पौष शुद्ध ६
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
न्या. माधवराव रानडे यांचा जन्म !
शके १७६४ च्या पौष शु. ६ रोजीं हिंदुस्थानांतील प्रसिद्ध राजकारणी, समाजसुधारक, दूरदृष्टीचे विवेचक, अर्थशास्त्रज्ञ व स्वतंत्र भारताचे द्रष्टे न्यायमूर्ति माधव गोविंद रानडे यांचा जन्म झाला. पेशवाईच्या अखेरीस कोंकणांतील मोभार पाचोरी गांवाहून यांचें घराणें देशावर आलें. माधवरावांचे निपणजे भगवंतराव यांनी पंढरपूरास वास्तव्य करुन आपला जम बसविला. भगवंतरावांचा मुलगा भास्कर आप्पा यांनी आपला ज्योतिषाचा धंदा सोडून शिपाईगिरींत नांव कमाविलें. यांचे चिरंजीव अमृतराव; आणि यांचे चिरंजीव म्हणजे माधवरावांचे वडील गोविंदराव. हे अहमदनगर जिल्ह्यांतील दुय्यम कलेक्टरच्या हाताखालीं कारकून होते. माधवरावांच्या बालपणीची एक विलक्षण घटना नमूद करण्यासारखी आहे. त्यांची मातु:श्री गोपिकाबाई ही आपल्या तीन वर्षांच्या लहानग्या माधवास घेऊन निफाडहून कोल्हापुरास निघाली होती. त्या वेळीं दळणवळणाचीं साधनें आजच्यासारखी नव्हती. गोपिकाबाई बैलगाडीनेंच निघाल्या होत्या. दिवसभर विश्रांति घेऊन रात्रीचा प्रवास त्या वेळीं सुखकर होत असे. मार्गात एक घाट होता, त्यांतून शिळोप्याच्या सुमारास ‘माधवा’ चा प्रवास सुरु झाला. डोंगराच्या थंड हवेमुळें गाडींतील सर्व मंडळींना झोंप लागली. उतरणीवरुन बैल भरधांव पळत होते. या वेळीं पांघरुणांत गुरफटलेले माधवराव एखाद्या गांठोड्याप्रमाणें खालीं पडले. कोणालाहि याचा मागमूस नव्हता. वेळ रात्रीची होती. निर्मानुष प्रदेश असल्यामुळें माधवरावांचा चरित्रक्रम येथेंच आटोपण्याची वेळ आली होती.परंतु या माधवाच्या हातून अलौकिक कामगिरी व्हावयाची असल्यामुळें हा भयानक प्रसंग टळला. त्यांचे चुलते घोड्यावरुन येत होते. कोणा मुलाच्या रडण्याचा आवाज आला म्हणून ते पाहतात तों लहानगा माधव ! "मोठी खैर झाली" म्हणून त्यांनी त्याला उचलून घेतलें. याच माधवानें पुढें अलौकिक पराक्रम केला. त्यांनीं आपल्या अद्वितीय विद्वत्तेनें, धोरणानें, कर्तबगारीनें राष्ट्राला नवें वळण लाविलें.
- १८ जानेवारी १८४२
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP