पौष शुद्ध ५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


तैमूरलंगाची भारतावर स्वारी !

शके १२७० च्या पौष शु. ५ रोजीं मनुष्यजातीचा शत्रु म्हणून प्रसिद्ध असलेला तैमूरलंग यानें हिंदुस्थानवर स्वारी करुन दिल्ली जिंकली ! तैमूरलंग जातीनें तुर्क असून त्याच्या ठिकाणी तीव्र बुद्धि व अचाट धाडस या गुणांचे वास्तव्य होतें. पूर्वायुष्यांत अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देऊन हा ऐश्वर्यास चढला. आपल्या जीवितांत यानें एकंदर पस्तीस स्वार्‍या केल्या. सर्व जगावर स्वामित्व असावें ही याची जबर इच्छा. अफगाणिस्तान ताब्यांत आल्याबरोबर याची दृष्टि ‘सुवर्णमय भारता’ कडे वळली. तैमूरच्या सहकार्‍यांत मतभेद झाले तरी त्यानें स्वारी निश्चित केली. तो आत्मचरित्रांत लिहितो, "हिंदुस्थानच्या काफर लोकांवर स्वारी करुन त्यांस इस्लामी धर्मांत आणावें, त्यांचीं मंदिरें व मूर्ति नाहींशा कराव्या, आणि ‘गाझी’ हें सन्मान्य नांव मिळवावें, अशी माझी फार इच्छा आहे." याप्रमाणें शके १२७० मध्यें तैमूर समर्कदहून हिंदुस्थानांत येण्यास निघाला. चिनाब व रावी यांच्या संगमावरील सर्व लोकांना यानें कापून काढिलें. अनेक ठिकाणी त्यानें भयंकर कत्तली केल्या आणि थोड्याच अवधींत याची धाड पानपतावरुन दिल्लीवर आली. दिल्लीचा सुलतान महंमूदशहा व त्याचा वजीर मल्लू इक्बालाखान यांनींहि तयारी केली. अल्लाची प्रार्थना करुन तैमूरनें युद्धास सुरुवात केली. यांत महंमूदचा पराभव झाला. तैमूरकडे दिलीचें बादशाही तख्त आलें. तैमूरच्या लोकांनीं या वेळीं केलेली लूट व कत्तल यास इतिहासांत तोड नाहीं. "रस्त्यांतून जाण्यास मार्ग नाहीं इतक्या प्रेतांच्या राशी शहरभर पसरल्या. हिरें, माणकें, मोत्यें, सोनें, चांदी, वगैरे लूट किती जमा झाली याची गणति नाहीं. पकड, लूट, हाणमार यांशिवाय कोणासच कांही सुचत नव्हतें." तैमूरला या प्रकाराबद्दल वाईट वाटलें नाहीं. त्यानें ईश्वरास प्रार्थना केली, " देवा ! हिंदुस्थानांतील माझी कामगिरी त्वां सिद्धीस नेलीस. काफर लोकांशी लढून परलोकसाधन करावें, आणि संपत्ती लुटावी हीं दोनहि कार्यें पूर्ण झालीं. धर्माकरितां लूट करणें हें मुसलमानांचे बाळकडूच आहे."

- १४ डिसेंबर १३४८

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP