श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २२ वा
‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.
श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्योनम: ॥
एका परमेश्वराकारणें ॥ करिती अनेक प्रकारचीं साधनें ॥ मोक्ष विश्रांतिस्तव यत्नें ॥ श्रमावें लागे प्राणियां ॥१॥
कोणी करिती तपसाधने ॥ कोणी करिती गोराजनें ॥ कोणी पंचाग्नि तापणें ॥ कोणी घेती जलवृष्टी ॥२॥
एक होती जटाधारी ॥ नग्न दिगंबर दुग्ध आहारी ॥ एक होऊन ब्रह्मचारी ॥ दमन करिती इंद्रियें ॥३॥
एक ऊर्ध्वबाहु होती ॥ एक धूम्रपान करिती ॥ एक संन्यासग्रहण करिती ॥ हातीं दंड कमंडलु ॥४॥
एक कानफाटे जोगी ॥ भगवीं वस्त्रें वागवी सिंगी ॥ एक प्राणायामीं योगी ॥ षट्चक्रें भेदिती ॥५॥
एक लुंचिती डोइचे केश ॥ पदर लावितां नाकास ॥ हिंसेभिणें आपुला श्वास ॥ बाहेर जाऊं न देती ॥६॥
एक लावोनि लंगोटी ॥ जावोनि बैसती गिरिकपाटी ॥ एक द्रव्याच्या कोटी ॥ वांटी द्विजां औदार्ये ॥७॥
एक हिमाचळीं गळती ॥ एक प्रयागा कर्वत घेती ॥ एक तीर्थव्रतें करिती ॥ स्वधर्मी सादर ॥८॥
ऐसे नानापरीचे जन ॥ करिती उपाय प्राप्तीलागून ॥ यमदंड महादारुण ॥ त्याचे धाकें कांपती ॥९॥
मोक्षप्राप्तीकारण ॥ इतुके उपाय जीवांस करण ॥ माझ्याठायीं एकही गुण ॥ विरक्तीचा असेना ॥१०॥
माझा केवा काय देवा ॥ एकही गुण न दिसे बरवा ॥ पडला संसाराचा गोवा ॥ कैंचा उगावा होईल ॥११॥
अनेक विकारांच्या लहरी ॥ हृदयीं उसळती विशाळ भारी ॥ वासना कल्पनेचे पूरीं ॥ बुडोनि गेले बुध्दिमंत ॥१२॥
कामक्रोधाचे खळाळ ॥ त्यांत सद्भावनेचा आदळ ॥ मनभोंवरा अति चंचळ ॥ झोंका देई चिंतेचा ॥१३॥
नाहीं शांति क्षमा दया ॥ ज्ञान वैराग्य ना जितेंद्रियां ॥ ऐसिया मज देवराया ॥ कोण्या उपायें तारिसी ॥१४॥
जरी म्हणो शरणागतें ॥ तरी काय अर्पिलें देवा तूतें ॥ फुकाचें नाम मुखातें ॥ तेंही लौकरी येईना ॥१५॥
सर्वदा आळशी बुध्दिमंद ॥ अहंपणाचा वागवी फुंद ॥ वाचे नयेसि तूं गोविंद ॥ केवीं बोध ठसावें ॥१६॥
इतुका असोनि अवलक्षण ॥ परी त्वां कृपा केली नारायण ॥ हें मी अंतरीं दृढ जाण ॥ मज जगज्जीवन पावला ॥१७॥
गर्भ संभवतां उदरीं ॥ चिन्हें उमटती बाहेरी ॥ अभ्रें आच्छादिला भानु जरी ॥ रात्र कोणी म्हणेना ॥१८॥
कस्तूरी झांकिता डब्याभीतरीं ॥ उठती सुगंधाच्या लहरी ॥ पुष्पकळिका विकासल्या वरी ॥ आमोद फांके आपैसा ॥१९॥
आंबा पक्व जाहल्यावरी ॥ गोड रस भरे अंतरीं ॥ किंवा रोग सरल्यावरी ॥ चढे तेजगी मुखाशीं ॥२०॥
यापरी मज कृपेची गरिमा ॥ तुवां केली पुरुषोत्तमा ॥ फिटली बुध्दीची जडत्वकाळिमा ॥ जाहली सोज्वळ स्वरुपीं ॥२१॥
होतों अज्ञान भ्रमाच्या मोहें ॥ शिकविली गोष्टी सांगतां नये ॥ तुझे कृपेचिया प्रत्ययें ॥ करुं ग्रंथ बुध्दीनें ॥२२॥
जेवीं पाठीसि असतां राम दृढ ॥ भिडती रणीं सुग्रीवादि उदंड ॥ तेवीं तुझ्या कृपेच्या बळें होड ॥ घालूं ग्रंथ करावया ॥२३॥
श्रीकृष्णआज्ञा असतां धर्मास ॥ अश्वमेधाचे काय सायास ॥ तेवीं दत्तआज्ञें शहामुनीस ॥ गुंता ग्रंथीं असेना ॥२४॥
इतुकें बोलण्याचा नसे अर्थ ॥ परी बुध्दीनें कवळिला दृष्टांत ॥ जैसा पुष्पींचा सुगंध फांकत ॥ फिरोनि कळिके तो आवरेना ॥२५॥
तैसें माझीये बुध्दीला ॥ अनेक तर्क चालती मतीला ॥ म्हणोनि शब्द बोलावयाला ॥ सुचती दृढ ग्रंथांतरीं ॥२६॥
या ग्रंथाचे निरुपण ॥ उत्तरार्ध परिसा सज्जन ॥ तें स्वमुखें श्रीभगवान ॥ निरुपी अनुभव आपला ॥२७॥
मागिले अध्यायीं जगदीश ॥ सृष्टि उत्पत्ति प्रपंचभास ॥ विस्तारला तो महिभट्टास ॥ यथासांग निवेदिला ॥२८॥
ती जगदीशमुखींची वाणी ॥ द्विजें सांठविली अंत:करणीं ॥ मग लोटांगण घालोनी ॥ करी दंडवत देवासी ॥२९॥
उभा राहोनि समोर ॥ प्रार्थना करी जोडूनि कर ॥ म्हणे तूं कृपेचा सागर ॥ मजवरी लोभ बहु करिशी ॥३०॥
माझ्या मनाची आशंका ॥ सृष्टिउत्पत्तीची देखा ॥ तें त्वां त्रैलोक्यनायका ॥ फेडिली संशय नुरे तैशी ॥३१॥
बहुतां ग्रंथीं सृष्टि ऐकिली ॥ वेदशास्त्रीं निरुपिली ॥ त्याही विरहित तुम्ही कथिली ॥ प्रचीत आली मानसीं ॥३२॥
या सृष्टीचा उपक्रम ॥ मज सांगसी तूं पुरुषोत्तम ॥ जें कोणी हें कधीं वर्म ॥ कथिलें नाहीं उघडोनी ॥३३॥
तें आजि तुमचें मुखें ॥ प्रगट ऐकों कर्णी सुखें ॥ थोर भाग्याचिया रेखें ॥ तुझें मुखें आयकूं ॥३४॥
आतां माझें एक मनीं ॥ तुम्हां पुसावें मोक्षदानी ॥ जे जीवास उत्पत्ति कानीं ॥ ऐकों तुझ्या स्वमुखें ॥३५॥
जीव हा काय पदार्थ ॥ कोठून उद्भवला यथार्थ ॥ त्याची मूळकथा समस्त ॥ मातें सांगा कृपाळुवा ॥३६॥
द्विजप्रार्थना चंद्र उगवला ॥ देवसिंधु भरतें उचंबळला ॥ महावाक्यें हेलावला ॥ शब्दलहरी उचंबळोनी ॥३७॥
मग बोले जगजेठी ॥ म्हणे ऐकें भट्टा कर्णपुटीं ॥ जीवपदार्थाची रहाटी ॥ तूतें सांगतों प्रांजळ ॥३८॥
मोठें जीवांचें लिगाड ॥ हेंचि नुगवे कोणा कोड ॥ उदंड शास्त्रें गडबड ॥ करोनि एथें गुंतती ॥३९॥
यासाठीं गुरु करणें ॥ अनेक शास्त्रें पाहणें ॥ पाहिलें तेंचि विवरणें ॥ तेणें उमजो लागेल ॥४०॥
एक म्हणती ब्रह्म तेंचि जीव ॥ अविद्येनें वेष्टिलें स्वयमेव ॥ विसरले मुळीच ठाव ॥ म्हणोनि भोगिती सुखदु:ख ॥४१॥
एक म्हणती जीव शिव एक ॥ सर्वांघटीं भरला देख ॥ मिथ्या भ्रमोनियां देख ॥ द्वैतभाव मांडिती ॥४२॥
एक म्हणती अविद्येंत बिंबला ॥ म्हणोनि जीवनाम पावला ॥ ज्ञानें पाहतां जीवाला ॥ ठाव कोठें असेना ॥४३॥
जीव तो ब्रह्मींचा अंश ॥ हाचि अनुभव बहुतांस ॥ परी याचा विचार मनास ॥ बरा आणीं द्विजोत्तमा ॥४४॥
ब्रह्म अविद्येंत आला ॥ आणी आपणां विसरला ॥ देहीं भोगी सुख:दुखाला ॥ भ्रमोनि पडे चौर्यांशीं ॥४५॥
ऐशी दशा होती जाहली ॥ मग अविद्याचि कां न म्हणावी थोरली ॥ ऐशी बोलती जे बोली ॥ ते नेणती मुळींचें सूत्र ॥४६॥
एक सूर्याचा दृष्टांत देती ॥ जीवांश प्रतिबिंब बोलती ॥ परी अनुभव पाहतां चित्तीं ॥ बिंब सर्वां अलिप्त ॥४७॥
जीवदु:ख शोक न करिता ॥ तरी बिंबाचा दृष्टांत साहता ॥ पाहतां जीवाची अवस्था ॥ क्लेशप्रवाहीं निमग्न ॥४८॥
जीवास लागलें जन्ममरण ॥ कर्म क्रिया प्रारब्ध गहन ॥ संसारप्रवाहीं लोटून ॥ भोगी पापपुण्यांसी ॥४९॥
जीवासी भय काळाचें ॥ जीवासी भय मरणाचें ॥ जीवासी भय चौर्यांसींचें ॥ जीव भितो यमासी ॥५०॥
जीव भितो देवतांसी ॥ कोणी बैसेल बोकांडिसी ॥ जीव भितो भुतावळीस ॥ झडविलें तरी काय करुं ॥५१॥
चहाडी चोरीचें भय जीवासी ॥ परद्वार करितां भय मानसीं ॥ करितां किजाया भय जीवासी ॥ राजदंडभय दारुण ॥५२॥
सावजांचे भय जीवास ॥ विंचु सर्पांचें भय जीवास ॥ चेडे मुठीचें भय जीवास ॥ अग्निपाण्यासी जीव भितो ॥५३॥
ऊ ढेकुण पिसु माशी ॥ जीव भितो निजतां त्यासीं ॥ देहीं उठतां रोगासी ॥ भय वाटे जीवाला ॥५४॥
तस्कराचें भय जीवासी ॥ महापापाचें भय जीवासी ॥ अनेक उद्योग चिंता मानसीं ॥ जीवासी लागे तळमळ ॥५५॥
घर बांधावया उद्योग ॥ व्यवसायधंद्याचा उद्योग देण्या घेण्याचा उद्योग ॥ उद्योग शेतां मळियांचा ॥५६॥
गांवीं जावयाचा उद्योग ॥ मुले उजवावयाचा उद्योग ॥ रोजगार करावयाचा उद्योग ॥ उद्योग पशुपोषणाचा ॥५७॥
चिंता लागलीसे पोटाची ॥ चिंता लागलीसे संसाराची ॥ चिंता लागली लौकिकाची ॥ द्रव्याद्वारें चिंता पैं ॥५८॥
इतुकीं किचाटें जीवाला ॥ तो ब्रह्मीचा अंश कैसा जाहला ॥ राजपुत्र भीक मागो लागला ॥ पोटासाठीं घरोघरीं ॥५९॥
जैं अग्रीस लागे कीडे ॥ तैं ब्रह्मीं जीवत्व घडे ॥ मुंगी मेरुसी घेऊनि उडे ॥ शेष दडे दर्दुरभयें ॥६०॥
वारुळ पाहुन मेरु लाजे ॥ अन्नासाठीं इंद्र सुजे ॥ खद्योत चालवी सूर्याचें काजें ॥ ऐसी मौज केवीं घडे ॥६१॥
समुद्र स्नानासाठीं ॥ येईल काय कूपाचिये भेटी ॥ किंवा सरस्वती विद्येसाठीं ॥ वेश्याघरीं प्रवेशे ॥६२॥
तैसें ब्रह्मजीव होउनी ॥ पडले अविद्येचे बंदिखानीं ॥ नाना दु:खांची जाचणी ॥ घेईल काय आपणातें ॥६३॥
जीव ब्रह्मींचा नव्हे ॥ म्हणसील तरी कोठील आहे ॥ याचा अनुभव बारे पाहें ॥ खरें तेंची सांगतों ॥६४॥
जीव अनादि सिध्द आइता ॥ हा स्वतंत्र पदार्थ तत्वता ॥ परी असे मायेच्या अधीनता ॥ अविद्याबंधनें विष्ठुनी ॥६५॥
सकळ देवांची माया स्वामीण ॥ प्रपंच तितुका मायेअधिन ॥ जीवहि मायेचे स्वाधीन ॥ एवढें श्रेष्ठत्व मायेचें ॥६६॥
असंख्य जीवांची एक रास ॥ वर्ण आकार सारिखाची त्यांस ॥ अधिक न्य़ून म्हणावयास ॥ द्वैत नसे अणुमात्र ॥६७॥
लहान तरी अणुप्रमाण ॥ थोर तरी गिरिसमान ॥ याचें स्फटिकवद्वर्तन ॥ स्वयंभ वाटोळें आसती ॥६८॥
ऐसें बोलतां कैवल्यराणा ॥ ब्राह्मण करी विज्ञापना ॥ म्हणे अहो जी परिपूर्णा ॥ पुसणें एक स्वामींस ॥६९॥
देव म्हणे द्विजा सुखें ॥ तूतें अवघड तें पुसें हरिखें ॥ कांहीं संशयाची ज्यातकें ॥ नको ठेवूं मानसीं ॥७०॥
मग म्हणे द्विजवर्य ॥ अहो जी स्वामी देवराय ॥ सकळ जीवांचें एक कार्य ॥ सारिखेंच ॥ निरुपिलें ॥७१॥
अणुपासूनि गिरिपर्यंत ॥ जीवां सांगितलें व्यापकत्व ॥ वर्ण आकार एकचि असत ॥ सकळ जीवां लागुनी ॥७२॥
तरी याविषयीं मातें आशंका ॥ उपजलीसे विश्वव्यापका ॥ ते तुजवांचोनि सखा ॥ कोण वारील सांगपां ॥७३॥
अवघे जीव तत्समान ॥ ऐसें बोलिलां तुम्हीं वचन ॥ तरी देहा देहामध्यें भिन्न भिन्न ॥ कैसे सामावती हे जीव ॥७४॥
एकाचा देह पर्वतासमान ॥ एक तो अणुचिया प्रमाण ॥ दोहीं माजि जी सांठवण ॥ कैसी जाहली सांगपां ॥७५॥
यावचनीं जगदीश ॥ द्विजास म्हणे त्वां पुसलें सुरस ॥ तुझे मनींचे संशयास ॥ परीहारुं दृष्टांतें ॥७६॥
दीप ठेवितां बोळक्याभीतरीं ॥ तितुकाचि उजेड अंतरीं ॥ तोचि ठेवितां रांजणाभीतरीं ॥ तैसाचि पसरे प्रकाश ॥७७॥
तोचि लावितां गृहांत ॥ घर भरोनि प्रकाश होत ॥ तैशी जीवांची जात ॥ देहासारिखा व्याप धरी ॥७८॥
ऐसें वदतां पुरुषोत्तम ॥ द्विज म्हणे गेला भ्रम ॥ या जीवांचें निजवर्म ॥ आजि कळलें आमुतें ॥७९॥
आतां चैतन्यापासून ॥ एक कर्मभूमींत येऊन ॥ कैसा प्रपंच केला जपोन ॥ तें मज सांगा दयाब्धी ॥८०॥
ऐसें बोलतां द्विज ॥ ऐकोनि आल्हादे महाराज ॥ म्हणे तुझ्या प्रश्नाचा मज ॥ बहुत वाटे संतोष ॥८१॥
ऐसा श्रोता जैं मिळे ॥ तैं वक्ता सहस्त्रगुणें उचंबळे ॥ आतां ऐक प्रांजळ ॥ विस्तार त्या जीवांचा ॥८२॥
आधीं विस्तारले सकळ देव ॥ मग सृष्टि निर्मिली स्वभाव ॥ या दोहींचा उगव ॥ मागें तूतें निरुपिला ॥८३॥
देवता आणी सृष्टीला ॥ दो पदार्थांचा विस्तार जाहला ॥ मग असंख्य जीवांला ॥ माया प्रेरीं सृष्टींत ॥८४॥
महामायेपासी ॥ दैवी माया म्हणे ऋषीवेषीं ॥ सकळ जीव तिजपासी ॥ स्वाधीन केले निजाज्ञें ॥८५॥
दैवी माया सकळ जीवांतें ॥ घेऊनि आली कर्मभूमीतें ॥ मग अनेक देहांची आकृतें ॥ करिती जाहली तें ऐका ॥८६॥
पंचभूतांचा सूक्ष्म अंश ॥ काढोनि घडी पिंडांस ॥ त्रिगुण मिळवी तयांस ॥ अष्टधा प्रकृति निर्मिली ॥८७॥
प्रथम केलिया चार खाणी ॥ अंडज स्वेदज उद्भिज जारज मिळोनी ॥ या चौमुसी आंतुनी ॥ चराचर विस्तारलें ॥८८॥
जितुक्या पक्षांच्या जाती ॥ अंडज पोटीं निर्माण होती ॥ यालागीं अंडज खाणी म्हणती ॥ नाम ठेविलें मायेनें ॥८९॥
स्वेद म्हणजे अंगींचा घाम ॥ तेथें जीवांसि होय जन्म ॥ तयां स्वेदज हें नाम ॥ बोलिलेसें नेमस्त ॥९०॥
लाल हिरे मोती यांपासून ॥ जीव होताती उत्पन्न ॥ त्यांसि उद्भिज खाणी म्हणोन ॥ बोलिली संज्ञा ॥९१॥
जारज म्हणजे योनींतून ॥ जन्मती पशु मानवी जन ॥ ते चौथी खाणी प्रमाण ॥ नाम त्याचें जारज ॥९२॥
यापरी उघड मुसीस ॥ आंत घालितां जीवास ॥ मग विचार पडिला मायेस ॥ दशा पाहोनि जीवांची ॥९३॥
जीवांसि नाहीं कर्ण नयन ॥ त्यांस नसे घ्राण वदन ॥ हस्तपादाविण ॥ दिसे गोळा मांसाचा ॥९४॥
मग एकेक देवतेचा अंश आणोन ॥ देहीं बैसवीं भिन्नभिन्न ॥ तयांच्या मुळें जीवासि ज्ञान ॥ होतें जाहलें पिंडांत ॥९५॥
दिशा पोकळींतील दैवत ॥ आणोनि बैसवी कर्णबिळांत ॥ तयाचे मुळें जीव शब्दाप्रत ॥ ऐकें श्रवणीं जाणपां ॥९६॥
दिशांचे दैवत गेलिया उठोन ॥ बधिर होय तेणेंकरुन ॥ ऐकों नये शब्दज्ञान असोन कर्ण वृथा ते ॥९७॥
यापरी नेत्रांचे ठायीं ॥ सूर्य अंश ठेविला पाहीं ॥ म्हणोनि सर्व पदार्थ कांहीं ॥ दिसती डोळां जीवांसी ॥९८॥
नेत्रीं सूर्याची कळा ॥ निघतां अंधत्व जीवाला ॥ विशाळ डोळे असोनि त्याला ॥ कोण्या येती उपयोगा ॥९९॥
घ्राणीं बैसले आश्विनी कुमार देवता ॥ तेणें कळे सुगंध दुर्गंधता ॥ रसनेतें वरूणाची योग्यता ॥ म्हणोनी जाणे चवीस ॥१००॥
स्पर्श गुण तो वायूचा ॥ त्वचेच्या ठायीं व्यापला साचा ॥ म्हणोनि कठिण मऊ पदार्थांचा ॥ अन्वय कळे अंगास ॥१॥
यावरी देवतांचे अंश ॥ पांचाठायीं बैसका त्यांस ॥ म्हणोनि ज्ञान जीवास ॥ जाहलें देवतेचे संगें ॥२॥
पांचा ठायीं जाणपण ॥ म्हणोनि ज्ञानेंद्रिय जाण ॥ नाम ठेविलें मायेन ॥ पाहोनि त्यांची योग्यता ॥३॥
पांच ज्ञानेंद्रियांसी ॥ पंच विषय नेमिले त्यांसी ॥ शब्द स्पर्श रुप रस गंधांसी ॥ पांचा ठायीं स्थापिलें ॥४॥
बैसविला शब्द कर्ण द्वारीं ॥ स्पर्श त्वचे माझारी ॥ रुप नेत्रांभीतरीं ॥ घ्राणी गंध जिव्हाग्रीं रसांश ॥५॥
या पांचां विषयाचे भोक्तृत्व ॥ देवता संगें जीव घेत ॥ म्हणोनि सुखदु:ख प्राप्त ॥ बैसवी माथां जीवांच्या ॥६॥
पांच देवतांचे मुळें ॥ पांच ज्ञानेंद्रिय जाहलें ॥ पंच विषय तेथेंचि स्थापिले ॥ कळावया जीवांसी ॥७॥
यापरी पांच कर्मेंद्रियें ॥ तेही सांगो यथान्वयें ॥ तुझ्या हृदयीं संदेहे ॥ नुरे ऐसें परिस गा ॥८॥
करीं अंश सहस्त्रनयनाचा ॥ तेणें व्यवहार चाले करावयाचा ॥ पायीं प्रवेश उपेंद्राचा ॥ म्हणोनि गमन जीवांसी ॥९॥
गुरुस्थानीं देव नैऋती ॥ म्हणोनि दुर्गंधाची वस्ती ॥ शिश्नीं प्रवेशला प्रजापती ॥ करी मैथुन जीव तेणें ॥११०॥
वाचेंत वन्हि बैसोन ॥ शब्द बोले दणाणून ॥ यापरी पांच जण ॥ कर्मेंद्रियें निरुपिलीं ॥११॥
बुध्दि ते ब्रह्मा जाण ॥ मन तें विष्णूचा गुण ॥ चित्त असे नारायण ॥ अंत:करण तो विश्वरुप ॥१२॥
हे याचे चारी अंश ॥ अंत:करण चतुष्टय म्हणावें तयास ॥ अहंकार तो रुद्राचा अंश ॥ तेणें गर्व जीवांसी ॥१३॥
मोह काम भय मैथुन ॥ लज्जासहित पांचजण ॥ हे आकाशाचे पांचगुण ॥ जीवांसाठीं निर्मिले ॥ १४॥
चळण वळण प्रसरण ॥ स्तंभन आणि रोधन ॥ हे वायूचे पांच गुण ॥ केले निर्माण जीवांसाठीं ॥१५॥
आहार निद्रा क्रोध शोक ॥ आळस सहित पांच देख ॥ हें जीवासाठीं पंचक ॥ केलें घोर मायेनें ॥१६॥
रेत मूत्र लाळ थुंका ॥ रक्तासहित पांच देखा ॥ हा द्विजनिवासासाठीं देखा ॥ करी उपाधि माया ते ॥१७॥
रोम त्वचा अस्थि मांस ॥ मज्जासहित पांच जिंनस ॥ हे पृथ्वीचे अंश ॥ केली बळकटी देहासी ॥१८॥
आणिक असती पंचप्राण ॥ तेही तूतें निरुपीन ॥ इतुकें सूत्र जीवांलागून ॥ करी माया कौतुकें ॥१९॥
उदान वसे कंठी ॥ अन्नोदकातें घोटी ॥ प्राण त्यांसी जठराग्नींत आटी ॥ व्यान भरी सर्वांगात ॥१२०॥
समान हातपाय हालवीत ॥ अपान मळमूत्र लोटवी ॥ ऐसें पंचप्राणांची पदवी ॥ करी माया हुनेर ॥२१॥
इतुकिया सामोग्रीची करोनि गाडी ॥ त्यासी जुंपी त्रिगुणांची घोडी ॥ ते करिती जिकडे वोढी ॥ तिकडे चाले रथदेह ॥२२॥
चार देह अवस्था ॥ जीवास माया करी तत्वतां ॥ अपूर्व तिची कुशलता ॥ काय सांगों द्विजा तूतें ॥२३॥
स्थूल देह पंचभूतांचे ॥ सूक्ष्मदेह वासनेचे ॥ कारण देह अज्ञानाचे ॥ महाकारण देह चौथे ते ॥२४॥
स्थूलदेहाची जागृती ॥ लिंगदेहाची स्वप्नस्थिती ॥ कारण देहाची सुषुप्ती ॥ महाकारणाची तुर्या ते ॥२५॥
इतुका समुदाव करुन ॥ पिंडदेह निर्मिला तेणें ॥ घरधणी करी जीवांलागून ॥ आंत बैसवी स्वामित्वें ॥२६॥
ऐसें ऐकोनि ब्राह्मणे ॥ देवासी प्रार्थी करुणावचनें ॥ म्हणें अहो जगदीशें पूर्णे ॥ परिसावी विनंती माझी ॥२७॥
तुझ्या निरुपणाची मात ॥ अपूर्व वाटे मातें ॥ अद्भुत म्हणोनि पुसावया हेत ॥ वारंवार होतसे ॥२८॥
स्त्रीच्या उदरांत ॥ बाळक वृध्दीतें पावत ॥ पंचभूतांचा प्रवेश होत ॥ कवणेपरी दातारा ॥२९॥
इतुक्या तत्वांचा समुदाव ॥ एकत्र होऊनियां सर्व ॥ वनितागर्भी संभव ॥ कोण्याद्वारें प्रवेशती ॥१३०॥
शरीरांत सूत्र नाना ॥ कोण करी जगज्जीवना ॥ हस्त पाद नेत्रकर्णा ॥ घडिता कोण जठरांत ॥३१॥
नाक मुख प्रजापती ॥ योनि गुदांची आकृती ॥ उदरीं अन्नपाण्याची वस्ती ॥ कैसी केली दयाळा ॥३२॥
मोकळा वायु शरीरांतें ॥ कैसा थांबविला त्रैलोक्यनाथें ॥ अंतकाळीं निघोनि जाते ॥ कोण द्वारें सांगावा ॥३३॥
जन्मतां आणि मरतां ॥ जीवांची कैसी होय अवस्था ॥ प्रारब्धीं जो ब्रह्मा लिहिता ॥ कैसा मातें सांगावा ॥३४॥
इतुकिया प्रश्नांची उत्तरें ॥ निरुपावीं मज कृपासागरें ॥ हें परिसोनि परमेश्वरें ॥ धन्य म्हणे द्विजासी ॥३५॥
विप्रा तुझा ऐकोनि प्रश्न ॥ सुखावलें माझें मन ॥ आतां परिसें सावधान ॥ निरुपितों द्विजवर्या ॥३६॥
महामायेची दैवी माया ॥ दैवी मायेची गुणमयी माया ॥ गुणमयीची अविद्या माया ॥ अष्टधा प्रकृति जाणिजे ॥३७॥
तुवां पुसलें गा मातें ॥ कसीं जठरीं प्रवेशतीं पंचभूतें ॥ तरी हे गुणमयी मायेचे कर्तृत्वें ॥ करी कुशलता बुध्दीची ॥३८॥
पंचभूतांचा अंश ॥ सूक्ष्म काढोनि मेळवी वीर्यास ॥ त्याचा करुनि रतिविलास भोगविलास तो केला ॥३९॥
वीर्यामध्यें पंचभूतें ॥ त्यांचा एक विचार गुप्तें ॥ वीर्याचे ठायीं जडत्वें ॥ तोचि अंश पृथ्वीचा ॥१४०॥
द्रवत्वें तेंचि होय पाणी ॥ दिसों येतसे उघड नयनीं ॥ तेज आंत असे मिळोनी ॥ यास्तव मैथुनीं उष्णता ॥४१॥
बिंदु वायूवांचुनी ॥ कैसा चालेल नळिकेंतुनी ॥ आकाशातें आधींच व्यापुनी ॥ पोकळवत तें असे कीं ॥४२॥
यापरी गा पंचभूतें ॥ सूक्ष्मरुपें पाहा बिंदुते ॥ त्याची उत्पत्ति तूतें ॥ सांगतों पुढें अवधारीं ॥४३॥
वृक्ष जैसा बीजातें ॥ वाढोनि पावे वृध्दीतें ॥ तयापरी पंचभूतें ॥ बीजरुपें असती ॥४४॥
स्त्रीचें उदर तें शेत नि:शेष ॥ विटाळ तो पडे पाऊस ॥ चतुर्थ दिवशीं होय वाफेस ॥ मग पुरुष करी पेरणी ॥४५॥
वासनेचे बैल जुंपून ॥ कामनेची तिफणी धरुन ॥ शिश्नचाडियांतून ॥ सोडी बिंदु बीजासी ॥४६॥
स्त्रीचें उतरे शोणित ॥ पुरुषाचें खेळोनि रेत ॥ उभयतां होऊनि मिश्रित ॥ कमळ गर्भी संभवे ॥४७॥
होय पुरुषाचे अधिक रेत ॥ तरी पुरुषाची होय आकृत ॥ जरी विशेष स्त्रीचें शोणित ॥ मग कन्या होय नि:संशय ॥४८॥
रेत शोणित समान होतां जन्मे नपुंसक तत्वतां ॥ ऐसी मैथुनाची वार्ता ॥ तुझ्या अर्था निरुपिली ॥४९॥
गुणमयी मायेची गुप्त करणी ॥ रेत शोणित एक करुनी ॥ मध्यें वायूची गांठ बांधोनी ॥ त्याचे ओढी पांच फांटे ॥१५०॥
मध्यस्थानीं नाभिकमळ ॥ तें समानवायूचें मूळ ॥ उदानवायू कंठीं खेळ ॥ अपान लावी अधोद्वार ॥५१॥
प्राण हृदयीं बळकावला ॥ व्यान सर्वांगीं चाळकू केला ॥ मग वाढवी कवटिला ॥ थापटोनि निजहस्तें ॥५२॥
मस्तकाची आकृतीं जाहलियावरी ॥ श्रोत्र चक्षु नासिका करी ॥ मुख कंट भुजावरी ॥ फुटती शाखा बोटांच्या ॥५३॥
उर पोट पाटह कोथळा ॥ मांज जानू पोटर्या सरळ ॥ घोंटे टांचा आणि पादतळ ॥ चवडे अंगुष्ठ उभारी ॥५४॥
काळिज बोकां ठेवी जठराग्नी ॥ अस्थींत कठिणत्व आणोनि ॥ नाडी शिरांतें पसरोनि ॥ त्यावरी करी त्वचा रोम ॥५५॥
कंठापासोनि नाभिपर्यंत ॥ दोनी नळ माया करित ॥ एकांतूनि उतरे अन्न कुशींत ॥ एकांतूनि पाणी सांठवी ॥५६॥
येवढी बळकटी करुनी ॥ आंत ठेवी जीवालागूनी ॥ हे मायेची अगाध करणी ॥ जननीलागीं कळेना ॥५७॥
हृदयीं करुनि चक्रास ॥ प्राण वोजें फिरें त्यात ॥ तो नासिकद्वारीं करी प्रवेश ॥ श्वासोच्छ्वास अहर्निशीं ॥५८॥
त्या हृदयाचा आधार ॥ जीव शरीरांत धरी धीर ॥ मोट बांधोनि जठराभीतर ॥ अधोवदनें लोळत ॥५९॥
योनिचियावरुत ॥ नाभिकमळाखालुत ॥ दोहींमध्ये गर्भ वाढत ॥ तळीं शिखर पाप कीं ॥६०॥
गर्भी वाढों लागतां बाळ ॥ जननीस वासनेचे होती डोहळ ॥ क्षार तिखट खातां गर्भ पोळ ॥ दाह बैसे मुलास ॥६१॥
यालागी नवमासपर्यंत ॥ पथ्य करणें मातेसि उचित ॥ मग बाळ जन्मे गुणवंत ॥ बत्तीस लक्षणीं लावण्यें ॥६२॥
जीव प्रवेशतां गर्भाभीतरीं ॥ शुभ नक्षत्र लाहे त्या समयीं जरी ॥ तरी होय भाग्यवंत संसारीं ॥ भोगी संपत्ति विलास ॥६३॥
अथना कुनक्षत्र लागतां ॥ जन्मे अवलक्षणीं दरिद्रता ॥ प्रारब्ध म्हणावें तत्वतां ॥ लिहिलें बोलतां विधीनें ॥६४॥
पुरुष स्त्री मैथुन करितां तमोगुणें बिंदु उतरे खालुता ॥ होय मनुष्य तामसी तत्त्वतां ॥ क्रोधरुपी जाणावा ॥६५॥
रजोगुणें रमतां प्राणी ॥ बिंदु पडे वनितायोनीं ॥ होय राजसी मनुष्य गुणी ॥ भोगी विषयवासना ॥६६॥
सत्त्वगुणें मैथुन करी ॥ बिंदु उतरे तत्समयीं जरी ॥ होय साधु अवधारीं ॥ क्षमाशीळ ज्ञानिया ॥६७॥
पूर्वीचें सुकृत ज्या म्हणावें ॥ हें गर्भ संभवतां जाणावें ॥ नक्षत्रगुणाचे योगस्वभावें ॥ बुध्दि उपजे मनुष्याची ॥६८॥
जैसा नक्षत्राचा योग ॥ तोचि प्रारब्धाचा भाग ॥ ज्या गुणावरी होतां संभोग ॥ तोचि स्वभाव जगासी ॥६९॥
तमोगुणावरी उत्पन्न जाहला ॥ तैसीच कठोरता होय बुध्दीला ॥ निर्दयी क्रूरदशा त्याला ॥ सर्वदा तामसी स्वभाव ॥१७०॥
रजोगुणीं जो जन्मला ॥ विषयवासना भरे बुध्दीला ॥ भोगी सदैव मनुष्य गुंतला ॥ आवडे विषय जीवासी ॥१७१॥
सत्वगुणनर पावे जन्मतां ॥ होय शांति क्षमेची योग्यता ॥ बुध्दीस धैर्य ज्ञान विवेकता ॥ ईश्वरभजनीं मन लागे ॥७२॥
ज्या गुणावर जो जन्मला ॥ तोचि स्वभाव मानवला ॥ त्या गर्भातील वृत्ति सकळा ॥ समग्र तूतें निरुपिल्या ॥७३॥
गर्भा आंतील यातना ॥ ते सांगतां नये ब्राह्मणा ॥ माता चालतां बोलतां जाणा ॥ बैसती हिंदोळे बाळका ॥७४॥
बहुत अन्न खाय जननी ॥ पोटांत मुलास होय जाचणी ॥ दळितां कांडितां वनितेलागुनी ॥ होती दु:खाच्या यातना ॥७५॥
नवमास भरल्यावरी ॥ जेव्हां जन्म योनिद्वारीं ॥ ते क्लेश अतिभारी ॥ काय सांगो द्विजोत्तमा ॥७६॥
जंत्रा आंतूनियां तार ॥ सोनार वोढी धरोनिया कर ॥ तेवीं योनीचें द्वार ॥ निघतां बाळका दु:ख होय ॥७७॥
बाहेर पडलियावरी ॥ लोभ होऊनि टाहो करी ॥ हाती अवस्था भारी ॥ ते नये सांगतां मुखानें ॥७८॥
बाळपणींची व्यथा ॥ काय सांगों द्विजा आतां ॥ विष्ठा मूत्र हातें चिवडितां ॥ भरे सर्वांग समजेना ॥७९॥
यावरी गा बाळपण ॥ खेळतां गेलें वय निघोन ॥ जननी म्हणे वाढे नंदन ॥ आयुष्य गेलें कळेना ॥१८०॥
तारुण्याचा चढता मद ॥ अहंपणाचा भरे फुंद ॥ होय द्रव्यदारेसी लुब्ध ॥ कर्मे करी अनेक ॥८१॥
कोणी काढिती दिवाळ्यातें ॥ कोणी जोडती संपत्तीतें ॥ कोणी शरण साधुसंतातें ॥ कोणी काढिती दिवाळ्यातें ॥ कोणी जोडती संपत्तीतें ॥ कोणी शरण साधुसंतातें ॥ कोणी लुच्चे लबाड ॥८२॥
कोणी होती गा दरिद्री ॥ भिक्षा मागती दारोदारीं ॥ कोणी श्रीमंत भारी ॥ कोणी व्यवहारी गुंतले ॥८३॥
उतरला तारुण्याचा भर ॥ जरा बैसे डोईवर ॥ कृष्ण केश होती शुभ्र ॥ आलें वृध्दपण बोलती ॥८४॥
बधिर होती दोन्ही कर्ण ॥ नेत्रींचें तेज जाय निघोन ॥ जिव्हा तेही जड होऊन ॥ बोले मंदबोबडी ॥८५॥
अंगत्वचा होय मोकळी ॥ सर्वांगासि पडती झूरळी ॥ गात्रें अवघीं ढिलीं जाहलीं ॥ गेली शक्ति निघोनी ॥८६॥
पायांची होती पडवळें ॥ दोन्ही हात होती खुळें ॥ मुखावाटे लाळ गळे ॥ दंत गळती उंबरें जैसी ॥८७॥
दमा दाटतां देत धाप ॥ सर्वांगासी भरे कंप ॥ जें बोलों न ये तें जल्प ॥ न ये झोंप रात्रंदिवस ॥८८॥
भिक्षुक पाहोनि दारवंटी ॥ काठी घेऊनि लागे पाठी ॥ थोर मोह वाटे पोटीं ॥ होये हिंपुटी कवडीस्तव ॥८९॥
दारा द्रव्य यांपासीं ॥ मन वोढे अहर्निशीं ॥ नातुडे धरोनी पोटासी ॥ घेत मुके मोहानें ॥१९०॥
अंतकाळीं काळाची उडी ॥ येतां पडे नेत्रांसी झांपडी ॥ तरी धरी मुलांची आवडी ॥ मनीं देव आठवेना ॥९१॥
जेव्हां जीवासि काळवोढ ॥ तेव्हां जीवाची दशा अवघड ॥ पंचप्राण एकत्र सांपड ॥ होय वेड बुध्दि मन ॥९२॥
वृक्षावरी वेल विस्तारे ॥ मुळीं उपडूनी वोढितां करें ॥ ठायीं ठायीं चिरोनि पडे ॥ होय छिन्नभिन्न त्या वेळीं ॥९३॥
तैसी गति या जीवास ॥ काळ वोढी घालुनि पाश ॥ मग भ्रंश होय प्राण्यास ॥ बंद तुटती देहाचे ॥९४॥
एक म्हणती मेलिया अंतीं ॥ पंचभूतें पांचाठायीं जाती ॥ मग कैचा नरक कैची मुक्ती ॥ मिथ्या वदंती जनाची ॥९५॥
जैसे केळीचे ढोल ॥ पदर उकलिता अवघे पोकळ ॥ तैसा शरीरतत्त्वांचा मेळ ॥ निरसितां कांहीं उरेना ॥९६॥
ऐसा जो दृष्टांत ॥ देती तितुका अवघा व्यर्थ ॥ याविषयीं ऐके स्वस्थ ॥ निर्णय तूतें सांगतों ॥९७॥
युध्दीं निमाल्या रायासी ॥ होय भ्रंश सैन्यासीं ॥ तेवीं जीव सांडित कुडीसी ॥ तत्वें अवघीं उखळती ॥९८॥
सूत्राच्या बाहुल्या नाचती ॥ तंतू तुटल्या विकळ होती ॥ तैसी जीवांची गती ॥ निघतां बीभत्स कुडीसी ॥९९॥
पंचभूतें पांचांठायीं जाती ॥ मिथ्या जीवांची वदती ॥ ऐसें जे गा बोलती ॥ सज्ञान तेची जाणावे ॥२००॥
जरी जीवांसी मिथ्यत्व म्हणती ॥ मग परमार्थ कासया करिती ॥ वेदशास्त्रांची उत्पत्ति ॥ कोणासाठी करावी ॥१॥
जरी जीव पदार्थ मिथ्या ॥ तरी परमार्थ करणें वृथा ॥ धर्म अधर्माची वार्ता ॥ खोटी होईल सर्वही ॥२॥
तरी ऐसें जें ज्ञान ॥ याचें काय मानसी प्रमाण ॥ हें संशयाचें भान ॥ सांडी द्विजा मानसीं ॥३॥
अगा जीव त्याचा पदार्थ ॥ तूंतें निरुपिला यथार्थ ॥ तों निवतां कुडींत ॥ तत्वें उखळती सहजची ॥४॥
ज्या देवाचा जो अंश ॥ तो तेथें जाय अनायास ॥ मग पंचभूतांचा विलास ॥ पांचाठायीं तो मिळे ॥५॥
स्थूलदेहाचा घरटा मोडला ॥ परी तिहीं देहाचा असे वेष्टिला ॥ सूक्ष्म कारण महाकारणाला ॥ गति केवीं तें सांगो ॥६॥
सूक्ष्म देहाचेंनि बळें ॥ भोगी स्वर्ग नरकींचीं फळें ॥ जन्ममरणांचे प्रवाहीं लोळे ॥ तेही हाल जीवासी ॥७॥
जरी होय तपाची सामग्री ॥ शुध्द सुकृत कोटीवरी ॥ तरी सूक्ष्मदेहाची सरवारी ॥ परी दोन देह सुटतीना ॥८॥
स्थूल सूक्ष्म जाण ॥ दोन देह सुटतां जीवालागुन ॥ मग कारण देहातें घेऊन ॥ देवस्थानीं प्रवेशे ॥९॥
सूक्ष्मदेह गेलिया निघोन ॥ जीवास वैकुंठीं कैलासीं होय गमन ॥ क्षीराब्धी अष्टभैरवांपर्यंत जाण ॥ विश्वरुपा पावेतों ॥२१०॥
इतुके देवांचे स्थानीं ॥ जीव प्रवेशे जाउनी ॥ हे कारण देहाची करणी ॥ ओळखें द्विजा विवेकें ॥११॥
होतां गुरुकृपा श्रेष्ठ ॥ तैं सुटे कारण देहाची गांठ ॥ उरे महाकारण प्रगट ॥ चतुर्थ देह जाणपां ॥१२॥
महाकारण देहाची संगती ॥ जीव चैतन्यमायेंत करी वस्ती ॥ जें अद्वैत असें म्हणती ॥ सिध्दांत गर्भ देवांचा ॥१३॥
जैं परमेश्वर दे दर्शन ॥ करी जयासी अपरोक्षज्ञान ॥ तैं सुटे महाकारण ॥ मोक्ष होय जीवासी ॥१४॥
यापरी जीवालागुन । चौ देहांचें दृढ बंधन ॥ हें सुटल्यांवांचून ॥ मुक्तता न घडे जीवासी ॥१५॥
ज्या जीवांचे चार देह सुटले ॥ ते जीव पदीं बैसले ॥ जया महाकारण देह लागले ॥ ते पावले चैतन्यपद ॥१६॥
कारणदेह ज्यांसी घडले ॥ ते जीव देवलोकामाजी गेले ॥ सूक्ष्मदेहाचे पडले ॥ जन्ममरण चौर्यांयसी ॥१७॥
स्थूल देहाचे प्रपंची ॥ जे राशि विकाराची ॥ यापरी चौं देहांची ॥ गति तूतें निरुपिली ॥१८॥
तंव महिभट्ट करि विनंती ॥ म्हणो अहो जी कृपामूर्ती ॥ महाप्रळयाचे अंती ॥ कोठें राहती जीव हे ॥१९॥
हें परिसोनि देवाधिदेव ॥ म्हणे ऐक याचा अनुभव ॥ प्रळय होतां जीव ॥ कोठें थारे तें सांगों ॥२२०॥
जो चौ देहांसी सूटला ॥ दिव्यचक्षु ज्ञान पावला ॥ तो मोक्षपदीं बैसला ॥ परमेश्वरासन्निध ॥२१॥
जो देवलोकांत गेला ॥ तो सुकृतें सुख भोगूं लागला ॥ प्रळय होतां पतन त्याला ॥ माया नेई आपणासीं ॥२२॥
जेव्हां ब्रह्मांड जाय बुडोन ॥ तेव्हां जीव जमा करुन ॥ माया आपुल्या सन्निध सांठवून ॥ करी राशी जीवांची ॥२३॥
कणगीआंतून बीज काढून ॥ कृषीवल पेरिती शेतीं नेऊन ॥ फिरोनि त्याची संवगणी करुन ॥ मळी आणोनि खळियांत ॥२४॥
मग मुद्दल बीज काढीत ॥ नेऊनि भरी तेंचि कणगींत ॥ तेवी माया जीवांसि करीत ॥ विस्तारी आणि सांठवी ॥२५॥
त्वां पुसला जीवांचा प्रश्न ॥ तो हा सांगीतला विस्तारुन ॥ हें परिसोन ब्राह्मण ॥ अष्टभावें निवाला ॥२६॥
पुढें देवासी प्रश्न ॥ अपूर्व पुसेल ब्राह्मण ॥ तोही अनुभव श्रोतयांलागून ॥ शहामुनि सांगेल ॥२७॥
इति सिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णयवर्णने द्वाविंशतितमोध्याय: ॥२२॥ ॥ओव्या॥ ॥२२७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2020
TOP