती ॥६॥
तरंग कल्लोळ कीर्ति सागरीं ॥ म्हणती आम्ही चुकलों जळास दूरें ॥ तैसी जीवांची नवलपरी ॥ भेटवा म्हणती देवास ॥७॥
हृदयीं स्फुरें जे स्फूर्ती ॥ त्यांतचि जाणीवकळा वर्तती ॥ तीच आत्मयाची ज्योती ॥ जाणती सुमती धन्य जे ॥८॥
याहून उघड बोलावें ॥ तरी संत क्षोभतील स्वभावें ॥ म्हणोनि मर्यादेचे शिवे ॥ स्फूर्तितुरंग थोकला ॥९॥
हिर्‍यालागीं जोहरी परिक्षी ॥ तैसा ज्ञानी आत्मा लक्षी ॥ जैसा चकोर पक्षी ॥ सेवी चंद्र अमृत ॥२१०॥
मुंगीचा मार्ग उमगे मुंगी ॥ अनुभवपंथें जाती योगी ॥ गति पाउलांची तुरंगीं ॥ ते रासभा शोभेल कीं ॥११॥
हंसाची क्रिया नये वायसा ॥ धारेवर नीट चढों जाणें मासा ॥ हनुमंताचें बळ राक्षसा ॥ नये अंगवण पामरा ॥१२॥
चंदनाचे गुण हिंगणा ॥ लसुणीं कापुराचा सुवास जाणा ॥ सिंहाचा पुरुषार्थ श्वाना ॥ बाभुळेस फुलें मालती ॥१३॥
कस्तूरीचा गुण कोळशाचे अंगीं ॥ शांति यावी काय भुजंगीं ॥ इंद्रियजित शुक योगीं ॥ ती दशा लाधे कीं कामिकां ॥१४॥
गजाचे स्वभाव काय टोणग्या ॥ मर्दाचें मैथुन सांगे मेंग्या ॥ गोरखीची सिध्दि इतर योग्यां ॥ लांडगियास क्रिया गंडभैरवी ॥१५॥
कोयाळ कंठ सम दर्दुरवाणी ॥ सरस्वतीपुढें कुंटण शहाणी ॥ पतिव्रतेचें वैभव व्यभिचारिणी ॥ कैसे शोभेस पावेल ॥१६॥
शुचिष्मंतापुढें कातकाडी ॥ आचार निष्ठा योग्य कैकाडी ॥ पंडित पंक्तींत मिरवे गुरगोडी ॥ काय हिजडी सुवासीण ॥१७॥
भोरपीस केलें दान ॥ तें काय हरिश्चंद्रासमान ॥ धर्मकसोटीचें भूषण ॥ दुर्योधनासे शोभेल ॥१८॥
दुर्जन आणि सज्जन ॥ जैसी हिंगण आणि चंदन ॥ परंतु थोराचे संगें जाण ॥ गुण पालटे नीचाचा ॥१९॥
वोहळ गंगेस मीनला ॥ तो पूर्वदिशा मुकला ॥ चंदनसंगें सुगंध जाहला ॥ द्रुम देवा मस्तकीं ॥२२०॥
लोह स्पर्शतां परिसासी ॥ मग काळिमा कैंची त्यासी ॥ चढे श्रेष्ठ मोलासी ॥ भूषण होय लेतियां ॥२१॥
यालागीं संतांचीं पाउलें ॥ धरितां संतपण अंगीं येईल ॥ जगीं मान्यता पावेल ॥ अंतीं बैसेल मोक्षपदीं ॥२२॥
बुध्दिबळें संत शहाणे ॥ संसार जिंकिला पुरुषार्थानें ॥ या जगांत लावून निशाणें ॥ कीर्तिघोष मिरवलें ॥२३॥
तोडावें संसारदु:खास ॥ जगीं जोडावा जगदीश ॥ उध्दरावें आपुल्या जीवास ॥ याहून पुरुषार्थ कोणता ॥२४॥
ज्या रीतीनें भेटेल ईश्वर ॥ तोचि उपाय करिती चतुर ॥ इतर व्यसनीं व्यर्थ नर ॥ फसती मीन जेवीं गळीं ॥२५॥
उगीच शुकनळिकान्यायें ॥ विश्व लटिकेंच गुंतलें आहे ॥ बाळ आरशांत आपणा पाहे ॥ झोंबों जाय कौतुकें ॥२६॥
मुक्त असोनि जगबध्द ॥ पडला अविदयेचा बंद ॥ घेऊन देहबुध्दीचा फुंद ॥ भेदकल्पनेंत बुडाले ॥२७॥
जात्याभिमान कर्माभिमान ॥ त्यावर चढला मताभिमान ॥ जैसा बुडाला पाषाण जळांत जाऊन ॥२८॥
बंदीं पडला त्यास सुटतां नये ॥ दुसरा सोडील तेव्हां मुक्त होये ॥ तैसी जीवाची गति आहे ॥ गुरुकृपेनें मुक्तता ॥२९॥
कोणी एक जळांत पाहोनि आपणा ॥ म्हणे मज धांवा काढा रे बुडतों जाणा ॥ स्वप्नीं आलिया पाहुणा ॥ पाहुणेर करणें जागृतीस ॥२३०॥
आप्त म्हणवूनि कवटाळी सखी ॥ मेल्यावर तीच नव्हेत पारखी ॥ जित्यामेल्यांच्या नव्हति ओळखी ॥ हें तो निश्चय घडेना ॥३१॥
कोण कोणाचीं नव्हेत सोबती ॥ संसार बाजाराचे सांगाती ॥ वाटसरु वृक्षा खालते बैसती ॥ उठल्या दोघे दोहींकडे ॥३२॥
पति निमाल्या दुसरा करिती ॥ त्याचाच घरोबा बोडवती ॥ तोही निमाल्या तिसरावरिती ॥ तोचि आडनांव वागवी ॥३३॥
ज्या योनींत जीव जन्मला ॥ तोचि मोह त्यासि वाढला ॥ तेथूनि दुसर्‍या योनींत गेला ॥ तेव्हां ममता तैसीच धरी ॥३४॥
कोणी कोणाचे न होती ॥ लटकी होतसे गुंतागुंती ॥ जैसी मुलें खेळ खेळती ॥ होती विहिणी बाहुलीच्या ॥३५॥
गुजराथी मरणार्‍याचे मेळ्यानें ॥ मोलें घालिती रडयाकारणें ॥ ऊर पिटून वोस बोलणें ॥ नयें आसूं डोळ्यावरी ॥३६॥
वेश्येचे बहु भ्रतार ॥ कोणासी सती निघणार ॥ सोंगांत स्त्रीपुरुष होती नर ॥ काय खरी नांदणूक ॥३७॥
हुतुतू खेळतां गडी मेला ॥ इतुक्यांत काय सूतक पडिला ॥ एकाचा गडी उठला ॥ कोण वांटी शर्करा ॥३८॥
यापरी संसार अवघा लटिका ॥ जैसा सोंगांत घुसारी देखा ॥ किंवा स्वप्नींचा प्रवास देखा ॥ जागृतीचा लटका कामा नये ॥३९॥
हें जगास कळोन डोळे झांक्ती ॥ मदाध भ्रांत मती ॥ लोभ आशा कामासक्ती ॥ फसती उमज सुचेना ॥२४०॥
सहस्त्रांमाजी कोणे एक ॥ विवेकी निघे सभाग्य देख ॥ जिंकोन भवरोग देख ॥ विजयी होत काळचक्रीं ॥४१॥
जे अनुभवाचे देख मुगुट ॥ नांदती भक्तीचे पेट ॥ भाविकां लावित नीट ॥ पाट सायुज्यमुक्तीच्या पंथें ॥४२॥
त्यासीच म्हणावें पराक्रमी ॥ जे सावधान अंतर्यामीं ॥ निश्चयो बैसला गुरुपादपद्मीं ॥ ध्रुवर जैसा ढळेना ॥४३॥
दैवी संपत्तीस तेचि समर्थ ॥ ज्यांपासी वसे चौथा पुरुषार्थ ॥ सर्व सुखांची जात ॥ त्यांपासी वहातसे ॥४४॥
जेणें जोडिला पद्मनाथ ॥ ज्यांचें जिणें जगीं सुलभ ॥ नरदेहीं आल्या हाचि लाभ ॥ मोक्षपदीं जो बैसे ॥४५॥
काय करावें दांभिक भजन ॥ देव ना संसारज्ञान ॥ दोहींकडे नागवण ॥ स्त्री ना पुरुष षंढसा ॥४६॥
पावकासंगें पाघळे लाख ॥ वायु स्पर्शतां कठिण देख ॥ कीर्तनीं ओधवे प्रेम अधिक ॥ उठतां शून्य हृदय ॥४७॥
पालथा पडे संसारासी ॥ म्हणे जातों पंढरीसी ॥ भिडेस्तव धाडी बायकोसी ॥ आपण घर सोडीना ॥४८॥
गुरुदक्षिणा देतां दडे ॥ व्यवहारीं उदंड द्रव्य बुडे ॥ कीर्तन करीना कधीं कोडें ॥ जावया अनुकूळ पडेना ॥४९॥
ऐसे शतमूर्ख ॥ जाहले कुटुंबाचे सेवक ॥ निमाल्या भोगिती नरक ॥ चौर्‍यांशींची यातना ॥२५०॥
पदरीं द्रव्याचा सांठा ॥ अंगीं भरे मीपणाचा ताठा ॥ न जाय साधूंच्या वाटा ॥ करी चेष्टा भल्यांच्या ॥५१॥
उगाचि थोरपणें माजे ॥ संतांचें पायां पडतां लाजे ॥ मुलांस मिठाई चारी चोजें ॥ देवा फूल वाहीना ॥५२॥
भिडेनें दांभिक गुरु केला ॥ त्याचा मानी कंटाळा ॥ जरी मातबर सोयरा भेटला ॥ खर्चिती दिवाळें निघेसें ॥५३॥
हें सांगावयाकारणें ॥ जयाचें कौतुक वाटे जाणें ॥ ज्यानें होय कल्याण ॥ तो विचार त्या कैंचा ॥५४॥
आयुष्य गेलें हातोहातीं ॥ पुढें नरदेहाची माती ॥ यमजांचणीची फजिती ॥ किती सोसी निर्लज्ज ॥५५॥
हें समजोन धरा अनुताप ॥ नाच धरावें दुष्ट पाप ॥ चुके चौर्‍याशींची खेप ॥ व्हावें तद्रुप स्वरुपीं ॥५६॥
जीव हा परमेश्वराचा अंश ॥ त्यास भजतां लाभ विशेष ॥ स्वधर्म म्हणावें त्यास ॥ इतर कर्म तें परधर्म ॥५७॥
तरंग मी जळ म्हणतां धर्म घडे ॥ तरंग कल्पितां परधर्म जोडे ॥ जीव देहाचें वागवी कोडें ॥ तोचि धर्म जीवातें ॥५८॥
योजोनि धर्म करणें ॥ हें पूर्वपक्षाचें बोलणें ॥ तेचि धरिती देहाभिमान ॥ त्यांस उत्तरार्ध लक्षेना ॥५९॥
परोक्षवाद पूर्वपक्ष ॥ अपरोक्ष म्हणजे शुध्द अंश लक्ष ॥ यास मुख्य वेदांत साक्ष ॥ उपनिषद भाग वेदाचा ॥२६०॥
वेददधि मंथून ॥ उपनिषद काढिलें माखण ॥ ज्ञानवन्हीनें पेटवून ॥ अद्वैत घृत स्वादिष्ट ॥६१॥
ते सेविती परमहंस ॥ सनकादिक शुक ऐसे ॥ राजयोगी जनकासरिसे ॥ मुक्त जाहले या बोधे ॥६२॥
हीच योगियाची समाधी ॥ मी ब्रह्मानिमग्न या बोधीं ॥ सदा डुल्लती सुखस्वानंदीं ॥ न दिसे द्वंद्वभेद कोठें ॥६३॥
हें ज्ञान होण्यासाठीं ॥ करावी संतांची सेवा मोठी ॥ सांडून थोरपण चावटी ॥ पायीं मिठी घालावी ॥६४॥
व्हावें ज्ञानी सुलक्षण ॥ त्यागावें अमंगळ अभक्षण ॥ न व्हावें कुबुध्दि अवलक्षण ॥ अहंभक्षिका भक्षूं नये ॥६५॥
भिऊन चालावें पापासी ॥ वाउगें गुंतूं नये दुष्ट वासनेसी ॥ नम्र असावे सर्वांसी ॥ सत्यभाषणीं देव राजी ॥६६॥
स्नान शिकावें गुरुपासीं ॥ त्यागावें दुर्जनसंगतीसी ॥ अन्नासांगातें माशी ॥ मग संतोष कासयाचा ॥६७॥
विष भक्षून प्रचीत पाहणें ॥ तें काय म्हणावें शहाणपणा ॥ नरदेहा येऊन नरका जाणे ॥ ही काय अक्कल चांगली ॥६८॥
ज्यांस अधोगतीची नाहीं लाज ॥ ते जितांचि मृत बोलिजे ॥ जैसें मढें श्रृंगारिजे ॥ मसनखाई दहनासी ॥६९॥
भक्तिविना देह निर्लज्ज ॥ जैसा चोरटा चावडीं बैसविजे ॥ वाघ दर्वेशीं वागविजे ॥ उग्र पराक्रम मग कैंचा ॥२७०॥
तरुणपण गेल्या मग वृध्द होणें ॥ अंगावर जरा बैसली येऊन ॥ मग भक्तीचें भूषण ॥ काय लाभे त्या पुरुषा ॥७१॥
थोर बांधोन माडीस ॥ आपण जाती मसणखाईस ॥ मेळविलें ज्या संपत्तीस ॥ तिचे भोक्ते दुसरेची ॥७२॥
क्षणभंगुर देह जाण ॥ यांत उमजले ते शहाणे ॥ ज्या अन्नांत विषाची मेळवण ॥ तें कळल्या काय भक्षावें ॥७३॥
ज्या मार्गें चोर नागविती ॥ तो मार्ग सोडून शहाणे जाती ॥ घरीं ब्रह्मराक्षसें केली वस्ती ॥ तें गृह टाकितां बरवें कीं ॥७४॥
देहावर काळाची फिरे गस्त ॥ मग कां बोकडाऐसें व्हावें बस्त ॥ घरांत निजल्या सुस्त ॥ आग लागल्या उठेना ॥७५॥
पोटीं रोगाचें बळ जाणा ॥ औषध भल्यांचें घेईना ॥ मेल्यावर चौर्‍यांशी यातना ॥ त्यासि उपाय न कीजे ॥७६॥
द्वारीं बैसल्या ऋणाईत ॥ दीधल्या वांचोनि नाहीं मुक्त ॥ पदरीं पापकर्माचें संचित ॥ पुण्यावांचोनि फिटेना ॥७७॥
आतां हाचि उपदेश ॥ भावें भजावा जगदीश ॥ येणें या जीवास ॥ सुटका होय काळापासोनि ॥७८॥
करावा विवेक विचार प्रबळ ॥ ईश्वरनिष्ठा असावी अढळ ॥ भजनभाव हृदयीं निर्मळ ॥ वमावा मळ कल्पनेचा ॥७९॥
विश्वजनांसि हेचि विनंती ॥ नका आचरुंन अनुचित मती ॥ भगद्भाव धरावा चित्तीं ॥ कल्याण करील परमात्मा ॥२८०॥
आतां हाचि आशीर्वाद ॥ भाविकां घडो आत्मबोध ॥ आतां हाचि आशीर्वाद ॥ भाविका घडे आत्मबोध ॥ लागो सद्भक्तीचा छंद ॥ व्हावा आनंद स्वानंदीं ॥८१॥
ग्रंथ जाला समाप्तीस ॥ श्रोतया ओतला स्वानंदरस ॥ ऐकोनि कामादिवंत पुरुष ॥ ब्रह्मानंदें डुल्लती ॥८२॥
एकेचाळिसांत अगस्तीचा जन्म ॥ लोपामुद्रेस उपदेश परम ॥ रावणमंदोदरीसंवाद सुगम ॥ विवेक विचार कथियेला ॥८३॥
बेचाळिसामाझारीं ॥ अनसूया अत्रिसंवाद कुसरी ॥ कोसल्येचें चरित्र भारी ॥ मदालसाआख्यान लिहिलें ॥८४॥
त्रेचाळिस चव्वेचाळिसांत ॥ कथिली गोपीचंदजालंधराची मात ॥ मस्त्येंद्र गोरखनाथ समर्थ ॥ त्यांचेंही अन्वय मांडिलें ॥८५॥
पंचेचाळीस भरतास जनकाचा बोध ॥ धर्मद्रौपदीसंवाद ॥ शुकें परीक्षितीचा हरिला खेद ॥ धर्मास भीष्में शिकविलें ॥८६॥
शेचाळिस भरतशेट भीष्मझूज ॥ सत्तेचाळीसांत कर्दम ऋषीचें चोज ॥ कपिला अवतार सांगीतला साच ॥ महाराज बोध केला मातेसी ॥८७॥
अठ्ठेचाळिसावा मुख्य कळस ॥ जैसा मेरुमाथां कैलास ॥ किंवा वाराणसीस येणें भागीरथीस ॥ अथवा सुवर्णीं कोंदण हिर्‍याचें ॥८८॥
सर्वांत पवित्र आनंदवन ॥ त्यांत सदाशिव विराजमान ॥ तेवीं ग्रंथमाथांचें भूषण ॥ अठ्ठेचाळिसावा होय कीं ॥८९॥
या ग्रंथाचें कौतुक ॥ परिसल्या होय प्रबळ विवेक ॥ अनुभव विचार ज्ञान ठीक ॥ अति सुरेख मांडिला ॥२९०॥
केला भक्तिचा सुकाळ ॥ ज्यांत बोधरस कल्लोळ ॥ पाहतां परमार्थ पुष्कळ ॥ उपदेश अर्थ नेटका ॥९१॥
उकलिली प्रपंचरचना ॥ उत्पत्ति प्रळय सांगितले जाणा ॥ माया उद्भवलयांच्या सुखा ॥ निर्गुण सगुण दाविलें ॥९२॥
भेद अभेद स्वधर्म परधर्म ॥ लय लक्ष साधन उपासना कर्म ॥ कीर्तनमहिमा साधुमहिमा परम ॥ नाममहिमा वर्णिला ॥९३॥
पिंड ब्रह्मांडाचा झाडा ॥ लिहिला तत्वांचा निवाडा ॥ पंचीकरण महावाक्यांचा झाडा ॥ नाममहिमा वर्णिला ॥९३॥
पिंड ब्रह्मांडाचा झाडा ॥ लिहिला तत्वांचा निवाडा ॥ पंचीकरण महावाक्यांचा झाडा ॥ फाडोवाडी मांडिला ॥९४॥
जीव शिवांचा निर्णय ॥ दाविली ब्रह्मप्राप्तीची सोय ॥ अविदयेचे काय जात आहे ॥ बध्दमुक्तभाव निवडिला ॥९५॥
भक्ती ज्ञान वैराग्य ॥ सर्व ब्रह्म हा राजयोग ॥ त्याग अत्यांग अष्टांगयोग ॥ सुगम योग दाविला ॥९६॥
वर्णिला गुरुमहिमा अपार ॥ ज्याचे कृपेनें कल्पना नुरे ॥ वोसरे माया प्रपंच व्यवहार ॥ दिसे ब्रह्म एकची ॥९७॥
यापरी गुरुकृपेनें ॥ केले ग्रंथाचें लेखन ॥ अर्थ शोधिल्या होय कल्याण ॥ जीवनमुक्ती आयती ॥९८॥
सिध्दांतबोध ग्रंथासी ॥ पारायण कर्त्या विवेकराशी ॥ ज्ञानभांडार लाभे त्यासी ॥ होय परमार्थ सुगम ॥९९॥
ग्रंथ वाचितां निवाडें ॥ विवेक अनुभव अंगीं जडे ॥ यश प्रताप अधिक जोडे ॥ वसती अक्षयी ब्रह्मपदीं ॥३००॥
होईल मनोरथ सुफळ ॥ उडेल वासनेचा मळ ॥ दया करील गुरुदयाळ ॥ काळचक्र भंगेल निश्चयें ॥१॥
नित्य वाचिल्या सदा मंगल ॥ कधीं न घडे कठीण काळ ॥ जाईल शोक संताप जाळ ॥ आशीर्वाद गुरुचा ॥२॥
आतां गुरुसंप्रदायक महिमा ॥ वाचोनि दावितों सज्जनहो तुम्हां ॥ श्रवणें संतोषेल तुमचा आत्मा ॥ वाढेल प्रेमा जेणें कां ॥३॥
ॐ नमो जी दत्तात्रेया ॥ अपूर्व स्वामी तुमची चर्या ॥ अपार अमूप अगाध चर्या ॥ गुरुवर्या तुज नमो ॥४॥
अवतार आले आणि गेले ॥ तुझें स्वरुप अक्षयीं संचलें ॥ घृत थिजिलें विघुरलें ॥ तेवीं निर्गुण सगुण तूं ॥५॥
जीव उध्दरावयासाठीं ॥ त्वां अवतार घेतला सृष्टीं ॥ गुरु आतां शिष्य राहाटी ॥ जगासाठीं दाविसी ॥६॥
चोवीस गुरुंसी करुन ॥ त्यांचें स्वीकारिलें लक्षण ॥ ते परिसा कोण कोण ॥ विवरण करोनी दावितों ॥७॥
पृथ्वी गुरु करुन ॥ क्षमा शिकला तिजपासोन ॥ समीर सर्वांत प्राणमय समान ॥ या गुणें सख्य सर्वांचें ॥८॥
आकाश सर्वथा असोनि वेगळा ॥ हाही गुण दत्तें स्वीकारिला ॥ पाणी सर्वांचा जिव्हाळा ॥ गाई व्याघ्र सारिखे ॥९॥
हेंही लक्षण घेऊन ॥ दत्त सर्वांत राहे मिळोन ॥ वन्हि जाळी सर्वांलागून ॥ ते गुण घेऊन कर्म जाळे ॥३१०॥
आतां चंद्राचे ठायीं श्यामश्वेत असे ॥ कृष्णपक्षीं कळा तुटत असे ॥ शुक्ल पक्षीं वाढतां दिसे ॥ मुख्य बिंबीं नसती दोन्ही ॥११॥
ब्रह्मीं अविदया आणि तुर्या ॥ विस्तारुन पावती लया ॥ हे गुण दत्तात्रेय ॥ चंद्र दृष्टांते शिकला ॥१२॥
रवि विश्वाचें कार्य चालवी ॥ परी कोणाचे कर्म ना सेवी ॥ दत्तही देहेंद्रिय वाजवी ॥ अलिप्त वर्ते कर्मासी ॥१३॥
आठवा गुरु कपोता ॥ त्याची सांगतों परिसा कथा ॥ स्त्रीलंपट फार फार होता ॥ त्यावर जाहला कुटुंबी ॥१४॥
उभयतां गेलीं चारियास ॥ मागे पारधियें पिलियांस घातले फांस ॥ कपोता पाहोन बाळकांस ॥ फांसी पडोन निमाला ॥१५॥
त्या कपोत्याचे शिकला गुण ॥ मोह धरितां येतसे मरण ॥ यालागीं विचरे उदास होऊन ॥ कुटुंबारहित आनंदें ॥१६॥
अजगरा सहज मिळत भक्षण ॥ राहे संतोषें समाधान ॥ तेही गुण दत्त घेऊन ॥ समाधानी सर्वदा ॥१७॥
सरिता भरोन येती अटती ॥ न्यून अधिक नोहे समुद्ररीती ॥ तेही गुण शिकला दत्तमूर्ती ॥ प्राप्तीं अप्राप्तीं सारिखा ॥१८॥
पतंग दीपा आलिंगून ॥ तेथें अचुक पावे मरण ॥ त्याही गुणातें घेऊन ॥ दत्तें विषय त्यागिला ॥१९॥
मक्षिकेचें शहाणपण ॥ बहु द्रुमांचा रस घेऊन ॥ तो एकत्र जमाकरुन ॥ स्वीकारी आवडीं ॥३२०॥
मक्षिकेचे गुण घेऊन ॥ बहूमति पंथ शोधून ॥ अनुभव हृदयीं सांठवून ॥ भोगी स्वानंद श्रीदत्त ॥२१॥
वारण हस्तिनीसाठीं ॥ गर्तेत पडे होय कष्टी ॥ अंकुश मारिती कपाळकुटी ॥ उठी बैसी करविती ॥२२॥
तोही गुण घेऊन ॥ स्त्री न करी जाण ॥ संसार घोर दारुण ॥ वांतिप्राय त्यागी श्रीदत्त ॥२३॥
सर्पास नावडे जगाची सोबती ॥ जगास नावडे उरगाची संगती ॥ तोही गुण घेतला श्रीदत्तीं ॥ जग आपणांत ना आपण जगीं ॥२४॥
भृंग सुवासीं वेधून ॥ अब्जिनींत राहे कोंडोन ॥ दत्तें घेतला तोही गुण ॥ अन्यथा व्यसनीं गुंतों नये ॥२५॥
गारी गायन परिसोन ॥ मृग वेधे तन्मय होऊन ॥ पारधी मारुनियां बाण ॥ घात करी तयाचा ॥२६॥
यालागीं शब्दश्रवणीं ॥ दत्त न गुंते त्याचें व्यसनीं ॥ त्याही गुणासि घेऊनी ॥ गुरुत्व आपण मानिले ॥२७॥
मीन रससें कारणें ॥ धांवोनि आमिष गिळी जाणे ॥ कंठीं गळ आडकोन जाण ॥ प्राण हानी होतसे ॥२८॥
यालागी रसनाविषये ॥ तोही गुण त्यागून दत्तात्रयें ॥ तोही गुण गुरुत्वें होय ॥ मीन फसला आपण सावध ॥२९॥
जनकरायाचे नगरीं ॥ पिंगळा नामें वेश्या नारी ॥ विषय भोगून अनुताप भारी ॥ उदेल्या जाहली मुक्तची ॥३३०॥
विषय भोगोनि त्यागी ॥ तोही श्रेष्ठ होय योगी ॥ तोही गुण दत्तें अंगीं ॥ स्वीकारिला गुरुपणें ॥३१॥
तिटवी मांस चुंचीं करुन ॥ नेतसे आपुल्या पिल्यांकारणें ॥ गगनीं करितां उड्डाण ॥ इतर पक्षीं लक्षिलीं ॥३२॥
तिटवीस चहूंकडे वेष्टून ॥ चंचुप्रहारें टोचिती जाण ॥ येरी मनांत समजोन ॥ केला त्याग मांसाचा ॥३३॥
मांस पडतां विहंगम झेंपावून ॥ युध्द करितां पावले मरण ॥ तिटवी कौतुक पाहोन ॥ आशा त्यागितां सुखी जाहली ॥३४॥
तोही गुण स्वीकारुन ॥ निराश फिरे दत्त आपण ॥ आशापाशीं घात परम ॥ निराश सुखी संतोषें ॥३५॥
बाळासमान अपमान नाहीं ॥ तोही गुण दत्तें पाहीं ॥ आतां कुमारी गुणांची नवाई ॥ परिसा चतुरीं निवेदितों ॥३६॥
कुमारी साळी सडों लागली ॥ बहु बांगडिया करिती खळखळी ॥ अवघिया काढोन तये वेळीं ॥ दोकरीं दोन उपाधि नसे ॥३७॥
तोहि गुण घेतला श्रीदत्तें ॥ द्वैतांत खळखळ विशेषें होते ॥ एकात्मज्ञानें चित्तांत ॥ अद्वय बोधें राहिला ॥३८॥
तीरगर शरातें वेधून ॥ एकाग्र करी तेथें मन ॥ निशाण घायीं गेलें सैन्य ॥ त्याचें भान त्या नसे ॥३९॥
तयाची एकाग्रता पाहोन ॥ तोहि गुण घेतला श्रीदत्तानें ॥ मग स्वरुपीं लावूनि मन ॥ लक्षी चिन्मय एकची ॥३४०॥
कांतीण तंतु काढून ॥ त्यावर उतरी चढी आपण ॥ शेखीं तंतू गिळोन ॥ राहे एकटी आनंदमय ॥४१॥
तैसी ईश्वराची कळा ॥ मायातंतु काढूनि निर्मी विश्वाला ॥ शेखीं ग्रासी विश्वासहित मायेला ॥ राहे एकाएकीं एकची ॥४२॥
तेही युक्ती दत्ते घेऊन ॥ उत्पत्ति प्रळय समजोन ॥ सर्वकाळीं राहे निमग्न ॥ सहज सुखें स्वानंदीं ॥४३॥
तेही युक्तीं दत्तें घेऊन ॥ सदा आनंदरुप मन ॥ स्वरुपीं होऊनिया तल्लीन ॥ गुंती नसे द्वैताची ॥४४॥
कुंभारीण अळी घेऊन हरि॥ घरांत ठेवी कोंडोन ॥ कांटा टोचोन जाय आपण ॥ तिच्या ध्यासें तद्रूप ॥४५॥
हाचि गुण दत्तें घेऊन ॥ स्वरुपी एकाग्रता होऊन ॥ स्वयें ब्रह्म जाहला आपण ॥ विश्वाघटीं सामावला ॥४६॥
मही वायु आकाश पाणी ॥ वन्हि चंद्र आणि तरणी ॥ कपोता अजगर समुद्र पतंग मिळोनी ॥ मक्षिका गज सर्प भृंग ॥४७॥
हरिण मीन वेश्या तिटवी ॥ बाळ कुमारी तीरगर कांतीण जेवीं ॥ कुंभारीण जाणा चोविसावी ॥ गुरुत्व घेतलें श्रीदत्तें ॥४८॥
हे चोविस गुरु मिळोन ॥ त्याग अत्याग गुण घेऊन ॥ जाहले चोविस प्रमाण ॥ संख्या केली श्रीव्यासें ॥४९॥
भागवतीं कृष्ण बोलोन ॥ वाखाणी चोवीस गुरुलक्षणें ॥ तोचि आश्रय पाहोन ॥ मीही वदलों श्रोतयां ॥३५०॥
श्रीदत्तात्रेय नारायण ॥ स्वयें अवतार श्रीभगवान ॥ विश्व उध्दरावया कारण ॥ गुरुमहिमा दाविला ॥५१॥
तया दत्तात्रेया स्वामीसी ॥ ध्याती अठयायशीं सहस्त्र ऋषी ॥ नवनाथ सिध्द चौर्‍याशीं ॥ भजती सुरवर मुनिजन ॥५२॥
मुनींद्रनाथ परमहंस ॥ दत्तें उपदेश केला त्यास ॥ श्रीगुरु शहास ॥ म्हणोनि नाम शहामुनी ॥५३॥
दत्ताचा उपदेश मुनीस ॥ मुनीनें उपदेशिलें शहास ॥ अवलंबून योग्यतेस ॥ केली कृपा गुरुरायें ॥५४॥
वाराणसींत गंगातीरीं ॥ प्रहर रात्र लोटल्यावरी ॥ आयुष्यमान् योग रेवती नक्षत्रीं ॥ अनुग्रह केला स्वामीनें ॥५५॥
नाहीं पाहिलें यातीकडे ॥ ज्ञान सांगीतलें उधडें ॥ अवघें उगविलें कोडें ॥ सोडिलें बिरडें अविदयेचें ॥५६॥
मंत्र फुंकोनि कर्णीं ॥ दीप लाविला हृदयभुवनीं ॥ गेली भ्रांती निरसोनी ॥ स्वयें प्रकाशलों स्वरुपीं ॥५७॥
ब्रह्मास्मि ठसावला बोध ॥ तोहि निरसोन केला आनंद ॥ आनंदाचाहि फुंद ॥ जिरोनि केला निवांत ॥५८॥
मजमाजीं मी आटलों ॥ आपआपणांत दाटलों ॥ माझा मी गोठलों ॥ सुटलों बांधलों दोन्ही मिथ्या ॥५९॥
गगनीं गगन सामावलें ॥ समुद्र समुद्रासि भेटले ॥ सूर्यबिंबीं सूर्य बैसले ॥ चंद्रे चंद्र आलिंगिला ॥३६०॥
नि:शब्दीं शब्द बुडाला ॥ जीव शिव शब्द उडाला ॥ सरला तुर्येचा गलबला ॥ स्फुरणीं स्फुरण तटस्थ ॥६१॥
कैंचा पूर्वपक्ष उत्तरपक्ष ॥ उडालें लय आणि लक्ष ॥ भेदाभेदास न दिसे साक्ष ॥ दक्षता मोक्ष कोण पुसे ॥६२॥
नाहीं गुरुशिष्यांचें नांव ॥ अर्धमात्रेचा पुसला ठाव ॥ ओंकार त्रिगुण उद्भव ॥ हे हीं उदकींचीं अक्षरें ॥६३॥
या रीतीनें जाहला उपदेश ॥ अवघा दाविला ब्रह्मविलास ॥ ठाव नुरे मी पणास ॥ नाम रुप दिसेना ॥६४॥
जेथें ना उद्भवें नाद ॥ तेथें कैंचा भेदाभेद ॥ तुटला जातगोत संबंध ॥ निवृत्ति प्रवृत्ति आटली ॥६५॥
आम्ही भोगी ना त्यागी ॥ सिध्द साधक नव्हे योगी ॥ ना वीतरागी ना जोगी ॥ संन्यासी ना गृहस्थ ॥६६॥
आम्ही घरबारी ना ब्रह्मचारी पुरुष ॥ ना नपुंसुक नारी ॥ दिगंबर नव्हे जटाधारी ॥ मौनी नव्हे ना बोलके ॥६७॥
आम्ही ज्ञानी ना अज्ञानी ॥ मुद्राधारी न हो ध्यानी ॥ निष्ठाशील भजनी ना अभजनी ॥ भक्त ना अभक्त ॥६८॥
पुण्यशील ना पापी ॥ गुप्त प्रगट नव्हे तपी ॥ फकीर मलंग ना सोपी ॥ वेदांती ना चार्वाक ॥६९॥
देव नसे ना पुजारी ॥ दाता नसे ना भिकारी ॥ भोजन करितां ना निराहारी ॥ जागृती ना निद्रित ॥३७०॥
मी माया ना ओंकार ॥ निर्गुण ना साकार ॥ तुर्या ना साक्ष व्यवहार ॥ चिन्मात्र निर्विकार माझा मी ॥७१॥
आम्ही जात ना अजात ॥ कर्मनिष्ठ ना क्रियातीत ॥ देह ना पंचभूत ॥ सदा सदोदित आनंद मी ॥७२॥
मज रात्र ना दिवस ॥ मी गुरु ना मज शिष्य ॥ स्वयंभ चिदाकाश प्रकाश पैस ॥ नाहीं अंत अनंत मी ॥७३॥
मी आकार ना निराकार ॥ महत्तत्व मकार ना विस्तार ॥ उत्पत्ती स्थिती ना संहार ॥ आहें तदाकार जैसा तैसा ॥७४॥
मी मुक्त ना नोव्हे बध्द ॥ भेद ना नोहे अभेद ॥ माझा मजसी स्वानुभव बोध ॥ हर्ष ना श्रमी मी ॥७५॥
मीच देशी ना परदेशी ॥ वस्ती आहे चिदाकाशीं ॥ नाम रुप वर्णावर्णांसी ॥ शोधकर्ता दिसेना ॥७६॥
आम्ही एक ना अनेक ॥ सहज ना उल्लेख ॥ नेमानेमी तर्क अतर्क ॥ आहे नाहीं बोलों नये ॥७७॥
आम्हा पाप ना पुण्य ॥ जन्म नाहीं ना मरण ॥ येणें नसें ना जाणें ॥ हे गुरुगम्य अगम्य कळा ॥७८॥
गुरुपदेश हातवटी ॥ श्रुत केली श्रोतियांचे कर्णपुटीं ॥ अर्थ ठेविला नाहीं पोटीं ॥ उघड दृष्टी दाविला ॥७९॥
मुनींद्र स्वामीची कृपा पूर्ण ॥ चित्तवृत्ति समाधान ॥ त्यांत उद्भवलें स्फुरण ॥ कवण शक्ती वदावया ॥३८०॥
चित्त रंजावयालागीं ॥ करममूक केली या जगीं ॥ साह्य सारंग दत्तयोगी ॥ मुनींद्र स्वामीसहित ॥८१॥
प्रथम प्रसंगापासोन ॥ षोडशअध्यायपर्यंत जाण ॥ केलें ऋषिभाष्य निरुपण ॥ वाखाणूनियां बहुमतें ॥८२॥
पुढें महिभटाची कथा ॥ हाही मतभेद सर्वथा ॥ बहु देवांची वदलों वार्ता ॥ हे कथा महात्म्यपंथीं ॥८३॥
महिभट ईश्वर भाषण ॥ हें निरुपण मुनिपंथीं जाण ॥ सांगितले अवतार भिन्न ॥ हें मत जातीचा ॥८५॥
महिभटाच्या वक्तृत्वांत ॥ विवरोनि दाविलें अनेक पंथ ॥ त्यांत वक्तृत्वाचें साहित्य ॥ तर्क समजा कवींचा ॥८६॥
तीस प्रसंगापर्यंत कथा ॥ निवेदिला मतांचा भेद पुरता ॥ ऐशिया बहु कथा ॥ कोठवर लिहाव्या कवीनें ॥८७॥
दहा अवतार विष्णूचे न होती ॥ अवतार भिन्न देवांचे असती ॥ ही पंथवादियांची मती ॥ कवींचा बोध तो नोहे ॥८८॥
ऋषि भिन्न वदले अठरापुराण ॥ हें कथिले मतभेद भाषण ॥ समजावया अभेद लक्षण ॥ भेद प्रकार दाविला ॥८९॥
आतां सांगों भेदाचें खंडण ॥ तिसांपासोन परिसा सज्जन ॥ मुख्य कवींचें बोलणें ॥ जें ज्ञान गुरुकृपेचें ॥३९०॥
एकतीस बत्तीस तेहतीस ॥ त्यांत करुन गुरुशिष्यमिस ॥ हा कवीचा बोध प्रकाश ॥ गुरुकृपेनें दाविला ॥९१॥
चौतीस पस्तिसावा जाण ॥ श्रोतियांचे निमित्तें करुन ॥ केलें आपणासीच भाषण ॥ ज्ञान सुधारस ओतिला ॥९२॥
छत्तीस सदतीस अडतीस ॥ एकूणचाळीस पावेतों सुरस ॥ गीतेंत वदला जगदीश ॥ तो प्राकृत अर्थ उकलिला ॥९३॥
दिगंबरी टीका श्रीधरी ॥ मधूसूदनी टीका ॥ श्रीभास्करी टीका ॥ टीका महात्म्याची भिंगारी ॥९४॥
ज्ञानेश्वराची प्राकृत टीका ॥ वामनी समश्लोकी यथार्थ दीपिका ॥ निवृत्ति सोपान मुक्तेश्वरी देखा ॥ सप्तश्लोकी ते वदले ॥९५॥
टीका जाहल्या पुढती होती ॥ ज्ञात्यांच्या मतीं प्रवेशती ॥ पुढें न करावें हें वदती ॥ अज्ञानाचें लक्षण ॥९६॥
गंगोदक मागें आतां खर्चिती ॥ पुढें पशु पक्षी विश्व स्वीकारिती ॥ त्यांत गंगोदक काय न्यून होती ॥ सांगा विवेक चतुरहो ॥९७॥
भूगर्भीं सुवर्णखाण ॥ मागें काढिलें पुढें काढिती जन ॥ मही काय उणें होऊन ॥ पुरे म्हणे लोकांसी ॥९८॥
विष्णूची करुनियां भक्ती ॥ वैकुंठपुरीं केली वस्ती ॥ आतां काय पुरे म्हणती ॥ दाटी जाहली करुं नका ॥९९॥
देवाची भक्ती चोखामेळा करी ॥ त्यास लोक धरिती दुरी ॥ वैकुंठीं महारवाडा वेगळा करी ॥ नांदावया तयासी ॥४००॥
उंच नीच नदींत शिरोन ॥ बाहेर निघती कुंभ भरोन ॥ मग म्हणती स्पर्शो नको चला दुरोन ॥ उदकांत उभयतां उभीं होतीं ॥१॥
असो या जनांसी बोलवेना ॥ पाप तेंचि विश्वकल्पना जाणा ॥ ज्ञाते समजोत आणोनि मना ॥ आपुले कार्य साधिती ॥२॥
यापरी समजोनि अंतरीं ॥ गुरुकृपेचा अभय शिरीं ॥ स्वजात परजात पेंच भारी ॥ नाहीं आणिलें मनांत ॥३॥
देहास जात पंचभूत ॥ भूतांची कोण जात सांगा बुध्दिमंत ॥ या विषयीं उडाली भ्रांत ॥ बोलोन काय वावुगें ॥४॥
छत्तिसांपासोनि एकुणचाळीस ॥ गीतार्थ निवेदिला सुरस ॥ जेवीं समुद्रतोयास ॥ चंचूंत चिमणी सांठवी ॥५॥
या अर्थास समजोनि सज्जनीं ॥ मान कीजे या वचनीं ॥ आतां एकेचाळिसांचि मांडणी ॥ गुरुमाहात्म्य वर्णिलें ॥६॥
केलें ध्रुवाचें कथन ॥ लोपामुद्रा जानकी भाषण ॥ मग गुरुसंप्रदाय सांगोन ॥ दाविला मूळ पुरुष श्रीदत्त ॥७॥
श्रीदत्तात्रेयाचें आख्यान ॥ चोवीस गुरुंचें निरुपण ॥ त्यावरी अनुग्रह केला स्वामीनें ॥ तोही अर्थ विस्तारला ॥८॥
विष्णूचे दहा अवतार प्रमाण ॥ स्वरुपीं ओंकार निर्माण ॥ ओंकारी वेदांत उद्भव जाण ॥ वेदांची अंगे तीं शास्त्रें ॥९॥
अष्टादश पुराण ॥ श्रीव्यासें केलीं प्रमाण ॥ हें मुख्य कवींचें ज्ञान ॥ संमत असे श्रेष्ठांचें ॥४१०॥
भेद अभेद उभारोन पक्ष ॥ बोलिलों परोक्ष अपरोक्ष ॥ यातें जाणती ज्ञाते दक्ष ॥ अर्थीं लक्ष ठेवोनी ॥११॥
इतुका अर्थ शब्दीं केला ॥ शब्दीं शब्द गौरविला ॥ प्रवृत्ति निवृत्ति कार्याला ॥ शब्दचि एक पाहिजे ॥१२॥
शब्दें कवण करावें ॥ शब्दें अर्थ सांगावे ॥ शब्दें ग्रंथ वाचावे ॥ शब्दें शास्त्रें भाषण ॥१३॥
औषध रोग दवडोनि आपण नुरे ॥ शब्द अनुभव दावूनि स्वयें जिरे ॥ ज्ञान करी बोध संचार ॥ शेवटीं ज्ञान होय विज्ञान ॥१४॥
ज्ञानबोध गुरुचा शिक्का ॥ तेणें ग्रंथ रचिला नेटका ॥ धरोनि भक्तीचा आवांका ॥ आश्रय संत पायांचा ॥१५॥
गुरुगृहीं भरिला ज्ञानसिंधू ॥ आम्हीं घेतला एक बिंदू ॥ जैसा चातकास आनंदू ॥ अल्प उदके होतसें ॥१६॥
भरोनि भागीरथीचें पाणी ॥ रामेश्वरा जाती कावडी भरोनी ॥ तेवीं ज्ञानभांडारांतूनी ॥ किंचित् अर्थ दाविला ॥१७॥
मनुष्य स्वीकारी अन्न शेर ॥ मुंगीस राळ्या इतुकें पुरे ॥ साधुकवितातरणी पसरे ॥ आमुचें कवन दीपकळिका ॥१८॥
संक्रांतीचीं सुगडें घेऊनी ॥ ज्याचे त्यास देती परतोनी ॥ तेवीं संत वचनें आणोनी ॥ ज्यांची त्यां समर्पिलीं ॥१९॥
आचारी पाक करोनि घाली भोजन ॥ मी आनंदांत ऐसें न म्हणे ॥ ज्याचें धन त्यांचे दान ॥ तेवीं लेखन हें माझें ॥४२०॥
गंगोदक गंगेस अर्पून ॥ अर्ध्य देती ब्राह्मण ॥ तेवीं संतांचा बोध त्यांपासीं ठेवून ॥ कर जोडोनि राहिलों ॥२१॥
मग आशीर्वाद दिला संतांनी ॥ त्वां जे केली ग्रंथ मांडणी ॥ जे परिसती श्रवणीं ॥ कल्याण त्यांचें होईल ॥२२॥
परिसोनि संतांचीं वचनें ॥ म्यां घातलें लोटांगण ॥ माझें येथें पाईकपण ॥ धनीपण स्वामींचें ॥२३॥
पांडवांचा अश्वमेध ॥ सिध्दी पाववी गोविंद ॥ तेवीं सिध्दांतबोध ॥ पूर्ण करी सद्गुरु ॥२४॥
विश्वामित्राचा यज्ञ पूर्ण ॥ सिध्दी नेला श्रीरामचंद्रानें ॥ तेवीं सिध्दांतबोध श्रीगुरुनें ॥ समाप्तीस आणिला ॥२५॥
आपुल्या बाहुबळानें ॥ ग्रंथ पोहावयाचा केला पण ॥ पार पावविला श्रीगुरुनें ॥ नेला सिध्दी मनोरथ ॥२६॥
मुंगी मस्तकीं शिळा घेऊनी ॥ चढों इच्छी रवि किरणीं ॥ तेवीं म्यां हांव धरोनी ॥ ग्रंथ रचना आरंभिली ॥२७॥
परी श्रीगुरुचा महिमा ॥ सिध्दी नेला करोनि सीमा ॥ जैसा सिंधु मंथनीं जगदात्मा ॥ साह्य जाहला सुरांसी ॥२८॥
पायरी सद्गुरु बैसोनि हृदयीं ॥ मति प्रकाशली व्यतिरिक्त अन्वयीं ॥ कविता वदविली पाहीं ॥ कळासूत्री होवोनी ॥२९॥
सिध्दांतबोध नभ अफाट ॥ गुरुत्वें ज्ञानभानू केला प्रगट ॥ मतिकल्हारे विकसली चोखट ॥ इंद्रियदिशा उजळल्या ॥४३०॥
सिध्दांतबोध गृहीं बरवा ॥ सद्गुरुनें लाविला ज्ञान दिवा ॥ दिसे तत्व समुदाव अवघा ॥ उघडा पदार्थ आत्मा मी ॥३१॥
देवामाजी सहस्त्रनयन ॥ फणिमाजी सहस्त्रवदन ॥ ग्रहमंडळी सहस्त्रकिरण ॥ तेवीं परमार्थीं सद्गुरु ॥३२॥
नक्षत्रांमाजी रोहिणीवरु ॥ पर्वतामाजी श्रेष्ठ मेरु ॥ सरितांमाजी विशाळ सागरु ॥ तेवीं सद्गुरु परमार्थीं ॥३३॥
पशु यातींत सिंह समर्थ ॥ विहंगमामाजी विनतासुत ॥ कल्पतरु वनस्पतींत ॥ तेवीं परमार्थीं सद्गुरु ॥३४॥
गुरुनें साह्य केलियाविण ॥ त्याचा परमार्थ व्यर्थ जाण ॥ गर्भांधाकारणें दर्पण ॥ कुंकुम विटंबन विधवेसी ॥३५॥
आतां असो हा दृष्टांत ॥ गुरुमहाराज समर्थ ॥ करावा हा सिध्दांत ॥ श्रुति अर्थ निश्चयें ॥३६॥
समस्तांसि लोटांगण ॥ जावें श्रीगुरुसि शरण ॥ तेणें सर्व कल्याण ॥ उभय लोकीं होईल ॥३७॥
जाहला ग्रंथाचा कळस ॥ गुरुनें पुरविला मनोरथहंस ॥ नमन माझें श्रोतियांस ॥ तुमच्यासंगें सुखी जाहलों ॥३८॥
ग्रंथ वाचितां भ्रांति उडे ॥ तुटे अविदयेचें बिरडें ॥ नुगवे संशयाचें कोडें ॥ नुरे भवभय तत्काळ ॥३९॥
नलगे पुसावे अर्थ कोणासी ॥ उघडे समजे सर्वांसी ॥ होय जीव संतोषी ॥ श्रवणमात्र जाहलिया ॥४४०॥
ग्रंथ वाचितां पूजितां ॥ सर्व सिध्दींचा होईल दाता ॥ हा आशीर्वाद पुरता ॥ अभयहस्त श्रीगुरुचा ॥४१॥
नित्य वाची करी पठण ॥ जातिदोषें होय पवन ॥ ज्ञानछत्र गुरुनें घालून ॥ केला उपकार लोकांसी ॥४२॥
सिध्दांतबोध रचिला राउळ ॥ स्वयंभ लिंग आंत गुरु दयाळ ॥ शहामुनी पुजारी प्रेमळ ॥ सेवेसि अक्षयी तरंग ॥४३॥
पन्नास प्रसंगांची माळा ॥ गुंफोनि घातली गुरुच्या गळां ॥ प्रदक्षिणा करुनि घालोनि लोटांगणाला ॥ राहिलों पायांपाशीं निवांत ॥४४॥
आतां हाचि उपदेश ॥ अवघा ब्रह्मींचा चिद्विला ॥ याचा अनुभव सनकादिकांस ॥ मुक्त केलें हंसानें ॥४५॥
जो मूळींचा उल्लेख ॥ तोचि जगदाभास ॥ देख ॥ हा समजला जो विवेक ॥ जन्म त्याचा सुफळ कीं ॥४६॥
सर्वांघटीं एक नेम ॥ सोहंस्मरणीं चाले दम ॥ हाचि बोध समजोनि सुगम ॥ भेद सांडिती सज्जन ॥४७॥
हेचि लक्षाची सुरेख ॥ जगीं आत्मा पहावा एक ॥ या दृष्टीचा ज्यासि निरख ॥ तोचि सभाग्य धनाढय ॥४८॥
नाही उरली साधन खळखळ ॥ निर्मळ अंत:करण जैसें गंगाजळ ॥ शांत सुशीळ प्रांजळ ॥ हृदयीं कल्लोळ प्रेमाचा ॥४९॥
चित्त रतलें गुरुपादपद्मा ॥ अगाध बोधाची जाहली सीमा ॥ वृत्तीस जाहली पूर्ण पूर्णिमा ॥ तुर्यांमंचकीं सुखशय्या ॥४५०॥
जिराला मी तूंपणाचा फुंद ॥ कोंदोन ठेला ब्रह्मानंद ॥ सबाह्य सुखाचा स्वानंद ॥ सामराज्यपदीं विराजलों ॥५१॥
हा अनुभव घेतल्या कसोटी ॥ बैसे स्वानंद सायुज्य मुक्तपटीं ॥ संसार दरिद्र न पडे दृष्टीं ॥ आत्मसुखीं सुखावलों ॥५२॥
ज्ञानसिंधूंत विराली चित्तलहरी ॥ जीव शिव साधनें उरली नाहीं उरीं ॥ वेदशास्त्र अर्थ भरला अंतरी ॥ ग्रंथ पाहाणें खुंटलें ॥५३॥
जगीं जगदीश उघड दिसे ॥ मग ग्रंथ शोधनें कां वाउगें पिसें ॥ गंगा मीनल्या सिंधूस ॥ मग खळखळ वाउगी ॥५४॥
पोट भरल्यावर बोटें चाटणें ॥ तैसें ज्ञान जाहल्या साधन करणें ॥ नदी उतरल्यावर सांगड बांधणें ॥ ही काय अक्कल चांगली ॥५५॥
साधन चमत्कार जगाची दृष्टी ॥ जैसा मृग धावे मृगजळाचें पाठीं ॥ किंवा सोंगाडयाची पाहोन हातवटी ॥ संतोष पावती मानसें ॥५६॥
नाहीं भेटला समर्थ गुरु ॥ तंववरी भ्रांतीचा जाईना भरु ॥ वर्षावकाळीं आलिया पुरु ॥ नीर निर्मळ न दिसे कीं ॥५७॥
अरुणास नलगे दिपाचे सायास ॥ ज्ञात्यास भ्रांति स्वप्नीं दिसे ॥ विंजवणारा घाली चंद्रास ॥ हें कैसें घडेल ॥५८॥
यापरी समजोन शुध्दबोध ॥ हृदयीं भरला ब्रह्मानंद ॥ हें ज्ञान वदे गोविंद ॥ गीतेमाजी उघड कीं ॥५९॥
या बोधीं जो रंगला ॥ असो कुटुंबी कीं एकला ॥ विष्णु दहा अवतार खेळला ॥ स्वयें स्वरुपीं उणा नव्हे ॥४६०॥
याचा अनुभव पंथें ॥ गेले राजऋषि पुण्यवंत संत ॥ बैसोन ब्रह्मज्ञान नौकेंत ॥ सुखें तरले भवाब्धी ॥६१॥
हा ग्रंथार्थ आणोनि मानसीं ॥ संतोष पाविजे आपुल्या आत्मयासी ॥ ईश्वर भजन करावें अहर्निशीं ॥ ही दक्षिणा देईंजे ॥६२॥
समान चित्त राखावें अष्टप्रहर ॥ हेंचि कोटि साधनांचें साधन सार ॥ समताबुध्दी जो साचार ॥ ईश्वर त्याणें जिंकिला ॥६३॥
मन देवोंप लाविजे ॥ किंवा मनचि देव कीजे ॥ ज्ञानदृष्टीनें ब्रह्म लक्षिजे ॥ ब्रह्म होइजे हें बरें ॥६४॥
अन्न उदक स्मरल्या तृप्ति होईना ॥ भोजनी संतुष्ट आत्मा जाणा ॥ ईश्वर अनुभवितां भ्रांति फिटेना ॥ ईश्वर होतां सुख अवघें ॥६५॥
अमृत म्हणतां अमर नाहीं जाहले ॥ धन आठवल्या पदरीं नाहीं पडलें ॥ अग्नि चिंततां देह जळे ॥ हें तों बोलणें अबध्द ॥६६॥
समुद्र मुखें खोल वर्णिला ॥ परंतु ठाव नाहीं काढिला ॥ चंद्राअंगीं कलंक देखिला ॥ कैसा जडला कळेना ॥६७॥
जोशी ग्रहण लागलें सांगताम दिसे ॥ त्याचें समरंगण अनुभवा येत नसे ॥ सूर्य गगनीं विचरत असे ॥ गमन गति लक्षेना ॥६८॥
विंचु डंश जाहला ज्यासी ॥ चतुर मंत्रानें उतरिती त्यासी ॥ विष कैसें आलें ठिकाणासी ॥ ती गति निरखेना ॥६९॥
कासवी अवलोकी पिल्यांला ॥ दूध नसतां तृप्ति त्यांला ॥ अवलोकनिकेला ॥ नय गति सांगतां ॥४७०॥
स्त्रीपुरुषांचे मैथुन ॥ तें सुख सांगतां नये वाचेनें ॥ व्यालीची वेदना वांझ नेणें ॥ गुरुपुत्राचा बोध नकळे निगुर्‍यासी ॥७१॥
यापरी समजणें चतुरानें ॥ काय उल्लेख लिहिला कवीनें ॥ समुद्र भरती समुद्र जाणे ॥ नदीस गति न येती ॥७२॥
गुरुकृपेनें जाहला बोधू ॥ हृदयीं भरला ज्ञानसिंधू ॥ तोची हेलावला सिध्दांतबोधू ॥ आनंदलहरी विस्तारल्या ॥७३॥
गंगेचा ओघ नीट गेला ॥ सिंधुमिळणीं निवांत ठेला ॥ तैसा शहामुनि मौनावला ॥ आत्मा आपुला पाहोनि ॥७४॥
मौन मुद्रेची निरखितां दृष्टी ॥ दृश्य द्रष्टा दर्शन घोटी ॥ अहं सोहं जिरवूनि पोटीं ॥ ज्ञानाची हुटहुटी राहिली ॥७५॥
पूर्णिमेवर कळा चढत नाहीं ॥ कळसावर काम होत नाहीं ॥ वेदें आत्मा ओळखिल्या पाहीं ॥ मग मौनावला न बोले ॥७६॥
लक्ष्मी निवांत विष्णूपासीं ॥ ध्रुव नाढळे अक्षयपदासी ॥ गंगा मीनल्या समुद्रासी ॥ फिरोनि त्र्यंबका पाहीना ॥७७॥
ब्राह्मण जन्म पावल्यावर ॥ ना इच्छी शूद्र जन्म व्यवहार ॥ वेदवक्ता नर ॥ ओ काढितां खडे मोजीना ॥७८॥
पोहणार न लागे दुसर्‍याचे कासेस ॥ नावे बैसला नाकरी पेटयाचे सायास ॥ अनुभव पूर्ण जाहला ज्यास ॥ जो साधनकष्टीं कष्टेना ॥७९॥
गंगातीरीं वसती ज्यासी ॥ तो इच्छीना कूप खणावयासी ॥ सद्गुरु संग अहर्निशीं ॥ तो फसेना फळ साधनीं ॥४८०॥
ज्या बोधीं बोध परिपूर्ण ॥ अवघा भरला नारायण ॥ अमृतसिंधूंत विष शोधून ॥ दृष्टीं कैसें पडेल ॥८१॥
यापरी अवघा गुरु लिंग एक ॥ शहा चरणीं ऊर्ध्व रेख ॥ उमटली सिध्दांतबोधीं देख ॥ अक्षर व्यंजनें श्रृंगारिलीं ॥८२॥
शहा शब्द गुरुचा शिक्का ॥ मुनि ब्रह्मींची चित्तकळिका ॥ प्रतापबोध जीवास देखा ॥ सिध्दांतबोधीं उमटला ॥८३॥
सिध्दांत बोध ग्रंथाला कर्ता ॥ आपण श्रीगुरु जाहला ॥ जैसा सिंधुमंथनीं सुरांला ॥ शक्ति देता महाविष्णु ॥८४॥
श्रीराम बळें सुग्रीवें ॥ युध्दीं धरियेली हांव ॥ तैसा ग्रंथाचा गौरव ॥ बुध्दीप्रेरक श्रीगुरु ॥८५॥
ब्राह्मण करी तर्पण ॥ गंगोदक गंगेसि देणें ॥ तैसें आमुचें लेखन ॥ अर्पण जाहलें गुरुपायीं ॥८६॥
वाढवूनि भक्त्तीचा महिमा ॥ संतोष करुं आत्मयारामा ॥ धत्तूरपुष्पीं शिव उमा ॥ संतोष कीजे ज्यापरी ॥८७॥
तुम्ही संत दयाळ माहेर माझें ॥ तेणें लाधलों चरणरज ॥ म्हणवूण भक्तिभूषणांत साजे ॥ मंडण जाहलों सज्जन सभे ॥८८॥
सुफळ जाहला संसार सारा ॥ संतपदीं जोडिला थारा ॥ केला ग्रंथाचा उभारा ॥ सिध्दांतबोध विख्यात ॥८९॥
सिध्दांतबोध ग्रंथ शोधून ॥ अर्थ अलंकार ल्यावे चतुरानें ॥ त्यांचें होऊन कल्याण ॥ जीवन्मुक्तपद पावतील ॥४९०॥
ग्रंथ समाप्तीचा प्रसंग ॥ जाहला सुखाचा त्रिवेणी प्रयाग ॥ श्रवणस्नानें पावन होईल जग ॥ सायुज्यपदवी पावती ॥९१॥
तनुमनधन अर्पण ॥ गुरुसी घातलें लोटांगण ॥ शहामुनि निवांत होऊन ॥ अक्षय सुखीं सुखावला ॥९२॥
मिळोनि संताची मंडळी ॥ केली आनंदाची दिवाळी ॥ अष्ट भावांची पुष्पांजुळी ॥ जीवें ओंवाळी गुरुरावो ॥९३॥
आतां हीच मंगळ आरती ॥ मी नाहीं तूंचि गुरुमूर्ती ॥ जीव भाव समर्पिला तुजप्रती ॥ शेवटींचें लळित अवघा तूं ॥९४॥
मीपणाचा धूप जाळिला ॥ कापूर पंचप्राणज्योत प्रकाशला ॥ आनंद टाळी हर्ष बुका उधळिला ॥ गजर केला नामाचा ॥९५॥
जाहली लिहावयाची सीमा ॥ लेखणी वाहिली गुरुपादपद्मा ॥ शहामुनीचा आत्मा ॥ अष्टभावें निवाला ॥९६॥
केले कष्ट गेले सिध्दी ॥ तन्मय शहामुनीची बुध्दी ॥ जाहली कर्याची सिध्दी ॥ लेखणी सीमा येथोनी ॥९७॥
शके सत्राशांत जाण ॥ ग्रंथ समाप्त जाहला पूर्ण ॥ चांबळि ग्रामाकडे पठारी मंडण ॥ तेथें लिहिला हा ग्रंथ ॥९८॥
शहामुनीचा शिष्य जाण ॥ लेखक भगवंत नारायण ॥ उपनाम पांढरकामा जाण ॥ वास्तव्य पाडळी धायगुडे ॥९९॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपण तत्वसारनिर्णये पंचशित्तमो ध्याय: ॥५०॥
॥अध्याय ५०॥ ओव्या ॥ ४९९ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीशुभं भवतु ॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP