पौष वद्य ३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


रामचंद्रांनीं लंकेस वेढा दिला !

पौष व. ३ या दिवशी मदोन्मत्त रावणास शासन करण्यासाठीं श्रीरामचंद्रांनीं त्याच्या लंकेस वेढा दिला. लंकेचा राजा रावण अत्यंत जुलमी आणि गर्विष्ठ झाला होता. ब्रह्मदेवापासून अवध्यत्वाचा वर मिळाल्यावर त्यानें अनन्वित कृत्यें करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष कुबेराचाहि पराभव रावणानें केला. कैलास पर्वतावरील शंकरांना उपद्रव दिला. कुशध्वजाची मुलगी देववती ही तपस्विनी होती, तिच्यावर बलात्कार करुन रावणानें अधमपणाची सीमा गांठली. शेवटी जुलमाच्या व क्रूरतेच्या इमारतीवर कळस म्हणजे प्रत्यक्ष रामचंद्रांची पत्नी सीतादेवी हिलाच रावणानें पळवून नेली. रामानें त्याचें पारिपत्य करण्याचें ठरविलें. दक्षिणेंतील सुग्रीव, हनुमंत वगैरे रामास मदत करण्यास तयार झाले. मारुतीनें अशोक वनांतील सीतेचा शोध लावला. स्वारीची जय्यत तयारी सुरु झाली. प्रचंड शक्ति खर्च करुन सेतु बांधण्यांत आला. आणि राम, लक्ष्मण, सुग्रीव, बिभीषण, अंगद, हनुमान वगैरे लोकांनीं समुद्रपार होऊन लंकेस वेढा दिला. रावणास ही सर्व वार्ता समजलीच. त्यानें रामाचें मायावी शिर उत्पन्न करुन तें सीतेपुढें आणलें व तो तिला म्हणाला, "मूर्ख स्त्रिये, हें पहा, माझा सेनापति ग्रहस्त यानें रामाचें शिर तोडून आणलें आहे. आतां तरी हट्ट सोड." परंतु रावणाच्या या कपटविद्येचा कांहींहि उपयोग झाला नाहीं. कोणाचेंहि न ऐकतां रावणानें युद्ध करण्याचा निश्चय केला. रामचंद्रांनींहि आपल्या सैन्याची व्यवस्था चांगलीच ठेवली. पूर्वेकडील दरवाजावर नील, दक्षिणेकडील दरवाजावर अंगद व पश्चिमेकडील दरवाजावर हनुमान यांची नेमणूक करुन खुद्द आपण लक्ष्मनासहित उत्तरेकडील दरवाजावर राहिले व सर्वांना मदत करणार्‍या सैन्याच्या विभागावर राजा सुग्रीव, जांबवान्‍, बिभीषण यांची नेमणूक केली. याप्रमाणें सर्व व्यवस्था होऊन लंकेचा वेढा दृढ झाला. रावणाच्या जुलमी कारकीर्दीची शंभर वर्षे भरत आलीं होतीं.

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP