मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ३६ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३६ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
तूतें वंदितों सद्गुरुस्वामी देवा ॥ तुझा ग्रंथ सिध्दांत सिध्दी न्यावा ॥ कृपाहस्त माझें शिरीं ठेवी बावा ॥ भवाब्धींत तारीं हरीं रे त्रितापा ॥१॥
आतां नमूं वंशावळी ॥ जन्म घेतला ज्यांचे कुळीं ॥ पणजा आमुचा मुळीं ॥ नाम त्याचें शहाबावा ॥२॥
महाराष्ट्र आणि पारशी ॥ उभयपक्षीं विद्या त्यासी ॥ आराधिलें होतें शिवासी ॥ एकनिष्ठ उपासना ॥३॥
आमिना होती त्याची अंगना ॥ परम पतिव्रता सत्यजाणा ॥ ती प्रसवली पुत्ररत्ना ॥ नाम तयाचें जनाजी ॥४॥
तों करी विष्णूची भक्ती ॥ मंडुबाई तयाची प्रकृती ॥ ती प्रसवली पुत्र सुमती ॥ नाम तयाचें मनसींग ॥५॥
त्याची भार्या नाम आमाई ॥ लोक म्हणती तिला ताई ॥ ती आम्हासी जाहली आई ॥ जन्मविलें पवित्र कुशींतें ॥६॥
पिता होता गणेशउपासक ॥ पोटीं आजा आला नामधारक ॥ हें जाणोनि कौतुक ॥ नाम ठेविलें शहाबावा ॥७॥
पणज्यापासीं होतें भक्तीचें बीज ॥ तोचि अंकुर विस्तारला सहज ॥ म्हणोनि संतचरणींचें रज ॥ प्राप्त जाहलें दैवानें ॥८॥
पणजा जन्मला प्रयागतीर्थी ॥ आजा जन्मला अवंतिकेप्रती ॥ सिध्दटेक ज्यास म्हणती ॥ जन्म पित्याचा त्या ठायीं ॥९॥
भीमातटीं पेगडांव शहर ॥ पूर्वेस सरस्वतीसंगम साचार ॥ ताईमातेचें पवित्र उदर ॥ जन्म दिला आम्हांसी ॥१०॥
पणजा होता वैराग्यखाणी ॥ रत्न प्रसवली तेथोनि ॥ वंशवेलीची मांडणी ॥ निवेदीं तुम्हां सज्जनहो ॥११॥
होतें पदरीं वडिलांचें पुण्य ॥ लाधलों तुम्हां संतांचे चरण ॥ जाहलें पापाचें खंडण ॥ मुकलों जन्ममरणांसी ॥१२॥
बरवी लाभाची जोडी ॥ उभारितों ग्रंथाची गुढी ॥ जे परिसिती आवडीं ॥ त्यांसी गोडी सुधेहूनी ॥१३॥
सोमवंशामाझारी ॥ कौरव जन्मले पांच केसरी ॥ राज्यलोभें कलहो भारी ॥ बंधुवर्गांसी लागला ॥१४॥
कौरवी मांडोनि कपटास ॥ पांडव धाडिलें वनवासास ॥ त्रयोदश वर्षें कष्टास ॥ भोगिले तिहीं जाणिजे ॥१५॥
सरली क्लेश भोग रजनी ॥ कृष्णकृपेचा उगवला तरणी ॥ मग वीरश्री बाणोनी ॥ राज्यविभाग मागती ॥१६॥
दुर्योधन नेदी विभागासी ॥ कलहो माजला उभयवर्गांसी ॥ घेऊनि अठरा अक्षौहिणी दळांसी ॥ कुरुक्षेत्रासी पातले ॥१७॥
धृतराष्ट्र म्हणे संजयाला ॥ कुरुक्षेत्रीं कौरव पांडव गेले युध्दाला ॥ त्यांत जय येईल कवणाला ॥ मातें सांग उगवूनी ॥१८॥
संजयो म्हणे कौरवराया ॥ दोनी सैन्य मीनलियां ॥ पार्थे संतोष पावोनियां ॥ काय बोले कृष्णासी ॥१९॥
फाल्गुन म्हणे शारंगपाणी ॥ रथ चालवीं झडकरोनि ॥ उभयतां सैन्यांची घांसणी ॥ रथ थोपीं मध्यभागीं ॥२०॥
विनंती करितां किरीटी ॥ रहंवर चालवी जगजेठी ॥ उभय सैन्यांची मिठी ॥ बाणवृष्टींत उभा केला ॥२१॥
अवलोकोनि सख्यागोत्रजांसी ॥ करुणा आली पार्थासी ॥ कंप सुटला अंगासी ॥ रथाखालीं उतरला ॥२२॥
संशय म्हणे ऐका राया ॥ दोनी सैन्यें भिडलियां ॥ अर्जुनें स्वगोत्र पाहूनियां ॥ मोहे तेथें द्रव आला ॥२३॥
मग म्हणे कृष्णालागोनी ॥ हा समुदाव देखिला नयनीं ॥ येथें आप्तवर्गावांचोनी ॥ पारकें कोणी दिसेना ॥२४॥
शस्त्र घेऊनियां तीक्ष्ण ॥ कैसे वधावे स्वजन ॥ आपुल्या गोत्रजांचें करावें छेदन ॥ कोण्या शास्त्रीं नेमिलें ॥२५॥
पाहतां सृष्टीचें ठायीं ॥ हिंसेसमान पाप नाहीं ॥ हा विचार नसे ज्याचें हृदयीं ॥ तो दुराचारी कृतघ्न ॥२६॥
हिंसा पाप महाभारी ॥ हिंसाकर्मीं तो अघोरी ॥ परपातकी निर्दय निष्ठुरी ॥ नष्ट पापी बोलिजे ॥२७॥
चुलते बंधू मामे मेहुण ॥ आजा गुरु द्रोण ब्राह्मण ॥ नातू पणतू मित्र जाण ॥ सोइरे सज्जन असती ॥२८॥
नरदेहा आलिया हाचि पुरुषार्थ ॥ जे वधावे गोत्रज समस्त ॥ भला नरकाचा पंथ ॥ उघड दिसों येतसे ॥२९॥
पृथ्वीचे सकळ भूपाळ ॥ प्रतापें जिंकोनियां सकळ ॥ संरक्षीजे आपुलें कुळ ॥ कुटुंबेंसीं जाण पां ॥३०॥
संतांस व्हावें शरणागत ॥ जनकजननीचें घ्यावें तीर्थ ॥ त्यांसी कीजे शस्त्रघात ॥ कोण ग्रंथीं हें लिहिलें ॥३१॥
जरी मारावें दुर्योधनासी ॥ मग कां ठेवावें धर्मासी ॥ उभयतां बंधु आम्हांसी ॥ गोत्रवध सहजचि ॥३२॥
परस्परें होय संहार ॥ तेणें प्राप्त नरक घोर ॥ पूर्वजांसि नरक साचार होय ॥ आचरणें आमुच्या ॥३३॥
राज्यभोग नाशवंत ॥ त्यासाठीं कीजे एवढा अनर्थ ॥ हें नव्हे आमुतें उचित ॥ बरवें अच्युता विचारीं ॥३४॥
येथूनि बरवा संन्यास ॥ त्यागूनि सेविजे वनास ॥ राज्यापरीस क्लेश ॥ भोगिता लाभ दिसतसे ॥३५॥
देश त्यागूनि जाइजे परमुलुखा ॥ बैसिजे गिरिकंदरीं देखा ॥ परी युध्दाचा आवांका ॥ यदुनायका घडेना ॥३६॥
आपण निर्वैर होऊन ॥ सोसावे निर्वाणबाण ॥ शेखीं पातल्या मरण ॥ त्यांत कल्याण आमुतें ॥३७॥
ऐसें बोलूनि गहिंवरला ॥ मोहें शोकें दाटला ॥ म्हणे कृष्णा आंता चला ॥ रणप्रसंग पाहों नये ॥३८॥
यापरी करुणेनें व्यापूनी ॥ अश्रुबिंदु पातले नयनीं ॥ पहिल्या प्रसंगाची मांडणी ॥ इतुक्यांत जाहली समाप्त ॥३९॥
दुसरिया प्रसंगाची मांडणी ॥ ते परिसावी सज्जनीं ॥ ज्यांत संशय नुरे मनीं ॥ उघड अर्थ सांगतों ॥४०॥
पाहोनि अर्जुनानी दशा ॥ हांसे आलें जगदीशा ॥ म्हणे पार्थ जाहला पिसा ॥ यासी काय करावें ॥४१॥
म्हणे नवल अर्जुना पाहीं ॥ तुवां आरंभिलें ये समयीं ॥ कोणत्या उणेपणाची डाई ॥ तूतें आली सांगपां ॥४२॥
तुझिया प्रतापाची थोरी ॥ संग्रामीं जिंकिला त्रिपुरारी ॥ संहारुनि निवातकवच भारी ॥ स्वस्थ केलें इंद्रासी ॥४३॥
शिक्षा करुनि गंधर्वासी ॥ सोडूनि आणिलें दुर्योधनासी ॥ गोग्रहणी कौरवांसी ॥ त्रासिलें त्वां बळिष्ठा ॥४४॥
बाण धाडोनियां स्वर्गी ॥ ऐरावत आणिला मातेलागीं ॥ कीर्ति विख्यात जाहली जगीं ॥ धन्य अर्जुन म्हणवोनी ॥४५॥
यंत्र भेदोनि जिंकिली पाचाळी ॥ कौरवां काळिमा लाविली ॥ कर्ण शल्य महाबळी ॥ शिथिल जाहले रणयुध्दीं ॥४६॥
तुज केसरीची ऐकोन हांक ॥ कौरवजंबुकां भरला धाक ॥ भाट होऊनि नृपलोक ॥ तुझा महिमा वानिती ॥४७॥
तो पुरुषार्थ सांडोन ॥ होऊं पाहसी रंक दीन ॥ क्लीब बोलती दुर्जन ॥ निंदिती नपुंसक म्हणोनी ॥४८॥
तूं न करिसी समरंगण हे चहोंकडोनि मारिती बाण ॥ मग विषाद पावोन ॥ पुन: युध्द करिसी कीं ॥४९॥
तूं समरंगणीं मृत्यु पावसी ॥ जासी स्वर्गप्राप्तीसी ॥ जिंकिलें तरी भोगिसी ॥ राज्य अवघें महीचें ॥५०॥
जित्या मेल्या लाभ भारी ॥ येवढी भाग्याची थोरी ॥ स्वधर्म नेमिला शास्त्रीं ॥ यासी काय करावें ॥५१॥
पार्थ म्हणे जगदीशा ॥ हा विपरीत बोध ठसा ॥ बळें घासितां कोळसा ॥ चंदन कैसा होईल ॥५२॥
पेरिली शेतीं नाचणी ॥ गहूं उगवेल कोठूनी ॥ गळां बांधला कांचमणी ॥ हिरा कैसा होईल ॥५३॥
ज्याकर्मी घडे दोष ॥ तेथें कैंचा मोक्षलेश ॥ अंगना आचरली जारकर्मास ॥ कैसी होय पतिव्रता ॥५४॥
जो आचरे कर्म भोंदू ॥ तो कैसा होईल साधू ॥ इंद्रियभ्रष्टासी इंद्रपदू ॥ केवीं आतुडे सांगपां ॥५५॥
द्रोणगुरुनें कृपा करुन ॥ हृदयीं ठसाविलें विद्याधन ॥ त्याचें फेडावें उसण ॥ शस्त्रें वधावें काय तया ॥५६॥
भीष्म दयेची राशी ॥ मोहें वाढविलें आम्हांसी ॥ केवीं निष्ठूर व्हावें त्यासी ॥ हृषीकेशी विचारी ॥५७॥
ऐसिया श्रेष्ठांचा करुनि वधू ॥ मग भोगावया राज्यपदू ॥ तेव्हा जीत नरकसंबंधू ॥ घडला नलगे पुसावें ॥५८॥
तुझे चरणीं ठेवितों डोई ॥ मज राज्याची चाड नाहीं ॥ तुमचा उपदेश माझें हृदयीं ॥ विपरीत वाटे जनार्दना ॥५९॥
कृष्णा म्हणेरे अर्जुना म्हणेरे अर्जुना ॥ बरा बोलसी शाहाणा ॥ हा विचार आणोनि मना ॥ स्वगेहीं स्वस्थ राहों नये ॥६०॥
सैन्य घेऊनि अचाट ॥ समरंगणीं पातला नीट ॥ लागतां शरांचे चपेट ॥ वदसी युध्द करींना ॥६१॥
तूं जन्मलासि क्षत्रियवंशीं ॥ समरंगणीं युध्द न करिसी ॥ पुण्यक्षयीं पतन पावसी ॥ होसी भ्रष्ट स्वधर्मी ॥६२॥
तूं म्हणसी माझे गोत्रज ॥ हेंचि वाटे मातें चोंज ॥ नेणसी आत्मज्ञानाचें गुज ॥ मोहभ्रमें बरळसी ॥६३॥
मी अर्जुन हे कोण ॥ मनीं पाहें विचारुन ॥ मग कौरव आपुले स्वजन ॥ नेमीं वरे जाणत्या ॥६४॥
अवघीं पंचभूतें एक ॥ कैचें कौरव कैंचें पांडव देख ॥ हा जाणोनियां विवेक ॥ नसते गोत्रज कल्पिसी ॥६५॥
जीवासी नाहीं मरण ॥ न उडे प्रभंजनें करुन ॥ न होय हुताशनें दहन ॥ जळत्यासी बुडविना ॥६६॥
न तुटे शस्त्राचे घायीं ॥ आत्मा अविनाश असे पाहीं ॥ त्यासि तूं मारिसी काई ॥ मिथ्या अहंकृती धरुं नको ॥६७॥
तूं एक मारिता होसील ॥ मग हे दुजे मरतील ॥ आत्महत्या मज घडेल ॥ या संशयीं पडूं नको ॥६८॥
हा तुझा लटिका अभिमान ॥ मारिता मरत मिथ्या जाण ॥ सर्वांघटीं एक चैतन्य ॥ अंतर बाह्य व्यापक ॥६९॥
जैसें उदकावरी बुडबुड ॥ तैसी सृष्टीची घडमोड ॥ जन्ममरणांची गडबड ॥ लटकी हडबड जीवांसी ॥७०॥
जैसा स्वप्नींचा व्यवहारु ॥ भासे दिसे नानाप्रकारु ॥ तैसाचि हा बडिवारु ॥ अविद्येमुळें वाढतो ॥७१॥
अविद्या वाढली सकळ ॥ विषयध्यास करी प्रांजळ ॥ त्यांत दु:खाचे बंबाळ ॥ इंद्रियद्वारें उद्भवती ॥७२॥
एक वार्ता परिसोनि संतोष ॥ एक करी दु:खाचा पोष ॥ एक पाहावया उल्हास ॥ एक दावी भयातें ॥७३॥
सुवासा वोढवी घ्राण ॥ कुवास लागतां जाय त्रासून ॥ गोड रस स्वीकारी आवडीन ॥ विटे रसना कडूसी ॥७४॥
पलंग न्याळी वरी करी शयन ॥ सुखावे त्वचा निवे मन ॥ वृश्चिकें डंखितां जाण ॥ होय दहन देहाचें ॥७५॥
हा सुखदु:खाचा ठेवा ॥ इंद्रियद्वारें धडे जीवा ॥ देहातीत होतां उगावा ॥ सहज होय ज्ञात्यासी ॥७६॥
त्रिगुणांत पडला वेद ॥ यालागीं सत्वशुध्द ॥ ज्यांत निखिल आत्मबोध ॥ द्वंद्वातीत सद्वस्तू ॥७७॥
यालागीं पंडित ॥ बुध्दि बोधें वर्तत ॥ संसार जाणोनि अंतवंत ॥ विवेकीं लक्ष्य ठेविती ॥७८॥
देहामुळें प्रपंच होत ॥ प्रपंची पापपुण्य निपजत ॥ पापपुण्य फळें देत ॥ स्वर्ग आणि नरकाचे ॥७९॥
देब संबंधी पुत्र दारा ॥ होय सोयर्‍यांचा पसारा ॥ पडे चौर्‍याशींचा फेरा ॥ देहामुळें जाण पां ॥८०॥
यालागीं होईजे देहातीत ॥ शुध्दज्ञान जाण बुध्दिमंत ॥ महाधैर्य मेरुवत ॥ अचळ राहतीं ध्रुवेसी ॥८१॥
अंगीं बुध्दियोगाचें कवच ॥ लागों नेदी सुखदु:खाचे पेंच ॥ पापपुण्य उंचनीच ॥ ज्याच्या दृष्टीं दिसेना ॥८२॥
कामनातीत निष्काम ॥ हृदयीं लक्षिती आत्माराम ॥ सर्वांभूतीं वृत्ति सम ॥ विषमभाव नसे जया ॥८३॥
हृदयांत बुध्दिसंचार ॥ कोटि पापांचा करी संहार ॥ ऐसा उदेला सहस्त्रकर ॥ शर्वरीस ठाव मग कैंचा ॥८४॥
गंगा मिळे उदधीं ॥ तैसा स्वरुपीं सद्बुध्दी ॥ तोचि बैसे सायुज्यपदीं ॥ सद्बुध्दीचेनि योगें ॥८५॥
युक्तिबळें पुरुष शाहाणे ॥ जिंतोनि जाती संसारालागून ॥ यश अपयशांचें गणन ॥ स्वप्नपाय ज्यां दृष्टीं ॥८६॥
यापरी बुध्दीचा योग ॥ वदला स्वमुखें श्रीरंग ॥ येथोनि द्वितीय प्रसंग ॥ समाप्त जाहला जाणिजे ॥८७॥
तृतीयअध्यायीं अर्जुन ॥ बोले आशंका घेऊन ॥ म्हणे विपरीत ज्ञान ॥ तुमचें ऐकों श्रीकृष्णा ॥८८॥
अव्यय आत्मा एक ॥ हाही सांगोनि विवेक ॥ गोत्रज वधावे आवश्यक ॥ नि:शंक बोधा आम्हांसी ॥८९॥
म्हणतां स्वधर्मी युध्द करावें ॥ मग म्हणतां समताबुध्दि धरावें ॥ तया भेद दिसे स्वभावें ॥ एकहि नीट बोलांना ॥९०॥
जगदीश म्हणे गा किरीटी ॥ सांगितली सांख्याची हातवटी ॥ बुध्दि बोधाची हे गोष्टी ॥ सहज तूतें निवेदिली ॥९१॥
याचा अर्थ न समजून ॥ बोलसी विषाद मानून ॥ दोन्ही मार्ग मजपासून ॥ अनादिसिध्द आसती ॥९२॥
एक संन्यास योग जाण ॥ दुसरा कर्मयोग गहन ॥ दोहींचेंही साधन ॥ प्राप्ति एकपदाची ॥९३॥
संन्यासयोगापासून ॥ सोपा कर्मयोग जाण ॥ मोक्षगति कर्मावांचून ॥ प्राप्त न पावे जाणपां ॥९४॥
एक कर्मातें त्यागून ॥ संन्यास घेती शाहाणे जाण ॥ परी कर्तव्यकर्म दारुण ॥ कांहीं केल्या सोडीना ॥९५॥
ध्यान धारणा जप योग ॥ संन्याश्यासि करावया लाग ॥ त्यास कर्माचा त्याग ॥ कैसा घडे सांग पां ॥९६॥
कर्म जित्या मेल्या न सोडी ॥ कर्माची प्रवृत्ति निवृत्ति रुढी ॥ कर्म अवघ्यांत गडबडी ॥ मोठी ओढी कर्माची ॥९७॥
कर्मास मूळ संबंध इंद्रियांचा ॥ इंद्रियांस संबंध देहाचा ॥ देह तंव पंचभूतांचा ॥ कर्मसुतांत गुंतला ॥९८॥
कोणी म्हणे कर्म त्यागिलें ॥ ऐकणें पाहणें हुंगणें राहिलें ॥ करपादांचें चलन खुंटलें ॥ हें घडेल कशानें ॥९९॥
निद्रा आहार तृषा ॥ हे केवीं सुटे वीरेशा ॥ जंववरी देहाची दशा ॥ तंववरी कर्म सोडीना ॥१००॥
यालागीं जे यातींत जन्मावें॥ तें कर्म कां सोडावें ॥ परकर्म आचरावें ॥ शास्त्रविरोध घडे कीं ॥१॥
अर्जुन म्हणे श्रीहरी ॥ जाणते कर्म टाकिती दुरी ॥ देव बोले कामक्रोधांचें गुढारीं ॥ गुंतलें तें सुटेना ॥२॥
अगा सर्वही त्याग करिती ॥ पुन्हा मठ बांधोनि राहाती ॥ आशा लोभ वासना चित्तीं ॥ काय त्याणीं त्यागिलें ॥३॥
काम क्रोध मद मत्सर ॥ यांणीं बळकाविलें शरीर ॥ शांति क्षमा विवेक विचार ॥ प्रवेश यांचा होईना ॥४॥
कामक्रोधांचा गोंधळ माजला ॥ नाटोपती हरिहरांला ॥ अगा इतर मानवांला ॥ केवा काय तरावया ॥५॥
यास जिंकावया जाण ॥ एक उपाय असे गहन ॥ होय गुरुकृपा गहन ॥ तरीच निर्मुळ दुष्टांचें ॥६॥
यापरी तृतीय प्रसंगीं बोध ॥ कर्मसिध्दि वदला गोविंद ॥ पुढें सांगेल ज्ञान विशद ॥ चौथ्या प्रसंगीं तें ऐका ॥७॥
हरि म्हणे पार्थाला ॥ हा योग आम्ही सूर्याला ॥ त्यासी पूर्वीं उपदेशिला ॥ तोचि  निवेदिला तुजलागीं ॥८॥
पार्थ म्हणे जगज्जीवना ॥ सूर्य पुरातन जाणा ॥ तूं देवकीचा तान्हा ॥ त्यासी कैसें उपदेशिलें ॥९॥
देव म्हणें मी पुरातन ॥ सूर्याचा जन्म मजपासून ॥ तूंही अनादिसिध्द जाण ॥ तुज विसर मज आठव ॥११०॥
युगायुगाचे ठायीं ॥ भक्तरक्षणा अवतरतों पाहीं ॥ दैत्य मर्दोंनि दिशा दाही ॥ उदय करितों धर्माचा ॥११॥
मी आकारे या सृष्टीं ॥ निराकाराची नवजाय हातवटी ॥ जे पाहती ज्ञानदृष्टी ॥ धन्य तेचि विवेकी ॥१२॥
माते समजावयालागीं ॥ कितीएक प्रकारें श्रीमती योगी ॥ एक साधनाचे मार्गीं ॥ हाटयोग साधिती ॥१३॥
एक प्राणायामी होती ॥ अपान प्राणीं मेळविती ॥ एक प्राण अपानांत आणिती ॥ एक दोन्ही आणिती समत्व ॥१४॥
एक पूरक साधून ॥ कुंभक करिती त्राहाटण ॥ रेचक बरवा करुन ॥ साधिती योग धारणा ॥१५॥
एका सुषुप्तीसी वाटे ॥ षड्‍चक्रे भेदिती उलटे ॥ उघडिती ब्रह्मारंध्रीची कपाटें ॥ सहस्त्रदळी प्रवेशती ॥१६॥
एक प्रत्याहारी बळकट ॥ उपशमनाचे धरिती नेट ॥ पंचप्राणांची एक मोट ॥ करुनि ओंकारीं पैठती ॥१७॥
एक द्रव्ययज्ञ करिती ॥ एक तपसामग्री मेळविती ॥ एक विषयांच्या आहुती ॥ देती ज्ञानहुताशनीं ॥१८॥
हें सर्वही कर्म अवघडें ॥ करी त्यास कोडें पडे ॥ अगा ज्ञानवन्हीपुढें ॥ तृणप्राय साधनें ॥१९॥
उदेल्या ज्ञानहेली ॥ नुरे साधनांची काजळी ॥ कर्म क्रिया पाप पुण्य जाळी ॥ मीतूंपण उरेना ॥१२०॥
ज्ञानासमान त्रिभुवनीं ॥ दुजी वस्तू न दिसे नयनीं ॥ जेवीं मेरुसम वजनीं ॥ दुजा नग असेना ॥२१॥
आकाशाएवढी सांठवण ॥ कोठूनि आणावी शोधून ॥ सिंधु इतकें जीवन ॥ तडागीं पाहतां मिळेना ॥२२॥
अमृतासारिखी गोडी ॥ कोणत्या रसीं सांपडे फुडी ॥ तेवीं ज्ञानाचिये इडेपाडी ॥ नसे जोडी ॥ सृष्टींत ॥२३॥
अगाध ज्ञानाचें वर्म ॥ जीवास करी परब्रह्म ॥ ज्ञानस्वरुप पुरुषोत्तम ॥ त्याअ काय उपमावें ॥२४॥
ज्ञान निश्चयो श्रीहरीनें केला ॥ इतुकियांत चौथा प्रसंग संपला ॥ पार्थ विस्मित जाहला ॥ पुसे प्रसंगीं पांचव्या ॥२५॥
मग म्हणे किरीटी ॥ तुमची उपदेशपध्दति उफराटी ॥ एक निश्चयाची गोष्टी ॥ कोठें धरावी सांगपां ॥२६॥
म्हणतां स्वधर्म करावा ॥ त्यावरी बुध्दियोगही बरवा ॥ पुढें ज्ञानाचा श्रेष्ठ ठेवा ॥ दावितां प्रकार तर्‍हेचा ॥२७॥
आमुचा विश्वास तुमचें वचनासी ॥ आमुचें कल्याण तूं करिसी ॥ त्वांचि घातलें फेर्‍यांसी ॥ पुढती काय करावें ॥२८॥
देव म्हणे पार्थातें ॥ दोनी मार्ग उमजविलें तूतें ॥ सांख्याहून कर्मयोगातें ॥ आचरतां लाभ विशेष ॥२९॥
संन्यासमार्ग कठिण ॥ आचरतां विघ्नें येती दारुण ॥ त्यापरी कर्मसोपान ॥ ज्ञानी आचरले राजऋषि ॥१३०॥
संन्यास बळें पाहणें ॥ कर्मनौकेंत बैसोनि जाणें ॥ आमुच्या मतें हेंचि करणें ॥ ज्या आचरणें सुख असे ॥३१॥
माझें कर्म मी कर्ता ॥ हें येऊं नेदिजे चित्ता ॥ तरीच पाविजे सायुज्यता ॥ अहंता नरकीं बुडवी ॥३२॥
जें जातिस्वभावें आलें ॥ तें आचरावें धैर्यबळें ॥ कामनिक दोषा पावले ॥ निष्काम गेले मोक्षातें ॥३३॥
संसार करुनि मोक्षसाधन ॥ हेंही कठिण कर्म जाण ॥ संन्यास कर्म दारुण ॥ विषय घाला घालिती ॥३४॥
विषयाची भारी चपेट ॥ साधकां बैसती लपेट ॥ उसळे वासनेची लाट ॥ बुडवी धैर्यवृत्तीला ॥३५॥
यालागीं ज्ञाता धन्य ॥ याची वृत्ति समसमान ॥ जनीं पाहती जनार्दन ॥ भेदबुध्दि सांडोनी ॥३६॥
ब्राह्मण धेनु गज शुनी श्वपचें ॥ समान पाहणें पंडितांचें ॥ तेचि पुतळे ब्रह्मींचें ॥ विषमभाव जयां नाहीं ॥३७॥
म्हणसी देहींच ब्रह्म कैसें जाहलें ॥ ज्यांणीं योगअभ्यास कमाविलें ॥ देऊनि तिन्हीं वज्रासन साधिलें ॥ जिंकिलें मनपवनासि ॥३८॥
अर्जुन म्हणे अनंता ॥ मज ब्रह्म करावें तत्वतां ॥ हरी म्हणे हो अभ्यासिता ॥ तुज सांगेन ज्यारीतीं ॥३९॥
ऐसें बोलिला अच्युत ॥ पांचवा प्रसंग जाहला समाप्त ॥ पुढें सहावें अध्यायीं मात ॥ सांगेल सिध्दांत जगद्गुरु ॥१४०॥
रुक्मिणीरमण म्हणे पार्था ॥ संन्यासयोग आचरतां ॥ कर्म सुटेना सर्वथा ॥ कर्तव्यता येतसे ॥४१॥
शिखासूत्र त्यागून ॥ त्रिकाळ करावें स्नान ॥ कौपीन कमंडलु भगवें प्रावरण ॥ विधिनिषेध सुटेना ॥४२॥
त्यापरी संसार काय वाईट ॥ ज्यांत स्वधर्म चोखट ॥ शास्त्रमर्यादें नीट वाट ॥ आचरतां दिसे चांगलें ॥४३॥
असा संसार म्हणिजे भोग ॥ संन्यास म्हणावा त्याग ॥ दोहींचेंही अंग ॥ जाणती ज्ञानी चतुरते ॥४४॥
आपुल्या संकल्पें कोंडला ॥ मी कोण पुसे गुरुला ॥ श्रीगुरु म्हणे तूंचि भला ॥ आत्माराम स्वत: सिध्द ॥४५॥
ज्याचा संकल्प त्यासी गोंवी ॥ त्याची गोंवी श्रीगुरु उगवी ॥ जसी आपुलीच ठेवी ॥ काढूनि दावी पायाळ ॥४६॥
यालागीं साधनीं ब्रह्म ॥ होती जीव धरितां नेम ॥ तेंही तूतें वर्म ॥ सांगतों तें आकर्णी ॥४७॥
जेथें नसेल जनाचा गोंवा ॥ तेथें बैसिजे पांडवा ॥ एकांत शुध्द बरवा पाहावा ॥ आसनपीठिका साधूनी ॥४८॥
आहार निद्रा जिंकोन ॥ विषयवासना खंडोन ॥ इंद्रियांतें दंडोन ॥ आशा लोभ त्यागावा ॥४९॥
निश्चळ होऊनि अंतरीं ॥ मग बैसावें आसनावरी ॥ साधूस वज्रासन बरव्यापरी ॥ टांच गुदांन बैसविजे ॥१५०॥
अपान कोंडून माघारा ॥ आणिजे सुषुम्नेच्या घरा ॥ प्राणही त्याच द्वारा ॥ एके ठायीं वांटिजे ॥५१॥
पहिला दीजे मूळबंद ॥ दुसरा वडवानळ बंद ॥ तिसरा जालंधरबंद ॥ चौथी मुद्रा भूचरी ॥५२॥
अध ऊर्ध्व मात्रा एक ॥ होतां कुंडलिनी उठे देख ॥ कंदावरुन पसरी मुख ॥ ग्रासी मनपवनासी ॥५३॥
कफ वात पित्त शोकित ॥ मांस शोणितांसमवेत ॥ षट्‍चक्रें भेदूनि सहस्त्रदळांत ॥ मिसळे ब्रह्मसागरीं ॥५४॥
सत्रावीचें अमृत प्राशून ॥ तृप्त होऊनि वमन ॥ तो रस अंगीं भरुन ॥ होय काया खेचरी ॥५५॥
ग्रासोनि पदपिंडास ॥ ठाव नुरे पंच कोशांस ॥ काम क्रोधांचा उडे भास ॥ दशा शांत उजळे ॥५६॥
लागे अक्षयसमाधी ॥ आनंदांत हेलावे बुध्दी ॥ सेवेसि वोळंगती सिध्दी ॥ होय निधी ज्ञानाचा ॥५७॥
इच्छिल्या ठायीं करी गमन ॥ कृतांत धाके पाहून ॥ त्रिलोकींचे शब्द ऐकती श्रवण ॥ दिसे सृष्टी लोचनीं ॥५८॥
एवढा सुखाचा लाधे अब्धी ॥ जैं हा योग जाय सिध्दी ॥ ऐसें वदला कृपानिधी ॥ अर्जुन विस्मयो पावला ॥५९॥
अर्जुन म्हणे दयानिधी ॥ तुम्हीं सांगितली योगसिध्दी ॥ परंतु आमुच्यानें हा विधी ॥ न साधे गोविंदा ॥१६०॥
हें महाभाग्य हृषीकेशा ॥ साधे तो होय तुम्हांऐसा ॥ आमुचा आवांका सहसा ॥ प्रवेश याचा होईना ॥६१॥
जो धैर्याचा होय अचाट ॥ तो चढे धारणेचे खड्गावरी नीट ॥ आमुच्या मतीची पाउलवाट ॥ यांत न चले श्रीधरा ॥६२॥
यापरीस मार्ग सोपा ॥ मातें दावीं मायबापा ॥ ऐसी करावी कृपा ॥ ज्यांत अटक नसे कीं ॥६३॥
साधन कर्माचें मन चंचळ ॥ तें नाटोपे नष्ट चपळ ॥ सुरा असुरातें ठकिल ॥ दैत्य निशाचर ऋषींसी ॥६४॥
मन स्वाधीन होणें कठीण ॥ यालागीं न घडे साधन ॥ तूं सांगसी तें करीन ॥ त्यांत कल्याण आमुचें ॥६५॥
हरि म्हणे सांगसी खरें ॥ मन तैसेंचि जोरावर ॥ परंतु योगबळासमोर ॥ सामर्थ्य नाहीं तगावया ॥६६॥
नाटोपे तूतें मन ॥ करीं अखंड माझें ध्यान ॥ ध्यान नव्हे तरी समसमान ॥ आत्मा एक लक्षावा ॥६७॥
पार्थ म्हणे एक आशंका ॥ माते उद्भवली यदुनायका ॥ ते ते तुजवांचोनि सखा ॥ कोण फेडील दुसरा ॥६८॥
जो योगसाधनीं लागला ॥ सिध्दि न होतां अस्त पावला ॥ कोण गतीस गेला ॥ सांग मुखें जनार्दना ॥६९॥
कृष्ण म्हणे कुंतीसुता ॥ ज्याचें साधन सिध्दी न पावतां ॥ निमे तो देवलोकीं होय सत्ता ॥ भोगी दिव्य भोगांस ॥१७०॥
भोगी उदास अवस्था ॥ पुढें ब्रह्पपदींची आस्था ॥ मग जन्म घेत मागुता ॥ पुण्य़वंताचें कुळीं ॥७१॥
जन्मतांचि बाळपणीं ॥ योग अभ्यास ठाके मनीं ॥ मति प्रवेशे सर्वसाधनीं ॥ इंद्रियें होती अनुकूळ ॥७२॥
सर्वशास्त्रें जिव्हाग्रीं ॥ ज्ञान प्रकाशें अंतरीं ॥ बोध प्रवेशे बुध्दीमाझारी ॥ कोंभ आत्मसुखाचा ॥७३॥
शांति क्षमा दया ॥ येऊनि बैसे त्याच्या हृदया ॥ काम क्रोध लोभ माया ॥ जाय अविद्या मूळेंसी ॥७४॥
बैसे अद्वैतबोधठसा ॥ ब्रह्म दिसे दाही दिशा ॥ नुरे जीवपणाची दशा ॥ होय चिदाकाश स्वयंभ ॥७५॥
त्यासि म्हणावें योग भ्रष्ट ॥ जो ब्रह्मज्ञानाचा मुगुट ॥ वेदशास्त्रांचें मूळ पीठ ॥ दिसे श्रेष्ठ योग्यता ॥७६॥
यापरी वदला शार्ड्गपाणी ॥ षष्ठप्रसंग समाप्त येथोनी ॥ पुढें सातव्याची मांडणी ॥ करील सारथी पार्थाचा ॥७७॥
त्याही निरुपणाची गोडी ॥ होईल अर्थात उघडी ॥ अर्जुनाचे आवडी काय एक करीना ॥७८॥
चातकालागीं मेघ गगनीं ॥ आणि सिंधूचें पाणी ॥ कृष्ण मासीं त्याची आईनी ॥ पुरवी हेत प्रीतीनें ॥७९॥
अब्जिनीचे प्रीतीं ॥ उदयो पावे गभस्ती ॥ किंवा चाकोराचे आर्तीं ॥ धावे मयंक गगनोपरीं ॥१८०॥
वत्सावर धेनूचें पान्हा घालणें ॥ कूर्मींचे पिल्यांवर अवलोकणें ॥ तेवीं मायबाप श्रीगुरुनें ॥ मनोरथ पुरवणें शाहाचे ॥१८१॥
इति श्रीसिध्दांतबोधपंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये षट्‍ त्रिंशत्तमोऽध्याय: ॥३६॥ ॥ओव्या॥ ॥१८१॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP