पौष शुद्ध ७
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
(१) "त्याच स्थानीं मोल देउनी
स्वातंत्र्याच्या नरडीचें !"
शके १७२४ च्या पौष शु. ७ रोजीं प्रसिद्ध असा वसईचा तह होऊन त्या दिवशीं बाजीराव इंग्रजांचा सर्वस्वी गुलाम बनला व मराठी राज्याच्या काळजाचीं इंग्रजांच्या मध्यस्थीनें अनेक शकलें झालीं. यशवंतराव होळकरानें पुण्यावर चाल केली तेव्हां दुसरा बाजीराव रायगड, महाड या ठिकाणीं निघून गेला. त्या वेळीं होळकरांनीं विनंति केली -
"धनी गादिचे आपण, आम्ही चाकर पायाचे असतां
भिऊनी आम्हां, करित; हमामा सैरावैरा कां पळतां ?
धनीपणानें येऊन मानें, हिशोब घेणे दौलतिचा,
दर्शन द्यावें, धन्य करावें, हीच एक कीं मनि इच्छा"
परंतु ‘सती अहल्येच्या लेकरानें’ केलेली ही विनंति बाजीरावास मान्य झालीं नाहीं आणि मनांत फार घाबरल्यामुळें तो इंग्रजांच्या जहाजांत बसून ८ डिसेंबरला वसई येथें गेला. ज्या वसईचे ठाणें पूर्वी चिमाजीअप्पानें मोठा पराक्रम करुन घेतलें होतें.
"ह्याच स्थानीं मोल देउनी स्वातंत्र्याच्या नरडीचे
विकत घेतलें नामर्दानें रक्षण अपुल्या देहाचें !"
त्या वेळीं इकडे पुण्यास अमृतरावांच्या नांवानें कारभार सुरु झाला. होळकरांशी तह करण्यापेक्षां हातीं आलेल्या बाजीरावाशीं तह करणें अधिक इष्ट म्हणून कर्नल क्लोज हा वसईस गेला आणी त्याच्या तंत्रानें बाजीराव व इंग्रज यांमध्यें पौष शु. ७ ला वसईचा तह झाला. इंग्रजांचें सैन्य पदरीं बाळगावें, त्याच्या खर्चासाठीं इंग्रजांना मुलूख तोडून द्यावा, पेशव्यांनीं इतर युरोपियन पदरीं ठेवूं नयेत. सुरतेवरील ताबा मराठ्यांनीं सोडावा, इत्यादि कलमें या तहांत होतीं. या तहानें बाजीराव पेशवे इंग्रजांच्या हातांतील बाहुलें बनले. शिंदे, होळकर, भोंसले, यांना परम दु:ख झालें:- "धन्याचें धनीपण गमावल्याचें धन्याला दु:ख झालें नाहीं, इतकें चाकरांचें चाकरपण गमावल्यानें चाकरास झालें !"
- ३१ डिसेंबर १८०२
-----------------------
(२) महर्षि वि. रा. शिंदे यांचे निधन !
शके १८६५ च्या पौष शु. ७ रोजीं सुप्रसिद्ध अस्पृश्यतानिवारक; समाजशास्त्रज्ञ, भाग्यशास्त्रज्ञ व ध्येयवादी, त्यागी पुरुष महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचें निधन झालें. शिंदे यांचा जन्म जमखंडी येथे झाला असून तेथूनच हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजांत अभ्यास करुन हे बी.ए. झाले. पहिल्या एल् एल् बी. च्या परीक्षेनंतर शिंदे यांचा ओढा प्रार्थना समाजाकडे वळला व हे त्या संस्थेचे प्रचारक झाले. याच कार्यासाठीं यांना ‘युनिटेरियन’ शिष्यवृत्ति मिळून हे ऑक्सफर्ड येथील मॅचेस्टर कॉलेजात तुलनात्मक धर्माचें अध्ययन करण्यास गेले. लिव्हरपूल व अँमस्टरडँम या ठिकाणी भरलेल्या युनिटेरियन परिषदेस हे हजर होते. या वेळीं यांनी लिबरल रिलिजन इन् इंडिया हा निबंध वाचला होता. मायदेशीं परत आल्यावर यांनीं प्रार्थनासमाजाच्या प्रचारासाठीं तीन वेळां आसेतुहिमाचल प्रवास केला. ब्रह्मदेशांतहि हे जाऊन आले होते. यानंतर यांचे लक्ष अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे वळलें आणि यांनीं सन १९०६ मध्ये ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया ऊर्फ भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी’ या संस्थेची स्थापना केली. सर्व हिंदुस्थानांत या संस्थेच्या शाखा सुरु झाल्या. सर तुकोजी होळकर व मुंबई सरकार यांच्या मदतीनें एक लाख रुपये जमवून पुण्यास विद्यार्थी-वसतिगृह व अहल्याश्रम यांसारख्या इमारती यांनीं उभ्या केल्या. यांची वृत्ति पक्की राष्ट्रीय बाण्याची होती. म. गांधींनी यांना कॉंग्रेस वर्किंग कमिटींत घेतलें होतें. सन १९३० च्या चळवळींत भाग घेतल्याबद्दल यांना सहा महिन्यांची शिक्षाहि झाली होती. समाजांत आमूलाग्र सुधारणा व्हावी म्हणून यांनीं रात्रंदिवस खटपट केली. यांच्या ध्येयवादी व त्यागी वृत्तीमुळें लोक यांना महर्षि म्हणत. इतिहास व भाषा यांचा अभ्यासहि शिंदे यांनीं उत्कृष्टपणें केला होता. यांच्या लिहिण्य़ाबोलण्यांतहि माहितीचा सूक्ष्मपणा व ठसकेपणा आढळत असे. यांनीं लिहिलेलें आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
- २ जानेवारी १९४४
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP