मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध| अध्याय ३ रा सिध्दान्तबोध प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३ रा ‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे. Tags : pothisiddhant bodhपोथीसिध्दान्तबोध अध्याय ३ रा Translation - भाषांतर श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ आतां वंदू कुळस्वामिणी ॥ श्रीकृष्ण जगत्रयजननी ॥ मज प्रेमपान्हा पाजुनी ॥ संतोष करीं बाळकां ॥१॥तुवां अवतार घेतला गोकुळीं ॥ वसुदेवयादवांचे मेळीं ॥ चोडकें घेऊनियां गोळी ॥ गोंधळ घालिती तुजपुढें ॥२॥बैसोनि संकल्पसिंहावरी ॥ भीमत्रिशूळ धरिला करीं ॥ जरासंध महिषासुर मारी ॥ चिरुनि केला दुखंड ॥३॥ तुझें ऐकोनियां सत्व गहन ॥ नवस केला द्रौपदीनें ॥ कौरवमेंढयांची दावण ॥ मारीन तुजपुढें अंबिके ॥४॥द्रौपदीनें केला नवस ॥ ऐकोनियां हसें येतसे विदुरास ॥ भीष्म म्हणे या वचनास ॥ विस्मयो कासया करावा ॥५॥ खडतर गोकुळींची देवता ॥ द्रौपदीनें नवल केला पुरता ॥ होमिलें कौरवकुळा समस्ता ॥ बरवें कांहीं दिसेना ॥६॥कौरवकपटाचिया जाळीं ॥ द्रौपदी सांपडली मासोळी ॥ कृष्णजीवनालागीं तळमळी ॥ दुष्टउष्णें तडफडित ॥७॥पांडवद्राक्षझाडास ॥ द्रौपदी फळ लागलें सुरस ॥ कौरवकावळे स्पर्शावयास ॥ कावकाव करिताती ॥८॥त्यास रक्षण कोणी नाहीं ॥ धांवें पावें कृष्णाबाई ॥ प्रगट होई या समयीं ॥ महिमा दावीं आपुला ॥९॥आजि वारीं हें सांकडें ॥ दुष्ट दु:शासन फेदी लुगडें ॥ धर्मराजा होऊन वेडें ॥ सत्यभाकेसी गुंतला ॥१०॥भीम अर्जुन महासागर ॥ क्रोधभरते दाटे अपार ॥ धर्ममर्यादे बाहेर ॥ सामर्थ्य नाहीं जावया ॥११॥भीमआरोळीची उसळ लाटे ॥ जहाज फांसे पडती उलटे ॥ दुर्योधनाचें धैर्यशिड तुटे ॥ तारूं बुडे हरुषाचें ॥१२॥दुर्योधन म्हणे कर्म खोटें ॥ पुढें वोढवलें अदृष्टें ॥ भीम आरोळीनें हृदय फुटे ॥ धर्मा याते आवरीएं ॥१३॥धर्मे आज्ञापितां भीमसेन ॥ मौनें बैसला श्वास घालोन ॥ पुढील भविष्य जाणे कोण ॥ ईश्वरमहिमा कळेना ॥१४॥भीमआरोळीचा सिंधु वोहटलां ॥ धर्मसंपदेचा जंजिरा उघडा पडिला ॥ पायवाटे जाहली कौरवांला ॥ जिंकावया आवडी ॥१५॥सुरंग लावूनि कपटाची ॥ उडविले बुरुज भीमबळाचे ॥ द्रव्य सांपडलें फुकाचें ॥ तस्कर तैसे लूटती ॥१६॥फांसे टाकिल्यावरी ॥ धृतराष्ट्र विदुराशेजारीं ॥ म्हणें कवणें जिंकिलें ये अवसरीं ॥ कर्णी आधी सांगपां ॥१७॥विदुर म्हणे हर्षे गाय ॥ व्याघ्राचे जाळींत बैसोंजाय ॥ पुढील भविष्य होईल काय ॥ ते तंव न कळे तियेसी ॥१८॥तस्कर चोरी करितां हरुखें ॥ सांपडतां मारिती डोचकें । तेवीं तुझ्या पुत्रें कौतुकें ॥ धर्मसंपदा जिंकली ॥१९॥रंका सांपडली कनकलाट ॥ परी जिरवावयाचें संकट ॥ विष खातां गोड वाटे ॥ प्राण घेईल शेवटीं ॥२०॥धृतराष्ट्र म्हणे विदुरासी ॥ खोऊनि गोष्ट सांगसी ॥ अखंड मम पुत्रां निंदिशी ॥ सर्वथा स्तविशी पांडवां ॥२१॥विदुर म्हणे कर्म विपरीत ॥ मरतयासी पाजितां अमृत ॥ हातें सारुनि करी परत ॥ भोग कवणाचा म्हणावा ॥२२॥असा द्रौपदी सभेंत ॥ क्रोधें होऊनि संतप्त ॥ म्हणे कोणी न दिसे आप्त ॥ कृष्णा वेगीं धांवरें ॥२३॥सहस्त्र अंगनांच्या कळपांत ॥ दु:शासन व्याघ्र पातला तेथ ॥ उडी घालोनि अकस्मात ॥ वोढूनि फरफरां आणिलें ॥२४॥लोटूनि सभेचे जाळीभीतरीं ॥ सन्मुख बैसोनि गुरगुरी ॥ हस्तें पंचाननें आसुडी निरी ॥ घोटूं पाहे कंठासी ॥२५॥थोर पडलें सांकडे ॥ भोंवती पाहे चहूंकडे ॥ कृष्णा दाखवीं रुपडें ॥ दुष्टापासोनी सोडवीं ॥२६॥सकळ देवांचे स्वामिणी ॥ कृष्णा सखिये मायबहिणी ॥ अंबे स्मरतें तुजलागुनी ॥ घाली उडी संकटी ॥२७॥द्रौपदी अधर ते धनुष्यबाण ॥ जिव्हासीत कठिण वोढून ॥ शब्दबाण सुटला कडकडोन ॥ कृष्णकर्णी धडकला ॥२८॥त्वरें पातला श्रीहरी ॥ वस्त्रें पुरवूनि श्रम हरी ॥ लज्जित होऊनि कौरव वैरी ॥ अधोवदनें ऊठिले ॥२९॥यावरी पांडवीं सेविले वनवास ॥ कष्ट भोगिले बारा वरुषें ॥ मग येऊनि राज्यास ॥ विभाग आपुला मागती ॥३०॥द्रौपदी म्हणे धर्मराया ॥ म्यां नवशिली कृष्णमाया ॥ तिचा नवस फेडावया ॥ विलंब कांही न करावा ॥३१॥कुरुक्षेत्रीं देऊनि मंडप ॥ आणोनि कौरवअजांचे कळप ॥ धरुं जातां भीम भूप ॥ बळेंचि थडका मारिती ॥३२॥भीम अर्जुन उभयतां लागुन ॥ द्रौपदी म्हणे आणा पाचारुन ॥ कौरवबस्तांते वधून ॥ विभाग घेणें राज्याचा ॥३३॥कर्णशंख चोंडकें वाजत ॥ भीम आरोळी समेळ गर्जत ॥ कथा गायिली महाभारत ॥ गोंधळ घातला रणयुध्दीं ॥३४॥स्थापूनि कृष्णभगवतीस ॥ होमिलें कौरवबस्तांस ॥ द्रौपदीनें फेडिला नवस ॥ संतुष्ट केली जगदंबा ॥३५॥प्रसन्न होऊनि भवानी ॥ आदिशक्ति नारायणी ॥ धर्मासी राज्यीं स्थापुनी ॥ सुखी केलें विश्वातें ॥३६॥ऐसी माझी अंबाबाई ॥ तिचा महिमा वर्णूं काई ॥ भावें लागतसे पायीं ॥ दया करीं मज बाळका ॥३७॥दत्तात्रेया गुरुमाउली ॥ करीं मज कृपेची साउली ॥ देई हातीं ज्ञान किल्ली ॥ होईन भांडारी मी तुझा ॥३८॥उघडीन सत्यलोककोउडीला ॥ ऐवजी पाहीन कितीक भरला ॥ खरें खोटें आणूनि मनाला ॥ पारखून ठेवीन ॥३९॥मागील अध्यायीं निरुपण ॥ नारदें धरिला अभिमान ॥ त्याची नारदी केली श्रीकृष्णें ॥ साठ पुत्र जन्मविले ॥४०॥यावरी नैमिषारण्याभीतरी ॥ समस्तीं मिळोन ऋषीश्वरीं ॥ उसळती ज्ञानलाटा भारी ॥ येरयेरां वरी लोटती ॥४१॥तेथें कोणे एके ऋषीनें ॥ बहुत वर्णिली दानपुण्यें ॥ विशेष स्तविले स्वर्गभुवन ॥ श्रेष्ठ स्थापिलें अमरांसी ॥४२॥त्याचें ऐकोनियां वचन ॥ दुसरा ऋषि बोले क्षोभोन ॥ म्हणे नाशवंत स्वर्ग भुवन ॥ त्यासी दीधलें श्रेष्ठत्व ॥४३॥कित्येकदा इंद्र जिंकोन ॥ धरोनि सोडिला सहस्त्रनयन ॥ दैत्य देव दारूण ॥ कलह करिता अखंड ॥४४॥रावण राक्षस प्रबळ ॥ बंदी घातले देव सकळ ॥ आपदा भोगिली दु:ख पुष्कळ ॥ कळों आली आम्हांसी ॥४५॥प्रगट होऊन रामरुपडें ॥ वारिलें देवांचे सांकडें ॥ त्याची काय सांगती प्रौढे ॥ काय वाचें बोलसी ॥४६॥स्वर्गलोकीं सुख कैचें ॥ अखंड वाजतसें कचकचें ॥ तुमचें ज्ञान आहे काचें ॥ बुध्दि पुरती असेना ॥४७॥आतां ऐका मी सांगेन ॥ पुण्य पावन ॥ तेथील स्वामी चतुरानन ॥ जो निर्मिता ब्रह्मांडें ॥४८॥जो बोलिजे विधाता ॥ तोचि सकळ सृष्टीचा कर्ता ॥ होय विश्वाचा जनिता ॥ ईश्वर त्यातें बोलिजे ॥४९॥जेणें आपुल्या इच्छेंकरुन ॥ रचिलें सकळ सत्यलोकभुवन ॥ ललाटीं शिव उत्पन्न ॥ कर्णी विष्णु जन्मला ॥५०॥सूर्य चंद्र दोघांला ॥ जन्म नेत्रापासोन जाहला ॥ नासापुटीं वायु उद्भवला ॥ श्वासीं जन्म इंद्रासी ॥५१॥चार्हीमुखांपासोनि ॥ वेद जाहले निर्माण ॥ अग्नि जाहला कंठांतून ॥ वरुण कक्षेपासोनी ॥५२॥कल्पना करितांची मानसीं ॥ निर्माण जाहले म्हणोनि ऋषी ॥ ऋषींपासोनि सृष्टीसी ॥ जन्म जाहला जाणिजे ॥५३॥कश्यपापासूनि सृष्टि जाहली ॥ हे तो भारतीं वानिली ॥ म्हणोनि असो हे बोली ॥ विस्तार लिहिणें कासया ॥५४॥देव दैत्य राक्षसगण ॥ सर्प पक्षि व्याघ्र हरिण ॥ आणिक मानवीजन ॥ ऋषीश्वरीं निर्मिल ॥५५॥विश्वाचा जनिता कश्यप ऋषी ॥ कश्यपाचा पिता मरीची ॥ मरीचीचा बाप विरंची ॥ स्वतां ईश्वर आपण ॥५६॥ज्याचे सभेस ऋषींचे कटक ॥ बैसती तापसी वरिष्ठ ॥ मध्यें सिंहासन श्रेष्ठ ॥ त्यावरी विराजे विधाता ॥५७॥वेद पुराणें दिव्य देही ॥ सदैव बसती ब्रह्मगेहीं ॥ सत्यावांचोनि बोलणें नाहीं ॥ धर्मवार्ता सर्वांसी ॥५८॥अष्टांगयोग अभ्यासिती ॥ जे कर्वतीं देह कापिती ॥ तयांसी सत्यलोकप्राप्ती ॥ नेमिली असे विधीनें ॥५९॥ब्रह्मचारी वानप्रस्थ ॥ संन्यासी परमहंस विख्यात ॥ सिध्दयोगी समस्त ॥ सदैव वसती ब्रह्मपुरी ॥६०॥ठाडेश्वरी आकाशमुनी ॥ तपें तपती काया कष्टोनी ॥ शास्त्रव्युत्पन्न पंडित ज्ञानी ॥ तयांस वस्ती ब्रह्मपुरीं ॥६१॥जे पंचाग्नी तापती ॥ शीतकाळीं जळांत बैसती ॥ ऊर्ध्वबाहु धूम्रपान करिती ॥ तयासी वस्ती ब्रह्मपुरीं ॥६२॥सत्यवादी क्रियाशीळ ॥ स्वधर्मे वर्ते सार्वकाळ ॥ गोब्राह्मणासी न करी छळ ॥ तया वस्ती ब्रह्मपुरीं ॥६३॥जिहीं परद्वार नाहीं केला ॥ स्पर्शले नाहीं मद्याला ॥ जयांसी पापाचा कंटाळा ॥ तयां वस्ती ब्रह्मपुरीं ॥६४॥जे दुसरिया दु:ख न देती ॥ परोपकारीं प्राण वेंचिती ॥ चाहाडी चोरी निंदा न करिती ॥ तयां वस्ती ब्रह्मपुरीं ॥६५॥अनंत जन्माचें सुकृत ॥ तरी ब्रह्मलोक प्राप्त ॥ याहून श्रेष्ठ पदार्थ ॥ पाहतां कोठें दिसेना ॥६६॥हाचि निश्चय साचा ॥ ब्रह्मा ईश्वर सर्वांचा ॥ ऐकोन शब्द ऋषीचा ॥ विस्मय करिती मुनीश्वर ॥६७॥ऋषीश्वरांचे मंडळींत ॥ एक खवळला रागें भरत ॥ म्हणे याचें ज्ञान विपरीत ॥ कोणें मनासी आणावें ॥६८॥ब्रह्मा कोण हें कांहीं ॥ ऐसें पुरतें ठाउकें नाहीं ॥ स्वल्पज्ञानें बोलोनि पाहीं ॥ श्रेष्ठत्व दावितां आपुलें ॥६९॥बरवें सांगतों आइका ॥ व्यर्थ कचकच करुं नका ॥ बैसलिया फुटकी नौका ॥ सिंधूंत केवीं तरेल ॥७०॥गारगोटी बंधिली पदरा ॥ म्हणे मज सांपडला हिरा ॥ परीक्षावंत खोटा खरा ॥ क्षणामाजी पारखी ॥७१॥श्वानासी मोगरा नांव ठेविला ॥ त्याचा हार कोणें गुंफिला ॥ सुवर्ण म्हणती अर्बटयाला ॥ काय व्यवहार होईल ॥७२॥पिशाच म्हणे मी राजा ॥ मुजरा करील काय प्रजा ॥ तैसा विवेक हा तुझा ॥ वाटे माझे मानसीं ॥७३॥खापरखुंटीच्या भाकरी ॥ खेळतां करिती कुमारी ॥ बोळक्यांत तुळसी मंजिरी ॥ म्हणती क्षीर रांधली ॥७४॥चिरगुटाची बाहुली ॥ वस्त्राभरणें श्रृंगारिली ॥ पुरुषापाशीं निजविली ॥ काय होईल गर्भवती ॥७५॥भीमासी मुष्टिभरी लाह्या ॥ केवीं तृप्त होईल त्याची काया ॥ पाहोनी शिंदीची शीतळ छाया ॥ हस्ती बांधिला विश्रांती ॥७६॥धोतर्याचे कनकफुलें ॥ भक्तीनें देवासी वाहिलें ॥ रात्रीं तस्करी चोरुन नेलें ॥ कुटुंब काय संतोषे ॥७७॥ताडपत्राचीं तानवडें करिती ॥ कोकणीं वनिता कर्णी लेती ॥ विकूं जातां वाण्या प्रती ॥ पैसा कोणी देईना ॥७८॥कुंभाराच्या उदिमासी ॥ नलगे भांडवल खर्चासी ॥ तेवीं फुकाचें बोलावयासी ॥ काय वेंचे तूमचें ॥७९॥आतां गडबड करुं नका ॥ मीं सांगतों तेंचि ऐका ॥ ब्रह्मलोक मज ठाऊका ॥ उघडोनि सवेंच दावितों ॥८०॥ऐका ब्रह्मयाची काहणी ॥ त्यासी शंखासुरें ठोकोनी ॥ वेद नेले हो चोरोनी ॥ समुद्रामाजी दडाला ॥८१॥सुताराचें हरपल्या वांकसं ॥ खोळंबा पडे इमारतीस ॥ तेवीं ब्रह्मा आपुल्या घरास ॥ उद्वेगित बैसला ॥८२॥नाहीं सत्ता आणावयाची ॥ कोठें शुध्दि नलगे त्याची ॥ कष्टी होऊनि विरंची ॥ चिंतार्णवीं पडियेला ॥८३॥नरसिंहाचा मंत्र चुकल्यावरी ॥ त्यास दैव पिशाच करी ॥ तैसा ब्रह्मा आपुल्या शरीरीं ॥ कांहीं उमज सुचेना ॥८४॥ राज्याचा मोठा कारभारी ॥ त्यासी तहगिर केल्यावरी ॥ लज्जा पावोन बैसे घरीं ॥ निवतां बाहेरी संकोच ॥८५॥दोघें भांडत गेले चावडीसी ॥ एक फजित पावला सभेसी ॥ परतोनि जातां गृहासी ॥ तोंड करी वोखटें ॥८६॥युध्दीं पळें रणशूर ॥ नालबंदी मागों जातां सत्वर ॥ जावया सरदारां समोर ॥ वरती मान करवेना ॥८७॥वनिता परपुरुषीं रमतां ॥ तत्समयीं देखे भर्ता ॥ मग तया सन्मुख जातां ॥ मरण वाटे तियेतें ॥८८॥मोटेचा नाडा गेला तुटोन ॥ पुढें पाट वाहील कशानें ॥ पुरुषाचें सरलिया व्यसन ॥ कोठूनि होय संतती ॥८९॥पक्षियांचे पर उपडिले ॥ उडावयाचें स्फुरण गेलें ॥ भाजलें बीज शेती पेरिलें ॥ धान्य पिके कासयानें ॥९०॥ कुंभारचक्राचा होतां नाश ॥ मडक्यांचा कारखाना पडिला वोस ॥ तेवीं जाहलें ब्रह्मसभेस ॥ कर्म वेदांविण चालेना ॥९१॥कामिका अंगनेवांचोनी ॥ निद्रा न लागे सुखशयनीं ॥ तैसें जाहलेम विधिलागोनी ॥ सुचित चित्तीं असेना ॥९२॥मग विष्णूपासी जाऊन ॥ फिर्याद करुन सांगे गार्हाणें ॥ अभय दीधलें लक्ष्मीरमणें ॥ वेद तुझे आणितों ॥९३॥हुडकोन पाहे भूमंडळ ॥ एकवीस स्वर्ग सप्तपाताळ ॥ मनीं विचारोनि वैकुंठपाळ ॥ सिंधुशोधन आरंभीं ॥९४॥जळांत करावया प्रवेश ॥ कोणत्या रुपें होईल पैस ॥ ऐसें विचारुन मत्स्यवेष ॥ धरोनि शिरला जराब्धी ॥९५॥शोधिले सप्तसिंधु अचाट ॥ उंच नीच बेटें सदट ॥ पाहतां गिरीचें कपाट ॥ त्यांत शंखासुर बैसला ॥९६॥निद्रित देखोनियांन नयनीं ॥ म्हणे सावधपणें मारिजे प्राणी ॥ मग पुच्छातें फडत्कारुनी ॥ जागृत केला वेदचोर ॥९७॥उठोनि दैत्य अतुरबळी ॥ दीर्घ ठोकिली आरोळी ॥ धांवोनि मत्स्या मिठी घाली ॥ दोघे युध्दीं मिसळले ॥९८॥गुडघे मेटि भांडी खुटी ॥ दैत्यें बहुत केली हुटहुटी ॥ मत्स्य धरोनि दाढे दपटी ॥ मोडिली हाडें कडकडां ॥९९॥यापरी वधिला शंखासुर ॥ वेद घेऊनि आला श्रीधर ॥ ब्रह्मा येवोनि समोर ॥ भावें विष्णु पूजिला ॥१००॥यापरी श्रीअनंत ॥ दैत्य वधी पापमूर्त ॥ परोपकारी दयावंत ॥ वेद विधीस दिधले ॥१॥जरी ब्रह्मा ईश्वर म्हणतला ॥ तरी शंखासुरें कां ठकविला ॥ शरण गेला विष्णूला ॥ कोठें राहिली प्रतिष्ठा ॥२॥कोणे एके दिवशीं ॥ सनत्कुमारें पुसिलें विधीस ॥ पूर्णब्रह्मप्राप्तीसी ॥ सांगा उपाव श्रेष्ठहो॥३॥कैसा आत्मा कैसा जीव ॥ त्याचा सांगिजे उगव ॥ त्रिगुण विषयाचा ठाव ॥ ज्ञानदृष्टि देऊनी ॥४॥ऐसें ऐकोनियां जाणा ॥ ब्रह्मयांस कांहीं सुचेना ॥ श्रमित होऊनियां मना ॥ तटस्थ ठेला ते समयीं ॥५॥चहुं वेदांचा वक्ता ॥ शास्त्रपुराणांसी जाणता ॥ जो सृष्टीचा स्वयें कर्ता ॥ त्याची बुध्दि हरपली ॥६॥तेव्हां होऊन राजहंस ॥ अवतार घेऊनि परमपुरुष ॥ करुन सनत्कुमारा उपदेश ॥ गुथि उगवली विधीची ॥७॥एके दिवशीं चतुरानन ॥ गर्वे फुगला आपण ॥ विष्णूसी म्हणे तूं कोण ॥ मीच ईश्वर सर्वांचा ॥८॥हरि म्हणे तुज लागलें वेडा ॥ माझे गर्जती पवाड ॥ मी फेडितों सर्वांचे साकडे ॥ साक्ष देती पुराणें ॥९॥ब्रह्मा म्हणे तुम्ही कोठें होतां ॥ मी सृष्टीचा आदिकर्ता ॥ पाहीं आणीन वेद आतां ॥ विलंब लागों नेदींच ॥११०॥दोघे पेटले हटास ॥ टाकोनि बोलती मर्यादेस ॥ पाहोनि उभयतां झोंबीस ॥ नारद तेथें पातला ॥११॥विष्णूसी म्हणे बुध्दि कवण ॥ आपुली प्रतिष्ठा करणें रक्षण ॥ दुसरिया तोंडें तंडण ॥ हेचि उणीव श्रेष्ठातें ॥१२॥सवेंचि ब्रह्मयासी म्हणे ॥ कळलें तुमचे शाहाणपण ॥ कित्येक जागीं फजित पावोनि ॥ ईश्वर आपणा म्हणवितां ॥१३॥कळली दोघांची बुध्दी ॥ सांगतो तें ऐका आधीं ॥ तिरायतीवांचोनि कधीं ॥ निवाडाअ तुमचा होईना ॥१४॥कैलासवासी गौरीरमण ॥ जुना पुरुष श्रीभगवान ॥ तो निवडील यथार्थ जाण ॥ संदेह फिटेल दोघांचा ॥१५॥ऐकोनि मुनीच्या वचनासी ॥ दोघे गेले शिवापासीं ॥ म्हणती आमच्या भांडणासी ॥ निवडून देणें पशुपते ॥१६॥शिव म्हणे भांडूं नका ॥ मी सांगतों तें ऐका ॥ विष्णूसी म्हणे माझ्या पादुका स्पर्शोनि येणें लौकरी ॥१७॥ब्रह्मयासी म्हणे मुकुटावरुतें ॥ हात लावोनि यावें तेथें ॥ आज्ञा घेऊनि त्वरितें ॥ शीघ्रगतीं तो चालिला ॥१८॥शिवासी करुनियां नमन ॥ पद स्पर्शावयालागून ॥ मार्गी चालतां जाण ॥ कोटि वरुषें क्रमियेली ॥१९॥विष्णु विचारी मनांत ॥ शिवाचा न कळे अंत ॥ फिरोनि जावें त्वरित ॥ हाचि लाभ दिसतसे ॥१२०॥मग फिरोनि लक्ष्मीभर्ता ॥ कैलासीं आला त्वरिता ॥ नमस्कारुनि षण्मुखताता ॥ मौनें पाठीं बैसला ॥२१॥शिव पुसे विष्णूला ॥ पाय स्पर्शोन्न तुम्हा आलां ॥ हरि म्हणे अंत नाहीं लागला ॥ अगाध महिमा स्वामीचा ॥२२॥येरीकडे हो विधाता ॥ लक्ष वरुषें क्रमिलीं चालतां ॥ बहुत श्रम पावला चित्ता ॥ दु:खित होऊनि बैसला ॥२३॥कष्टी जाहला चतुराननु ॥ पुढें देखिली कामधेनु ॥ तीस म्हणे माझा मानुं ॥ उल्लासे ऐसें सांगपां ॥२४॥हांसोनि बोले दुग्धखाणी ॥ तुमचा वृत्तात कळला मनीं ॥ त्वरें जातां कार्यालागुनी ॥ तें तव सिध्दी न पवेची ॥२५॥कोटि योजनें पर्यंत ॥ उंच गेले गगनचुंबित ॥ कोठें न लागे मुगुटाचा अंत ॥ फिरोनि आले माघारीं ॥२६॥ऐकोनि पशुवनितेच्या वचनाला ॥ दचक बैसला विरंचीला ॥ म्हणे पुढें जावयाला ॥ शक्ति मातें असेना ॥२७॥आतां ऐकें वत्सले जननी ॥ म्यां मुगुट देखिला म्हणूनी ॥ याची साक्ष त्वां देवोनी ॥ पडिला प्रसंग संपादी ॥२८॥धेनु म्हणे बुध्दि चळली ॥ असत्य वदतां शिवाजवळी ॥ शापून मेळवील धुळी ॥ विपरीत कर्म करुं नये ॥२९॥विधि म्हणे अवघड ॥ विष्णूसी घातली होड ॥ नाहीं म्हणतां प्रतिष्ठा उडे ॥ यासी कैसें करावें ॥१३०॥भिडेस घालुन्हि धेनूसी ॥ ब्रह्मा गेला शिवापासीं ॥ म्हणे म्यां देखिलें मुगुटासी ॥ साक्ष धेनु आणिली ॥३१॥ऐसें वदता चतुरानन ॥ क्रोधें पेटला पंचवदन ॥ धेनूस म्हणे तूं पापिण ॥ असत्य साक्ष मज देशी ॥३२॥तुझें अपवित्र होईल मुख ॥ सर्वदा भक्षिशील नरक ॥ पुच्छ धरुनियां लोक ॥ पूजा करितील उफराटी ॥३३॥रागें आपटोनि जटेसी ॥ शाप दीधला ब्रह्मयासी ॥ अपूज्य होसील भूलोकासी ॥ तुझी मूर्ति न पूजिति ॥३४॥मी ईश्वर हा अभिमान ॥ जिराला स्फुंदे म्लान वदन ॥ मौनेंचि सत्यलोका जाऊन ॥ श्वास घालीत बैसला ॥३५॥ऐसी ब्रह्मयाची करणी ॥ त्यासी ईश्वरत्व स्थापूनी ॥ याचि ज्ञानें जाहला मुनी ॥ कळों आलें महत्त्व ॥३६॥आणिक कर्म ब्रह्मयाचें ॥ पुराणप्रसिध्द आहे साचें ॥ तेंही उघड करोनि वाचें ॥ बरवें ऐका सांगतों ॥३७॥एके दिवशीं नारदमुनी ॥ सहज पातला ब्रह्मसदनीं ॥ विरिंची म्हणे कोठूनी ॥ येणें जाहलें सांगपां ॥३८॥मुनि म्हणे मृत्युलोकांत ॥ नवल देखिलें अद्भुत ॥ गौळियाचे घरांत ॥ सिध्दपुरुष जन्मला ॥३९॥म्हणे ईश्वर तो मीची ॥ मजपुढें काय विरंची ॥ पूजा घेतसे त्रिलोकांची ॥ यमुनातटीं क्रीडतो ॥४०॥ऐसें ऐकोनि जगज्जनितां ॥ संतप्त जाहला नारदपितां ॥ म्हणे मुकुंदासी ठकवून आतां ॥ गाई वत्सें आणितों ॥४१॥यापरी विचारुन गौतमश्वशुर ॥ सोंगें नटला तस्कर ॥ यमुनातटीं सावित्रीवर ॥ गुप्तरुपें पातला ॥४२॥कृष्ण नवह्ता ज्या समयीं ॥ ऐसी संधि साधूनि पाहीं ॥ गोपाळ वत्सें अवघड ठायीं ॥ नेऊनि ठेविलीं कपाटीं ॥४३॥विधीनें मानूनियां हरुष ॥ जाता जाहला सत्यलोकास ॥ हे जाणोनियां जगदीश ॥ कौतुक करिता जाहला पैं ॥४४॥निर्मिलीं मावेचीं वांसुरें ॥ तांबडीं ढवळीं मोरीं खैरें ॥ कबरीं पीतवर्णे कपिलाकारें ॥ रोडकीं मोठीं थोर सान ॥४५॥तैसेच गोपाळ निर्मिले गडी ॥ पेंदा सुदामा वांकुडी ॥ बडजा जयासी श्रीकृष्ण आवडी ॥ तैसें संगी मीनले ॥४६॥काणीं बहिरीं चोंचरीं मुकीं ॥ दांतरीं धोंधरीं तोंतरीं मुकी ॥ लंगडे पांगळे हातमोडकीं ॥ उंच ठेंगणें खुजे खुरटीं ॥४७॥अवगुणी गुणवंत तामसी हटी ॥ लबाड तोंडाळ धीट कपटी ॥ थोट भ्याड चाहाड चोरटीं ॥ बलिष्ठ गाढे पांगुळ ॥४८॥काठी कांबळें नागसुर मुरली ॥ हुडु कदफडी सारंग जवळी ॥ कृष्णापासीं सकळ मंडळी ॥ पहिल्या ऐसी विराजे ॥४९॥गोळा करुन वांसुरां ॥ संध्याकाळीं जाती घरा ॥ गाईं वांसुरें मायलेंकरा ॥ अंतर कांहीं पडेना ॥५०॥ यापरी लोटलें एकवर्ष ॥ विचार करी चतुर्मुख ॥ म्यां ठकविला मदनजनक ॥ घरें बुडालीं गौळियांचीं ॥५१॥आतां जाऊं गौकुळासी ॥ जरी शरण येतील मजसी ॥ गोपाळ वत्सें देईन त्यांसी ॥ सुखी करीन समस्तां ॥५२॥ऐसें विचारोन कमलोद्भव ॥ जावोनि पाहे गोकुळ गांव ॥ वत्सें गोपाळांचा समुदाव ॥ यमुनातटीं क्रीडती ॥५३॥ म्हणे हें कैसें जाहलें ॥ कोणें त्यासी दाखविलें ॥ विवरांतून वासुरें मुलें ॥ केव्हां येणें आणिली ॥५४॥सवेंचि फिरोन माघारा ॥ उघडोनि पाहे विवरद्वारा ॥ गोपाळ वत्सें समुदाव सारा ॥ ठेविला तैसाची असे तो ॥५५॥म्हणे हें काय गारुड जाहलें ॥ कृष्णें ऐथें नवल केलें ॥ दोहीं ठायीं वांसरें मुलें ॥ सारखींच असती ॥५६॥अपूर्व कृष्णाची कळा ॥ होय ब्रह्मीचा पुतळा ॥ शरण रिघावें गोपाळा ॥ अन्याय मागून घेईजे ॥५७॥लज्जित होऊनि मानसीं ॥ धांवोनि आला हरीपासीं ॥ नमन करोनि चरणांसीं ॥ जोडोनि पाणी बोलत ॥५८॥म्हणे तूं श्री अनंत ॥ तुझा न कळे खेळ गुप्त ॥ कोटि ब्रह्मांडे निमिषांत ॥ रचोनि मोडिसी इच्छामात्रें ॥५९॥अनंत माया तुझ्या हातीं ॥ काय एक न करिसी श्रीपती ॥ मी अपराधाची मूर्ती ॥ क्षमा करीं दयाळा ॥१६०॥तुझा नेणोनियां महिमा ॥ व्यर्थ वर्तलों तस्करकर्मा ॥ तूं सर्वसाक्षी अंतरात्मा ॥ हा निश्चयो मज कळला ॥६१॥तूं अजर अमरं परात्पर ॥ निरामय निर्गुण निर्विकार ॥ स्वयंभ निरालंब पारावार ॥ अनुपम अगम्य ॥६२॥ऐसें बोलोनियां पडे ॥ गोपाळ म्हणती लागलें वेडें ॥ वृक्ष ब्राह्मण चहूं तोंडें ॥ शरण आला मुलाशीं ॥६३॥कर्णी ऐकोनि गोपाळवार्ता ॥ विस्मित जाहलां विधाता ॥ आणोनि वत्सां समस्तां ॥ कृष्णापाशीं दीधलीं ॥६४॥आज्ञा मागोनि श्रीहरीची ॥ सत्यलोका गेला विरिंची ॥ ऋषि म्हणे विधात्यासी ॥ कथा समस्त ऐकिली ॥६५॥कोणे एके दिवसांत ॥ रावणाची चुकली तिथ ॥ दशानन क्षोभला अद्भुत ॥ आणा म्हणे ब्रह्मयासी ॥६६॥उग्र राक्षस खर्वनामा ॥ धाडिला सत्यलोकग्रामा ॥ पाहोनि तयाची प्रतिमा ॥ कंपित जाहला विरिंची ॥६७॥पर्वताएवढें मस्तक ॥ बारा गांवें लांब नाक ॥ दाढी ऐसें भकास मुख ॥ आंत जिव्हा सरिता जैसी ॥६८॥इमारतीच्या तुळवटा ॥ तेवीं दंत वाजती खटाखटां ॥ मुसळा सारिख्या रोमजटा ॥ उभ्या असती शरीरीं ॥६९॥डोंगरांत विशाळ विवर ॥ यापरी त्याचें कर्णद्वार ॥ जुळ्या येवढें डोळे उग्र ॥ वटारोनी पाहातसें ॥१७०॥मेघ गडबडे अंबरीं ॥ तैसे शब्द गर्जना करी ॥ ब्रह्मयासी म्हणे रामारी ॥ तुजवरी क्षोभला ॥७१॥ब्रह्मा होऊनियां वेडें ॥ हातीं घेऊनि पातडें ॥ रावणाचे सभेपुढें ॥ बळे बोबडी बोलतां ॥७२॥इतराजी केली रावणें ॥ बैसवूनि ठेविला सहा महिने ॥ अजीं करुनि बिभीषणें ॥ सोडविला ते समयीं ॥७३॥आणिक ऐका त्याचे गुण ॥ सुंदर कन्या अवलोकून ॥ काम उद्भवला दारुण ॥ धांवोनि पदरीं झोंबला ॥७४॥येरी म्हणे ऐक ताता ॥ हें काय आतां ॥ उन्मत्त होऊनि विधाता ॥ बळें संधटे अंगासी ॥७५॥झटपट होता दोघांसी ॥ कंदर्प गळाला भूमीसी ॥ लज्जित होऊनियां मानसीं ॥ म्लानवदनें परतला ॥७६॥ऐसीं ब्रह्मयाची कर्मे अचाटें ॥ ईश्वर म्हणतां लाज वाटे ॥ मुखें बोलिला मुनि स्पष्टे ॥ नाहीं ठेविली मर्यादा ॥७७॥यापरी निरसिलें विधीस ॥ पुढें वर्णिलें वैकुंठास ॥ तेचि निरुपणाचें रहस्य ॥ उघडोनि दावी सज्जना ॥७८॥जयासी राजा करी भांडारी ॥ जडाव दागिने त्याचे पदरीं ॥ देत घेत आपल्य करीं ॥ राशी मोजी मोत्यांच्या ॥७९॥परमार्थ भांडार श्रीगुरुचें ॥ मी व्यापारी सेवक त्याची ॥ माझ्या वाचें काय वेंचे ॥ बोलावया ग्रंथासी ॥१८०॥गांव मोकासा जाहला ज्यासी ॥ सत्ता करावया लाज कायसी ॥ अमृत पाजितां रोग्यासी ॥ अव्हेरी कोणी दिसेना ॥८१॥असो पैसा नसेल जयाचे पदरीं ॥ लक्ष्मी जावोनि बैसल्या घरीं ॥ कोण म्हणेल त्यास भिकारी ॥ ताजीम देत श्रीमंत ॥८२॥तेवीं मी रंक दीन ॥ कृपा केली नारायणें ॥ मुखीं चंद्रवतऽ चिद्रत्नें ॥ ग्राहक श्रोते खरिदकर्ते ॥८३॥आतां असो हा प्रसंग ॥ पूर्ण कर्ता श्रीरंग ॥ पुढील कथेचा मार्ग ॥ क्रमितां निशा पावली ॥८४॥प्रसंग समाप्तरात्रीस ॥ पुढें प्रारंभ उगवेल दिवस ॥ कथापंथे जावयास ॥ हरुष वाटे मानसीं ॥८५॥माझा साबडा शब्दु ॥ आवडी परिसती साधु ॥ शहा मुनीचा आनंदु ॥ पूर्णकर्ता ईश्वर ॥८६॥इति श्रीसिध्दांतबोधे तत्त्वसारनिरुपणं नाम तृतीयोऽध्याय: ॥३॥ओंव्या ॥१८६॥ N/A References : N/A Last Updated : September 23, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP