श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३२ वा
‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.
श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
अगाध महिमा साधूंचा ॥ सांगतां शिणल्या सहस्त्र वाचा ॥ लेखा काय मानवाचा ॥ जाणावया महिमान ॥१॥
साधु दयेचे सागर ॥ साधु प्रकाशाचे सहस्त्रकर ॥ साधु मेघापरीस उदार ॥ साधु वंद्य सर्वांसी ॥२॥
साधु ब्रह्मादिक मानिती ॥ साधुसंग इंद्रादिक इच्छिती ॥ हिमालयजामात ध्यातीं चित्तीं ॥ विष्णु त्याचा कामारी ॥३॥
साधु ज्ञानसुधाब्धी ॥ साधु आनंदाची नदी ॥ साधुपासी सर्व सुखाची मांदी ॥ साधु दाते मोक्षाचे ॥४॥
साधूंपासी नुरे कर्म ॥ साधूंपासीं उडे भ्रम ॥ साधूंपासी अद्य धर्म ॥ सेवेलागीं तिष्ठती ॥५॥
साधु गहन गंभीरु ॥ साधु धैर्यांचा महामेरु ॥ साधु भवाब्धीचें तारूं ॥ साधु शीतळ चंद्राहुनी ॥६॥
साधु दीनजनाचे नाथ ॥ साधु करिती अनाथां सनाथ ॥ साधु सर्वोपरी समर्थ ॥ साधु शुध्द जगदात्मे ॥७॥
साधु सिंधुपरीस खोल ॥ साधु आकाशापरीस पोकळ ॥ चिदाकाश तैसे निर्मळ ॥ साधु अढळ सर्वांहूनी ॥८॥
साधु मायाळू कृपाळू ॥ साधु सखे सज्जन मवाळू ॥ साधु निर्मळ प्रेमळू ॥ नसे सळू साधूंपासी ॥९॥
साधूंपासीं पाप पळे ॥ साधूंपासी विकार जळे ॥ साधूंपासी ब्रह्म आकळे ॥ ओळखी पुरे मी कोण ॥१०॥
साधूंपासी त्रिताप जळे ॥ साधूंपासी द्वैत गळे ॥ साधूंपासी निश्चयो मिळे ॥ निजवस्तूचा लाभ ॥११॥
साधु विवेकाचे गांव ॥ साधु अनुभवाचा ठाव ॥ साधू देवांचाही देव ॥ साधूंचा वेश स्वरुपाचा ॥१२॥
चारी पुरुषार्थ साधुचरणीं ॥ चारी मुक्ति घेती लोळणीं ॥ दैत्य दानव येती लोटांगणीं ॥ साधु मान्य सर्वांसी ॥१३॥
देवापासीं ठकाठकीं ॥ भक्त वैकुंठीं अभक्त नरकीं ॥ नव्हे वर्तणूक एकसारखी ॥ नव्हती सन्मुख सर्वांसी ॥१४॥
तैसे नव्हेति साधु ॥ देवापासीं वटक भोंदू ॥ बळीस देवोनियां आशीर्वादू ॥ शेखीं पाताळीं घातला ॥१५॥
प्रल्हाद जळतां रक्षिला ॥ पिता द्वेषी वधियेला ॥ बिभीषण राज्यीं स्थापिला ॥ कूळक्षयो केला दशग्रीवाचा ॥१६॥
वाळीचा संहार सुग्रीव राजी ॥ ऐसी बुध्दि देवामाजी ॥ कंसासी वधून झाला गाजी ॥ उग्रसेन राज्यीं स्थापिला ॥१७॥
पांडव रक्षी कौरव संहारी ॥ द्वैतबुध्दी चराचरीं ॥ तैसी नव्हे साधूंची परी ॥ दुर्जन सज्जन मम त्यांसी ॥१८॥
म्हणाल साधूंचा महिमा वानिला ॥ संतमहिमा न वर्णिला ॥ तरी साधु आणि संताला ॥ भेद कांही असेना ॥१९॥
साधु तेचि गा संत ॥ संत तेचि गुरु समर्थ ॥ गुरुहूनि थोर हा अर्थ ॥ म्हणतां दूषण जिव्हेसी ॥२०॥
ज्याची शुध्द परंपरा ॥ त्यासी परमार्थी लक्ष खरा ॥ मी वसें त्याच्या घरा ॥ सभाग्य पुरुष तो एक ॥२१॥
हरिहर ब्रह्मादिक जाण ॥ होती गुरुपदीं लीन ॥ त्या गुरुसी करुनि नमन ॥ ग्रंथ लेखणी धरियेली ॥२२॥
मागें शिष्यांचिया प्रश्नविधी ॥ गुरुनें दाविली प्रांजळ बुध्दी ॥ न वाहे कल्पना नदी ॥ उचंबळे उदधी सुखाचा ॥२३॥
संतोष पावोनियां शिष्य ॥ म्हणे धन्य उगला दिवस ॥ स्पर्शावया पादुकांस ॥ अधिकारी मी जाहलों ॥२४॥
कोटिपुण्याची राहाटी ॥ केली होती जीवानें आटी ॥ यालागीं तुमची भेटी ॥ पदांबुज देखिलें ॥२५॥
त्रिलोकींचा तूं देखणा ॥ यालागीं पुसावया हेतु कामना ॥ विनंति स्वामीच्या चरणा ॥ स्वल्प निवेदितों स्वामिया ॥२६॥
सूर्यापुढें काडवाती ॥ चंद्रापुढें चंद्रज्योती ॥ समुद्रास अर्ध्य देती ॥ चुळक उदकें ज्याचें तया ॥२७॥
मलयगिरीस चंदनाची उटी ॥ विद्युल्लतेपुढें लावणें दिवटी ॥ तयापरी आमुच्या गोष्टी ॥ कीं शिवपदीं धत्तपुष्प ॥२८॥
मेरुसन्निध वाढे वारुळ ॥ शेषा सन्मुख विरोळा करी वळवळ ॥ गरुडासंगें उडावया टोळ ॥ इच्छा धरी मानसीं ॥२९॥
इंद्रापुढें उभें कैकाडी ॥ श्रीमंत संपदे रंक जोडी ॥ सुधेपासीं मधाची गोडी ॥ नये परवडी दाखवूं ॥३०॥
तुळसीपत्रीं विष्णु संतोष ॥ तेवीं विनंति माझी स्वामीस ॥ आतां निवेदितों पायांस ॥ करीं निवाडा उघडाची ॥३१॥
प्रपंच म्हणावें कासयासी ॥ अविद्येची जात कैसी ॥ पापपुण्यांच्या रुपासी ॥ स्वयें प्रकाशीं मुखानें ॥३२॥
ब्रह्मीं मया कैसी जाहली ॥ त्याची सांगावी मुख्य किल्ली ॥ पुढें सृष्टि कैसी विस्तारली ॥ हे बोली करा प्रांजळ ॥३३॥
कैसा उद्भव कैसा लयो ॥ कोण निर्मिता कर्ता प्रळयो ॥ जीवभाव तोही उगवो ॥ करीं संशयो नुरे ऐसें ॥३४॥
ऐकोनि शिष्याच्या बोला ॥ गुरु म्हणे भलारे भला ॥ उकलितों तुझ्या संशयाला ॥ परिसें दक्ष होऊनियां ॥३५॥
महत्तत्व त्रिगुण पंचभूत ॥ हें प्रपंचाचें गणित ॥ चार खाणी चौर्यायशीं लक्ष योनींत ॥ मुद्द्ल ऐवज इतुकाचि ॥३६॥
महागिरी मेरु कैलास ॥ स्वर्ग सत्यलोक वैकुंठ विशेष ॥ प्रपंचाचा हा विलास ॥ दुसरा लेश नसे कीं ॥३७॥
देवताप्रपंच ऋषिप्रपंच ॥ भूतप्रपंच रुद्रप्रपंच ॥ राक्षस आणि दैत्यप्रपंच ॥ प्रपंच पशुपक्षियांचा ॥३८॥
जलचर वनचर खेचर ॥ किडा मुंगी वृश्चिक विखार ॥ पिशाचगण विद्याधर ॥ एकचि प्रपंच विस्तारला ॥३९॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ अठरापगड यातींचा विस्तार ॥ उंच नीच नारी नर ॥ हाचि प्रकार प्रपंचाचा ॥४०॥
अवघी प्रपंचासि एकरास ॥ त्यांत उंच नीच कोणी नसे ॥ भेदवादियांचें ज्ञान फोस ॥ पोंचट दिसे साधूंला ॥४१॥
एकचि वन्हि बहुविध विभागिला ॥ ओला कोरडा सजीव निर्जीव जाहला ॥ ऐक याचे अभिप्रायाला ॥ प्रांजळ निवेदितो आकर्णी ॥४२॥
ओला वन्ही चंद्र तारागण ॥ प्रकाश परी शीतळ गहन ॥ कोरडा वन्ही सहस्त्रकिरण ॥ आर्द्र लेश असेना ॥४३॥
सजीव वडवानळ जठरींचा ॥ निर्जीव कार्य चालवी विश्वीं साचा ॥ गोवरी काष्ठादिकांचा ॥ नसतां आधार विझे तो ॥४४॥
एक विजेचा वन्ही ॥ दुजा शिवाचे नयनीं ॥ वसे काष्ठीं पाषाणीं ॥ परी अवघा व्यापक ॥४५॥
बहुत शाखा एक तरुवर ॥ अपार लहरी एक नीर ॥ पाहतां उदंड अलंकार हेम एक राहिलें ॥४६॥
तेवीं प्रपंचाची मूस ॥ एकचि ओतला विश्वरस ॥ यांत उंच नीच म्हणावयास ॥ कारण कांही असेना ॥४७॥
जग राहाटावया क्रिया कारण ॥ शास्त्रीं लाविले वर्णावर्ण ॥ मुख नासिक नेत्र कर्ण ॥ एक देहीं भिन्न क्रिया ॥४८॥
हा प्रपंच सांगितला तुज ॥ परिसें अविद्येचें बीज ॥ जीवाच्या बळें दु:ख भोगिजे ॥ चौर्यायशींची याताना ॥४९॥
अविद्येचे मुळें जीव भुलला ॥ भोगी नाना फळाला ॥ जन्म मरण स्वर्ग नरकाला ॥ भोंवें भवचक्रीं दु:खाच्या ॥५०॥
माझा देह माझा संसार ॥ माझीं दारा कन्या पुत्र ॥ माझीं मायबापें बहिण बंधु श्वशुर ॥ माझी जातगोत मी वतनी ॥५१॥
माझीं पापपुण्य़ें बरीं वाईट ॥ मी भला बुरा नटखट ॥ माझा बाप मी चोखट ॥ माझी खटपट मीच जाणें ॥५२॥
मी कोण नकळे कर्ता ॥ वाहे संसाराची चिंता ॥ मी शाहाणा बोलका कर्ता ॥ हे अविद्येची कथा जगा पैं ॥५३॥
मी पंडित शास्त्री पुराणिक ॥ मी जोगी जंगम गोसावी देख ॥ मी कोण हा न कळे विवेक ॥ अविद्येची मेख या नांव ॥५४॥
मी पूर्वी होतों कोण ॥ मेल्यासाठीं कोठें गमन ॥ मागील पुढील आवेशून ॥ अविद्या जाण ती नांव ॥५५॥
आपुले हस्तीं वस्तू ठेवणें ॥ तीस पडे शोध करणें ॥ म्हणे मज समयीं नाहीं जाणें ॥ हें लक्षण अविद्या जाण ॥५६॥
उगाचि बैसे पडे भ्रांत ॥ उमजेना कांहीं किंचित ॥ आळस निद्रा सदा सुस्त ॥ फिरे उन्मत्त कैफी जैसा ॥५७॥
जीव ब्रह्मींचा अंकुर ॥ मुख्य ईश्वराचा कुमर ॥ तें पद विसरुनि होय पामर ॥ अविद्या साचार ती नांव ॥५८॥
म्हणे मी पतित रंक ॥ मातें कोणी सांगा विवेक ॥ दाखविजे परलोक ॥ मागें भीक संतांपुढें ॥५९॥
माझा व्हावया उध्दार ॥ म्हणोनि तीर्थोतीर्थी फिरे ॥ करी एकादशी प्रदोष सोमवार ॥ हे घोर अविद्येचे ॥६०॥
ब्रह्मचारी करी अनुष्ठान ॥ योग याग धर्म दान ॥ अष्टांगयोग वायु निरोधूण ॥ लावी मुद्रा अविद्या ॥६१॥
घर कुटुंब त्यागी ॥ राख लावोनि जाहले जोगी ॥ आपणास म्हणविती सिध्द जोगी ॥ अविद्या जगीं ती नांव ॥६२॥
आपण ईश्वर हा पडे विसर ॥ जीव मी दीन उच्चार ॥ मज मुक्तीचें दावा द्वार ॥ करी घोर ही अविद्या ॥६३॥
स्वरुपीं विद्यमान नव्हे ॥ आपुलें मूळ न पडे ठावें ॥ मुखें अविद्या हें जाणावें ॥ आतां ओळखें पापपुण्य ॥६४॥
अहो वांझेचा बाळ ॥ कडे घेऊन पांगुळ ॥ तैसा पापपुण्याचा मेळ ॥ जाणती केवळ सज्ञान ॥६५॥
कापुराचा कोंडा काढून ॥ चित्रींचे म्हैशीस घाली आंबवण ॥ सूर्याची काजळी धरुन ॥ अंध सुवासिनीस लेववी ॥६६॥
वार्याची वळून चराटें ॥ बांधोनि ठेवा स्वप्नींचे चोरटे ॥ कवळून जाळ्याचिया मोटें ॥ तरंग सांठवणें सिंधूचे ॥६७॥
पिंपळाची फुलें तोडणें ॥ वंध्यापुत्राचे गळां घालणें ॥ तैसें पापपुण्याचे बोलणें ॥ समर्थ गुरु त्याचेनी ॥६८॥
इंद्र पोहतां बुडे मृगजळीं ॥ सूर्यास वेष्टून चाले काजळी ॥ दर्दुरी धांवोनि शेषा गिळी ॥ कावळीं टोचिजे कपींद्रा ॥६९॥
सरिता ससुद्रीं नांदे वेगळी ॥ वारा हिंडे सोडोनि पोकळी ॥ तैं पापपुण्याची बोली ॥ सत्य होय गुरुकृपें ॥७०॥
पापपुण्य जाणा ॥ ह्या तों मनाच्या कल्पना ॥ ज्याची उडाली वासना ॥ पापपुण्य़ त्या कैंचें ॥७१॥
रज्जुसर्प पाहून भ्याला ॥ तेथेंचि पापा ठाव जाहला ॥ रज्जु ओळखोन हरिखेला ॥ पुण्य आलें इतुक्यांत ॥७२॥
पापपुण्य कल्पी त्याचे ठायीं ॥ रज्जु दोनी जाहला नाहीं ॥ हा निवाडा समजोनि घेईं ॥ ज्ञानदृष्टीं लक्षूनी ॥७३॥
पापपुण्यांचे बोल ॥ त्यांसी कल्पनाचि मूळ ॥ कल्पनेचें स्वरुप केवळ ॥ आपुलीच आशंका ॥७४॥
जैं पापपुण्य लटिकें वाटे ॥ तैं जन्ममरणाची सांकळी तुटे ॥ ऐसा अनुभव ज्यास नेहटे ॥ तोचि सुटे भवबंधा ॥७५॥
पापपुण्याहून वेगळा ॥ तोचि भोगी मुक्तीचा सोहळा ॥ जेव्हां लाहे गुरुकृपेला ॥ तेव्हां लाभ सुखाचा ॥७६॥
असो पापपुण्याचा लेखा ॥ तुज दाविला शिष्यबालका ॥ परिसें पुढील आशंका ॥ ब्रह्मीं माया कैसी जाहली ॥७७॥
माया समजावयाचा अर्थ ॥ तेथेंच भांबावला पंथ ॥ मायेचा न कळे अर्थ ॥ करितां तर्क बहु होती ॥७८॥
एक म्हणती माया जाहली ॥ एक म्हणती नाहीं मूळीं ॥ ऐसी ग्रंथाची बोली ॥ वाद विवाद वितंड ॥७९॥
एक म्हणती माया अनादिसिध्द ॥ स्वरुपीं वाढवी भेदाभेद ॥ एक म्हणती तिचें रुप अगाद ॥ ब्रह्मीं भेद असेना ॥८०॥
बहुत करितां माथागोवी ॥ परी नुगवे मायेची उगवी ॥ आतां मीच सांगतों बरवी ॥ संदेहकारक तुज वचनें ॥८१॥
ब्रह्मीं माया जाहली नाहीं ॥ ऐसा निश्चयो केला जिहीं ॥ एवढी सृष्टीची गलबल पाहीं ॥ दुजा कोण करावया ॥८२॥
माया म्हणतां अनादिसिध्द ॥ तरी ब्रह्मीं जाहला भेद ॥ यालागीं आतां विशुध्द ॥ तुजलागीं निरुपितों ॥८३॥
सुताचें जाहलें सुताडें ॥ त्यासी माया म्हणणें ॥ पाहतां सूत सुताडें ॥ दोन काय कल्पावीं ॥८४॥
तरंग नाना उदका ॥ तरुच्या फांकल्या शाखा ॥ गोड त्या घृताच्या कणिका ॥ तेवीं माया ब्रह्मीं जाणावीं ॥८५॥
कनक नगीं मृत्तिका घटीं ॥ आडवे उभे तंतू पटीं ॥ जाहली सहस्त्रकिरणांची दाटी ॥ विलसे बिंबी एकत्वें ॥८६॥
जो ब्रह्मींचा उल्लेख ॥ तोचि जगदाकार देख ॥ द्वैताचा लाविती कलंक ॥ भेदवादी मिथ्याचि ॥८७॥
हस्त पाद नाडी डोळे ॥ एकेचि देहीं विस्तारले ॥ आलीं भोंपळीस फळें ॥ लांब वाटोळें एकचि ॥८८॥
एके बाभुळीस लक्ष कांटे ॥ कोटि तारा शुभ्रता एक उमटे ॥ एक बुध्दीचे अनंत फांटे ॥ तैसी ब्रह्मीं माया भासे ॥८९॥
काष्ठीं खांब कल्पिला ॥ पाहतां खांब काय जिन्नस आला ॥ तेवीं मायेचा गलबला ॥ भांबावला जन सारा ॥९०॥
एकचि ब्रह्मींचा पसारा ॥ जळाच्या गोठल्या अनंत गारा ॥ वाजे वेदांचा नगारा ॥ माया व्यवहार यापरी ॥९१॥
कापुसास म्हणती पेळा ॥ तेवीं माया शब्द ब्रह्मीं जाहला ॥ सूत असतां लुगडें भावी त्याला ॥ ऐसी भ्रांति मायेची ॥९२॥
नाम रामजी म्हणती आपणा ॥ परी कोण हें तया कळेना ॥ एके स्वरीं रागांचा तनाना ॥ म्हणती कानडा भैरव ॥९३॥
अग्नीपासोनि आणिला दीप ॥ अग्नीचें काय मागें राहिलें रुप ॥ भिन्न म्हणावा अग्निदीप ॥ तैसी जाण ब्रह्मीं माया ॥९४॥
लोह आणि तरवार ॥ दोन नामीं कितेक अंतर ॥ भंडार हळदीचा व्यवहार ॥ अंतर काय मोजावें ॥९५॥
अंगारा उदी विभूत राख ॥ दाणे पीठ भाकरी देख ॥ यापरी मायेचें कौतुक ॥ आंत कोंदींव ब्रह्मचि ॥९६॥
उगवलीया मायेची गुंती ॥ शिष्याची उडाली भ्रांती ॥ पुढें सृष्टिकर्माची रीती ॥ आणीं चित्तीं निवेदितों ॥९७॥
सृष्टि जाहली संहरली ॥ हे बहुतां ग्रंथीं लिहिली ॥ यालागीं न घाली पाघाळी ॥ स्वल्पांत उमजे सुमती ॥९८॥
गगनीं अभ्र विस्तारलें ॥ त्यास गगनें नाहीं निर्मिलें ॥ शेखीं लयातें पावलें ॥ त्यासी मोडितें नव्हे नभ ॥९९॥
मृगजळ सूर्यानें नाहीं केलें ॥ बिंबीं नाहीं सांठवलें ॥ मध्येंच जाहलें आणि मोडलें ॥ गडबड वृथा होतसे ॥१००॥
मुळीं अंगीं बीज स्वयंभ ॥ मध्येंचि वृक्ष वाढे बंब ॥ गंधर्वनगरीच्या हुडयाचें डिंब ॥ तैसी माया घडमोडी ॥१॥
दुधावरती जमोनि साय ॥ विरोनि त्यांतचि नाहींसी होय ॥ यापरी उद्भवलय ॥ बहुद जेवीं उदकांत ॥२॥
ॐ कारापासोनि बावन्न मातृका ॥ त्यांचें वेदशास्त्र देखा ॥ शास्त्रांपासोनि शब्दा आवांका ॥ मौन पाठीं वोसरे ॥३॥
शून्यापासूनि लक्ष अंक ॥ लक्ष आटितां शून्य एक ॥ यापरी उद्भव लय देख ॥ जाणती ज्ञानी डोळस ॥४॥
आतां जीवाचा उद्भव ॥ त्याचाही लक्षीं जन्म ठाव ॥ यासाठीं मिरविती जाणीव ॥ मोठें गुंताडें तें सर्वां ॥५॥
जीव उमगावयालागीं ॥ गिरिकपाटीं निघती योगी ॥ एक सुषुम्नेचे मार्गी ॥ प्राण अपान घोटिती ॥६॥
एक करिती शास्त्रशोधन ॥ एक तीर्थी करिती भ्रमण ॥ एक व्रतातें धरुन ॥ सोसी आपुले कुडीला ॥७॥
एक पडे मुद्रेचे फेरीं ॥ एक गुरुची सेवा करी ॥ एक तिष्ठे संतांचे द्वारीं ॥ कृपा करीं म्हणतसे ॥८॥
एक म्हणती जीव बिंब ॥ एक म्हणती जीव स्वयंभ ॥ एक म्हणती जीवाचा गर्भ ॥ कांहीं केल्या गोवेना ॥९॥
एक म्हणती सर्वांचें बीज उदक ॥ तोचि जीव हा देख ॥ एक म्हणती ज्योतिर्मय प्रकाश ॥ एक प्राणच जीव बोलती ॥११०॥
जीव शिवा एक म्हणती ॥ पुसो जातां नुगवे गुंती ॥ यापरी पडली भ्रांती ॥ वेडावती जाणते ॥११॥
जीव वाटोळा कीं लांबोळा ॥ कोण रंग काय आकारला ॥ कोण स्थान होत त्याला ॥ नुगवे कोडें वेडावती ॥१२॥
जीव प्रतिबिंब ब्रह्मींचा ॥ हा सिध्दांत वेदशास्त्रांचा ॥ परी उकले पेंच याचा ॥ हा महिमा गुरुकृपें ॥१३॥
यालागीं गुरुपासी गती ॥ गुरुपासीच होय मुक्ती ॥ गुरुपासीं राबती ॥ चारी पुरुषार्थ रंकसे ॥१४॥
गुरुपासी मार्ग ॥ गुरुपासी योग ॥ गुरुपासी लाग ॥ पैलतीरा जावया ॥१५॥
गुरुपासी ज्ञान ॥ गुरुपासी समाधान ॥ गुरुपासी आत्मदर्शन ॥ होय पावन तत्काल ॥१६॥
गुरुपासी तीर्थ ॥ गुरुपासी व्रत ॥ गुरुपासी पुरुषार्थ ॥ घडे अवघा सिध्दचि ॥१७॥
गुरुपासी देव भेटे ॥ गुरुपासी संशय तुटे ॥ गुरुपासी विकल्प नुठे ॥ लाभ मोठा गुरुपासी ॥१८॥
गुरुपासी अवघा जप ॥ गुरुपासी कोटी तप ॥ गुरुपासी ब्रह्म तद्रूप ॥ गुरुपासी बीजमंत्र ॥१९॥
गुरुपासी वेदशास्त्र ॥ गुरुपासी वसे सूत्र ॥ गुरुपासी कळा विचित्र ॥ गुरु स्वतंत्र सर्वां धनी ॥१२०॥
गुरुपासी उडे त्रिताप ॥ गुरुपासी हरे पाप ॥ गुरुपासी विद्या अमूप ॥ गुरु मायबाप सर्वांचा ॥२१॥
गुरुपासी हरे व्याधी ॥ गुरुपासी विशाळ बुध्दी ॥ गुरुपासी लागे समाधी ॥ गुरुपासी उदधि आनंदाचा ॥२२॥
यापरी गुरुचे महिमान ॥ वर्णिता वेदां पडलें मौन ॥ गुरुप्रताप धन्य धन्य ॥ गुरु चैतन्य विश्वात्मा ॥२३॥
गुरु निराकार निरंजन ॥ गुरु परात्पर परिपूर्ण ॥ गुरु देवांचा देव जाण ॥ गुरु सर्वज्ञ निजगुरु ॥२४॥
गुरु नेम गुरु धर्म ॥ गुरुएवढें नाही वर्म ॥ गुरु वर्णाश्रम सुगम ॥ गुरुनाम अगाध ॥२५॥
ऐसा गुरुचा महिमा ॥ वर्णितां सहस्त्रमुखी जाहली सीमा ॥ अवतारांची अगाध महिमा ॥ तेही शरण गुरुसी ॥२६॥
शिव सनकादिक नारदमुनी ॥ व्यास वाल्मीक शुकमुनी ॥ लागती श्रीगुरुचे चरणीं ॥ इतरांचा पाड कायसा ॥२७॥
अठयाशीं सहस्त्र ऋषी ॥ चौर्यांशीं सिध्द योगी तापसी ॥ नवनाथ सिध्द ब्रह्मादिकांसी ॥ पूज्य गुरुनाथ यथार्थ ॥२८॥
ज्यातें गुरुगम्य नाहीं ॥ तें ज्ञान ऐकों नये पाहीं ॥ गुरुवांचोन कर्म तेंहीं ॥ बध्द होय कर्त्यासी ॥२९॥
गुरुवांचून दान धर्म साधन ॥ ते अवघेंचि दिसे शून्य ॥ भूस उपणल्या श्रम दारुण ॥ कण हातीं लागेना ॥१३०॥
जाळें टाकोनि वारा धरी ॥ श्रृंग लावी गंधर्वनगरीं ॥ समुद्र सांठवी रांजणाभीतरीं ॥ ते काय शाहाणे म्हणावे ॥३१॥
मुक्यासी कलागत केली ॥ त्याची पंचाईत कैसी जाय निवडली ॥ ईश्वर पार्वती रुसलीं ॥ कोण त्यांसी समजावी ॥३२॥
श्रीमंतासवें वर्हाडी ॥ सजून चालिले कैकाडी ॥ भगवी झूल पांघुरली घोंगडी ॥ तरी काय होय संन्यासी ॥३३॥
शिमग्यांत नेसले पुरुष लुगडीं ॥ कोल्हाटीण खेळतां बांधी पगडी ॥ दर्वेसी माकडापासोनि घाली फुगडी ॥ काय श्रृंगार हिजडीचा ॥३४॥
वेश्येची काय संगती ॥ जाय द्रव्य हीन शक्ती ॥ तैसीं साधनें वृथा जाती ॥ सद्गुरुवांचून जाणिजे ॥३५॥
ज्यासी पाहिजे परमार्थ साधन ॥ आपुलें व्हावें कल्याण ॥ त्याणें गुरुसी जावे शरण ॥ हे शिकवण श्रेष्ठांची ॥३६॥
सांगतां जीवाची पध्दती ॥ बोलतां फांकली मती ॥ आतां आवरोनि स्फूर्ती ॥ जीव प्रश्नीं आणितों ॥३७॥
जीवास नाहीं आकार ॥ नसे एकस्थानीं थार ॥ पिंडीं व्यापक समग्र ॥ ऐकें दृष्टांत सांगतों ॥३८॥
दृष्टांताचें ऐक कारण ॥ सुंदर श्री श्रृंगार लेण ॥ निर्मल हिर्यास कोंदण ॥ शोभें शोभा आगळी ॥३९॥
सांवळ्या अंगीं चंदनउटी ॥ अंजन शोभे प्रमदेच्या दिठी ॥ तैसी दृष्टांताची मिठी ॥ उठे साहित्य ग्रंथाचें ॥१४०॥
ज्या ग्रंथीं दृष्टांत नाहीं ॥ तो ग्रंथ फोस पाहीं ॥ गहूं असोनि करावे काई ॥ पदार्थ विस्तारल्या वांचोनी ॥४१॥
दिसती साखरेचे खडे ॥ मिठाई घालितां रुचि वाढे ॥ तैसे दृष्टांताचे पवाडे ॥ ग्रंथीं उभारिती कवि कर्ते ॥४२॥
काना वेलांटी मात्रा व्यंजन ॥ देतां शोभे अक्षर गहन ॥ शाकीं मेळवितां लवण ॥ स्वादिष्ट होय सर्वांचें ॥४३॥
शिवालय रचावयासी ॥ चुना चिरे कपरें पाहिजेत त्यासी ॥ तेवीं ग्रंथ उभारणेंशीं ॥ आणी साहित्य कवीश्वर ॥४४॥
सांगावया जीवाचें स्वरुप ॥ घातले दृष्टांत अमूप ॥ श्रोतीं न मानावा कोप ॥ आहे नियामक ठीकचि ॥४५॥
जैसें तेल भरलें सर्व तिळां ॥ तैसा जीव कुडींत व्यापला ॥ जीव कुडींतूनि निघाला ॥ कुडी जड काष्ठ होय ॥४६॥
उंसामाजी भरला रस ॥ रस गेल्या ऊस बांकस ॥ अथवा पुष्पामाजी सुवास ॥ निघतां वास फूल सुके ॥४७॥
हें आमुचें गुप्त ठेवणें ॥ दृष्टांतें दाविलें तुजकारणें ॥ तिळ फूल ऊंस दृष्टांतानें ॥ अनुभव घेणें जीवाचा ॥४८॥
कंटक रुपला असतां चरणीं ॥ वेदना उमटे मस्तकालागोनी ॥ जीव व्यापला अंग भरोनी ॥ म्हणोनि जाणे वेदना ॥४९॥
आणिक ऐका सूक्ष्म विवेक ॥ जीव ब्रह्मीं जाहला तो उल्लेख ॥ तोचि ईश्वर जीव देख ॥ दोहीं ठायीं व्यापला ॥१५०॥
माया घटीं बिंबला ॥ यालागीं ईश्वर नांव पावला ॥ अविद्येमाजी बिंबला ॥ म्हणोनि पावला जगदीशा ॥५१॥
पृथ्वी जाणावी शरीर ॥ अब अंत:करण नीर ॥ त्यांत जाणीव मिरवे साचार ॥ त्यास विवेक हें नांव ॥५२॥
ब्रह्मीं जाहलें स्फुरण ॥ तोचि ईश्वर घ्या ओळखोन ॥ शरीरीं आपुल्या होय स्फुरण ॥ तोचि जीव बोलिजे ॥५३॥
ऐके देखे हुंगे चाखे ॥ हात पाय हालवी मुखें ॥ तुझें माझें ओळखे ॥ ते जाणीव जीवासी ॥५४॥
आणिक एक प्रकार ॥ ब्रह्मीं उल्लेख तो नादाकार ॥ तोचि गुणसाम्य हा निर्धार ॥ त्यासी चातुर्य बोलिजे ॥५५॥
जो घुमघुमिला नादाकार ॥ तोचि बोलिला ओंकार ॥ त्यासीच माया साचार ॥ वेदांतींचा सिध्दांत ॥५६॥
गीतेमाजी उभारणी ॥ दोन माया नेमी शारंगपाणी ॥ एक अष्टधा प्रकारें दावोनी ॥ दुजे नादाकार दावी जीवरुपें ॥५७॥
तोचि नाद नाभिकमळीं ॥ तेथूनि आदळे सहस्त्रदळीं ॥ घुमघुमे पिंड ब्रह्मांडमेळीं ॥ अनुहत ध्वनी बोलती ॥५८॥
नादापासोनि शब्दाचा उल्लेख ॥ तोचि वायूचें मूळ देख ॥ वायूपासोनि तेजासी लखलख ॥ तेजीं नीर निरीं महीं ॥५९॥
सांगितला जीवाचा पक्षू ॥ तूंही निरखीं होऊनि दक्षू ॥ मुद्रेहूनि उघडे लक्षू ॥ ज्ञानचक्षूनें विलोकीं ॥१६०॥
सांगीतले तुझे प्रश्न ॥ जैसें दर्पणीं पाहिलें वदन ॥ अर्थ फार उघडोन ॥ तूतें दाविला सुजाणा ॥६१॥
सद्गुरुकृपें वरुषें धन ॥ शिष्यचातकें पसरिलें वदन ॥ म्हणे तृप्त नव्हे मन ॥ लागे अखंड वांकुडी ॥६२॥
कृपा केली महाराजा ॥ मज दीनाचिया काजा ॥ लक्षावया चरणांबुजा ॥ सामर्थ्य कैंचें मजपासीं ॥६३॥
मज दीनावरी करुनि दया ॥ निरविली अविद्या मोहमाया ॥ पवित्र जाहली शुध्द काया ॥ गेले पाप संताप ॥६४॥
यांत कर्माचा अभिमान ॥ भलें केलें स्वामीखंडण ॥ मी कोण हें नेणोन ॥ बहु फिरलों भवचक्रीं ॥६५॥
घेतला ग्रंथांचा धांडोळा ॥ परी मज थांग नसे लागला ॥ गूढार्थाचिया बोला ॥ अर्थ कांहीं उकलेना ॥६६॥
जैसा करतळावर आंवळा ॥ तैसा अर्थ उघड केला ॥ अंतर बाहेर दिसों आला ॥ पुसणें खुंटलें इतरचि ॥६७॥
ऐसा कोण अर्थदानी ॥ एवढी उकली अर्थठेवणी ॥ तूं वदलासि देवतटिनी ॥ मी भगीरथ निवालों ॥६८॥
माझी मती द्रौपदी धडफुडी ॥ कुबुध्दि-कौरवें केली वेडी ॥ तूं कृष्ण पावोनि तांतडी ॥ राखिली लज्जा या जन्मीं ॥६९॥
माझी सद्बुध्दि ते जानकी ॥ अहंकाररावणें हरिली अविवेकीं ॥ तूं रामचंद्र प्रगटोनि एकाएकी ॥ अविद्याकारागृहांतूनी मुक्त केली ॥१७०॥
बहूपंथांची गुंताडीं ॥ सांगूनि उगविलीं त्यांची कोडीं ॥ पुढें संशयाची आडी ॥ न पडे ऐसें त्वां केलें ॥७१॥
इंग्ळ निवोनि जाहली राख ॥ तेंवी जाहला मतीचा तर्क ॥ भेद शक्ति दाहक ॥ शांति जाहली तव कृपें ॥७२॥
किंचित् आशंका आतां ॥ कृपेनें सांगावी गुरुनाथा ॥ पुसावया आवांका ॥ तुझे चरणीं होतसे ॥७३॥
माया ईश्वर दोन कीं एक ॥ याचा उगवेना तर्क ॥ म्हणती दोन नाही एक ॥ तरी नामें दोन कां पडली ॥७४॥
हाही गर्भ फोडोन ॥ याच्या कातरा द्या निवडोन ॥ कैसें भक्तीचें लक्षण ॥ मुख्य ज्ञान तें कैसें ॥७५॥
अवघें एकचि ब्रह्म ॥ हेंहि सांगा करुनि सुगम ॥ मी कोण हें वर्म ॥ काय नेणूं आपणांतें ॥७६॥
जीव-शिव-प्राया-प्रपंचांत ॥ मी कोण एक पदार्थ ॥ हा घोर संदेह होत ॥ समर्थ तूं काढावया ॥७७॥
या अर्थाची सांकडी ॥ पुसावया मती होतसे वेडी ॥ आपण जरी कराल उघडी ॥ तरी मज सुख होईल ॥७८॥
काय नेणों कोण जन्मीं ॥ पुण्य आचरलों होतों स्वामी ॥ यास्तव गुरुचे पादपद्मीं ॥ सन्मती करी उद्गार ॥७९॥
निष्काम पुण्याच्या कोटी ॥ तैं सद्गुरुची होय भेटी ॥ उघडी होय ज्ञानदृष्टी ॥ हें तंव दृष्टी दुर्लभ ॥१८०॥
संसार घोर ताणाताणी ॥ विश्रांति न पावे कोठें प्राणी ॥ तुझे कृपेची अगाध करणी ॥ सुखसागरीं स्थापिसी ॥८१॥
पाहतां या संसारवृत्ती ॥ मोठे हाल स्थिति फजिती ॥ आलाला आताता आबाबा करिती ॥ शेखीं पडतीं भवफांसी ॥८२॥
एक म्हणती संसार पुरे ॥ कोणा आवडती हे फेरे ॥ मरण येतें तरी बरें ॥ सवेंचि वदे केले पाहिजे ॥८३॥
एक म्हणे संसार लटिका ॥ एक म्हणे तोडून लटका ॥ एक म्हणे धरा अवांका ॥ लौकिकास्तव करावा ॥८४॥
त्रास घेत पुन्हा करिती ॥ जेवीं वमन बिडाल चाटिती ॥ एक मरती एक रडती ॥ तेही जाती त्या मार्गे ॥८५॥
धरी वेश्यासंग आवडीं ॥ दु:ख भरल्या चरफडी ॥ बरा जाहल्या तीच गोडी ॥ फिरे दु:ख उताणा पडे ॥८६॥
बाईल मेली बहु क्षोभला ॥ दुसरी मेली तडफडला ॥ तिसरीसाठीं आकांत केला ॥ तरी म्हणे चौथी करुं ॥८७॥
ऐसें जें खरें म्हणे मूर्ख ॥ ना ऐके शास्त्र न धरी विवेक ॥ जैसें धिक्कारितां रंक ॥ द्वारीं तिष्ठे तैसाचि ॥८८॥
लोक हांसती न धरी लाज ॥ चेष्टिक स्वभाव सदा निर्लज्ज ॥ तैसें जगाचें चोज ॥ वाढे माझ्या मानसीं ॥८९॥
पुरे पुरे नको नको ॥ संसार दैन्य ऐकूं नको ॥ मूर्खासंगें बहुकां नको ॥ नको शोकूं जीव वृथा ॥१९०॥
हें समजलों आजि स्वामी ॥ म्हणोनि पावलों पादसंगमीं ॥ जिराली संतापऊर्मी ॥ निवालों शीतळ तव छायें ॥९१॥
असो सांसारिकाची राहटी ॥ म्यां स्वामींस पुसली गोष्टी ॥ त्याची सांगावी हातवटीं ॥ कृपादृष्टीं पाहोनियां ॥९२॥
तुझे कृपेचें अवलोकन ॥ माझें तृप्त अंत:करण ॥ रोगियांस सुधा रसायण ॥ तेवीं संतुष्ट तव वाक्यें ॥९३॥
चारा घेऊनि आली पक्षीण ॥ पिलीं पसरती हरुषें वदन ॥ कीं अल्पोदकींचा मीन ॥ सिंधुभेटी संतुष्टें ॥९४॥
अवर्षणीं वर्षे घन ॥ जना वाटे समाधान ॥ मयूरें घेती उड्डाण ॥ अंकुर फुटती मेदिनीं ॥९५॥
तृषार्थियांसी सांपडे गंगा ॥ लक्ष्मी येऊनि भेटे भणंगा ॥ सीता भेटतां रमारंगा ॥ कपि गुढिया उभारती ॥९६॥
जन्मेजयापासून ॥ मुक्त केलें काद्रवेयांलागून ॥ जयजयकार वासुकी करुन ॥ सुखसिंधूंत हेलावे ॥९७॥
सुरांपासोनि सुधा जिंकोनी ॥ खगेंद्र मुक्त करी जननी ॥ तेवीं आनंद माझे मनीं ॥ किती वंदू या वदनें ॥९८॥
यापरी शिष्याची विनंती ॥ जैसें वत्स हंबरे क्षुधार्ती ॥ गाई हंबरोनि पान्हा घालिती ॥ होय तृप्ति वत्सासी ॥९९॥
शिष्यप्रश्नांचें कोड ॥ सद्गुरु करील अर्थ उघड ॥ त्याही प्रश्नांचे निवाड ॥ पुढिले प्रसंगीं होतील ॥२००॥
अध्यायापरीस अध्याय विशेष ॥ जेवीं देउळावरी ठेविजे कळस ॥ चाले मतीचा प्रकाश ॥ कविमुखें गुरुकृपें ॥१॥
वानरांहातीं विनाश शंकेचा ॥ हा महिमा श्रीरामाचा ॥ म्यां लेखा केला ग्रंथाचा ॥ हे प्रौढी श्रीगुरुची ॥२॥
आमुचा पहाल केवा ॥ सिंधूवरी बिंदूचा ठेवा ॥ कनकीं नग मिरवे बरवा ॥ तेवीं जीवत्व आमुचें ॥३॥
वायु सांडोनि गगन ॥ कोठें करुं पाहे गमन ॥ उदक सोडून धांवणें ॥ तरंग कैसा करील ॥४॥
पयापोटीं निघतां माखण ॥ आकाशापोटीं तारागण ॥ रविबिंबीं प्रगटे किरण ॥ किंवा धन महीचें उदरीं ॥५॥
गुरुकृपा शिजवटा ॥ ज्ञानगंगा बोध निघे धोपटा ॥ शिष्यहृदय होय डोहो मोठा ॥ भरोनि उचंबळें इंद्रियद्वारें ॥६॥
तृप्त जाहल्या अनंतर ॥ ढेकर जेवीं देती जेवणार ॥ तेवी सद्गुरुकृपेचा भर ॥ उद्गार निघे कविमुखें ॥७॥
अनुभवावांचोनि कवण ॥ जैसें टर्फल बीजाविण ॥ कीं नपुंसकवराचें मैथुनें ॥ काय कांता निवेल ॥८॥
काय वेदीं शास्त्रीं उण ॥ ल्याहावें ग्रंथीं घालून ॥ उगीच केली वटवट जाण ॥ पिशाच जैसा आलापी ॥९॥
भिल्लें लिंगावर पाय ठेविला ॥ शिव प्रसन्न त्यासी जाहला ॥ द्रोपदी अर्पितां शाकपत्राला ॥ धाला दीनबंधु तितुक्यांत ॥२१०॥
बिभीषणाचें एक लोटांगण ॥ राम करीं लंकेचें दान ॥ मुष्टि पोहे समर्पितां जाण ॥ हेमनगरी सुदाम्या ॥११॥
तुळसीपत्रें विष्णुसंतोष ॥ बुका लावितां विठ्ठला हरुष ॥ तेवीं शहामुनीचें नमनास ॥ सद्गुरु होती कृपाळु ॥१२॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये द्वात्रिंशोऽध्याय: ॥३२॥
अध्याय ॥३२॥ ओव्या ॥२१२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2020
TOP