मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध| अध्याय ५ वा सिध्दान्तबोध प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ५ वा ‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे. Tags : pothisiddhant bodhपोथीसिध्दान्तबोध अध्याय ५ वा Translation - भाषांतर श्रीगणेशायनम: ॥ जो नर धर्मपरायण ॥ दया शांति अंगीं पूर्ण ॥ सत्य बोले दु:ख सुख समान ॥ त्याचा जन्म सुफळ कीं ॥१॥विकल्पीं अविश्वासी खोटा ॥ गर्विष्ठ अभिमानी अंगीं ताठा ॥ कुबुध्दीचा हृदयी सांठा ॥ सद्वासना बुडाली ॥२॥अठरा पगड याती बैसत ॥ नौका न बुडवी तयांस ॥ एक विटाळशी बैसल्या तेथ ॥ बुडवी जळांत तारीना ॥३॥ जयासी विकल्प कल्पना भारी ॥ तोचि विटाळशीसमान संसारीं ॥ पाषाण बांधोनि पोहणें सागरीं ॥ हें अघटित घडेना ॥४॥महाविशाळ गजराज ॥ त्याचें मस्तकीं मोतीं निपजे ॥ तो जिवंत असतां घेईजे ॥ हें तों अघटित घडेना ॥५॥महाविशाळ गजराज ॥ त्याचें मस्तकीं मोतीं निपजे ॥ तो जिवंत असतां घेइजे ॥ हें तों अघटित घडेना ॥५॥सर्पफणेवरी वसे मनी ॥ तो जिवंत असतां घेइजे काढोनी ॥ हें काय साजे हो बोलणी ॥ चतुरालागीं घडेना ॥६॥वनमृगाचेनाभीची ॥ हाता नये कस्तुरी साची ॥ जिवंत असतां व्याघ्रचर्माची ॥ प्राप्ति नोहे मानवां ॥७॥युध्दीं हातातील तरवार ॥ दुजया नेदी महावीर ॥ किंवा आपुलें धन साचार ॥ कृपण दुजया देईना ॥८॥शर्करा सोमल होणें ॥ सोमलास साखरेचे येती गुण ॥ हिंगण होईल गा चंदन ॥ चंदनास हिंगण होतां नये ॥९॥निर्गुणास विषमत्त्वें वर्ततां नये ॥ समत्वें सगुणासी चालतां नये ॥ भक्तांचे कीजे देवें साह्यें ॥ दुष्टांलागीं संहारिजे ॥१०॥प्रर्हाद रक्षूनि हिरण्यकशिपू संहारिला ॥ वाळी मारोनि सुग्रीव मित्र केला ॥ रावण वधूनि बिभीषण तारिला ॥ समता न धडे सगुणासी ॥११॥निर्वैर व्हावें ही साधूंची पदवी । शुकसनकादिक नारद मिरवी ॥ विषय भावना धरिती जीवीं ॥ समता गुण स्वरुपीं ॥१२॥समता बोध गुरुचें धरीं ॥ म्हणोनि वंदिजे हरहरी ॥ ब्रह्मींचा अंकुर उल्लेख नगरी ॥ ज्ञान विग्रही सर्वेश्वरु ॥१३॥यालागीं श्रीगुरुसी शरण ॥ न जातां न घडे मोक्ष सदन ॥ न जाये भ्रांति भेद भान ॥ अद्वैत बोध ठसेना ॥१४॥जिवंत असतां सिंहाचें नख ॥ आणीन म्हणे धडे विवेक ॥ तेवीं गुरुवांचोनि मोक्षसुख ॥ होणें हें तों दुर्लभ ॥१५॥गुरुकृपेचा अपार गरिमा ॥ नि:सीम बोधाची पूर्ण पौर्णिमा ॥ यालागीं कवित्वाची सीमा । होती जाहली ते परिसा ॥१६॥गंगेचा ओघ मुळीं लहान ॥ पुढें पसरे अपार जीवन ॥ तैसा हा ग्रंथ जाण ॥ वोळखान घेणें चतुरानें ॥१७॥बीजापासोनि लहान अंकुर ॥ पुढें वृक्ष पसरे अपार ॥ यापरी हा ग्रंथविस्तार ॥ होईल पसर तो परिसा ॥१८॥पुढें बोधीन यात अद्भुत ॥ कथीन सिध्दांतबोध विख्यात ॥ रस ओतीन अर्थभरित ॥ रहस्य गोडी अनुपम ॥१९॥लिहितों अनेक चरित्ररचना ॥ यांत संशय आणूं नये मना ॥ पुढें परिसिलिया ज्ञानखुणा ॥ निवती सज्जन विवेकी ॥२०॥मी तों शरणागत देवासी ॥ हेंचि भांडवल मजपासी ॥ शरणागताचा अभिमान हरीसी ॥ हें बिरुद प्रसिध्द असे ॥२१॥याविषयीं ऐका दृष्टांताची मात ॥ परिसा सांगतों रामायणांतील चरित ॥ लक्ष्मणास शक्ति लागल्या रघुनाथ ॥ फार श्रमी तो जाहला ॥२२॥लक्ष्मणास कवळोनि हृदयांत ॥ शोक करी राम समर्थ ॥ म्हणे विपरीत होणार बळिवंत ॥ कैसें घडेल या समयीं ॥२३॥कैसी बंधुपणाची अगाध सीमा ॥ तुवां करुनि दाविली सख्या उत्तमा ॥ माझा निवाला अंतरात्मा ॥ एवढा प्रेमा वाढविला ॥२४॥मजसांठीं नवमास कष्टलास ॥ सेविला त्यागूनि राजविलास ॥ सेवा केली चौदा वरुष ॥ निराहार राहोनियां ॥२५॥नाहीं आठविलीं पिता माता सुत दारा ॥ वैभवविषयां लागों दिला नाहीं वारा ॥ इंद्रियजित धैर्यपुरा ॥ ऐसा बंधु दुर्लभ ॥२६॥ शूर धीर गुणगंभीर ॥ चातुर्य सुलक्षण विवेकसार ॥ मज पुढें ठेवूनि आपुलें शिर ॥ स्वर्गी जाणें त्वां केलें ॥२७॥तुवां गेलिया मागें अयोध्येकारणें ॥ मातें मुख दावितां लाजिरवाणें ॥ युध्द हृदयीं बैसेल धडका ॥ काय उत्तर मग वदों ॥२९॥आतां येथें वेंचीन आपुला प्राण ॥ तुजपासी स्वर्गास येईन ॥ आपुले पाठीमागें जाण ॥ होणार तें सुखें घडो ॥३०॥पाषाण बांधोनि आपुले पोटीं ॥ उडी टाकीन महातटीं ॥ मागें होईल ते होऊ गोष्टी ॥ प्राण त्यजीन सागरीं ॥३१॥देव गुंतले कारागृहांत ॥ सीता राहिली अशोकवनांत ॥ जातां अयोध्येंत मात ॥ कौसल्या प्राण त्यजील ॥३२॥लागेल सूर्य वशी बट्टा ॥ राम आचरला कर्म खोटा ॥ परंतु वोढवल्या संकटा ॥ त्यास उपाव नसे कीं ॥३३॥मी निवाल्या देव सुटणार नाहीं ॥ याचा खेद म्यां सोडिला पाहीं ॥ जानकी राहिली राक्षसगृहीं ॥ हाही संकल्प म्यां त्यजिला ॥३४॥मजवांचोनि कपि समस्ता ॥ प्राण त्यजितील उदकांत ॥ त्याही शोकाची अपार मात ॥ म्यां रामें सोडिली ॥३५॥अयोध्येंत तिघी माता ॥ प्राण त्यजितील ऐकतां ॥ याही खेदाची शोकचिंता ॥ म्यां रघुनाथें सोडिली ॥३६॥इतुक्यापरीस दु:ख मातें भारी आठवे अपार खेदलहरी ॥ बिभीषण कवणाचे द्वारीं ॥ शरणागत जाईल ॥३७॥देव सीता माता कपी ॥ यांचा खेद नाहीं माझिया स्वरुपीं ॥ परंतु बिभीषणाचे संकल्पी ॥ हा घोर मज बहु वाटे ॥३८॥मातें थोर शरणागतांची लाज ॥ केलें अनंत भक्तांचें काज ॥ अनाथ होतां रावणानुज ॥ मग मी राम कशाचा ॥३९॥मग धरोन श्रीरामें अभिमान ॥ निवटी कुळासहित रावण ॥ राज्यीं स्थापिला बिभीषण ॥ पण नेला सिध्दीतें ॥४०॥हें चरित्र ल्याहावया हेंचि कारण ॥ शरणागतांचा अभिमानी नारायण ॥ ऐसीं गर्जतीं महापुराणें ॥ संत साधु पुण्यात्मे ॥४१॥शरण जातां देवासी ॥ कोटिसाधनें देती यशासी ॥ अनन्यें आवडे जननीसी ॥ प्रीत नसे तोंवरी थोरीवा ॥४२॥जो भक्त अनन्य शरण ॥ त्यासी साह्य नारायण ॥ यालागीं पांडवांचें संरक्षण ॥ करितां जाहला श्रीहरी ॥४३॥अश्वमेधपर्वी अर्जुन ॥ सज्जून चालला सकळ सैन्य ॥ पुढें सोडिला श्यामकर्ण ॥ मागें थाट फौजेचा ॥४४॥अर्जुन हृदयसागरीं ॥ हेलाविलीं अभिमानलहरीं ॥ म्हणे मजसमान भूक्षेत्रीं ॥ सोमवंशांत दुर्लभ ॥४५॥इतुकीच धरितां अहंकृती ॥ तों पुढें वोढवली फजिते ॥ ते परिसा श्रवणें श्रोतीं ॥ कौतुकार्थ हरीचे ॥४६॥हंसध्वजाचा सुकुमार बाळ ॥ सुधन्वा षोडशवर्षांचा केवळ ॥ शिकार खेळतां प्रबळ ॥ श्यामकर्ण लक्षिला ॥४७॥ठाण माण चपळ गती ॥ सुधन्वें धांवोन धरिला हातीं ॥ सुवर्णपत्रिका भाळीं शोभती ॥ अक्षरें रेखिलीं सुढाळ ॥४८॥सोमवंशामाझारी ॥ धर्म राजा हस्तिनापुरीं ॥ श्यामकर्ण सोडिला पृथ्वीवरी ॥ जिंकावया नृपांतें ॥४९॥जो अशक्त असेल नृपवर ॥ त्याणें द्यावें द्रव्यभार ॥ ज्यास युध्दाचा असेल जोर ॥ त्याणें समरंगणीं भिडावें ॥५०॥पत्रार्थ ध्यानीं आणिला ॥ वारु वृक्षासी बांधिला ॥ धनुष्य सज्जूनि उभा ठेला ॥ सिंह जैसा गजावर ॥५१॥मागें भार आले रक्षपाळाचें ॥ एक्या शरें कर छेदिले त्यांचे ॥ त्यांणी घेऊन वोझें अपयशाचें पार्थापुढें ठाकले ॥५२॥अर्जुन म्हणे हे विपरीत ॥ कोणे छेदिले यांचे हस्त ॥ एक वदती अद्भूत ॥ बाळ दृष्टीं देखिला ॥५३॥तेणें सुवर्णपत्रिका वाचिली ॥ वारु वृक्षासि बांधिला ॥ दाहा सहस्त्र मनुष्यांला ॥ एकें शरें छेदिलें ॥५४॥परिसोनि अचंबा करी अर्जुन ॥ हें न घडावे तें घडलें जाण ॥ रथ लोटोनि करी अवलोकन ॥ बाळ सुकुमार देखिला ॥५५॥तुझी सुकुमार तनु धाकुटी ॥ विद्येची चपळाई दिसे मोठी ॥ संतोष जाहला माझिया पोटीं ॥ क्षमा केला अपराध ॥५६॥तूतें दिलें जीवदान ॥ सोडीं माझ्या वारुवालागून ॥ हें परिसोनि सुधन्व्यानें ॥ हास्य केलें गदगदां ॥५७॥म्हणे युध्दावांचोनि वारु सोडणें ॥ हे तों कल्पांतीं न घडे जाण ॥ पाहूं तुझा पुरुषार्थ गहन ॥ घेईं धनुष्य आपुले करीं ॥५८॥अर्जुन म्हणे या ब्रह्मांडांत ॥ मातें जिंकी ऐसा कवणा पुरुषार्थ ॥ हें तो न घडेचि अघटित ॥ बोलसी मुला हें नवल ॥५९॥तूं बाळ दिससी सुकुमार ॥ म्यां शर मारितां हसतील सुरवर ॥ पाहों कितेक तुझा जोर ॥ करी संधान मजवरी ॥६०॥परिसोनि अर्जुनाची वाणी ॥ सुधन्व्यानें बाण लाविला गुणीं ॥ वारु सारथी यांतें मारुनी ॥ रथाचे आख छेदिले ॥६१॥दुसरिया रथीं बैसे पार्थ ॥ तोही रथ मोडी सुधन्वा त्वरित ॥ घाबरा जाहला कुंतिसुत ॥ बाण जाळें वेष्टिला ॥६२॥गेला पुरुषार्थ निघोन ॥ गुंग जाहला फाल्गुन ॥ उतरला समरंगणाचा पण ॥ कृष्णालागीं आठवी ॥६३॥चिंता करितां हृदयभुवनीं ॥ अंतरसाक्ष चक्रपाणी ॥ प्रगट जाहला तेच क्षणीं ॥ सावध म्हणे किरटी ॥६४॥आणोनि नूतन रथासी ॥ सजोगूनि चपळ तरगांसी ॥ धनुष्य देऊन पार्थपासी ॥ उभयतां रथीं आरुढले ॥६५॥तों सुधन्व्यानें बाण सोडिला ॥ रथ गगनांत उडविला ॥ गरगरां फिरों लागला ॥ जाहला घाबरा अर्जुन ॥६६॥हरीनें सांवरोनि रथाला ॥ धरेवरुता स्थिर केला ॥ अर्जुना चाल हस्तनापुराला ॥ युध्द यासी करुं नये ॥६७॥अर्जुन म्हणे कृपाळा हरी ॥ मुलाचें भय घालितां भारी ॥ चालोनि आलिया दर्दुरीं ॥ भुजंगें भिऊन पळावें ॥६८॥जंबुकाचे गर्जनेसाठीं ॥ सिंहे धाक घेईजे पोटीं ॥ किंवा मूषकें धरितां हुटहुटी ॥ मांजरीं काय पळावें ॥६९॥युध्दामाजी प्रचंड वीर ॥ संहारिले कर्ण शल्य झुंजार ॥ निवातकवच अपार शूर ॥ म्यां समरगंणी जिंकिले ॥७०॥सुधन्वा म्हणे पुरुषार्थ खरा ॥ सांगसी आपुला शार्ड्गधरा ॥ आतां पण करोनि चतुरा ॥ युध्द करीं मजसवें ॥७१॥अर्जुन वदे तीन शरानें ॥ शिर छेदिन संकल्प जाण ॥ असत्य होय तरी पतन ॥ घडेल पूर्वज वंशासी ॥७२॥सुधन्वा वदे रुक्मिणीरमणा ॥ तुझिया साक्षीनें तिन्हीं बाणां ॥ न तोडीं तरी पूर्वजां पतना ॥ माझ्या घडो जाणपां ॥७३॥अर्जुनें काढिला तीक्ष्ण शर ॥ कृष्णें संकल्प केला त्यावर ॥ राम अवतारीं मित्राचोर ॥ वधिला रावण बलाढय ॥७४॥देव सोडिला बंदींतुन ॥ सुखीं केले विश्वालागुन ॥ तें पुण्य वाणीं प्रवेशोन ॥ शिर तुटो सुधन्व्याचें ॥७५॥अर्जुनें सोडिला बाण ॥ मध्येंच तोडिला सुधन्व्यानें ॥ हरि म्हणे गेला पण ॥ अवसान माझें गळालें ॥७६॥सांडीं युध्दाची गोष्टी ॥ चाल जाऊं धर्माचे भेटी ॥ अर्जुन आपलें कपाळ पिटी ॥ गेला जन्म व्यर्थची ॥७७॥दोन शरानें याचें शिर ॥ उडवीन हा निज निर्धार ॥ दुसरा संकल्प शार्ड्गधर ॥ घालिता जाहला त्यावरी ॥७८॥म्यां गोकुळीं गोवर्धन उचलोन ॥ संरक्षिला गोवत्सांचा प्राण ॥ त्यापुण्य़ें शिर छेदून ॥ पडो या बाळाचें ॥७९॥अर्जुनें कसूनि बाण लावितां ॥ तोही तोडिला सुधन्व्यानें त्वरितां ॥ हरि म्हणे अर्जुना आतां ॥ सीमा झाली चाल घरा ॥८०॥आतां एका बाणा साठीं ॥ नको पडूं संतापसंकटीं ॥ माझी जिराली हुटहुटी ॥ दोनी संकल्प बुडाले ॥८१॥अर्जुन म्हणे या बाणें ॥ घेईजे सुधन्व्याचा प्राण ॥ नाहीं तरी देईन आपुल्या जीवा लागुन ॥ परी मुख न दाखवीं धर्मराया ॥८२॥हरींनें मग बाणबुडासी ॥ स्थापिलें आणूनि महारुद्रासी ॥ मध्य भागीं ब्रह्मयासी बैसविला अभिषेकुनी ॥८३॥भालाग्रीं कालचक्र ॥ बैसविलें भरोनि महाचक्र ॥ त्याचे पाठीं साह्य सूत्र ॥ संकल्पाचें नेमिलें ॥८४॥श्रीकृष्ण निरामय निर्गुण ॥ ब्रह्मचारी विषयातीत पूर्ण ॥ तरी याचि सायकें करोन ॥ शिर पडो सुधन्व्याचें ॥८५॥ मग अर्जुन करीं बाण घेऊन ॥ करोनि हरीस नमन ॥ बाण सोडिला धनुष्या पासोन ॥ जेवीं कोटि विजा कडाडिल्या ॥८६॥सुधन्वें नमोनि हरिचरणा ॥ स्मरोन कैलासपति गिरिजारमणा ॥ भरोनि कानाडा वाढितां जाणा ॥ अर्जुन शर मध्येंचि खंडिला ॥८७॥बाण जाहलासे दुभंग ॥ पार्थ प्राण त्यजूं पाहे मग ॥ तों हातीं धरी श्रीरंग ॥ वरता लक्षी सुलक्षण ॥८८॥काळचक्र होतें भालाग्रीं ॥ कंठ छेदिला वरच्यावरी ॥ रुंड पडलें महीवरी ॥ हरिस्मरणा मुक्त जाहलें ॥८९॥दोहींचा पण नेला सिध्दीतें ॥ ऐसी कळा श्रीअनंतें ॥ यालागीं शरणागत हरीतें ॥ होतां कल्याण होतसे ॥९०॥मीठ मोतीं उदकापासून ॥ मीठ तों मऊपणें जाय मिळोन ॥ मोत्याचे अंगीं कठिणपण ॥ यालागा तें मिळेना ॥९१॥जीव ब्रह्मींचा अंश ॥ ब्रह्म जीवाचा एकांश ॥ दोनी होतां समरस ॥ होय बध्द स्वभावें ॥९२॥पाणी नम्रपणें सर्वांत मिळे ॥ पाषाण कठिणपणें राहती वेगळे ॥ जो पुरुष नम्र चाले ॥ तो आवडे हरीसी ॥९३॥तुळसीरोप दिसे लहान ॥ त्यासी पूजिती विश्वजन ॥ येर वृक्ष विशाल असोन ॥ नमन कोणी करीना ॥९४॥चांदरातीचां चंद्र धाकुटा ॥ विश्व जोडी करसंपुटा ॥ पौर्णिमेस होतां मोठा ॥ कोणी नमन करीना ॥९५॥ नदीस पूर भरोनि येती ॥ मोठे वृक्ष वाहोनि जाती ॥ लहान नव्हे तैसेचि असती ॥ थोरिवां पीडा लहान सुखी ॥९६॥लहानी मुंगीस साकर ॥ गज भक्षी काष्ठें अंकुशाचा मार ॥ बारीक बीज वट अपार ॥ पावटा मोठा झाड वाढेना ॥९७॥यालागीं सोडोनि अभिमान ॥ सर्वांभूतीं नम्र चालावें चतुरानें ॥ संतांसी घालावें लोटांगण ॥ थोरीव वोवाळूनि सांडिजे ॥९८॥घेऊनी अनुताप पूर्ण ॥ भजावा एक नारायण ॥ नमनीं नमावा श्रीभगवान ॥ जेणें पावन जीवात्मा ॥९९॥आमुचें हेंचि सार्थक ॥ नमो श्रीकृष्ण ब्रह्म देख ॥ सत्ताधारी मोक्षदायक ॥ त्यासी भजों एकनिष्ठें ॥१००॥एकनिष्ठा एकनेम ॥ यांत संतोष आत्माराम ॥ बहु उपासनेचा वाढतां भ्रम ॥ विश्रांति न श्रमची ॥१॥सर्व उपासनांत श्रेष्ठ उपासना ॥ सद्गुरु एक कैवल्यराणा ॥ जो चुकवी जन्ममरणा ॥ त्यासी शरण रिघावें ॥२॥जो गुरुचाही परमगुरु ॥ श्रीकृष्ण परब्रह्म परमेश्वरु ॥ अलक्ष अपार अपरंपारु ॥ उतरी पारु भवाब्धी ॥३॥त्या श्रीहरीसी नमन ॥ एकनिष्ठा अनन्य शरण ॥ तरीच श्रीनारायण ॥ कृपा करील निश्चयें ॥ ४॥एकरुप जनार्दन ॥ काळासूत्रीं तूंचि निर्गुण ॥ उत्पत्ति स्थिति प्रळयीं जाण ॥ कर्ता हर्ता तूंचि कीं ॥५॥हृदयीं स्फुरतां चेतविता ॥ अंतर्साक्षी जगन्नाथा ॥ माझ्या मीपणा आतौता ॥ बुध्दिप्रेरिता तूं स्वामी ॥६॥ओं नमो श्रीशार्ड्गधर ॥ ब्रह्मादिकां नकळे पार ॥ येथें काय मानवी नर ॥ जाणावया तव महिमा ॥७॥तुझें कळावया स्वरुप ॥ शिव स्मशानीं करी तप ॥ तरी नकळें जी रुप ॥ सहस्त्रमुद्रा लावितां ॥८॥शिवादिकांची ही गत ॥ तेथें इंद्रचंद्रांची कोण मात ॥ ऋषीश्वरांचा पुरुषार्थ ॥ जिरोन गेला वितंडतां ॥९॥यालागीं सांडोनि अभिमान ॥ अनन्यभावें व्हावें शरण ॥ तरीच श्रीनारायण ॥ कृपावंत होईल ॥११०॥जे देवाचे सलगीचे ॥ पराक्रमी बहुबळाचे ॥ सखे मित्र श्रीहरीचे ॥ त्यांचे गर्व भाजले ॥११॥बळराम श्रीकृष्णाग्रज ॥ गरुड अरुणाचा अनुज ॥ सत्यभामा श्रीकृष्णभाज ॥ तिघें गर्वे फुगलीं ॥१२॥सत्यभामा गरुड बळराम ॥ या तिघांसीं गर्व परम ॥ हें जाणोनि मेघश्याम ॥ करिता जाहला लाघव ॥१३॥लंकेमध्यें हो मारुती ॥ बैसला होता निश्चळचित्तीं ॥ त्याच्या हृदयीं कामशक्ति ॥ प्रेरुनि केलें चंचळ ॥१४॥कपीनें मनीं विचारिलें ॥ श्रीराम निजधामा गेले ॥ त्रेतायुग संपलें ॥ द्वापार तेंही जातसे ॥१५॥त्रेतायुगापासोन ॥ नाहीं केलें पृथ्वी गमन ॥ कांहीं तीर्थयात्रा करुन ॥ मागुता येऊं लंकेसी ॥१६॥ऐसें विचारुनि उठिला ॥ प्रथम रामेश्वरा आला ॥ मग गया काशीला ॥ करुनि आला पुष्करा ॥१७॥प्रयागीं त्रिवेणी मथुरा पुरीं ॥ अयोध्या आणि हरिद्वार नगरीं ॥ बद्रिकेदार ब्रह्मगिरी ॥ करोनि द्वारके पातला ॥१८॥दुरोनि पाहे विलोकूनी ॥ लंके ऐसी हेमसदनीं ॥ अवघी कनकाची मांडणी ॥ शोभे जैसी ब्रह्मपुरीं ॥१९॥म्हणे मज दिशा भुली जाहली ॥ कीं पाहें लंका कोणीं आणिली ॥ घालीन महीं पालथी सगळी ॥ शोध लावीन मी तयाचा ॥१२०॥सोनियाची लंका नगरी ॥ दुसरी नाहीं पृथ्वीवरी ॥ माझ्यामागे करुनि चोरी ॥ कोणें बलिष्ठें आणिली ॥२१॥बिभीषणासी लंकाभुवन ॥ देऊनि गेला रघुनंदन ॥ ते श्रीरामाज्ञा मोडून ॥ कोणें धारिष्ठ केलें हें ॥२२॥जिवंत असतां मी आज ॥ कोणाचें जाहलें एवढें काळीज ॥ ऐसें बोलोनि कपिराज ॥ दोन्ही भुजा पसरिल्या ॥२३॥तेचि समयीं नारदमुनी ॥ जात होता स्वेच्छागमनी ॥ कौतुक पाहोनियां नयनीं ॥ कपिनिकत पातला ॥२४॥मारुतीस म्हणे नारद ॥ तुझा न करितां अपराध ॥ आतां व्यर्थ करिसी द्वंद्व ॥ हें ईश्वरासी मानेना ॥२५॥तूं म्हणसी आणिली लंका ॥ तरी हे लंका नव्हे द्वारका ॥ येथें राज्यासी भाग्यरेखा ॥ तेणें हरुषें बांधिली ॥२६॥हें ऐकोनि प्लवंगम ॥ म्हणे काय नृपाचें नाम ॥ मुनि म्हणे एवढें मर्म ॥ मातें कांहीं पुसो नको ॥२७॥बहुत आग्रह करी मारुती ॥ नारद हांसे आपुले चित्तीं ॥ म्हणे या नगरीचा नृपती ॥ बळराम राजा बोलिजे ॥२८॥बळराम ऐशा ऐकोनि नामासी ॥ क्रोध धडकला मारुतीसी ॥ नेत्र वटारुनि तयासी ॥ क्रोधदृष्टीं विलोकित ॥२९॥माझा स्वामी राम पूर्ण ॥ बळराम आणिला कोठून ॥ बोलावया तुझें मन ॥ धारिष्ट कैसें जाहलें रे ॥१३०॥नारद म्हणे मारुती ॥ म्यां पहिलेंची निवेदिलें तुजप्रती ॥ नाम सांगतां क्रोधदीप्ती ॥ हृदयीं तुझ्या प्रगटेल ॥३१॥तैसेंचि वर्तलें जाणा ॥ मातें कां करिशी छलना ॥ कपि म्हणे ऐक वचना ॥ सांगतों तें त्वां करावें ॥३२॥आतां जावोनियां नगरांत ॥ माझी सांगावी त्वां मात ॥ बळराम नामातें त्वरित ॥ सोडोनि देईं परातें ॥३३॥बोलेल पुरुषार्थ आपुला ॥ तरी शीघ्र प्रेरीं युध्दाला ॥ मुनि परिसोन वचनाला ॥ गडबडां लोळे भूमीसी ॥३४॥कांहीं नाचे कांहीं हांसें ॥ मार्गी चालिला परम हरुषें ॥ म्हणें त्वरें जाऊनि द्वारकेस ॥ वृत्तांत निवेदूं कपीचा ॥३५॥ऐसें विचारुनी नारदमुनी ॥ आल्हादें चालिला कृष्णसदनीं ॥ सभा बैसली धनवटोनी ॥ मध्यें बळराम गोपाळ ॥३६॥नारदास विलोकूनि नयनीं ॥ यादवांसहित चक्रपाणी ॥ विधिसुता नमस्कारोनी ॥ बहु आदरें सन्मानिला ॥३७॥वसुदेवसुत पुसे विधिसुता ॥ कोठून येणें जाहलें त्वरिता ॥ कांहीं अपूर्व सांगावी वार्ता ॥ काय ऐकिलें देखिलें ॥३८॥हांसोनि बोले वाल्मीकगुरु ॥ एक नवल देखिले थोरु ॥ तो सांगावया विचारु ॥ जीव माझा भीतसें ॥३९॥कृष्ण म्हणे अहल्याग्रजा ॥ ऐकावया हेतु माझा ॥ स्पष्ट असेल तें सांगे वोजा ॥ गुंती न ठेवीं मानसीं ॥४०॥परीसोनि जगदीशवाणी ॥ हास्य करी नारदमुनी ॥ बळरामअनुजा लागुनी ॥ वृत्तांत सांगे वर्तला ॥४१॥म्हणे द्वारके नगराबाहेर ॥ विपरीत देखिला वानर ॥ ऊलथूं पाहे ब्रह्मांड समग्र ॥ केवढी शक्ति दावितो ॥४२॥भुजें कवळूनि द्वारकेसी ॥ नेऊं पाहे लंकेसी ॥ मी पावलों त्या समयासी ॥ स्थिर केला कपींद्र ॥४३॥तेणें पुशिलें मातें ॥ कवण राजा नांदतो येथें ॥ बळराम सांगतां नामातें ॥ क्रोधें बहुत खवळला ॥४४॥क्रोधें विलोकितां मात ॥ बहुत विनविलें म्यां त्यातें ॥ निरोप सांगोनि पाठविलें येथें ॥ तेंही प्रगट सांगतों ॥४५॥बळराम नाम असेल ज्यातें ॥ सांडोनि शरण यावें मातें ॥ विलंब लावितां शमनपंथें ॥ वोळवीन रोकडा ॥४६॥असेल युध्दाची हुटहुटी ॥ येवोनि भिडावें समदृष्टीं ॥ यापरी पेटलासे हाटीं ॥ कांहीं केलिया समजेना ॥४७॥ऐसें वदला मुनिराज ॥ परिसोनि हांसला गरुडध्वज ॥ म्हणे सांगितलें याणें चोज ॥ नवल कांहीं असेना ॥४८॥मग म्हणे रेवतीरमणा ॥ मुनिवचन आणिलें मना ॥ ते उपाधी निवारणा ॥ कैसी होईल सांगपां ॥४९॥बळरामा म्हणे गोपाळा ॥ कोण मानी मर्कटचाळा ॥ मुनीचें सोंग घेऊनि आला ॥ भोरपी जैसा सभेतें ॥५०॥गोविंद म्हणे बळरामा ॥ न कळे ईश्वराचा महिमा ॥ कोण घटीं कैसा आत्मा ॥ नेमिला असे कर्त्यानें ॥५१॥समुद्राचें संकट ॥ झुरळें निवारीलें अचाट ॥ लव कुश बाळें धाकुट ॥ युध्दीं जिंकिले रामभरत ॥५२॥बहुत मिळोनि माकडें ॥ गोंधळ घालिती लंकेपुढें ॥ देवांपरीस राक्षस गाढे ॥ धुळीमाजी मेळविले ॥५३॥रेणुकेच्या लघु सुतानें ॥ तेणें सहस्त्रार्जुन मारुन ॥ त्याचें केले निसंतान ॥ पुरुषार्थ असे आगळा ॥५४॥अर्जुन म्हणजे मानवी जन ॥ स्वर्गी बाण धाडिला तेणें ॥ ऐरावती इंद्रापासून ॥ मृत्युलोकीं आणिला ॥५५॥हरि हर ब्रह्मादिक ॥ अनसूयेनें केले बाळक ॥ कुंभोभ्द वसुते देख ॥ विष्णुश्वशुर प्राशिला ॥५६॥यालागीं सांगतों ऐका ॥ व्यर्थ हावें भरुं नका ॥ नाम सोडोनि कपी देखा ॥ निरोप सांगोन पाठवा ॥५७॥बरवें सांगतो ऐक अग्रज ॥ नको पडूं आग्रहकाजा ॥ नाम सोडोनि कपिराजा ॥ निरोप सांगोन पाठवा ॥५८॥स्वल्पासाठीं कलह करणें ॥ यश अपयश देव जाणें ॥ त्यालागीं दुराग्रह त्यजून ॥ राहिले सुखें मंदिरीं ॥५९॥कृष्णमुखवारूळांतून ॥ शब्दभुजंग निघाला फुंपाटून ॥ बळरामा कर्णी डंखोन ॥ गर्वविषें व्यापिलें ॥१६०॥त्यास गुणियां अंजनीपुत्र ॥ जपेल पुच्छबळाचा मंत्र ॥ बळराम दर्शनमात्र ॥ फुटेल झेंडू गर्वाचा ॥६१॥तोचि रहस्यभाग कथेचा ॥ वदेल बाळ श्रीदत्ताचा ॥ शहामुनि सेवक संतांचा ॥ मिरवे सज्जनसभेसी ॥६२॥परी येथें जाहलें उफराटे ॥ मध्येचि भरले आडफांटे ॥ मागील कथा राहिली कोठें ॥ जालंधर दैत्याची ॥६३॥चौथे अध्यायीं निरुपण ॥ शिव दैत्य भांडती दारुण ॥ तें सांडोनि अनुसंधान ॥ दुसरी कथा लागली ॥६४॥अंतर पडल्या तत्वतां ॥ क्षमा करावी मज श्रोतां ॥ ईश्वर बुध्दीचा प्रेरिता ॥ सत्ता काय आपुली ॥६५॥चक्रावरील मृत्तिकेचा गोळा ॥ भार्गव उतरी मडक्याला ॥ लहान थोर सुगडांला ॥ कर्ता एक कुलाल ॥६६॥अधोलीच्या मापानें ॥ धान्य मोजिती शाहाणे ॥ तैसें माझ्या मुखानें ॥ माप घाली सद्गुरु ॥६७॥नगरीं अथवा खेडियासी ॥ कन्या वोपिली वरासी ॥ मौनें जाय नांदावयासी ॥ उपाय काय तियेचा ॥६८॥पोटीं वाढल्या गर्भासी ॥ नारी नर करावयासी ॥ सामर्थ्य नाहीं मायबापासी ॥ त्याचें सूत्र हरि जाणे ॥६९॥माझें मुख हें धोकटें ॥ शब्दसुतांचें भरले चिवटे ॥ कांडी फिरवी सद्गुरु स्पष्टें ॥ तैसा पट उतरतसे ॥१७०॥आतां फार बोलों काई ॥ पायांवरी ठेवितों डोई ॥ कृपा करीं कृष्णाबाई ॥ पुरवीं मनोरथ मनींचे ॥ ७१॥मनमोहना जगज्जीवना ॥ माझी पुरवी मनकामना ॥ शहामुनि लागे चरणां ॥ आलों शरण तुजलागीं ॥१७२॥इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये पंचमोध्याय: ॥५॥ अध्याय ॥५॥ ओव्या ॥१७२॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP