पौष शुद्ध १५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
डॉ. शरच्चंद्र चतर्जी यांचें निधन !
शके १८५९ च्या पौष शु. १५ रोजी आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळविणारे बंगालचे विख्यात कादंबरीकार डॉ. शरच्चंद्र चतर्जी यांचें निधन झालें. कविश्रेष्ठ रवीन्द्रनाथ ठाकूर हे अमीर उमरावांचे कवि होते. पण बंगालमधील दलित समाजाचें दर्शन घडविणारा श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून चतर्जींचा लौकिक आहे. चतर्जीचे बहुतेक सर्व आयुष्य दारिद्र्याशीं झगडण्यांत गेलें. घरांतून बाहेर पडून संन्यासी होऊन हे अनेक ठिकाणीं फिरले. अनेक दलित, पतित व्यक्तींचे निरीक्षण केलें आणि वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी गृहहीन, धनहीन व उदास अशा स्थितींत शरच्चंद्र ब्रह्मदेशांत गेले. तेथेंहि अनेक आपत्तींना तोंड देत देत एका सरकारी हपिसांत लहानशा पगारावर कारकून म्हणून राहिले, आणि आपल्या संगीतप्रियतेमुळें अधिकार्यांची कृपा संपादन करुन थोडी शांतता मिळवली व त्यांच्याच ग्रंथालयांतील भिल्ल, कॅण्ट, हेगेल, आदि तत्त्ववेत्त्यांची पुस्तकें त्यांनी वाचून काढलीं. रवींद्रांच्या उत्तमोत्तम ग्रंथांचा अभ्यास केला. त्यानंतर कलकत्त्याच्या ‘यमुना’ मासिकांत अनेक मित्रांच्या आग्रहावरुन त्यांची एक गोष्ट प्रसिद्ध झाली आणि त्यांना किर्ती मिळाली. बडी दिदी, परिणीता, चंद्रनाथ, श्रीकांत, दत्ता या कादंबर्यांमुळें त्यांचे नांव सबंध बंगल्यांत प्रसिद्ध झालें. ‘पाथेर दबी’ ही यांची सुप्रसिद्ध कादंबरी. ही आणि तिचें मराठी भाषांतर ‘भारती’ कित्येक दिवस सरकारनें जप्त केलें होतें. समाजांतील पतित व्यक्तींच्या अंत:करणांतील हळुवार भावना अति सूक्ष्मपणें रेखाटून त्यांचे स्वभाव साकार आणि सगुण करणें हे त्यांच्या कादंबर्यांचे वैशिष्ट्य आहे. समाजांतील सर्व थरांतील पात्रांचे उत्कृष्ट स्वभावरेखन यांच्या वाड्मयांत सांपडतें. चतर्जी म्हणत, - "मी समाजासाठीं लिहितो, आणि रवीन्द्रबाबू माझ्यासाठी लिहितात." यांच्या चाळीस-पंचेचाळीस कादंबर्यांपैकी बर्याच कादंबर्यांची इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, गुजराथी, मराठी आदि भाषांतून भाषांतरे झाली आहेत. ‘देवदास’, ‘काशिनाथ’, ‘सव्यसाची,’ ‘बडी दिदी’ ‘छोटाभाई’ इत्यादि चित्रपटांतील कथानकें यांचींच आहेत.
- १६ जानेवारी १९३८
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP