श्रीसिध्दान्तबोध - अध्याय १६ वा
‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.
श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
मोठा हुनेरी ईश्वर ॥ नाहीं ते दावी चमत्कार ॥ भरोनि सृष्टीचा बाजार ॥ आपण जाहला गारुडी ॥१॥
मायेचा पेटारा करुन ॥ एक खबुदर काढी आंतून ॥ त्याचे तीन पांच करुन ॥ केले पंचवीस छत्तीस ॥२॥
हत्ती घोडे उष्ट्र मार्जार ॥ विंचु सर्व पक्षी अपार ॥ वाघ कोल्हा मुंगुस उंदीर ॥ दावी काढोनि पेटींतून ॥३॥
पेंटीतून काढी राक्षस ॥ बहुत निर्मिलें देवांस ॥ असंख्यात मानवांस ॥ गणती कोणे करावी ॥४॥
कित्येक निगांडी त्रिचरणी ॥ एकचरणी भाललोचनी ॥ निर्नासिक विशालकानीं एक अंथुरती पांघुरती ॥५॥
एक मुकी एक बहिरी ॥ एक तोंतरी वोंचरी ॥ एक दांतरी घोगरी ॥ एक लंगडे पांगुळ ॥६॥
अस्वलें माकडे वानर ॥ बहुत वनस्पती तरुवर ॥ आकाश वायु वैश्वानर ॥ आप पृथ्वी निर्मिली ॥७॥
जळाहारी मांसाहारी ॥ अन्नाहारी तृणाहारी ॥ एक असती जीवाहारी ॥ वायु आहारी सर्पादी ॥८॥
एवढें लाघवसूत्र केलें ॥ शरीरांत चाळविलें ॥ ऐकती कर्ण पहाती डोळे ॥ नाकीं सुगंध सेविती ॥९॥
पायें चालती मुखें बोलती ॥ हस्तें लेती देती घेती ॥ अन्नपाणी कंठीं घोंटिती ॥ बाहेर वेगळे ॥१०॥
मोठा हुनेर देवाचा ॥ चेडा सोडिला कामाचा ॥ तेणें हरिहर ब्रह्मादिकांचा ॥ घात केला निर्धारें ॥११॥
जाऊनि झोंबला इंद्रासी ॥ भंगें पाडिलीं शरीरासी ॥ कलंक लाविला चंद्रासी ॥ नारदाची केली नारदी ॥१२॥
रावणाचे झोंबला कटीं ॥ हात धुवोनी लागला पाठीं ॥ राक्षस होते कोटयानकोटी ॥ धुळीमाजी घातले ॥१३॥
दुर्योधनाचें हृदयीं संचारला ॥ तो गर्वे घुमों लागला ॥ द्रौपदी पाहूनि पिशाच जाहला ॥ कलह माजला घरांत ॥१४॥
ऋषीश्वरांची पाठी घेतली ॥ योगी सिध्द कित्येक झोडिलीं ॥ पराशराची मुरकुंडी केली ॥ इतरांचा पाड कायसा ॥१५॥
यापरी चेडा बहु माजला ॥ विश्वामध्यें बंबाळ केला ॥ त्यासी गांवगुंड भेटला ॥ शुकयोगी बलिष्ठ ॥१६॥
तो मोठा पंचाक्षरी ॥ दिव्यमंत्राची विद्या भारी ॥ ज्ञान अक्षता टाकूनि वरी ॥ निजवृत्तीनें खीळिला ॥१७॥
यापरी श्रीदेवें ॥ केलें गारुड बहुत बरवें ॥ काय कौतुक सांगावें ॥ हुनेर एक एक हरीचा ॥१८॥
एक्या पेटी आंतून ॥ दाविलें ब्रह्मांड निर्माण करुन ॥ मग अवघें जमा करुन ॥ सांठवी त्याच पेटींत ॥१९॥
येवढे हुनेरी जेणें केले ॥ त्यापुढें इतराचें काय चाले ॥ भूत वेताळ मंत्रबळें ॥ काय जोडे मोक्षगति ॥२०॥
सांपडतां अमृताचा लेश ॥ इतर औषधांचा काय सायास ॥ हृदयीं स्मरतां जगदीश ॥ मुख्य नाम ईश्वराचें ॥२१॥
राम कृष्ण बोलती ॥ भूतें दैवतें लागती ॥ तैसी नोहे नामशक्ती ॥ मोक्षगति सर्वांसी ॥२२॥
हृदयीं मुख्य नाम जपतां ॥ पळे भूत पिशाच देवता ॥ परी तेंचि नाम होतां ॥ चढे दैवें गुरुकृपें ॥२३॥
गुरु करावा शास्त्रें बोललीं ॥ म्हणोनि गुरुमार्गी जाहलीं ॥ कान फुकोनि मोकळी ॥ ध्यान धारणा कळेना ॥२४॥
गुरुमार्गी जे होती ॥ आणि भूतें दैवतें लागती ॥ मग गुरु केलिया विश्रांती ॥ काय त्यानें जोडिली ॥२५॥
गुरुच्या मंत्रेकरुन ॥ न चुके भूतदेवतांचें विघ्न ॥ मग यमपुरीचें बंधन ॥ कैसें निवारेल संसारीं ॥२६॥
हें असो प्रस्तुत ॥ ऐका ऋषीभाष्याची मात ॥ एकापरीस एक बोलत ॥ विशेषता ज्ञानाची ॥२७॥
मागील अध्यायीं ऋषीन ॥ केलें पंचीकरणनिरुपण ॥ सांगितलें तत्त्वांचें विवरण ॥ सृष्टिउत्पति दाविली ॥२८॥
सकळ ब्रह्ममतें एक ॥ हाही दाविला विवेक ॥ तें परिसोनि आणिक ॥ बोलावया सरसावला ॥२९॥
म्हणे तुम्ही ज्ञान बोलला ॥ परी हिशोब करितां चुकलां ॥ प्रपंच आणि देवाला ॥ समता कैसे आणिली ॥३०॥
जन म्हणिजे अज्ञान ॥ स्वस्वरुप ज्ञानघन ॥ उभयतांसी एक म्हणण ॥ हेची नेणीव तुम्हांसी ॥३१॥
ईश्वर करी ब्रह्मांडरचना ॥ जनास मारतां उठवेना ॥ कोण्या अर्थे एक भावना ॥ धरावी ते सांगपां ॥३२॥
देव त्रैलोकींचे जाणें ॥ मनुष्य पाठिमागें नेणें ॥ दिवस रात्र एक करणें ॥ कैसी होईल सांगपा ॥३३॥
स्वरुप घडावें मोडावें ॥ हें तों नये गा अनुभवें ॥ यालागीं तुम्ही परिसावें ॥ मी सांगतों तें निवाडे ॥३४॥
ब्रह्मीं विश्व नाहीं जाहलें ॥ हें तों वेदांतीं बोलिले ॥ ऐसेंचि अनुभवा आणिलें ॥ सनकादिकीं पूर्वीच ॥३५॥
ब्रह्मीं माया नाहीं जाहली ॥ हे तो वेदांची मुख्य बोली ॥ शोधोनि पाहा शास्त्रें सकळीं ॥ श्रेष्ठ वेदांत सर्वांस ॥३६॥
तंव वेदांतीं निर्णय केला ॥ मायेचा विटाळ स्वरुपाला ॥ इच्छा आणि कल्पनेला ॥ स्पर्श नाहीं परब्रह्मा ॥३७॥
जेवढें ब्रह्म तदाकार ॥ तेवढा मायेचा विस्तार ॥ उभयतांपासोनि चराचर ॥ निर्माण जाहलें जाणावें ॥३८॥
स्वरुपीं इच्छा जाहली ॥ श्रुति पूर्वपक्ष बोलिली ॥ तेंचि उत्तरार्धी निरुपिली ॥ जे इच्छा नाहीं स्वरुपीं ॥३९॥
स्वरुप तें इच्छातीत ॥ हा महावाक्याचा सिध्दांत ॥ स्वरुप उपाधिरहित ॥ स्वस्वरुप परमात्मा ॥४०॥
वेदसिंधु मंथन करुन ॥ महावाक्य काढिलें माखन ॥ मायातीत ब्रह्मपूर्ण ॥ कल्पनालेश असेना ॥४१॥
ऐसें वदला एक मुनी ॥ दुसरा म्हणे कळली कहाणी ॥ ऐसिया तुमच्या वचनीं ॥ संदेह कैसा वारेल ॥४२॥
स्वरुप म्हणतां इच्छातीत ॥ मायास्पर्श नसे त्यांत ॥ मग येवढें जगडंबर विख्यात ॥ कोठोनि जाहलें सांगा हो ॥४३॥
ब्रह्म निरामय बोलिलें ॥ तेथूनि कांहीं नाहीं जाहलें ॥ तरी विश्व अवघें निर्मिलें ॥ कोण्या पुरुषें सांग हें ॥४४॥
दुजा ठाव एक असावा ॥ ब्रह्मीं वेगळा दावावा ॥ तरी अनुभव तुमचा बरवा ॥ सत्य मानूं श्रेष्ठ हो ॥४५॥
ब्रह्म पूर्ण किंवा अपूर्ण ॥ हेंचि सांगा शोधून ॥ अनुभवाव्यतिरिक्त ज्ञान ॥ फोल दिसे सर्वही ॥४६॥
आतां परिसा एकचित्त ॥ मीच सांगतों सिध्दांत ॥ ब्रह्म विश्व हा पदार्थ ॥ उभयभागीं दावितों ॥४७॥
जितुकी प्रगटे ज्ञानज्योती ॥ तितुकीचि अज्ञानाची भ्रांती ॥ म्हणोनि समतुल्य असती ॥ ज्ञान आणि अज्ञान ॥४८॥
अज्ञानेंकरुन ज्ञान मोडे ॥ ज्ञानेंकरुन अज्ञान उडे ॥ यालागीं इडेपीडे ॥ समान असती दोन्हीही ॥४९॥
चार प्रहर दिवसाचे ॥ चार प्रहर असती रात्रीचे ॥ गणीत अष्टप्रहरांचें ॥ समतुकेंची जाणिजे ॥५०॥
म्हणोनि उभयभागीं बोलिलें ॥ ब्रह्म माया सम तुले ॥ तयापासोनि विश्व उलालें ॥ संदेह येथें कायसा ॥५१॥
हळद आणि चुन्यास ॥ दोन्ही रंग असती दोहींस ॥ एकत्र करिती तयांस ॥ तिसरें भासे प्रत्यक्ष ॥५२॥
दोन काष्ठांची घसणी ॥ तिसरा अनळ प्रगटे तेच क्षणीं ॥ तेवीं प्रकृति-पुरुषांची मिळणी ॥ होय प्रपंच तीसरा ॥५३॥
याचा अनुभव देहातें ॥ मैथुनसमयीं पाहा निश्चितें ॥ रेत शोणित होता मिश्रितें ॥ बालक उपजे तात्काळ ॥५४॥
अर्धांगीं पुरुषवेष ॥ अर्धांगीं गौरिभास ॥ ऐसें नटला महेश ॥ सोंगें आणि बहुरुपी ॥५५॥
दक्षिण सव्य दोन्ही भाग ॥ उभयतां पाहतां एकचि अंग ॥ तेवीं प्रकृति पुरुष चांग ॥ ओळखा विवेक समरसें ॥५६॥
अधिक अथवा न्यून ॥ बोलों नये यथार्थवचन ॥ ऐसें ऋषि आपुलें ज्ञान ॥ मुनीश्वरासी बोलिला ॥५७॥
ऐसी ऐकोनियां गोष्ट ॥ एक उठला चाऊनि होंट ॥ म्हणे तुम्ही अवघे चावट ॥ एकही नीटा बोलेना ॥५८॥
प्रमाण आणि अप्रमाण ॥ हें ज्याचें तोचि जाणे खूण ॥ तुमचे मतीचें बोलण ॥ काय जाय शेवटा ॥५९॥
कैसी माया कैसा ईश्वर ॥ कोणें पाहिला साचार ॥ नाहीं तोचि प्रकार ॥ भलतें स्थापा स्वबुध्दीनें ॥६०॥
ब्रह्म काळें गोरें सांवळें ॥ ऐसें कोणें देखिलें ॥ अथवा मायेचें स्वरुप काळें ॥ कवणे धरिलें पदरासी ॥६१॥
न कळे पृथ्वीची खोली ॥ समुद्रीं वाळू किती विखुरली ॥ हें नेणोनि ब्रह्माची बोली ॥ केवी यथार्थ मानिता ॥६२॥
किती आकाश लांबरुंद ॥ सांगा वायूचा जन्मकंद ॥ यापरी पंचभूतांचा भेद ॥ गणित करुनी दावा हें ॥६३॥
मायेच्या पोटीं जन्मलें ॥ ब्रह्मादिक हरिहर भले ॥ तेही नेणती याचें मुळ ॥ अगाध कळा म्हणोनी ॥६४॥
जेथें ब्रह्मादिक कुंठित ॥ नेणती याचा अर्थ ॥ तेथें तुम्हीं ऋषि समस्त ॥ व्यर्थ गलबला करीतसां ॥६५॥
यालागीं समस्त ऐका ॥ व्यर्थ हावें भरुं नका ॥ आतां कळला तुमचा अवांका ॥ सांडा गर्व श्रेष्ठ हो ॥६६॥
ऐसा एक बोलिला पाहीं ॥ दुसरा म्हणे यथार्थ ग्वाही ॥ ब्रह्मरुपाचें डोहीं ॥ कोणें ठाव काढिला ॥६७॥
मेला मोक्षासी गेला ॥ तो कोण पाहोनि आला ॥ अथवा चौर्यासीमाजि पडिला ॥ त्यासी कोणें देखिलें ॥६८॥
ईश्वर सर्वांठायीं असे ॥ पाहों जातां कोठें न दिसे ॥ आपुली पाठ आपणासे ॥ अनायासें दिसेना ॥६९॥
यालागीं आमुच्या मतें ॥ भावें भजावें भगवंतातें ॥ शुध्द आचरावें तपातें ॥ नेम निष्ठा धरोनी ॥७०॥
एक म्हणती हेंही बरवें ॥ न ठावकें तरी कर्म करावें ॥ कर्मी ब्रह्म स्वभावें ॥ अनायासें पाविजे ॥७१॥
आपुलें कर्म तें श्रेष्ठ ॥ ऐसें बोलती वेद स्पष्ट ॥ तें सांडोनि आडवाट ॥ कासया जावें श्रेष्ठ हो ॥७२॥
एकें म्हणीतलें स्वभावें ॥ कर्म होईल तरी करावें ॥ नातरी उपासनामार्गीं लागावें ॥ ईश्वराचें अर्चनीं ॥७३॥
घालूनियां पद्मासन ॥ करावा जप धरोनि मौन ॥ विषयवासना निरोधून ॥ मनोवृत्ति मोडाव्या ॥७४॥
सहस्त्रनामांचे स्त्रोत्र ॥ मुखें जपावें पवित्र ॥ बळ असोनियां स्वतंत्र ॥ यात्रे न जाये तो पापी ॥७५॥
परिसोनि ऐसा विवेक ॥ एक म्हणे ज्ञान चोख ॥ अद्वैतबोधें नि:शंक ॥ सुखामध्यें असावें ॥७६॥
कोण करी कर्मासी ॥ कोण बैसे उपासनेसी ॥ ज्ञानें अवधीया निरसी ॥ निष्काम करी वृत्तीला ॥७७॥
यापरी अवघ्यांनी केली ज्ञानाची कडसणी ॥ एकएकाचे बोलणीं ॥ भिन्न जाहला परमार्थ ॥७८॥
बहुतांनीं सांगितलें ज्ञान ॥ कोणाचें मानावें यथार्थ वचन ॥ असत्य कल्पावें कवणा लागून ॥ पडला संदेह भाविकां ॥७९॥
ऐसी गडबड ऋषींची ॥ बहुती जाहली ज्ञानाची ॥ परंतु मति अवघ्यांची ॥ एका ठायीं न बैसे ॥८०॥
ज्या ऋषीचा जितुका आवांका ॥ तितुकें बोलिला ज्ञान विवेका ॥ तें परिसतां भाविका ॥ विस्मय जाहला मानसीं ॥८१॥
याचिपरी ऋषि बोलिले ॥ तें श्रोतयालागीं सांगितलें ॥ पुढें नवल वर्तलें ॥ तें परिसा सज्जन हो ॥८२॥
महेश्वरभट्ट ब्राह्मण ॥ अनुष्ठानीं ज्ञानसंपन्न ॥ तीर्थव्रतें तपसाधान संपादिलीं सर्वही ॥८३॥
चहूवेदांचा अर्थ ॥ सांगों जाणें हो यथार्थ ॥ साही शास्त्रें मूर्तिमंत ॥ मुखोद्गत आसती ॥८४॥
अठरा पुराणें ज्याचे हातीं ॥ सांगतां करतळामळ लागती ॥ नाना कुशलता काव्यस्फूर्ति ॥ हृदयीं वसे ज्याचिया ॥८५॥
जाणे चौसष्टि कळा ॥ चातुर्यज्ञानें गुणागळा ॥ भारत आणि रामायणाला ॥ पाठ करुनी ठेविलें ॥८६॥
यवनभाषा गीर्वाण भाषा ॥ कानडी आणि तैलंगी भाषा ॥ गुजराथी आणि महाराष्ट्रभाषा ॥ जाणे संस्कृत प्राकृत ॥८७॥
हंसगीता अवधूतगीता ॥ जाणे भागवत भगवद्गीता ॥ सहस्त्र स्तोत्रें गुरुगीता ॥ हेंही असे पाठ कीं ॥८८॥
इतुकी विद्या महेंश्वरासी ॥ कोणी संभाषण न करी त्यासी ॥ महांडित ज्योतिषी ॥ शरण येती देखतां ॥८९॥
मग तो भट्ट विस्मय करी ॥ म्हणे माझे विद्येची थोरी ॥ नसे ब्रह्मांडा भीतरीं ॥ दुजा पुरुष मजऐसा ॥९०॥
ऐशी भावना भावी ॥ म्हणे मी कोण आपुल्या जीवीं ॥ देव किंवा मानवी ॥ विचार विवरी अंतरीं ॥९१॥
मी म्हणावें देव आपणासी ॥ तरी सामर्थ्य नाहीं मजपासी ॥ सत्ता ऐश्वर्य पदासी ॥ कोठें जाहला अधिकार ॥९२॥
आज्ञामात्रें सृष्टि रचावी ॥ सवेंचि इच्छेनें मोडावी ॥ माझ्या ठायी येवढी पदवी ॥ नसतां काय ईश्वरत्व ॥९३॥
आतां जीवही म्हणों जातां ॥ येऊं पाहे अज्ञानता ॥ ऐसी भ्रांतीची वार्ता ॥ होती जाहली ब्राह्मणा ॥९४॥
मग अनुतापें संतप्त ॥ म्हणे हें अवघेंचि ज्ञान व्यर्थ ॥ आतां आराधूं आधिदैवत ॥ जो सर्वांसी वरिष्ठ ॥९५॥
जो निर्गुण ब्रह्म सनातन ॥ त्यास करूं पूर्ण प्रसन्न ॥ तो सांगेल तें प्रमाण ॥ होईल निवृत्ति मनाची ॥९६॥
ऐसा निश्चय मनीं केला ॥ पवित्र गंगातीरा गेला ॥ आसन घालोनि बैसला ॥ ब्रह्मप्राप्तीकारणें ॥९७॥
म्हणे जो ईश्वराचा ईश्वर ॥ तिन्ही देव ज्याचे किंकर ॥ मायेहून परात्पर ॥ त्यास नमस्कार पैं माझा ॥९८॥
जो सकळ देवांचा स्वामी ॥ सर्वव्यापक अंतर्यामी ॥ त्या देवाचें पादपद्मी ॥ मस्तक ठेवीं आदरें ॥९९॥
अहो निर्विकार निरंजना ॥ दयासागरा परिपूर्णा ॥ माझी पुरवीं मनकामना ॥ शरण चरणा तव आलों ॥१००॥
ऐसा नेमातें धरुन ॥ ध्यानीं बैसला ब्राह्मण ॥ पुढें परमात्मा येऊन ॥ दर्शन देईल तयासी ॥१॥
होईल दोघांचा संवाद ॥ निर्माण होईल ब्रह्मबोध ॥ त्या कथेचा विनोद ॥ श्रोतयां लागीं निवेदीन ॥२॥
येथून पूर्वपक्ष जाहला ॥ ऋषिभाषण संगतीला ॥ सर्व मतांचा झाडा केला ॥ ज्ञानमति दाउनि ॥३॥
ज्याणें धरविली लेखणी ॥ तोचि काव्याचा अभिमानी ॥ अपूर्व उत्तरार्धाची मांडणी ॥ निरुपीण अवधारा ॥४॥
पहिल्यापासोन सोळा पर्यंत ॥ दाविला पूर्वपक्षाचा सिध्दांत ॥ पुढें उत्तरार्धाची मात ॥ परिसवीन कौतुकें ॥५॥
मागें जितुकें निरुपण जाहलें ॥ तितिक्याचें दर्शन पुढें केलें ॥ अवघ्या मतांचीं मुळें ॥ दाऊन निवडिला परमात्मा ॥६॥
ती परमेंश्वराचीं वचनें ॥ द्रवतील मुक्तपदींची रत्नें ॥ तुम्हीं श्रोते चातक होऊन ॥ वरिच्यावरी झेलावीं ॥७॥
यापरी श्रीभगवान ॥ मज दीनावर कृपा करुन ॥ केले पूर्वार्ध निरुपण ॥ देशभाषा सारिखें ॥८॥
धरुनि टिटवीचा अभिमान ॥ सिंधू जिंकिला गरुडाने ॥ तेवीं मज किंकरा पासोन ॥ ग्रंथ करवी सद्गुरु ॥९॥
तो चमत्कार रसिकां ॥ पुढें होईल ठाउका ॥ आतां आणोनि विवेका ॥ श्रवण करा ग्रंथासी ॥११०॥
येथूनि अनुभवाचें रहस्य ॥ स्वमुखें सांगेल जगदीश ॥ ब्रह्मज्ञानाचा विलास ॥ वोतीन रस अनुपम ॥११॥
त्या सुखाची गोडी ॥ सांगेन अनुभवें करुनि उघडी ॥ शहामुनीची हेंचि जोडी ॥ ईश्वरभजनीं लागला ॥११॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये षोडशोध्याय: ॥१६॥ अध्याय ॥१६॥ ओंव्या ॥११२ ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 21, 2020
TOP