मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध| अध्याय २६ वा सिध्दान्तबोध प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २६ वा ‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे. Tags : pothisiddhant bodhaपोथीसिध्दान्त बोध अध्याय २६ वा Translation - भाषांतर श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्योनम: ॥ समस्त श्रोतयां लागूनी ॥ प्रार्थना करितों जोडूनि पाणी ॥ नरदेह अलभ्य लाभ मानोनी ॥ नका दवडूं व्यर्थ हा ॥१॥नरदेह इच्छिती सुरवर ॥ पावावया मोक्षाचें घर ॥ तुम्हांसी लाधला साचार ॥ सार्थकता करावया ॥२॥नरदेह जायाचें लेणें ॥ उसणें दीधलें मायेनें ॥ तिणें घेतल्या मागत्यानें ॥ पुन्हा लक्ष चौर्यांशी ॥३॥मग घडेल थोर प्रस्ताव ॥ जैसा ययातीस जाहला अपाव ॥ पावोनि सर्व सुखाचा ठाव ॥ आत्मस्तुतीनें दवडिला ॥४॥मृगाचिये नाभीसी ॥ वसे सुगंधाची राशी ॥ भोक्तृत्व न घडे त्यासी ॥ असोनि कस्तूरी संनिध ॥५॥तैसा मूर्खा नरदेह जोडला ॥ अनुभव न करितां व्यर्थ गेला ॥ वायस आयुष्य फार पावला ॥ कोण उपयोगा येईल ॥६॥उरगमस्तकीं मणी उपजला ॥ परी जनाचे उपयोगा नाहीं आला ॥ तेवीं अज्ञान नरदेहा आला ॥ वायां गेला भक्तिविणें ॥७॥म्हणोनि करावा सारासार विचार ॥ सत्य भजावा परमेश्वर ॥ चुकवावे जन्मफेर ॥ तरीच पुरुषार्थ नरदेहीं ॥८॥परमेश्वरीं भक्ति केली नाहीं ॥ ते बुडाले मध्यप्रवाहीं ॥ जन्मोनियां नरदेहीं ॥ फुटकी नाव ज्यापरी ॥९॥न संसारभोग पुरता घडे ॥ ना मोक्षमार्ग जोडे ॥ आयुष्य सरतां जाहलें मढें ॥ दोहींकडे नागवण ॥१०॥ऐसें नका करुं भाई ॥ संसार स्वप्नवत् पाहीं ॥ येथें हातीं लागत नसे कांहीं ॥ व्यर्थ प्रवाहीं लोटले ॥११॥नका लुब्धुं द्रव्य दारा ॥ हा तों मायिक पसारा ॥ दर्पणींचें बिंब धरितां करा ॥ हातीं काय लागेल ॥१२॥भेटों जातां अंगींची छाया ॥ केवीं संतोष पावे काया ॥ तेवीं जाणा पुत्र जाया ॥ कळों येईल परिणामीं ॥१३॥नेत्रांतील बाहुली ॥ केवीं मुखीं जाईल चुकविली ॥ अभ्राचिये छाये तळीं ॥ गृहस्थाश्रम चालेल ॥१४॥अहो रवीचिया किरणीं ॥ उचलों पाहीं दीपा लागूनीं ॥ चंद्रबिंबींचें पाणी ॥ प्राशूं म्हणतील तृषेला ॥१५॥तैसे संसारिक जन ॥ भलतेंचि इच्छी त्यांचें मन ॥ गाजराचें करोनि तुळादान ॥ बैसों पाहती विमानीं ॥१६॥घरोघरीं ब्रह्मज्ञान ॥ बोलती चातुर्य शाहाणपण ॥ भक्तिभाव दयाशून्य ॥ जाय कठोरता विषमता ॥१७॥सुखेच्छा असंभाव्य जोडे ॥ करणी तिळप्राय न घडे ॥ प्राप्तीचा विचार उगा आतुडे ॥ बोलणें कुंडें सर्वही ॥१८॥बहुशास्त्रांचा करितां अभ्यास ॥ निश्चयो न बैसे एक ठायास ॥ मग आत्मसुखाचा लेश ॥ केवीं लभ्यांश होईल ॥१९॥फार जरी तीर्थे केलीं ॥ मानसकल्पना नाहीं निमाली ॥ तेव्हां कोणत्या पुण्याची माउली ॥ पदरीं पडिली अनुभवा ॥२०॥अनेक व्रतें केलीं ॥ उपोषणें काया दंडिली ॥ परी विश्रांतीची साउली ॥ कोणती आली विचारा ॥२१॥जप तप यज्ञ होम ॥ येणें कोणता निरसिला भ्रम ॥ षंढें त्यजिला गृहस्थाश्रम ॥ शुक संगी तो केवीं होय ॥२२॥ यालागीं हा गोवा ॥ येथें कैसा होईल उगवा ॥ कोणत्या सुकृताचा ठेवा ॥ जेणें पावाल मोक्षातें ॥२३॥जों जों पडेल साधनांत ॥ तों तों गुंतला बहुत ॥ आयुष्याचें अल्पगणित ॥ क्षण शाश्वत असेना ॥२४॥यालागीं साधन कचाट ॥ त्यांची बांधोनि बुडवा मोट ॥ धरा भक्तीची श्रेष्ठ वाट ॥ मोक्षपेठ वसावया ॥२५॥शेरांचें दुग्ध काढोन ॥ तया घुसळितां न निघे माखण ॥ तैसें अनेक साधनें करुन ॥ सारवस्तुं मिळेना ॥२६॥आतां असो हा दृष्टांत ॥ ज्ञानी जाणती हा संकेत ॥ अज्ञान भाविती विपरीत ॥ नेणोनि अर्थ मुळींचा ॥२७॥मूळ शोधावया कारण ॥ केला हा सिध्दांतबोध निर्माण ॥ येणें चुकेल अज्ञानभ्रमण ॥ निश्चिय बैसे परब्रह्मीं ॥२८॥यालागीं हा ग्रंथ श्रवण कीजे समग्र भक्तीकरुन ॥ तया प्राप्त होईल आत्मज्ञान ॥ फिटेल कल्पना मनाची ॥२९॥मागील अध्यायाचे अंतीं ॥ कथिली अवतारपध्दती ॥ ते परिसोनि द्विजमूर्ती ॥ पृच्छा करी स्वामिया ॥३०॥भूदेव म्हणे करुणाघना ॥ निरुपिली अवतारचरित्ररचना ॥ चतुर्थ नारसिंह जाणा ॥ कोण पुरुष मज सांगें ॥३१॥जगदीश म्हणे अगा द्विजा ॥ निरुपितों नृसिंह अवतार वोजा ॥ कवण पुरुष या काजा ॥ अवतार तो आकर्णी ॥३२॥वैकुंठपाळ विष्णूनें ॥ वराहवपू अवलंबून ॥ वधिला हिरण्याक्ष दैत्य दारुण ॥ वसुधा स्वस्थळा आणिली ॥३३॥हिरण्यकशिपू त्याचा अनुज ॥ कैटभारीनें वधिला अग्रज ॥ हें परिसोन असुरराज ॥ संतप्त जाहला मानसीं ॥३४॥सहोदराचें दु:खास्तव ॥ धरिला श्रीमहाविष्णूसी वैरभाव ॥ ग्रामीं कोणीं देवाचें नांव ॥ घेतां दंडी त्या लागीं ॥३५॥घरोघरीं द्वाही फिरविली ॥ तुळसीवृंदावनें मोडिलीं ॥ महाशिवालयें भंगिली ॥ पुराणश्रवण मग कैचें ॥३६॥कोणी वदतां हरिहर ॥ तयांचें छेदी वक्र ॥ पूजा कीर्तन नामोच्चार ॥ शून्य जाहला त्यादेशीं ॥३७॥नारद सांगें विष्णुपाशीं ॥ हिरण्यकशिपु तुम्हां द्वेषी ॥ विष्णु सांगे महाविष्णुपाशीं ॥ दैत्यें कलहो मांडिला ॥३८॥मोडिली स्वधर्माची राहाटी ॥ वाढविली अधर्माची गोष्टी ॥ ऐसा पेटलासे हटीं ॥ अखंड द्वेषीं आमुतें ॥३९॥आमुचें नाम उच्चारितां ॥ प्रवर्ते त्याचिया घाता ॥ ऐसिया असुर उन्मत्ता ॥ कोण उपाय करावा ॥४०॥ऐसें सांगतां कमळापती ॥ वदे क्षीराब्धींची मूर्ती ॥ जयविजय आमुचे होती द्वारपाल बलिष्ठ ॥४१॥ऋषिशापें मृत्युलोका ॥ पतन पावले उभयतां देखा ॥ पावोनि असुरवपूची पीठिका ॥ उन्मत्त जाहले मदांध ॥४२॥त्याचा असुर ज्येष्ठ बंधू ॥ स्वकरें केला तुम्ही वधु ॥ त्या रोषें तुम्हांसी द्वंद्वू ॥ वाढविला अविचारें ॥४३॥विश्वंभरनाम दैवत ॥ सन्निध होता बुध्दिमंत ॥ तयासि प्रेरिलें त्वरित ॥ मृत्युलोका माझारी ॥४४॥तो विश्वंभर महाचतुर ॥ असुरगृहीं जाहला कुमर ॥ तो अखंड नामोच्चार ॥ कंठीं स्पष्ट अनुवादे ॥४५॥विश्वंभराचें अभिदान ॥ जनकें प्रल्हाद ठेवून ॥ मोहें मानी मम नंदन ॥ नेणे भाव विष्णूची ॥४६॥आहार दे धरोनि सद्भावो ॥ पूजी शक्ति ग्रामदेवो ॥ उच्चारी श्रीहरीचें नांवों ॥ नि:शंक निर्भय मानसीं ॥४७॥वार्ता प्रवेशली सदनी ॥ प्रल्हाद गर्जे नामध्वनि ॥ म्हणें कुमरा तुझी वाणी ॥ कोणें वदविली या रीतीं ॥४८॥येरु म्हणे अगा जनका ॥ सत्ताधारी विश्वव्यापका ॥ तोचि माझा प्राणसखा ॥ वदवी देखा सद्बुध्दी ॥४९॥रावण म्हणे अरे नष्टा ॥ भलतेच वदसी क्रियाभ्रष्टा ॥ माझिया वैरिया दुष्टा ॥ कैसा वदसी या वदनीं ॥५०॥आजि पासोनि हरिवचन ॥ वमी पुत्रा मनापासोन ॥ येरु म्हणे गेलिया प्राण ॥ निष्ठा न सुटे हरीची ॥५१॥वसुधा बुडों समुद्रोदरीं ॥ आकाश तुटोनि पडो शिरी ॥ हरीनाम बैसलें वैखरी ॥ तें कल्पांतीं निघेना ॥५२॥धरा त्यजोनि सहस्त्रफणी ॥ कूपीं बैसला विरोळ होऊनी ॥ किंवा विनतानंदन पाणी ॥ काद्रवेयाघरीं वाहेल ॥५३॥खद्योततेजाचेनि उजियेडें ॥ भास्कर लाजोनि सदनी दडे ॥ पिपीलिका श्वासे मेरु उडे ॥ तैं मज घडे अभक्ता ॥५४॥पिनाकीचा तृतीय नयन ॥ होईल हिमकरासमान ॥ तैं माझें हृदयीं हरिभजन ॥ शून्य होईल स्वभावें ॥५५॥जैं अढळपदी ध्रुव चळे ॥ वैश्वानर आणील जळें ॥ मूषकधाके कुंजर पळे ॥ तैं मी चळें हरिभजनीं ॥५६॥परिसोनि पुत्राचा अचळ नेम ॥ जनकहृदयीं क्रोध परम ॥ मग म्हणे हा कुमर ॥ भस्म हुताशनी करावा ॥५७॥रचोनि शुष्ककाष्ठांचा गिरी ॥ प्रल्हाद बैसविला तयावरी ॥ वन्हि पेटविला चौंफेरीं ॥ शिखा गगनीं कवळिती ॥५८॥विश्वंभराचा अवतार जाणोन ॥ अग्नि वंदी प्रल्हादचरण ॥ तो वन्हिरुप होवोन ॥ निर्भय उभा ज्वाळांत ॥५९॥जाहलीं काष्ठें जळोनि राख ॥ प्रल्हाद गर्जे नि:शंक ॥ आश्चर्य करुनि असुरनायक ॥ धरा म्हणे पुनरपि ॥६०॥अरे हा चेटकी कुमर ॥ विद्याबळें वांचवी शरीर ॥ ग्रीवेसि शिळा बांधोनि थोर ॥ समुद्रोदरीं बुडवावा ॥६१॥आज्ञा होतांचि नृपाची ॥ सेवकीं केलें तैसेंची ॥ येरु मनोवेगें गुप्तची ॥ सभेमाजी पातला ॥६२॥राजा म्हणे सेवकांतें ॥ कैसें बुडविलें उदकीं यातें ॥ सेवक म्हणती हा विद्यावंत ॥ कांहीं केल्या मरेना ॥६३॥हें परिसोनि नृपवर ॥ क्रोधें चावोनियां अधर ॥ म्हणे बांधा यासी लौकर ॥ लोटा गिरितळवटीं ॥६४॥पाषाण घालोनियां करा चूर्ण ॥ विष प्राशूनि घ्यारे प्राण ॥ शस्त्राघायें करा छिन्नभिन्न ॥ प्राण घ्यारे तत्काळ ॥६५॥घालोनि कुंजरपायातळीं ॥ मर्दूनि मेळवावा धुळीं ॥ दंशूनि महाव्याळ कंठनाळीं ॥ करा होळी अंगाची ॥६६॥प्रल्हाद म्हणे ऐकें ताता मात ॥ तुझ्या कोपाचे आघात ॥ मातें लागती पुष्पवंत ॥ रोमरेषा न भंगे ॥६७॥पिता म्हणे महासंकट ॥ कोण निवारितो अरिष्ट ॥ येरु म्हणे जगीं प्रगट ॥ हरि म्हणती पुराणीं ॥६८॥राजा पुसे तुझा हरि ॥ कोठें वसे गा सांग झडकरी ॥ आधीं त्यातें वधीन शस्त्रीं ॥ मग मारीन तुज आत्मजा ॥६९॥येरु म्हणे सर्वव्यापक ॥ हरि भरला पहा विवेक ॥ जळीं स्थळीं काष्ठीं देख ॥ कोंदलासे जगदात्मा ॥७०॥येरीकडे महाविष्णूनें ॥ यक्षिणी प्रेरिली साह्यालागून ॥ ते खांबामाजी प्रवेशून ॥ गुप्तरुपें राहिली ॥७१॥यावरी कोपला असुर भारी ॥ म्हणे कोठें रे तुझा हरी ॥ तेव्हां स्तंभ चिरोनि केसरी ॥ विक्राळरुपें प्रगटला ॥७२॥यक्षिणीच्या कोपापुढें ॥ जळो शके ब्रह्मांड गाढें ॥ तेथें हिरण्यकशिपु बापुडें ॥ काय वेडें तगेल ॥७३॥हिरण्यकशिपु धरिला दाढे ॥ द्वारामध्यें घेतला पुढें ॥ उदर विदारुनि वोढी आंतडें ॥ दैत्यमढें निमाले ॥७४॥प्रल्हाद रक्षिला श्रीहरी ॥ मात विस्तारिली विश्वामाझारी ॥ यक्षिणी अवतार नरहरी ॥ नेणती हें निजवर्म ॥७५॥तंव ब्राह्मण पुसे जी देवा ॥ याचा अभिप्राय हा बरवा ॥ विवरोनियां आघवा ॥ कृपाळुवा मज सांगा ॥७६॥अहो विष्णूचे दाहा अवतार ॥ ऐसा पुराणांतरीं गजर ॥ तुम्हीं तों निवडितां भिन्नाकार ॥ अवतारचर्या वेगळी ॥७७॥मत्स्यावतार वज्रभानाचा ॥ कूर्म निरुपिला महाविष्णूचा ॥ वराह कथिला कमळावरचा ॥ यक्षिणीचा नारसिंह ॥७८॥सकलपुराणीं एकमत ॥ तुम्हीं कथिला भिन्नार्थ ॥ विष्णु प्रगटला स्तंभांत ॥ जगप्रसिध्द सांगती ॥७९॥ ऐसी ब्राह्मणाची आशंका ॥ फेडावया सर्वोत्तमा देखा ॥ बोलता जाहला भक्तसखा ॥ द्विज भाविका सभाग्य ॥८०॥जगदीश म्हणे ब्राह्मणालागुनी ॥ दहा अवतार विष्णुचे पुराणीं ॥ ऐसी प्रगटली वाणी ॥ त्याचें मूळसूत्र ऐकपां ॥८१॥सकल सृष्टीचा बोभाट ॥ महाविष्णूपें जाय प्रकट ॥ यालागीं मूळपीठ ॥ विश्वरक्षक क्षीराब्धी ॥८२॥महाविष्णूचे आज्ञाधार ॥ ब्रह्मादिक हरि हर ॥ इंद्र चंद्र भास्कर ॥ गंधर्व सांब यक्षिणी ॥८३॥ज्यासी महाविष्णु आज्ञा करी ॥ तोचि देव अवतार धरी ॥ म्हणोनि पुराण उच्चारी ॥ विष्णूची घेतो अवतार ॥८४॥युध्द करिती महावीर ॥ घायाळ होती रणशूर ॥ विजयी जाहलिया वर ॥ नाम होतें नृपाचें ॥८५॥महाविष्णूचे आज्ञेकरुन ॥ अवतार घेती देवता जाण ॥ म्हणोनि वाखाणिती पुराणें ॥ दाहा अवतार विष्णूचे ॥८६॥पुराणींचें संमत ॥ विष्णूचि परमात्मा सत्य ॥ तोचि दहा अवतार धरित ॥ विश्व रक्षावयाकारणें ॥८७॥ब्राह्मण म्हणे जगजेठी ॥ दहा अवतार अंबरीषासाठीं ॥ घेतले हेचि गोष्टी ॥ प्रेरणा केली पुराणीं ॥८८॥सर्वेश्वर म्हणे द्विजासी ॥ दत्तात्रेय दुर्वासऋषी ॥ जन्मले अनसूयेचे कुशीं ॥ त्रेतायुगीं जाणपां ॥८९॥द्वापाराची उदय वेळ ॥ अंबरीषाचा जन्मकाळ ॥ शंखासुरें वेद हरतेवेळ ॥ नव्हता दुर्वास अंबरीष ॥९०॥दुर्वास जन्मला त्रेतायुगांत ॥ अंबरीष द्वापारांत ॥ चतुर्थ अवतार कृतयुगांत ॥ याजपूर्वी जाणपां ॥९१॥कृतयुगांत जाण ॥ अंबरीष असता पुरातन ॥ तरी दाहा अवतार प्रमाण ॥ धरों येते त्यास्तव ॥९२॥या युगांतील अंबऋषी ॥ मागिले चौकडीतील निश्चयेंसी ॥ हें गुह्यज्ञान नकळे पुराणांसी ॥ विश्वालागीं केवीं कळे ॥९३॥अंबरीष या चौकडींतील ॥ अवतारसंख्या पुरातन ॥ अंबरीषाचे गर्भवास चुकवणें ॥ विष्णुलागीं घडेना ॥९४॥मुळीं विष्णु आहेत चार ॥ कोणत्या विष्णूचे दहा अवतार ॥ हें नकळतां उच्चार ॥ पुराणीं ऋषि बोलती ॥९५॥एक बोलिजे सहज विष्णु ॥ दुजा म्हणिजे महाविष्णु ॥ तिजा जाणिजे महद्विष्णु ॥ चतुर्थ विष्णु परम जो ॥९६॥सहजविष्णु वैकुंठींचा ॥ महाविष्णू क्षीराब्धिचा ॥ महद्विष्णू भैरवींचा ॥ परम विष्णु तो विराट ॥९७॥या चौं विष्णु वेगळा ॥ जाणिजे परब्रह्म पुतळा ॥ वर्म सांगितलें द्विजा तुजला ॥ इतरांसी अलक्ष्य ॥९८॥यापरी चार अवतार ॥ कृतयुगीं जाहले साचार ॥ मग जावोनि सनत्कुमार ॥ प्रश्न करिती ब्रह्ययासी ॥९९॥मत्स्य अवतार जाहला ॥ वज्रनाभ देवें घेतला ॥ परी परमार्थ नाहीं कथिला ॥ कार्य साधिलें तितुकेंची ॥१००॥कूर्मावतार महाविष्णु धरुन ॥ मंदरगिरि पृष्ठिवरी उचलून ॥ सुरीं असुरीं समुद्र मंथून ॥ सुवा देवालागीं दीधली ॥१॥परंतु परमार्थचरित्र ॥ कथिलें नाहीं अणुमात्र ॥ मग मोक्षाचें निजसूत्र ॥ केवीं प्राप्त साधकां ॥२॥वराह अवतार विष्णूचा ॥ वध केला हिरण्याचा ॥ परि उपदेश सद्भक्तीचा ॥ नाहीं वदलां जीवांसी ॥३॥नारसिंह अवतार घेऊनि यक्षिणी ॥ प्रगटली विशाळ स्तंभ चिरोनी ॥ हिरण्यकशिपू विदारुनी ॥ प्रल्हादा साह्य ती जाहली ॥४॥चार अवतार चौंचे जाहले ॥ कार्य साधून स्वस्थळा गेले ॥ परी साधक तैसेचि राहिले ॥ मोक्ष आशा धरुनियां ॥५॥कृतयुगही संपलें ॥ विश्व अधोगती चालिलें ॥ त्यासी पाहिजे परमार्थ कथिलें ॥ श्रेष्ठ तुम्ही विवेकीं ॥६॥निरुपा जी निजवर्म ॥ जीवाचा तुटे भ्रम ॥ प्राप्त होय मोक्षधाम ॥ ऐसें सुगम निवेदा ॥७॥कैसी माया कैसा ईश्वर ॥ कैसा जीवाशिवांचा विस्तार ॥ उत्पत्ति प्रळय संहार ॥ कोण कर्ता मूळसूत्र ॥८॥कोठें जीवाचा मूळ उगम ॥ तें मज करुनि सुगम ॥ तुम्हांपाशीं आगम निगम ॥ वेदशास्त्रें पुराणें ॥९॥जेणें उगवे संसार उगवा ॥ ऐसा विवेक कथिजे बरवा ॥ पंचविषय सुटिजे जीवा ॥ पुन्हां भावना नातळे ॥११०॥यापरी करा निजबोध ॥ तुटेल जीवाचा अविद्याबंध ॥ पावेल सौख्य स्वानंद ॥ चुकेल द्वंद्व यातनाची ॥११॥तूं सृष्टी स्वयें कर्ता ॥ यालागीं प्रार्थितो ताता ॥ आमुची निवारीं भवव्यथा ॥ तूंचि दाता सकळांचा ॥१२॥ऐशी पृच्छा सनत्कुमारांची ॥ परिसोनी विस्मय करीं विरींची ॥ म्हणे अगाध बुध्दि यांची ॥ प्रश्न करिती अतर्क्य ॥१३॥या प्रश्ना प्रत्युत्तर ॥ शोधिता नसे हृदयाभीतर ॥ मग विचारोनि सावित्रीवर ॥ परमेश्वर लक्षिला ॥१४॥मी पाहोनि समर्थ ॥ पुशिला प्रश्न अत्यद्भुत ॥ यांचे पुरवूं मनोरथ ॥ ऐसा अर्थ मज कैंचा ॥१५॥यांसी नाहीं म्हणतां ज्ञान ॥ येवों पाहे अज्ञान ॥ होय म्हणतां बोधसंपन्न ॥ करावया मज कैंचा ॥१६॥अनुभव आणूनि ज्ञानी ॥ स्मरे परमेश्वरालागूनी ॥ तुजवांचोनि गवसणी ॥ कोण निरसील दूसरा ॥१७॥मी तों कर्मी ब्रह्मा ॥ नेणे परमभक्तीचा महिमा ॥ यालागीं जी पुरुषोत्त्तमा ॥ देई दर्शन यासमयीं ॥१८॥घरीं सगुणरुप गोमटें ॥ अर्थदानीं या होय प्रगट ॥ वारीं सनत्कुमारांची अट ॥ आपुली गोष्ट सांगोनी ॥१९॥तूं स्वयें अव्यक्त ॥ मजकरितां होई व्यक्त ॥ सनत्कुमार करीं मुक्त ॥ आपुली भक्ति दावूनी ॥१२०॥तूं म्हणसी निर्विकार ॥ किमर्थ धरुं सगुण अवतार ॥ तरी हा घोरसंसार ॥ कोण निस्तरी जीवांचा ॥२१॥म्हणसी मातें नाहीं श्रवण ॥ कोण पुसे तुझें स्तवन ॥ मुंगीचे वाजती चरण ॥ श्रुत होती तुज स्वामी ॥२२॥तुझी महामाया चैतन्य ॥ तोडूं न शके जीवाचें बंधन ॥ इतर देवांचा पाड कोण ॥ करावया जीव मुक्त ॥२३॥यालागीं परपुरुषा ॥ घालीं कृपेचा अपुल्या ठसा ॥ तोडीं अविद्येचा फांसा ॥ जीव हंसा उध्दरीं ॥२४॥ऐसी विरिंचीची करुणा ॥ परिसोनि कैवल्यराणा ॥ होऊनि हंसपक्षी जाणा ॥ अवतार धरी त्या समयीं ॥२५॥ऐसी सर्वोत्तमाची वाणी ॥ परिसोनि द्विज करी विनवणी ॥ माझिया हृदयभवनीं ॥ संशयउर्मी उसळली ॥२६॥ज्यास नांव नाहीं रुप ॥ जे निर्विकार स्वरुप ॥ तो कैसा जाहला हंसरुप ॥ भ्रांति मातें उदेली ॥२७॥जगदीश म्हणे ब्राह्मणा ॥ सृष्टि उदय प्रलय जाणा ॥ परमेश्वर आज्ञेविणा ॥ मध्यें कैसी होईल ॥२८॥परमेश्वर अवतार न घेतां ॥ मग जीवांचा उध्दार केउता ॥ निर्विकार पदाची वार्ता ॥ कोण करिता सृष्टींत ॥२९॥ब्राह्मण म्हणे स्वामी ॥ या बोला गवसला तुम्ही ॥ सृष्टीची घडामोड ब्रह्मीं ॥ इच्छामात्रें असे कीं ॥१३०॥ब्रह्म इच्छाकल्पनातीत ॥ ऐसा निरुपिला पूर्वी सिध्दांत ॥ आतां म्हणतां ईश्वर हेत ॥ उत्पत्ति आणि संहार ॥३१॥तेव्हां परमेश्वर कर्ता ॥ ऐसें आलें मम चित्ता ॥ या परिहारा समर्था ॥ तुजविणा वक्ता दिसेना ॥३२॥गोसावी म्हणे ब्राह्मणा ॥ बरवी काढिली कल्पना ॥ याचा विवेक निपुणा ॥ परिसें सूज्ञा सुतर्की ॥३३॥परमेश्वर न कर्ता सृष्टि करी ॥ त्याची निरखें नवलपरी ॥ तुझिया आशंकेची भरारी ॥ ते परिहारुं दृष्टांतें ॥३४॥चुंबकाचे संन्निधानीं ॥ लोह चळे पाहतां नयनीं ॥ तें काय हालवी लावोनि पाणी ॥ कीं मुखानें आज्ञापी ॥३५॥तैसा परमेश्वर कर्ता ना अकर्ता ॥ माया सन्निधानें चळे सर्वथा ॥ चुंबकवत जाणे भगवंता ॥ माया लोह्त्वें ओळखावी ॥३६॥अगा गवंडियाचा वोळंबा ॥ त्या आधारें करी घर उभा ॥ गगनीं प्रगटत चंद्रबिंबा ॥ भरती दाटे समुद्रीं ॥३७॥उदय होतां गभस्ती ॥ कुमुदिनी विकासती ॥ विश्वाची निरसे सुषुप्ती ॥ जीव करिती व्यवहार ॥३८॥कूर्मे आठवण करिती हृदयीं ॥ पिलीं तृप्त होती स्वगृहीं ॥ मीन परतोनि दिठी पाहीं ॥ मत्स्य पोसती आपैसें ॥३९॥यापरी जाण द्विजोत्तमा ॥ कांहीं न करोनी करी परमात्मा ॥ उभारी अनंत ब्रह्मांडधामा ॥ सत्तामात्रें जाण पां ॥१४०॥स्वरुपें खुणाविता जाणा ॥ माया करी ब्रह्मांडरचना ॥ म्हणोनि परमात्म्याविना ॥ सृष्टि न करवे मायेसी ॥४१॥ब्राह्मण म्हणे जी स्वामिया ॥ काय खोळंबा होता देवराया ॥ सृष्टि रचावी हे माया ॥ देवें केली संज्ञा ॥४२॥परिसोनि ब्राह्मणाचा भाव ॥ बोलता जाहला देवाधिदेव ॥ म्हणे मायातमा जीव ॥ पडले होते असंख्य ॥४३॥तमांतून जीव काढावया ॥ करुणा आली देवराया ॥ सृष्टि रचावी माया ॥ करिता जाहला संज्ञा ॥४४॥करुणा यावया कारणें ॥ ऐसें पुसिलें ब्राह्मणें ॥ त्या परिहाराचीं वचनें ॥ देता जाहला जगदीश ॥४५॥या परमेश्वरा सन्निधाना ॥ चतुर्थशक्ति वोळगणा ॥ दया माया कृपा करुणा ॥ नांवें त्यांचीं ओळखावीं ॥४६॥गोठणीं धेनु असतां देखा ॥ पृष्ठीं बैसल्या गोमक्षिका ॥ तेचि स्थानीं उटाळिका ॥ होत असे त्वचेचि ॥४७॥धेनु सर्वांगीं निश्चळ ॥ कोठें अणुमात्र नाहीं चळ ॥ यापरी पाहतां प्रांजळ ॥ मक्षिका स्थानीं स्फुरली ॥४८॥तैसा जाण परमात्मा ॥ जयाची निश्चळ प्रतिमा ॥ करुणाशक्तीचा पुरुषोत्तमा ॥ उल्लेख जाहला स्वरुपीं ॥४९॥धेनुन्यायें परमात्मा बोलिजे ॥ गोमक्षिका ते माया जाणिजे ॥ स्फुरली ते ओळखिजे ॥ उल्लेखाची संज्ञा ॥१५०॥यापरी स्वरुपाचा उद्गार ॥ माया करी सृष्टीचा आधार ॥ मायेचा असे कीं ॥५१॥स्वरुप अकर्ता म्हणावें ॥ तरी त्यावेगळी सृष्टि न उद्भवे ॥ जरी कर्ता ऐसें म्हणावें ॥ तरी माया सर्व विस्तारी ॥५२॥कर्ता म्हणसी तरी हा करीना ॥ अकर्ता म्हणों तरी त्याविणें होईना ॥ लोहचुंबकवत् जाणा ॥ अनुभव मात्र जाणिजे ॥५३॥इतर शास्त्रांचें बोलणें ॥ स्वरुपीं मी ब्रह्म जाहलें स्फुरण ॥ मग सृष्टि निर्माण ॥ जाहली ऐसा सिध्दांत ॥५४॥मी ब्रह्म स्फुरण जाहलें ॥ तैं चैतन्य मायेनें केलें ॥ तेथें जीवास लग्न लागलें ॥ सोहं भाव कल्पोनी ॥५५॥सकळ जीवांस माया मोहून ॥ लाविलें सोहमस्मि ध्यान ॥ विसरोनि परब्रह्म निर्वाण ॥ मायेसी म्हणती मी ब्रह्म ॥५६॥अगा सोहं हा उच्चार ॥ सर्वां घटीं निरंतर ॥ मग मोक्षाचें मंदिर ॥ कां न लक्षिती जीव हे ॥५७॥हाचि परमार्थ रुढ पाहीं ॥ गुरु उपदेशिती ठायींठायीं ॥ तूंचि ब्रह्म शिष्यदेहीं ॥ सोहंशब्दें जाणिजे ॥५८॥आधीं उपदेशती तूंचि ब्रह्म ॥ मग सांगती साधनकर्म ॥ हा उफराटा योगधर्म ॥ अनुभवें जाणिजे ॥५९॥अगा येवढा जो परमात्मा ॥ तयाची काय अज्ञान प्रतिमा ॥ आपणासि विसरोनियां भ्रमा ॥ गुंतोनि पडे चौर्याशीं ॥१६०॥हें तो तर्कवादियांचें मत ॥ जीवासीच ब्रह्म कल्पित ॥ जीव परमात्मा भिन्नत्व ॥ अनादिसिध्द असती ॥६१॥मायातमीं अंधकारीं ॥ जीव असंख्य असती अंतरीं ॥ पाहोनि करुणा माये लहरी ॥ उल्लेख जाहला स्वरुपीं ॥६२॥स्वरुपीं उल्लेख जाणून ॥ मायेचे ठायीं जाहलें स्फुरण ॥ मग सृष्टिविस्तार गहन ॥ करिती जाहली स्वइच्छा ॥६३॥यालागीं आणि कल्पना ॥ मायेच्या ठायीं ब्राह्मणा ॥ स्वरुपीं लाविती वासना ॥ ते चावळती स्वप्नवत ॥६४॥प्रस्तुत असो हे बोली ॥ त्वा मातें पृच्छा केली ॥ सृष्टि कां विस्तारली ॥ जगदीश्वरें हें सांगा ॥६५॥त्या परिहाराकारणें ॥ इतुकें जाहलें बोलणें ॥ हें परिसोन द्विजानें ॥ पृच्छा केली पुढती ॥६६॥परम पुरुषा तुझ्या गोष्टी ॥ जों जों पडती कर्णपुटीं ॥ तों तों हृदयसंपुटीं ॥ सांठवूं ऐसें वाटतें ॥६७॥काय निमित्त उत्पत्ति सृष्टीची ॥ ते त्वां सांगितली साची ॥ मायातमीं गुंती जीवाची ॥ यास्तव सृष्टी उद्भवली ॥६८॥विस्तार तो हा जीवासाठीं ॥ जाहली ब्रह्मांडांची दाटी ॥ परी संहार कवणासाठीं ॥ होतो काय निमित्त ॥६९॥हें मज सांगावें कृपा करुनी ॥ परिसोनि बोले मोक्षदानी ॥ म्हणे ऐका विप्रा श्रवणीं ॥ संहार काय तुज सांगो ॥१७०॥अविद्या लागली जीवासी ॥ म्हणोनि भोगी चौर्यासी ॥ जे पावले मोक्षपदासी ॥ त्यांची चुकली भवफेरी ॥७१॥किती एक योगें जीवाला ॥ भोगितां गर्भवास दुखावला ॥ कृपा आली कृपाशक्तीला ॥ परमेश्वरीं वोळंगली ॥७२॥स्वरुपीं उल्लेखसंज्ञा होतां ॥ माया जाणे त्या अर्था ॥ प्रळयसृष्टीची वार्ता ॥ करिती जाहली साक्षेपें ॥७३॥जे परमेश्वरें मुक्त केले ॥ ते जन्ममरणा चुकले ॥ जे उरते ते सांठवले ॥ मायातमीं जाणपां ॥७४॥करुणाशक्तीनें सृष्टि रचिती ॥ कृपाशक्तीनें संहार करिती ॥ दया माया शक्तीनें अवधारिती ॥ जीव उध्दरती भक्तीनें ॥७५॥दया माया कृपा करुणा ॥ सुंदर औदार्य स्वानंद जाणा ॥ सौभाग्य व्यापक परिपूर्णा ॥ ओळखें खुणा देवाच्या ॥७६॥परमेश्वर तो निर्विकार ॥ सगुण धरी अवतार ॥ अव्यक्तासी अवयव अंकुर ॥ कैसे जाहले तुज सांगों ॥७७॥निराकार आकारा आला नाहीं ॥ अवतार तरी घेतला पाहीं ॥ अनुभव ज्ञानेंचि घेई ॥ येर्हवी न कळे विचारितां ॥७८॥ब्रह्मयाची करुणा परिसोन ॥ दया माया स्वरुपीं ओळंगोन ॥ परमेश्वर हंस होऊन ॥ मूर्ति धरिता तो जाहला ॥७९॥हंसदेह माया होऊन आंत बिंबलें स्वरुप निर्गुण ॥ घटीं व्योमन्यायें जाण ॥ अवतार धरिला जगदीशें ॥१८०॥जैसा दीप भिंगाआंत ॥ प्रकाश सबाह्य फांकत ॥ दिवा भिंगासि अलिप्त ॥ तेवीं स्वरुप हंसदेहीं ॥८१॥भिंगवत माया जाण ॥ दीपन्यायें स्वरुप खूण ॥ हंस माया वपू आपण ॥ आंतील स्वरुप जगदीश ॥८२॥म्हणसी अवतार जाहला गेला ॥ या परिहारणें संशयाला ॥ मुख्य परमार्थाला ॥ समजावे तेंचि हें कीं ॥८३॥या गांवींच्या दीपाला ॥ शेजिया गांवीं नेला ॥ तो काय चरणें चालिला ॥ दिव्याची ज्योति दिपामाजी ॥८४॥माया शुध्द चैतन्य ॥ परमेश्वराचा देह जाण ॥ हे अवतार घेती खुण ॥ तूंतें निरुपिली यथार्थ ॥८५॥तूं म्हणसी सर्व घटीं पाहीं ॥ जगदीश बिंबवत् देहीं ॥ परी परमात्माचि सोई ॥ न लाहसी अणुमात्र ॥८६॥अगा पिंड आणि ब्रह्मांड ॥ अष्टधा प्रकृतीचें बंड ॥ रचिलें नाशवंत पाषंड ॥ विकाराचें जाण पां ॥८७॥पाहतां देहाची अवस्था ॥ क्लेशदायक सर्वथा ॥ परमेश्वर त्या आतौता ॥ केवीं सहवास करील ॥८८॥देह अस्थींची पिंजरी केली ॥ शिरा नाडी ते गाढिली ॥ त्वचा रोमें वरी मढिली ॥ ओल्या मांसे थबथबीत ॥८९॥आंतडयानें वेष्टिला कोथळा ॥ विष्टा मूत्रें सांठविला ॥ हृदयीं वसे दमा खोकला ॥ कफ पित्त लाळ थुंका ॥१९०॥ऐसिया कुश्चळ देहांत ॥ केवीं परमात्मा बिंबेल आंत ॥ यालागीं हा सिध्दांत ॥ मतवादियांचा ॥९१॥देही म्हणती देव ॥ हा तों मिथ्याचि अनुभव ॥ जैसा षंढाचा गौरव ॥ श्रृंगारुनि मिरविजे ॥९२॥हिंगांत कस्तूरीची खाण ॥ वेळुपोटीं चंदन ॥ शुनी प्रसवे सिंहालागून ॥ षंडस्तनीं पय निपजे ॥९३॥निंबाच्या वृक्षाला ॥ चूतफळें येती त्याला ॥ अथवा लसणाचे कांडीला ॥ जवादी परिमळ द्रवेल ॥९४॥पिंपळाचे गुदांत ॥ निघेल काय रेशीमतंत ॥ कीं चंबूच्या हृदयांत ॥ सोज्वळता मिळेल ॥९५॥एरंडाचिया काष्ठास ॥ पिळितां निघेल इक्षुरस ॥ किंवा बाभुळी तरुस ॥ जाईचीं पुष्पें प्रकाशती ॥९६॥राव अनामिकाचें घरीं ॥ निद्रा करील चर्मावरी ॥ कामधेनूचें वत्स क्षुधे जरी ॥ अजागळस्तन चाखील ॥९७॥मातंगगंडींचीं मुक्ताफळें ॥दर्दुरमस्तकीं येतील ॥ तेवीं मनुष्यदेहीं वसेल ॥ अविनाश परब्रह्म ॥९८॥म्हणती हृदयीं देव ॥ हाचि महानवलाव ॥ जेथें अज्ञात लाघव ॥ तेथें परमात्मा कल्पिती ॥९९॥एक म्हणती ब्रह्मांडीं वसे ॥ तरी कां पूजिती पाषाण पिसे ॥ एक म्हणती नेत्रीं भासे ॥ मसुरेप्रमाण जाणती ॥२००॥अनंत ब्रह्मांडें ज्याचें उदरीं ॥ तो काय मसुरे इतुका नेत्रीं ॥ एक लक्षिती ब्रह्मरंध्रीं ॥ तेही अज्ञान जाणावें ॥१॥अगा देहीं परमेश्वरवास ॥ हा अज्ञानाचा भास ॥ अंतरसाक्षी जगदीश ॥ हा शब्द यथार्थ ॥२॥प्रत्यक्ष पहा प्रमाण ॥ दर्पणीं प्रतिबिंब उठे जाण ॥ इतर पदार्थ लक्षितां लोचन ॥ तेथें बिंब उमटेना ॥३॥तेवीं मायास्वरुप दर्पण ॥ त्यांत बिंब परमेश्वर आपण ॥ देह प्रपंच जाणोन ॥ जगदीश बिंब उमटेना ॥४॥कमळपुष्पामाझारी ॥ भ्रमर अखंड वास करी ॥ तो बोरीच्या कांटयावरी ॥ क्षणमात्र न बैसे ॥५॥पयापोटीं प्रगटे माखण ॥ तें काय निघे अर्कांतून ॥ सैंधवा जाळितां कापूर भावोन ॥ ज्योति कैंची प्रगटेल ॥६॥आतां असो हा दृष्टांत ॥ मायास्वरुपीं प्रगटे भगवंत ॥ प्रापंचिक देहांत ॥ न अवतरे जगदीश ॥७॥म्हणोनि माया होय पुर ॥ परमेश्वर अंश आंत संचार ॥ यालागीं हंस अवतार ॥ धरिता जाहला परमात्मा ॥८॥ब्रह्मा आणि सनत्कुमार ॥ उभयतांमध्यें हंस अवतार ॥ उभा राहिला परमेश्वर ॥ पाहती स्वरुप भक्त तें ॥९॥कोटि चंद्रबिंबांचा गाभा ॥ तैसी अंगकांतिप्रभा ॥ भक्त तारावया उभा ॥ पक्षिरुपें दयाळ ॥२१०॥चरण चंचु आरक्त नयन ॥ फांकती अनंत रविकिरण ॥ शुभ्रपक्षींचें तेजेंकरुन ॥ उजळती दिशा नसतां रवी ॥११॥पाहोनि हंस अवतार ॥ तटस्थ जाहले सनत्कुमार ॥ म्हणती ऐसा पक्षी सुंदर ॥ नाहीं कोठें लक्षिला ॥१२॥निरखितां स्वरुप उजरी ॥ नेत्रासी लागे खेचरी ॥ मौनावली वैखरी ॥ देहभाना हरपली ॥१३॥पाहोनि सनत्कुमाराची दशा ॥ हर्ष वाटे परमपुरुषा ॥ मग घालोनि कृपेचा ठसा ॥ सावध करी भवतारुं ॥१४॥आवरुनि मनाच्या वृत्ती ॥ सनत्कुमार बोलती ॥ तूं कवण गा हंसमूर्ती ॥ तुझी स्थिती कळेना ॥१५॥वनचर जळचर खेचर ॥ सुरनर किन्नर विद्याधर ॥ किंवा मुख्य परमेश्वर ॥ हंसरुपें आलासी ॥१६॥तुज पाहोनि लोचनीं ॥ आम्हां लागली उन्मनी ॥ कांहीं बोला आपुल्या वचनीं ॥ ओंकारध्वनि निघों दे ॥१७॥हंस म्हणे मी कोण ॥ हेंचि न कळे तुम्हांलागून ॥ तेव्हां इतुकें केलें साधन ॥ त्यांत काय साधलें ॥१८॥ऐकोन हंसमुखीचे मंत्र ॥ तटस्थ जाहलें जैसें चित्र ॥ मौनावलें वक्र ॥ होय न होय न करवे ॥१९॥पाहोनि सनत्कुमार उत्कंठित ॥ हंसमूर्ति बोले तयांप्रत ॥ म्हणे भक्त हो तुमचा अर्थ ॥ काय तो पुसें विधातया ॥२२०॥तो अर्थ पुसाल मातें मुखें ॥ तो परिहरीन विवेकें ॥ जेणें तुमची वेरझार चुके ॥ चौर्याशींची यातना ॥२१॥इतुकी ऐकोनियां गोष्ट ॥ उघडलें त्यांचें अंतरपट ॥ मग बोलते जाहले प्रगट ॥ वाक्य श्रेष्ठ हंसासी ॥२२॥सनत्कुमार विनीत होऊन ॥ प्रार्थीत हंसा कर जोडून ॥ आमुचें अविद्याबंधन ॥ तुटे ऐसें उपदेशा ॥२३॥देह हा पंचभूतांची कोथळी ॥ आंत जीवदशा गुंतली ॥ पायीं त्रिगुणांची सांखळी ॥ बळकट पडली तुटेना ॥२४॥नाना योनी माझारी ॥ प्रवेश केला आजिवरी ॥ आतां स्वामी कृपा करी ॥ चुकवा फेरी जन्माची ॥२५॥एक एक योनीठायीं ॥ दु:ख भोगिलें गणित नाहीं ॥ सुकृतें पावलों नरदेहीं ॥ पुन्हां प्रवाहीं घालूं नको ॥२६॥केलीं साधनें क्लेश होतां ॥ परी न आटे शोकसरिता ॥ संसार धक्क्याचे फेरे खातां ॥ विश्रांतिवार्ता मिळेना ॥२७॥मत्स्य कच्छ वराह नारसिंह ॥ चौ पासीं न फिटे संदेह ॥ म्हणोनियां तुझे पाय ॥ घट्ट धरिले मानसीं ॥२८॥आपुले कृपेची गरिमा ॥ आम्हांवरी करीं पुरुषोत्तमा तुझिया दर्शनाचा महिमा ॥ वारीं भ्रमापासोनी ॥२९॥आम्ही जीव शिव पंचभूत ॥ कशानें निर्मिलों यथार्थ ॥ कीं ब्रह्मस्वरुपांत ॥ उत्पन्न जाहली जीवदशा ॥२३०॥आमुचा कोठें मुळींचा उगम ॥ तुम्हीं करुन सांगा सुगम ॥ माया स्वरुपाचा आगम ॥ तेंही वर्म निवेदा ॥३१॥भक्ति कैसी कैसें ज्ञान ॥ कैसें भवरोग्याचें चिन्ह ॥ कैसें करावें आचरण ॥ कोणतें साधन मोक्षाचें ॥३२॥कोणता मुख्य परमात्मा ॥ कोणती पूजूं त्याची प्रतिमा ॥ कोणत्या जपों नामा ॥ तें बोलावें जगदीशा ॥३३॥परिसोनि भक्ताची विनंती ॥ सुखावोनियां हंसमूर्ती ॥ म्हणे ऐकावें स्वस्थचित्तीं ॥ सांगेन तेंचि नेमस्त ॥३४॥तुम्ही न व्हा पंचभूतें त्रिगुण ॥ देव नव्हेसि देवतागण ॥ नामरुप माया जाण ॥ जीव आत्मा हा यथार्थ ॥३५॥तुमची गा स्वतंत्र जाती ॥ न मिळे प्रपंचाआतौती ॥ न सामावे सिध्दांतीं ॥ राहोनि निश्चिती वेगळीं ॥३६॥माया आदि सकळदेव ॥ याचा स्वतंत्र अनुभव ॥ अष्ट प्रपंचाचा ठाव ॥ हा विभाग वेगळाचि ॥३७॥मुख्य जो परमेश्वर ॥ तो स्वतंत्र निर्विकार ॥ जीव तितुके समग्र ॥ यांची रास वेगळी ॥३८॥हे चारी पदार्थ अनादि ॥ न मिळती एक एकामधीं ॥ हाची परमार्थ शोधीं ॥ विवेकबुध्दी करोनी ॥३९॥परमेश्वर तो जीव होईना ॥ नाना देवतांत मिळेना ॥ प्रपंच तो जड जाणा ॥ त्या वेगळा परमात्मा ॥२४०॥सकळ देव आणि माया ॥ न मिळे स्वरुपीं भक्तराया ॥ नाना जीवांचिया ठाया ॥ ना प्रपंचीं सौरसें ॥४१॥जीव स्वरुपीं न मिळत ॥ न सामावे देवतांत ॥ प्रपंच जड पदार्थ ॥ समरसें जीवदशा ॥४२॥प्रपंचरुपीं न मिळे ॥ ना देवतांत भेसळे ॥ ना जीवांचे मिळणीं मिळे ॥ राहे वेगळा जीवत्वें ॥४३॥नारळ देंठाहूनी तोडिला ॥ त्यांत चार पदार्थ पाहतां ॥ कोणे रीतीनें तत्वतां ॥ निवडोनि तुम्हां दावितों ॥४४॥वरील टरफल चिरोनि काढिती ॥ त्याचे विशाळ दोर वळिती ॥ तेणें समुद्रीं जहाजें आवरिती ॥ कुंठिती नांगर घालोनी ॥४५॥नारळाची कर्वंटी घेऊन ॥ त्याची करिती गुरतुडी कांतोन ॥ ते विश्वमुखें मिरवून ॥ जाहली प्रिय जगासी ॥४६॥खोबर्यांत दोन पदार्थ ॥ गाळितां तेल पडे निश्चित ॥ एका नारळाचे चतुर्थ ॥ अर्थ तुमच्या अनुभवा ॥४७॥रक्त चर्म मांस अस्थी ॥ भिन्न असोन एकत्र दिसती ॥ तैसीच पदार्थांची रीती ॥ एकत्वें भासती भिन्नत्व ॥४८॥प्रपंच अष्टभैरवांपासोन ॥ त्याचें विश्वरुप तें कारण ॥ स्थूळ विस्तारें तें कार्य जाण ॥ सूक्ष्म बिंब तें अव्यक्त ॥४९॥जेव्हां प्रलय होईल ॥ तेव्हां स्थूळ प्रपंच नासेल ॥ अव्यक्त मूळ तें संचेल ॥ राहील निश्चल मूळस्थानीं ॥२५०॥त्या मूळबीज प्रपंचासी ॥ नाशितां नये स्वरुपासी ॥ मग माया देवतांसी ॥ केवीं नाश करील ॥५१॥तैसी स्थूळ अविद्या माया ॥ ते नाशितां पावे लया ॥ परी शुध्द चैतन्य माया ॥ ते न नासे कल्पांती ॥५२॥यालागीं जीव आणि प्रपंच ॥ देव परमेश्वर साच ॥ हे चारी पदार्थ पूर्वीच ॥ अनादिसिध्द असती कीं ॥५३॥ऐसें वदताम हंसमूर्ती ॥ सनत्कुमार करिती विनंती ॥ या वचनी आमुची भ्रांती ॥ निरसोनी गेली स्वामिया ॥५४॥जरी आम्ही असतों देव ॥ तरी सामर्थ्याचें असे वैभव ॥ हा सत्य भासला अनुभव ॥ आम्हीं देव नसों कीं ॥५५॥आम्ही प्रापंचिक होतों ॥ तरी देही जडत्वें असतो ॥ माझा संसार न म्हणतों ॥ राहतों मूढत्वें पाषाणासे ॥५६॥आम्ही जाणते प्रपंचांत ॥ दुर्धर ऐसा भाव मनांत ॥ आम्ही प्रपंच हा सिध्दांत ॥ एक अर्थी घडेना ॥५७॥आम्ही परमेश्वर म्हणतां ॥ हा तो अनृत शब्द बोलतां ॥ सुपर्णाची योग्यता ॥ पिसुअंगीं केवीं असे ॥५८॥ढेकुण आपले पृष्ठीवरी ॥ धरील वसुंधरा सारी ॥ भास्कराचा चेंडू करी ॥ घेऊनि खेळे पतंग ॥५९॥पृथ्वीची करुनि विटी ॥ मेरुचा दांडू धरुनि मुष्टी ॥ मशक खेळुं इच्छी पोटीं ॥ तैसी गोष्टी जीवासी ॥२६०॥जीव म्हणे मी परमेश्वर ॥ भोगी चौर्यासी नरक घोर ॥ या दुर्बुध्दीस दुसरा सर ॥ जोडपें कोणी असेना ॥६१॥जीव हा परमेश्वर असता ॥ अविद्याबंधनें न वेष्टिता ॥ हा अनुभव आमुचें चित्ता ॥ पुरता निश्चय मानला ॥६२॥तुमचें वाक्यरविकिरणीं ॥ सरली अज्ञानतमरजनी ॥ प्रकाश जाहला हृदयभुवनीं ॥ चतुर्थ पदार्थ यथार्थ ॥६३॥आतां पुसणें स्वामींस ॥ कवण आचारावें नेमास ॥ जेणें पावे परमपुरुष ॥ तुटे पाश जीवांचा ॥६४॥कोणती पूज्य पूजूं मूर्ती ॥ काय ध्यानीं आणूं चितीं ॥ कैसी आचरों पध्दती ॥ जेणें गति या जीवां ॥६५॥मुख्य नाम कोणतें जपूं ॥ जेणें तुटे अविद्यावपू ॥ तूं भेटलासि मायबापू ॥ वारीं संतापू जीवांचा ॥६६॥मोक्ष विश्रांतीची वाट ॥ कोणती सांगा स्वामी प्रगट ॥ जेणे चुके कर्मराहट ॥ ऐसी गोष्टी निवेदा ६७॥हंस म्हणे परिसा वचन ॥ कीजे हंसमूर्तीचें ध्यान ॥ येणें पावाल पद निर्वाण ॥ चुके गमन भवाचें ॥६८॥जे निर्विकार स्वरुप ॥ तो मी हंस तद्रूप ॥ मातें ध्यातां व्हाल सुखरुप ॥ चुकेल खेप जन्माची ॥६९॥श्रीपरमहंस गोसांव्या शरण ॥ या नामाचें करा भजन ॥ या तेरा अक्षरांचें उच्चारण ॥ अहर्निश करावें ॥२७०॥हें तेराअक्षरीं नाम ॥ जो जपेल नित्यनेम ॥ तया मोक्षपदीचे धाम ॥ होय सुगम अक्षयी ॥७१॥सांडोनि सकळ देवांचा अंश ॥ होईं प्रपंचीं उदास ॥ अनुसरावें मज हंसास ॥ संन्यासदशा घेऊनी ॥७२॥कैसा संन्याशाचा धर्म ॥ तुम्हां निवेदितों सुगम ॥ जो आचरेल धरोनि नेम ॥ तयासि उत्तम पद जोडेल ॥७३॥कीजे गृहस्थाश्रमत्याग ॥ संसाराचा मानून उबग ॥ सर्व विषयांचा संग ॥ वांतिप्राय मानिजे ॥७४॥त्यागूनि शिखासूत्रांसी ॥ शुध्द होईंजे संन्यासी ॥ सोडून देणें मत्सरासी ॥ द्वेष संगें ठेवूं नये ॥७५॥कोणी अर्पील द्रव्यास ॥ तें मानिजे गोमांस ॥ बहुत मोहो विश्वास ॥ धरितां दूषण रोकडें ॥७६॥मार्गी करितां गमन ॥ अवचित सांपडे धन ॥ तें लेखिजे विष्ठेसमान ॥ नैराश्यदशा तैं जोडे ॥७७॥दृष्टि पडतां सुंदर वनिता ॥ मानिजे जननीसम तत्त्वतां ॥ मी विरक्त ऐसी अहंता ॥ अणुमात्र न व्हावी ॥७८॥कोणीही करील उपचार ॥ त्याचा करावा अव्हेर ॥ दांभिक आणि अहंकार ॥ होतां दूषण घडेल ॥७९॥घेऊं नये शुष्क अन्नासी ॥ स्वयें करुं नये स्वयंपाकासी ॥ चहूं घरीं मागूनि भिक्षेसी ॥ उदरपोषण करावें ॥२८०॥आहारापुरती भिक्षा घेणें ॥ विशेष अंगिकारितां दूषण ॥ करिजे अरण्यवाससेवन ॥ ग्रामवस्ती न करावी ॥८१॥कोणी केलिया अपराध ॥ त्यासी न करावें द्वंद्व ॥ क्षमा धरावी हा बोध ॥ सुबुध्दिविवेक हृदयीं असावी ॥८२॥एक नेम निजनिष्ठा ॥ भजा हंसमूर्ती श्रेष्ठा ॥ चुकाल संसारींच्या कष्टा ॥ मोक्षवांटा जोडेल ॥८३॥भक्तीचें हेंचि सदर ॥ कोणाचें दुखवूं नये अंतर ॥ सर्वांभूतीं करुणा फार ॥ हृदयामाजी असावी ॥८४॥स्थूळ सूक्ष्म जीव जंतु ॥ मनुष्य पक्षीयांतू ॥ कोणाचा करुं नये घातु ॥ हा परमार्थ भक्तीचा ॥८५॥मज हंस मूर्तीचें भजन ॥ रात्रंदिवस कीजे सुखेंकरुन ॥ इतर चर्चा विष्ठेसमान ॥ जिव्हे स्पर्श न कीजे ॥८६॥हें भक्तीचें वर्म ॥ तुम्हां सांगीतलें करुनि सुगम ॥ आतां ज्ञान तेंहीं परम ॥ परिसावें सुकर्णी ॥८७॥जीव प्रपंच देवता ॥ जो परमेश्वर मोक्षदाता ॥ या जाणिजे चौ पदार्थां ॥ ज्ञान तयास म्हणावें ॥८८॥पापपुण्य स्वर्ग नरक ॥ कर्म क्रिया प्रारब्ध देख ॥ शुभाशुभ सुख दु:ख ॥ ओळखावें तें ज्ञान कीं ॥८९॥जाणे सारासार विचार ॥ ओळखे स्वहिताचें कोण घर ॥ तोचि वोळगे होऊनि किंकर ॥ साधक त्यासी बोलिजे ॥२९०॥वैराग्याचें हेंचि चिन्ह ॥ मानावें विषय तितुके वमन ॥ मान प्रतिष्ठा विष्ठेसमान ॥ राहें विरक्त सर्वदा ॥९१॥भक्ति ज्ञान वैराग्य ॥ हा स्वरुपप्राप्तीचा मार्ग ॥ आचरेल तो सभाग्य ॥ होय योग्य मोक्षासी ॥९२॥ऐसा सनत्कुमारां उपदेश ॥ करोनि अदृश्य जाहला हंस ॥ हें कृतयुगींचें रहस्य ॥ तूतें निरुपिलें ब्राह्मणा ॥९३॥यापरी देवें द्विजांसी ॥ कथिलें हंसचरित्रासी ॥ तो अनुभव श्रोतयांसी ॥ केला प्रांजळ उघडोनी ॥९४॥अध्यायापरीस अध्याय चढ ॥ निरुपण रसिक गाढ ॥ पुरवी श्रोतयांचें कोड ॥ जे निवाडा परिसती ॥९५॥सव्विसाव्या अध्यायीं निरुपण ॥ केलें सद्गुरुकृपेंकरुन ॥ शहामुनीचें प्राकृत वचन ॥ मान्य करी ईश्वर ॥२९६॥इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्त्वसारनिर्णये षडविंशोध्याय: ॥२६॥ अध्याय ॥२६॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP