मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध| अध्याय ४३ वा सिध्दान्तबोध प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४३ वा ‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे. Tags : pothisiddhant bodhaपोथीसिध्दान्त बोध अध्याय ४३ वा Translation - भाषांतर श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ गणेश सरस्वती श्रीगुरु ॥ एकरुपें आत्मा साचारु ॥ श्वेत उष्मा प्रकाशे भास्करु ॥ काय भेद कल्पावा ॥१॥बुदबुदा लहरी सागर ॥ थंड कठिण मऊ सागर ॥ शेला सूत कापूस तीन प्रकार ॥ मुळीं विचार एकची ॥२॥एकाचे अनेक अनेकीं एक ॥ सुवर्णी अलंकार नगीं कनक ॥ शून्यापासोनि लक्ष आंख ॥ शेवटीं शून्य एकचि ॥३॥यापरी अभेदभावना ॥ नमूं विश्वमय जनार्दना ॥ मोडूनि भेदाची कल्पना ॥ अभेदभेदीं समरसलों ॥४॥त्याच भेदाचा हृदयीं भर ॥ उठे जी विवेक विचार ॥ बिंदु अक्षरें उमटती अपार ॥ ग्रंथपीठिका रचितसें ॥५॥परिसा चरित्र सावकाश ॥ ज्यांत अनुभव अत्यंत रहस्य ॥ गोड सुढाळ प्रांजळ सुरस ॥ निर्मळ चोख चांगलें ॥६॥गौडबंगाल देश उत्तरखंडाप्रती ॥ तेथील राजा तिलकचंद सुमती ॥ पराक्रमी विशाळकीर्ती ॥ दयावंत धर्मात्मा ॥७॥त्याची भार्या लावण्यखाणी ॥ चातुर्याची शिरोमणी ॥ सखोल सरळ सुलक्षणी ॥ नाम तिचें मैनावती ॥८॥हृदयकमळीं एकचि शुध्द ॥ जन्मला पुत्र गोपीचंद ॥ ज्याच्या कीर्तीचा छंद ॥ विश्वामुखीं विस्तार ॥९॥जाहलीं द्वादश वर्षें पुत्रास ॥ पित्यानें केला स्वर्गवास ॥ वैधव्य मैनावतीस ॥ गळसूत्र शमनें खंडिलें ॥१०॥गोपीचंद जाहला राज्याधिकारी ॥ विषयांवरी वासना भारी ॥ पर्णिल्या सोळा शतें नारी ॥ बारा शतें नाटकशाळा ॥११॥अहर्निशीं विषयीं रत ॥ भोगीं गुंतले अक्षयीं चित्त ॥ नाठवे प्रपंच परमार्थ ॥ उन्मत्त अतिमदांध ॥१२॥कोणे एके समयीं मैनावती ॥ सहज उभी मंदिरावरुती ॥ निरखितां लक्षी योगमूर्ती ॥ जालंधर सिध्दाची ॥१३॥तो सिध्दांमाजी अग्रणी ॥ तपोनिधि अगाध ज्ञानी ॥ विवेक शांतींत शिरोमणी ॥ जिंकिला काळ पुरुषार्थें ॥१४॥निरामय आनंदभरित ॥ पृथ्वीवरुता सहज विचरत ॥ सदा परोपकारार्थ ॥ काष्ठें वाहे मस्तकीं ॥१५॥काष्ठभार घेतां शिरीं ॥ अधांत्रीं वोझें मस्तकावरी ॥ पाहोनि जन आश्चर्य करी ॥ कोणी त्यासी वोळखीना ॥१६॥ त्या काष्ठांचा विक्रय करुन ॥ द्रव्य तितुकें करी दान ॥ देई अनाथ दीना लागून ॥ अंधपंगू अशक्तां ॥१७॥परोपकार हाचि पुरुषार्थ ॥ परोपकार हाचि मोक्षपंथ ॥ परोपकार समर्थ ॥ करी पार सर्वांसी ॥१८॥परोपकारीं शरीर कर्वतिलें ॥ परोपकारीं मांस कांपिलें ॥ चांगुणेनें बाळ वधिलें ॥ राज्य दीधलें हरिश्चंद्रें ॥१९॥परोपकारावांचोनि नर ॥ जैसें क्षारकूपांत नीर ॥ किंवा पंडुरोगी शरीर ॥ अथवा अंधपंगू समान ॥२०॥जो परोपकारी पुरुष नाहीं ॥ तो नपुंसक देह पाहीं ॥ काय करावा षंढ जांवई ॥ व्यर्थ वांझोटी संसारीं ॥२१॥परोपकाराचें अर्थीं ॥ दधीचि ऋषीनें वोपिल्या अस्थी ॥ हें समजोनि जालंधर चित्तीं ॥ परोपकारीं कष्टवी शरीर ॥२२॥काष्ठें विकोनि करी दान ॥ मग वेंची बीदीचे कण ॥ त्यावरी करी उदर पोषण ॥ संतुष्ट सदा आनंदमय ॥२३॥ग्रामाबाहेर अर्धकाश ॥ तेथें करी एकांतवास ॥ कोण न जाय त्या स्थानास ॥ पिशाचमय मानूनी ॥२४॥चिन्हें विलोकूनि नयनीं ॥ मूर्ति ठसावोनि गेली मनीं ॥ मैनावती संतोष पावोनि ॥ आश्चर्यातें पावली ॥२५॥म्हणे हा ईश्वर पूर्ण अवतार ॥ नव्हे सिध्द साधक योगी नर ॥ यांचें दर्शनें संसार घोर ॥ भवाब्धीचा तरेन ॥२६॥याची घेतल्या निकट भेटी ॥ तोडील जन्ममरणांची राहाटी ॥ जीव बैसेल ज्ञानमठीं ॥ कृपादृष्टीं याचिया ॥२७॥आतां कोणे उपायें करुन ॥ याचें घडेल मज दर्शन ॥ माझा स्त्रीदेह जाण ॥ लज्जा बुंथीनें वेष्टिला ॥२८॥यासी करावया वोळखी ॥ संगें नेऊं नये कोणी सखी ॥ अवघीं परमार्थीं पारखीं ॥ नव्हेत विवेकी सुखाचीं ॥२९॥आतां बैसोनियां मनोरथीं ॥ धैर्य करुनियां सोबती ॥ घेऊनि सद्भाव श्रध्दा सुमती ॥ शरण जावें योगिया ॥३०॥ऐसें विचारुनियां महासती ॥ निशी पातल्या मध्यरात्रीं ॥ दोर लावूनि महाल खालती ॥ उतरती जाहली निर्भय ॥३१॥वस्त्रें सांवरोनि घाली कांसोटा ॥ निरखीत चालली नीट वाटा ॥ निशींचा अंधकार होता मोठा ॥ चिंता चित्तीं असेना ॥३२॥हरुषें पातली त्यास्थळा ॥ जेथें योगिराज बैसला ॥ मग पाहोनि निर्मळ डोळां ॥ अष्टभावें निवाली ॥३३॥प्रेम भरोनियां चित्तीं ॥ घाली लोटांगण सद्भक्तीं ॥ प्रदक्षिणा करोनि सिध्दाप्रती ॥ कर जोडूनि उभी ठाकली ॥३४॥योगिराज होते समाधिस्थ ॥ ध्यानीं पाहात त्रैलोक्य समस्त ॥ स्वर्गींची रचना विलोकित ॥ सत्य कैलास वैकुंठ ॥३५॥सप्त पाताळें सप्त द्वीपें ॥ पाहे दशखंडीचे महाभूप ॥ देश पर्वत नगर अमूप ॥ समीप देख ज्ञानदृष्टीं ॥३६॥निरखितां गौडबंगाल देश ॥ मठीं एक अंगना उभी असे ॥ मग पावोनि विस्मयास ॥ ध्यान विसर्जीं योगींद्र ॥३७॥उघडोनि पाहे नेत्रकमळीं ॥ पुढें उभी लावण्यपुतळी ॥ म्हणे तूं कोण यावेळीं ॥ किंनिमित्त आलीस ॥३८॥मैनावती घाली लोटांगण ॥ म्हणे मी अनाथ रंक दीन ॥ सर्वभावें मी शरण ॥ कृपादान मज करीं ॥३९॥पाहोनि तुमच्या स्वरुपासी ॥ वेधोनि गेलें माझ्या मानसीं ॥ कल्पोनी स्त्री देहासी ॥ उपेक्षा न करीं दयाळुवा ॥४०॥तिलकचंदाची पट्टराणी ॥ गोपीचंदाची जननी ॥ सुकृतें पाहिलें तुजलागोनी ॥ नाम माझें मैनावती ॥४१॥एकोनि बोले तीस योगी ॥ आम्ही नव्हेति सिध्दयोगी ॥ आतां भक्षूं तुजलागीं ॥ जाय वेगीं माघारी ॥४२॥आम्ही तामस पिशाच अघोर ॥ निर्दय निष्टुर मांस खाणोरी ॥ तूं पडलीस या फेरीं ॥ कैसी वांचोनि जासील ॥४३॥मैनावती म्हणे स्वामी ॥ तुमचे लक्षितां पादपद्म आम्ही ॥ कोठें उद्भवेल संतापउर्मी ॥ अंतर्यामीं तूं साक्षी ॥४४॥भूतीं भूत तूं महद्भूत ॥ पिंड ब्रह्मांड खासी समस्त ॥ नुरे चंद्र सूर्यांचा अंत ॥ शेखीं खासी जीवशीवां ॥४५॥भूतीं भूतात्मा तूं एक ॥ अंतकाचाही अंतक ॥ मारिसी कर्मावरी मेख ॥ नव्हेसि भक्षक गोसावी ॥४६॥आतां लागतें मी पायां ॥ उदार होई योगिराया ॥ नको पाहूं माझी चर्या ॥ करीं छाया कृपेची ॥४७॥पाहोनि सतीचा भाव दृढतर ॥ संतोष पावला जालंधर ॥ म्हणे ईचें सुकृत अपार ॥ अनुतापें तापली ॥४८॥मग परमकृपें अवलोकुनी ॥ बीजमंत्र उपदेशिल कानीं ॥ शिरीं अभयपाणी ठेवोनि ॥ तन्मय केली समाधी ॥४९॥विसरली स्त्रीपुरुषभावना ॥ उडाली जीवशीव-कल्पना ॥ न दिसे गुरुसी जाणा ॥ स्वयें स्वरुपीं कोंदली ॥५०॥कैंचें पाप कैचें पुण्य ॥ जिरोनि गेलें मीतूंपण ॥ सबाह्य अंतरीं चैतन्य ॥ कल्पांबुधि जाहाला एकचि ॥५१॥शब्द विरे नभाचें पोटीं ॥ लहरी तोयांचि पडे मिठी ॥ तेवीं जाहलीसे गोरटी ॥ उठी उतरली विषयाची ॥५२॥करें कुरवाळोनि सुकुमार ॥ देहांत आणिली सुंदर ॥ नेत्रकमळीं झरे नीर ॥ प्रेमा हृदयीं दाटला ॥५३॥मस्तक ठेवोनि चरणकमळीं ॥ कर जोडोनि उभी ठेली ॥ मंजुळशब्दें बोलली ॥ अति नम्र होवोनी ॥५४॥परिसें स्वामी योगिराजा ॥ पावलासी भक्तकाजा ॥ हेत पूर्ण केलासी माझा ॥ निवलें तरलें तव चरणीं ॥५५॥गुरु पहा लक्षकोटी ॥ परी नवल तुझी हातवटी ॥ व अवलोकितां कृपादृष्टीं ॥ बैसविलें पदीं मोक्षाचें ॥५६॥ज्यासाठीं साधनें अगाध ॥ तो सहज जाहला समाधिबोध ॥ कोंदोनि गेला निजानंद ॥ न दिसे द्वंद्व द्वैताचा ॥५७॥विराला जाति कर्म कुळाभिमान ॥ जाहलें संचित प्रारब्ध दहन ॥ अक्षयीं सुखी केलें कल्याण ॥ अढळ बैसलें साम्राजी ॥५८॥थोर कृपेची जाहली गरिमा ॥ पुसणें सांगावयाची जाहली सीमा ॥ नांदूं आनंदमंगळधामा ॥ नाहीं उपमा या सुखा ॥५९॥ऐसें बोलोनियां गोरटी ॥ हर्ष न माये तिच्या पोटीं ॥ मग चरणीं घालोनि मिठी ॥ मौनावली चौंवाचे ॥६०॥यापरी संतोष पावोनि जालंधरें ॥ उठविली धरोनियां दोन्ही करें ॥ मग म्हणे शाबास सुकुमारें ॥ बरें सार्थक त्वां केलें ॥६१॥तुतें जाहली स्वरुपप्राप्ती ॥ हें सुख सांठवीं आपुल्या चित्तीं ॥ गुह्य फोडों नको कोणाप्रती ॥ गुज ठेवीं अंत:करणीं ॥६२॥आतां आलीस तैसी जाई ॥ सुखरुप नांदें आपुल्या देहीं ॥ माझी आज्ञा पाळिल्या पाहीं ॥ दासी होती चारी मुक्ती ॥६३॥आज्ञापितां महायोगी ॥ संतोष पावली अंतरंगी ॥ चरणकमळ वंदोनि उगी ॥ येती जाहली स्वगेहीं ॥६४॥जो अनुभव जाहला तीतें ॥ तेणें शांत जाहल्या वृत्तीतें ॥ सुशीळ पवित्र निर्मळ मतीतें ॥ वागवी देहसंबंध ॥६५॥उघड मुद्रा जगीं जगदीश ॥ लक्षी एकचि चिदाकाश ॥ ऐसिया पावोनि भाग्यास ॥ राहे निमग्न सर्वदा ॥६६॥यावरी कोणे एके दिवशीं ॥ गोपीचंद बैसला स्नानासी ॥ वनिता तिष्ठती सेवेशीं ॥ साहित्य सर्व घेवोनि ॥६७॥रत्नजडित चौकी जिरी ॥ राव बैसला जाऊनि त्यावरी ॥ भोंवत्या वेष्टोनियां नारी ॥ नाना विलास जाणविती ॥६८॥दोघी प्रक्षाळिती दोन चरणां ॥ दोघी लाविती उटणें जाणा ॥ दोघी घालिती विंझणा ॥ दोघी चामरें ढाळिती ॥६९॥एक करोनि देतसे विडा ॥ एक झारी घेऊनि उभी पुढां ॥ एक धांवोनि दुडदुडां ॥ पिकदाणी वोढवी ॥७०॥वाजती पायीं पैंजण मधुर ॥ घुमघुमे नाद उठे गजर ॥ ध्वनि ऐकोनि माडीवर ॥ माया पाहे तळवटीं ॥७१॥पुत्र बैसला चौरंगावरी ॥ भोंवत्या वेष्टिती सुंदर नारी ॥ तनु सुकुमार साजिरी ॥ लावण्यपुतळा नेटका ॥७२॥ गोचिरा बळसंपन्न ॥ हर्षवदन विशाळ नयन ॥ रत्नासारिखे दों बाहीं दशन ॥ वोतींव मदनाचा पुतळा पैं ॥७३॥बहु नक्षत्रें एक चंद्र ॥ बहु नागिणी एक भोगींद्र ॥ तैंसा शोभला नरेंद्र ॥ थाट बहुत वनितांचा ॥७४॥बहु किरण एक भास्कर ॥ बहु नदया एक सागर ॥ बहु अक्षरें एक ओंकार ॥ बहु वासना मन एक ॥७५॥बहु लतेनें वेष्टीला तरुवर ॥ बहु कमळीं एक भ्रमर ॥ यापरी बहु कामिनी एक नृपवर ॥ भोक्ता त्यांसी गोपीचंद ॥७६॥मैनावतीनें पाहोनि डोळां ॥ म्हणे हा वोतींव रसपुतळा ॥ लावण्यरुपीं विकासला ॥ कैसा वोतींव रोखिलासे ॥७७॥ऐशिया सगुणबाळासी ॥ पाहतां काळ ग्रासील यासी ॥ काया होईल भस्म स्मशानवासी ॥ दग्ध होईल अस्थिमांस ॥७८॥हें समजोन वाटला खेदू ॥ नेत्रीं आले अश्रुबिंदू ॥ पाठीवर पडतां गोपीचंदू ॥ फिरोनि पाहे माडीवर ॥७९॥जळ भरोनियां नयनीं ॥ शोक पावोनियां रडे जननी ॥ धावोनियां मस्तक ठेविला चरणीं ॥ करी प्रार्थना मातेसी ॥८०॥काय जाहलें कारण ॥ शोक करिसी मनापासून ॥ कोण बोलिलें दुष्टवचन ॥ राणी प्रजा सेवक ॥८१॥जो बोलिला असेल शब्द ॥ त्याचा करीन शिरच्छेद ॥ त्वां सांडोनियां खेद ॥ बोले निर्मळ मजपासी ॥८२॥सर्व राज्याची तूं स्वामीनी ॥ मी सेवक तुझा तुजलागूनी ॥ तुझी आज्ञा शिरीं वंदोनि ॥ सांगसी तें करीन ॥८३॥परिसोनि पुत्राची विनयवाणी ॥ मैनावती बोले अनुतापोनी ॥ म्हणे म्यां खेद केला समजोनी ॥ बरें कुमरा दिसेना ॥८४॥ज्या तनूचा उपचार देख ॥ त्याची होईल उदयां राख ॥ तुझा पिता तुजहूनि अधिक ॥ मजदेखतां भस्मला ॥८५॥तृणकाष्ठाचिया परी ॥ अस्थिकेशा जाळिलें वैश्वानरी ॥ तनु ठेवितां चितेवरी ॥ कोणी न जाहला सोबती ॥८६॥आतां घेईं अनुताप ॥ वमीं विषयवासना पाप ॥ जाळोनि सांडी त्रिविधताप ॥ नसे संताप तें करीं ॥८७॥पूर्वीं राजा भर्तृहरी ॥ तुजपरीस विषयविलास भारी ॥ अनुताप संचरला अंतरी ॥ त्याच्या चरित्रा परिसें पैं ॥८८॥सहस्त्र स्त्रिया पट्टराणी ॥ दोनसहस्त्र नाटकशाळा त्यालागूनी ॥ आणिक वेश्या लावण्यखाणी ॥ या विरहित परद्वारीं ॥८९॥इतुक्या विषयकर्दमांत ॥ राव लोळे मंडूकवत ॥ नेणोनि आपुलें स्वहित ॥ अति उन्मत्त मदांध ॥९०॥एके दिवशीं बहुत वनिता ॥ रासक्रीडा जळीं खेळतां ॥ श्रम पावोनियां चित्ता ॥ वृक्षाखालीं पहुडला ॥९१॥गोरक्षनाथ महासमर्थ ॥ त्या वृक्षापासी आले अकस्मात ॥ राव उठोनियां त्वरित ॥ घाली साष्टांग लोटांगण ॥९२॥म्हणे संसारश्रम जावया ॥ शरण तूतें योगिराया ॥ वृत्ति जडली तुझिया पायां ॥ करीं छाया कृपेची ॥९३॥बुडोन गेलों विषयराहाटीं ॥ स्वहित विचार नाठवे पोटीं ॥ मोहममतेची पडली मिठी ॥ बैसल्या गांठीं सुटेना ॥९४॥परमार्थ जाहला अवघा कडू ॥ विषय वाटती गोड लाडू ॥ कोण्या रीतीनें यातें सोडूं ॥ कैसे जोडूं तुझे पाय ॥९५॥आजि पावेतों विषयींरत ॥ होतों कुबुध्दीमाजी पूर्ण रत ॥ आतां चित्त जाहलें विरक्त ॥ हा महिमा स्वामीचा ॥९६॥तुझिया आगमनाची उडी ॥ वृत्तीनें आनंदाची उभविली गुढी ॥ कोणत्या जन्माची हे जोडी ॥ गोडी तुझ्या पायांची ॥९७॥लोह जडत्व काळिमा पूर्ण ॥ परीस स्पर्शतां होय सुवर्ण ॥ तेवी स्वामीच्या दर्शनेंकरुन ॥ जीवीं न दिसे जीवबुध्दी ॥९८॥मी तों पतित पापी अपराधी ॥ राज्यमदें मातलों दुर्बुध्दी ॥ तूं कृपेचा महोदधी ॥ करीं पावन जीव आत्मा ॥९९॥आजि तुमचें जाहलें दर्शन ॥ राज्यसुख भासे वमन ॥ स्वामीनीं कृपा करुन ॥ करावा उपदेश शुध्दबोध ॥१००॥माझे तनु मन पंच प्राण ॥ केले स्वामीस अर्पण ॥ राज्य सांडिलें ओंवाळून ॥ थुंकोनि सांडिलें थोरिवां ॥१॥हिरे माणिके दिसती खडे ॥ वनिता भासती अस्वलें मूढें ॥ सोनें रुपें हें तों जड ॥ पाषाण निश्चय मानिलें ॥२॥आजिपासोनी सकळ कामिनी ॥ वनितासहित मातें जननीं ॥ साक्ष असे शूलपाणी ॥ दिव्य पाय मज तुझे ॥३॥सत्यसंकल्प गुरुराजा ॥ म्यां अनुतापाची लाविली ध्वजा ॥ तुझिया संगें करीन मौजा ॥ मानिलें राज्य विषवत ॥४॥नको नको पुरे पुरे ॥ कोण फिरतो भवफेरे ॥ आतां तुझे पाय दिसती बरे ॥ जेणें उध्दरे जीव माझा ॥५॥पुरे संसार छी छी ॥ अस्थिमांसांच्या तनूची ॥ सांठवण आतं विष्ठामूत्राची ॥ काय रुची कफ वात ॥६॥आतां घेईं जानचक्र ॥ सोडवीं घोर संसारनक्र ॥ जेवीं स्वर्गीं राजा शक्र ॥ तेवीं बैसवी कैवल्यपदीं ॥७॥मृत्यूलोकीं राज्य पदवी ॥ जैसी श्रियाळशेट जगांत मिरवी ॥ किंवा रायविनोदें सोंग दावी ॥ अथवा गंधर्वनगरीं काय हुडे ॥८॥जमे वितुळे अभ्र छाया ॥ तेवीं पाहतां दिसे माया ॥ मेघ वळे वोसरे जाय लया ॥ अथवा विदया वोडंबरी ॥९॥स्वप्नींचा लाभ आणि हानी ॥ जागृतीमाजी कोण गणी ॥ दुर्बळाची संसारकाहाणी ॥ परिसिल्या काय संतोष ॥११०॥पति करी दुसरे नारीस ॥ पहिलीस काय सवतीचा उल्हास ॥ सजलिया राधेच्या सोंगास ॥ व्यर्थ विटंबना पुरुषाची ॥११॥आतां असो संसारराहाटी ॥ तुझिया पायीं घातली मिठी ॥ मजवर पाहें कृपादृष्टीं ॥ करीं वृष्टि सुखाची ॥१२॥पाहोनि अनुताप रायाचा ॥ संतोषला आत्मा श्रीनाथाचा ॥ म्हणे बरा विवेक चित्ताचा ॥ निश्रयो केला एकनिष्ठ ॥१३॥म्यां सांगावा अनुभव सुरेख ॥ त्याचा त्वांचि कथिला विवेक ॥ उपदेश करावया देख ॥ नाहीं राहिला अणुमात्र ॥१४॥वैराग्य भाग्याची दशा ॥ ते आली नरेशा ॥ सोडिली राज्यभोगाची आशा ॥ दु:खलेशा वारिलें ॥१५॥या कर्मांचे कापुरगिरी ॥ जाळिले अनुताप वैश्वानरीं ॥ रवि उदयीं कैची शर्वरी ॥ तेवीं बोधीं भ्रम कैंचा ॥१६॥सन्मुख बैसवूनि श्रीनाथानें ॥ उपदेशिला राजनंदन ॥ कर्णीं बीजमंत्र फुंकोन ॥ शिरीं हस्त ठेविला ॥१७॥लागली तन्मय उन्मनी निद्रा ॥ न दिसे पाहतां अविदया भद्रा ॥ लक्ष्मी चिन्मय पूर्णचंद्रा ॥ वारिले दरिद्रा मृत्यूच्या ॥१८॥सबाह्य ब्रह्म एक लक्षी ॥ न दिसे भेद कल्पना पक्षी ॥ आपआपणा जाहला साक्षी ॥ अक्षय सुखीं सुखावला ॥१९॥चहूंकडे स्वरुप पारखी ॥ ब्रह्मचि दिसे नाथ गोरखी ॥ आप आपणातें जंव निरखी ॥ दिसे ओळखी ब्रह्मची ॥१२०॥मग म्हणे नाथ बाबा ॥ बरा केला जी अचंबा ॥ आतां घेईन हातीं तुंबा ॥ करीन योग आवडी ॥२१॥वाजवीन अनुहताची शिंगी ॥ बैसेन अनुभवाची तुरंगीं ॥ चातुर्य सुखाचे संभोगीं ॥ मिरवेन योगीं योग्यता ॥२२॥ बैसवीन वैराग्याची कडकी ॥ उडवीन महाकाळाची धडकी ॥ त्यागीन देहलोभाचीं मडकी ॥ तुटकी जेवीं पैजार ॥२३॥लावीन अनुभवचा तुरा ॥ उडवीन कुवासनेचा थारा ॥ मारीन मीपण पामरा ॥ अहंकारद्रुम उपडीन ॥२४॥घेईन क्षमेची विशाळ ढाल ॥ विवेकखड्ग वागवीन प्रबळ ॥ शांतिटोप शिरीं अढळ ॥ ज्ञानकवच लेईन ॥२५॥घेईन एकात्मतेची गदा ॥ भेदभोंदूचा करीन चेंदा ॥ वागवीन लयलक्षाचा हुद्दा ॥ जिंकीन निंदा मत्सर ॥२६॥ऐसें बोलूनि राजा भर्तृहरी ॥ केशांच्या जटा वळल्या भारी ॥ भस्म लावून शरीरीं ॥ फेडिला पीतांबर नेसला कौपीन ॥२७॥झोळी पात्र घेतली किंगरी ॥ श्रीनाथास नमस्कार करी ॥ जोगी होऊनियां भर्तृहरी ॥ गेला भिक्षेस महालांत ॥२८॥उभा ठाकला महाद्वारीं ॥ अलेख शब्दे हांक मारी ॥ भिक्षा घाला वो मातोश्री ॥ तों दासीनें लक्षिला ॥२९॥परतोन गेली मंदिरांत वेगीं ॥ म्हणे बाई राजा जाहला जोगी ॥ राख लावूनियां अंगीं ॥ भिक्षा दयावी बोलता ॥१३०॥असत्य नव्हे माझें वचन ॥ तुम्हीं पाहा विलोकून ॥ राणी होऊन क्रोधायमान ॥ ताडन करी दासीला ॥३१॥द्वारासी आली महारागें ॥ तों पतीनें घेतला देखे जोग ॥ म्हणे कांहो दावितां सोंग ॥ ठकवावया आम्हांतें ॥३२॥तो म्हणे माते भिक्षा देईं ॥ येरी म्हणे बोलतां विपरित काई ॥ गलबला ऐकोनियां गेहीं ॥ सहस्त्र अंगना धाविन्नल्या ॥३३॥राव ओळखोनियां दिठीं ॥ अवघ्या पायीं घालिती मिठी ॥ वेष घेतला कासयासाठीं ॥ खरा कीं सोंग महाराजा ॥३४॥येरु म्हणे ऐका मातोश्री ॥ माझ्या कामवासनेची जाहली बोहरी ॥ अनुताप संचरला अंतरीं ॥ भजनलहरी ऊठली ॥३५॥गेले विषयांचे ढग ॥ विकल्प पळाला मांग ॥ रतिविलास वनितासंग ॥ ओकून त्यावर थुंकलों ॥३६॥विषयवासना गेली निवटोन ॥ सकळ ललना मातृवत् मानोन ॥ मन गेलें उन्मन होऊन ॥ देहीं देहभाव असेना ॥३७॥हें परिसोनि सकल नारी ॥ पडिल्या सर्व शोकसागरीं ॥ नयनीं नीर चाललें भारी ॥ कपाळ पिटती आपुलें ॥३८॥ज्या तनूस सुगंध लाविले अनेक ॥ त्यास लाविली रायानें राख ॥ सुकुमार कुरळ केश देख ॥ त्याच्या केल्या जटा ॥३९॥कोण प्रक्षाळी तुमचे चरण ॥ कोण करील संगें शयन ॥ कोण बोलेल हास्य करुन ॥ कोण देईल भोजनविडा ॥१४०॥राजा म्हणे विश्व आपुलें ॥ घरोघरीं मायबाप संचले ॥ पादप्रक्षाळणीं नदया अनुकूल ॥ वस्त्रें अंबर मंचक धरा ॥४१॥महाल मंदिर द्रुम-च्छाया ॥ उशा पाषाण धुणी पासिया ॥ किन्नरी मंजुळ गाणें गाया ॥ बोले आपआपणा ॥४२॥शिरीं अक्षयी बोधछत्र ॥ हातीं सुविचार घेतलें पत्र ॥ नानाद्रुमीं फळें विचित्र ॥ भक्षावया आवडी ॥४३॥हे परिसोनि बोले अंगणा ॥ ज्याणें उपदेशिलें तुज ज्ञाना ॥ तो पावो निसंताना ॥ जेणें विघडिलें आम्हांसी ॥४४॥गुरुनिंदा परिसोनि श्रवणीं ॥ त्रास पावोनिया मनीं ॥ मौनेंचि परतला जनीं गेला संबंध तोडोनियां ॥४५॥यापरी तोडोनि बंधन ॥ आपुलें केलें कल्याण ॥ विचरे जनीं वनीं आनंदघन ॥ कीर्ती भूषण जगामुखीं ॥४६॥यापरी भर्तृहरीचें चरित्र ॥ निर्मळ कीर्ती परम पवित्र ॥ परिसोनि माझेही ॥ आनंद पुत्रा पावलें ॥४७॥पूर्वी राजा होता गंगाधर ॥ भार्या त्याची रखुमाई सुंदर ॥ पुत्राचें नाम रत्नाकर ॥ ऐकें चरित्र तयाचें ॥४८॥राव गेला स्वर्गलोका ॥ कांतेनें फार केलें शोका ॥ तीस भेटला निजसखा ॥ श्रीदत्त योगिया ॥४९॥पाहोनियां श्रीदत्त ॥ शोक करी अद्भुत ॥ म्हणे स्वामी वैधव्यपणांत ॥ विटंबना देहाची ॥१५०॥वनितादेह लज्जायमान ॥ सदा संकोचित सासुरवास गहन ॥ माहेरासाठीं झुरे मन ॥ मुर्हाळी फिरवितां हृदय फुटे ॥५१॥सासु-नणंदांची जाचणी ॥ नित्य पतीची कांचणीं ॥ किती लवोनि चालावें जनीं ॥ बाहेर फिरतां बोलतां नये ॥५२॥किती अवळावें ठायीं ठायीं वेणी ॥ किती टोचावें कानालागोनी ॥ नाकास छिद्र पाडोनी ॥ कटीं किती वेष्टणें ॥५३॥दंड कर माजघोटें बोटांत ॥ दशांगुळांसि बंधन होत ॥ कर बोटांत मुद्रिका दाटत ॥ काय तें सोंग शरीरा ॥५४॥पति निमालिया जाणा ॥ भूषणांची विटंबना ॥ यापरी वनितादेह जाणा ॥ कुश्चळ अमंगळ विटाळाचें ॥५५॥तरूणपणीं चालत अंगना ॥ परपुरुषांची धांवे वासना ॥ कापटयखाणी कलहो जाणा ॥ वनितादेह साजिरा ॥५६॥बंधु सख्यांत वैराकार ॥ घर फोडोनि करी वेगळेचार ॥ महाराजांचे राज्यभार ॥ विनाशातें पावले ॥५७॥त्या कुडींत सांठवण ॥ त्यावरी पातलें वैधव्यपण ॥ शोक घोर जाहला दारुण ॥ चित्त चिंतेनें भवचक्रीं ॥५८॥तिचा परिसोनि वृत्तांत ॥ कृपेनें द्रवला श्रीदत्त ॥ मस्तकीं ठेविला अभयहस्त ॥ कृपादृष्टीं पाहिलें ॥५९॥अमृतांची पडतां मिठी ॥ मग मृत्यूच्या कैंच्या गोष्टी ॥ बैसतां मारुतीच्या पाठीं ॥ भूतबाधा मग कैंची ॥१६०॥राया संगे चालतां स्वारीस ॥ तस्कार भय करील त्यास ॥ सूर्यरथीं अरुणास ॥ उदयोग दीपाचा घडेना ॥६१॥ श्रीदत्तें कृपा केलिया ॥ गेले शोक मोह दु:ख लया ॥ विवेक पावला तीतें उदया ॥ सग्ददीत कंठें दाटली ॥६२॥तुझी तूंच आत्मकळा ॥ वोळखे आपआपणाला ॥ यापरी बोध ठसावला ॥ रखमाईच्या चित्तांत ॥६३॥बोधूनि गेला दत्तदीप ॥ रखुमाईस पावला अनुताप ॥ जिकडे तिकडे अमूप ॥ चिन्मय दशा कोंदल्या ॥६४॥गेला पतीचा खेद ॥ मनीं भरला ब्रह्मानंद ॥ सर्वदा लक्षी आनंदकंद ॥ न दिसे द्वंद्व दु:खाचा ॥६५॥रखुमाई स्वयें स्वरुपांत मिळाली ॥ पुत्र कर्ता चतुर बळी ॥ तेणें राज्यक्रिया आटोपिली ॥ पित्यापरीस विशेष ॥६६॥रत्नाकर चतुर शहाणा ॥ प्रपंची सावधान जाणा ॥ बहु आवडला जनां ॥ माता त्यासी न बोले ॥६७॥खेद पावोनियां चित्तीं ॥ पुत्र मातेस करी विनंती ॥ माझा संतोष नसे तुजप्रती ॥ काय निमित्त सांग पां ॥६८॥पित्यामागें संसार ॥ म्यां संपादिला बहुताप्रकारें ॥ लोक म्हणती मजला बरें ॥ तूं चितीं कां उदास ॥६९॥माता बोले रत्नाकरा ॥ मूर्ख म्हणती तूतें बरा ॥ काय धरिला त्वां फुगारा ॥ संसाराचे शहाणपणें ॥१७०॥काय करावें बकाचें लक्ष ॥ बिडाल मूषकावरीं दक्ष ॥ शकुनींनें धरिला दुर्योधनाचा पक्ष ॥ किंवा कणीकनीति धृतराष्ट्रें ॥७१॥काय कागाचें शहाणपण ॥ काय कोल्हाटीं बिरुद बांधोन ॥ वृथा सवतीचें भांडण ॥ कीं चावट गोष्टी दुर्बळाच्या ॥७२॥काय शिमग्याचें सोंग समजणें ॥ कीं रायविनोदयाचें बोलणें ॥ कीं चित्रकथ्यांचे पाहणें ॥ कीं खेळ गारोडियांचा ॥७३॥यापरी संसारी बाजेगिरी ॥ जैसी मृगजळाची लहरी ॥ त्यांत तुझी चातुरी ॥ काय उपयोगा येईल ॥७४॥मुलें घालिती हमामा ॥ श्रमी होऊनि भरती दमा ॥ श्रीकृष्णाचा कंस मामा ॥ कार प्रीत चांगली ॥७५॥काय पिनसीचा तुरा पगडी ॥ खासदार नाचवी पराची घोडी ॥ लटकीं वेश्येची प्रीत गोडी ॥ द्रव्य सरल्या विघड पडे ॥७६॥काय स्वप्नींचे मोकासे ॥ दु:खाची रांड चांगली दिसे ॥ काय करावें बोडकीच्या गर्भास ॥ नाश होय बाळाचा ॥७७॥काय कसाबा घरींचे सोहळे ॥ वांझ खेळवी दुसर्यांचीं बाळें ॥ व्यभिचारिणीची आण प्रबळें ॥ काय सत्य मानावी ॥७८॥काय मदयपियाची भाक ॥ शिमग्यांत शंखध्वनीचा कोण हरिख ॥ मोलें रडे तिचा वृथा शोक ॥ काय तेज गुंजांचें ॥७९॥काय गंधर्वनगरीचा कोट ॥ विहीर उपसावयाची मोट ॥ समुद्रीं फुटल्या मिठाचा घाट ॥ काय लोट धुकटाचा ॥१८०॥यापरी संसार मिथ्या ॥ थुंकोन टाकीं पुत्रा तूं त्या ॥ सायुज्यपदीं बैसें आपल्या ॥ धोका नसे काळाचा ॥८१॥काय मुलाम्याचें नाण ॥ वाउगें पदरीं बांधोन ॥ संगें घेऊनियां अंध शुन ॥ शिकार करणें वृथाचि ॥८२॥अंध बधिर मुकी वनिता ॥ मग संतोष काय भर्ता ॥ परीक्षेविण हिरा घेतां ॥ खोटा होय व्यापारीं ॥८३॥आतां पुत्रा संसार वमीं ॥ लक्ष लावीं परब्रह्मीं ॥ जाऊन बैसे मंगळधामीं ॥ जेथें आनंद सुखाचा ॥८४॥यापरी मातेचा उपदेश ॥ हृदयीं बिंबला पुत्रास ॥ लात मारुनि संसारास ॥ अरण्यवासी तो जाहला ॥८५॥तपें तपला अद्भुत ॥ विमान आलें त्यास त्वरित ॥ वैकुंठीं गेला मिरवत ॥ कीर्ति घोष माजविला ॥८६॥आणिक एक ऐकें चरित्र ॥ चंद्रसेन राजा होता समर्थ ॥ राज्यकारभारांत सावचित्त ॥ न्याय नीतीं करितसे ॥८७॥चारी प्रहर चालवी राजकारण ॥ मध्यरात्रीं एकांतीं शयन ॥ म्हणे भाग्यें लाधलों राजमंडण ॥ ईश्वर भेटे तरी बरें ॥८८॥मज देव देईल भेटी ॥ जाऊनि बैसेन वैकुंठी ॥ उभय भागीं लाभ गांठी ॥ उणें काय दैवास ॥८९॥बैसोनियां मध्यरात्रीं ॥ नित्य हाचि विचार करी ॥ एके दिवसीं श्रीहरी ॥ माडीवर उभा ठाकला ॥१९०॥पाय वाजवितां नृपती ॥ म्हणे एवढे मध्यरात्रीं ॥ तस्कर आला कोणें गतीं ॥ शेखीं भय तो पावला ॥९१॥ शस्त्र घेऊनियां करीं ॥ कोण म्हणोनियां हांक मारी ॥ देव त्यासी उत्तर करी ॥ म्हणे मी असें सारवीन ॥९२॥माझा गमावला उंट एक ॥ त्याची करितों शोधणूक ॥ त्वां मारिली हांक ॥ करीं निद्रा संतोषें ॥९३॥राजा म्हणे बोलसी विपरीत ॥ उंट शोधावा वनांत ॥ तूं धुंडिसी माडीवरुत ॥ कोण शाहाणीव हे तुझी ॥९४॥हरि म्हणे तूं मंचकीं बैससी ॥ देव भेटावा हें जरी इच्छिसी ॥ तरी जावें वनासी ॥ राज्य थुंकोन सोडिजे ॥९५॥राजा चमत्कारिला भारी ॥ पश्चात्ताप प्रवेशला अंतरीं ॥ धावोनि पाहे माडीवरी ॥ तों देव गुप्ते जाहला ॥९६॥मग पुत्रास बोलावून ॥ राज्य केलें त्याचें स्वाधीन ॥ आपण संन्यासी होऊन ॥ महाअरण्यांत प्रवेशला ॥९७॥सोडोनि देहाचा लोभ ॥ मन धैर्याचा केला स्तंभ ॥ हृदयीं चिंतोनि पद्मनाभ ॥ निर्भय नि:संग बैसला ॥९८॥निराहार तीन वरुष ॥ लक्षूनि बैसला जगदीश ॥ कृपाळु होऊनियां महेश ॥ येऊन त्यास भेटला ॥९९॥म्हणे जाहलों प्रसन्न ॥ येरु घाली लोटांगण ॥ म्यां निष्काम केलें भजन ॥ हेत कांहीं असेना ॥२००॥तुझें जाहलिया दर्शन ॥ माझें जाहलें कृत कल्याण ॥ मग महेशे विमान आणोन ॥ कैलासवासी तो केला ॥१॥ऐसी भगवद्गीतेची ख्याती ॥ स्वर्गीं ध्वजा त्याच्या मिरवती ॥ विषयलोभी नरकीं पचती ॥ कोण पुसे त्यांलागीं ॥२॥उमज समज पडत अंतरीं ॥ नको जाऊं नरकद्वारीं ॥ यमजाचणीं भारी ॥ दु:ख दारुण बोलवेना ॥३॥तारुण्य जाईल जरा येईल ॥ कर्ण बधिर नेत्र अंध दशन गळतील ॥ दम खोकला झुरळ्या पडतील ॥ घोर लागेल दाटतां कफ ॥४॥काळ चेपेल गळ्यापासी ॥ कोण मैत्र सोडवी या समयासी ॥ पाय पसरुन उताणा पडसी ॥ भोंवत्या रडतील वनिता तुझ्या ॥५॥चहूंकडोनि उठती शंखध्वनी ॥ होईल प्रेताची मिरवणी ॥ मसणखाईंत जाशील जळोनी ॥ लोक सतीचे बोळावे ॥६॥ऐकोन मातेचा अगाध बोध ॥ उत्तर करी गोपीचंद ॥ बोलिलीस माते सुशब्द ॥ म्यां मस्तकीं वंदीला ॥७॥परी कोण गुरु वरिष्ठ चतुर ॥ जो मस्तकीं ठेवून अभयकर ॥ करील काया अजरामरा ॥ मृत्यूपासोनि सोडवी ॥८॥मैनावती वदे उत्तर ॥ समर्थ योगी जालंधर ॥ तुझी काया करील अमर ॥ मृत्यू स्पर्शो देईना ॥९॥गोपीचंद वदे मातेसी ॥ द्वाद्वशवर्षें करीन राज्यासी ॥ मग होईन जोगी उदासी ॥ आज्ञा तुझी प्रमाण ॥२१०॥माता म्हणे पुत्रा सुजाण ॥ कोणास करवेल काळाची वंचना ॥ कोण वेळेस काय होईल जाणा ॥ आजची घडी उदयां नये ॥११॥नसे मृत्यूचें प्रमाण ॥ अष्टही प्रहर त्याचें संधान ॥ आकार त्याचे मुष्टींत जाण ॥ भक्षितां वेळ नलगेची ॥१२॥ग्रास घेतां लागे उचकी ॥ काळ इतुकियांत जीव उचकी ॥ डोळयांस लागतां वाईचं वाईच लचकी ॥ काळ चकवी इतुक्यांत ॥१३॥श्वास घालावया नाहीं अवकाश ॥ जाहली तनु गांठ मृत्यूस ॥ कंठीं बैसेल काळपाश ॥ तेव्हां डोळे वटारिसी ॥१४॥जेथील तेथें राहिल संपदा ॥ मेल्यापाठीं थोर आपदा ॥ जन्ममरण चौर्याशीं रेंदा ॥ छी छी थू थू फजीती ॥१५॥तुज पाहिजे आपुलें कल्याण ॥ तरी आतांच निष्टे या मोहांतून ॥ जालंधर सिध्दास जाय शरण ॥ काळचक्र चुकवील ॥१६॥यापरी मातेनें उपदेश ॥ केला पुत्रास सुढाळ सरस ॥ तो जाईल गुरु करावयास ॥ ते कथा पुढिले प्रसंगीं ॥१७॥रसिक गोड चरित्र ॥ लिहिलें पवित्राचें पवित्र ॥ परिसोन सज्जनाचे श्रोत्र ॥ संतोषातें पावती ॥१८॥पदकीं कोंदणीच साठीं ॥ लाख मिरविली रायाचे कंठीं ॥ संतपायीं पडतां मिठी ॥ मान्य जाहलों जगातें ॥१९॥यांत अभिमान सांडोन ॥ संतांस घातलें लोटांगण ॥ तेथें शहामुनी पावन ॥ प्रसाद लाधे निजमोक्ष ॥२२०॥इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये त्रिचत्वारिंशोध्याय: ॥४३॥॥अध्याय ४३॥ ओव्या २२०॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीराम ॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP