मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय १३ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय १३ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥
श्रीगुरुभ्यो नम: ॥ जो निराकार निर्गुण ॥ पूर्णब्रह्म सनातन ॥ तोचि राजाधिराज जाण ॥ महाराज श्रेष्ठ सकळांचा ॥१॥
त्याचा प्रधान मुख्य माया ॥ अगाधबुध्दी गुणचातुर्या ॥ सर्व कार्य करावया सावधान सर्वदा ॥२॥
तिजपाशीं तिघे कारकुन ॥ ब्रह्मा विष्णु महेश जाण ॥ सृष्टीचा जमाखर्च करुन ॥ झाडा देती प्रळयांतीं ॥३॥
इंद्रासि देऊनि सुभेदारी ॥ ठेविला असे स्वर्गलोकाभीतरीं ॥ सकळ सुरांची खबरदारी ॥ करणें लागे तयासी ॥४॥
पाताळीं सर्पकुळांत ॥ हवालदारी वासुकी करित ॥ नाग जितुके बळिवंत ॥ त्याचे आज्ञेंत वर्तती ॥५॥
पक्षियांत गरुड कारभारी ॥ दैत्यांत हिरण्यकशिपुची थोरी ॥ रावणाची फौजदारी ॥ राक्षसांमाजी लंकेंत ॥६॥
पशुयातींत सिंह सबळ ॥ मनुष्यांत नरभूपाळ ॥ प्रजांसि देऊनियां कौल ॥ वस्ति केली तिहीं लोकीं ॥७॥
बहुजन्मांची कुळवाडि केली ॥ पापपुण्यें पिकासि आलीं ॥ आयुष्याची राशि मोजिली ॥ पदरीं पडलें सुकृत ॥८॥
मोठा कुणबावा रावणाचा ॥ चौदा चाहुर सेताचा ॥ पाळी चुकतां नीतीचा ॥ कुतर्क तृण वाढलें ॥९॥
कामक्रोधांचे खुंट ॥ शेतीं वाढले बळकट ॥ तेणें कणसें आलीं पोंचट ॥ जाहलें बांट अवघेची ॥१०॥
दुर्योधनें मळा केला ॥ वांटा देईना धर्माला ॥ तेणें कलह फार केला ॥ नाश जाहला स्वकुळाचा ॥११॥
अधर्माचे टोळ पडिले ॥ शेत जाळूनि पीठ केलें ॥ दीवाण सारे लागले ॥ तोटा आला कौरवां ॥१२॥
हरिश्चंद्रें केली खेती ॥ पुण्याचीं कणसें पिकलीं शेतीं ॥ धान्यें वांटलीं ऋषींप्रती ॥ राशि मोजिली चौपट ॥१३॥
बहुतांनीं केलें शेत ॥ नामें सांगतां वाढेल ग्रंथ ॥ यालागीं स्वल्प दृष्टांत ॥ बोलोनि दाविला श्रोतयां ॥१४॥
राजा एक परमेश्वर ॥ इतर प्रजाचि साचार ॥ म्हणोनि समस्त नरु ॥ रुजु असावें दरबारीं ॥१५॥
बरा व्यापार करावा ॥ तोटा येऊं न द्यावा ॥ हिशोब दुरुस्त राखावा ॥ झाडा घेईल यमाजी ॥१६॥
यालागीं सावधपणें ॥ प्रपंच साधुनि परमार्थ करणें ॥ इहलोकीं परमार्थ साधणें ॥ सार्थक तरीच जन्माचें ॥१७॥
चुकवावया जन्मयातना ॥ शरण जावें नारायणा ॥ नाहीं तरी नरक चुकेना ॥ भोगणें लागे जीवासी ॥१८॥
जीवासी लागलें थोर झट ॥ अखंड कर्माचें कचाट ॥ भरले विकल्पाचे फांट ॥ श्रमित जाहली वासना ॥१९॥
वासनेमुळें दु:ख प्रबळ ॥ माजला प्रपंच गोंधळ ॥ होय द्वैताचा सुकाळ ॥ सुखाचा लेश मिळेना ॥२०॥
याचा अनुभव अंगें ॥ कळों आला साधुसंगें ॥ म्हणोनि विवेकमार्गे ॥ बुध्दि माझी प्रवर्तली ॥२१॥
तेणें सुखावलें चित्त ॥ मन जाहलें आनंदभरित ॥ मग स्मरोनि श्री अनंत ॥ प्रसंगार्थ आरंभिला ॥२२॥
मागिले अध्यायी निरुपण ॥ ऋषीनें स्तविलें मायेलागून ॥ तयावरी आणिका मुनीन ॥ निरसन केलें मायेचें ॥२३॥
नैमिषारण्याभीतर ॥ समस्त बैसले ऋषीश्वर ॥ तयातें एक तत्पर ॥ बोले ज्ञान आपुलें ॥२४॥
ऋषि सांगे आपुला बोध ॥ म्हणे ऐका समस्त सिध्द ॥ विराट्‍ स्वरुप अगाध ॥ सत्य ईश्वर जाणावा ॥२५॥
सप्तपाताळ भूमंडळ ॥ एकवीस स्वर्गांवरी विशाळ ॥ एक विराटचि प्रबळ ॥ दुजा कोणी असेना ॥२६॥
कर्ण ते दिशा जाण ॥ अंगींची त्वचा प्रभंजन ॥ नेत्र ते सहस्त्रकिरण ॥ जिव्हा वरूण असे कीं ॥२७॥
अश्विनौदेव ते घ्राण ॥ वाचेमध्यें वन्ही गहन ॥ हस्त ते सहस्त्रनयन ॥ पाद जाण उपेंद्र ॥२८॥
प्रजापति शिश्न जाणावा ॥ गुदीं नैऋत्य ओळखावा ॥ यापरी विराट बरवा ॥ देव त्याचे अंगभूत ॥२९॥
विष्णु तें अंत:करण ॥ चंद्रमा तो जाणावा मन ॥ चित्त तें नारायण ॥ बुध्दि ते विरिंची ॥३०॥
अहंकार तो गिरिजाकांत ॥ दाढांमाजी यम वसत ॥ जळ वृष्टि तें रेत ॥ ओळखी विराट्‍स्वरुपाची ॥३१॥
पाताळ ते चरणतळ ॥ घोटें तेंचि तळातळ ॥ पोटर्‍या सरळ रसातळ ॥ सुतळ गुडघे जाणिजे ॥३२॥
वितळ ते जानु साचार ॥ अतळ ते असे कंबर ॥ महीतळ खोल उदर ॥ सप्त पाताळ बोलिजे ॥३३॥
भूलोक तें नाभिस्थान ॥ भुवर्लोक हृदय जाण ॥ स्वर्गलोक भुजा गहन ॥ महर्लोक तो कंठ ॥३४॥
जनलोक तें वदन ॥ तपोलोक तें लटाटस्थान ॥ मस्तकतें महाभुवन ॥ एकवीस स्वर्ग जाणावे ॥३५॥
एकवीस स्वर्ग सप्तपाताळ ॥ एक विराट स्वरुप निखिल ॥ पसरलासे ढिसाळ ॥ ब्रह्मांड अवघें पोटांत ॥३६॥
मनुष्याचें पोटांत ॥ जैसे जंतु किडे होत ॥ तैसे त्याचिया उदरांत ॥ विश्व जंतु जाणिजे ॥३७॥
सप्तधातु सप्तसागर ॥ वडवानल तो जठर ॥ सिरा नाडी सरिता थोर ॥ रोम ते वृक्ष ओळखावें ॥३८॥
यालागीं आदिअंत ॥ विराट्‍स्वरुप निश्चित ॥ हाचि प्रत्यय याचा अर्थ ॥ जाणा समस्त सिध्द हो ॥३९॥
विराट्‍स्वरुप ईश्वर ॥ ऐसें बोलिला ऋषीश्वर ॥ जें परिसोनियां उत्तर ॥ देते जाहले तापसी ॥४०॥
बहुत ऋषींचे कटक ॥ त्यांत उत्तर करी एक ॥ म्हणे धन्य तुझा विवेक ॥ कळों आला आम्हांसी ॥४१॥
विराट्‍ म्हणजे दिसे आकार ॥ परमात्मा बोलिले निराकार ॥ तुझें ज्ञान हें साचार ॥ कोणे अर्थे जाणावें ॥४२॥
दिसे तितुकें नाशवंत ॥ हें तो प्रत्ययासी येत ॥ परमात्मा तो अव्यक्त ॥ आकार त्यातें असेना ॥४३॥
मी सांगतों प्रमाण ॥ परमेश्वर तो निर्गुण ॥ कार्य आणि कारण ॥ त्याजपासी असेना ॥४४॥
पांचा रंगां वेगळा ॥ श्वेत पीत नव्हे ढवळा ॥ काळा गोरा ना सांवळा ॥ नाम रुप त्या नाहीं ॥४५॥
माया प्रपंच कल्पना ॥ त्याजपासी नाहीं जाणा ॥ अनुभवें आणिजे मना ॥ व्यापक असे सर्वांसी ॥४६॥
नाहीं सृष्टीची घडामोडा ॥ नाहीं शास्त्राची बडबड ॥ बोलावया देवाची अवघड ॥ श्रुति मौनें परतल्या ॥४७॥
तेथें वर्ण ना व्यक्ती ॥ कुळ ना गोत जाती ॥ नाहीं प्रकाश ज्योती ॥ निष्कर्म जाणावा ॥४८॥
नाहीं दान धर्म ॥ नाहीं क्रिया नाहीं कर्म ॥ नाहीं तीर्थ व्रत नेम ॥ पाप पुण्य कोण पुसे ॥४९॥
पंचभूतें ना निर्गुण ॥ ध्यान धारण अवघी शून्य ॥ पंचमुद्रेचें देखण ॥ कांहीं तेथें लक्षेना ॥५०॥
नाहीं स्थूल सूक्ष्म कारण ॥ महाकारण नसे जाण ॥ चारी अवस्थांचें भान ॥ अणुमात्र असेना ॥५१॥
यापरी अवघा निराकार ॥ त्यांसी कैसा लावितां आकार ॥ ऐसा बोलिला मुनि तत्पर ॥ तंव आणिक ऋषि उठला ॥५२॥
दांत खावोनि करकरां ॥ म्हणे काय बोलिलासी सैरा ॥ अद्यापि ज्ञानें अपुरा ॥ तपसामुग्री बुडविली ॥५३॥
कळली नाहीं आत्मशुध्दी ॥ तरी कां बोलावें अल्पबुध्दी ॥ यालागीं सभेमधीं ॥ व्यर्थ बडबड करुं नये ॥५४॥
ऐका विवेक ज्ञान ॥ निराकार म्हणजे शून्य ॥ तया नास्तिकवादालागुन ॥ ब्रह्म कैसें बोलतां ॥५५॥
कांहीं नाहीं तो निराकार ॥ तो ईश्वर कैसा साचार ॥ एवढया ब्रह्मांडास आधार ॥ कोणाचा तें सांग पां ॥५६॥
देव सर्वांचा आधार ॥ देवापासून जगदाकार ॥ यालागीं मुख्य साचार ॥ एवढया ब्रह्मांडास आधार ॥ कोणाचा तें सांग पां ॥५६॥
देव सर्वांचा आधार ॥ देवापासून जगदाकार ॥ यालागीं मुख्य साचार ॥ सांगेन तेंचि परिसावें ॥५७॥
प्रत्यक्षासी सांडोनि प्रमाण ॥ व्यर्थ कां भरावें आडरान ॥ पृथ्वी श्रेष्ठ सर्वांहून ॥ इयेतें ईश्वर म्हणावे ॥५८॥
पाहतां पृथ्वीची खोली ॥ कोणें शुध्दि नाहीं आणिली ॥ लांब रुंद मोजिली ॥ ऐसा कोणी दिसेना ॥५९॥
पृथ्वी बुडतां ईश्वर बुडे ॥ पृथ्वीपासूनि सृष्टि घडे ॥ विशाल पर्वत गाढे ॥ महीं आधारें असती ॥६०॥
पृथ्वीआधार महामेरुं ॥ तयावरी नांदती हरिहरु ॥ सकळ देवता सावित्रीवरु ॥ त्यांसी आश्रय मेरुचा ॥६१॥
सकळदेवांस मेरुचा आधार ॥ मेरुस पृथ्वीचा आधार ॥ क्षमा धैर्य गुणगंभीर ॥ पृथ्वी श्रेष्ठ असे कीं ॥६२॥
रुपें आणि सुवर्ण ॥ पृथ्वीपासूनि निर्माण ॥ लाल हिरे रत्नकांचन ॥ पृथ्वीपोटीं जन्मती ॥६३॥
कथील तांबें लोखंड ॥ असंख्य वृक्ष प्रचंड ॥ जिन्नस निर्माण होती उदंड ॥ पृथ्वीपासूनि जाणिजे ॥६४॥
पृथ्वीपासूनि नारीनर ॥ पशु पक्षी तृणांकुर ॥ दिसे तितुकें चराचर ॥ पृथ्वीवरतें जाण पां ॥६५॥
अठरापगड धान्य ॥ पृथ्वीवरुतें निर्माण ॥ योगक्रिया दान पुण्य ॥ पृथ्वीपासूनि होतसे ॥६६॥
नाना मंडप देउळें ॥ पृथ्वीवरती रचिलीं सकळें ॥ कित्येक नगरपट्टणें रचिले ॥ महीचेनी आधारें ॥६७॥
सप्तपुर्‍या सप्तसागर ॥ सप्तपाताळांचें विवर ॥ एकवीस स्वर्गांची उंची थोर ॥ पृथ्वी आधारें असें कीं ॥६८॥
मुळीं देहची पृथ्वीचें ॥ म्हणोनि बोलावया सुचे ॥ वेदशास्त्र पुराणांचें ॥ कार्य चाले देहयोगें ॥६९॥
देहामुळें अवघ्या गोष्टी ॥ जाहली संसाराची दाटी ॥ कित्येक घडमोड हातवटी ॥ देहामुळें होतसे ॥७०॥
देहापासून ध्यान धारण ॥ ज्ञान आणि अज्ञान ॥ पंचमुद्रेचें देखण ॥ देहापासीं जाण पां ॥७१॥
देहापासी अवघें कारण त्या देहाचें मूळ धरा जाण ॥ यालागीं स्वर्गाहून ॥ श्रेष्ठ जाण पृथ्वी हे ॥७२॥
पृथ्वीच ईश्वर सत्य ॥ ऐसें वदला मुनि परमार्थ ॥ तें परिसोनि विरक्त ॥ उत्तर देती तयातें ॥७३॥
म्हणती अहो विवेकी ॥ काय बोलतां ज्ञानें फिकीं ॥ अझूनि वस्तु ठाउकी ॥ जाहली नाहीं तुम्हांसी ॥७४॥
बहुत बैसले ऋषी ॥ त्यांत एक बोले ज्ञानासी ॥ म्हणे मी सांगतो सर्वांसी ॥ सार वस्तु कोणती ॥७५॥
पृथ्वी म्हणिजे जड ॥ प्रत्यक्ष माती आणि दगड ॥ त्यासी ईश्वरत्व घड ॥ सांगा निवड श्रेष्ठहो ॥७६॥
पृथ्वीस आधार कवणाचा ॥ शेषास आधार वराहाचा ॥ वराहास आधार कूर्माचा ॥ कूर्मास आधार नीरहो ॥७७॥
नीर म्हणजे निराकार ॥ तयापासूनि आकार ॥ दिसे तितुकें चराचर ॥ तयाचें मूळ आप कीं ॥७८॥
प्रत्यक्ष आपोनारायण ॥ ऐसें वदे वेदवचन ॥ तेथें संदेहाचें भान ॥ कोण्या अर्थे धरावें ॥७९॥
महाप्रळयाचे अंतीं ॥ तेव्हाम विरोनी जाईल क्षिती ॥ मग जगाची उत्पत्ती ॥ कोठें राहील सांग पां ॥८०॥
बुडोनि जातील मेरुमंदार ॥ अवघा होईल निराकार ॥ यालागीं मुख्य ईश्वर ॥ सत्य एक आपची ॥८१॥
आधीं होतें एक पाणी ॥ मग जाहली हे मेदिनी ॥ त्याची साक्ष आहे पुराणीं ॥ पाहा तुम्ही श्रेष्ठ हो ॥८२॥
पापणियाची निघाली हे मळी ॥ ते गोठोनी पृथ्वी जाहली ॥ शेवटीं वीरोनी मिळे जळीं ॥ सामर्थ्य नाहीं तगावया ॥८३॥
पाण्यापासूनि पृथ्वी जाहली ॥ उदकापासूनि सृष्टि उद्भवली ॥ पाण्यापासोनि वृक्ष वल्ली ॥ निर्माण जाहल्या जाणिजे ॥८४॥
पाहतां वीर्य तेंचि पाणी ॥ तयापासोनि निपजे प्राणी ॥ स्त्रीपुरुषांचें मैथुनी ॥ होय विलास पाण्याचा ॥८५॥
पाण्यापासूनि पिंड ॥ घडलें अवघें ब्रह्मांड ॥ चारी खाणी प्रचंड ॥ पाण्यापासोनि उगवल्या ॥८६॥
जंववरी पाणियाचा रस ॥ वाढे वृक्ष धरोनि पैस ॥ पाणी शोकितां बाकस ॥ होय काष्ठ कोरडें ॥८७॥
पाण्या पासूनि धान्यें पिकती ॥ राजे लोग बागा करिती ॥ अनेक पुष्पे विकासती ॥ शोभा होय पाण्यानें ॥८८॥
पाण्यापासूनि नानारस ॥ कडुवट आंबट तीक्ष्ण पीयूष ॥ खार गोड तुरट आम्लरस ॥ षड्रसीं चवी पाण्याची ॥८९॥
स्नान संध्या देवतार्चन ॥ पाण्यावांचोनि न घडे जाण ॥ पावित्र तीर्थे पुण्य पावन ॥ तींही असती पाण्याची ॥९०॥
सप्तधातु सप्तसागर ॥ तेही पाण्याचा विचार ॥ वापी कूप तळीं अपार ॥ पाण्यासाठीं खणिती ॥९१॥
विष तें पाण्याचा अंश रस ॥ अमृत तें पाण्याचा अंश ॥ पृथ्वीवरी पडे पाऊस ॥ होय सुकाळ धान्याचा ॥९२॥
पाण्यापासून स्वयंपाक ॥ कैसा निपजे पाहा विवेक ॥ ताहान लागतां जीव शोक ॥ कोरडे पडे घशासी ॥९३॥
सत्रावीची जीवनकळा ॥ तोचि पाण्याचा जिव्हाळा ॥ काकमुखीं लंबिकेला ॥ लाऊनि तेणें प्राशिती ॥९४॥
तिच्या आधारें योगीश्वर ॥ प्राण वांचविती साठीसहस्त्र ॥ म्हणोनि सर्वांसी आधार ॥ पाणी एक जाणावें ॥९५॥
पाहतां पाण्यावांचून ॥ कांहीं न होय निर्माण ॥ याचें अनुभवज्ञान ॥ उघड दिसोंयतसे ॥९६॥
सगुण आणि निर्गुण ॥ सत्य आपोनारायण ॥ सर्वसाक्षी सर्वज्ञ ॥ ईश्वर स्वामी सर्वांचा ॥९७॥
यापरी नैमिषारण्यीं ॥ ऋषीनें स्तविलें विशेष पाणी ॥ तें परिसोनियां कर्णी ॥ उत्तर करी दूसरा ॥९८॥
तया शब्दांचें कल्लोळ ॥ सांगेन श्रोतयां प्रांजळ ॥ माझीं कविता तुळसीदळ ॥ कृष्णार्पण होतसे ॥९१॥
नामरुपा घालोनि शून्य ॥ केलें अवघें कृष्णार्पण ॥ शहामुनीचें वचन ॥ मिरवे जैसें मृगजळ ॥१००॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिरुपणे त्रयोदशोध्याय: अध्याय ॥१३॥ ओंव्या ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP