श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४५ वा
‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
ओं नमो निरामया निर्विकारा ॥ अपारा अमूपा सुखसागरा ॥ सर्वोत्तमा सर्वेशा परात्परा ॥ अलक्षा न येसी लक्षासी ॥१॥
मैलागिरी चंदन उगाळून ॥ गाळून काढितां नये सीतळपण ॥ यापरी परमेश्वरांचे ध्यान ॥ लक्षितां नये साधकां ॥२॥
कापुराचा काढितां कोंडा ॥ पाण्याचा करितां नये धोंडा ॥ भाकरीच्या पाहूं नये तोंडा ॥ चहूंकडे सारिखी ॥३॥
साखरेची निवडूं नये गोडी ॥ वायूची घालितां नये घडी ॥ जातां नये आकाशपैलथडी ॥ सूर्याहूनि तांतडी पळतां नये ॥४॥
मोत्याचें काढितां नये पाणी ॥ पृथ्वी मोजितां नये वजनीं ॥ तैसी ईश्वराची अगाध करणी ॥ जीवा लागूनी गवसेना ॥५॥
ऐशा अपाराचें ध्यान ॥ कैसें करावें त्याचें भजन ॥ हे खूण सद्गुरुवांचोन ॥ न सांपडे निगुर्यासी ॥६॥
जे भेदवादी मतवादी ॥ कर्मवादी देहबुध्दी ॥ जात्याभिमानी ॥ महा फंदी ॥ त्यांस हे संधि न सांपडे ॥७॥
तत्वें अजात आत्मा अजात ॥ जातीचा पेंच अभिमानी उचलित ॥ निरभिमानें वर्तती संत ॥ देव वसे त्यांपासी ॥८॥
न सांपडे भक्तीचें अंग ॥ तंववरी न सापडें श्रीरंग ॥ भक्तिवांचोनि आघवे सोंग ॥ करावें ती फजिती ॥९॥
सोंगाडी जाहला संन्यासी ॥ तरी कां विरक्तिदशा पावेल त्यासी ॥ बकें लाविलें लक्षासी ॥ काय योगिया होईल तो ॥१०॥
गळही उदकीं निरखी दिठी ॥ नये कूर्माची हातवटी ॥ चकोरें चंद्रामृतें होती तुष्टी ॥ ते हातवटी नये वायसां ॥११॥
मेघमुखींचा बिंदु देख ॥ तो वरिचेवरी झेली चातक ॥ तो लाभ घ्यावया बक ॥ झेंपावतां क्रिया नये कीं ॥१२॥
गर्भवतीचे डोहळे वांझेस करितां नये ॥ कोकिळास्तर कागास आणितां नये ॥ धर्माची शांति दुर्योधनासि न होये ॥ व्यासकविता न होय शाहिरा ॥१३॥
संतांची क्रिया अवघड ॥ करावया इतरांसि पडे अवघड ॥ मयूराचे राहाटीस घुबड ॥ काय पामर जाणती ॥१४॥
जो बैसला राज्यपद सिंहासनावरी ॥ सत्ताछत्र शिरीं उडे चवरी ॥ त्या सुखास दरिद्री ॥ कैसे प्राप्त होतील ॥१५॥
तैसें भगवद्भक्तींत रंगले ॥ ईश्वराचे लडिवाळ जाहले ॥ इंद्रादिकीं जे पूजिले ॥ वंदय जाहले सर्वांसी ॥१६॥
एवढी पदवी ज्या भक्तीपासी ॥ नेऊन बैसवी अढळपदासी ॥ ते नावडे भक्ती ज्यासी ॥ ते हीन अविवेकी ॥१७॥
ज्यासी भक्ति ते सुवासीण जाण ॥ भक्तीहीन विधवेचें पाहूं नये वदन ॥ यालागीं भक्तीचें भूषण ॥ मंडन होय भक्तांसी ॥१८॥
भक्ति संतांचें माहेर ॥ भक्ति ज्ञानियांचें रत्नभांडार ॥ भक्ति विवेकाचा सागर ॥ भक्ति कलश मोक्षाचा ॥१९॥
भक्ति योगियांची समाधी ॥ भक्ति साधकांची सर्व सिध्दी ॥ भक्ति जीवाची तोडी उपाधी ॥ बैसवी पदीं बोधाच्या ॥२०॥
भक्ति निष्ठावंताचें करी कल्याण ॥ भक्ति तोडी चौर्यांशींचें बंधन ॥ चुकवी नरक घोरासी ॥२१॥
भक्ति अनुभवाची पेठ ॥ भक्ति प्रेमाचा लोट ॥ भक्ति सुखाचा घाट ॥ भक्ति नीट अवीटप्राप्ती ॥२२॥
भक्ति अनाथाची माउली ॥ भक्ति स्वानंदाची नव्हाळी ॥ भक्ति शांतिरसाची वोतिली ॥ भक्ति गुरुकिल्ली सायुज्यमुक्तीची ॥२३॥
भक्ति समतेचा बोध ॥ भक्ति वैराग्याचा मूळकंद ॥ भक्तीनें लाभे ब्रह्मानंद ॥ उडे द्वंद्व कल्पनेचा ॥२४॥
भक्तीपासीं अहंकार गळे ॥ भक्तीपासीं सद्भाव बळे ॥ भक्तीपासीं संशय गळे ॥ पळे भक्तीनें ॥२५॥
भक्तीपासी कोटितीर्थें ॥ भक्तीपासी अनंत व्रतें ॥ भक्तीपासीं चारीं पुरुषार्थ ॥ स्वधर्म सेवक भक्तीचा ॥२६॥
भक्ति भजनाचा कडका ॥ भक्तीस खर्चावया नलगे आडका ॥ भक्ति दावी सुखाचा चुटका ॥ उडवी फटका शोकाचा ॥२७॥
भक्ति कामक्रोध झोडी ॥ मोहममतेची उपडी पेडी ॥ उभवी निजप्राप्तीची गुढी ॥ जोडी वैभव देवाचें ॥२८॥
भक्ति करी संसारनिरास ॥ उरों नेदी भवाचा लेश ॥ आतळों नेदी गर्भवास ॥ लावी ध्वजा कीर्तीची ॥२९॥
भक्ति कीर्तनाचा घोष ॥ करी समूळ पापांचा नाश ॥ उडवी संतापऊर्मीस ॥ मारी मेख कर्मासी ॥३०॥
भक्ति संचित प्रारब्ध उडवी ॥ माया अविदयेपासोनि सोडवी ॥ जीवशिवांस एक घडवी ॥ त्यासही चढवी स्वानंदपदीं ॥३१॥
एवढा भक्तीचा उपकार ॥ तीस विसरेल तो नर पामर ॥ भक्तीपासी तिष्ठे परमेश्वर ॥ हें वर्म जाणती संत कीं ॥३२॥
भक्तीनें माता सद्गुरु जोडे ॥ फिटे मीतूंपणाचें बिरडे हृदयीं जोडे ॥ उगवे गुढ जन्माचें ॥३३॥
एवढा अगाध भक्तीचा महिमा ॥ भक्ति आवडे पुरुषोत्तमा ॥ व्यास वाल्मीक सांगती सीमा ॥ संतांचा प्रेमा ज्यांत वसे ॥३४॥
अद्वैत भक्तांचें भूषण ॥ तुटे वाद तो पूर्ण ॥ जैसें सबाह्य निर्मळ गगन ॥ ऐसी बुध्दि परावी ॥३५॥
पाणी तंववरी कडकडे लोणी ॥ पाणी जळल्या निवांत राहे एकपणीं ॥ ऐसी अद्वैताची करणी ॥ द्वंद्वबाधा वसेना ॥३६॥
द्वैत तेथें वसे पाप ॥ द्वैत तेथें घडे संताप ॥ द्वैत तेथें निंदा दर्प ॥ वसे अमूप अहंकार ॥३७॥
द्वैत कल्पिलें धर्मराजें ॥ माझे गोत्रज वधिले पाप मज ॥ यालागीं न करी स्वयें राज्य ॥ उदास जाहला संतप्त ॥३८॥
कृष्णाची नायके गोष्टी ॥ शोकें कपाळ आपुलें कुटी ॥ म्हणे पाप लागलें माझे पाठीं ॥ कोण करी राज्यासी ॥३९॥
मग श्रीकृष्णानें धर्मासी ॥ करीं धरोनि नेलें भीष्मापासी ॥ धर्मे वंदूनि पितामहासी ॥ म्हणे राज्यातें करीना ॥४०॥
ऐकें तूं जनकजनका ॥ जन्मोनि पावलों थोर दु:खा ॥ गोत्रवध पापनरका ॥ पात्र जाहलों भूतळीं ॥४१॥
केलें पुण्य गेलें वृथा ॥ शेवटीं पाप आलें माझिया माथां ॥ आतां प्राण त्यजीन ताता ॥ रिघेन गिरिकपाटीं ॥४२॥
जन्मा आलिया काय जोडिलें फळ ॥ गोत्रवध पाप तुंबळ ॥ केलें सुकृत बुडालें समूळ ॥ पापात्मा मी जाहलों ॥४३॥
हिंसा पाप महाभारी ॥ त्यावरी गोत्रहत्या कष्ट शिरीं ॥ चौर्यांशीं जन्म नरक घोरीं ॥ भोगणें प्राप्त आमुतें ॥४४॥
एक राज्यलोभासाठीं ॥ पदरीं घेतलें दु:खकोटी ॥ जाहलों निर्दय निष्ठुर कपटी ॥ धिक् आमुच्या जीवित्वासी ॥४५॥
परिसोन धर्माचा संताप ॥ भीष्म पावला विस्मयो अमूप ॥ वदे अदयापि ज्ञानदीप ॥ नाहीं तूतें प्रकाशला ॥४६॥
भीष्म म्हणे धर्मराया ॥ वृथा शोक नको वायां ॥ मृगजळवत् माया ॥ रज्जू सर्प ज्यापरी ॥४७॥
बुदबळें सोंकटीं खेळतां स्वकरीं ॥ कोण मरे कोण मारी ॥ तरंगावर तरंग उसळे भारी ॥ काय दोषी ते होती ॥४८॥
भिंतीवरी लिहिल्या चित्रांचीं ॥ युध्द आकारिती हुनेरी त्यांचीं ॥ तेथें जित्यामेल्यांची ॥ खंती कोणा नसे कीं ॥४९॥
सोंगांत भिल्ल होऊन आला ॥ एकें मारिला तो मेला ॥ सवेंचि उठोनि उभा राहिला ॥ तोक तमाशा पाहती ॥५०॥
अवघें पंचभूतांचे जन ॥ विश्व एक गोत्रज वोळखे ज्ञानचक्षूनें ॥ त्यांत कौरव कल्पून ॥ वेगळे कोठून आणिले ॥५१॥
तुम्हीं मारिले कौवर मेले ॥ ते काय पंचभूतां वेगळे ॥ तत्वीं तत्त्व असें जन्मले ॥ विघड त्यातें असेना ॥५२॥
पंचभूतें गेलीं नाहीं ॥ आत्मा तो आपुले ठायीं ॥ त्वां घोर घेतला देहीं ॥ कासियाचा सांग पां ॥५३॥
तरंग हेलावले थिरावले ॥ कोण मेले कोण जन्मले ॥ यापरीस मज वहिलें ॥ शोक सांडी जाणत्या ॥५४॥
तुमच्या घटीं आत्मा एक संचरला ॥ कौरवांचा दुजा कोठून आला ॥ एक जगला एक निमाला ॥ हें आश्चर्य मज वाटे ॥५५॥
मुळीं सूर्य एकचि पाहीं ॥ दोन भासले जळाचे ठायीं ॥ तो निश्चयो केला जीहीं ॥ त्याचें नवल मज वाटे ॥५६॥
कल्पना वाढवूनि अचाट ॥ वायूची बांधों पाहे मोट ॥ बुडबुडे वेंचून भरी पाण्याची मोट ॥ तोही शाहाणा तुज ऐसा ॥५७॥
कोठोनि मोतियांचें पाणी ॥ म्हणे आणून भरा रांझणीं ॥ सूर्य किरणांचें करुं मणी ॥ घालूं कंठीं इच्छावें ॥५८॥
अगा संसार तितुका शून्य ॥ जेवीं बागुलभय दारुण ॥ किंवा कांसवीचें तूप काढून ॥ वांझपुत्रा वाढिजे ॥५९॥
मारुतीचें करावया लग्न ॥ स्वप्नींचे वर्हाडी जमा करुन ॥ तैसें संसाराचें भूषण ॥ दिसे गारुड बाजेगिरी ॥६०॥
गगनीं चमकली वीज ॥ तेणें प्रकाशें ग्रंथ लिहिजे ॥ तैसी संसाराची मौज ॥ क्षणभंगुर जाणावी ॥६१॥
पुत्र जन्मला शर्करा वांटिली ॥ निधन पावतां शंखध्वनि केली ॥ रज्जुसर्प पाहोनि भ्याली ॥ ओळखी हांसे गदगदां ॥६२॥
स्वप्नीं धन सांपडलें ॥ स्वप्नींच तस्करें चोरोनि नेलें ॥ जागृत होतां तें वेळे ॥ हर्षशोक मिथ्याचि ॥६३॥
राम रावणांचे ग्रंथ ॥ वाल्मीकें लिहिले कोटीशत ॥ पाहतां एकही पदार्थ ॥ दिसेना नामें राहिलीं ॥६४॥
तुमच्या होतील त्याचि गती ॥ लोक कहाणी मागें सांगती ॥ कौरव गेले तुम्हां काय निश्चिती ॥ शाश्वताची कल्पिली ॥६५॥
जातियांतील रडती ॥ सुपांतील हांसती ॥ शेखीं दोघांची एकचि गती ॥ सूर्यवंशा सोमवंशाच्या पंक्ती ॥ उठोन गेल्या लक्षिती ॥६६॥
अवघी भोरपी सोंग पाही ॥ हें कर्त्यासि आश्चर्य नाहीं ॥ शोकाच्या घायीं ॥ काय तो घडा मोडेल ॥६७॥
आकार तितका मृगजळपूर ॥ लय पावती हरिहर ॥ तूं कां करिसी घोर ॥ कोणी कोणाचा असेना ॥६८॥
सर्वांघटीं आत्मा एक ॥ हा पुसिजे कृष्णासी विवेक ॥ ज्या ज्ञानें जनकादिक ॥ मोक्षपदीं बैसेले ॥६९॥
दुष्टकर्में कौरव बुडाले ॥ त्यांचें कर्म त्यास भोंवलें ॥ तुम्हासि हरीनें लक्षिलें ॥ कौतुककर्ता तो एक ॥७०॥
हा श्रीकृष्ण परब्रह्म अवतार ॥ उतरावया धराभार ॥ मारावया दुष्ट पामर ॥ रक्षावे पवित्र साधुसंत ॥७१॥
तो सूत्रधारी परमात्मा ॥ कर्ता हर्ता अंतरात्मा ॥ तुम्हासि दोष नाहीं धर्मा ॥ तुम्ही बाहुलीं सूत्रवत तो ॥७२॥
जो ब्रह्मीं स्फुरे परिपूर्ण ॥ तोचि तुम्हा आत्मा जाण । तुम्हां कैंचें पापपुण्य ॥ नसती कल्पना कल्पिसी ॥७३॥
पापपुण्य़ें हे बुझावयाची गुढी ॥ पाहोनि भडकती मृगें बापुडीं ॥ रज्जुसर्प धांवे काढून फडी ॥ हें तो सत्य नसे कीं ॥७४॥
तैसी संसारमाया देख ॥ मोह धरितां पावे दु:ख ॥ ममता त्यजितां स्वानंदसुख ॥ ब्रह्मानंद होतसे ॥७५॥
मी धर्म असें उठे जें मीपण ॥ तोचि आत्मा स्वत:सिध्द पूर्ण ॥ येथें सारावें दुजेपण ॥ नलगे साधन योगमुद्रा ॥७६॥
अनंत बिंबें सूर्य एक ॥ तैसा सर्वीं सर्वोत्तम देख ॥ हा समजोनि विवेक ॥ स्मरे सोहमस्मि ब्रह्म मी ॥७७॥
तूं शांतरसाचा पुतळा ॥ शुध्दसत्वें वोतीव जमला ॥ अमृतास गोड करायाला ॥ काय त्यातें वैरावें ॥७८॥
धर्मा तूं धैर्याचा स्तंभ ॥ हृदय पैस जैसें नभ ॥ ज्ञानविवेकाचा गर्भ ॥ वोतीव कोंभ ब्रह्मींचा ॥७९॥
प्रळयांबुस कोणत्या उदकें वाढवावें ॥ सूर्यास काय उजळोनि प्रकाश पावावें ॥ देवास कोणतें शाहाणपण शिकवावें ॥ मैलागिरीस उटी कासयाची ॥८०॥
पाण्यास काय पातळ करावें ॥ वेदवेत्त्यास काय पाटीवर शिकवावें ॥ तैसे तुझे गुण संपूर्ण बरवे ॥ शर्करा गोडी नाबाद ॥८१॥
सुखें करावें राज्यास ॥ नि:संदेह असोंदे मनास ॥ सोमवंशाच्या भूषणास ॥ मंडण होसी पवित्रा ॥८२॥
तूं कल्पतरु चिंतामणीं परेश ॥ विशाळ बुध्दि ज्ञान तुर्याप्रकाश ॥ तूतें कराया आम्ही उपदेश ॥ सुधासागरा तक्र पाजणें ॥८३॥
आतां हेचि आज्ञा माझी उत्तमा ॥ अंगीकारावी राया धर्मा ॥ चालवावें राज्यनेमा ॥ वंशमर्यादा रक्षावी ॥८४॥
हाचि श्रीकृष्णाचा मनोरथ ॥ माझा पूर्ण चित्तांतील हेत ॥ प्रपंच करुन परमार्थ ॥ पृथुराजासारिखा ॥८५॥
यापरी बोधोनि धर्मासी ॥ भीष्म मौनें राहिला मानसीं ॥ धर्में वंदूनियां पदरजासी ॥ स्वयें स्वस्थानासी पातला ॥८६॥
ज्या चरित्रीं अनुभव गहन ॥ तो इतिहास निरुपिला पुरातन ॥ संतोष पावे श्रोत्यांलागून ॥ तोचि रस वोतिला ॥८७॥
निरुपिला विवेक अनुभवसिंधू ॥ संशय नुरे एक बिंदू ॥ होय स्वानंद आनंदबोधू ॥ ब्रह्मानंदू अक्षयी ॥८८॥
जैसा गंगेचा पर्जन्यकाळीं लोट ॥ तैसा सिध्दांतबोधाचा थाट ॥ कीं ब्रह्मपदीं चढावया नीट ॥ केल्या पायर्या सुखाच्या ॥८९॥
तंतूपासून पट व्हावा ॥ कनकी नगाचा विस्तार बरवा ॥ यापरी अनुभवाचा ठेवा ॥ प्रगट केला सज्ञाना ॥९०॥
तृषार्तियास गंगाजीवन ॥ रोगियास अमृतपान ॥ निर्धनास सांपडे धन ॥ तेवीं भाविका हा ग्रंथ ॥९१॥
या ग्रंथाचें हें नीजबीज ॥ समान पाहणें समाधिशेज ॥ अद्वयबोधीं संतोषिजे ॥ या सिध्दांतीं मी ब्रह्म ॥९२॥
अद्वैतबोधी समाधिसुख ॥ ज्यांत निमग्न सनकादिक ॥ हेंच वर्म गीतेंत वदला वैकुंठनायक ॥ वेदमनीचें नवनीत ॥९३॥
सर्प वांकडातिकडा फिरत ॥ वारुळांत नीत उतरत ॥ जैसा कवि बहुप्रकारें वदत ॥ शेवटीं सिध्दांत अद्वैतची ॥९४॥
म्यांही सिध्दांतबोधांत ॥ लिहिला मतभेद द्वैतबहुत ॥ शेवटीं अद्वैतबोधाची मात ॥ बेरीज केली एकचि ॥९५॥
प्रगट केला ज्ञानवन्ही ॥ भेद कपट जाळिलें निपटोनी ॥ मी ब्रह्मदाहक निवांत होऊनी ॥ शांत जाहलों निजतेजें ॥९६॥
ज्ञानरसाचा अपार सिंधू ॥ प्रगट केला सिध्दांतबोधू ॥ जैसा गुणांत शुध्द अगाधू ॥ मातृकेंत चौथी तुर्या जे ॥९७॥
वेदीं उपनिषद भाग ॥ तैसा सिध्दांतबोधी परम लाग ॥ वारी संशय विकल्प उदयोग ॥ बैसवी साम्राज्यमोक्षपदीं ॥९८॥
ग्रंथ उभारणीचा झाला कळस ॥ उरला भजनाचा विलास ॥ लग्न लागल्या सावकाश ॥ मिरवणूक उरली सोहळ्याची ॥९९॥
आतां सुख विलास गोडी ॥ बोलावयाची परम आवडी ॥ आनंद लहरीची गुढी ॥ हौस पुरे मनाची ॥१००॥
मौजेचा देव मौजेची भक्ती ॥ मौजेची उत्पत्ति आणि स्थिती ॥ मौजेचा संहार काळ शक्ती ॥ मौजेंत मौज देव खरा ॥१०१॥
मौजेची माया मौजेचा ईश्वर ॥ मौजेचा जीव संसार घोर ॥ खंडेराव म्हाळसा श्वान तुरंग ॥ पाहा मौजा कल्पनेच्या ॥२॥
अवतारसोंगें नानापरे ॥ आपणचि नटला मौजीं हरी ॥ ज्ञान अज्ञान उभयतां माझारी ॥ मिरवी जाणीव आपुली ॥३॥
आपुल्या अंगाचे करुन तरंग ॥ आपणांत आपण समुद्र दंग ॥ तैसा मौजी श्रीरंग ॥ एक आपण बहु दावी ॥४॥
जो ब्रह्म तोचि गुरु ॥ गुरुकृपें करी साक्षात्कारु ॥ आपणचि शिष्य हृदयीं साचारु ॥ आपणास उपदेश आपण करी ॥५॥
समुद्र पुरुष वनिता सरिता ॥ दोहींचें स्वरुप उदक पाहतां ॥ यापरी गुरु शिष्यांची एकात्मता ॥ समजोन घेणें चतुरानें ॥६॥
मुख्य बिंब प्रतिबिंब जेथें ॥ काय जातिभेद कल्पावा तेथें ॥ तैसा गुरुशिष्यांचा पंथ कल्पावा तेथें ॥ अनुभव रीत एकची ॥७॥
लोकांमध्यें लौकिकाचार ॥ सद्गुरुघरीं एक विचार ॥ आजा पणजा नातू विस्तार ॥ परी आडनांव असे एकच ॥८॥
काकवी राब गूळ साखरेस ॥ त्यांचा पूर्वज एकच असे ॥ अनंत धरा गणतीस ॥ उदक स्वभावें एकची ॥९॥
यापरी गुरुमहिमा गहन ॥ अनुभवज्ञान परिपूर्ण ॥ ह्याची लीला जग समजोन ॥ निवांत राहणें गुरुभक्ती ॥११०॥
ज्यापें गुरु समर्थ परेश ॥ तेणें कां मागावें भिक्षेस ॥ करावें व्रत धांवावें तीर्थास ॥ पुण्याचे तुकडे मागावे ॥११॥
घरीं कामधेनु हिंडावें ताकास ॥ चिंतामणी पदरीं वेंचित फिरावें कवडयांस ॥ सांडोनि कल्पतरुछायेस ॥ हिंवरातळीं कां बैसावें ॥१२॥
गुरुभक्तीचें घेऊनियां भूषण ॥ निराश असावें वैराग्य पूर्ण ॥ कुवासनेस करावें वमन ॥ शांत निवांत असावें ॥१३॥
भक्ति ज्ञान वैराग्य ॥ हे गुरुभक्तीस भूषण सौभाग्य ॥ जैसा पतिव्रतेस योग्य ॥ श्रृंगार शोभा चांगली ॥१४॥
कर्मापासोनि प्रगटे ज्ञान ॥ ज्ञान घटल्या कर्माचा नाश जाण ॥ जैसें आधीं फूल मग फळ येऊन ॥ फळ आल्या फूल सुके ॥१५॥
आधीं साधन मग प्राप्ति ॥ प्राप्त जाहलिया साधनें सरती ॥ स्वयंपाकाची गडबड करिती ॥ तृप्तीवर दडपिती चुलीस ॥१६॥
नेमिल्या ठायां जाणें ज्यासी ॥ तंववरी सोडूं नये मार्गासी ॥ गंगा न भेटतां सिंधूसी ॥ वाहणें आलें कपाळा ॥१७॥
जंववरी नाहीं स्वरुपप्राप्ती ॥ तंववरी भोगणें लागे प्रारब्धगती ॥ पुण्यशीळ राजा परीक्षिती ॥ पडिला फेरीं शापाचे ॥१८॥
पोहणार भवंर्यांत पडिला ॥ किंवा हकीम न्याय करितां चुकला ॥ पतिव्रतेस आळस आला ॥ व्यभिचारिणीची योग्यता ॥१९॥
साधूस संताप आला ॥ हंसें मांसरज्जु उचलिला ॥ धर्म फांसे टाकून फसला ॥ तैसा जाहला परीक्षिती ॥१२०॥
लक्ष्मणा दुष्टवचन ॥ बोलून पस्तावली सीता आपण ॥ दशरथें कैकयीस भाक देऊन ॥ मग उपाय चालेना ॥२१॥
ययातीस पस्ताव पडला ॥ नहुषराजा स्वर्ग राहाटीस भांबावला ॥ राम मृगापाठीं लागला ॥ पंडू फसला मृग वधितां ॥२२॥
यापरी राजा परिक्षिती ॥ मृगया खेळतां वनाप्रती ॥ कुबुध्दी उपजली चित्तीं ॥ मृतसर्प सुदेला ऋषिकंठीं ॥२३॥
त्या अपराधें ऋषिपुत्र प्रबळ ॥ निष्ठूर निर्दंय शाप वदला काळ ॥ आयुष्यवल्लीचीं सुकृतफळें ॥ सप्तदिनेंशी खंडिलीं ॥२४॥
तें श्रुत होतां रायासी ॥ पश्चात्ताप प्रवेशला मानसीं ॥ म्हणे विचित्र कर्मगती कैसी ॥ जें न टळे हरिहरां ॥२५॥
अकस्मात छापा वरी पडला ॥ कीं समुद्रीं सुकृतजाहज बुडाला ॥ कीं मेरुचा कडा ढांसळला ॥ नातरी वीज पडली कडकडोनी ॥२६॥
ऐसा पडला पस्ताव ॥ पुढें विश्रांतीस न मिळे ठाव ॥ कोण आतां करावया उपाव ॥ चित्त पडिलें भवचक्रीं ॥२७॥
शोकसंतापाची उठली कडकी ॥ मृत्यूची येऊन बैसली धडकी ॥ जीव दडावया जागा हुडकी ॥ कोठें आश्रय दिसेना ॥२८॥
मग आपुलें चित्तीं आपण ॥ करी विचार धैर्य सांवरोन ॥ म्हणे होणारा बळवंत गहन ॥ सहसा न टळे विधातिया ॥२९॥
नळास घडावया वनवास ॥ रामास व्हावया वनप्रवेश ॥ हरिश्चंद्रा डोंबाघरीं प्रवास ॥ कष्ट भोगणें धर्मासी ॥१३०॥
ऋषिशापाचे शास्त्रघायीं ॥ आयुष्य खंडलें उपाय नाहीं ॥ पुढें मोक्षाची निजसोयी ॥ कोण उपायें साधावी ॥३१॥
ऐसें कोठें नाहीं समर्थ तीर्थ ॥ स्नान करितां करी मुक्त ॥ जें चुकवी मृत्युपंथ ॥ ऐसें व्रत दिसेना ॥३२॥
ऐसा नाहीं मंत्र अद्भुत ॥ उच्चारितां चुके मृत्युचा घात ॥ आराधिला नाहीं देव समर्थ ॥ हांक मारितां आलों म्हणे ॥३३॥
दान यज्ञ तपोबळें ॥ न चुकती मृत्यूचे उमाळे ॥ ठसे बोध अविदया गळे ॥ ऐसा गुरु समर्थ दिसेना ॥३४॥
चित्त पडिलें चिंतार्णवीं ॥ जळरहित मीन तेवीं ॥ तळमळी अपार आपुल्या देहीं ॥ तंव शुकस्वामी पातला ॥३५॥
नकळे पूर्वजांची जोडी ॥ किंवा पुण्याची उभविली गुढी ॥ यास्तव शुकयोगी तांतडी ॥ आला धडाडित तपोराशी ॥३६॥
जो योगियांचें मंडण ॥ जीवन्मुक्त ब्रह्मज्ञानी पूर्ण ॥ विषयातीत शुध्द चैतन्य ॥ वोतींव पुतळा ब्रह्मींचा ॥३७॥
देह प्रारब्धावर मारिली मेख ॥ संसार घोर थुंकिला देख ॥ विकारवासनेचा न स्पर्शें पंक ॥ नित्यानंद आनंद सदा ॥३८॥
तो पाहोनि शुकस्वामी ॥ राजा नमी पादपद्मीं ॥ निवालों म्हणे अंतर्यामीं ॥ संताप ऊर्मी उडाली ॥३९॥
जीव जातां प्राप्त सुधा ॥ दरिद्रीयास लाभे संपदा ॥ तृषार्थीयावरी धांवली गोदा ॥ किंवा भेटी नारदवाल्मीकां ॥१४०॥
कीं प्रल्हाद मांजितां प्रगटे नरसिंहमूर्ती ॥ सीतेस संतोष दयावया आला मारुती ॥ घाबरी होतां द्रौपदी सती ॥ कृष्ण परमात्मा पातला ॥४१॥
यापरी माझिया मनोरथीं ॥ येऊनि बैसलासि ब्रह्ममूर्ती ॥ कृपानुग्रह स्वानंदस्थिती ॥ मोक्षपदीं बैसवी ॥४२॥
मज नाहीं देहाचा लोभ ॥ ज्ञान प्रकाश करी स्वयंभ ॥ दावी अक्षयी पद्मनाभ ॥ उडे भांब भयाची ॥४३॥
ज्या मृत्यु भेणें मी कापें ॥ त्या भयाचें छेदी पाप ॥ चुकवी जन्म मरणाची खेप ॥ लावी दीप ज्ञानाचा ॥४४॥
वारी शोक मोह भयचिंता ॥ तोडी संशय लोभ ममता ॥ करी बोध अनुभव पुरता ॥ तूं गुरुदाता भेटलासी ॥४५॥
मृत्युसर्प डंखला भारी ॥ त्याची वारी विषलहरी ॥ बैसवी अनुभवसुधासागरीं ॥ करी छाया कृपेची ॥४६॥
मी अनन्यस्वामीस शरण ॥ माझें तोडीं भवबंधन ॥ ज्या सुखीं सनकादिक निमग्न ॥ त्या सुखांत बैसवी ॥४७॥
पाहोनि रायाचा अनुताप ॥ शुकही सुखावला अमूप ॥ म्हणे लक्षी चैतन्य चिद्रूप ॥ होई तद्रूप स्वानंदीं ॥४८॥
ऋषीनें शापिलें मायीक ॥ सर्पदंश देहासि देख ॥ तुझा आत्मा अजरामर निष्कलंक ॥ नाश त्यातें असेना ॥४९॥
देह तंव पंचभूतांचें ॥ शाप काय नाश करील त्यांचें ॥ आत्म्यास नाश हें वाचें ॥ कुष्ट जिव्हेसी बोलतां ॥१५०॥
पंचभूतें गेलीं नाहीं ॥ आत्मा गगनवत् अचळ पाहीं ॥ त्वां काय भय घेतलें हृदयीं ॥ मृत्यु पदार्थ दिसेना ॥५१॥
पाहतां जेथील तेथें संचलें ॥ जन्मलें आणि निमालें ॥ हें भ्रांतीनें भासलें ॥ बागुल बाळा काय सत्य ॥५२॥
जैसा मृगजळाचा पूर ॥ तैसा संसाराचा घोर ॥ उठती गंधर्वनगरींचे गिरिवर ॥ एक वितुळे एक जमे ॥५३॥
अभ्र आलें तैसे नाहीं ॥ जग जन्मलें निमालें पाहीं ॥ वस्तु नित्यानंद अविनाश पाहीं ॥ स्वयं प्रकाशे कोंदली ॥५४॥
सोनें अलंकारा आलें नाहीं ॥ ब्रह्म जग जाहलें नाहीं ॥ तंतु पटाचे ठायीं ॥ जातिभेद जाहला नाहीं पैं ॥५५॥
सिंधू अनेक तरंगीं खेळला ॥ जातिकर्मास नाहीं आला ॥ सुवर्ण तोळ्याचा श्वान केला ॥ किमतीस उणा होईना ॥५६॥
मडकें महाराघरीं नीच जाहलें ॥ ब्राह्मणघरीं उंचपण पावलें ॥ परी मडकें उंच नीच नाहीं जाहलें ॥ आपुल्या स्वरुपीं खापर ॥५७॥
खांब आपण कल्पिला ॥ काष्ठ खांब नाहीं जाहला ॥ दीपासि दीप दुसरा लाविला ॥ जातिभेद जाहला नाहीं ॥५८॥
लोणी माखण मसका नवनीत ॥ चहूं नामीं एकचि पदार्थ मिरवत ॥ जग माया ब्रह्म अनंत ॥ एक रुपाचा विलास ॥५९॥
सुवर्णाचे नग राया ॥ तेवीं वोळखे ब्रह्मीं माया ॥ मोजितां तरंगाची क्रिया ॥ उदकमय संचली ॥१६०॥
तरंग वेगळे मोजिनि करिती ॥ तरी मायेस निरसिती ॥ गुळावेगळी गोडी दाविती ॥ तरी शाहाणे म्हणावे ॥६१॥
सुगंध गुंफोनि करिती हार ॥ तरी माया ऐसा दाविती प्रकार ॥ सूर्याबिंबींहून काढिती अंधार ॥ हें तों अघटित घडेना ॥६२॥
पाहतां अज्ञानाचें रुप ॥ जैसा भांगेचा कैफ ॥ रज्जुसर्पाचा भरे कंप ॥ तैसा दर्प काळाचा ॥६३॥
वांझ जन्मली नाहीं पुत्रासी ॥ मग कजिया कैंचा सासुसुनेसी ॥ कासवीच्या तुपासी ॥ भोजन करणें वृथाची ॥६४॥
तुरंगाची शिंगें काढून ॥ आकाशांत कूप खणून ॥ त्या कूपाचें पाणी सेंदण ॥ वायूचा डोल करुनियां ॥६५॥
तैसी मायेची गणना ॥ करु कोणी कल्पना ॥ प्रतिबिंब काढावया जळांत जाणा ॥ करणें प्रयत्न मूर्खता ॥६६॥
या बोधीं उत्तम राया ॥ मिथ्या भ्रमूं नको वायां ॥ अनुभव सज्जून हृदया ॥ वारीं कल्पना मनाची ॥६७॥
मन म्हणावें हृदयास ॥ मन म्हणावें कल्पनेस ॥ मन म्हणावे अंत:करणास ॥ मनोमय विष्णु जाण पां ॥६८॥
विष्णु तोचि हिरण्यगर्भ देख ॥ ब्रह्मींचा तोचि उल्लेख ॥ माया ईश्वर तदात्मक ॥ समजणें गुरुज्ञान किल्ली ॥६९॥
जैसा उसास आपुला ॥ तैसा ब्रह्मीं उल्लेखी जाहला ॥ त्याचा विश्वाकार जमला ॥ दुधावरी जैसी साय ॥१७०॥
बिंदूंत जमे देहसंबंध ॥ तैसें उल्लेखीं जगप्रसिध्द ॥ हा महावाक्याचा बोध ॥ प्रसिध्द पाहे ज्ञानदृष्टी ॥७१॥
मुंडासा पगडी पागोटें पाग ॥ एक्या कापुसाचा विभाग ॥ भिन्न कल्पी अज्ञान जग ॥ ज्ञाता पाहे तंतू एक ॥७२॥
हा अद्वैतबोधाच सिध्दांत ॥ बुधबळाची प्यादी मात ॥ हें समजोनि करी साधन पदार्थ ॥ तो कळसावर धोंडा ठेवी ॥७३॥
पोट भरल्या चाटावीं बोटं ॥ ज्ञान झालिया साधनाचे कष्ट ॥ द्वारीं वाहे गंगेचा लोट ॥ कूप खणणें तृषेला ॥७४॥
लोणी आलिया हातीं ॥ मग ताक घुसळणें हे काय रीती ॥ गंगामीनल्या समुद्राप्रती ॥ वाहावयाची वासना धरावी ॥७५॥
लक्ष्मी जाहलिया प्रसन्न ॥ मग कां मागावें कोरान्न ॥ राजपदीचें आलिया भूषण ॥ दरिद्रभोग कां इच्छावे ॥७६॥
बैसावया मिळाली शिबिका ॥ मोळीवाह्याचा धरावा आवांका ॥ विष्णू भेटल्या देखा ॥ मग महिषासुर कां पूजावा ॥७७॥
भोजन जाहल्या रंधन करणें ॥ तैसें ज्ञानिया समाधान ॥ नदी उतरल्या सांगडी बांधण ॥ हें काय शाहाणपण चांगलें ॥७८॥
हा अद्वैतबोधाचा प्रताप ॥ जयांत निरसे पुण्यपाप ॥ आपण स्वयें स्वरुपें तद्रूप ॥ चिदाकाश चिन्मय ॥७९॥
पक्षी गगनमार्गें जाती ॥ त्यांचा माग पक्षी काढिती ॥ तैसी अनुभवाची जाती ॥ अनुभवी जाणती तों लक्ष ॥८०॥
श्रीमंताचें वैभव दरिद्रियास नये ॥ साधूचें स्वानंदसुख अज्ञानासि काय होय ॥ सूर्याचे रथीं बैसला आहे ॥ तो पाहे निशा कैसी ॥८१॥
ज्यांत कर्म देह अभिमान ॥ हें गगनछायेचें रुप जाण ॥ स्वर्ग नरक पाप पुण्य ॥ मिथ्या भ्रमणा कल्पनेची ॥८२॥
या बोधें राहे परिपूर्ण ॥ शाप बाधेचें नलगे लांछन ॥ देहाचा बंध आत्म्यास जाण ॥ पृथ्वी नभ जयापरी ॥८३॥
देह सप्तदिनीं पडो कीं सप्तवर्षांप्रती ॥ याचा संकल्प सोडीं भूपती ॥ दिवसरात्री नव्हे एक जाती ॥ त्याचा खेद कायसा ॥८४॥
जो आपुला नव्हे पदार्थ ॥ त्या देहाचा कां करावा शोक स्वार्थ ॥ हें जाणोनि होती भ्रांत ॥ त्यांस कैसें करावें ॥८५॥
देह पाहतां आपुलें नाहीं ॥ तूं आत्माराम पूर्ण पाहीं ॥ या अनुभवे शुध्द होई ॥ जीवन्मुक्त तुझा तूं ॥८६॥
तूंचि तुर्येचा प्रकाशक ॥ उन्मनीचा प्रकाशदीपक ॥ अवघा ब्रह्म तूंचि एक ॥ विश्वविलास तुझाचि ॥८७॥
तूंच शापी तूंच सर्प ॥ जित्या मेल्याचें तूचि रुप ॥ तूंचि अपार अमूप ॥ तुझा तूं एकचि ॥८८॥
हा वेदांचा सिध्दांत ॥ उपनिषदांचें नवनीत ॥ साही शास्त्राचें मथित ॥ सारांश पुराणांचा ॥८९॥
ब्रह्मज्ञानाचा मूळकंद ॥ सनकादिकांचा सुखस्वानंद ॥ योगियांचा समाधिबोध ॥ सोलींव साजिरा मुक्तपदींचा ॥१९०॥
सर्व भागवताचें मथित ॥ सारांश काढिलें नवनीत ॥ देऊनि परीक्षिती केला मुक्त ॥ मरणभयापासोनी ॥९१॥
हें सुख समजोनि संतसज्जनीं ॥ निर्भय वर्तती जनीं वनीं ॥ मिथ्या संसारभ्रम जाणोनि ॥ आत्मरमणीं ते रमती ॥९२॥
जनीं पाहावा जनार्दन ॥ हें अलक्षमुद्रेचें लक्षण ॥ निर्वैर जगीं विचरण ॥ निंदा स्तुती वर्जोनी ॥९३॥
शत्रु मित्र समसमान ॥ हें योगियास सौभाग्यमंडण ॥ जैसें सर्वांत भरोन गगन ॥ निरामय अलिप्त ॥९४॥
विश्व एकचि गोत्र पाहून ॥ निवांत राहिलों समजोन ॥ द्वैतपणाचा मत्सर त्यागून ॥ राहिलों पैं अद्वैतीं ॥९५॥
हौस पुरली जीवाची ॥ जाहली समजाविस मनाची ॥ चिंता उडाली चित्ताची ॥ कोंदला हरिख अंतरीं ॥९६॥
सिध्दांबोधाची प्रतापशक्ती ॥ उगल्या संशयाच्या गुंती ॥ भाग्यें लाधलों ज्ञानसंपत्ती ॥ साम्राज्यपदीं बैसलों ॥९७॥
भाग्यें जोडिलें पुरुषोत्तमा ॥ ठसली पूर्ण बोधाची सीमा ॥ जाहलों काळाचाही आत्मा ॥ अनुभवपूर्णिमा अक्षयीं ॥९८॥
अद्वैतबोध गुरुजी किल्ली ॥ ममता जाऊन समता आली ॥ स्वानंदसुखाची दिवाळी ॥ महासण संतसंगें ॥९९॥
तोचि आनंदचा दसरा ॥ नित्य भजों परमेश्वरा ॥ नांदा सद्गुरुघरमाहेरा ॥ उजळू दीप तुर्यासी ॥२००॥
नमूं संतांचिया पायां ॥ पुजूं सद्गुरुहृदया ॥ बैसेन शांति शीतळछाया ॥ गाऊं ओव्या शहा म्हणे ॥२०१॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये पंचचत्त्वारिंशोध्याय: ॥४५॥
॥अध्याय ४५॥ ओव्या २०१॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीशुभं भवतु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2020
TOP