मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ३९ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३९ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
धन्य महाराज कबीर ॥ जो सत्यस्वरुप अवतार ॥ घेवोनि मनुष्य आकार ॥ सत्व गंभीर नाम ठेविलें ॥१॥
कृतयुगामाझारी ॥ गंभीर नामें ब्रह्मचारी ॥ जीवावर उपकार करी ॥ उपदेशी ज्ञानसिंधूतें ॥२॥
त्रेतायुगीं मुनींद्र नाम ॥ द्वापारीं करुणाकर परम ॥ कलीमाजी कबीर उत्तम ॥ नाम विख्यात विश्वमुखीं ॥३॥
अव्यक्तरुपी निराकार ॥ दिसे शरीर परी नसे विकार ॥ लावण्यगुणगहन गंभीर ॥ बाळलीला गंगातटीं ॥४॥
नुरहा नाम मोमीन ॥ होता पुण्यपरायण ॥ तेणें कबीर पाहोन ॥ उचलोनि गृहीं आणिला ॥५॥
वैशाख शुध्द तृतीयेसी ॥ मृग नक्षत्र होतें ते दिवसीं ॥ ठेवोनि कबीर नामासी ॥ आनंदातें पावला ॥६॥
बाळ लीलावेषधारी ॥ सहज वाढळा अजरामरी ॥ सर्व शास्त्रें जिव्हाग्रीं ॥ न अभ्यासितां अनुकूळ ॥७॥
दिसे ज्ञानाचाचि कोंभ ॥ कीं अवतरला पद्मनाभ ॥ हृदयीं पैस जैसें नभ ॥ सखोल धैर्य मेरुचें ॥८॥
विवेक वैराग्य अनुभव शांती ॥ क्षमा दया भगवद्भक्ती ॥ समता बोधें स्वरुपस्थिती ॥ सर्वतत्वनिर्णय ॥९॥
काळ कुसरी भेद ॥ अभेदगुरु केला रामानंद ॥ कर्म क्रियातीत शुध्दबुध्द ॥ आनंदभरित सर्वदा ॥१०॥
त्यागी कर्मकेरसुणी वानेला ॥ स्वयें आत्मबोधीं रंगला ॥ दिसे ब्रह्मींचा पुतळा ॥ जनासि दीक्षा लक्षेना ॥११॥
वाद लावी अविंधासी ॥ हिंसाचारी मारितां गाईसी ॥ पूजितां मृत्तिका मसीदीसी ॥ काय लाभ यांत सांगा ॥१२॥
ब्राह्मणांसि म्हण तुम्ही अज्ञान ॥ कां पूजितां व्यर्थ पाषाण ॥ न ओळखा आत्मचैतन्य ॥ भ्रांति तुमची जाईना ॥१३॥
सर्व लोक त्यासी निंदी ॥ न मिळे ब्राह्मणीं न मिळे अविंधीं ॥ नसती काढी तो उपाधी ॥ विधिनिषेधां उडवितो ॥१४॥
मग दावी नाना चमत्कार ॥ भजों लागले जन समग्र ॥ म्हणती ईश्वर अवतार ॥ यासि निंदितां बरें नोहे ॥१५॥
मग केली अपार कविता ॥ बहु बोधिले उध्दरी पतितां ॥ ग्रंथीं पदें सारखीं संख्यारहिता ॥ ज्ञानकल्लोळ कृपाळू ॥१६॥
मार्गेश्वर पौर्णिमेसी ॥ लोपी आपुल्या स्वरुपासी ॥ भांडण लागलें ब्राह्मण अविंधासी ॥ एक पुरुं एक जाळूं म्हणती ॥१७॥
शेला घेती उचलोन ॥ शरीराचीं पुष्पें देखोन ॥ मोठा नवलाव जाणोन ॥ करिती नमन सर्वत्र ॥१८॥
जगीं विख्यात कीर्ती विस्तारली ॥ म्हणती कबीराचीं पुष्पें जाहलीं ॥ ऐसी कोणी नाहीं केली ॥ कलींत कळा अद्भुत ॥१९॥
ऐसा कबीर जगीं धन्य ॥ मातें स्वप्नीं दिलें दर्शन ॥ तोही गुरु माझा पूर्ण ॥ जपें त्यासी अहर्निशीं ॥२०॥
गीतार्थाची सिध्दी ॥ सांगतों सज्जनांचिये मांदीं ॥ अर्जुनाची सरिता बुध्दी ॥ मिसळे गोविंदी एकत्वें ॥२१॥
पंचदशाध्यायीं उत्तमपुरुष ॥ परिसोनि अर्जुनाचा संतोष ॥ मग म्हणे हृषीकेश ॥ दैवी आसुरी सांगतों ॥२२॥
जैसे रात्र आणि दिवस ॥ ज्ञान अज्ञान वसे जनांस ॥ जेवी कां पोट पाठीस ॥ एक परी अंतर ॥२३॥
कर उजवा आणि डावा ॥ परी निराळें कर्म पांडवां ॥ एकें धर्म करावा ॥ एकें प्रक्षाळावें ॥२४॥
यशोदेनें वाढवावा ॥ देवकीचा गौरव व्हावा ॥ उग्रसेना राज्यभार द्यावा ॥ कंसालागीं वधावें ॥२५॥
यापरी सुर असुर ॥ उभयतां कश्यपाचे कुमर ॥ त्यांच्या राहाटीचा प्रकार ॥ परिसें सांगतों पांडवा ॥२६॥
सत्य दया धर्म ॥ सम शांति क्षमा परम ॥ निर्वासना वृत्ति उपशम ॥ धैर्य विवेक शुध्दज्ञान ॥२७॥
दान धर्म गुण गांभीर्य ॥ विचार सुमती परम वीर्य ॥ परोपकारी औदार्य ॥ गुरुचर्या भजनीं सदा ॥२८॥
चित्त शुध्द मन बुध्दी ॥ धार्मिक वृत्ति सद्बुध्दी ॥ सदा बैसे संतवृंदीं ॥ सज्जनमांदी मेळवी ॥२९॥
इच्छा द्वेष कल्पना ॥ स्पर्शों नेदी अंत:करणा ॥ मायाळू दयाळू सर्वांभूतीं करुणा ॥ न दुखवी मनास कवणाचे ॥३०॥
दयाळू व मायाळू ॥ प्रेमाळू सरळू निश्चळू ॥ खोलू प्रांजळू विशाळू ॥ अचल निष्ठा भक्तीची ॥३१॥
आवडे संतांची संगती ॥ सर्वदा करी ईश्वरभक्ती ॥ नाम स्मरे दिवसरातीं ॥ अक्षय चित्तीं आनंदमय ॥३२॥
शास्त्रसंग्रहो पुण्य़संग्रहो ॥ न करी कोणाचा दुराग्रहो ॥ सर्वांस सारिखा मोहो ॥ हिंसाकर्म करीना ॥३३॥
शुचिर्भुत सर्वकाळ ॥ गेला वासनेचा मळ ॥ निर्विकल्प हृदय निर्मळ ॥ बोले मंजुळ सर्वांसी ॥३४॥
उडाला फुंद जिराली अहंता ॥ कोठें भेद न दिसे पाहतां ॥ मी आत्मा हा बोध तत्वतां ॥ ठसावला पुरता निश्चयो ॥३५॥
दैवीसंपत्तीचें लक्षण ॥ मोक्षमांदुसा आंतील रत्न ॥ सभाग्यपुण्यवंतां भूषण ॥ धन्य तो दैवाचा ॥३६॥
आतां आसुरीसंपदा ॥ तेही सांगतों सुबुध्दा ॥ जे भोगवी आपदा ॥ प्राप्त जाहल्या अधमा ॥३७॥
वागवी दंभदर्पांसी ॥ जे अवगुणांची राशी ॥ कठिण निष्ठुरता मानसीं ॥ निर्दय क्रूर दुरात्मा ॥३८॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हृदयीं कुवासनेचें भ्रष्ट बिढार ॥ भ्रष्ट नष्ट दुष्ट अविचार ॥ लोभिष्ट पापिष्ट मदोन्मत्त ॥३९॥
अघोरी तामसी लंड भंड ॥ धीट लबाड वागवी पाखंड ॥ कुश्चळ वाचाळ निंदक वितंड ॥ अमंगळ हिंसक ॥४०॥
कुचर चाहाड चोरटा ॥ परद्वारी सुरापानी कपटी मोठा ॥ भ्रष्टकर्मीं नष्ट नरकवांटा ॥ निढर्‍या त्यासी मोकळ्या ॥४१॥
ऐसीं लक्षणें ज्यापासी ॥ आसुरसंपदा म्हणावें त्यासी ॥ भोगावया नरकाशीं ॥ दुष्टांलागीं निर्मिले ॥४२॥
गगनोदरीं चंद्रतारा ॥ पृथ्वीपोटीं हिरा गारा ॥ समुद्र मंथनीं सुधा सुरां ॥ जनिता एक क्रिया भिन्न ॥४३॥
वेळूचें पोटीं करंडी केरसुणी ॥ तेवीं जनीं दैवी आसुरी योनी ॥ एक नेयी मोक्षालागुनी ॥ एक भोगवी नरकासी ॥४४॥
एक वृत्तीचे ठायीं ॥ सुवासना कुवासना उपजे पाहीं ॥ एक्या पित्याचे पुत्र दोघेही ॥ बिभीषण आणि रावण ॥४५॥
यालागीं जैसें आचरण ॥ तैसें त्यास प्राप्त जाण ॥ म्हणोनि शास्त्र आज्ञेकरुन ॥ वर्तावें आज्ञा पैं माझी ॥४६॥
दैवीआसुरींची राहाटी ॥ जाहल्या षोडशांच्या गोष्टी ॥ पुढें परिसा कसवटी ॥ सतराव्याची ॥४७॥
अर्जुन म्हणे गोविंदा ॥ तुम्हीं सांगा शास्त्रमर्यादा ॥ तीं प्रमाणींच्या श्रध्दा ॥ कैसें घडे सांग पां ॥४८॥
संसार चिंता अफाटे ॥ चहूंकडोनि चित्त फाटे ॥ शास्त्र श्रवण चोखटें ॥ केवीं घडे विचारीं ॥४९॥
मग उडे जेवीं कारंजा ॥ उकर्डीं बहु केराचा पुंजा ॥ गगनीं अभ्रांचिया मौजा ॥ वितुळे जमे रंग पालटे ॥५०॥
कित्येक रची मनसुब्यासी ॥ सवेंचि ढासळे उतरडी जैसी ॥ निजवी बैसवी देहासी ॥ जांभई अंग मोडी हांसवी रडवी ॥५१॥
कोणत्या ऐशा अनिवार मनाच्या खोडी ॥ केवीं शास्त्राची धरील गोडी ॥ त्रिगुणांची अनिवार वोढी ॥ कैसी श्रध्दा बैसेल ॥५२॥
कोणत्या गुणाचें काय लक्षण ॥ श्रेष्ठ कनिष्ठ मध्यम जाण ॥ जेणें होईजे पावन ॥ ते श्रध्दा कोणती ॥५३॥
मग म्हणे श्रीगोविंद ॥ संसार करावया होसी सावध ॥ शास्त्रीं वर्तावया मतिमंद ॥ कां गा होसी जाणत्या ॥५४॥
गोचिड लागला आंचळास ॥ पय सांडूनि सेवी अशुध्दास ॥ तेवीं धरितां कुसंगास ॥ घडे बध्दता मोक्ष कैंचा ॥५५॥
कैवर्तकासंगें मत्स्य मारणें ॥ ब्राह्मणसंगें हिंसा त्यागणें ॥ वेश्येसंगें पाप भोगणें ॥ स्वदारेसीं पवित्रता ॥५६॥
अताराघरीं सुगंध लाग ॥ लोहारासंगें शस्त्रास भंग ॥ शिंदीपासीं अपवित्र अंग ॥ पयप्राशनीं पवित्रता ॥५७॥
लबाडासंगें घडे चेष्टा ॥ भल्यापासी प्रतिष्ठा ॥ गंधकापासी गंध मोठा ॥ कस्तुरीपासी सुगंध ॥५८॥
दह्यासंगें खापर मस्तकीं चढे ॥ विष्ठेसंगें उकरडीं पडे ॥ संतसंगें मोक्ष जोडे ॥ पतनीं पडे पतितासी ॥५९॥
जैसा संग तैसी प्राप्ती ॥ ऐसी शास्त्रें नेमिली संगती ॥ यासाठीं सत्वगुणवृत्ती ॥ धरितां श्रध्दा पवित्र ॥६०॥
आतां सात्विकें भजावें देवासी ॥ रचें भजावें यक्षराक्षसांसी ॥ तमें भजावें भुतांसी ॥ त्रिविधप्रकार हे जाण ॥६१॥
शास्त्रबाह्य वर्तणें ॥ तितुकीं मूर्खलक्षणें ॥ क्रियाभ्रष्ट आचरणें ॥ हिंसाचारी पापिष्ठ ॥६२॥
सत्वगुणियास मिष्टान्न आवडे ॥ राजसिया बहुशाखा रुचि पडे ॥ शिळें भर्जितें आंबलें चित्त वोढे ॥ तामसियासीप्रियकर ॥६३॥
यज्ञक्रिया उत्तम देख ॥ निष्काम करावीं सात्विक ॥ जे परम प्रिय पवित्र चोख ॥ सत्पात्रीं दान नम्रता ॥६४॥
दंभाचार फळाशा ॥ हा यज्ञ करणें राजसां ॥ अफाट कर्मीं तामसा ॥ यज्ञ करी शास्त्रबध्द ॥६५॥
याकरितां सत्वशुध्दी ॥ धरितां प्राप्त आत्मशुध्दी ॥ हेही पतिव्रतेची बुध्दी ॥ पतिनिष्ठतेनें सुखी ॥६६॥
देव गुरु ब्राह्मणपूजन ॥ समयीं आलिया आतिथ्य करण ॥ घाली संतासि लोटांगण ॥ नमी आर्जवी सर्वांसी ॥६७॥
सरली वैराग्य खटपट ॥ बुडाली कल्पना साधनें कचाट ॥ हृदयीं आत्मज्ञान होय प्रगट ॥ नाहीं चटपट वृत्तीसी ॥६८॥
कायिक वाचिक मानसिक ॥ अवघा स्वयें आकारला विवेक ॥ गेली कल्पना कळंक ॥ शुध्द निर्मळ हृदय ॥६९॥
सदा ईश्वर वसे चित्तीं ॥ यास सात्त्विक तप म्हणती ॥ दंभाचार लोभीं मिरवती ॥ राजस तप या नांव ॥७०॥
तामस उगाचि जाळी देहासी ॥ प्रपंच ना परमार्थ त्यासी ॥ म्हणोनि सत्वगुणासी ॥ धरितां बरवें दिसतसे ॥७१॥
तीर्थ पर्वणीं सत्पात्रीं ॥ सात्त्विक दान त्यातें करी ॥ राजसी दंभाचारी ॥ देयी भाट बसविला ॥७२॥
तामसी भोरपी जळमंडळीस ॥ कोल्हांटी गारुडी चित्रकथ्यांस ॥ वेंची मदयपी द्रव्यास ॥ देयी वैदय दासीला ॥७३॥
अगा सात्त्विक दावावयासाठीं ॥ रज तम बोलिलों किरीटी ॥ सत्वगुणाची राहाटी ॥ देवलोकीं जाणिजे ॥७४॥
सत्तगुणाचा विचार ॥ सांगतों त्रिविधप्रकार ॥ ज्या नामें पैलपार ॥ पावले सनकादिक ॥७५॥
ओंतत्सदिती त्रिविध आकार ॥ याचा वियोग विचार ॥ यज्ञ दान तप कर्म साचार ॥ करितां उचित होतसे ॥७६॥
ओंकार म्हणिजे आकारा आलें ॥ तत्कर्मीं ब्रह्म अनुभविलें ॥ सत्कार आपणचि ब्रह्म जाहलें ॥ दुजेपणातें निरसोनि ॥७७॥
ऐसें सांगोनि जगदीश ॥ समाप्त केलें सत्रावियास ॥ पुढती वदेल अठरावियास ॥ तोही अर्थ परिसावा ॥७८॥
अर्जुन म्हणे त्याग आणि संन्यास ॥ दोहींचा विवेक एकची अस ॥ आमुच्या मानसीं स्वामी ऐस ॥ तुमचें कैसें मातें सांगा ॥७९॥
संन्यास अवघें त्यागावें ॥ कर्मीं माझे कांही न म्हणावें ॥ दोहींत श्रेष्ठ कोणतें जाणावें ॥ आचरणीं उत्तम अनंत ॥८०॥
हरि म्हणे नित्य नैमित्तिक स्वकर्म ॥ हा देहाचा होय धर्म ॥ हेंचि जाणोनि वर्म ॥ राजऋषि आचरती ॥८१॥
कामनिक करितां लागे बट्टा ॥ निष्कामीं मोक्षाचा वांटा ॥ यज्ञ दान कर्म उत्कंठा ॥ करीं मी कर्ता न म्हणावें ॥८२॥
एकास मीपणत्याग होईना ॥ त्रासोनि कर्म सांडी जाणा ॥ अधिक गोडी पडे मना ॥ कर्तव्य अंगीं आदळे ॥८३॥
यज्ञ दान क्रिया कर्म ॥ हें न टाकावें मुख्य वर्म ॥ कन्यापासोनि जनकोत्तम ॥ अभिलाषी ना देई दुसरा ॥८४॥
जामदार जतन करी द्रव्यासी ॥ आपुलें न म्हणे निश्चयेंसी ॥ तैसें संरक्षावें स्वधर्मासी ॥ वेद धणी आपण सेवक ॥८५॥
लेंक करी बापाचे घरीं धंदा ॥ मी घरधनी न म्हणे कदा ॥ तैसें स्वधर्म रक्षोनि मर्यादा ॥ न म्हणे माझें तों सूज्ञ ॥८६॥
आपुला स्वधर्म टाकोनि कठिण ॥ दुसर्‍याचा सोपा करण ॥ पती त्यजोनि व्यभिचारण ॥ तो न्याय दिसे परधर्मीं ॥८७॥
अगा स्वधर्माचा त्याग केला ॥ कर्म सुटेना तयाला ॥ जरी संन्यास घेतला ॥ जें करी तेंचि कर्म ॥८८॥
पांचांपासोनि जाहलें कर्म ॥ देहीं जीव प्राण इंद्रियधर्म ॥ यांपासोनि कर्मांचें वर्म ॥ आत्मयांत नसे कीं ॥८९॥
चक्षूनें पाहावें करे पदें वर्तांवें ॥ चक्षू कर पाद नव्हे ॥ यापरी आत्म्याचें वैभवें ॥ कर्म चालवी अकर्तेपणें ॥९०॥
कर्म आणि आत्मयासी अंतर न भाक्षितीसी ॥ पाहतां सूर्यापासी ॥ विश्वराहाटी नसे कीं ॥९१॥
आत्मयासि कर्म नाहीं ॥ कर्म अहंकाराचें ठायीं ॥ तो अहंकार टाकितां देहीं ॥ कर्मक्रिया शून्यवत ॥९२॥
सूर्यापासी रात्रिं कैंची ॥ परिसें स्पर्शतां काळिमा नसेची ॥ ब्रह्म अनुभवें कर्म तैसेंची ॥ उरे दृश्य द्रिष्टे निशीं ॥९३॥
ही अनुभवाची जाती । सांगितली तुजप्रती ॥ पूर्वपक्षाची रीती ॥ देहासि कर्म असे कीं ॥९४॥
ज्ञाता म्हणे जीवासी ॥ ज्ञान बोलिजे इंद्रियांसी ॥ ज्ञेय तो विषयांसी ॥ अन्यथा ज्ञान जाणावें ॥९५॥
अज्ञानास विषय ब्रह्म ॥ माझें म्हणोनि करी कर्म ॥ ज्ञाता ने घे देहभ्रम ॥ कर्मबाधा त्यासी नाहीं ॥९६॥
सत्वगुण मीच ब्रह्म आहें ॥ भेदभ्रांति त्यासीं न होये ॥ रजोगुणी भेद वाहे ॥ द्वैतविकल्पी सर्वदा ॥९७॥
तामसी न मानी शास्त्रासी ॥ करी निंदय कर्मांसी ॥ अफाट सुटल्या वायूसी ॥ कोण त्यासी आवरी ॥९८॥
सात्विक स्वधर्मीं नीट चाले ॥ सर्वांसी नम्र बोले ॥ राजसा भला बुरा नकळे ॥ निंदी मातापितयांसी ॥९९॥
जैसें सजगुरियांचें कणिस ॥ तैसा ताठे तामस ॥ आळस निद्रा देयी जांभईस ॥ शुभ अशुभ सुचेना ॥१००॥
सात्विक निष्काम करी कर्म ॥ राजसी लोभाचाराचा संग्रहो परम ॥ खट नष्ट गुण अधम ॥ तमागुणी असे कीं ॥१॥
हंस निवडी पयपाणी ॥ पारखी निवडी पयपाणी ॥ पारखी निवडी रत्नांलागूनी ॥ श्वान स्वीकारी वमनासि मनीं ॥ तैसी बुध्दि राजासी ॥२॥
चक्षुहीनासि दिवा सारिखा ॥ कटुकीस गोडपण कैचें देखा ॥ दर्दुर नेणें सुवासिका ॥ तैसा तामसी अमंगळ ॥३॥
सात्विक परमार्थीं धरी धीर ॥ राजसाचा लौकिकावर भर ॥ तामसी विषयांवर निर्धार ॥ दु:ख भोगी त्रासेना ॥४॥
आत्मप्राप्ती करणें तें सुख ॥ येविषयीं सर्व दु:ख ॥ विषयीं जो झाला विमुख ॥ तोचि सुखी सर्वदा ॥५॥
राजसी विषयांतें सुखी ॥ तामस दिसे तें संतोषी ॥ जे भोगवी नरकीं ॥ श्वानसूकरयोनीसी ॥६॥
यासाठीं गुणांचे ॥ देह वोतिले साचे ॥ उत्तम मध्यम कनिष्ठींचे ॥ प्रकार असती जाणपां ॥७॥
जयागुणीं चारी वर्ण ॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जाण ॥ चौथा शूद्र कनिष्ठपण ॥ शास्त्र अधिकार त्या नसे ॥८॥
सत्वगुणाचे ब्राह्मण ॥ सत्वरजमिश्रित क्षत्रिय वैश्य जाण ॥ रजतमिश्रित वर्ण शूद्र निश्चयें जाणावें ॥९॥
ब्राह्मणांचे नव गुण ॥ त्यांचें सांगतों वर्तन ॥ ज्यांत ईश्वरप्राप्ती पावन ॥ श्रेष्ठ सर्वां पूज्य तो ॥११०॥
शम म्हणिजे मनोवृत्तीस अवरावें ॥ दम तम इंद्रियां दमावें ॥ तप ईश्वरीं चित्त ठेवावें ॥ शौच कल्पना टाकावी ॥११॥
शांति म्हणिजे अहंकार टाकणें ॥ आर्जवे सर्वांसी ऐक्य होणें ॥ ज्ञान बोलिजे सर्व ब्रह्म पूर्ण ॥ विज्ञानें निरसावें आपणा ॥१२॥
विश्वीं विश्वंभर पूर्ण ॥ यालागीं गेली कल्पना निमोन ॥ विकारलेश निरसिला धुवोन ॥ आस्तिक भाव तो हा ॥१३॥
हा ब्राह्मणआचार ॥ परी क्षत्रियाचा विचार ॥ सत्वगुणाचा निर्धार ॥ ज्याच्या ठायीं वसे कीं ॥१४॥
शूर धीर दक्षता ॥ समरंगणीं न ये फिरतां ॥ महातेज दानी उदारता ॥ ईश्वरीं निष्ठा ढळेना ॥१५॥
सवंग घ्यावें महाग विकावे ॥ हे वैश्याचे गुण स्वभावें ॥ तिहीं वर्णाचें शुश्रुषण करावें तें असे ॥१६॥
यालागीं जातिस्वभावें जें आलें ॥ तें कर्म पाहिजे केलें ॥ तें वेदी असें नेमिलें ॥ तेचि आज्ञा पैं माझी ॥१७॥
उदक पातळपण विटे ॥ पाषाण कठिणत्वासी घटे ॥ बाभुळ म्हणे नलग कांटे ॥ अमृतफळें त्या कैचीं ॥१८॥
हिंगण म्हणे करा चंदन ॥ गंधक इच्छी कस्तूरी गुण ॥ अपानद्वारीं सुगंध येणं ॥ कसे घडे सांगपां ॥१९॥
ज्याचा तो अधिकारी ॥ तैसेंचि वर्तावें साचार ॥ पायांचें काम कर ॥ करितां उचित दिसेना ॥१२०॥
तूं क्षत्रियवंशीं जन्मलासी ॥ सत्य गुणार्णवीं घडलासी ॥ तो स्वभाव तुजपासी ॥ झुंजवील निर्धारें ॥२१॥
आतां घेऊन धनुष्यबाण ॥ संहारीं दुष्ट दुर्जन ॥ याचसाठीं अवतार घेणें ॥ मज पडलें पांडवा ॥२२॥
सांगीतली स्वधर्मरचना ॥ तेचि करावी पांडुनंदना ॥ मी कर्ता हे भावना ॥ उठों नेदी देहातें ॥२३॥
अद्वैत बोध जंव न ठसे ॥ तंववरी कर्म लागले असे ॥ गंगा समुद्रीं केलिया पवेश ॥ मग खळबळ कासयाची ॥२४॥
आत्मबोध उघड समाधी ॥ हे परमयोग्यांची सिध्दी ॥ तुटे त्रिपुटीची संधी ॥ विधिनिषेध मग कैंचा ॥२५॥
अंगीं भेटली त्रिपुटी ॥ ज्ञानदीप उजळला घटीं ॥ पापपुण्य न पडे दिठीं ॥ दिसे सृष्टि ब्रह्मची ॥२६॥
या बोधीं भेद नाहीं ॥ तुझें पापपुण्य मीच पाहीं ॥ प्रळयांबु जाहलिया पाहीं ॥ सरिता कोठें दिसेना ॥२७॥
यालागीं ज्ञानभक्तिश्रेष्ठ ॥ सप्तमाध्यायीं बोलिलों स्पष्ट ॥ जेणें मी ब्रह्म एकवट ॥ द्वैतातीत अद्वय जें ॥२८॥
तरंग समुद्रावरी खेळे ॥ गोडी गुळांत भेसळे ॥ तेवी तूं स्वरुपांत मिसळे ॥ मी अर्जुन निरसोनी ॥२९॥
क्रिया कर्म पापपुण्य ॥ अवघा होईल जनार्दन ॥ माझ्या अद्वैतशक्तीचें लक्षण ॥ प्राप्त होईल तुजलागीं ॥१३०॥
इतरशास्त्रें दोष निरसिती ॥ परी ब्रह्म करुं न शकती ॥ माझी अद्भुत शक्ती ॥ गीता होय जाण पां ॥३१॥
निशाहरणीं मार्तंड ॥ तेवीं संसारग्रामीं गीता प्रचंड ॥ पेटल्या वन्हि प्रळय उदंड ॥ कैचें तृण उरावया ॥३२॥
अगा वज्रशस्त्रापुढें ॥ इतर शस्त्र काय बापुडें ॥ तेवीं माझिया गीतेस भिडे ॥ ऐसें शास्त्र असेना ॥३३॥
तूं माझें बोलणें अव्हेरुनी ॥ मी अर्जुन हें घेसी मनीं ॥ तरी पडशील महापतनीं ॥ मुक्तदशा जाईल ॥३४॥
मी देह म्हणतां असंख्य बुडाले ॥ मी आत्मा म्हणतां मुक्त जाहले ॥ सर्वां सिध्दींतें पावले ॥ मोक्षपदीं बैसोनी ॥३५॥
अगा हेचि माझी आज्ञा ॥ युध्द करावें समरंगणा ॥ स्वधर्में वर्तावें अर्जुना ॥ हेचि ममाज्ञा निश्चयें ॥३६॥
रोग दारिद्रय चिंता ॥ यांची कायसी असे चिंता ॥ परंतु आलिया चिंता ॥ त्यासी काय करावें ॥३७॥
कर्मांचा चालक ईश्वर ॥ तो हृदयीं वसे साचार ॥ कर्म चालवी त्याचें सूत्र ॥ तूं अहंता धरुं नको ॥३८॥
कायावाचामनोभावें ॥ त्वां माते शरण यावें ॥ तुज दोष न स्पर्शे स्वभावें ॥ तरसी सत्य भाक माझी ॥३९॥
इतर शास्त्रें सरिता ॥ हे समुद्र हाय गीता ॥ वेदवृक्षाचें मूळ पाहतां ॥ गीता बीज हाय का ॥१४०॥
गीता नाम शास्त्र ॥ पढे जयाचें वक्र ॥ दोष नुरे क्षणमात्र ॥ होय पवित्र मद्भक्त ॥४१॥
निरसोनियां द्वैतासी ॥ नेवोनि बसवी मोक्षपदासी ॥ हें सामर्थ्य गीतेसीं ॥ आणिकापासीं असेना ॥४२॥
यालागीं बुध्दि आणि मन ॥ माझें ठायीं करीं अर्पण ॥ अखंड नामस्मरण ॥ करीं गर्जना मुखानें ॥४३॥
सर्वत्र मातें किरीटी ॥ पाहें अंतर्बाह्यदृष्टीं ॥ मग मीच होसी शेवटीं ॥ लवण जैसें सागरीं ॥४४॥
धर्में इतर देवांची उपासना ॥ सांडावी फळवासना ॥ मातें शरण यावें जाणा ॥ तरसी संशय नसेचि ॥४५॥
तुझिया सर्वपापासी ॥ मी संहारीन हृषीकेशी ॥ बैसवीन मोक्षपदासी । निश्चयेसीं जाणपां ॥४६॥
अगा माझी हे गीता ॥ तपहीना सांगों नये सर्वथा ॥ अथवा तपक्रिया आचरे पुरता ॥ परी गुरुभक्ति नव्हे जया ॥४७॥
त्यासी हें अद्वैतशास्त्र ॥ सांगों नये बीजमंत्र ॥ गुरुभक्ति करी पवित्र ॥ परी श्रवणीं आस्था नसे कीं ॥४८॥
तयासि गीतेची गोष्टी ॥ घालूं नये कर्णपुटीं ॥ जैसीं मुक्ताफळें गोमटीं ॥ छिद्राविण कामा न येती ॥४९॥
तपीं गुरुभक्ति श्रवणीं आस्था ॥ त्यासी सांगे ज्या आवडे गीता ॥ तो माझा पढियंता ॥ प्राणसखा जाण पां ॥१५०॥
जो माझे गीतेची निंदा करी ॥ तो चांडाळ दुराचारी ॥ पचेल बहुकाळ नरक घोरीं ॥ त्याचा स्पर्श करुं नको ॥५१॥
माझी गीता नित्य पढे ॥ त्याचें निवारीं भवसांकडें ॥ संतांपासी जो धरी आवड ॥ तोचि पढिये मंत्रहोय ॥५२॥
म्यां तूतें उपदेश केला ॥ तो तुझिया हृदयीं बैसला ॥ मी पुसेन त्या खुणेला ॥ उत्तर करीं जाणत्या ॥५३॥
स्वयें गोत्र होतें मानसी ॥ तें गेलें कीं आहे तुजपाशीं ॥ अर्जुन म्हणे गोत्र मोहाची राशी ॥ गेली कुटुंबेसी दोष नुरे ॥५४॥
अर्जुन म्हणे सूर्यापासीं ॥ अंधार पुससी हृषीकेशी ॥ समुद्राचिया उदरासी ॥ लवण शोधितां मिळेना ॥५५॥
आतां मोहाची वार्ता ॥ स्वप्नीं न दिसे पाहतां ॥ त्वां कृपा केली अनंता ॥ सांगसी तें स्वीकारुं ॥५६॥
अर्जुनाचिया बोला ॥ पुरुषोत्तम संतोषला ॥ मग पार्थ पोटासी धरिला ॥ कर ठेविला मस्तकीं ॥५७॥
संजय म्हणे ऐक राया ॥ श्रीकृष्णें केली दया ॥ पार्थासि आलिंगन देऊनियां ॥ पाठी हातें थापटी ॥५८॥
जें उपनिषदांचें सार ॥ सर्वशास्त्रांचें गुह्य भांडार ॥ ब्रह्मज्ञानाचा निर्धार ॥ व्यासप्रसादें ऐकिला ॥५९॥
जाहलें आमुचें कल्याण ॥ ऐसा हर्षानंदपावोन ॥ अष्टभावें उचंबळोन ॥ नेत्रीं अश्रु पातले ॥१६०॥
धृतराष्ट्रास म्हणे तूं कां रडसी ॥ कोण पुसे तुझिया परमार्थासी ॥ सांग जय होईल कवणासी ॥ दुर्योधन समर्थ माझिया मतें ॥६१॥
संजय म्हणे नृपती ॥ कृष्णार्जुन ज्या रथीं ॥ तेथें जय लक्ष्मी तिष्ठती ॥ आमुच्या मतीं निश्चय सत्य जाणपां ॥६२॥
समग्र भारतींची राहाटीं ॥ शेवटीं सांगितली निश्चय गोष्टी ॥ अष्टादश अध्यायींचे देठीं ॥ श्लोक एक संजयाचा ॥६३॥
गीता शास्त्र अगाध ॥ स्वयें वदला श्रीगोविंद ॥ पापराशी होती दग्ध ॥ श्रवण करितां हा महिमा ॥६४॥
याची फलश्रुती ॥ व्यास वदला बहुतां रीतीं ॥ जगप्रसिध्द विख्यात कीर्ती ॥ कवीनें काय सांगावें ॥६५॥
नाहीं लिहिला विस्तार ॥ सोडिला नाहीं बीजांकुर ॥ श्रोते समजोत चतुर ॥ दूषण न ठेवावें कवीतें ॥६६॥
मागें टीका फार जाहली ॥ पुढती होतील भविष्यावळी ॥ गीतासिंधू माउली ॥ किती मेघ उपसती ॥६७॥
एका दीपीं अनेक दीप लाविती ॥ पर उणी नव्हे दीपज्योती ॥ तेवीं गीतेच्या अर्थीं ॥ अगाध अर्थ भरलासे ॥६८॥
शर्करेचिया गिरीसी ॥ काय नेती मुंगिया गृहासी ॥ तैसें गीतेच्या अर्थासी ॥ किती एक कवि वदती ॥६९॥
धत्तुरपुष्प वाहोनि ॥ संतोष कीजे पिनाकपाणी ॥ तैसें म्यां बाळभाषणीं ॥ संतांपुढें बोललों ॥१७०॥
सिंधूउदक सिंधूसी अर्पिती ॥ तैसे तुमचे अर्थ तुम्हांप्रती ॥ मालधनीं संत असती ॥ शहामुनी हमाल ॥७१॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये एकोनचत्वारिं शत्तमोध्याय: ॥३९॥
अध्याय ॥३९॥ ओव्या ॥१७१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP