मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय २८ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २८ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
राजा एक परमेश्वर ॥ त्यापासीं केला रोजगार ॥ जाहलों जन्माचा चाकर ॥ चौर्‍यायशीं फेरे कोण फिरे ॥१॥
स्वर्गीचा इंद्र सरदार ॥ तोही ठेवी पुण्यवंत नर ॥ परी शेवटीं करितो तहगीर ॥ घेत भूषणें हिरोनी ॥२॥
तोही जागा हळुवट पाहतां ॥ दिली पदवी घेत मागुता ॥ यालागीं भगवद्भक्तां ॥ तेथें पुरी पडेना ॥३॥
ब्रह्मादिक हरिहर ॥ तेही श्रेष्ठ सरदार ॥ कल्पांतीं करिती तहगीर ॥ शिपाई फकीर शेवटीं ॥४॥
यालागीं सेवक मुख्याचा ॥ जाहलों मी पाहीं अनंताचा ॥ पावलों मोकासा मोक्षपुरीचा ॥ काढूं न शके कळिकाळ ॥५॥
मनतुरंगीं करुनि स्वारी ॥ ज्ञानवज्रकवच घातलें शरीरीं ॥ शुभा अशुभांचीं शस्त्रें भारी ॥ पुष्पप्राय लागती ॥६॥
हातीं घेऊनि विवेक भाला ॥ केला वासनेवरी हल्ला ॥ फोडोनि क्रोध फळीला ॥ छेदिला रिपु अहंकार ॥७॥
क्षमाढाल पुढें केली ॥ विश्वनिंदा विवेकें निवारिली ॥ मद मत्सर होते बळी ॥ तेही खंडिले सत्संगें ॥८॥
हेंचि शूरत्वाचें बळ ॥ लागों नेदी मळ ॥ हिरा जैसा सोज्वळ ॥ अंतर बाहेर सारिखा ॥९॥
शिरीं टोप शातीचा ॥ घाय चुकविला विकल्पाचा ॥ वेढा उपडिला हिंसेचा ॥ बोधकडेसि निघालों ॥१०॥
वरी विषयाचा छापा पडिला ॥ इंद्रियग्राम अवघा लुटिला ॥ मग वैराग्यपट्टा घेतला ॥ पराभविलें पर सैन्य ॥११॥
यापरी पाहोनि निधडा शूर ॥ मान्य करी परमेश्वर ॥ मग सिध्दांतबोध दप्तर ॥ हुद्दा मातें वोपिला ॥१२॥
ज्या दप्तरा आंत ॥ अवघा जमाखर्च होत ॥ ब्रह्मांडाचा झाडा निघत ॥ रुजू बाकी सकळही ॥१३॥
मागील अध्यायीं तीन अवतार ॥ वामन परशुराम रघुवीर ॥ यांचा थोर विचार ॥ देवें मुखें वाखाणिला ॥१४॥
तो सर्व ब्राह्मणें परिसोनि कानीं ॥ मस्तक ठेविला अच्युतचरणीं ॥ पुढें उभा जोडूनि पाणी ॥ विनयें बोले सर्वोत्तमा ॥१५॥
द्विज म्हणे संशयच्छेदका ॥ जीवउध्दार बुध्दिबोधका ॥ संसारश्रमहारका ॥ नाम शस्त्रें करोनी ॥१६॥
मातें तुम्ही कृपा करोनी ॥ सांगीतली अवतारकहाणी ॥ परी ते न होत मोक्षदानी ॥ हा अनुभव मज बिंबला ॥१७॥
आतां त्रेतायुगीं कोणता ॥ जो जीवासी उध्दरिता ॥ तो अवतार मज आतां ॥ श्रवण केला पाहिजे ॥१८॥
गोसावी म्हणे द्विजवर्या ॥ जीवाची करुणा जाणोनियां ॥ तो स्वामी दत्रात्रेया ॥ मोक्षदानी यथार्थ ॥१९॥
जो निर्विकार स्वरुप ॥ तो दत्तात्रेय तद्रूप ॥ तेथें नाना संकल्प ॥ पुराणीं कल्प मांडिला ॥२०॥
एक म्हणती दत्त सिध्द ॥ एक म्हणती स्वरुप अगाध ॥ एक म्हणती प्रसिध्द ॥ ब्रह्मा विष्णु महेश ॥२१॥
आतां याचा अनुभव ॥ तूतें उगवोन सांगतों सर्व ॥ हृदयीं संशयाचा ठाव ॥ नुरे ऐसें परिसें गा ॥२२॥
त्रेतायुगाआंत ॥ चौर्‍यांशीं सिध्द नवनाथ ॥ देवतांच्या बळें समर्थ ॥ सामर्थ्य अंगीं बाणिलें ॥२३॥
योगबळें वज्रदेही ॥ अभ्यासें काळ जिंकिला पाही ॥ इंद्रचंद्र लेखांत नाहीं ॥ मानिती ईश्वर आपण ॥२४॥
चमत्कार दावून जगासी ॥ लाविती आपुल्या भक्तीसी ॥ शरण आणिती रायांसी ॥ विद्याबळें मोहुनी ॥२५॥
जीव लागले देवताभजनीं ॥ मोक्षवार्ता न मिळे स्वप्नीं ॥ मग कृपामायेनें आर्जवोनी ॥ परमेश्वर आणिला ॥२६॥
चैतन्य मायापूर वाहोन ॥ स्वरुपाची अवयवता आपण ॥ अनसूयेच्या उदरीं जाण ॥ जगदीश गर्भ संभवला ॥२७॥
परिपूर्ण होतां दिवस ॥ जन्म पावला परेश ॥ ऋषि करिती वेदघोष ॥ शुभकाळ दिसतसे ॥२८॥
अनसूयेच्या उदरव्योमांतून ॥ उदेश स्वरुप निशारमण ॥ जीवाची अविद्या निरसोन ॥ अपरोक्ष चांदणें प्रकाशी ॥२९॥
कोणी म्हणे अयोनि जन्मला ॥ तळहातापासोन प्रगटला ॥ देवें मनुष्यवेष घेतला ॥ गर्भी संभवला यथार्थ ॥३०॥
ब्रह्माविष्णुमहेश ॥ तिहीं ओळखिला जगदीश ॥ मग समरस सेवेस ॥ अंशरुपें शरीरीं ॥३१॥
त्रय अंश अंगीकारिले ॥ यालागीं दत्तात्रेय नांव ठेविलें ॥ विश्वामाजी रुढलें ॥ तिन्ही देवांचा अवतार ॥३२॥
दत्तात्रेय परमेश्वर ॥ हेंचि ओळखे साचार ॥ जीवाचा करावया उध्दार ॥ अवधूतवेषें प्रगटला ॥३३॥
मायापूर अंगीकारुन ॥ अवतरला आनंदघन ॥ दत्तात्रेय भगवान ॥ मोक्षदानी गोसावी ॥३४॥
जिंकोनि चौर्‍यायशी सिध्द ॥ दावूनि स्वरुप अगाध ॥ नवनाथांचें सोडवी बिरुद ॥ पराक्रमें आपुल्या ॥३५॥
अलर्करायासी उपदेश ॥ करुनि तोडिला भवपाश ॥ मांधातें पुशिलें प्रश्नास ॥ त्याचे आर्त पुरविले ॥३६॥
यदुराजा ययातिनंदन ॥ तया देवोनि स्वयें दर्शन ॥ केली ब्रह्मविद्या निरुपण ॥ परमार्थाची मूळरासी ॥३७॥
यदुराजा अनुतापयुक्त ॥ राज्य सांडूनि फिरे वनांत ॥ तंव अकस्मात अवधूत ॥ दत्तात्रेय देखिला ॥३८॥
पहातां उडाली अहंकारउर्मी ॥ पावला संतोषाचें धामीं ॥ मस्तक ठेवितां पादपद्मीं ॥ देहभाव विसरला ॥३९॥
अवलोकितां मुखाकडे ॥ दिसे निरामय रुपडें ॥ म्हणे हें परब्रह्म उघडे ॥ सगुणरुप सुखावलें ॥४०॥
यदु म्हणे स्वमी अवधूता ॥ दर्शनें उडविली संतापव्यथा ॥ आतां लावीं मोक्षपंथा ॥ होईं दाता जीवाचा ॥४१॥
बहुत पाहिले सिध्दऋषी ॥ पराक्रमी सृष्टीसी ॥ मनोभ्रमणाची माशी ॥ नाहीं निवांत बैसली ॥४२॥
सहज परमार्थाची रुची ॥ लावी मुख्य स्वरुपाची ॥ पुढें वार्ता भवाची ॥ स्वप्नीं नातळे जगदीशा ॥४३॥
सायासें मनुष्यदेह पावलों ॥ राज्यांमदें उन्मत्त जाहलों ॥ अष्टौ प्रहर विषयीं गुंतलों ॥ सहज मुकलों मोक्षातें ॥४४॥
या जगापरीस अधिक ॥ रायापासीं वसे पातक ॥ राज्यांतीं घोर नरक ॥ बांधला पालवीं बळकट ॥४५॥
ज्यामार्गी राव चालिला ॥ त्या राष्ट्रीं प्रळयो मांडिला ॥ शिंवारग्राम तुडविला ॥ आकांत होय देशांत ॥४६॥
प्रजापीडें पातक ॥ रायामस्तकीं आवश्यक ॥ अनेक जीवांची हिंसा देख ॥ तेही घडे रायासी ॥४७॥
मुंगी ढेंकूण उवा लिखा ॥ टोळ सरड झुरळ आणिका ॥ ऐसे लक्ष वधितां देखा ॥ तैं एक सर्प मारिला ॥४८॥
सर्प पक्षी मूषक घूस ॥ हे लक्ष वधिल्याचा दोष ॥ एक मृग अथवा अजास ॥ मारितां पातक त्या तुल्य ॥४९॥
कुक्कुट मीन मृग बस्त ॥ हे मारिल्या लक्ष नेमस्त ॥ तेव्हां एक धेनूचा घात ॥ केल्या दोष त्या घडे ॥५०॥
धेनु महिषी वृषभ रेडा ॥ श्वान मार्जार उंट घोडा ॥ हे लक्ष मारिल्या पाडा ॥ एक मनुष्यवध घडे ॥५१॥
लक्ष मनुष्य मारिल्यावरी ॥ एक स्त्रीचा वध निर्धारीं ॥ लक्ष वनिता निवटितां करीं ॥ एक बाळहत्या त्या तुल्य ॥५२॥
लक्ष बाळें करितां हनन ॥ एक ब्राह्मण मारिला जाण ॥ वधितां लक्ष ब्राह्मण ॥ एक साधू त्या तुल्य ॥५३॥
जो एक साधू मारी ॥ तेणें सहस्त्रलता परमेश्वरीं ॥ याहोनि पातक भारी ॥ ब्रह्मांडांत असेना ॥५४॥
मांडव्य ऋषी भावोनि तस्कर ॥ रायें ओपिला शूळावर ॥ ऐसा पातकांचा विचार ॥ राज्यपदीं नसे कीं ॥५५॥
साधु पातल्या नृपभेटी ॥ त्यासी सन्मानितां दृष्टी ॥ तो विमुख जाहलीया शेवटीं ॥ बुडे सुकृत जन्माचें ॥५६॥
दीन दुर्बळ कोणें गांजिला ॥ तो फिर्यादी सभेस आला ॥ त्याचा न्याय नाहीं केला ॥ तेव्हां बुडाला स्वधर्म ॥५७॥
रायें ठेविले सेवक ॥ सत्तेनें पीडिती प्रजालोक ॥ राव हो अथवा रंक ॥ अद्भुत पाप रोडकें ॥५८॥
प्रजांचा कौल मोडी प्रतिवर्षी ॥ नेमाहून घे अधिक द्रव्यासी ॥ तरी हेंहीं पातक रायासी ॥ निवारु न शके विधाता ॥५९॥
द्रव्यलोभासाठीं ॥ नवी कानूची करी पट्टी ॥ नसतां अपराध प्रजा आटी ॥ तें महत्पाप रायासी ॥६०॥
विषयांचे कर्दमांत ॥ राव लोळे मंडूकवत् ॥ स्वप्नीं नाठवे भगवंत ॥ होय आसक्त धनदारां ॥६१॥
ऐसीं पातकें रायाचिये घरीं ॥ त्याचे वंशीं जन्मलों संसारीं ॥ म्यांही आळस तिळभरी ॥ दोषाचरणीं नाहीं केला ॥६२॥
अखंड पारधीव्यसन ॥ निरपराध पशुहनन ॥ जळक्रीडा करितां मीन ॥ वधिले संख्यारहित ॥६३॥
पोटासाठी चोरी करी ॥ त्यासी निरोधोनि आणिलें हरी ॥ म्या देवविलें शूळावरी ॥ नाहीं भ्यालों आत्महत्ये ॥६४॥
मागिले जन्मीं भजन ॥ घडलें होतें सत्पात्रीं दान ॥ त्या सुकृताचें पुण्य ॥ हृदयीं माझ्या उदेलें ॥६५॥
तेणें जाहलों मी विरक्त ॥ राज्य मानिलें वमनवत् ॥ पुढें शोधितां मोक्षपंथ ॥ तुमचे पाय देखिले ॥६६॥
यदूचीं अनुतापवचनें ॥ परिसीलीं अनसूयानंदनें ॥ मग म्हणे हा संपन्न ॥ ज्ञानास प्राप्त होईल ॥६७॥
अवधूत म्हणे यदुराजा ॥ तुझ्या स्फूर्तीची वाग्ध्वजा ॥ पाहोनि अंत:करणीं माझ्या ॥ हेलावला सुखसिंधु ॥६८॥
कोणी एक दरिद्री ॥ संसारीं त्रासून वैराग्य करी ॥ तूतें सर्व सुखाची सामग्री ॥ असतां अनुताप हें नवल ॥६९॥
वैभव सांडोन अनुताप धरी ॥ तो परम श्रेष्ठ परमेश्वरीं ॥ दरिद्र असोन वैराग्य करी ॥ तो कनिष्ठ बोलिजे ॥७०॥
यालागीं तूं अनुतापासी ॥ राज्य वांतिप्राय त्यागिसी ॥ पुढें मोक्षप्राप्ति पुससी ॥ हें आश्चर्य वाटे मज ॥७१॥
जोंवरी जीवासी अज्ञान ॥ मानी संपदा भोगसदन ॥ हृदयीं संचरतां आत्मज्ञान ॥ काकविष्ठा मग दिसे ॥७२॥
सुंदर स्त्रियांचीं मुखकमळें ॥ पाहतां विधीचें वीर्य गळे ॥ त्या वनिता वैराग्यबळें ॥ दिसती जैशा अस्वली ॥७३॥
रागसंगीत मधुर गायन ॥ परिसतां अज्ञान सुखीजन ॥ विरक्तासी तें गायन ॥ अपानवाद्यासारिखें ॥७४॥
नाना सुगंध सुवास ॥ अज्ञान लुब्धे भ्रमरसमरस ॥ वीतरागी पुरुषास ॥ भासे नीलगंधिका ॥७५॥
अनेक षड्रसभोजन ॥ अज्ञानातें सुधासमान ॥ ज्ञानी चाखितां मुखेंकरुन ॥ मानी आंबवण म्हशीचें ॥७६॥
पलंग सुपत्नी मृदु शय्या ॥ अज्ञानाची सुखावे काया ॥ आत्मज्ञानी लेखी तया ॥ शेणखाईसमान ॥७७॥
स्त्रियाचें मुखचुंबन ॥ अज्ञानासी सुधापान ॥ ज्ञाता पाहे विषासमान ॥ लाळ थुंका दुर्गंधी ॥७८॥
स्त्रियांचे पयोधर ॥ अज्ञानी स्पर्शतां निवे कर ॥ ज्ञात्यास इंद्रावण साचार ॥ कडुवट वाटे अंतरीं ॥७९॥
स्त्री हृदयीं आलिंगितां ॥ अज्ञान सुखावे चित्ता ॥ ज्ञात्यास तो स्पर्श होतां ॥ मानी जेवीं खदिरांगार ॥८०॥
पिशुन संबंधा दारा कुमर ॥ अज्ञानास आप्त सहोदर ॥ ज्ञाता भावी हे तस्कर ॥ नागवावयास मीनले ॥८१॥
बहुत कुटुंब असतां घरीं ॥ अज्ञान फुगे धन्य संसारीं ॥ ज्ञानी भावी पीडा भारी ॥ जितांचि वाळंबें लागले ॥८२॥
संसार अवघा शाश्वत ॥ अज्ञानासी दिसे यथार्थ ॥ ज्ञाता पाहे नाशवंत ॥ स्वप्नवत् भ्रमणा हे ॥८३॥
अज्ञान करी श्रृंगारनग ॥ ज्ञानी भावी भोरपी सोंग ॥ अज्ञानमग्न पिऊनि भांग ॥ ज्ञानी म्हणे कष्ट वृथा ॥८४॥
अज्ञान करी वनिता आवडीं ॥ ज्ञाता म्हणे पडली बेडी ॥ अज्ञान हर्षे बांधी माडी ॥ ज्ञानी म्हणे कष्ट वृथा ॥८५॥
पोळ्याचा बैल न्यावया पुढें ॥ अज्ञान द्रव्य वेंची वेडें ॥ ज्ञानी म्हणे महामूढें ॥ अहंतेनें नागवला ॥८६॥
होळीचीं बांधावया पोळी ॥ अज्ञानें नागवण भरिली ॥ ज्ञानी म्हणे कर्म बळी ॥ पुरता पाठी लागला ॥८७॥
मृत्तिकेचा शिराळशेट ॥ पुढें न्यावया नागवी फुकट ॥ ज्ञानी म्हणे भोग बळकट ॥ उघड तेही दिसेना ॥८८॥
माझी शिखरीं लागो काठी ॥ अज्ञान डोचकें आपटी ॥ ज्ञानी म्हणे पातकें मोठीं ॥ आत्महत्या रोकडी ॥८९॥
खेळावया सोंगटी ॥ अज्ञान हांव धरी पोटीं ॥ ज्ञानी म्हणे अनर्थ कोटी ॥ व्यर्थ आयुष्य वेंचिलें ॥९०॥
ज्ञानियाचें आत्मसुख ॥ अज्ञानासी विपरीत विख ॥ ज्ञानियाचा महाविवेक ॥ कुतर्क वाटे अज्ञाना ॥९१॥
ज्ञानिया वोढ वैराग्याकडे ॥ अज्ञान वोढी विषयांकडे ॥ ज्ञात्यास त्याग आवडे ॥ अज्ञानासी अभिलाष ॥९२॥
अज्ञाना हरिख चावडीचा ॥ ज्ञानियां हरिख आत्मचर्चेचा ॥ अज्ञाना पुरुषार्थ हिंसेचा ॥ ज्ञाता भितो मुंगीसी ॥९३॥
अज्ञानी चौर्‍यांशी भोगास गाढ ॥ ज्ञाता जन्म मरणांसी भ्याड ॥ अज्ञान वाहे संसारकवाड ॥ ज्ञानी रडे त्या दु:खें ॥९४॥
अज्ञान खेळवी बाळ कोड ॥ ज्ञानी म्हणे लागलें वेड ॥ अज्ञाना वेश्यासंग गोड ॥ ज्ञानियासीं गोड सत्संग ॥९५॥
अज्ञानी जाय अध:पतना ॥ ज्ञानी जाय मोक्षसदना ॥ यापरी दोहींची विवंचना ॥ तूतें राया निरुपिली ॥९६॥
ऐकें राया विवेक ॥ संसार चोर भयानक ॥ त्यातें त्यागितां परलोक ॥ भक्तीचे योगें घडतसे ॥९७॥
जीवाचें नासावया कर्म ॥ मी मनुष्य जाहलों परब्रह्म ॥ शुध्द आचरें वैराग्यनेम ॥ जीवास सुगम करावया ॥९८॥
म्या चोविसापासोन ॥ घेतलें गुरुत्वाचे गुण ॥ जीवांचें सोडवावया बंधन ॥ संन्यासदशा म्यां धरिली ॥९९॥
मी परमात्मा अच्युत ॥ जीवासाठीं जाहलों अवधूत ॥ आपुले कृपेची पेरुनि शक्त ॥ जीवास मुक्त करीतसें ॥१००॥
या जीवाचिया चाडा ॥ मी जगदीश फिरे उघडा ॥ बळकट अविद्येचा खोडा ॥ मजविण न तुटे आणिकां ॥१॥
या जीवाचिया संगें ॥ भक्तिज्ञान वैराग्यें ॥ मी आचरें स्वयें अंगें ॥ जीवास योग्य करावया ॥२॥
मज बंध ना मुक्त ॥ मी परमात्मा अव्यक्त ॥ जीवासाठीं जाहलों भक्त ॥ मुनिवेष धरोनियां ॥३॥
परमेश्वर स्वतंत्र ॥ विश्व म्हणती अनसूयासुत ॥ माझा मीच जाणें सूत्र ॥ सिध्दयांस कळेना ॥४॥
माझी स्वतंत्र गती ॥ नेणें माया कल्पांतीं ॥ मग देवता जीव जाती ॥ काय जाणती मज पुरुषा ॥५॥
तुझिया भाग्याची जरी ॥ मी भेटलों भवगजकेसरी ॥ आतां ऐक बरव्यापरी ॥ गोष्ट सांगों हिताची ॥६॥
मायेपासोनि कर्मभूमीपर्यंत ॥ व्यापूनि असती सकळ दैवत ॥ सिध्द ऋषि साधक समस्त ॥ देवताभजनीं तत्पर ॥७॥
करोनि अभ्यास योगसाधन ॥ आराधिती हरिहरांलागून ॥ मी परब्रह्म निर्वाण ॥ हे नेणती गा साधक ॥८॥
अष्टधा प्रकृतीचा प्रपंच ॥ पिंड ब्रह्मांड रचिलें याच ॥ हा स्वतंत्रचि साच ॥ कार्य कारण असे कीं ॥९॥
माया आणि सकळ देव ॥ यांचा स्वतंत्रचि अनुभव ॥ सामर्थ्यवान असती सर्व ॥ परी परमात्मा न होती ॥११०॥
सकळ जीवांची स्वतंत्र रास ॥ अविद्या लागली यांच्या मूळास ॥ तेणें चौर्‍याशींचा फांस ॥ बैसला माथां बळकट ॥११॥
परमेश्वर जो आपण ॥ सदैव स्वानंदपरिपूर्ण ॥ निरामय निर्गुण ॥ सर्वांत श्रेष्ठ जाणपां ॥१२॥
जीवप्रपंच देवतांसी ॥ परमेश्वर अलिप्त या तिघांसी ॥ म्हणोनि तो अविनाशी ॥ मोक्षदानी बोलिजे ॥१३॥
जीव प्रपंचाभीतरी ॥ देवता व्यापक चराचरीं ॥ जैसें कांदियामाझारी ॥ पदरांत पदर व्यापक ॥१४॥
एक केळीच्या खांबाला ॥ पाहतां पदरानें पदर मोकळा ॥ तैसा देवतांचा मेळा ॥ व्यापक असे जीवांसी ॥१५॥
एक भाकरींत पदर सात ॥ सुगरणी करुनि दावित ॥ किंवा कासार दुकानांत ॥ ताटांत ताटें बहु रची ॥१६॥
अभ्रक एक चिकटला ॥ पदर उकलितां होय मोकळा ॥ अथवा केवडयाच्या कणसाला ॥ फकडींत फकडींत असे कीं ॥१७॥
या दृष्टांता प्रमाण ॥ सर्वत्र देवता असती व्यापून ॥ जीवास संगें घेऊन ॥ वागविती सामर्थ्ये ॥१८॥
पंचभूतें आणि त्रिगुण ॥ एकत्रही होती परी भिन्न ॥ दधि तक्र पय माखण ॥ चाखितां स्वाद वेगळा ॥१९॥
पंच भूतें भिन्न मूळची ॥ प्रपंच भिन्न तैसाची ॥ प्रकृति मनुष्याची ॥ तेही भिन्न असे कीं ॥१२०॥
अनंत देवता अनंत सृष्टी ॥ अनंतयुगीं अनंत राहटी ॥ अनंत अवतार जगजेठी ॥ चरितचर्या वेगळी ॥२१॥
अवतारासारिखे अवतार न होती ॥ हे मूळची असे पध्दती ॥ मत्स्यासारिखी नव्हे कूर्माची रिती ॥ कूर्मासारिखा वराह नोहे ॥२२॥
नारसिंह विक्राळमूर्ती ॥ तेज फांके दशदिशाप्रती ॥ वामन देहलहान आकृती ॥ परी क्रिया भिन्न असे कीं ॥२३॥
परशुरामा ऐसा नव्हे रघुनाथ ॥ रामा ऐसा कृष्ण नव्हे समर्थ ॥ कृष्णा ऐसा बौध्द न होत ॥ बौध्दा ऐसा नव्हे कलंकी ॥२४॥
सूर्यासारिखा चंद्राचा उबारा ॥ चंद्रासारिख्या कैंचा तारा ॥ तारा ऐशा न होती गारा ॥ गारांचें तेज खडयास न ये ॥२५॥
एक ज्ञानी एक मूर्ख ॥ पहा मनुष्यांत कौतुक ॥ एक धनाढय भिकारी एक ॥ एक रोगी एक चांगला ॥२६॥
एक दाता एक भिकारी ॥ एक धनी एक चाकरी करी ॥ एक पुरुष एक नारी ॥ एकाच्या अनेक पाहा मौजा ॥२७॥
द्वैत म्हणतां दिसे अद्वैत ॥ निवाडा करी सद्गुरुनाथ ॥ हें वर्म जाणे तो समर्थ ॥ इतरां अर्थ लक्षेना ॥२८॥
भेदाभेदांचें द्वंद्व ॥ साही शास्त्रां पडिले वाद ॥ अनेक मतांचे फंद ॥ वितंडवाद जल्पती ॥२९॥
असो आतां लोकांचा विचार ॥ प्रस्तुत सांगतों ऐक सादर ॥ माझी आज्ञा कर्णधार ॥ पावती तीर भवाब्धीचें ॥३०॥
संसार दु:खाचें मूळ ॥ विश्रांति न मिळे अळुमाळ ॥ अवधा खैराचा इंगळ ॥ जाळी प्रबळ देहासी ॥३१॥
गोमक्षिका गेली कर्णांत ॥ कणू प्रवेशे नेत्रांत ॥ कंटक मोडतां चरणांत ॥ तळमळ कैसी वाटेना ॥३२॥
ढेंकणाचे बाजेसी ॥ निद्रा न लागे जैसी ॥ जो केला शूळेंसी ॥ गोड क्षीर कैंची त्या ॥३३॥
माथां शूळ पोटीं तिडक ॥ त्यावरी दंश करी वृश्चिक ॥ तत्समयीं पुत्र निमाला देख ॥ मग सुख काय सांगावें ॥३४॥
तैसी संसाराची जाचणूक ॥ भोगितां त्रासती लोक ॥ धन्य राया तुझा विवेक ॥ तापलासी अनुतापें ॥३५॥
भोगी होय त्यागी ॥ तो जाणिजे महायोगी ॥ जो परमार्थी विरागी ॥ संतोष मातें बहु वाटे ॥३६॥
त्यागीं भोग भोगी त्याग ॥ त्यास म्हणावें राजयोग ॥ मुख्य हाचि गा जोग ॥ बैसे पदीं मोक्षाचे ॥३७॥
खेळतां चेंडूफळी ॥ जो जिंकी तो महाबळी ॥ चूके तो घोडी होय तयातळीं ॥ कुरु म्हणे तो तयासी ॥३८॥
जो संसारडावीं अजिंक ॥ तो भोगी अक्षय सुख ॥ चुके तो भोगी जन्ममरणदु:ख ॥ टर घोडी तो जाहला ॥३९॥
चुकवी चौर्‍यांशींचा झोंका ॥ तोचि मर्द गाजे देखा ॥ यालागीं तूं माझा सखा ॥ भाळींची रेखा उघडली ॥१४०॥
यालागीं तूं माझें नाम ॥ घेई हेंचि मुख्य वर्म ॥ दुर्गम तेचि होईल सुगम ॥ भवभ्रम मग कैंचा ॥४१॥
नामप्रतापाची प्रौढी ॥ तोडी संसारदु:खबाधवडी ॥ नाम कळिकाळातें झाडी ॥ उभवी गुढी आनंदाची ॥४२॥
माझें नाम पतितपावन ॥ जपतां तोडी अविद्याबंधन ॥ चार अक्षरीं नाम गहन ॥ तारावया प्रतापी ॥४३॥
माझी नामावळी प्रबळ ॥ ज्याच्या वदनीं करील कल्लोळ ॥ ऐकोनि पळे कळिकाळ ॥ भूतबाधा बाधीना ॥४४॥
माझें नाम स्मरतां ॥ विघ्न न करिती स्वर्गदेवता ॥ हरिहर आणि विधाता ॥ ते मद्भक्ता सन्मानिती पैं ॥४५॥
माझिया भक्तीची थोरी ॥ वाखाणिती देव चारी ॥ मुखें गाय शिव गौरी ॥ ध्यान घरीं क्षीराब्धी ॥४६॥
माझें करितां नाम ध्यान ॥ जीवाचें चुके भवबंधन ॥ शेखीं कैवल्यपद संपूर्ण ॥ अर्पीन त्यातें अक्षयीं ॥४७॥
मजप्राप्तीकारण ॥ विषयभोग मानी वमन ॥ ऐसी विरक्ति धरीं मन ॥ तैं मी संपूर्ण आतुडें ॥४८॥
अव्हेरुनि मज श्रीदत्ता ॥ शरण जाई इतर देवता ॥ मग मोक्षाची वार्ता ॥ स्वप्नीं नातुडें जीवासी ॥४९॥
राया तूं भाग्याचा पूर्ण ॥ माझें लाधलासि दर्शन ॥ आतां ममाज्ञा धरोनि प्रमाण ॥ करीं आचरण भक्तीचें ॥१५०॥
तुझें देखोदेखींजन ॥ राहाटती सद्भाव धरुन ॥ त्यांसी हें ज्ञान उपदेशून ॥ सद्भक्ति दाखवावी ॥५१॥
तुझा पापपुण्यशैल ॥ माझें नाम प्रवेशतां जळेल ॥ दग्ध होय कर्पूरातुल्य ॥ रक्षा नुरे दावावया ॥५२॥
दत्तमुखींची अक्षरें ॥ यदूनें घेतलीं कर्णविवरें ॥ हृदयीं संशयतम निवारे ॥ गेलें बाकी घेऊनी ॥५३॥
यदूचा विरक्तिहुताशन ॥ वरी दत्तउपदेश घृत पडोन ॥ धडकलें ज्ञान प्रदीप्त होऊन ॥ कर्मकाष्ठें दग्ध जाहलीं ॥५४॥
यदूचें भाग्य अद्भुत ॥ लाधला श्रीगुरुदत्त ॥ ठेविला कृपेचा हस्त ॥ येरु सर्वांगीं निवाला ॥५५॥
मग घालूनि दंडवत ॥ त्रिवार प्रदक्षिणा करीत ॥ नमस्कारुन अनसूयासुत ॥ आज्ञा प्रसाद वंदिला ॥५६॥
होतां दत्ताचा बोध ॥ यदूस जाहला स्वानंद ॥ उतरला राज्यपदाचा मद ॥ निर्द्वंद्व वर्तो लागला ॥५७॥
मी क्षत्रिय श्रीमंत राजा ॥ माझें वैभव माझीं प्रजा ॥ हें विसरला यदुराजा ॥ करी मौज परमार्थी ॥५८॥
विसरला राज्याची खटपट ॥ त्यागोनि कारभार झट ॥ मानी संसाराचा वीट ॥ होय नीट हरिभजनीं ॥५९॥
तोडोनि ममतेची बेडी ॥ उभविली परमार्थाची गुढी ॥ केली मोक्षसुखाची जोडी ॥ गेली परवडी जन्माची ॥१६०॥
ऐसा प्रताप दत्तात्रेयाचा ॥ म्हणोनि जगद्गुरु साचा ॥ ज्याचेन दर्शनें जीवाचा ॥ होय उध्दार तत्काळ ॥६१॥
हंस अवतार जाहला ॥ पुर त्यागोनि निजधामा गेला ॥ दत्तात्रेय राहिला ॥ द्वापरकली सरेतों ॥६२॥
माहोरगडीं केली वस्ती ॥ कोल्हापुरीं भिक्षा करिती ॥ माध्यान्हीं पांचाळेश्वरा येती ॥ निद्रेलागीं गंगातटीं ॥६३॥
गुप्त प्रगट दर्शंन ॥ अद्यापि देती दीनालागून ॥ आणिक त्याचें आख्यान ॥ परिसें द्विजा सांगतों ॥६४॥
महायोगी सिध्द गोरखी ॥ अवध्यांसि तृणप्राय लेखी ॥ मानी ईश्वर आपण कीं ॥ सत्ता मिरवी विश्वांत ॥६५॥
त्याचें सामर्थ्याचें बळ ॥ धाकती देव दानव सकळ ॥ आयुष्य जिंकिलें मर्यादे आगळ ॥ वज्रदेही तो जाहला ॥६६॥
तत्काळ दावी चमत्कार ॥ लोक मानिती ईश्वर ॥ तामस योनी निशाचर ॥ तेही भजती तयासी ॥६७॥
झोळी पाठवी लंकेंत ॥ मंदोदरी भिक्षा वाढित ॥ प्रतिदिनीं आणवित ॥ सत्ताबळें आपुल्या ॥६८॥
एके दिवशीं अकस्मात ॥ बैसला श्रीदत्त समर्थ ॥ आयागमनी गगनांत ॥ झोळी जातां देखिली ॥६९॥
झुगारुनि पादुकेसी ॥ तळीं पाडोनि झोळिसी ॥ तूं कवणाची कोठें जातेसी ॥ सांग आम्हांसी यथार्थ ॥१७०॥
झोळी म्ह्णे परिसा स्वामी ॥ नाथ गोरखी तयाची मी ॥ भिक्षेसाठीं लंकाग्रामीं ॥ प्रतिदिनीं जातसें ॥७१॥
दत्त म्हणे बहुत बरवें ॥ माझें पात्र संगें न्यावें ॥ इतुकें भरोनि आणावें ॥ भिक्षान्न आमुचें ॥७२॥
यावरी झोळी पात्र दोनीं ॥ जाऊनी प्रवेशलीं लंकाभुवनीं ॥ मंदोदरी भिक्षान्न घेऊनी ॥ झोळींत आधीं घातलें ॥७३॥
मग पात्रांत अन्न ॥ न भरे घालितां सहस्त्रगुण ॥ लक्षखंडय़ांचें पक्वान्न ॥ घालितां पात्र भरेना ॥७४॥
मग चमत्कारिली दशमुखजाया ॥ म्हणे हे ईश्वराची माया ॥ झोळी परीस पात्रठायां ॥ सत्व दिसे आगळें ॥७५॥
स्नान करोनि शुध्द जळें ॥ नूतन पाक निर्मिले ॥ पात्रीं भरतां करकमळें ॥ स्वल्पांत जाहली पूर्णता ॥७६॥
उभयतां उडोनि खेंचरगती ॥ पात्र आलें दत्ताहातीं ॥ झोळी गेली गोरखीप्रती ॥ पाहोनि नाथ क्षोभला ॥७७॥
गोरखें चावोनि अधर ॥ म्हणे कां लाविला उशीर ॥ क्षुधानळें पेटलें जठर ॥ कोणे गुंता तुज केला ॥७८॥
झोळी म्हणे ताता मार्गी ॥ अकस्मात भेटला योगी ॥ पादुका झुगारोनि मजलागीं ॥ सत्ताबळें पाडिलें ॥७९॥
वृत्तांत पुशिला मातें ॥ यथार्थ निवेदला त्यातें ॥ पात्रा धाडिलें सांगातें ॥ आणावया भिक्षेला ॥१८०॥
भिक्षा घेवोनि मंदोदरी ॥ आधीं मातें वाढी करीं ॥ मग पात्रीं अन्न भरी ॥ तंव पूर्ण होईना ॥८१॥
यावरी नूतन निर्मिले अन्न ॥ पात्रीं घालितां जाहलें पूर्ण ॥ तें गेले अवधूतालागून ॥ मी आलें तुम्हापासी ॥८२॥
परिसोनि झोळीचा वृत्तांत ॥ क्रोधें भरला गोरक्षनाथ ॥ म्हणे दावी तो अवधूत ॥ जेणें तुजसी शापिलें ॥८३॥
बोलोनियां मत्स्येंद्रकुमर ॥ हातीं घेऊनियां चक्र ॥ जेथें होता अत्रिपुत्र ॥ तया निकट पातला ॥८४॥
गोरख म्हणे श्रीदत्ता ॥ कोणती आराधिली देवता ॥ जिच्या सामर्थ्यें योग्यता ॥ विश्वामाजी मिरविसी ॥८५॥
दत्त म्हणे मी नेण ॥ जप तप अनुष्ठान ॥ देवतेचें आराधन ॥  नाहीं केलें स्वप्नांत ॥८६॥
त्वां कोणती साधिली कळा ॥ ती प्रसंगीं सांग मजला ॥ कोणत्या साधनें सिध्द जाहला ॥ जप योग गुरुकृपा ॥८७॥
गोरख म्हणे तूं अर्भक ॥ नेणसी माझा विवेक ॥ मी त्रैलोक्यनाथ गोरख ॥ रचीं पाळीं संहारीं ॥८८॥
सिध्दांमाजी मुगुटमणी ॥ योगी ध्याती मजलागूनी ॥ सकळ साधनें मजपासोनी ॥ प्रगट जाहलीं विश्वांत ॥८९॥
मी अजिंक कळिकाळा ॥ वज्रदेही आथिला ॥ माझी गुप्त प्रगट कळा ॥ नेणती हरिहर ब्रह्मादि ॥१९०॥
तूं योगी म्हणविसी ॥ साहें माझीया चक्रासी ॥ तूंही प्रेरी आम्हांसी ॥ अनुमान येथें कायसें ॥९१॥
दत्तें चक्र प्रेरिलें ॥ गोरक्षअंगीं आदळलें ॥ लोहस्तंभीं पुष्प लागलें ॥ कीं पाषाणीं थेंबुटा ॥९२॥
तृणें हनुमंतासी भोकी ॥ गजासी बळें मारिती बुकी ॥ तयापरी गोरखी ॥ चक्र मानी दत्ताचें ॥९३॥
म्हणे भला रे भला ॥ वज्रदेही तूं देखिला ॥ माझा चक्रवेग वायां गेला ॥ रोम एक न भेदितां ॥९४॥
तूंही न करीं अनुमान ॥ चक्र प्रेरीं मजलागून ॥ बोलतां दत्तमुखें करुन ॥ गोरखानें चक्र टाकिलें ॥९५॥
दीपाची ज्योति तोडूं जातां ॥ शस्त्र रिघोनि जाय रितां ॥ कीं वायूसी बाणें भेदितां ॥ अनिळ कांहीं दुखवेना ॥९६॥
जैसें निश्चळ अक्षयी नभ ॥ तैसा उभा दत्त स्वयंभ ॥ तेथें गोरखचक्राचा क्षोभ ॥ वायुन्यायें विचरला ॥९७॥
कौतुक पाहोनियां नाथ ॥ विस्मयो करी चित्तांत ॥ म्हणे हे कळा अद्भुत ॥ नाहीं कोठें देखिली ॥९८॥
जाहला चक्राचा पुरुषार्थ ॥ गोरख म्हणे मी होतों गुप्त ॥ त्वां शोधूनियां त्वरित ॥ विद्याबळें काढावें ॥९९॥
काया पालटोनि गोरखी ॥ जाहला सूक्ष्म मंडूकी ॥ जळा पोटीं रिघोनि मस्तकीं ॥ शेवाळें वेष्टून आच्छादिला ॥२००॥
श्रीदत्त जाहला विरोळा ॥ जळामाजी प्रवेशला ॥ गोरखी धरोनि दाढेला ॥ काढी तोंडा आंतुनीं ॥१॥
काया पालटोनि दोघे ॥ मनुष्यरुपें राहिले उभे ॥ गोरखी म्हणे तुझा गर्भ ॥ मातें दावीं अवधूता ॥२॥
दत्त म्हणे मी होतों गुप्त ॥ शोधून काढीं तूं त्वरित ॥ तूं सिध्दीचा पुरुषार्थ ॥ आजि दावीं आमुतें ॥३॥
पंचभूतें पांचांठायीं ॥ सहज मीनलीं एके दायीं ॥ अव्यक्त आत्मा तोही ॥ जेथचा तेथें संचला ॥४॥
गोरखी पाहे चहूंकडे ॥ सामर्थ्य वेचितां नातुडे ॥ शोध करितां जाहलें वेडें ॥ कोठें थांग लागेना ॥५॥
वायु आकाश मेदिनी ॥ पाताळ अग्नि शोधिलें पाणी ॥ विद्यागमनें आयागमनीं ॥ पोकळ अंतराळ पाहिलें ॥६॥
कैलास वैकुंठ स्वर्गांत ॥ शैलशिखरीं विवरांत ॥ ग्रहमंडळें भूलोकांत ॥ ऋषिआश्रम शोधिले ॥७॥
मुद्रा लावोनि पाहे जगतींत ॥ तेथें नसे श्रीदत्त ॥ मग श्रमी होऊनि नाथ ॥ अहंभाव विराला ॥८॥
स्वस्थानीं करी ध्यान ॥ दावीं पुरुष आतां दर्शन ॥ करुणा भाकितां वचन ॥ दत्त पुढें देखिला ॥९॥
उभयतां जोडूनि पाणी ॥ मस्तक खालाविला चरणीं ॥ कोण पुरुषा तूं मेदिनीं ॥ विचरसी तें सांग पां ॥२१०॥
जन्मलासि कोणे मायचे पोटीं कोणापासी जे साधिली हे कसोटी ॥ तूं लपलासि कोणें देठीं ॥ तें स्थान दाखवीं ॥११॥
कोण गुरु कोण शिष्य ॥ कोठें साधिला योगाभ्यास ॥ अगम्य तुझें मानस ॥ तर्कूं जातां नातुडे ॥१२॥
ऐक नाथा म्हणे दत्त ॥ मी अतर्क्य श्रीअनंत ॥ नव्हे त्रिगुण पंचभूत ॥ माझी गति मी जाणें ॥१३॥
मी अगम्य वेदशास्त्रांसी ॥ मी कोण हें नेणती महर्षी ॥ माझ्या जाणवया स्वरुपासी ॥ मुख्य मायेसी कळेना ॥१४॥
सकळ गुरुत्वें मजपासोन ॥ मी कोणासी जाऊं शरण ॥ जीवाचें करावया मोचन ॥ मजविण दुजा नसे कीं ॥१५॥
तूं कोण गा गोरख ॥ तें मज दावीं पारख ॥ कैसा भोगिसी आत्मसुख ॥ मुक्तदशा कोणती ॥१६॥
गोरख म्हणे मग निर्भये ॥ मुळींचाचि ब्रह्म आहे ॥ यालागीं अमरदेहें ॥ नाश नसे कल्पांतीं ॥१७॥
दत्त म्हणे तूं ब्रह्म ॥ आपुल्या मुखें बोलसी सुगम ॥ तरी पुसेन एक वर्म ॥ दाखवीं खुण मुळींची ॥१८॥
जेव्हां होतें निराकार ॥ एकवट ब्रह्मचि साचार ॥ तेव्हां मायेचा विस्तार ॥ कैसा जाहला सांगपां ॥१९॥
हे माया कशाची केली ॥ किंवा ब्रह्मस्वरुपीं जाहली ॥ इच्या उत्पत्तीची किल्ली ॥ यथार्थ वदे गोरखी ॥२२०॥
गोरखी म्हणे दत्तात्रेया ॥ जैसी आपुले अंगीं छाया ॥ तैसी स्वरुपीं दिसे माया ॥ नसती भासे मृषावत ॥२१॥
दीपकळिकेची काजळी ॥ तैसी ब्रह्मीं माया जन्मली ॥ किंवा गगनाची पोकळी ॥ गंधर्वनगरी उभारिली ॥२२॥
अग्निकाष्ठें एकत्र करितां ॥ मध्यें धूम्र निघे अवचितां ॥ तैसी माया ब्रह्मघटनतां ॥ आकार धूम्र विस्तरला ॥२३॥
ब्रह्मस्वरुप तें वन्ही ॥ काष्ठवत् माया कल्पोनी ॥ तृतीय धूम्र निघे आंतुनी ॥ तो प्रपंच बोलिजे ॥२४॥
दत्त म्हणे गोरखीला ॥ त्वां अनुभव विशेष कथिला ॥ तरी पुसतों एक तुजला ॥ मुळीं द्वैत कीं अद्वैत ॥२५॥
गोरख म्हणे ब्रह्म अद्वैत ॥ तयासी साक्षी वेदांत ॥ स्वरुप निरामय अव्यक्त ॥ द्वैत त्यातें साहीना ॥२६॥
ऐकें नाथा म्हणे दत्त ॥ ब्रह्म सांगती अद्वैत ॥ तेथें माया छायावत ॥ कोण्या अर्थे स्थापिली ॥२७॥
भानूचिया बिंबातळीं ॥ रात्र चालेल असोनि जवळी ॥ तरी ब्रह्ममायेची साउली ॥ कल्पूं तुमचिया वाक्यानें ॥२८॥
गगनीं चालणें भानूस ॥ मनुष्यावरी उष्ण प्रकाश ॥ अंगाचिया कवडशास ॥ छाया उमटे आपैसी ॥२९॥
तैसा ब्रह्म मनुष्यवत ॥ दुजा सूर्य वर चालत ॥ तो प्रकाश ब्रह्मावर पडत ॥ माया छायावत् उमटे तळीं ॥२३०॥
ब्रह्मीं दुजेपण नाहीं ॥ तेथें छाया उमटेल कायी ॥ याचि अनुभवें देही ॥ सायुज्यता लाधले ॥३१॥
एक टवळें दुजी वात ॥ स्नेह चौथी ज्योत ॥ पांचवी काजळी निपजत ॥ दीप त्यातें म्हणताती ॥३२॥
तैसें ब्रह्मीं टवळें स्नेह वात ॥ चौथी कशाची लागली ज्योत ॥ मग माया काजळवत ॥ प्रगटली म्हणों यथार्थ ॥३३॥
काष्ठाचिया संगात ॥ सूक्ष्म वन्हि होय बहुत ॥ ब्रह्म काय काष्ठवत ॥ मायासंगें विस्तारे ॥३४॥
पुढें धूम्रवत् प्रपंच ॥ हें तुमचें ज्ञान साच ॥ तेव्हां ओझें जन्ममरणाचें ॥ परब्रह्में घेतलें ॥३५॥
गोरख म्हणे दत्तस्वामी ॥ यथातथ्य वदा तुम्हीं ॥ पुढें संशयाची उर्मी ॥ नुरे ऐसें निवेदा ॥३६॥
श्रीदत्त करी विचार ॥ गोरखी देवतेचा अवतार ॥ यास ब्रह्मविद्या साचार ॥ प्रेरितां उगवेना ॥३७॥
मग अवधूतगीता उपदेश ॥ निरुपिला जीवशिवसमरस ॥ तेणें गोरखीचें मानस ॥ उल्लासलें बहुसाल ॥३८॥
गोरखें करुनियां नमन ॥ आज्ञा घेऊनि केलें गमन ॥ श्रीदत्तात्रेय तेथोन ॥ सह्याद्रीसी पातला ॥३९॥
द्वापार जाऊन कलि सरत ॥ तंववर राहिला दयावंत ॥ जीव उध्दारावे हा हेत ॥ करुणाकर अपार ॥२४०॥
शंकराचार्या देऊनि भेटी ॥ निवेदिली आत्मज्ञानकसोटी ॥ तोही देवतेचा अवतार देखोनि दृष्टी ॥ ब्रह्मविद्यादानार्थ ॥४१॥
देवतेस मोक्ष नाहीं ॥ यालागीं गुह्य ठेविलें पाहीं जीवचि अधिकारी निश्चयीं ॥ परमेश्वरप्राप्तीचा ॥४२॥
शंकराचार्यापासीं ॥ होते दशनाम संन्यासी ॥ ते शरण आले दत्तासी ॥ कीं निजवाक्य निरुपा ॥४३॥
श्रीदत्त पाहे दशनामासी ॥ अहंकारी निष्ठुर तामसी ॥ काम क्रोध मद मत्सर मानसीं ॥ हृदयीं थारा होईना ॥४४॥
यांसी ब्रह्मविद्या निरुपितां ॥ हे न राहती धरोनि नम्रता ॥ मग जाहला संन्यास स्थापिता ॥ जीव ब्रह्म नमोनि ॥४५॥
ब्रह्मविद्या निरुपण ॥ तें अतर्क्य अद्भुत ज्ञान ॥ जीवाच्या अधिकारावांचोन ॥ प्रेरु नये भलत्यासी ॥४६॥
हें दत्तात्रेय आख्यान ॥ निरुपिलें द्विजालागून ॥ त्रेतायुगापासोन ॥ करी उध्दार जीवांचा ॥४७॥
रामअवतारापासोन ॥ रामनाम उच्चारिती जन ॥ जोहार शब्द पुरातन ॥ त्यास कोणी पुसेना ॥४८॥
जोहार शब्द लोपला ॥ तो श्वपच्यांमुखीं राहिला ॥ राम विश्वीं विस्तारला ॥ फेर पडला सहजची ॥४९॥
कृतयुगीं मायेची सत्ता ॥ त्रेतायुगीं हरिहरांची सत्ता ॥ द्वापारीं इंद्रादिकांची सत्ता ॥ कलियुगीं सत्ता यक्षिणीची ॥२५०॥
कृतयुगांत नाना भक्त ॥ करिती हंस अवतारा विरहित ॥ तो भाग वांटा माया घेत ॥ सत्ता तिची प्रबळ ॥५१॥
त्रेतायुगांत द्विजवर्या ॥ सांडोनि श्रीदत्तात्रेया ॥ अनेक भक्ति आचरलिया ॥ त्याचे भोक्ते हरिहर ॥५२॥
द्वापारीं श्रीकृष्णाविना भजन ॥ करितां अनेक देवतापूजन ॥ तें पावे इंद्रादिकालागोन ॥ त्यांची सत्ता त्यायुगीं ॥५३॥
या कलियुगीं मजवांचून ॥ पूजती अनेक देव नित्यान ॥ यांसी साह्य यक्षीण ॥ सत्ता तिची कलींत ॥५४॥
यापरी परमपुरुष ॥ विप्रास केला उपदेश ॥ परिसतां श्रोतयांचें मानस ॥ तेंही पावे स्वानंदें ॥५५॥
संसारपाणी पय परमार्थ ॥ उभयतां जाहले मिश्रित ॥ श्रोते राजहंस तेथ ॥ ज्ञान चंचूनें निवडिती ॥५६॥
अहिमस्तकीं निपजे मणी ॥ तैसी प्राकृत परमार्थ खाणी ॥ प्रगटली भाविकांलागोनि ॥ सिध्दांतबोधीं उघड ॥५७॥
तुटे अनेक मतांचा झगडा ॥ होय परमार्थ रोकडा ॥ शहामुनीचा चाडा ॥ साह्य जाहला सद्गुरु ॥२५८॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्त्वसारनिर्णये अष्टविंशतितमो ध्याय: ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP