पौष वद्य ५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
(१) सुभाषचंद्र बोस यांचा जन्म !
शके १८१८ च्या पौष व. ५ रोजीं भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचे उपासक, दुसर्या आझाद हिंद सेनेचे प्रमुख व कुशल संघटक ‘नेताजी’ सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. बंगालमधील कटक येथील सुप्रसिद्ध वकील जानकीनाथ बसू यांच्या घरीं सुभाषचंद्रांचा जन्म झाला. त्यांची आई प्रभावतीदेवी. या धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळें सुभाषबाबूंच्या मनावर चांगलेच संस्कार झाले.शाळेंत शिकत असतांना श्रीरामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणुकीचा यांच्या मनावर अत्यंत परिणाम झाला, आणि गंगायमुनांच्या तीरीं व हिमालयाच्या गिरिकंदरांतून ‘सुभाष’ गुरुच्या शोधार्थ हिंडूं लागले. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सि कॉलेजमधून नांव कमी केल्यावर हे इंग्लंडला गेले आणि तेथें आय्. सी. एस्. ची परिक्षा पास झाले. मायदेशीं येऊन सरकारी नोकरी न करतां देशसेवेसाठीं त्यांनी आपणास वाहून घेतलें. म. गांधी व चित्तरंजनदास यांच्या नेतृत्वाखालीं देशसेवा सुरु केली. राष्ट्रसभेंत संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव आणण्यासाठीं त्यांनीं जी अतोनात खटपट केली. राष्ट्रसभेंत संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव आणण्यासांठीं त्यांनीं जी अतोनात खटपट केली तिला लाहोर सभेंत यश आलें. सन १९३८ सालीं हरिपुरा कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यामुळें त्यांचें यश सर्वत्र विकसूं लागलें. पुढल्या वर्षीहि त्रिपुरी काँग्रेसच्या वेळी गांधींनीं पाठिंबा दिलेल्या पट्टाभिसीतारामय्यांपेक्षां अधिक मतें पडून हेच निवडून आले. त्या वेळीं त्यांना गांधीगटाच्या असहकाराला तोंड द्यावें लागलें. त्यानंतर सशस्त्र क्रांतीवर अधिक विश्वास वसूम लागल्यावर २६ जानेवारी १९४१ रोजीं ते राहत्या घरांतून अदृश्य झाले. बहिर्या व मुक्या असणार्या झियाउद्दीनच्या वेषानें पेशावरमार्गे काबुलास जाऊन तेथून बर्लिन व त्यानंतर सिंगापूर येथें सुभाषबाबू आले. तेथें आझाद हिंद सेनेची स्थापना करुन २१ ऑक्टोबर १९४३ रोजीं हिंदुस्थानचें स्वतंत्र सरकारहि स्थापन केलें. जपानचा पराजय होण्याचीं चिन्हें होत असतां सुभाष बाबू सिंगापूरहून १६ ऑगस्ट १९४५ रोजीं विमानानें टोकियोला निघाले असतां विमानाला अपघात होऊन त्यांचें निधन झालें.
- २६ जानेवारी १८९७
--------------------------
(२) महात्मा गांधींची भीषण हत्या !
शके १८६९ च्या पौष व. ५ रोजीं जगद्बंद्य विभूति महात्मा गांधी यांचा अमानुषपणें खून करण्यांत आला. नित्याप्रमाणें सायंप्रार्थनेसाठी गांधीजी दिल्ली येथील बिर्लाभवनामध्यें प्रार्थनेच्या व्यासपीठाकडे जात असतां एका युवकानें त्यांच्यावर हातांतील पिस्तुलानें चार गोळ्या लागोपाठ झाडल्या. गांधीजी त्या क्षणींच खालीं पडले. लगबगीनें त्यांना बिर्लाभवनांत नेण्यांत आलें. परंतु कशाचाच उपयोग न होतां ५-४० वाजतां महात्मा गांधी आपल्या आवडत्या भारताला कायमचे सोडून गेले. सन १९१७ - १८ सालापासून सतत तीस वर्षे भारतालाच नव्हे तर सबंध विश्वाला प्रकाशित करणारी त्यांची प्राणज्योत विश्वतेजांत विलीन झाली ! सर सर्वपल्ली राधाकृष्णन, लॉर्ड पेथिक लॉरेन्स, मि. रेजिनॉल्ड, सोरेन्सन, जनरल स्मसट्, लॉर्ड हॅलिकॅक्स आदि जगांतील श्रेष्ठ व्यक्तींनीं महात्माजींना श्रद्धांजलि वाहिली. राष्ट्राचें केवळ राजकीय नुकसान झालें म्हणून नव्हे तर सर्व जगताला बंधुत्वाचा, अध्यात्माचा, अहिंसेचा संदेश पोचविणारा शांतिदूत गेला म्हणून सर्व जगतावर दु:खाची छाया पसरली. "आमच्या पौर्वात्य संस्कृतीचें अंतिम ध्येय गाधींच्या रुपानें अवतरलें आहे. यज्ञाला स्वत:ला. मनुष्यरुप घ्यावेसें वाटलें आणि तो गांधीच्या रुपानें अवतरला ..." असें जे कविवर्य रवींद्रनाथ टागोरांनीं म्हटलें होतें त्याचाच साक्षात्कार गेलीं तीस वर्षे महात्माजींच्या राजकीय वा सांस्कृतिक जीवनांत जगाला दिसून आला होता. जे. एच्. होम्स यांनीं गाधींची योग्यता उचित अशा शब्दांत सांगितली आहे कीं --- " जेव्हां मी गाधींचा विचार करतों तेव्हां माझ्यापुढें ख्रिस्त उभा रहातो; कारण ते ख्रिस्ताचें जीवन जगत आहेत, ते त्याचे शब्द बोलत आहेत, ते दु:ख सहन करीत आहेत, ते प्रयत्न करीत आहेत आणि एखादे दिवशीं तरी ईश्वराचें राज्य या भूमीवर यावें या ध्येयासाठीं ते देहत्याग करतील." महात्माजींच्या भीषण हत्येमुळें सर्व भरतखंडांत उदासवाणी छाया पसरली. जिकडे तिकडे शोकसागराला पूर आला. तेरा दिवसपर्यंत सबंध राष्ट्रानें सुतक पाळलें. गांधीजींची स्मशान-यात्रा अभूतपूर्व अशीच निघाली होती.
- ३० जानेवारी १९४८
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
TOP