पौष वद्य ४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


"सुरतेची बेसुरत जाली !"

शके १५८५ च्या पौष व. ४ रोजीं श्रीशिवाजी राजे यांनीं सुरत लुटून बादशहास चांगलीच दहशत बसविली. त्या वेळीं सुरत हें अत्यंत श्रीमंत शहर असून मोंगल बादशाहींतील पश्चिम किनार्‍यावरील व्यापाराचें मोठेंच ठिकाण होतें. त्यावर हल्ला करण्याचा विचार शिवाजीनें केला. बहिर्जी नाईक नांवाच्या चतुर हेरानें सर्व गुप्त बातमी आणली. जंजिर्‍याजवळ दंडा राजपुरीनजीक एक व कल्याण येथील दुसरी अशा दोन फौजा शिवाजीनें तयार केल्या आणि पौष व. ४ या दिवशीं अचानकपणें चार हजार स्वारांनिशीं शिवराय सुरतेवर येऊन पोंचले. सर्व लोकांच्या अंगांत धडकी भरली. इनायतखान शहरांतील मोंगली अमलदार होता. किनार्‍यावर इंग्रज व डच यांच्या वखारी होत्या. आदल्या दिवशीं शिवाजीनें नागरिकांना कळविलें, "इंग्रजी व एतद्देशीय व्यापारी किंवा इतर लोक यांस कोणत्याहि प्रकारें इजा पोंचविण्याची आमची इच्छा नाहीं. फक्त बादशहानें आमच्या मुलखावर हल्ला करुन लोक मारिले; आणि आमचें पुण्याचें वास्तव्य बंद पाडिलें, त्याचा वचपा घ्यावा, येवढाच आमचा हेतु आहे." शिवाजीचा दावा फक्त बादशहाशीं होता. त्यानें शिवाजीचा नायनाट करण्याचा प्रयत्न चालविला होता. तेव्हां त्याला हात दाखविणें क्रमप्राप्तच होतें. शिवाजीशीं कपटकारस्थान करण्याचा व त्याचा खून करण्याचा डावहि फसला. शिवरायांनीं त्या सर्वांना जबरदस्त शिक्षा दिल्या आणि पौष व. ४ रोजीं लुटीस प्रारंभ झाला. तीन-चार दिवसपर्यंत यथेच्छ लूट करण्यांत आली. चांदी, सोनें, मोतीं व जवाहीर यांची प्राप्ती मोठ्या प्रमाणावर झाली. शिवाजीच्या या कृत्यास कोणी कोणी ‘लुटारुपणा’ चा अर्थ चिकटवितात. परंतु येथें हें ध्यानांत घेतलें पाहिजे कीं, मोंगल सुभेदार पुण्यामध्यें खुद्द शिवाजीच्या वाड्यांत राहून हिंदु धर्म, हिंदु समाज यांचा उच्छेद करण्यास प्रवृत्त झाला होता त्याचा बंदोबस्त शिवाजीनें करावयाचा नाहीं तर कोणी ? औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला दहशत बसवण्यासाठीं याचा फार उपयोग झाला.

- ६ जानेवारी १६६४

N/A

References : N/A
Last Updated : October 03, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP