श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २९ वा
‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.
श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
अभिमान लागला सर्वांसी ॥ प्रपंच अथवा परमार्थासी ॥ कार्यकारण कर्तृत्वासी ॥ अभिमान सोडीना ॥१॥
अभिमाने संसारास त्यागिती ॥ भस्म लावोनी जोगी होती ॥ कडकडत वैराग्य करिती ॥ अभिमानें करोनि ॥२॥
अभिमानें करोनि योग ॥ नाना मंत्राचे प्रयोग ॥ विहंगमपिपीलिकामार्ग ॥ अभिमानें शोधिती ॥३॥
शास्त्राभ्यास हा अभिमान ॥ वेदार्थ घोकिती हा अभिमान ॥ मी पुराणीक हा अभिमान ॥ अभिमानें मी पंडित ॥४॥
मी जोशी मी भट्ट ॥ मी वैदिक वैद्य श्रेष्ठ ॥ मी देव ऋषि स्पष्ट ॥ मी पंचाक्षरी अभिमान ॥५॥
मी ज्ञानी सिध्द साधु ॥ माझा अगाध पैं बोधु ॥ मी स्वत: सिध्द अभेदु ॥ उठे द्वंद्वु अभिमानें ॥६॥
अभिमानें अध्यात्मचर्चा ॥ अभिमानें निश्चयो भक्तीचा ॥ अभिमानें प्रपंचाचा ॥ खटला चाले सर्वही ॥७॥
ग्रंथ वाचणें हा अभिमान ॥ अर्थ सांगणें अभिमान ॥ ऐकावें हा अभिमान ॥ विद्याभिमान सहजची ॥८॥
कथा करावी हा अभिमान ॥ बहुगायक हा अभिमान ॥ महोत्साह करणें हा अभिमान ॥ धर्म अभियान अनायासें ॥९॥
अभिमानें शाहीर होती ॥ अभिमानें शाबरीविद्या शिकती ॥ महाकवि ग्रंथ करिती ॥ अभिमानें सहजची ॥१०॥
अभिमानें ऋषि संवादलें ॥ अभिमानें अनुष्ठान केलें ॥ अभिमानें तीर्थासी गेले ॥ व्रत करणें हा अभिमान ॥११॥
अभिमानें यज्ञ करणें नाना कर्मे आचरणें ॥ स्नान संध्या देवतार्चनें ॥ माझी यात हा अभिमान कीं ॥१२॥
अभिमानें ऋषि शापिती ॥ अभिमाने आशीर्वाद देती ॥ अभिमानें बध्द होती ॥ घडे मुक्ति अभिमानें ॥१३॥
अभिमानें नरकीं बुडे ॥ अभिमानें स्वर्गसुख जोडे ॥ अभिमानें यमदंड घडे ॥ घाली अवघडे चौर्यांशीं ॥१४॥
अभिमानें रावणें बांदवडी ॥ देव घातले तेहतीस कोटी ॥ अभिमानें राम झोडी ॥ राक्षसांतें निर्दाळिलें ॥१५॥
अभिमानें प्रर्हाद भक्ति करी ॥ अभिमानें स्तंभीं प्रगटे हरी ॥ हिरण्यकशिपू विदारी ॥ अभिमानें बिरुद वागवितसें ॥१६॥
अभिमानें इंद्र भगेंद्र ॥ अभिमानें क्षयरोगी चंद्र ॥ अभिमानेंचि खगेंद्र ॥ कपीनें वदनीं ताडिला ॥१७॥
अगस्ति समुद्रा करी क्षार ॥ कपिलें भस्म केले सगर ॥ भगीरथें गंगानीर ॥ अभिमानें आणिलें ॥१८॥
मी ब्रह्मचारी हा अभिमान ॥ मी संन्यासी हा अभिमान ॥ मी राजा हा अभिमान ॥ मी सेवक सखा सोयरा ॥१९॥
अभिमानें ब्रह्मा सृष्टि कर्ता ॥ अभिमानें विष्णु प्रतिपाळिता ॥ अभिमानें शंकर संहारिता ॥ प्रळयकर्ता विश्वाचा ॥२०॥
मुख्यस्वरुप जो निर्गुण ॥ तेथें ब्रह्मीं होय स्फुरण ॥ सृष्टि तेव्हां होय निर्माण ॥ यालागीं अभिमान सर्वांसी ॥२१॥
जरी स्वरुपीं अभिमान नसता ॥ तरी सृष्टि निर्माण कोण करिता ॥ या ब्रह्मांडाची कथा ॥ कोण सांगता कोणापासीं ॥२२॥
अभिमानें दहा अवतार जाहले ॥ गीता भागवत उपदेशिले ॥ अनेक ग्रंथ वाढले ॥ खटपट करिती षट्शास्त्रें ॥२३॥
अभिमान घेतला सद्गुरुनें ॥ शिष्यांची तोडावया भवबंधनें ॥ स्वरुपींच धारणा धरणें ॥ अभिमानाविण चालेना ॥२४॥
निराभिमानी अभिमान ॥ अभिमानांत निरभिमान ॥ हे सज्जन जाणती खूण ॥ ज्यासी होय गुरुकृपा ॥२५॥
शब्दागणित अभिमान ॥ सहज येतो मुखेंकरुन ॥ यालागीं कवि जाणोन ॥ वाचे अभिमान आणील ॥२६॥
कां जैसें बीज तैसीं फळें ॥ गोड आंबट कडुवळें ॥ तद्वत् स्वरुपीं अभिमान लागले ॥ तोचि अंकुर विश्वांत ॥२७॥
यालागीं बोलिलों जें कांहीं ॥ ते मुळींचीच कळा पाहीं ॥ म्हणोन श्रोते तुम्हीही ॥ क्षमा करा आमुतें ॥२८॥
घेऊनि संतकृपेची जोडी ॥ रचली ग्रंथाची परवडी ॥ पुढें अनुभवाची गोडी ॥ रह्स्य परिसा सादर ॥२९॥
द्विज म्हणे जगदेकराया ॥ परिसीली रामअवतारचर्या ॥ त्रेतायुगींही संपलिया ॥ पुढें द्वापार उद्भवलें ॥३०॥
त्या द्वापाराच्या अंतीं ॥ एकचि कृष्ण चक्रवर्ती ॥ अवतार प्रगटला विख्यातकीर्ती ॥ लीलानाटकी विचित्र ॥३१॥
तो दश अवतारांमाजी अस ॥ किंवा वेगळाचि परमपुरुष ॥ हा गुह्यार्थ शरणागतास ॥ निश्चितार्थ सांगाजी ॥३२॥
देव म्हणे बहुत बरवें ॥ पुसिलें तें यथार्थ परिसावें ॥ कृष्णअवतार मम ठावे ॥ निर्णय त्याचा दाखवूं ॥३३॥
द्वापारीं दैत्यांचा अंश ॥ धरोनि मानवांचा वेष ॥ राजे होऊनि कर्कश ॥ त्रास देती जगातें ॥३४॥
ऋषि मुनि महातापसी ॥ त्यातें उपदेशिती पापराशी ॥ वेद शास्त्र पुराणांसी ॥ अमान्य करिती दुरात्मे ॥३५॥
अविवेकी क्रियानष्ट ॥ कर्महीन स्वधर्मभ्रष्ट ॥ हिंसाचारी परम नष्ट ॥ अरिष्ट सृष्टीवरी मांडिलें ॥३६॥
असुरअपराधांचा जाच ॥ दु:खें वसुधेनें घेतला कांच ॥ मग धेनूचें स्वरुप साच ॥ शरण गेली विधातया ॥३७॥
असुरकर्माची राहाटी ॥ सुचविली विधीचे कर्मपुटीं ॥ धात्रें मान्य करुन गोष्टी ॥ वसुधा धाडिली स्वस्थाना ॥३८॥
ध्यानीं बैसोनि कमळोद्भव ॥ हृदयीं आराधी देवाधिदेव ॥ सृष्टीमाजी गांजिले जीव ॥ त्यासी संरक्षीं दयाळा ॥३९॥
ध्यानीं लक्षितां चतुर्वदनीं ॥ अंतरिक्ष वदली अशरीरवाणी ॥ विश्वचिंता पद्मयोनी ॥ स्वस्थ करील जगदात्मा ॥४०॥
जो करुणघन दीनोध्दार ॥ परात्पर परमेश्वर ॥ ते घेऊनि स्वयें अवतार ॥ प्रगट होईल विश्वांत ॥४१॥
माया जगदीश आणि विष्णू ॥ तिघेही धरितील एक तनू ॥ दैत्य दुष्टांचे दमनू ॥ कल्याण करितील जगातें ॥४२॥
परिसोनि आकाशवाणी ॥ चतुरानन संतोषला मनीं ॥ पुढे वर्तली जे करणी ॥ ते आकर्णी द्विजोत्तमा ॥४३॥
सप्तपुरीमाझारी ॥ मथुरा नामें श्रेष्ठपुरी ॥ तेथें उग्रसेन राजा राज्य करी ॥ त्याची कथा तूं परिसें ॥४४॥
त्यासी जाहली एक कन्यका ॥ देवकी नामें लावण्यलतिका ॥ प्रकाशतेजें रविदीपिका ॥ उदय पावली वंशांत ॥४५॥
सांगों सविस्तर तें कथन ॥ भागवतीं कथिलें शुकमुनीन ॥ दशमस्कंधीं विस्तारुन ॥ कृष्णचरित्र वर्णिती ॥४६॥
उदयापासोनि अस्तपर्यंत ॥ अवतार लीला दिन सप्त ॥ मुखें वदला व्याससुत ॥ परीक्षिती रायासी ॥४७॥
तो विस्तारजगांत ॥ प्रगट गाती पुराणीं प्राकृत ॥ यालागीं मुख्य अर्थ ॥ तात्पर्यार्थ सांगतों ॥४८॥
माया जाहली कृष्णतनू ॥ आंत अभिमान तो श्रीविष्णू ॥ आत्मकळा जगजीवनू ॥ बिंबवत् प्रकाशला ॥४९॥
माया विष्णुस्वरुप निर्गुण ॥ त्रयमूर्तीचा एक कृष्ण ॥ देवकी उदरीं गर्भ संभवोन ॥ जगदीशज्योती प्रकाशली ॥५०॥
नाना विलास कौतुक नट ॥ खेळु खेळला गुप्त प्रगट ॥ हें मायेचे कृत्य स्पष्ट ॥ जगदीश चेष्टा ते नव्हे ॥५१॥
जन्मतांचि मायात्याग ॥ परगृहीं वाढला श्रीरंग ॥ गोरस चोरिलें गौळणी भोग ॥ जगदीश सोंग तें नव्हे ॥५२॥
बहु थोर लहान होणें ॥ गोवर्धनगिरि तर्जनीं धरणें ॥ सुरेंद्रासी अपमानणें ॥ हे विंदान मायेचें ॥५३॥
वत्सें गोपाळ आपण जाहला ॥ वेदवक्ता ब्रह्मा ठकविला ॥ हें विश्वरुप दाविलें यशोदेला ॥ हे लीला मायेची ॥५४॥
चेंडुफळी काळिया नाथणें ॥ कदंबशाखे वस्त्रें हरणें ॥ गोपी जळीं नग्न पाहणें ॥ हें विंदान मायेचें ॥५५॥
रासक्रीडा राधाविलास ॥ गोपीगृहीं बहुविध प्रवेश ॥ गोपाळां संगें चोरुन दुग्धास ॥ हे विलास मायेचे ॥५६॥
हास्य विनोद टवाळी ॥ बालक्रीडा चेष्टा केली ॥ काठी कांबळी वाजवी मुरली ॥ हे तों उकळी मायेची ॥५७॥
कालयवनाभेणें पळाला ॥ मथुरा त्यजोनि द्वारके गेला ॥ पर्णी अष्टनायिकांला ॥ हेही कळा मायेची ॥५८॥
सोळा सहस्त्र अंगना ॥ वेष्टोनि मिरविती दिव्य ललना ॥ बहु पुत्र नातु सुना ॥ हे तों रचना मायेची ॥५९॥
जितुक्या वनिता तितुके कृष्ण ॥ भोगूनि कामना करी पूर्ण ॥ नारदाची नारदी होणें ॥ हे तों खूण मायेची ॥६०॥
द्रौपदी आणितां सभेसी ॥ असंख्य नेसवी वस्त्रांसी ॥ दुर्वासें छळितां माध्यान्हेसी ॥ तृप्त केला गंगातटीं ॥६१॥
इतुकीम आचरला कर्म ॥ होय मायाकृत वर्म ॥ मुख्य जो पुरुषोत्तम ॥ त्याचे धर्म नव्हेत हे ॥६२॥
परमेश्वर तो सत्यवादी ॥ तो कैसा वर्तेल कपटसंबंधीं ॥ नाना भोग विषयसंबंधीं ॥ ब्रह्मानंदी घडेना ॥६३॥
कृष्ण चरित्र तें माया ॥ तुज निरुपिली द्विजवर्या ॥ आतां विष्णुची चर्या ॥ ते गुणवर्या आकर्णी ॥६४॥
पूतनाशोषण कंसमर्दन ॥ कागासूर बकासुर चिरणें ॥ तृणासुर वत्सासुर ॥ हनन हे विष्णुगुण परिसावे ॥६५॥
रिठासुर रगडिला दाढें ॥ शकटासुराचीं मोडिली हाडें ॥ वसुदेवदेवकीचें सांकडें ॥ फेडिलें कोडें बंदीचें ॥६६॥
सत्रा वेळ जरासंध ॥ पिटोनि लावी गोविंद ॥ करी दुष्टांचा द्वंद्व ॥ हा विनोद विष्णूचा ॥६७॥
महाप्रतापें असुरबळी ॥ दैत्यांवर जीवब्रह्मयांसी भिन्नत्व ॥ एक ब्रह्म म्हणती ते नेणती अर्थ ॥ चुकती पंथ मुळींचा ॥६८॥
जीव भोगी जन्ममरणांसी ॥ परमात्मा तो अविनाशी ॥ या दोहींच्या ऐक्यासी ॥ करितां कदा घडेना ॥६९॥
यापरी अद्वैत स्थापून ॥ सिध्दांत केला न्यायशास्त्रानें ॥ आतां योगशास्त्रांचें बोलणें ॥ तेंही परिसें पवित्रा ॥७०॥
नाना साधनें मुद्रा कळा ॥ योगशास्त्रीं सांगितल्या समूळा ॥ चौर्यांशीं आसनें प्रणावला ॥ लयलक्षीं ॥७१॥
अनेक तपांचीं साधनें ॥ ध्यान धारणा अनुसंधानें ॥ भक्ति उपासना अनुष्ठानें ॥ विवेक वैराग्य अनुभव ॥७२॥
करावें तीर्थव्रतासी ॥ धरावें शांति क्षमेसी ॥ भावें भजावें ईश्वरासी ॥ केला निश्चय योगशास्त्रीं ॥७३॥
वैद्यमार्गीचें देखणें ॥ ज्योतिषमताचीं लक्षणें ॥ ग्रह नक्षत्र दान पुण्यें ॥ धर्मशास्त्रीं स्थापिलीं ॥७४॥
बारा राशिसंवत्सर ॥ वर्णाश्रम शुध्द आचार ॥ श्रेष्ठकर्माचीं सदर ॥ स्नान संध्या देवतार्चन ॥७५॥
होम यज्ञ अश्वमेध ॥ सोवळें ओंवळें विधिनिषेध ॥ हा धर्मशास्त्रींचा बोध ॥ केला विशद सिध्दांतें ॥७६॥
कामशास्त्रामाझारी ॥ सांगीतली गायनकळा कुसरी ॥ अनेक मंत्रांचीं भरोवरी ॥ साधन कर्म दाविलें ॥७७॥
भोग विलासी राजनीति ॥ कामिनीसंग रतीची गती ॥ सामुद्रिक लक्षणांची जाती ॥ यथास्थिती मांडिली ॥७८॥
स्तंभन मोहन उच्चाटन ॥ बह्त विद्यांचें संधान ॥ कामशास्त्रीं केलें कथन ॥ कापटय कर्म सर्वही ॥७९॥
आगमशास्त्रीं जाणा ॥ सांगीतली शक्तीची उपासना ॥ हिंसाकर्म पशूंचिया हनना ॥ होमहवना स्थापिलें ॥८०॥
वाममार्गीचें आचरण ॥ केवळ अधर्मवर्तन ॥ बावन्न वर्ण एकत्र होऊन ॥ मद्यमांस प्राशिती ॥८१॥
सोडून स्वधर्म मर्यादेशी ॥ घालिती अघोर कर्मगोंधळासी ॥ प्रवर्तती क्रियाभ्रष्ट कर्मासी ॥ तमोगुणी अतिमंद ॥८२॥
तितुकें शाक्तधर्म स्थापिलें ॥ तितुकें आगमशास्त्रीं कथिलें ॥ तेणें जन फार नासले ॥ ‘खल्विदं ब्रह्म’ कल्पोनि ॥८३॥
यापरी आगमशास्त्राची ॥ तुज सांगीतली रुची ॥ आतां युक्ति निगमाची ॥ तेचि परिसें ब्राह्मणा ॥८४॥
निगमशास्त्रीं निर्गुण भजन ॥ सगुण तितुकें निंदिलें जाण ॥ अविंध लोकीं अंगीकारुन ॥ तेचि रीतीं वर्तती ॥८५॥
आतां पुराणांच्या ठायीं ॥ एकही निश्चयो घडला नाहीं ॥ ऋषि आपुल्या ज्ञानें पाहीं ॥ होतें तैसें बोलिले ॥८६॥
पुराणीं निरुपिलें बहुत कर्म ॥ अनेक उपासना नेमधर्म ॥ दान पुण्य यज्ञ होम ॥ क्रिया आचरण स्थापिलें ॥८७॥
विधिनिषेधांचें कचाट ॥ वर्णभेदांची बांधली गांठ ॥ सोंवळ्याओंवळ्याची खटपट ॥ उंच नीच नेमिली ॥८८॥
सांगीतलें भक्ति वैराग्य ज्ञान ॥ नेमधर्मादिक साधन ॥ तीर्थे व्रतें तप ध्यान ॥ राजनीति निरुपिल्या ॥८९॥
पुराणीं कथिले युध्दप्रसंग ॥ करावें अश्वमेधादि नाना याग ॥ स्नानसंध्या यथासांग ॥ साधन योग दाविला ॥९०॥
गोदान ब्राह्मण उध्दव ॥ तो अधिकारी परम जीव ॥ त्याचा जाणोनियां भाव ॥ स्वयें देव पाचारी ॥९१॥
उध्दवाचा धरुनि कर ॥ एकांतीं नेऊनि सर्वेश्वर ॥ परम गुह्य निजसार ॥ सांगे उद्गार उध्दवा ॥९२॥
श्रीकृष्ण म्हणे उध्दवासी ॥ जिवलग सखा माझा होसी ॥ रहस्य सांगों तुजपासीं ॥ तुवां मानसीं धरावें ॥९३॥
छपन्न कोटि यादवांत ॥ उध्दवा तूं परम भक्त ॥ यालागीं परमार्थ ॥ तुज एकांत सांगतों ॥९४॥
गोपिकांसी माझें प्रेम ॥ दृढ बैसला भोगकाम ॥ मी मथुरेसी येतां मेघश्याम ॥ अति दुर्गम त्यां घडला ॥९५॥
माझ्या भोगसुखाचे ठायीं ॥ त्यांचें चित्त गुंतलें पाहीं ॥ मजविण दिशा दाही ॥ वोस सर्वही दिसती ॥९६॥
ऐशा प्रेमळ गोपी ॥ त्यांची प्रीती माझ्या स्वरुपीं ॥ जे न पावती जपीं तपीं ॥ तें त्यांतें अर्पीन ॥९७॥
उध्दवा काय सांगों तुज ॥ गोपिकांचें न कळे चोज ॥ मजसी एकांतीं करिती गुज ॥ मी अधोक्षज तिष्ठें त्या ॥९८॥
गोपिकांची सुकृतजोडी ॥ न पावती यज्ञयागाचिया कोडी ॥ तीर्थव्रतांची परवडी ॥ त्यांचे तोडी न तुकती ॥९९॥
गोपिकातनु केवळ मुक्ती ॥ कीं त्या वेदाच्या परम श्रुती ॥ अथवा ब्रह्मींच्या चैतन्यशक्ती मज अच्युता प्रियकर ॥१००॥
मी समुद्र गोपिका लहरी ॥ मी कमळ त्या भ्रमरी ॥ मी तरु त्या शाखा वरी ॥ मी चंद्र त्या कळा ॥१॥
मी सूर्य त्या किरण ॥ घेतल्या चातकी जाण ॥ मी आत्मा प्राण ॥ मी लोहचुंबक त्या लोखंड ॥२॥
मी देव त्या देवी ॥ मी दीप त्या दीवी ॥ मी शंभु त्या शांभवी ॥ मी नंदी त्या धेनू ॥३॥
मी धैर्य त्या धृती ॥ मी विवेक त्या शांति ॥ मी जगदीश त्या शक्ती ॥ मी धर्म त्या दया ॥४॥
मी पुष्प त्या सुगंधी ॥ मी ज्ञान त्या बुध्दी ॥ मी सिंधू त्या नदी ॥ मी शेष नागिणी त्या ॥५॥
मी नेत्र त्या बाहुली ॥ मी स्वरुप त्या साउली ॥ मी लता त्या कळी ॥ मी कनक त्या कांती ॥६॥
मी जळ त्या मासोळी ॥ मी चंदन त्या भुजंगवेटाळीं ॥ मी नाद त्या मुरली ॥ मी गोप त्या गोपिका ॥७॥
मी गीत त्या हरिणी ॥ मी मुद्रा त्या हिरकणी ॥ मी पुरुष त्या कामिनी ॥ मी कपींद्र त्या पुच्छा ॥८॥
मी ब्रह्म त्या स्फुरण ॥ मी अंत:करण त्या मन ॥ मी निर्गुण त्या सगुण ॥ मी शिव त्या जीव ॥९॥
मी व्योम त्या शब्द ॥ मी पृथ्वी त्या गंध ॥ मी आप त्या रसस्वाद ॥ मी तेज त्या स्वरुप ॥११०॥
मी वायु त्या स्पर्श ॥ मी अनंत त्या हर्ष ॥ मी चिध्दन त्या विलास ॥ मी सूत्र त्या पुतळ्या ॥११॥
मी राजा त्या प्रजा ॥ मी कृष्ण त्या माझ्या मौजा ॥ मी अवतार धरीं त्यांचिया काजा ॥ त्यांस मज दुजा भेद नाहीं ॥१२॥
मी गोपिकांलागीं वेडा ॥ त्या मज भोंवता वेढा ॥ त्यांची मजशीं आनंदें क्रीडा ॥ जाहली उघडी यमुनेतटीं ॥१३॥
मला त्याची लागली भुरळी ॥ त्या मजसाठीं पिशा सकळी ॥ मी त्यांसाठीं शिवी लादली ॥ मजसाठीं तयां बहु जाच ॥१४॥
त्यांचे आलिंगनें त्या निवती ॥ म्यां त्यांसि दीधली रती ॥ त्या भोगिती अष्टांगें ॥१५॥
म्यां त्यांचें मन चोरिलें ॥ त्यांनीं माझें मन हरिलें ॥ मी त्यांसाठीं वेडावलों ॥ त्यांचें मन अडकलें मजपासी ॥१६॥
त्यांचा भोग माझें मनीं ॥ मजसाठीं त्या परद्वारिणी ॥ लोक म्हणती व्यभिचारिणी ॥ सोसिती जाचणी मजसाठीं ॥१७॥
मजसाठीं सासुरवास ॥ त्यांणीं भोगिला कर्कश ॥ सांडोनि पतिपुत्रांची आस ॥ माझा सहवास त्यां घडला ॥१८॥
ऐसी गोपिकांची अडी ॥ मज लागली परम गोडी ॥ मी त्यांसाठीं चरफडी ॥ त्यांची लडबडी मजसाठीं ॥१९॥
त्यांची माझी परम दिठी ॥ त्यांची माझी हर्ष गोष्टी ॥ त्यांची माझी एकांतमिठी ॥ नव्हे सुटे कल्पांतीं ॥१२०॥
त्यांसी माझा सहवास ॥ मध्यें अक्रूरें केला विरस ॥ मज आणिलें मथुरेस ॥ अतिरस बिघडला ॥२१॥
बैसोनियां यमुनेच्या तटीं ॥ माझ्या करिती नित्य गोष्टी ॥ अखंड मथुरेकडे दृष्टी ॥ आणिक सृष्टी सुचेना ॥२२॥
ऐकें उध्दवा सद्बुध्दी ॥ त्वां जावें गोकुळामधीं ॥ आत्मज्ञानाची सांगोनि सिध्दी ॥ स्वानंदसुखी तयां करी ॥२३॥
बहुत दिवस केला भोग ॥ आता करा कांहीं योग ॥ आत्मनिष्ठें चालवी योग ॥ दावीं प्रयोग प्रणवांचा ॥२४॥
तुज सांगतों आत्मज्ञान ॥ तेंचि बोधीं गोपिकांलागून ॥ विषय त्यांतें वाटे वमन ॥ ऐसें निमग्न तयां करीं ॥२५॥
उध्दव म्हणे श्रीकृष्णासी ॥ तूं कोठें ज्ञान शिकलासी ॥ कोण गुरु जाहला तुजसी ॥ तें मजपासीं निवेदीं ॥२६॥
तूं तंव देवकीचा कुमर ॥ आम्ही जाणों जन्म समग्र ॥ सांगसी सारांश विचार ॥ हा निर्धार तुज कैंचा ॥२७॥
नाहीं विद्या वेदपठण ॥ नाहीं वैराग्यसाधन ॥ अखंड विषयीं तरलें मन ॥ ज्ञानखूण तुज कैंची ॥२८॥
यापरी उध्दवें पुसतां ॥ हांसें आलें श्रीकृष्णनाथा ॥ उध्दवास म्हणे तुज आतां ॥ मी कोण तें तुज सांगतों ॥२९॥
नांव सांगावया वेद मुका ॥ पार न लागे ब्रह्मादिकां ॥ ध्यानीं शिवाचे न ये जो कां ॥ तो मी पुत्र देवकीचा ॥१३०॥
अनंतब्रह्मांडांच्या उतरडी ॥ रचोनि संकल्पें मोडीं ॥ स्तवितां शेषाची वळे बोबडी ॥ तो मी बांदवडीं जन्मलों ॥३१॥
अपार सृष्टीचा मी कर्ता ॥ विश्वमायेचा मी भर्ता ॥ आकारहृदयीं सांठविता ॥ त्या मज पिता वसुदेव ॥३२॥
संसाराचें सांकडिये ॥ जीव उतरी भवाब्धिथडिये ॥ तो मी यशोदेचे कडिये ॥ घडिये घडी खेळवी ॥३३॥
जो मी काळांची नळी पिळी ॥ जीवाची तोडीं अविद्यासांकळी ॥ त्या मज यशोदा बांधे उखळीं ॥ गौळणीं सकळी हांसती ॥३४॥
मी सनकादिकांचा जप ॥ मजसाठीं ऋषि करिती तप ॥ तो मी गोपिकांसी स्वल्प ॥ घेती चुंबन मुखाचें ॥३५॥
जो मी निर्विकार परमेश्वर ॥ तोचि कृष्ण अवतार ॥ उध्दवा बोले साचार ॥ मी करुणाकर जगदात्मा ॥३६॥
ऐसें बोलोनि अनंत ॥ उध्दवाचें मस्तकीं ठेविला हस्त ॥ तत्काळ जाहला समाधिस्थ तटस्थ मुद्रा लागली ॥३७॥
मी उध्दव हा फुंद बुडाला ॥ पुढें कृष्णही न दिसे डोळां ॥ एकचि ब्रह्म प्रकाशला ॥ एकत्वें बुडे स्वानंदीं ॥३८॥
कृष्णें केला विचार ॥ म्हणे उध्दव जाहला तदाकार ॥ सागरामाजी लवण जिरे ॥ तेवीं हा मुरे आपणांतें ॥३९॥
म्यां गोपिकांसी बोध ॥ करावया उध्दव केला सावध ॥ आतां लागली या समाध ॥ सुखसिंधूंत बुडाला ॥१४०॥
आतां यातें सावधान ॥ करुन सुचवूं देहभान ॥ हा गोपिकांलागून ॥ संतोषवृत्ति करील ॥४१॥
मग अवलोकिलें कृपादृष्टीं ॥ उध्दवासी फुटली देहाची पुटी ॥ ज्ञान अज्ञानांचे तटीं ॥ तुर्या नेहटी उभा असे ॥४२॥
जाहला आत्मसुखाचा लाभ ॥ पुढें न दिसे प्रपंच डिंभ ॥ होईल अनुभव स्वयंभ ॥ नभप्राय उभा असे ॥४३॥
मग सद्गदित भरला अंतरीं ॥ हृदयीं आली प्रेमलहरी ॥ सर्वांग रोमें थरारी ॥ नेत्रीं अश्रू लोटले ॥४४॥
पाहोनियां कृष्णमूर्ती ॥ दंडप्राय पडला क्षितीं ॥ अष्टभावें कैवल्यपती ॥ नमीं सद्भावें उध्दव ॥४५॥
वारंवार चरणकमळीं ॥ भाव ठेवी जोडोनि अंजली ॥ उडाली अहंकाराची उकळी ॥ सबाह्य न्याहाळी श्रीकृष्ण ॥४६॥
मग बोले शारंगपाणी ॥ उध्दवा ओळखिलें मज नयनीं ॥ येरु म्हणे तूं मोक्षदानी ॥ तुझिया कृपेनें तुज ओळखिलें ॥४७॥
नव्हेसि नंदाचा किशोर ॥ होसि मुख्य परमेश्वर ॥ निर्गुण जो निर्विकार ॥ परात्पर तूं देवा ॥४८॥
तूं व्यापक जैसा नभू ॥ तूतें लक्षी सदैव शंभू ॥ तूं कृपाळु भक्तकदंबू ॥ केवळ विभु मायापर ॥४९॥
नव्हे वसुदेवाचा तनुज ॥ नव्हेसि यादव चतुर्भुज ॥ ब्रह्मादिकां परम गुज ॥ निजानिज मी जाणें ॥१५०॥
तूं जगदीश हृषीकेश ॥ सनकादिकांचा निदिध्यास ॥ योगी तुझा करिती शोष ॥ तूं परमेश अनुभविला ॥५१॥
कैवल्यपती मोक्षपती ॥ यादवपति भक्तपती ॥ जीवपति जगज्ज्योती ॥ तुझी व्याप्ति त्रैलोक्यीं ॥५२॥
तूतें मानिती देवकी पुत्र ॥ होसी आप्त सखा गोत्र ॥ आतां कळलें तुझें चरित्र ॥ तूं स्वतंत्र परमात्मा ॥५३॥
परिसोनि उध्दवाची विनंती ॥ कृपें बोले कृष्णमूर्ती ॥ माझी तूतें परमप्रीती ॥ तूं प्रिय मज होसी ॥५४॥
आतां माझी एक आज्ञा ॥ त्वां मानावी गा सूज्ञा ॥ गोपिकांस माझी संज्ञा ॥ करी प्रज्ञा ज्ञानाची ॥५५॥
तुवां जावें गोकुळा ॥ भेटावें माझिया प्रेमळां ॥ जिवलग रवि स्नेहाळा ॥ माझा कळवळां त्यां सांगें ॥५६॥
सांगोनि त्यांस ज्ञानगोष्टी ॥ तोडीं मोहाची फांसोटी ॥ दावीं आत्मा निजदृष्टीं ॥ बैसवीं पदीं मोक्षाचे ॥५७॥
सोडवीं विषयांची परवडी ॥ लावीं भक्तिसुखाची गोडी ॥ उभवीं अनुभवाची गुढी ॥ बोधीं रोडकी ब्रह्मविद्या ॥५८॥
यापरी आज्ञापितां देवें ॥ मान्य केलें उध्दवें ॥ कृष्णासी वंदोनि सद्भावें ॥ गोकुळासी तो गेला ॥५९॥
उध्दव आला गोकुळीं ॥ वार्ता ऐकिली सकळीं ॥ पुसों पातल्या त्या उध्दवाजवळीं ॥ वार्ता कैसी श्रीहरीची ॥१६०॥
गोपिका म्हणती उध्ववालागून ॥ तुम्ही आलां मथुरेहून ॥ काय कृष्णाचें वर्तमान ॥ आम्हां संपूर्ण निवेदावें ॥६१॥
आमुची कृष्णाची परमगोडी ॥ अक्रूरें केली ताडातोडी ॥ नेऊन गेला तांतडीं ॥ जाहलों वेडीं तैंपासून ॥६२॥
आमुच्या भोगसुखांत ॥ अक्रूरें केला परमघात ॥ घेऊन गेला कृष्णनाथ ॥ हा अनर्थ तैंहून ॥६३॥
अरे अक्रूरा तूं नष्टा ॥ निर्दय निष्ठुरा दुष्टा ॥ आम्हां घालोन बहुकष्टा ॥ वरें पापिष्ठा होईना ॥६४॥
तुझें जाहलें काळें तोंड ॥ करोनि गेलासि पाखंड ॥ आमुच्या भोगीं पाडिला खंड ॥ अति लंड अक्रूर ॥६५॥
अक्रूरा तूं परम वैरी ॥ घेऊन गेलास श्यामलहरी ॥ मूर्ति सकुमार साजिरी ॥ जैं सुरवरां दुर्लभ ॥६६॥
ज्याचें अवलोकितां वदन ॥ ओवाळोनि सांडावे कोटि मदन ॥ तो सखा आमुचा सज्जन ॥ कैसा दुर्जनें तोडिला ॥६७॥
कृष्णास देतां आलिंगन ॥ निवे तनु मन जीव प्राण ॥ त्या सुखासी पडलें अवर्षण ॥ हो निसंतान तयाचें ॥६८॥
उध्दवा कार करितो हरी ॥ सांग त्याची नवलपरी ॥ गोपाळमेळीं गाईं चारी ॥ राज्याधिकारी तो जाहला ॥६९॥
आम्हां उचलों लागे घागरी ॥ आतां मस्तकीं उडे चौरी ॥ कोण आठवी मागील परी ॥ विसरला हरि आम्हांतें ॥१७०॥
यशोदेमागें धांवे रडे ॥ आम्हीं त्यासी मारूं खडे ॥ आतां रोज त्याचे पुढें ॥ जोडल्या करीं तिष्ठती ॥७१॥
उध्दवा आमुची आठवण ॥ कधीं केली मनापासोन ॥ कीं विसरला मनमोहन ॥ निर्दय कठोर तो जाहला ॥७२॥
उध्दव म्हणे गोपिकांसी ॥ तुम्हां न विसंबे हृषीकेशी ॥ खेद करी अहर्निशीं ॥ गोकुळीं लक्ष तयाचें ॥७३॥
आसनीं शयनीं भोजनीं ॥ तुम्हांसि आठवी नित्य मनीं ॥ मातें साक्षेपें पाचारुनी ॥ तुम्हांकडे धाडिलें ॥७४॥
सोडा विषयाचा छंद ॥ विवेकें छेदावा काममद ॥ वोखट वासनेचा फुंद ॥ हें गोविंद बोलिला ॥७५॥
भोगीं उठती रोग नाना ॥ निमाल्या चौर्यायशीं यातना ॥ यालागीं योगसाधना ॥ धरा धारणा स्वरुपीं ॥७६॥
ऐकोनि उध्दवाची बोली ॥ हास्य केलें गोपिकांनीं सकळीं ॥ म्हणती चालक वनमाळी ॥ केली रळी आमुतें ॥७७॥
भोगोनि निवे तनु मनु ॥ उभयमेळीं समाधान ॥ हें सोडोनि वैराग्यसेवन ॥ करितां सुख कैचें जोडे ॥७८॥
उध्दव म्हणे ऐका निवाडे ॥ आयुष्य पाहतां दिसे तोकडे ॥ बाल्य तारुण्य वृध्दपण जोडे ॥ हे तंव कोडें मानवांचें ॥७९॥
बाळपणीं अज्ञान ॥ अल्प वय गेलें निघोन ॥ तारुण्यपणीं विषयीं मन ॥ अडके मीन गळीं जैसा ॥८०॥
पुढें वृध्दापकाळीं ॥ विषतुल्य याची वाढे उकळी ॥ इंद्रियें खाकर होऊन ठेलीं ॥ जरा व्यापिली सर्वांगीं ॥८१॥
पुरुषापरीस वनितादेहो ॥ बहु बीभत्स दिसे पाहाहो ॥ यालागीं आत्मसुखाचा लाहो ॥ ध्यावा पाहाहो सत्वर ॥८२॥
कृष्ण नव्हे विषयभोगी ॥ नव्हे त्यागी अथवा जोगी ॥ तो योगियांचा योगी ॥ जीव उध्दारावया अवतरला ॥८३॥
जो व्यापक वनमाळी ॥ तो तुमचें हृदयकमळीं ॥ त्यातें ओळखा विवेकें सकळीं ॥ भोगनव्हाळी स्वरुपाची ॥८४॥
फेडा वासनेची कंचुकी ॥ पहुडा तुर्येचे मंचकी ॥ भोगा आत्मस्वरुपान्वयकीं ॥ ज्याचे ओळखीं भव तुटे ॥८५॥
इंद्रियातीत शुध्द आत्मा ॥ तया ओळखा मेघशामा ॥ आत्मा रमणीय रमतां तुम्हां ॥ भय नाहीं कल्पांतीं ॥८६॥
मायापर परमेश्वर ॥ तोचि हा शारंगधर ॥ दयावंत कृपाकर ॥ दीनोध्दार कनवाळू ॥८७॥
ब्रह्मादिकां न ये ध्यानीं ॥ तुम्हीं देखिला नित्य नयनीं ॥ तुमच्या भाग्याची शिराणी ॥ नये महेशा वानितां ॥८८॥
विषयभोगीं लौकिक ॥ कोण पावला करा विवेक ॥ भक्ति अंगें वेश्यादिक ॥ थोर पदवी पावल्या ॥८९॥
रेणुका अरुंधती शांडिल्या ॥ सीता मंदोदरी कौसल्या ॥ रुक्मिणी द्रौपदी अहल्या ॥ जाहल्या पुराणीं प्रविष्टा ॥१९०॥
लोपमुद्रा अनसूया ॥ कयाधु सुलोचना दमयंती या ॥ तारामती सावित्री या ॥ जाहल्या प्रियकरा भगवंतीं ॥९१॥
त्यांसम व्हाल तुम्ही गोपी ॥ चित्त जडल्या आत्मस्वरुपीं ॥ जें पद नातुडे जपतपीं ॥ तें तुम्हांसी अनायासें ॥९२॥
भाव भक्ति धरा सप्रेम ॥ चित्तीं स्मरा मेघश्याम ॥ ऐसें बोधोनि उध्दवें उत्तम ॥ संतोषविल्या गोपिका ॥९३॥
जितुका परमार्थ निरुपण ॥ तितुका जाण परमेश्वरीं गुण ॥ कृष्णावतारीं घ्या ओळखून ॥ त्रय अंश जगदीश ॥९४॥
गीता आणि भागवत ॥ अध्यात्मविद्या अद्भुत ॥ निरुपिली विख्यात ॥ अर्जुना आणि उध्दवा ॥९५॥
गीता भागवतासमान ग्रंथ ॥ शोधितां नातुडे ब्रह्मांडांत ॥ वेदशास्त्रांचा मथितार्थ ॥ अति गुह्यार्थ मांडिला ॥९६॥
कृष्णावतारीं तीन प्रकार ॥ माया विष्णु परमेश्वर ॥ भिन्न भिन्न समग्र ॥ तुज द्विजा निरुपिले ॥९७॥
एक म्हणती मायिक नट ॥ एक म्हणी विष्णु प्रगट ॥ एक म्हणती पूर्ण ब्रह्म श्रेष्ठ ॥ कृष्ण अवतार हो कीं ॥९८॥
कृष्ण अवतार मायेचा ॥ शेखीं होय विष्णुचा ॥ याही परता परमेश्वराचा ॥ सत्य होय जाणावें ॥९९॥
यालागीं कृष्णासमान ॥ नाहीं अवतार ब्रह्मांडीं जाण ॥ ज्याची लीला अति गहन ॥ तिही लोकीं दुर्लभ ॥२००॥
हे कृष्णअवतार लीला ॥ देवें निरुपिली द्विजाला ॥ श्रवण करितां भाग्याला ॥ संदेह हरे सहजचि ॥२०१॥
संदेह हरिला सद्गुरुनें ॥ यालागीं ग्रंथ केला कवीनें ॥ शहामुनीचीं वचनें ॥ भूषणें होती भाविकां ॥२०२॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे तत्वसारनिरुपणे एकोनत्रिंशत्तमोध्याय: ॥२९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2020
TOP