श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४८ वा
‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
श्लोक ॥ सिध्दांतबोध हरिचा परमप्रतापी ॥ जाळून अज्ञपण उध्दरि सर्व पापी ॥ जीवाचिही जीवदशा निरसूनि रुपीं ॥ ऐक्यत्वता करि जिवास पहा स्वरुपीं ॥
नभेंनि नमावें कवणासी ॥ एकचि व्यापक अविनाशीन ॥ आपल्या स्वरुपें अवघें प्रकाशी ॥ नमितां दुजा दिसेना ॥१॥
अंत:करण विष्णु सत्य ॥ दुजा कोण नेमावा आपण येथें ॥ स्फुरण रुपें भरला अनंत ॥ बोलवी शब्द कुसरी ॥२॥
सागरापासोन उठे लहर ॥ लहरीपासोन ना होय सागर ॥ परंतु सागरावेगळी ना होय लहर ॥ हा अनुभव उघडाची ॥३॥
तेवीं ब्रह्मापासूनि जीव निर्माण ॥ जीवापासून ब्रह्म होईना जाण ॥ परंतु जीव ब्रह्मावेगळा ना होय खूण ॥ समजून घेणें चतुरानें ॥४॥
म्हणोनि जीव ब्रह्माचा अंश ॥ जैसा सिंधूवर तरंगविलास ॥ किंवा रविबिंबीं किरण प्रकाश ॥ अथवा भंगारी आकारी नगदशा ॥५॥
यापरी अनुभव समजून ॥ निवांत राहिलों गुरुकृपेन ॥ अद्वयबोध परिपूर्ण ॥ ठसला अक्षयीं स्वानंदीं ॥६॥
तोचि उल्लेख हृदय कमळीं ॥ ब्रह्मानंदाची दिवाळी ॥ आपआपणा ओवाळी ॥ तुर्याप्रकाश ज्योतीनें ॥७॥
उघडली भाग्याची अपार रेषा ॥ ज्ञानघन साधलों कैसा ॥ केला उदीम सिध्दांतबोधसा ॥ नफा चौगुणें दुणावला ॥८॥
नाना चरित्र इतिहासपोतीं ॥ किराणा भरला जिन्नस रीतीं ॥ अनुभव माल अमूल्य ज्योति ॥ मुमुक्षु श्रोते घेती ते ॥९॥
आतां ऐकावी इतिहास कथा ॥ ज्यांत अनुभव पुरातन पुरता ॥ कर्दम ऋषि समर्थ होता ॥ त्याच्या चरित्रा परिसावें ॥१०॥
कर्दम ऋषि तपोरासी ॥ धैर्यविवेकज्ञानरासी ॥ एकासनीं बैसला तपश्चर्येसी ॥ दहा सहस्त्र संवत्सर ॥११॥
पाहोनि तपोबळ अढळ ॥ भेटीस पातला वैकुंठपाळ ॥ कर्दमास म्हणे त्वां विशाळ ॥ तप केलें एकनिष्ठ ॥१२॥
पाहोनि तुझिया तपाची थोरी ॥ संतोष माझिया बहु अंतरीं ॥ आतां ममाज्ञा वरीं ॥ करीं कल्लोळ सुखाचा ॥१३॥
त्वां अनुष्ठान करावें समाप्त ॥ तूं सखा माझा परम आप्त ॥ म्हणूनि तुझ्या हितार्थ ॥ करीन आज्ञा ते पाळीं ॥१४॥
ब्रह्मचर्य व्रत करीं पूर्ण ॥ आतां करावें त्वां लग्न ॥ तुझा पुत्र मी होईन ॥ इच्छा माझें मानसीं ॥१५॥
स्वायंभु मनु येईल भेटी ॥ पवित्र राजा पुण्यकोटी ॥ त्याची कन्या महा गोरटी ॥ देईल तूतें ऋषिवर्या ॥१६॥
त्वां न करावें अनुमान ॥ सुखें पर्णावें तिजलागून ॥ तुझिया संततीचें भूषण ॥ मंडण होईल सृष्टीतें ॥१७॥
हें परिसोनि कर्दम ऋषी ॥ साष्टांग नमी महाविष्णूसी ॥ म्हणे धन्य भाग्य हृषीकेशी ॥ भेटलासी तूं कृपाळू ॥१८॥
ब्रह्मादिका अलक्ष ॥ वेदांसि ना कळे तुझा पक्ष ॥ पाय चिंती सदा मोक्ष ॥ लक्षा अलक्ष तूं स्वामी ॥१९॥
शिवादिकांचे न येसी ध्यानीं ॥ तो तूं देखिला प्रत्यक्ष नयनीं ॥ संतोष उल्हास माझिया मनीं ॥ काय वदनीं या वदों ॥२०॥
ध्यानीं भरलासि गोविंदू ॥ जाहला सुखाचा स्वानंदू ॥ कोंदूनि गेला गेला ब्रह्मानंदू ॥ निवालों तरलों तव चरणीं ॥२१॥
कोटिजन्मांचें सुकृत ॥ तूं भेटलासि श्री अनंत ॥ पुन्हा घालिसी संसारघोरांत ॥ हें तों नवल मज वाटे ॥२२॥
त्या संसाराभेणें वैराग्य ॥ केला विषयवासना त्याग ॥ जाहलों सनकां योग्य ॥ रंगलों निजरंगें रंगीं ॥२३॥
स्त्रीसंभोगें महासुखी ॥ कोण जाहले तिहीं लोकीं ॥ देव दानव मनुष्य ऋषि ॥ कीं त्राहेमान पावले ॥२४॥
स्त्रीमुळें होय संतती ॥ त्या पोसण्याची पडे गुंती ॥ पुढें उजवावयाचा घोर चित्तीं ॥ न मिळे विश्रांति जीवभ्रमें ॥२५॥
शिवाऐसा समर्थ सृष्टीं गंगा पार्वती लागल्या पाठीं ॥ त्रासोनि बैसला गिरीकपाटीं ॥ जाहला हिंपुटी वनितेसाठीं ॥२६॥
ब्रह्मादिकांचें गळालें रेत ॥ इंद्र पावला फजित ॥ विश्वामित्रा ऐसे समर्थ ॥ त्यांचीं तपें भ्रष्टलीं ॥२७॥
थोरथोरांचा हा लेखा ॥ मी तों अनाथ दीन देखा ॥ भाग्या पावून दशमुखा ॥ कुळक्षय केला दशमुखें ॥२८॥
या लागीं मी भयभीत ॥ निष्काम कामनातीत ॥ मी ध्याननौकेआंत ॥ निर्भय बैसलों भय नाहीं ॥२९॥
पोहणार सोडी कासेपासोन ॥ तेव्हां त्यास आलें मरण ॥ तैसें लोटतां मजलागून ॥ संसारघोरप्रवाहीं ॥३०॥
सांडोनि ब्रह्मानंदू ॥ विषय सेवणें किंचित् बिंदू ॥ सुधा त्यागोनि विषकंदू ॥ घेतां काय सार्थक ॥३१॥
परिसोनि कर्दमॠषीची वाणी ॥ हांसोनि बोले चक्रपाणी ॥ विषयबीजापासोनी ॥ उद्भव विश्वजनाचा ॥३२॥
देवदानव ऋषी मुनी ॥ सिध्द साधक राव रंक प्राणी ॥ म्यां अवतार घेतले मेदिनी ॥ मातेसंगें जाण पां ॥३३॥
माझी माता देवहूती ॥ स्वयंभूमुनीची कन्या पवित्रमूर्ती ॥ तिच्या पोटीं मी निश्चितीं ॥ जन्म घेईन जाण पां ॥३४॥
तिसी लावूनियां लग्न ॥ त्वां संपादावा गृहस्थाश्रम ॥ माझी आज्ञा मानल्या उत्तम ॥ कोटि यज्ञ तुज होती ॥३५॥
ऋषि म्हणे हृषीकेषी ॥ एक पुत्र जाहल्या माझे वंशीं ॥ मग मी होईन संन्यासी ॥ सत्य संकल्प जाण पां ॥३६॥
ऋषिवचन परिसोनि अढळ ॥ निघोन गेला वैकुंठपाळ ॥ स्वयंभु मनु नृपाळ ॥ कन्या घेऊनि आला त्वरें ॥३७॥
ऋषीस करुनियां नमन ॥ नम्र बोले विनयवचन ॥ माझी कन्या चिद्रत्न ॥ तूतें अर्पिली ऋषिवर्या ॥३८॥
तूं पवित्र ब्राह्मणमूर्ती ॥ तपोनिधी विवेक शांति ॥ तो क्षत्रिय विकल्प चित्तीं ॥ आणूं नको समर्था ॥३९॥
रायापासूनि ब्राह्मण सुखी ॥ ब्राह्मण आशीर्वादें राजा कल्याण कीं ॥ झग्यादावनाचा संबंध की ॥ एकाएकानें साजिरा ॥४०॥
ऐसें बोलोन ऋषिला ॥ देवहुतीसी विवाह लाविला ॥ कन्या अर्पून ऋषीला ॥ राव गेला स्वनगरा ॥४१॥
देवहुती पतिव्रता ॥ विनयें भजे ऋषि समर्था ॥ अष्टही प्रहर सेवेसि सादरता ॥ अंतर पडों देईना ॥४२॥
ऋषि निष्काम कामातीत ॥ तपश्चर्या आचरे समर्थ ॥ आसनीं शयनीं स्पर्श किंचित ॥ देवहूतीचा करीना ॥४३॥
ऐसीं लोटलीं सहस्त्रवरुषें ॥ देवहूती चिंताक्रांत असे ॥ म्हणे काय करावें दैव असें ॥ उपाव कांही चालेना ॥४४॥
एके दिवसीं मर्जी पाहून ॥ घाली साष्टांग लोटांगण ॥ उभी ठाकली कर जोडून ॥ विनयें बोले अति नम्र ॥४५॥
देवहूती म्हणे योगिराया ॥ शरण आलें तुझिया पायां ॥ ओवाळून सांडीन आपुली काया ॥ अंकित दारा मी तुमची ॥४६॥
तुमचा संकल्प एक पुत्र ॥ जाहालिया घेईन संन्याससूत्र ॥ तें वचन वेदचक्र ॥ सिध्दी नेले पाहिजे ॥४७॥
परिसोनि देवहूतीची विनंती ॥ ऋषि सुखावला आपुलें चित्तीं ॥ मग म्हणे तूं सुमती ॥ बरी सूचना मज केली ॥४८॥
मज आज्ञा श्रीविष्णूची ॥ तुझिया संगें उत्पत्ति पुत्राची ॥ एक जाहलिया पुन्हा विषयाची ॥ वार्ता न करीं सर्वथा ॥४९॥
ऐसें सांगोन वनितेला ॥ तिसी संभोग केला एकवेळां ॥ तों कन्या प्रसवली बाळा ॥ सुलक्षणी लावण्य ॥५०॥
ऋषि म्हणे जाहली संतती ॥ मी संन्यास घेतों मनोरथीं ॥ तों वदे देवहूती ॥ पुत्रसंकल्प नाहीं जाहला ॥५१॥
ऋषि संकोचित आपुलें मनीं ॥ पुन्हा अंगीकारिली निज पत्नी ॥ दुसरी कन्या जन्मली गुणी ॥ ऋषि आपटी कपाळ ५२॥
मग म्हणे होईन संन्यासी ॥ येरी म्हणे संभाळा वचनासी ॥ पुत्र जाहल्या घेणें वैराग्यासी ॥ सत्य वचन करा स्वामी ॥५३॥
त्रास पावोनि ऋषीश्वर ॥ पुढती केला अंगीकार ॥ तों प्रसवली सुंदर ॥ तृतीय कन्या सुढाळ ॥५४॥
यापरी नव कन्या जन्मल्या ॥ पवित्र सुढाळ लावण्यपुतळ्या ॥ किंवा ब्रह्मदेवें स्वयें रेखिल्या ॥ प्रकाशमय ओतिल्या विदयुल्लता ॥५५॥
ऋषि वदे जाहली सीमा ॥ आतां त्यजीन आपुला आत्मा ॥ कोण कर्म वोढवलें आम्हा ॥ पुत्रसंतति होईना ॥५६॥
मग वदली आकाशवाणी ॥ नको प्राण त्यागूं मुनी ॥ दहावा पुत्र होईल तुजलागूनी ॥ अवतार घेईल जगदीश ॥५७॥
परम संतोष पावोनि मुनी ॥ पुन्हा अंगीकारिली निजपत्नी ॥ पुत्र प्रसवली लावण्यगुणी ॥ जो अवतार विष्णूचा ॥५८॥
नामें कपिलमुनि विख्यात ॥ प्रगट जाहला श्रीअनंत ॥ ज्याचें ज्ञान अति अद्भुत ॥ जगदुध्दार जीवांसी ॥५९॥
पाहे पुत्राचें वदन ॥ दिसे ब्रह्मींचें ठेवण ॥ मग म्हणे मी धन्य ॥ सुफळ जाहला जन्म हा ॥६०॥
मग म्हणे देवहूतीला ॥ माझा संकल्प सिध्दीस गेला ॥ आतां घेतों संन्यासाला ॥ सुखें नांदें तूं गेहीं ॥६१॥
येरी वदे संसारफांसटी ॥ घालोनि जातां माझे कंठीं ॥ या जोजाराची आढी ॥ मातें नुचले समर्था ॥६२॥
या नव लेकींचें लग्न ॥ आपुले हाती घ्या उजवून ॥ हा घोर मजलागून ॥ नका ठेवूं स्वामिया ॥६३॥
हें परिसोनि ऋषि संतप्त ॥ म्हणे कैसें वोढवलें संचित ॥ कोण कर्म बळवंत ॥ उदयोग पाठी सोडीना ॥६४॥
होतों निष्काम मोकळा ॥ कैसी जडली कर्म सांकळां ॥ आतां प्राण त्यजीन आपुला ॥ मातें न उगवे ही गुंथी ॥६५॥
जन्मांत नाहीं आचरलों पाप ॥ केली तपश्चर्या अमूप ॥ त्याचें काय हेंचि उगवलें रोप ॥ काम कचाट भोगावया ॥६६॥
ऐशिया चिंतेच्या डोहीं ॥ ऋषि संतापला आपुलें हृदयीं ॥ इतुकियांत ब्रह्मा लवलाहीं ॥ भेटीलागीं पातला ॥६७॥
म्हणे कष्टी होऊं नको मुनी ॥ दहा पुत्र मजलागूनी ॥ नवांस देतों नवजणी ॥ दहावा नारद ब्रह्मचारी ॥६८॥
मग नवपुत्रांस नवजणी ॥ लग्न लावूनि दीधल्या विधीनीं ॥ धाकुटी अनसूया सुढाळगुणी ॥ अत्रिऋषीला ती दिली ॥६९॥
तिचें पोटीं तीन पुत्र ॥ हरि हर विधाता जन्मले विचित्र ॥ पराक्रमी परम पवित्र ॥ ज्यांची ख्याति पुराणीं ॥७०॥
ब्रह्मा चंद्र होऊनि जन्मला ॥ विष्णु दत्तात्रेय जाहला ॥ दुर्वासरुपें रुद्र अवतरला ॥ पवित्र अनसूया म्हणोनी ॥७१॥
उगवली कन्यांची गुंथी ॥ ऋषि संतोष पावला चित्तीं ॥ मग म्हणे देवहूती ॥ संन्यासदशा मी घेतों ॥७२॥
देवहूती म्हणे जी समर्था ॥ तुम्ही संन्यास स्वयें घेतां ॥ पुढें माझी कोण वारील चिंता ॥ भवतापाची सांगा जी ॥७३॥
संसार घोर महापाश ॥ दु:खदायक नरकवास ॥ फिरतां चौर्यांशीं फेर्यांस ॥ जीव पडे भवचक्रीं ॥७४॥
श्रीमंताची अंगना ॥ भीक मागतां लाज कोणा ॥ गंगेमाजी पोहतां मीना ॥ तृषा हरेना हें नवल ॥७५॥
कां सेकार सोडवी उदकांत ॥ मग त्याचा उपाय काय तेथें ॥ तेवीं त्वां समर्थें ॥ मातें उपेक्षिल्या गति काय ॥७६॥
हें परिसोनि कर्दम ऋषी ॥ म्हणे तूं कां सखये खेद करिसी ॥ पुत्र आहे तुजपासीं ॥ जो अवतार विष्णूचा ॥७७॥
परम पुरुष श्रीभगवान ॥ तो हा कपिलमुनि अवतार पूर्ण ॥ तूतें सांगेल निजज्ञान ॥ ब्रह्मज्ञान शुध्द जें ॥७८॥
ऐसें सांगोनि देवहूतांला ॥ मग बोले कपिलमुनीला ॥ रंकाधरीं देवराव आला ॥ हा नवलाव मज वाटे ॥७९॥
सर्पास गज पाहुणा ॥ सागर कूपास मागे जीवना ॥ भानु काजव्यासी इच्छी मैत्रपणा ॥ तेवीं तुम्हीं मम गेहीं ॥८०॥
तूं आलासि दयारासी ॥ उध्दरावया कोटिजीवांसी ॥ आतां मी होतों संन्यासी ॥ आज्ञा देई समर्था ॥८१॥
ऋषीची परिसोनि विनवणी ॥ हांसोनि बोले कपिलमुनी ॥ तूं संन्यास इच्छीसीं मनीं ॥ काय लाभ मजपरिस ॥८२॥
ज्यासाठीं घेसी संन्यास ॥ तो मी तुझीया घरीं जगदीश ॥ सांडोनि हातींचा परीस ॥ सायास करणें धातूचें ॥८३॥
कामधेनु असोनियां घरीं ॥ तक्र मागें दारोदारीं ॥ बैसोनियां भागीरथीचें तीरीं ॥ कूप खणणें तृषेला ॥८४॥
बैसोनि कल्पतरुच्या ठायां ॥ इच्छावी हिंवर तरुची छाया ॥ चिंतामणी पदरी बांधलियां ॥ चिंता करणें पोटाची ॥८५॥
ऋषि म्हणे हा विवेक ॥ तुम्हीं सांगितला सुरेख ॥ संन्यासबीजाचा अंकुर देख ॥ तूंचि त्याचा फळदाता ॥८६॥
परंतु माझिया मनोरथीं ॥ संकल्प घेतला जो चित्तीं ॥ या देहाची निर्गती ॥ याचि पंथें लावावी ॥८७॥
तूं ज्ञानस्वरुप मार्तंड ॥ माझा संकल्प नको करुं खंड ॥ देईं हातीं वैराग्य शुध्ददंड ॥ उडे बंड देहबुध्दीचें ॥८८॥
पाहून पित्याचा मनोधर्म ॥ कपिलमुनि वदे ताता उत्तम ॥ ज्याम्त तुझा हेत परम ॥ तैं स्वाकारीं स्वानंदें ॥८९॥
मग पुसोनि पुत्रपत्नीसी ॥ जाहला त्रिदंडी संन्यासी ॥ गेला बदरिकाश्रमासी ॥ केलें कल्याण उभयलोकीं ॥९०॥
पति गेला पुण्यमार्गीं ॥ संताप उदेला माझिया अंगीं ॥ तो निववावयालागीं ॥ कृपा करीं सुपुत्रा ॥९१॥
कर्दम गेला संन्यास घेऊन ॥ देवहूती चिंतेनें व्यापून ॥ म्हणे पुत्रास मज कारणें ॥ करीं विवेक सुखाचा ॥९२॥
तूं ब्रह्मस्वरुपींचा कोंभ ॥ उदेलासि पद्मनाभ ॥ मातें करीं सुखाचा लाभ ॥ दावी गर्भ अनुभवाचा ॥९३॥
आधीं माया कीं ईश्वर ॥ आधीं निशी कीं वासर ॥ आधीं पाप कीं पुण्य साचार ॥ आधीं बीज कीं वृक्ष ॥९४॥
आधीं साच कीं लटिकें ॥ आधीं धर्म कीं अधर्म देख ॥ सुखापासूनि दु:ख दु:खा पासोनि सुख ॥ सांग विवेक याचा तूं ॥९५॥
आधीं सगुण कीं निराकार ॥ आधीं त्रिगुण कीं ओंकार ॥ आधीं कर्म प्रयत्न साचार ॥ आधीं प्रारब्ध कीं भोग ॥९६॥
जीव शिव भिन्न कीं अभिन्न ॥ कैसें बध्दमुक्तांचें लक्षण ॥ तत्वसंख्या किती प्रमाण ॥ एकाचे अनेक कां जाहले ॥९७॥
कोण पुरुष कोण नारी ॥ कोण चालक या शरीरीं ॥ आत्मा चालक चराचरीं ॥ उंच नीच मग कोण ॥९८॥
विटाळ म्हणावें कशास ॥ सोंवळ्याचें रुप कैसें असे ॥ आत्मा एक सर्वांस ॥ तरी जातिभेद कां केला ॥९९॥
तूं अवतार ब्रह्ममूर्ती ॥ या प्रश्नाची उगवीं गुंथीं ॥ ऐसें पुसतां देवहूती ॥ कपिलमुनी तो वदे ॥१००॥
आकार माया ना ईश्वर ॥ ब्रह्मस्वरुप तदाकार ॥ रज्जूवर भासला सर्पाकार ॥ एक वदे नाग एक वदे नागिणी ॥१॥
नागनागिणी मिथ्या भूत ॥ रज्जूमात्र असे सत्य ॥ तैसा स्वरुपाचा सिध्दांत ॥ माया ईश्वर कल्पना ॥२॥
रवीनें रात्र देखिली नाहीं ॥ रात्रीस सूर्य ठाऊका नाहीं ॥ उभयतां संबंध नसतां पाहीं ॥ उत्पत्ति काय सांगावी ॥३॥
ती एकांत एक नसे ॥ पाहणारा दोन दिसे ॥ दर्पण तर एकरुपें असे ॥ दोन देखणीं भास कीं ॥४॥
पापपुण्याचें स्वरुप असावें ॥ तरी आधीं मागें सांगावें ॥ दोन्ही कल्पना स्वभावें ॥ ही मनाची आशंका ॥५॥
बीजवृक्षाचें पोटा आंत ॥ वृक्षाचें स्वरुप बीजचि होत ॥ जैसी साय दुधांत ॥ तैसे आकार स्वरुपीं ॥६॥
आधीं साच कीं लटिकें ॥ दोंहींत अक्षराचा विवेक ॥ अवघ्या मातृकाचि देख ॥ सत्य मिथ्या कल्पना ॥७॥
आधीं उदय कीं अस्त ॥ दोन्ही सूर्यातें मिथ्यात्व ॥ तैसें धर्म अधर्माचें गणित ॥ दोन्हीं बाजेगिरी ॥८॥
गढूळ पाणी निर्मळ ॥ दोन्ही मिळोनि गंगाजळ ॥ तैसा सुखदु:खाचा मेळ ॥ उठे देहसंबंधें ॥९॥
विवेक पाहतां दु:खाचा निरास ॥ अविवेकें होय महा सोस ॥ मेला ना उठे माणुस ॥ जन रडतां राहेना ॥११०॥
घर जळालें नीट होईना ॥ द्रव्य हारपलें गावेना ॥ माणुस शोक करितां राहेना यास काय करावें ॥११॥
हरपलें मेले जळाल्यासाठीं ॥ शोकें कपाळ आपुलें पिटी ॥ तिहींची गांठ न पडे शेवटीं ॥ शोक संताप पदरीं पडे ॥१२॥
दुग्ध उतूं गेलें हातीं येईना ॥ परंतु तळमळ वनितेची जाईना ॥ नवरानवरी भांडेना ॥ वर्हाडी भांडती लबाड ॥१३॥
ज्वारी जोंधळा नाव एक ॥ तैसी माया ईश्वर देख ॥ छाया परुषें वेगळिक ॥ कैसी होती जाण पां ॥१४॥
नदी वनिता पुरुष सागर ॥ दो नामीं एकचि नीर ॥ दोनी पाद चालती बरोबर ॥ पुढें आला कोणता मोजावा ॥१५॥
वाम सव्य हात ॥ आधीं कोणता जन्मला करावा सिध्दांत ॥ तेवीं माया ईश्वर निश्चित ॥ उभयतां जन्म एकचि ॥१६॥
शरीरापासोनि अवयव जाणा ॥ तेंवीं ओंकारापासून त्रिगुणरचना ॥ उदकावर तरंगांची गणना ॥ यापरी ओंकारी गुण देखा ॥१७॥
काकवी गूळ साकर ॥ एका उंसाचे तीन प्रकार ॥ तैसा ओंकाराचा विचार ॥ तीन गुण उद्भवती ॥१८॥
अग्नि ज्वाळा रविकिरण ॥ तंतूपटीं नगीं सुवर्ण ॥ घट मृत्तिका वेगळेंपणें ॥ राहतां ठाव दिसेना ॥१९॥
अवघा ओंकाराचा संबंध ॥ पसरलासे त्रिपाद विविध ॥ बावन्न मातृका शास्त्र वेद ॥ ओंकारस्वरुपें जाण पां ॥१२०॥
प्रयत्नकर्त्याची सांकळी ॥ जैसी कडीनें कडी आडकली ॥ प्रयत्नापुढें कर्माची चाली ॥ कर्मापुढें प्रयत्न उभा ॥२१॥
आचरणासारखी उपजे बुध्दी ॥ बुध्दीसारखा आचरणविधि ॥ सिंधूचें पाणी पडे नदीं ॥ नदी जाय सिंधूपें ॥२२॥
वासना तैसी पापपुण्याची गणना ॥ पापपुण्य तेंवीं वासना उठे जाणा ॥ पुरुषांवांचून स्त्री सबळ होईना ॥ स्त्रींवाचोनि पुरुषा ना होय संतती ॥२३॥ प्रारब्धावांचोनि न घडे भोग ॥ भोग तो प्रारब्धयोग ॥ एकामागें एक अस्तामागें उदय जैसा ॥२४॥
बिंबप्रतिबिंबाचें लक्षण ॥ तैसा जीवशिव घे ओळखोन ॥ आरशामुळें दोन जाण ॥ तेवीं अविदयासंबंधें भिन्नता ॥२५॥
बहु मुक्तांचें लक्षण ॥ शुकनळिकान्याचें घ्या ओळखोन ॥ दर्पणमंदिरीं भुंके श्वान ॥ एकटा असोन बहु भावी ॥२६॥
प्रतिबिंब पाहून सिंह टाकी उडी ॥ आपुली कल्पना आपणासी नाडी ॥ भवंडीनें फिरती घरें धुंडी ॥ तें काय सत्य मानावें ॥२७॥
स्वप्न तैसी जागृती ॥ सुषुप्तींत दोनी मिथ्या होती ॥ बध्दमुक्त या रीतीं ॥ ज्ञान अनुभवें जाणिजे ॥२८॥
मी आत्मा ही मुक्तता ॥ मी देह ज्यांत ही बध्दता ॥ या दोहींचें मूळ पाहतां ॥ आपुलीच आशंका ॥२९॥
जागृती माजी स्वप्न भासे ॥ स्वप्नांत जागृती ना दिसे ॥ बध्द न पाहे मुक्तीस ॥ मुक्तांस बध्दता दिसेना ॥१३०॥
स्वप्न जागृति प्रबळ ॥ निमाल्या दोहींचें वाटोळें ॥ जेथें ज्ञान प्रकाशलें ॥ बध्दमुक्ततेस ठाव कैंचा ॥३१॥
बध्द मुक्त हे दोनी ॥ पाहतां स्वप्नींची काहाणी ॥ पति शेजारीं निजेली ॥ स्वप्नांत विधवा साच काय ॥३२॥
पाण्यांत मीन विसरे उदक ॥ तर काय कोरडा पडे देख ॥ किरणें रवीचि ना ओळखें ॥ तरी किरणें काय वेगळीं होती ॥३३॥
अहो चित्तपणाचे विसरे ॥ कांहीं एक अज्ञान अंगीं संचरे ॥ म्हणोनि जीवघेणें घेरे ॥ येरवीं ब्रह्म तोचि कीं ॥३४॥
पुसिली त्वां तत्वसंख्या ॥ तत्वें चोवीस मुख्य देखा ॥ यांचा हिशेब ऐका ॥ गणित करोनी सांगतों ॥३५॥
पंच विषय पंच भूत ॥ दश इंद्रियें आणिक त्यांत ॥ अंत:करणचतुष्टय सहित ॥ चोवीस तत्वें जाणावीं ॥३६॥
पंचविसावा असे अहंकार ॥ तो काळचक्र साचार ॥ तो अवघ्यांचा करी संहार ॥ मग तोही मरे शेवटीं ॥३७॥
या तत्वांपासून पिंड ब्रह्मांड संपूर्ण ॥ यांचें मूळ त्रिगुण जाण ॥ त्याचें बीज ओंकार ॥३८॥
ओंकार म्हणजे ब्रह्मींचा अंकुर ॥ त्यापासोनि अवघा पसर ॥ समजोन मुळींचा विचार ॥ ब्रह्मीं लक्ष ठेवणें ॥३९॥
समुद्रअंगीं तरंग पाहणें ॥ बिंबी लक्षी सहस्त्र किरणें ॥ हेमीं अलंकार जाणणें ॥ कापुसीं विस्तार वस्त्राचे ॥१४०॥
बीजापोटीं वृक्ष विस्तारें ॥ चंद्रबिंबी चांदणें पसरे ॥ देहासंगें कर्म उभारे ॥ मनापासोन वासनेचे बुचके ॥४१॥
कल्पनेपासोनि विस्तारे सृष्टी ॥ कल्पना निमाल्या शून्य शेवटीं ॥ शून्याचाही निरास नि:शून्यापोटीं ॥ नि:शून्य जिरे महाशून्यीं ॥४२॥
शून्यापासोनि विस्तारलें ॥ शून्य शून्यीं सामावलें ॥ तैसे एकाचे अनेक जाहले ॥ अनेकीं एक सहजची ॥४३॥
स्त्रीपुरुष पंचभूतांचीं ॥ दोहींत आत्मा मुळीं एकचि ॥ सारखी वासना कामाची ॥ भिन्न काय सांगावें ॥४४॥
आहार निद्रा मैथुन ॥ स्त्रीपुरुषांत सारखी जाण ॥ स्वभाव मात्र असे भिन्न ॥ इतुक्यानें भेद कल्पावा ॥४५॥
दोघां संसार सारिखे ॥ दोघां सुख दु:ख सारिखें ॥ दोघां जन्ममरण सारिखें ॥ दोघां मैथुनी आनंद एकचि ॥४६॥
जैशा कळसूत्राच्या बाहुल्या नाचती ॥ तैसी स्त्रीपुरुषांची गती ॥ दश इंद्रिये प्राण पंचकाची रीती ॥ दोहींकडे सारिखी ॥४७॥
बाहुली बाहुली चिरगुटाचीं ॥ यापरी स्त्रीपुरुषें पंचभूतांची ॥ नर मादी नगार्याचीं ॥ परि चाम एक जाणावें ॥४८॥
सनई सुर दोन भेद ॥ दोहींत असे एक नाद ॥ पाण्यांत कोंबडा कोंबडी खेळती छंदें ॥ सरिता सिंधु एकची ॥४९॥
यापरी स्त्रीपुरुषांचें गुज ॥ याचें सांगितलें चोज ॥ ही कर्त्याची मौज ॥ समजणें ज्ञानकिल्लीनें ॥१५०॥
प्राण चालक शरीरांत ॥ प्राण अंत:करण होत ॥ अंत:करण जाणीव मिरवत ॥ तोचि अंश विष्णूचा ॥५१॥
समुद्र थोर तरंग लहान ॥ यापरी उंच नीच जाण ॥ तरवार सुरीचा फेर पाहणें ॥ लोखंड एक सत्य कीं ॥५२॥
दासी धनीण उंच नीच ॥ हा वर्तावयाचा पेंच ॥ परी तत्वें नव्हे उंच नीच ॥ इंद्रियस्वभाव एकचि ॥५३॥
राजा फरजी प्यादा उंट ॥ पाहतां अवघें एक काष्ठ ॥ परी खेळावया स्पष्ट ॥ उंच नीच नेमिले ॥५४॥
नौबत ढोल टिमकी मृदंगाची ॥ इतुकियांत वाजे चाम एकचि ॥ भेद टाकोनि अभेदाची ॥ गति समजणें या रीतीं ॥५५॥
विटाळ म्हणावें कल्पनेस ॥ सोवळें म्हणिजे आत्मा एक प्रकाश ॥ नासिकीं श्वास उंच दिस ॥ अपानीं पाद अमंगळ ॥५६॥
सूर्याठायीं अंधार नसे ॥ ज्ञानियास अवघें सोवळें दिसे ॥ अवघा पंचतत्वांचा अंश असे ॥ विटाळ कल्पना मनाची ॥५७॥
त्वां पुशिलें आम्हाला ॥ एक आत्मा जातिभेद कां जाहला ॥ पहा एकचि पृथ्वीला ॥ सात द्वीपें नव खंडें ॥५८॥
केले देश घातल्या शिंवा ॥ तेणें आवरण जाहलें जीवा ॥ केला मर्यादेचा गोवा ॥ सृष्टिरचना चालावया ॥५९॥
ब्रह्मीं एकचि जाहलें स्फुरण ॥ स्फुरणाचीं प्रकृति परुषें जाण ॥ वामसव्यभग मिळून ॥ एक अंगीं विराजती ॥१६०॥
एक काडा लेखणीचा ॥ दोन जीव्हानें चाले विस्तार लिहिण्याचा ॥ दोनपदीं गमन मार्गाचा ॥ वाजे टाळी दोन्ही करें ॥६१॥
दोन ओठीं एक बोलणें ॥ दोन दिठी एक पहाणें ॥ दोन श्रवण एक ऐकणें ॥ दोघांविण व्यवहार चालेना ॥६२॥
स्त्रीवांचोनि पुरुषास शोभा नसे ॥ पुरुषाविण वनिता चांगली ना दिसे ॥ दिवसरात्रींच्या उद्देशें ॥ निद्रा जागणें दोनीं होती ॥६३॥
दर्पण एक असतां पाहीं ॥ दोन दावी ही नवायी ॥ तैसीं माया ईश्वर पाहीं ॥ एक्या अंगीं दोन दिसती ॥६४॥
गुलाबाच्या फुलास दोन रंग ॥ उदकीं बुडबुडा एक तरंग ॥ दोन जिव्हा एकचि उरग ॥ दोन नासापुटें एक श्वास ॥६५॥
समुद्र आपुलें अंगावरी ॥ अनंत विस्तारे लहरी ॥ तैसें ब्रह्म चराचरीं ॥ या अनुभवें जाणिजे ॥६६॥
यापरी मातेस बोध ॥ कपीलमुनीनें केला अगाध ॥ भरला अनुभव सुखस्वानंद ॥ तन्मय जाहली देवहूती ॥६७॥
हा परमार्थ सज्जनासाठीं ॥ दाविली थोरांची कसवटी ॥ अर्थ आणिल्या पोटीं ॥ द्वैत नुठी त्या पुरुषा ॥६८॥
अज्ञान मात्र हरावया ॥ जीवास ज्ञान होवावया ॥ वेदशास्त्रांच्या बाह्या ॥ उभारोनी बोलिली ॥६९॥
याजसाठीं संन्यासग्रहण ॥ अद्वैतबोध सांगावया कारण ॥ हेचि अनुभवें जनक निमग्न ॥ मुक्त असती सनकादिक ॥१७०॥
चुकल्या अद्वैतबोध वर्म ॥ जीवास पडे भवभ्रम ॥ करितां अनेक साधनश्रम ॥ मुक्त होणें कठिणची ॥७१॥
ज्ञानी ना बैसे दृढमती ॥ यालागीं देहअभिमानाचें वागविती ॥ जातीधर्माचे पडले गुंथीं ॥ याच मार्गीं बहु फसले ॥७२॥
नाशवंत शरीर ॥ याचें कर्म काय साचार ॥ भरलें देह अभिमानाचें वारें ॥ यास काय करावें ॥७३॥
जातकर्मांची सांखळी ॥ तोडी एक ज्ञानप्रतापी बळी ॥ सूर्यापुढें अंधारी उरली ॥ ही तों चर्चा करुं नये ॥७४॥
ज्यांत जात्याभिमान ॥ त्याणीं पोटीं बांधिला पाषाण ॥ मग तरावयाची जाण ॥ आस्था केवीं साजेल ॥७५॥
एक जात्याभिमानाची मस्ती ॥ दुसरी कर्माभिमानाची मस्ती ॥ तिसरी विदयाभिमानाची मस्ती ॥ चौथी मस्ती धनाची ॥७६॥
पांचवी मूर्खपणाची मस्ती ॥ साहावी अंगबळाची मस्ती ॥ सातवी मदयप्राशनाची मस्ती ॥ आठवी मस्ती मीपणाची ॥७७॥
जेथें आठवी मस्तीचें पवाडे ॥ तेथें भल्याचा उपदेश कैसा चढे ॥ ज्यासि अविदयाभांगेचा कैफ चढे ॥ तो पडे उताणा निर्लज्ज ॥७८॥
ज्या देहास करावे उपचारपुष्टी ॥ तो देह जाय मसणवटीं ॥ धन मेळवावें आप्तांसाठीं ॥ ते तो अंतीं मोकलिती ॥७९॥
सुसर वोढी पाण्याआंत ॥ ती माशासाठीं हात पसरित ॥ तैसी जगाची गत ॥ काळ वोढी आपण कवळी ॥१८०॥
जो दयावया नेला सूळावर ॥ त्याची वासना क्षीरीवर ॥ जीवास लागला असे घोर ॥ तो तळमळी मुलासाठीं ॥८१॥
रिणकर येऊन बैसले घरीं ॥ आपण दुसर्याशी जामिनकी करी ॥ घरीं मरतसे म्हातारी ॥ आपण जाय यात्रेसी ॥८२॥
मायबापांसी भांडोन ॥ वेगळा निघे बाइल घेऊन ॥ निमाल्यापाठीं पिंडदान ॥ करिती अक्कलीचे गधडे ॥८३॥
बांधी ढाल तलवार बंदुकेसी ॥ युध्द करितसे संन्यासी ॥ ना संसार परमार्थ त्यासी ॥ उभयलोकीं फजित ॥८४॥
दरिद्रें पीडिलें ज्यासी ॥ फार पोरें होतीं त्यासी ॥ ज्याघरीं धनाच्या राशी ॥ त्यासि दुष्काळ मुलांचा ॥८५॥
भूषणें घेतलीं हरिभक्तीचीं ॥ चिंता वाहे संसाराची ॥ बुध्दि सांगे समतेची ॥ द्वेष मत्सर जाईना ॥८६॥
अपवित्र वेश्येचें ऐकती गायन ॥ पवित्र भक्त करिती हरिकीर्तन श्रवण ॥ त्यांस ठेविती दूषण ॥ म्हणती शूद्रामुखें ऐकों नये ॥८७॥
पाप पाहिजे ज्यासी ॥ तेणें निंदावें भल्यासी ॥ निर्वैर होतां सर्वांगी ॥ त्या पुण्यास जोडा नसे ॥८८॥
लेइजे भक्तीचें भूषण ॥ निष्काम कामना जिंकोन ॥ कोणाचें दुखवूं नये मन ॥ सख्य असावें सर्वांसी ॥८९॥
चित्त असावें ईश्वरभजनीं ॥ हेचि तपाची मांडणी ॥ शुध्द वागल्या अंत:करणी ॥ सर्व साधनांचें मूळची ॥१९०॥
जो निर्विकल्प निर्मळ ॥ त्यासीच स्वधर्माचें फळ ॥ शांत सुशीळ पवित्र प्रांजळ ॥ सखोल भला समबुध्दी ॥९१॥
ईश्वरीं ज्याचें अक्षयीं मन ॥ तेणें केलें तीर्थ तप दान ॥ जातिधर्म आचरण ॥ यांतच आलें सर्वही ॥९२॥
चित्तीं असे अक्षयीं देव ॥ त्याणें जोडिला मोक्षाचा ठाव ॥ साधिला अष्टांगयोग गौरव ॥ सिध्दी गेल्या पंचमुद्रा ॥९३॥
मन लावावें देवापासी ॥ किंवा चित्तीं ठेवावें देवासी ॥ सर्व साधनाच्या रासी ॥ त्यापासी तिष्ठसी ॥९४॥
जैसा धनकामिनीवर दक्ष ॥ तैसा ईश्वरीं लावी लक्ष ॥ त्याच्या धरीं राबे मोक्ष ॥ ऋध्दि सिध्दि तिष्ठती ॥९५॥
सर्व ब्रह्म जाणोनि साचार ॥ स्वरुपीं जाहला तदाकार ॥ वेदशास्त्रांचा गुह्य भांडार ॥ पदरीं त्याच्या अक्षयीं ॥९६॥
जो अद्वैतबोधीं जाहला निमग्न ॥ कोटी यज्ञांचें केलें साधन ॥ भक्ति ज्ञानवैराग्य पूर्ण ॥ सर्वही त्याणें जोडिलें ॥९७॥
अनुभवाचा अगाध बोध ॥ समजोनि चालवा वेदांताचा संबंध ॥ करावा संतसंगें आनंद ॥ निर्भय असावें स्वानंदीं ॥९८॥
प्रपंचाचा ब्रह्म देंठ ॥ यांत बरें काय वाईट ॥ भरला सिंधु एक थाट ॥ तरंग उंच नीच मोजूं नये ॥९९॥
त्रिगुणासारिखें वर्ते जन ॥ त्यांचे पाहूं नये दोष गुण ॥ हें साधनांत श्रेष्ठ लक्षण ॥ जनीं जनार्दन लक्षावा ॥२००॥
हा शुध्दबोध रस ॥ ओतिला सिध्दांतबोध मुनीस ॥ ग्रंथ आला समाप्तीस ॥ सुफळ जाहला मनोरथ ॥१॥
आतां नमूं गुरुपादपद्मा ॥ तुमचे कृपें पावलों मोक्षधामा ॥ अक्षयीं कल्याण जाहलें आम्हा ॥ कल्लोळ करुं तव नामीं ॥२॥
नामीं रुपीं अवघा जगदीश ॥ ध्यातां हृदयीं तोचि परेश ॥ अवघा त्याच चिद्विलास ॥ सत्य शपथ गुरुची ॥३॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये अष्टचत्त्वारिंशो ध्याय: ॥४८॥
॥अध्याय ४८॥ ओव्या २०३॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2020
TOP