मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ४० वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४० वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
आतां नमू एकाकीं एक ॥ अवघा आपणची प्रकाशक ॥ श्रोत्र चक्षु वदन नासिक ॥ एके अंगीं शोभलीं ॥१॥
सूप चाळणी दुरडी करंडी तट्टे ॥ वेळु अंगीं पदार्थ उमते ॥ खांब तुळई कडी किलचा चौकटे ॥ पदार्थ काष्ठ एक असे ॥२॥
यापरी ईश्वरकरणी ॥ आपण नटला सर्व गुणीं ॥ तोचि कवीच्या हृदयभुवनीं ॥ हालवी वाचा बोलवीं शब्द ॥३॥
आपण आपणा करी गमन ॥ जैसा तरंग सागरां शरण ॥ किरणें रवीशीं अनन्य ॥ तेवीं नयन पैं माझें ॥४॥
देऊळ लिंग नंदी पायरी ॥ उंचनीच कल्पना करी ॥ अंगण माजघर वोसरी ॥ महीस विभाग हे कैंचे ॥५॥
जगदीश जनार्दन ॥ यालागीं विश्वास केलें नमन ॥ माझें मला घडलें बंधन ॥ मीच विश्वबिंबीं विश्वात्मा ॥६॥
मोती मीठ गार ॥ एका जळाचे तीन प्रकार ॥ तेवीं विश्वरुपाचा विचार ॥ इतर प्रकार काल्पनिक ॥७॥
गूळ गोडी आणि ढेंप ॥ तीं नामें एकचि रुप श्वेत ॥ प्रकाश उष्ण दीप ॥ किंवा मूळ त्वचा आणि शाखा ॥८॥
विजात स्वजांत स्वगत ॥ तीन प्रकारें बोले वेदांत ॥ अन्वय आणि व्यतिरिक्त ॥ हाही एक प्रकार ॥९॥
विजात म्हणावें मोत्यांस ॥ स्वजात म्हणावें मिठास ॥ स्वगत बोलिजे तरंगास ॥ उदक एकचि असे ॥१०॥
विजात म्हणजे प्रपंच पाहे ॥ स्वजात तों जीव होय ॥ स्वगत स्फुरण आहे ॥ मुळींचा उल्लेख मी ब्रह्म ॥११॥
अन्वयव्यतिरिक्तांची गोष्टी ॥ तेही परिसा कर्णपुटीं ॥ यांत संशय कल्पना नुठी ॥ तैशा रीती सांगतों ॥१२॥
मायेपासोनि प्रपंचरचना ॥ तो व्यतिरिक्त पदार्थ जाणा ॥ या विरहित ओळखिजे निर्गुणा ॥ अन्वय त्यास म्हणावें ॥१३॥
आणिक एक प्रकार जाणणें ॥ तरंगास व्यतिरिक्त म्हणणें ॥ उदकांतें संचेलपणें ॥ हाही एक अनुभव ॥१४॥
कोठें मृगजळ माया धरिली ॥ कोठें तरंगवत् कल्पिली ॥ दों प्रकारें शास्त्रीं बोधिली ॥ गुरुमुखें समजावें ॥१५॥
कांहीं एक करणी वांचोन ॥ नकळे स्वरुप ज्ञान ॥ यालागीं अभ्यास पूर्ण ॥ सत्संग शास्त्रीं असावा ॥१६॥
ध्रुवबाळ सत्संगे जाहला ॥ श्रीव्यासें पुराणीं गाइला ॥ त्याची कथा स्वामी कार्तिकाला ॥ अगस्तीनें पुसिली ॥१७॥
श्रोता वक्ता दोघे समर्थ ॥ उभयतां भाषणीं अद्भुत ॥ त्याचा भाव किंचित ॥ श्रोते हो परिसावा ॥१८॥
अगस्ति पुसे स्वामीस ॥ ध्रुवें कैसें केलें तपास ॥ स्वामी म्हणे बरवें परीस ॥ सांगतों त्याची मूळकथा ॥१९॥
सूर्यवंशीं गा नृपती ॥ उत्तानपाद नामें विशाळकीर्ती ॥ दोघी भार्या तयाप्रति असती ॥ कनिष्ठ प्रिय वडिल अमान्य ॥२०॥
कनिष्ठ अष्टौप्रहर सेवेस ॥ प्रीतीनें मोहिला नरेश ॥ वेगळें ठेविलें वडिलीस ॥ अप्रिय म्हणोनी ॥२१॥
तिचें पोटीं जाहला कुमरु ॥ आवडीं नाम ठेविलें धुरु ॥ सभाग्याचा नरु ॥ नीटनेटका गोजिरा ॥२२॥
अवलोकुनि जननी ॥ म्हणे पिता दावीं नयनीं ॥ येरी म्हणे राजचूडामणी ॥ मुख्य जनक तो तुझा ॥२३॥
पिता परिसोनि आवडीं ॥ हरुषाची उभाविली गुढी ॥ मातेस वंदोनि तांतडी । जनकभेटी तो आला ॥२४॥
बैसावें पित्याचे जानुवर ॥ भार्या वदें मागें सर ॥ तुज नसे अधिकार ॥ रायापुढें बैसावया ॥२५॥
जानूवरी बैसले माझा कुमर ॥ त्यांसीच राज्यपदीं अधिकार ॥ तुझीया दैवीं दरिद्र घोर ॥ राज्यभोग लेश मिळेना ॥२६॥
ऐसें वदतां सावत्र जननी ॥ आश्रुबिंदु पातले नयनीं ॥ महाखेद पावोनि मनीं ॥ जननीपासीं तो गेला ॥२७॥
पाहोनि बाळकाची उद्विग्न दशा ॥ माय म्हणे रे राजसा ॥ कायनिमित्त शोकपाशा ॥ अवलंबिलें मज सांग ॥२८॥
ध्रुव म्हणे वो जननी ॥ पिता अवलोकूनी नयनीं ॥ हर्षें बैसावें जानूवरी जाऊनी ॥ तों सावत्र मायेनें वर्जिलें ॥२९॥
म्हणे राज्यीं बैसावें माझिया सुतें ॥ धिक्कारुन लाविलें मातें ॥ खेद पावलों हृदयांतें ॥ तो परिहार दिसेना ॥३०॥
जननी म्हणे सत्य गोष्टी ॥ विधात्यानें लिहिलें ललाटीं ॥ दरिद्र पातलें आमुचे भेटी ॥ राज्यवैभव कैंचे आम्हां ॥३१॥
देव देईल तेंचि घ्यावें ॥ आपुल्या संचितासी रुसावें ॥ पेरावें तेंचि उगवे स्वभावें ॥ अधिक मिळे कशानें ॥३२॥
पदरीं बांधिली दरिद्र नरोटी ॥ परीस कोठून होईल शेवटी ॥ आतां पुत्रा न होईं कष्टी ॥ शोक पोटीं जिरों दे ॥३३॥
राज्यभोग मुक्त पदवी ॥ प्राप्तीस अपार सुकृतें व्हावीं ॥ यालागी आराधना करावी ॥ एकनिष्ठा ईश्वरीं ॥३४॥
सुकृताचा भरला होता ॥ मातृवचन लागला पालिता ॥ भडका उडाला अनुताप त्वरितां ॥ भरतें जेवीं सागरीं ॥३५॥
आधींच दैवाचा पुतळा ॥ शुध्द अनुतापें तापला ॥ अग्नि जैसा प्रज्वळिला ॥ तेवीं जाहलें ध्रुवासी ॥३६॥
करोनि मातेसी नमन ॥ संगें अनुताप घेऊन ॥ राज्यलोभ मानून वमन ॥ ग्राम त्यागोनी चालिला ॥३७॥
हेर सांगती रायासी ॥ ध्रुव जातो वनवासी ॥ राव म्हणे पंचग्रामांसी ॥ अर्पितो सुखी असावें ॥३८॥
ध्रुव बोले देईल जगदीश ॥ कोण पुसे पंच ग्रामास ॥ पिता बोले अर्धराज्यास ॥ देतो संतोषें आपुल्या ॥३९॥
ध्रुव म्हणे हरी वांचून ॥ कोण घेतो राज्य सिंहासन ॥ राजा म्हणे सर्व देईन ॥ ध्रुव म्हणे नलगे ताता ॥४०॥
तुटके उपानह देती टाकून ॥ तेवीं राज्य त्यागिलें ध्रुवान ॥ जैसा कुडीतून गेला प्राण ॥ पुन्हा प्रवेश करीना ॥४१॥
त्वचा त्यागिल्या उरंगें ॥ नसें लोभ न पाहे मागें ॥ कीं लंका जानकीरंगें ॥ दिली इच्छा नसे कीं ॥४२॥
तेवी निराश होऊन मना ॥ पुढे भाग्याचा उदयो जाणा ॥ ध्रुव चालिला मधुवना ॥ सप्तऋषि भेटले ॥४३॥
रोगियास प्राप्त सुधारस ॥ किंवा रंकास सांपडें परिस ॥ नातरी गर्भाधास ॥ देखणी काळा उदेली ॥४४॥
सप्तऋषी पाहोन ॥ ध्रुव घाली लोटांगण ॥ म्हणे तुम्ही दीनाकारण ॥ अवतार घेतला या सृष्टी ॥४५॥
क्षुधार्थियास क्षीरसिंधू ॥ अनुभवियासी प्राप्त ज्ञानबोधू ॥ भाविकासी भेटे साधू ॥ तेवीं आनंदू मन वाटे ॥४६॥
काय पुसावें स्वामीस ॥ हें नेणें माझें मानस ॥ राज्यभोगीं आला त्रास ॥ इतुकें चित्तीं जाणावें ॥४७॥
तुम्ही भेटवाल ईश्वर ॥ जाहला कर्माचा परिहार ॥ ऐसें वदोनि आला गहिंवर ॥ अश्रु नेत्रीं लोटले ॥४८॥
कश्यप म्हणे रे बाळका ॥ तुझ्या भाग्याची श्रेष्ठ रेखा ॥ भय न धरीं आवांका ॥ सांगतों विवेक स्वयें करीं ॥४९॥
ईश्वर प्राप्तीकारण ॥ आधीं पाहिजे वैराग्य पूर्ण ॥ वैराग्यवांचोनि साधन ॥ निष्फळ दिसती सर्वही ॥५०॥
दाराकुमरां कंटाळोन ॥ होईना संसार बहुत ऋण ॥ उठोनि जाय त्रासून ॥ त्रास वैराग्य या नांव ॥५१॥
जोंवरी बैसती मसणखाई ॥ सांगती वैराग्याची नवाई ॥ म्हणती संसारी कांहीच नाहीं ॥ स्मशानवैराग्य या नांव ॥५२॥
कोनीं निघता तिडका उठती ॥ तेव्हां म्हणे नलगे पती ॥ पुन्हां तेचि कर्मीं प्रवर्तती ॥ प्रसूतिवैराग्य या नांव ॥५३॥
मैथुनीं दावी विलास ॥ वीर्यपतनीं मानी त्रास ॥ विटे पुन्हा उठे भोगास ॥ मैथुनवैराग्य या नांव ॥५४॥
मूळ वैराग्य शुध्द अनुताप ॥ चित्तीं वसे ईश्वरस्वरुप ॥ उडे वासनेचा कल्प ॥ संसारभान दिसेना ॥५५॥
माझिया आशीर्वादें हेंचि दशा ॥ तूतें घडों पुण्यपुरुषा ॥ पुन्हा न घडो जन्मवळसा ॥ अक्षयी कल्याण हो तुझें ॥५६॥
अत्रि म्हणे ध्रुवालागुन ॥ वैराग्यासारिखा विवेक निपुण ॥ विवेकासारिखी शांति जाण ॥ तेव्हां शोभे सर्वही ॥५७॥
तुंबा दांडी तिसरी तार ॥ एकत्र होतां नाद मधुर ॥ तेवीं विवेक वैराग्य शांतीचें घर ॥ तिन्हीं ज्यापासी तो धन्य ॥५८॥
गंगा यमुना सरस्वती ॥ एकत्र होतां त्रिवेणी म्हणती ॥ रक्तमांस मीनल्या अस्थी ॥ तेव्हां बंदोबस्ती शरीरीं ॥५९॥
नौबत चाम वाजविणार ॥ नाद घुमघुमे घनघोर ॥ लावण्य तारुण्य श्रृंगार ॥ निरखितां तृप्ति लोचनीं ॥६०॥
यापरी शांति विवेक वैराग्य ॥ वसती तेथें सुखाचें सौभाग्य ॥ त्यासीच साधे महायोग ॥ न भंगे अभंग धैर्याचा ॥६१॥
ज्यापासी विवेक शांति नसती ॥ वैराग्याची नसतां संपत्ती ॥ जेवी केली लग्नाची आइती ॥ नवरा घरीं राहिला ॥६२॥
संन्यासवेष घेऊनियां शठ ॥ मार्गीं बैसे अंतरीं कपट ॥ शिकविलें तैसें नाचे मर्कट ॥ स्वतां बुध्दी ते नव्हे ॥६३॥
प्रपंचीं परमार्थीं विवेक ॥ करी तोचि शाहणा देख ॥ स्वत: शांति अधिक ॥ हें काय लागे सांगणें ॥६४॥
ज्यापुरुषासि शांति नाहीं ॥ त्याचा पुरुषार्थ व्यर्थ पाहीं ॥ पर्णिली नोवरी घ्राण नाहीं ॥ काय सौंदर्य जाळावें ॥६५॥
पतिपत्नी उभयतां मुकीं ॥ संसारवेग चुकाचुकी ॥ लग्न समयीं नवर्‍यास लागली धुकधुकी ॥ सावधान तरी होऊं दया ॥६६॥
तोत्रा चाटया तोत्रा गिर्‍हाईक ॥ बोलतां दोघांस राग अधिक ॥ मग कलहप्रसंग देख ॥ लोकांत तमाशा सहजचि ॥६७॥
यापरी ज्यापासी शांति नाहीं ॥ तो अवघाचि विलग परमार्थ पाहीं ॥ घरा आलिया जांवई ॥ कन्या उपयोगा पडेना ॥६८॥
भ्रतार कर्ता चतुर शाहणा ॥ स्त्री गुणाढय लावण्य वर्ते पतीच्या वचना ॥ पुत्र राहाटे उभयतांच्या रक्षूनियां मना ॥ मग किती गोड सांगावें ॥६९॥
आतां माझिया वर ॥ विवेकशांतीचा होय सागर ॥ वृत्ति राहे तदाकार ॥ हो कल्याण अक्षयी ॥७०॥
भारद्वाज म्हणे नृपकुमरा ॥ उडो संताप उर्मीचा थारा ॥ जाय कुवासना घेऊन मत्सरा ॥ न बाधे जरा दशा नूतन ॥७१॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हे षड्‍वैरी अनिवार ॥ यांनीं बुडविलें बहुतांचें घर ॥ केले कष्ट वृथाचि ॥७२॥
ऐसे जे दुर्जन वैरी ॥ हे न वसोत तुझिया अंतरीं ॥ माझिया वरदकल्लोळ करीं ॥ हो कल्याण अक्षयीं घर ॥७३॥
विश्वामित्र म्हणे ध्रुवराया ॥ धरीं धैर्य वरें माझिया ॥ बळकट असो तुझी काया ॥ निश्चभ वसो मेरुसम ॥७४॥
बैसे पद्मासन घालून ॥ एकत्र मिळतील पंचप्राण ॥ षट्‍चक्रांतें भेदून ॥ कुंडलिनी प्राशील सत्रावी ॥७५॥
लागेल मुद्रा खेचरी ॥ प्रगटेल अगोचरी चांचरी ॥ बैसेल कळाशी भूचरीं ॥ लक्ष लागो अक्षयीं ॥७६॥
वृत्ति मिसळो सहस्त्रदळीं ॥ लागो ब्रह्मानंदीं टाळी ॥ अजर अमर काया हो सकळी ॥ आशीर्वादें आमुच्या ॥७७॥
गौतम वदे दया करुन ॥ सर्व शास्त्रीं मति दारुण ॥ चौदा विदया गुणसंपन्न ॥ वसोत हृदयीं तुझिया ॥७८॥  
चातुर्य परीक्षिका चौसष्टी कळा ॥ बुध्दीस बोध भासत आगळा ॥ सदा शुची शुध्द निर्मळा ॥ पापमळ न लागो ॥७९॥
तुझा संकल्प जाय सिध्दी ॥ तूतें विघ्न कदापि न बाधी ॥ सेवे तिष्ठती अष्टसिध्दी ॥ होय निधी विधीचा ॥८०॥
ज्या सुखासी नाहीं भंग ॥ तें सुख असो तुज अव्यंग ॥ तूतें न छळो अनंग ॥ माझिया वरें सुजाणा ॥८१॥
वसिष्ठें धरुनि हनूवटी ॥ शंख लाविला कर्णपुटीं ॥ बीजपुत्र फुंकिला होंटीं ॥ ज्याचें तेज ब्रह्मचि ॥८२॥
म्हणे बाळका समसमान ॥ दिसो सबाह्य चैतन्य ॥ अद्वैत बोधें ज्ञानसंपन्न ॥ प्रकाशो तुर्या अक्षयी ॥८३॥
भेटी देवोनि पुरुषोत्तम ॥ दिसो पिंडब्रह्मांडब्रह्म ॥ उडो भेद भ्रांति भ्रम ॥ होय सुगम देहबुध्दी ॥८४॥
माझिया वराचें हेंचि बिरुद ॥ तूतें जोडो अक्षयी पद ॥ जेथें न बाधी प्रळय द्वंद्व ॥ करीं आनंद तें पदीं ॥८५॥
जमदग्नि वदे माझे वज्रकवचें ॥ न लगती चपेटे विघ्नशरांचे ॥ भय न वाटे मृत्यूचें ॥ कृतांतवायु स्पर्शेना ॥८६॥
यापरी सप्त ऋषि मिळोन ॥ सभाग्य केला राजनंदन ॥ ध्रुवानें घातलें लोटांगण ॥ अदृश्य जाहले ते समयीं ॥८७॥
ध्रुवास अष्टविध भाव उदेला ॥ प्रेमा हृदयीं बहु दाटला ॥ मग तेथेंचि स्वस्थ बैसला ॥ मेरु जैसा चळेना ॥८८॥
ऋषि अभय पुरतां शिरीं ॥ अष्टांगयोग बाणला शरीरीं ॥ गहन गंभीर निर्भय अंतरीं ॥ तपें तपला अत्यंत ॥८९॥
ध्रुवतप चुंबकान ॥ इंद्रलोखंड कंपायमान ॥ मग अष्टनायका पाचारुन ॥ तपहरिणी प्रेरिल्या ॥९०॥
त्या पातल्या श्रृंगार करुन ॥ केलें सप्तस्वरीं गायन ॥ ध्रुव वदे तुम्ही मातेसमान ॥ स्तनपान देऊं पातलां ॥९१॥
लज्जित अप्सरा होऊनी ॥ ध्रुवास नमोनि गेल्या परतोनि ॥ हें जाणोनि कुलिशपाणी ॥ यक्षिणी प्रेरी विघ्नासी ॥९२॥
ती विक्राळ भयानक ॥ पुढें धांवली पसरोनि मुख ॥ आरडोनि मारी हाक ॥ दचके कृतांत जयापरी ॥९३॥
बहुतांपरी दावूनि रुप ॥ खटाटोप केला अमूप ॥ ध्रुवाचें मन गगनरुप ॥ यक्षिणी-वायूनें चळेना ॥९४॥
मग इंद्र पाचारी वरुणा ॥ त्वां शिळावृष्टि करोनि नाना ॥ मारावें उत्तानपादनंदना ॥ दोष तूतें नसेचि ॥९५॥
मही जल अनल अनिल नभासी ॥ पाप नाहीं तुम्हां पांचांसी ॥ यालागीं मारुन ध्रुवासी ॥ राखें आम्हासी निर्भय ॥९६॥
अगस्ति पुसे स्वामीस ॥ पाप नसे पंचभूतांस ॥ शेखीं न दिसे आत्मयास ॥ पाप कोणासी हें सांगा ॥९७॥
स्वामि म्हणे ऋषि समर्था ॥ पाप कोणतें तत्व पाहतां ॥ हे मनाची कल्पकता ॥ पाप पदार्थ असेना ॥९८॥
पाप काय स्वतां भूत ॥ जें संचरे शरीरांत ॥ पोटीं जन्मला नाहीं सुत ॥ मृत्युचिंता कासयाची ॥९९॥
रात्र न दिसे दृष्टीं ॥ मग सूर्याच्या करी कवण गोष्टी ॥ पापचि नाहीं सृष्टीं ॥ पुण्याची राहाटी कासया ॥१००॥
पापाचें मूळ ते वासना ॥ वासनेचें मूळ ते मनोमयकल्पना ॥ कल्पनेचें मूळ अंत:करण जाणा ॥ अंत:करण तोचि विष्णू ॥१॥
विष्णु तोचि उल्लेख ॥ उल्लेख तोचि ब्रह्मा देख ॥ शाखामूळ वृक्ष एक ॥ संशय धरणें कासया ॥२॥
अगस्ति म्हणे कळली खूण ॥ यास वेदवेदांत प्रमाण ॥ पुढें ध्रुवाचें आख्यान ॥ निवेदा स्वामी स्वयें मुखें ॥३॥
स्वामी म्हणे मुनिवर्या ॥ वरुणास इंद्रें आज्ञापिलिया ॥ हें जाणोनि नारद लवलाह्यां ॥ वार्ता सांगे विष्णूपासीं ॥४॥
राज्य त्यागून वनांत ॥ ध्रुव बैसला परम भक्त ॥ इंद्रे प्रेरिलें वरूणास ॥ शिलावृष्टि करावया ॥५॥
अवघें ठाउकें असें तूतें ॥ माझा स्वभाव वदतों येथें ॥ विष्णु उठोनियां त्वरितें ॥ चक्र घेऊनि धाविन्नला ॥६॥
निवारोनि विघ्नासी ॥ अढळपदीं बैसविलें ध्रुवासी ॥ त्वां पुशिल्या प्रश्नासी ॥ निवेदिलें म्यां मुनिवरा ॥७॥
एके दिवशीं पुसे भवानी ॥ शिवासि प्रार्थी करुणावचनीं ॥ लोपामुद्रा जानकी मिळोनी ॥ संवादलीं तें सांगा ॥८॥
हांसोनि बोले त्रिपुरारी ॥ बरें परिसें हिमालयकुमारी ॥ रामें रावण संहारिल्यावरी ॥ अयोध्येसी चालिला ॥९॥
सवें जनकाचि बाळा ॥ मागें चाले जैसी चपळा ॥ पुढें ऋषिआश्रम देखिला ॥ मनोरम वरुणसुताचा ॥११०॥
महीसुतेचा धरुनि कर ॥ प्रसन्नवदनें वदे रघुवीर ॥ म्हणे कुंभोद्भवाची नार ॥ बुध्दि-बोधें आगळा ॥११॥
ज्ञानप्रकाशाची खाणी ॥ चातुर्यरत्नशिरोमणी ॥ हंसगमना शोभे पद्मिनी ॥ विवेकें बोलकी सर्वज्ञा ॥१२॥
तुझी जाहलिया भेटी ॥ ती पाहील अनुभवकसवटी ॥ सेतुबंधन प्रकाश राहाटी ॥ तिच्या पर्णपुटी न प्रेरीं ॥१३॥
सुचवूनि पुढील गुह्यार्थ ॥ चालता देखिला भूपुत्रसुत ॥ त्यास देखोनी जनकजामात ॥ एकमेकां लक्षिलें ॥१४॥
रामअगस्तींसी पडली मिठी ॥ न सुटे बैसल्यास वज्रगांठी ॥ विवादें जोडे फळ ब्रह्म देठीं ॥ न सरे गोष्टी दूसरी ॥१५॥
महोदधि रत्नाकर ॥ तेवीं अगस्तिरघुवीर ॥ किंवा भेटले हरिहर ॥ अथवा आनंदीं स्वानंद मिळाला ॥१६॥
दोन्ही दीप एकत्र करितां ॥ घरांतील बाहेरील म्हणावा कोणता ॥ तैसें अगस्तिरघुनाथा ॥ अंतर काय सांगावें ॥१७॥
जैसी गंगा यमुनेवर लोटली ॥ तैसी लोपा जानकीवर धांवली ॥ किंवा शांतीनें क्षमा आलिंगिली ॥ नातरी दया करुणा जाहल्या मिश्रित ॥१८॥
त्वंपद तत्पद असिपदावर ॥ तेवीं राम ऋषि स्वानंद वोसरीवर ॥ बैसोनि उभयतां गादीवर ॥ बोलती सुखाच्या निज गोष्टी ॥१९॥
तुर्या उन्मनी उल्लेखनगरी ॥ तेवीं सीता लोपा परेच्या माजघरीं ॥ बैसोनि बोलती नवलपरी ॥ तें चतुरीं परिसावें ॥१२०॥
लोपा म्हणे जनकनंदिनी ॥ तूं लावण्य सुकुमार दिव्यदामिनी ॥ राज्य टाकोनि निघतां वनीं ॥ हृदयीं दु:ख जाहलें असेल ॥२१॥
ऐसें लोपेनें पुसतां ॥ उत्तर वदे श्रीरामकांता ॥ बाई रामासवें विचरतां ॥ तें सुख कैचें राज्यपदीं ॥२२॥
राज्यपदीं कारभार व्यसन प्रगटे ॥ सेवक मंत्री समुदाय मोठे ॥ मज एकांती राम भेटे ॥ ऐसा समयो होता तो ॥२३॥
वनीं मागें मी पुढें मी ॥ शयनीं मी सेवेशि मी ॥ अष्टही प्रहर समागमें मी ॥ वियोग नसे दिवानिशीं ॥२४॥
अखंड राम पाहें उघडा ॥ निवती डोळे जाय पीडा ॥ माझिया सुखासि नाहीं जोडा ॥ नसे लेश दु:खाचा ॥२५॥
चमत्कारिली अगस्तिदारा ॥ म्हणे इचा सद्भाव दिसे खरा ॥ इणें केलें प्रखर उत्तरा ॥ जनककुमारी होय कीं ॥२६॥
लोपा पुसे जनकनंदिनी ॥ नूतन दिसे वेणीफणी ॥ साजुक फुलें गुंफिलीं आणोनी ॥ कोणें करणी हे केली ॥२७॥
जानकी म्हणे विचरतां वनीं ॥ भेटली अत्रीची कामिनी ॥ केश विंचरोनि घातली वेणी ॥ पुष्पें गुंफिलीं स्वहस्तें ॥२८॥
चौदा वर्षें आजिपासोनी ॥ न सुकती पुष्पें नूतन वेणी ॥ माझें अभयवर तुजलागोनी ॥ अनसूया माया ते वदली ॥२९॥
लोपा म्हणे सुकुमार चरण ॥ मार्गीं कंटक रुपती दारुण ॥ तेव्हां कंठीं येतसेल प्राण ॥ संताप ऊर्मी बहुदु:ख ॥१३०॥
सीता वदे मही जननी ॥ माझी अवस्था देखोनी ॥ लोण्यासारिखा मार्ग करोनी ॥ चालतां संतोष मज वाटे ॥३१॥
सखे मध्यान्हीं पातल्या भानू ॥ उष्णकिरणें कर्पे तनू ॥ कासाविस होतसे प्राणू ॥ तेही व्यथा अनिवार ॥३२॥
बाई सूर्य पूर्वज जाणा ॥ मजकडे पाहोनी येतसे करुणा ॥ स्नुषा भावोनि रघुनाथअंगना ॥ शीतळ किरणें स्पर्श करी ॥३३॥
सखे ग्रीष्मऋतूचें उष्ण अफाट ॥ कठिण विशाळ लंपट ॥ तेंही संकट महादुर्घट ॥ कैसें तूतें लोटत ॥३४॥
सखे लपेट येतां दुर्धर ॥ तेव्हां समीर करी विचार ॥ माझिया पुत्रस्वामीची नार ॥ केवीं स्पर्शों इजलागीं ॥३५॥
बाई तुज नेलें निशाचरीं ॥ रामें सोडविलें कवणेपरी ॥ वारोनी तुझी खेदलहरी ॥ विजयी जाहला तो कैसा ॥३६॥
परिसोनि लोपामुद्रेची बोली ॥ जानकीस आली हृदयकमळी ॥ म्हणे रामें मजसाठीं केली ॥ अघटित कळा या लोकीं ॥३७॥
मेळवूनि कपि अचाट ॥ पाषाणांचा बांधला घाट ॥ शुक्रपत्रापरी हळुवट ॥ तरती उदकीं हें नवल ॥३८॥
लंकेपर्यंत शतगावें ॥ सेतु बांधिला श्रीराघवें ॥ उतरला कपींचा समुदावे ॥ सुवेळपर्वतीं वेंधला ॥३९॥
ऐसें वदे श्रीरामभार्या ॥ परिसोनि वदे ऋषीची जाया ॥ म्हणे रामें कष्ट करावया ॥ कारण नव्हतें श्रमातें ॥१४०॥
माझिया पतीस येतां शरण ॥ करिता एकचि सिंधूचें आचमन ॥ पदीं चालोनि वानरगण ॥ जाते उडया मारित ॥४१॥
लोपावचन वज्रधार ॥ खोंचलें जानकीचें अंतर ॥ म्हणे वदला होता रघुवीर ॥ तेंचि वचन प्रतीती येतसे ॥४२॥
मग स्मरोनि रघुवीर ॥ उत्तर करी सुंदरा ॥ म्हणे ऋषिमूत्र समुद्र खरा ॥ पवित्र कपी न स्पर्शती ॥४३॥
यालागीं पाषाण तारुनी ॥ कपी उतरले पवित्र गुणी ॥ हें वचन ऐकोनी ॥ चकित जाहली ऋषिभार्या ॥४४॥
मग म्हणे वो जानकी ॥ गोष्टी सांगीसी विवेकी ॥ राम प्रवेशोनि लंकेसी ॥ कैसा रावण मारिला ॥४५॥
जानकी म्हणे कार्मुक वोढूनि ॥ शरें रावणहृदय भेदूनी ॥ सर्व राक्षसांतें मारुनी ॥ विजयी जाहला श्रीराम ॥४६॥
लोपा म्हणे श्रीराम ॥ मनुष्य किंवा परब्रह्म ॥ जानकी वदे पुरुषोत्तम ॥ सर्वांघटी तो नांदे ॥४७॥
परिसोनि जानकीची बोली ॥ लोपा म्हणे भली भली ॥ रावण हृदय कमळीं ॥ आत्माराम होता कीं न होतां ॥४८॥
जानकी जाहली कुंठित ॥ म्हणे काय जीव दों रघुनाथ ॥ राम प्रवेशोनि हृदयांत ॥ ज्ञानकळा प्रवेशली ॥४९॥
रामीं काम नाहीं ॥ काम रावणाचे ठायीं ॥ यालागीं संग न घडे पाहीं ॥ हिर्‍य़ापंक्तीस कैसा कोळसा ॥१५०॥
सर्प धरुं नये हातीं ॥ जेवूं नये श्वान पंक्तीं ॥ मिठी घालूं नये व्याघ्राप्रती ॥ विंचूं कंठीं बांधूं नये ॥५१॥
राम रावणघटीं होता ॥ त्याची विषयकामीं अलिप्तता ॥ निष्काम राम ब्रह्म असतां ॥ सकामीं कैसा घडेल ॥५२॥
जानकी म्हणे चित्रींची सेना ॥ पोतेरे फिरवितां संहारे जाणा ॥ कोण जित्यामेल्याची करी गणना ॥ तैसा खेळ संसारीं ॥५३॥
खांबासूत्राची बाहुली ॥ दोरी तुटतां उलथोनि पडली ॥ तैसी निशाचरांची बोली ॥ काय पुससी साजणी ॥५४॥
मृगांबूचे चिखलीं ॥ त्यांत काय लावाव्या साळी केळी ॥ गगनसुमनांची माळ गुंफिली ॥ वंध्यापुत्रें घालावया ॥५५॥
जें जन्मलेंच नाहीं ॥ त्याचें मरण पुससी काई ॥ सटवल्याचें बारसें पाहीं ॥ लज्जा वाटे कर्तया ॥५६॥
पंचभूतांचें काय मरावें ॥ आत्मा तो अविनाश स्वभावें ॥ तेथील तेथेंच संचलें आघवें ॥ घडमोड तरंगवत ॥५७॥
लोपा म्हणे उडाली भ्रांती ॥ धन्य विशाळ तुझी मती ॥ स्वल्प उरलीसे गुंती ॥ तें तूं सांगें सुजाणे ॥५८॥
राम पूर्णब्रह्म सांगसी ॥ विषयलेश नसे त्यासी ॥ तूं आपुल्या संभोगासी ॥ कैसें करिसी सांगपां ॥५९॥
जानकी म्हणे कोंडें ॥ इणें मज घातलें अवघडें ॥ कैसें उगवूं सांकडें ॥ काय तोंडें सांगावें ॥१६०॥
मग जानकी करी हास्यवदन ॥ म्हणे बरी भेटलीस विचक्षण ॥ नाहीं तेंचि पुससी खोदून ॥ सांगता लज्जा वाटे कीं ॥६१॥
राम केवळ निष्काम ॥ मी कैसी त्यासी लावूं काम ॥ माझ्य़ा भोगाचा संभ्रम ॥ कोण्या युक्तीनें वारावा ॥६२॥
मी म्हणें राम भोक्ता ॥ तरी येऊं पाहे बध्दता ॥ नाहीं म्हणों तरी माझी संभोगता ॥ कोणासी म्यां सांगावी ॥६३॥
यापरी समजोनि चतुरी ॥ श्रीराम स्मरल्या हृदय मंदिरीं ॥ बुध्दि सांवरोनि उत्तर करी ॥ ज्यांत संतोषे ऋषिभार्या ॥६४॥
निष्काम राम कल्पतरु समर्थ ॥ म्यां कल्पिलें फळ देऊनि पुरवी मनोरथ ॥ माझ्या कामनेंत मी तृप्त ॥ विषयातीत राम शुध्द ॥६५॥
कल्पतरुपासी पदार्थ नाहीं ॥ जो कल्पी तो पदार्थ देई ॥ तैसा रामीं विषय नाहीं ॥ माझी कल्पनेंत मी पूर्ण ॥६६॥
राम सहज विषयातीत ॥ मीही अनुभवें अलिप्त ॥ हाही तूतें ज्ञानार्थ ॥ उघड सांगतें परिसावें ॥६७॥
ऐकावें बोलावें ॥ हे गुण आकाशाचे जाणावे ॥ स्पर्शावें सुवास घ्यावे ॥ हे तो गुण वायूचे ॥६८॥
नेत्रीं पहावें अन्न भस्म करावें ॥ हे गुण वन्हीचे जाणावे ॥ रस चाखावे मैथुन करावे ॥ हे क्रिया स्वयें आपाची ॥६९॥
आहार स्वीकारावे मळ त्यागावे ॥ हे गुण महीचे जाणावे ॥ पंचभूतांचे विषय ओळखावे ॥ माझा आत्मा अलिप्त ॥१७०॥
मी स्वयंप्रकाश परिपूर्ण ॥ विश्व विस्तारे माझे किरण ॥ विषयीं स्फुरे स्फुरण ॥ चित्त चैतन्य मीच कीं ॥७१॥
मीच मनाचें मुळीं ॥ उठवीं मनाची उकळी ॥ मीच बध्द मीच मोकळी ॥ मीच उकळी गिळी सगळें ॥७२॥
मीच विश्व विस्तारावें ॥ मीच सर्व रक्षीं स्वभावें ॥ म्यांचि विश्व संहारावें ॥ सखीं विश्व मीच कीं ॥७३॥
हे माझी अनुभव किल्ली ॥ श्रीरामकृपें तुज निवेदिली ॥ तूं भेटलीस माउली ॥ माय बहिण गणगोत ॥७४॥
ऐसें बोलोन गहिंवरली ॥ प्रेमें हृदयीं दाटली ॥ लोपामुद्रा मिठी घाली ॥ आनंदाश्रु पातले ॥७५॥
दोन्ही ओघ एकत्र मीनलें ॥ स्वयें सुखाचे प्रयाग जाहले ॥ श्रवणें श्रोतयां स्नान घडलें ॥ जाती त्रिपात निवे तनू ॥७६॥
दोघीं हृदयीं प्रेमलहरी ॥ एकमय मिसळल्यास सुंदरी ॥ निमग्न होऊनि अंतरीं ॥ स्वस्थ बैसल्या निवांत ॥७७॥
अगस्ति पुसे रामालागून ॥ सुखरुप आलां स्वस्थ कल्याण ॥ राम म्हणे तुमच्या दर्शनें ॥ क्षेम कल्याण अक्षयी ॥७८॥
यापरी लोपामुद्रा संवाद ॥ तूतें सांगीतला सुबुध्द ॥ परिसोनि बहु पावली आनंद ॥ संतोषली जगदंबा ॥७९॥
जाहला ग्रंथाचा शेवट ॥ आहे तेंचि बोलिलों स्पष्ट ॥ अनुभवें उघडिला स्पष्ट ॥ उठविला लोट ज्ञानाचा ॥८०॥
आतां सांगतों चार पुरुषार्थ ॥ परिसा दुतर्फा अर्थ ॥ ज्यांत नुरे भ्रांत ॥ तैसी रीती सांगतों ॥८१॥
शूरपणें भीष्म पुरुषार्थी ॥ दानीं कर्ण हरिश्चंद्र तारामती ॥ औदार्यें एक शाहाणी चांगुणा सती ॥ धैर्य पुरुषार्थ ॥ मयूरध्वजाचा ॥८२॥
धर्म म्हणावा भगवद्भक्ती ॥ अंबरीष रुक्मांगद प्रल्हादमूर्ती ॥ ईश्वरीं निष्ठा पुरुषार्थी ॥ चळणें नाहीं अरिष्टा ॥८३॥
सांगितले धर्म पुरुषार्थ ॥ ऐका अर्थिकांचा अर्थ ॥ द्रव्य मेळवूनि बहुत ॥ करी संसार जोडोनि लौकिक ॥८४॥
वेदशास्त्रें शोधून ॥ अर्थ घेइजे निवडोन ॥ होय ब्रह्मज्ञानी पूर्ण ॥ अर्थ पुरुषार्थ या नांव ॥८५॥
निमाली वासना स्थिर बुध्दी ॥ निष्काम साधन गेलें सिध्दी ॥ मन मीनले निजानंदी ॥ काम पुरुषार्थ मुख्य हा ॥८६॥
जन्मपर्यंत पुण्य जोडोन ॥ पापवासना नातळोन ॥ प्रतापें जिंकीं स्वर्गभुवन ॥ मोक्ष पुरुषार्थ या नांव ॥८७॥
माझा मीच पूर्णब्रह्म ॥ उडाला साधनकष्टभ्रम ॥ जिंकिला परमार्थ जाहला सम ॥ मोक्ष पुरुषार्थ मुख्य हा ॥८८॥
तिन्हीं पुरुषार्थ त्यागून ॥ चौथा त्यागी तोचि धन्य ॥ जेवीं त्रयमात्रा निरसोन ॥ चौथी स्वीकारिती निजज्ञानी ॥८९॥
वायूनें कांपे दीपकळी ॥ भय नाहीं सूर्यमंडळीं ॥ तेवीं चौथा पुरुषार्थ बळी ॥ अक्षय सुखी तो एक ॥१९०॥
नहुष इंद्रपदाहून पावे पतन ॥ ध्रुव अढळपदीं पूर्ण ॥ यारीतीं चतुरीं समजोन ॥ धक्का न सोसे तें कीजे ॥९१॥
जन्ममरणांछी राहाटी ॥ किती पडावें शोकसंकटीं ॥ यालागीं बैसिजे ज्ञानमठीं ॥ चरमगुरुचें भय नाहीं ॥९२॥
किती हुडकाल संसारमडकीं ॥ ज्यांत बैसेल काळाची धडकी ॥ सोडा देहबुध्दी सुडकी ॥ हुडकी आत्मा आपुला ॥९३॥
ओढाळीमुळें लोढणें गळां ॥ कुसंगखोर पायीं आगळा ॥ साधुसंगें मोक्ष गेला ॥ दुर्जनासंगें नरकीं पडे ॥९४॥
संसारसमुद्र गहन जाणोन ॥ सिध्दांतबोध नौकेंत बैसोन ॥ सायुज्यतीरा उतरोन ॥ सुखी नांदा भय नाहीं ॥९५॥
सिध्दांतबोध सूर्यापासी ॥ भ्रांति दिशा न ये स्वप्नासी ॥ अमृतसागरीं बुडणें ज्यासी ॥ मरण त्यासी काय करी ॥९६॥
सिध्दांतबोध समुद्रांतून ॥ जो अर्थरत्नें काढी निवडोन ॥ तो निजकर्मीं लेवोन ॥ दिसेल स्वानंदीं साजिरा ॥९७॥
सिध्दांतबोधाचा लावूण तुरा ॥ तो ब्रह्मानंदीं मारील लहरा ॥ होईल ब्रह्मज्ञानाचा हिरा ॥ चमके सर्वांचे मस्तकीं ॥९८॥
उगींच अक्षरें जोडोन ॥ नाहीं केलें ग्रंथलेखन ॥ येथें श्रीगुरु अंत:करण होऊन ॥ उठविला लोट कवितेचा ॥९९॥
गुरुसमुद्र अंत:करण होऊन ॥ मतीस भरते आलें पूर्ण ॥ ज्ञान लाटा उसळोन ॥ तुषार ग्रंथचि विस्तारला ॥२००॥
या ग्रंथाची अक्षरवटिका ॥ गुरुकृपेनें केली पीठिका ॥ जैसी सत्रावी चंद्रिका ॥ सोळाकळांवरी विराजे ॥१॥
ग्रंथ समाप्त येथून ॥ हर्षें करितों गुरुचें स्तवन ॥ तें परिसावें सज्जन ॥ कैसा उपदेश मज जाहला ॥२॥
एकाएकीं एक ॥ मुनींद्र गुरुचा हस्तक ॥ प्रकाशला ज्ञानदीपक ॥ सबाह्य चिन्मय कोंदलें ॥३॥
यापरी शहास उपदेशे ॥ मुनींद्र गुरुचा पुरता असे ॥ तोही प्रकार अनायासें ॥ समाप्तींत सांगेन ॥४॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये चत्वारिंशोध्याय: ॥४०॥
अध्याय ॥४०॥ ओव्या ॥२०४॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP